शुक्रवार, ६ जून, २०२५

रोहित पाटील : मातीचा गंध, संगीताचा नाद

-उमाजी म. केळुसकर ⬑ नाट्य-चित्ररंग ⬉

          
रायगडच्या भूमीतून, अलिबागच्या मातीतून उदयास आलेले, लोणारे येथील  एक तळमळीचे व्यक्तिमत्व, ज्यांनी आपल्या गायकीने आणि संगीताने रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवले आहे, ते म्हणजे
रोहित पाटील. छत्रपती शिवाजी महाराज यांच्यावरील 'माझ्या देवाचं नाव गाजतंय' या अजरामर गाण्याने घराघरात पोहोचलेले रोहित पाटील हे केवळ गायक आणि संगीतकार नाहीत, तर छत्रपती शिवाजी महाराजांचे निस्सीम भक्त आणि आपल्या मातीशी, संस्कृतीशी घट्ट जोडलेले एक कलावंत आहेत. त्यांच्या कलाप्रवासातील समर्पण, महाराजांवरील श्रद्धा आणि आपल्या मातीशी असलेली त्यांची निष्ठा यातून त्यांच्या व्यक्तिमत्त्वाची अनेक पैलू समोर येतात.

          'माझ्या देवाचं नाव गाजतंय' हे गाणे रोहित पाटील यांच्या कारकिर्दीतील एक मैलाचा दगड ठरले आहे. या गाण्याच्या निर्मितीमागे एक अद्भुत शक्ती होती, असे ते मानतात. पनवेल-पेण परिसरातून जात असताना, एका गाडीवर महाराजांचा फोटो आणि त्यावर 'आमचा देव' हे शीर्षक पाहिल्यावर त्यांना 'माझ्या देवाचं नाव गाजतंय गडकिल्ल्यांच्या दगडावर' ही ओळ सुचली. छत्रपती शिवाजी महाराजांना ते देवापेक्षाही श्रेष्ठ मानतात, कारण त्यांनी हिंदू संस्कृती वाचवली आणि मंदिरांचे रक्षण केले. अलिबागमध्ये महाराजांचे मंदिर उभारण्याचे त्यांचे स्वप्न आहे. विशेष म्हणजे, बाईकवरून पनवेलपर्यंत जाताना त्यांनी हे गाणे लिहिले आणि ते आज ५० कोटींपेक्षा जास्त लोकांनी ऐकले आहे. त्यांच्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज हे केवळ एक ऐतिहासिक व्यक्तिमत्व नसून, एक देव आणि अखंड प्रेरणास्रोत आहेत. त्यांच्या नावानेच ते प्रत्येक कार्यक्रमाची आणि नवीन कामाची सुरुवात करतात.

         रोहित पाटील यांचा संगीत क्षेत्रातील प्रवास सुरुवातीला संघर्षाचा होता. ते लहानपणापासूनच पखवाजवादक आहेत आणि त्यांनी पखवाजमध्ये विशारद पदवी घेतली आहे. संगीताच्या अनेक परीक्षाही त्यांनी दिल्या आहेत. विशाल अभंगी, वैभव थोरवे, अशोक अभंगे, विक्रांत वार्डे यांसारख्या गुरुंकडून त्यांनी संगीताचे धडे गिरवले आहेत. संगीत हे एक अथांग महासागर आहे, असे ते मानतात आणि अजूनही गाणं म्हणजे काय हे पूर्णपणे कळले नसल्याची त्यांची नम्र भावना आहे. २००८ साली योगेश काळभोर यांनी त्यांना ऑर्केस्ट्रात पहिली संधी दिली आणि मानकुळे गावात विक्रांत वार्डे यांच्या कार्यक्रमातून त्यांचा संगीतमय प्रवास खऱ्या अर्थाने सुरू झाला. बालपणी माळवी मॅडमने त्यांना गायला दिलेले 'दिवस तुझे फुलायचे' हे भावगीत त्यांच्यासाठी अविस्मरणीय आठवण आहे. लहानपणी पखवाज घेण्यासाठी पैसे नसताना मोहन पाटील यांनी त्यांना मदत केली होती, हे ते कृतज्ञतेने सांगतात. विशाल दळवी आणि वैभव दळवी यांच्याकडून त्यांनी गीतकार म्हणून शब्दांचे बारकावे शिकले, तर प्रल्हाद पाटील आणि रमेश घरत यांच्यासोबत भजनातून त्यांनी गायन व पखवाजचा सराव केला. हरिश्चंद्र लोणारकर, विजय पाटील, प्रताप पाटील यांसारख्या दिग्गजांकडून त्यांना पखवाजचे ज्ञान मिळाले.

             कुटुंबाचा, विशेषतः पत्नी, आई, बहीण आणि भाऊ यांचा त्यांना नेहमीच आर्थिक आणि मानसिक आधार मिळाला आहे. त्यांना कोणतीही व्यसने नाहीत, ही गोष्ट ते अभिमानाने सांगतात आणि नवोदित कलाकारांना व्यसनांपासून दूर राहण्याचा सल्ला देतात, कारण व्यसनांमुळे गायनक्षमतेवर परिणाम होतो. कॉलेजमधूनच त्यांना गाण्याची जास्त आवड निर्माण झाली. कॉलेजच्या गॅदरिंग्समध्ये त्यांनी 'उन्मेश तरुणाई' नावाचे गाणे गायले होते. युथ फेस्टिव्हलमध्ये सहभाग घेतल्याने त्यांना महाराष्ट्रातील विविध कॉलेजेसच्या गाण्यांचा अनुभव मिळाला. विक्रांत वार्डे यांच्या 'शाळेत' त्यांनी नाटक, गायन, पखवाज, हार्मोनियम आणि डान्स या सर्व गोष्टींची शिकवण घेतली.

           'रामदास निघाली' हे गाणे त्यांच्या हृदयाच्या खूप जवळचे आहे. १९४७ साली झालेल्या रामदास बोटीच्या अपघातावर आधारित हे अत्यंत भावनिक गाणे आहे, ज्यात रेवसच्या कोळी बांधवांनी ७२५ प्रवाशांचे प्राण वाचवले होते. ही कहाणी ऐकल्यानंतर त्यांनी या घटनेवर गाणे बनवण्याचा निर्णय घेतला. गाण्याची पहिली ओळ 'धनी येणार कधी तुम्ही घरी परतोनी तशी होते जीवाला होरघूर काळजातून' त्यांना सुचली. हे गाणे रायगडमध्ये त्यांचे पहिले सुपरहिट गाणे ठरले. 'खंदेरीचे माझे येताल देवा' हे गाणेही त्यांच्या सुरुवातीच्या व्यावसायिक यशातील महत्त्वाचे गाणे आहे. हे गाणे त्यांनी योगेश आग्रावकर यांच्यासोबत भजनातून गुणगुणत लिहिले होते आणि योगेश आग्रावकर  यांच्या आवाजातील हे गाणे त्यांचे पहिले व्यावसायिक आणि सुपरहिट गाणे ठरले. या गाण्यामुळे खंदेरीचा वेताळ देवही प्रसिद्ध झाला.

          सुरेश वाडकर यांच्या घरी जाऊन त्यांना आपले गाणे ऐकवण्याची संधी मिळाली, जी त्यांच्यासाठी एक मोठी उपलब्धी होती. 'असा नाखवा होणार नाही' या गाण्यासाठी त्यांना गीतकार आणि संगीतकार असे दोन 'मीमा' पुरस्कार मिळाले. अशोक पतकी, स्वप्नील बांदोडकर, बेला शेंडे यांसारख्या दिग्गजांनी या पुरस्कारांचे परीक्षण केले होते, ज्यामुळे या यशाचे महत्त्व अधिक वाढले. नवीन पिढीला रोहित पाटील सल्ला देतात की, केवळ एक-दोन स्टेज मिळाल्यावर किंवा एखादे गाणे रेकॉर्ड केल्यावर लगेच आत्मविश्वास वाढवू नये, तर गाण्याची खोलवर शिकवण घेणे महत्त्वाचे आहे. 'अळवावरचं पाणी' असणाऱ्या या क्षेत्रात प्रसिद्धी आणि पैसा कधीही टिकत नाही, त्यामुळे गाणी अशी बनवावीत की ती महाराष्ट्राबाहेरही वाजतील. त्यांचे 'एकच राजा' हे गाणे खानदेशातही लोकप्रिय झाले आहे, हे ते अभिमानाने सांगतात.

           सध्या रोहित पाटील एका नवीन संकल्पनेवर काम करत आहेत – छत्रपती शिवाजी महाराजांवरील पहिला अभंग. त्यांच्यासाठी शिवाजी महाराजच देव असल्याने ते 'शिवशंभू गाथा' या कार्यक्रमासाठी हे टायटल साँग बनवत आहेत. भविष्यात हजारो शाळांमध्ये हा कार्यक्रम ते विनामूल्य सादर करणार आहेत, जिथे वैभव थोरवे, सागर म्हात्रे यांसारखे कलाकार त्यांच्यासोबत गाणार आहेत. 'माझ्या रायगडचे आम्ही वारकरी, शिवराय माझे पांडुरंग हरी.' हा अभंग 'एकच राजा' पेक्षाही हिट होईल असा त्यांना विश्वास आहे. रोहित पाटील यांचा संगीत प्रवास, छत्रपती शिवरायांशी असलेले त्यांचे अतूट नाते आणि त्यांच्या मातीवरील निष्ठा यातून त्यांचे व्यक्तिमत्व उजळून दिसते. त्यांच्या पुढील वाटचालीस खूप खूप शुभेच्छा!

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा