-उमाजी म. केळुसकर ⬑ नाट्य-चित्ररंग ⬉
शांता शेळके, मराठी साहित्य क्षेत्रातील एक तळमळीची, प्रतिभासंपन्न कवयित्री आणि लेखिका. शांता शेळके, हे नाव उच्चारताच एक हळुवार, मधुर स्वर कानावर पडतो, आणि डोळ्यासमोर निसर्गाचे, भावनांचे आणि जीवनातील विविध छटांचे मनमोहक चित्र उभे राहते. सौंदर्यदृष्टी, रसिकता आणि सहजता ही शांताजींच्या साहित्याची अविस्मरणीय वैशिष्ट्ये होती, ज्यांनी मराठी जनांच्या मनावर गारुड केले. त्यांनी केवळ कविताच लिहिल्या नाहीत, तर त्या जगल्या. त्यांच्या प्रत्येक शब्दात जीवनातील सौंदर्य, मानवी भावनांची खोली आणि साध्यासुध्या गोष्टींमधील आनंद अनुभवता येतो. त्यांचे साहित्य म्हणजे केवळ अक्षरांची मांडणी नव्हे, तर ते त्यांच्या संवेदनशील मनाचे, रसिक वृत्तीचे आणि प्रतिभावान लेखणीचे प्रतिबिंब होते. आज त्यांची त्यांची २३ वी पुण्यतिथी त्यानिमित्त हा लेख.
शांता शेळके यांचा जन्म १२ ऑक्टोबर १९२२ रोजी इंदापूर येथे झाला. त्यांचे बालपण खेड, मंचर या परिसरात, तसेच वडिलांच्या बदलीच्या नोकरीमुळे चिखलदरा, नांदगाव, खर्डी अशा विविध ठिकाणी व्यतीत झाले. वडील रेंज फॉरेस्ट ऑफिसर, तर आजोबा शाळामास्तर. घरात शिक्षणाचे आणि वाचनाचे संस्कार उपजतच होते. आईच्या मृदू स्वभावाचा, तिच्या चित्रकलेचा आणि वाचनवेडाचा कळत-नकळत शांताबाईंवर प्रभाव पडला. लहानपणी आजोळी ऐकलेली पारंपरिक गीते, ओव्या आणि श्लोक त्यांच्या मनात कवितेची बीजे रोवत गेली. वयाच्या नवव्या वर्षी पितृछत्र हरपल्यानंतर, पुण्याच्या हुजुरपागेत मिळालेले सुसंस्कृत आणि सुविद्य वातावरण, तसेच स. प. महाविद्यालयात प्रा. श्री. म. माटे, प्रा. के. ना. वाटवे, प्रा. रा. श्री. जोग यांच्यासारख्या गुरुजनांचे मार्गदर्शन त्यांना लाभले. या काळात त्यांना केवळ अभ्यासाच्या पुस्तकांपलीकडील अवांतर वाचनाची आणि कवितेची गोडी लागली. महाविद्यालयाच्या नियतकालिकासाठी लिहिलेल्या एका लेखावर प्रा. माटे यांनी दिलेल्या अभिप्रायामुळे त्यांना लेखनासाठी हुरूप आला आणि येथूनच त्यांच्या साहित्यिक प्रवासाला खऱ्या अर्थाने सुरुवात झाली. बी.ए. झाल्यावर लगेचच प्रकाशित झालेला ‘मुक्ता आणि इतर गोष्टी’ हा त्यांचा पहिला कथासंग्रह, प्रा. माटे यांच्या प्रस्तावनेने अधिकच मोलाचा ठरला. १९४४ मध्ये संस्कृतमध्ये एम.ए. करत असताना त्यांना तात्यासाहेब केळकर सुवर्णपदक मिळाले, जे त्यांच्या विद्वत्तेची साक्ष देणारे होते.
पदव्युत्तर शिक्षणानंतर आचार्य अत्रे यांच्या ‘समीक्षक’ मासिक, ‘नवयुग’ साप्ताहिक आणि ‘दैनिक मराठा’ मध्ये त्यांनी दोन-तीन वर्षे काम केले. या अनुभवाने त्यांना विविध प्रकारच्या लेखनाची शिदोरी मिळाली आणि साहित्याच्या अनेक बारकाव्यांची ओळख झाली. त्यानंतर नागपूरचे हिस्लॉप कॉलेज, मुंबईचे रुईया आणि महर्षी दयानंद महाविद्यालय येथे अनेक वर्षे अध्यापन करून त्यांनी पुढील पिढी घडविण्यातही मोलाचे योगदान दिले.
शांताबाईंची साहित्यसंपदा विपुल आणि वैविध्यपूर्ण आहे. कविता, गीत, चित्रपटगीत, कथा, कादंबरी, बालसाहित्य अशा विविध साहित्यप्रकारांत त्यांची जवळपास शंभर पुस्तके प्रकाशित झाली आहेत. ‘वर्षा’ (१९४७) हा त्यांचा पहिला काव्यसंग्रह असला तरी, ‘रूपसी’, ‘तोच चंद्रमा’, ‘गोंदण’, ‘अनोळख’, ‘कळ्यांचे दिवस, फुलांच्या राती’, ‘जन्मजान्हवी’, ‘चित्रगीते’, ‘पूर्वसंध्या’, ‘इत्यर्थ’ यांसारख्या काव्यसंग्रहांनी मराठी कवितेत एक वेगळीच उंची गाठली. कथासंग्रहांमध्ये ‘मुक्ता’, ‘गुलमोहोर’, ‘प्रेमिक’, ‘काचकमळ’, ‘सवाष्ण’, ‘अनुबंध’, ‘बासरी’, तसेच बालकांसाठी ‘कविता करणारा कावळा’, ‘सागरिका’ हे विशेष उल्लेखनीय आहेत. ‘विझली ज्योत’, ‘नरराक्षस’, ‘पुनर्जन्म’, ‘धर्म’, ‘ओढ’ यांसारख्या कादंबऱ्या, तर ‘शब्दांच्या दुनियेत’, ‘आनंदाचे झाड’, ‘धूळपाटी’, ‘पावसाआधीचा पाऊस’, ‘एकपानी’, ‘वडीलधारी माणसे’, ‘संस्मरणें’, ‘मदरंगी’, ‘सांगावेसे वाटले म्हणून’ यांसारखे ललितलेखन हे त्यांच्या समृद्ध प्रतिभेचे द्योतक आहेत. ‘धूळपाटी’ हे त्यांचे आत्मपर लेखन त्यांच्या अंतर्मुख व्यक्तिमत्त्वाची ओळख करून देते. त्यांनी अनेक अनुवादही केले, ज्यामध्ये ‘तालपुष्कर’, ‘आंधळ्याचे डोळे’, ‘औट घटकेचा राजा’, ‘चौघीजणी’, ‘गाठ पडली ठका ठका’, ‘गवती समुद्र’, ‘आंधळी’, ‘गाजलेले विदेशी चित्रपट’, ‘पाण्यावरल्या पाकळ्या’, ‘मेघदूत’ यांचा समावेश आहे. त्यांनी केवळ अनुवाद न करता, अनुवादित कृतीला स्वतंत्र निर्मितीच्या जवळपास नेण्याचा प्रयत्न केला, ज्यामुळे वाचकाला पुनर्निर्मितीचा आनंद मिळाला.
शांताबाईंचे पहिले आणि खरे प्रेम कवितेवरच राहिले. त्यांच्या कवितेत हळूवार भावकवितेपासून ते नाट्यगीते, भक्तीगीते, कोळीगीते, बालगीते, चित्रपटगीते, प्रासंगिक गीते अशा अनेक रूपांचे दर्शन घडते. ‘रेशमाच्या रेघांनी लाल काळ्या धाग्यांनी’ यांसारख्या लावणीमुळे त्या मराठीतील पहिल्या स्त्री लावणीकार ठरल्या. त्यांची पहिली कविता १९४१ मध्ये ‘शालापत्रक’ मासिकात छापून आली. सुरुवातीला माधव जूलिअन यांच्या काव्याचा त्यांच्यावर प्रभाव असला तरी, ‘गोंदण’ (१९७५) पासून त्यांची कविता कुणाच्याही अनुकरणापासून दूर जाऊन अधिक अंतर्मुख, चिंतनशील आणि प्रगल्भ बनली. बालपणाच्या आठवणी, प्रेम वैफल्य, मानवी अपुरेपणा, एकाकीपण, मनाची हुरहूर, सृष्टीची गूढता हे काव्यविषय त्यांच्या नंतरच्या कवितेत प्रतिमांच्या माध्यमातून अधिक प्रभावीपणे वाचकांसमोर आले. वृत्तबद्ध कविता, गीते, बालगीते, सुनीते आणि मुक्तछंद रचना अशा सर्व प्रकारांवर त्यांचे प्रभुत्व होते. ग. दि. माडगूळकरांप्रमाणेच उत्कृष्ट भावानुकूल चित्रपट गीते लिहिणारी गीत लेखिका म्हणून त्यांना प्रसिद्धी मिळाली. भालजी पेंढारकर, दिनकर द. पाटील, लता मंगेशकर, सुधीर फडके, हृदयनाथ मंगेशकर, सलील चौधरींसारख्या अनेक संगीत दिग्दर्शकांसाठी त्यांनी चालीबरहुकूम गीते लिहिली. हृदयनाथ मंगेशकरांनी संगीतबद्ध केलेली ‘वादळवारं सुटलं गं’, ‘वल्हव रे नाखवा’, ‘राजा सारंगा, राजा सारंगा’ ही गीते तर अजरामर झाली. जितेंद्र अभिषेकी यांनी संगीत दिलेल्या ‘वासवदत्ता’ आणि ‘हे बंध रेशमाचे’ या दोन्ही नाटकांसाठी त्यांनी गाणी लिहिली. संतांच्या काव्यातील सात्विकता, पंडितांच्या काव्यातील विद्वत्ता आणि शाहिराच्या काव्यातील ललितमधुर उन्मादकता त्यांच्या कवितेत आढळते.
त्यांच्या कथांमध्ये बालपणी अनुभवलेल्या ग्रामीण जीवनाचे आणि प्रौढपणीच्या शहरी जीवनातील अनुभवांचे सुंदर शब्दचित्रण आहे. मनोविश्लेषण किंवा धक्कातंत्राचा वापर न करता, त्यांच्या कथा अगदी सहजपणे रोजच्या अनुभवांप्रमाणे अभिव्यक्त होतात. हेच त्यांच्या ललित लेखनाबद्दलही म्हणता येईल. रोजच्या दैनंदिन अनुभवाला एक मानवी आणि वैश्विक स्तर देऊन त्यांनी चिंतनशीलतेतून आपले विचार मांडले. मानवी जीवनाकडे बघण्याची कुतूहलपूर्ण दृष्टी आणि मानवी स्वभावाविषयीची उत्सुकता त्यांच्या लेखनातून स्पष्ट दिसते. सौंदर्यदृष्टी, रसिकता, मानवी मनोभूमिका आणि सहजता ही शांता शेळके यांच्या साहित्याची प्रमुख वैशिष्ट्ये आहेत. त्यांनी अवतीभोवतीचा सामाजिक आणि सांस्कृतिक अवकाश याच सौंदर्यदृष्टीतून आणि सहजतेतून अभिव्यक्त केला.
त्यांच्या या अतुलनीय योगदानाला अनेक पुरस्कारांनी गौरवण्यात आले. डेक्कन बालमित्र मंडळाचा यशवंतराव चव्हाण पुरस्कार (१९८८), कॉन्टिनेन्टल प्रकाशनाचा कुसुमाग्रज पुरस्कार (१९९१), ग. दि. माडगुळकर पुरस्कार (१९९४) हे त्यापैकी काही. सर्वात महत्त्वाचे म्हणजे, १९९६ मध्ये आळंदी येथे भरलेल्या ६९ व्या साहित्य संमेलनाच्या अध्यक्षा म्हणून त्यांना सन्मानित करण्यात आले, जो त्यांच्या साहित्यिक कारकिर्दीतील एक महत्त्वाचा टप्पा होता.
शांता शेळके या केवळ एक लेखिका नव्हत्या, तर त्या एक संवेदनशील व्यक्तिमत्त्व होत्या, ज्यांनी शब्दांना जीवंत केले. त्यांची प्रत्येक निर्मिती वाचकाला आत्मचिंतनाकडे घेऊन जाते, जीवनातील सौंदर्य आणि गूढता अनुभवण्याची दृष्टी देते. आज त्या आपल्यात नसूनही, त्यांचे शब्द, त्यांची कविता, त्यांची गाणी, त्यांच्या कथा आणि त्यांचे ललितलेखन आजही आपल्याला प्रेरणा देत आहेत, आजही आपल्याला शांततेने आणि सहजतेने जगण्याचा अर्थ समजावून देत आहेत. ‘जन्मजान्हवी’ खऱ्या अर्थाने शांता शेळके होत्या, कारण त्यांनी आपल्या लेखनातून ज्ञान आणि सौंदर्याची एक पवित्र गंगा अखंड प्रवाहित ठेवली. त्यांचे स्मरण करून, आपण त्यांच्या साहित्यकृतींचा आस्वाद घेत राहणे हेच त्यांना खरी आदरांजली ठरेल.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा