खारावारा लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
खारावारा लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

रविवार, ३ ऑगस्ट, २०२५

अवयवदान हे जीवनाचे वरदान

-उमाजी म. केळुसकर ⬑ खारावारा ⬉


जीवनाचे गूढ उलगडताना, आपण अनेकदा विचार करतो की अस्तित्वाचा अर्थ काय? आपल्या आयुष्याचा उद्देश काय? या प्रश्नांची उत्तरे अनेक असली तरी, एक गोष्ट मात्र निश्चित आहे ती म्हणजे, आपल्या असण्याने जर दुसऱ्याच्या जीवनात प्रकाश येऊ शकत असेल, तर त्याहून मोठा सत्कार दुसरा कोणताही नाही. आपल्या भारतीय संस्कृतीत, परोपकाराला आणि त्यागाला नेहमीच सर्वोच्च स्थान दिले गेले आहे. महष दधीची ऋषींचे उदाहरण याच त्यागाचे एक चिरंतन प्रतीक आहे. इंद्राला वृत्रासुर राक्षसाचा वध करण्यासाठी एका विशिष्ट शस्त्राची गरज होती, जे केवळ दधीची ऋषींच्या अस्थींपासूनच बनवता येऊ शकत होते. लोककल्याणासाठी, स्वतःच्या प्राणाची आहुती देऊन दधीची ऋषींनी आपली अस्थी दान केल्या, ज्यामुळे वज्र (वज्रायुध) तयार झाले आणि वृत्रासुराचा वध होऊन सृष्टीचे रक्षण झाले. दधीची ऋषींनी आपले जीवन दुसऱ्यांसाठी समर्पित केले, त्याचप्रमाणे अवयवदान हे आपले शरीर दुसऱ्याच्या जीवनासाठी समर्पित करण्याचेच एक आधुनिक रूप आहे. ही केवळ एक कथा नाही, तर ती मानवतेसाठी स्वतःला झोकून देण्याची प्रेरणा आहे.

      आज, ३ ऑगस्ट रोजी, आपण याच सत्कार्याचा, म्हणजेच राष्ट्रीय अवयवदान दिनाचा उत्सव साजरा करत आहोत. हा केवळ एक कॅलेंडरमधील दिवस नाही, तर तो आशा, त्याग आणि मानवतेच्या विजयाचा एक महत्त्वाचा क्षण आहे. भारतातील पहिले यशस्वी मृत-दाता हृदय प्रत्यारोपण ३ ऑगस्ट १९९४ रोजी झाले या ऐतिहासिक घटनेच्या स्मरणार्थ ३ ऑगस्ट रोजी साजरा केला जातो. हा बदल केवळ तारखेचा नसून, तो या महान कार्याचे महत्त्व अधोरेखित करतो आणि देशात अवयवदानाबद्दल अधिक जागरूकता निर्माण करण्याचा प्रयत्न करतो. विशेषतः यंदा, महाराष्ट्रामध्ये ३ ते १५ ऑगस्ट २०२५ दरम्यान अवयवदान सप्ताह साजरा करण्यात येणार असल्याने, या चळवळीला आणखी गती मिळणार आहे. हा सप्ताह अवयवदानाचे महत्त्व जनसामान्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी आणि लोकांना या कार्यात सक्रिय सहभागी होण्यासाठी प्रोत्साहित करण्यासाठी एक सुवर्णसंधी आहे.

     राष्ट्रीय अवयवदान दिन साजरा करण्याचा मूळ उद्देश अवयवदानाबद्दल समाजात सखोल माहिती पोहोचवणे, त्याभोवती असलेले गैरसमज दूर करणे आणि अधिकाधिक लोकांना अवयवदानासाठी पुढे येण्यास प्रोत्साहित करणे हा आहे. कल्पना करा, तुमच्या एका निर्णयामुळे, मृत्यूनंतरही तुमचे अवयव दुसऱ्याला नवजीवन देऊ शकतात. याहून मोठे दान जगात दुसरे कोणतेही नाही.

      भारतामध्ये अवयवदानाची गरज प्रचंड मोठी आहे. जागतिक आरोग्य संघटनेच्या आकडेवारीनुसार, भारतात दरवष सुमारे २ लाख किडनी प्रत्यारोपणाची गरज असते, परंतु प्रत्यक्षात केवळ १०,००० च्या आसपासच प्रत्यारोपण होतात. तसेच, यकृताच्या प्रत्यारोपणाची गरज सुमारे ३०,००० ते ५०,००० लोकांमध्ये असताना, प्रत्यक्षात केवळ २,००० पेक्षा कमी प्रत्यारोपण शक्य होतात. हृदय प्रत्यारोपणाची गरज तर अनेक पटींनी जास्त आहे. लाखो लोक आज किडनी, यकृत, हृदय, फुफ्फुस, स्वादुपिंड आणि डोळ्यांच्या प्रत्यारोपणाच्या प्रतीक्षेत आहेत. किडनी निकामी झालेल्या हजारो लोकांना डायलिसिसवर जगावे लागते, ज्यामुळे त्यांचे जीवनमान खूपच मर्यादित होते, आर्थिक भारही वाढतो आणि त्यांना अनेकदा उपचारासाठी मोठा वेळ द्यावा लागतो. यकृत निकामी झालेल्या व्यक्तींना यकृताचे प्रत्यारोपण मिळाल्यासच त्यांचे प्राण वाचू शकतात. हृदय किंवा फुफ्फुस निकामी झालेल्या व्यक्तींसाठी प्रत्यारोपण हाच एकमेव पर्याय असतो, अन्यथा त्यांचे आयुष्य अत्यंत कमी कालावधीचे ठरते. दुर्दैवाने, या प्रचंड गरजेच्या तुलनेत अवयवदानाचे प्रमाण खूपच कमी आहे. या कमी प्रमाणामागे अनेक कारणे आहेत: जागरूकतेचा अभाव, गैरसमज आणि अंधश्रद्धा, पायाभूत सुविधांची कमतरता आणि समुपदेशनाचा अभाव. हे गैरसमज दूर करणे अत्यंत आवश्यक आहे. आजही अनेक लोकांना वाटते की अवयवदान केल्याने मृत्यूनंतर पुढील जन्मावर परिणाम होतो किंवा शरीराची विटंबना होते. ही सर्व केवळ मिथके आहेत. वैद्यकीय दृष्ट्या आणि वैज्ञानिक दृष्ट्या अवयवदान हे पूर्णपणे सुरक्षित आणि पवित्र कार्य आहे.

     अवयवदान मुख्यतः दोन प्रकारचे असते. जिवंत अवयवदान आणि मृत्यूपश्चात अवयवदान. जिवंत अवयवदानात दाता जिवंत असताना आपल्या शरीरातील एक अवयव दान करतो, जो त्याच्या स्वतःच्या जीवनावर फारसा परिणाम करत नाही. उदा. एक किडनी किंवा यकृताचा काही भाग. हे दान मुख्यतः नातेवाईक (उदा. आई-वडील, भावंड, मुले) एकमेकांना करतात. काही विशिष्ट कायदेशीर परिस्थितीत, सरकारची परवानगी घेऊन, जवळचे मित्र किंवा नातेवाईक नसलेले व्यक्ती देखील दान करू शकतात. दुसऱ्या प्रकारात, ब्रेन-डेड (मेंदूमृत) झालेल्या व्यक्तीचे अवयव दान केले जातात. ब्रेन-डेड म्हणजे जेव्हा व्यक्तीचे हृदय आणि इतर जीवन कार्ये यंत्रांच्या साहाय्याने चालू ठेवली जातात, परंतु मेंदूचे कार्य पूर्णपणे थांबलेले असते आणि ते पुन्हा कधीही पूर्ववत होऊ शकत नाही. अशा स्थितीत दान केलेल्या अवयवांमुळे अनेक लोकांचे प्राण वाचू शकतात. हृदय, फुफ्फुसे, यकृत, मूत्रपिंड, स्वादुपिंड, डोळे (कॉर्निया), त्वचा, हाडांचे काही भाग आणि काहीवेळा आतडे यांसारखे अवयव दान केले जाऊ शकतात. भारतात याच प्रकारच्या अवयवदानाचे प्रमाण वाढवणे अत्यंत महत्त्वाचे आहे, कारण जिवंत अवयवदानावर नैसर्गिक मर्यादा येतात.

      अवयवदान हे केवळ एका व्यक्तीला जीवनदान देत नाही, तर ते अनेक कुटुंबांना नवसंजीवनी देते. ज्या व्यक्तीचे अवयव निकामी झाले आहेत आणि ज्याला प्रत्यारोपणाची नितांत गरज आहे, त्याच्यासाठी हे अवयवदान म्हणजे पुनर्जन्मच असतो. कल्पना करा, ज्या व्यक्तीला किडनी निकामी झाल्यामुळे आठवड्यातून अनेकदा डायलिसिसच्या वेदना सहन कराव्या लागत होत्या, त्याला प्रत्यारोपणानंतर सामान्य जीवन जगता येते. ज्या व्यक्तीला हृदयविकारामुळे अंथरूणावर पडून राहावे लागत होते, तो पुन्हा आपले काम करू लागतो. यातून तो व्यक्ती केवळ स्वतःचे जीवन सुधारत नाही, तर आपल्या कुटुंबाला आधार देतो आणि समाजासाठीही योगदान देतो. हे केवळ शारीरिक जीवनदान नसून, ते मानसिक आणि सामाजिक पुनरुत्थान आहे. एक अवयवदान अनेकदा एकाच वेळी अनेक लोकांना जीवन देऊ शकते  एका दात्याच्या अवयवांनी आठ जणांना जीवदान मिळू शकते, तर त्वचा, डोळे आणि इतर ऊतक (टिश्यू) मिळून ५० पेक्षा जास्त लोकांचे जीवन सुधारू शकते.

         देशातील प्रत्यारोपण केंद्रांची संख्या वाढवणे, त्यांना आवश्यक उपकरणे, आधुनिक तंत्रज्ञान आणि प्रशिक्षित मनुष्यबळ पुरवणे अत्यंत आवश्यक आहे. रुग्णालयांमध्ये प्रशिक्षित आणि संवेदनशील समुपदेशक उपलब्ध करून देणे. हे समुपदेशक ब्रेन-डेड रुग्णांच्या नातेवाईकांशी अत्यंत सहानुतीने संवाद साधून त्यांना अवयवदानाचे महत्त्व पटवून देतील. अवयवदानाची कायदेशीर प्रक्रिया अधिक सुलभ आणि पारदर्शक करणे आवश्यक आहे, जेणेकरून वेळ वाचेल आणि प्रक्रिया किचकट वाटणार नाही. अवयवांच्या जलद वाहतुकीसाठी ग्रीन कॉरिडॉरची सुविधा देशभरात अधिक प्रभावीपणे वापरणे आवश्यक आहे, जेणेकरून अवयवांचे नुकसान टाळता येईल आणि वेळेत प्रत्यारोपण शक्य होईल.

       अवयवदान सप्ताहाच्या पार्श्वभूमीवर, आपण सर्वांनी एक विचार करणे आवश्यक आहे. आपल्या मृत्यूनंतर आपले शरीर मातीत मिसळणार असेल किंवा अग्नीत भस्म होणार असेल, तर त्यातील काही अवयव दुसऱ्याला जीवनदान देत असतील, याहून मोठे पुण्य काय असू शकते? हे दान कोणत्याही धर्म, जात किंवा पंथाच्या पलीकडचे आहे. ते शुद्ध मानवतेचे प्रतीक आहे. आपल्यापैकी प्रत्येकाने अवयवदानाचा संकल्प करावा. आपल्या कुटुंबाशी याबद्दल मोकळेपणाने चर्चा करावी आणि आपला निर्णय त्यांना सांगावा. आपल्या आधार कार्डावर किंवा ड्रायव्हिंग लायसन्सवर अवयवदानाची संमती नोंदवण्याचा पर्याय आता उपलब्ध आहे, त्याचा वापर करा. हा एक छोटासा निर्णय, आपल्या मृत्यूनंतरही आपल्या जीवनाची ज्योत दुसऱ्यांच्या जीवनात तेवत ठेवू शकतो.

        खरं तर, जीवन म्हणजे केवळ श्वास घेणे आणि सोडणे इतकेच नाही, तर ते आहे इतरांसाठी जगणे, इतरांच्या आयुष्यात अर्थ निर्माण करणे. आपल्या जीवनाच्या अंतिम क्षणीही, आपण कुणासाठी तरी आशेचा किरण बनू शकतो, हेच तर मानवतेचे खरे सौंदर्य आहे. आपले अस्तित्व हे केवळ स्वतःपुरते मर्यादित नसून, ते अनादि अनंत जीवनाच्या साखळीचा एक अविभाज्य भाग आहे. दधीची ऋषींनी जसा स्वतःचा देह लोककल्याणासाठी समर्पित केला, तसेच अवयवदान म्हणजे आपल्या देहाचे रूपांतर जीवनात, आशेमध्ये आणि भविष्यात करणे होय. चला, या उदात्त कार्यात सहभागी होऊन, आपण या जीवनाचे अधिक मोल करूया आणि मृत्यूच्या पलीकडेही जीवंत राहण्याचे सामर्थ्य जगाला दाखवून देऊया.

मंगळवार, २२ जुलै, २०२५

नवीन सोष्टे : पत्रकारितेचे झंझावाती पर्व

-उमाजी म. केळुसकर ⬑ खारावारा ⬉


आज, २२ जुलै २०२५ रोजी, चार वर्षांपूर्वीचा तो दिवस आठवला की मन हेलावून जातं. २२ जुलै २०२१ रोजी, कोरोनाच्या भयाण लाटेत आपण एका अशा व्यक्तिमत्त्वाला गमावलं, ज्यांनी रायगड जिल्ह्याच्या पत्रकारितेला खरंच 'झपाटून' टाकलं होतं. माझे ज्येष्ठ मित्र,
नवीन सोष्टे हे केवळ एक नाव नव्हतं, तर ते रायगडच्या पत्रकारितेचं, समाजसेवेचं आणि एका अविरत लेखणीचं चालतं-बोलतं विद्यापीठ होतं. वयाच्या अवघ्या १८ व्या वर्षांपासून त्यांनी हातात लेखणी धरली, ती शेवटच्या श्वासापर्यंत त्यांनी सोडली नाही. त्यांच्या ६९ व्या वर्षी अचानक जाण्याने केवळ नागोठणेचंच नाही, तर संपूर्ण रायगड जिल्ह्याच्या पत्रकारितेचं एक देदीप्यमान पर्व संपलं, हे कटू सत्य आजही मनाला चटका लावतं. या महान पत्रकाराला आणि समाजसेवकाला माझी विनम्र आदरांजली!

        नवीन सोष्टे यांच्या पत्रकारितेची सुरुवात ही केवळ एका बातमीदाराची नव्हती, तर ती एका ध्येयवेड्या समाजसेवकाची होती. सर्वोदय कार्यकर्ते मधु रावकर यांच्या 'युगारंभ' साप्ताहिकातून त्यांनी आपली लेखणी धारदार केली. जयप्रकाश नारायण यांच्या विचारांनी भारलेल्या सोष्टे यांनी 'माधुरी सोष्टे' या टोपण नावाने हुंडाविरोधी चळवळीत स्वतःला झोकून दिलं. त्या काळात हुंडा ही एक सामाजिक कीड होती आणि तिच्याविरोधात तरुण वयात आवाज उचलणं हे खरंच हिमतीचं काम होतं. 'माधुरी सोष्टे' हे नाव केवळ एक टोपणनाव नव्हतं, तर ते सामाजिक परिवर्तनाची नांदी होती, स्त्री सन्मानासाठी पेटलेली एक धगधगती मशाल होती.

       त्यांचा पत्रकारितेचा प्रवास हा एखाद्या अथांग प्रवासासारखा होता. 'सकाळ' सारख्या अग्रगण्य वृत्तपत्रात तब्बल ३० वर्षं त्यांनी आपल्या लेखणीची ताकद दाखवली. त्यानंतर 'सामना', 'सागर', 'कृषीवल', 'महाराष्ट्र टाइम्स', 'लोकमत', 'रत्नागिरी टाइम्स' अशा अनेक मोठ्या नावांसोबत त्यांनी काम केलं. त्यांची लेखणी फक्त बातम्या देत नव्हती, तर ती समाजातील समस्यांवर, राजकारणावर, ग्रामीण जीवनावर आणि मानवी मूल्यांवर सखोल भाष्य करत होती. त्यांच्या प्रत्येक शब्दातून त्यांचं सूक्ष्म निरीक्षण, सखोल विश्लेषण आणि समाजाला दिशा देण्याची तळमळ स्पष्ट दिसत होती. रायगडच्या कानाकोपऱ्यातील गोष्टी, इथल्या लोकांच्या भावना, त्यांचे प्रश्न त्यांनी आपल्या लेखणीतून महाराष्ट्राच्या घराघरात पोहोचवले.

     आजच्या घडीला, पत्रकारिता क्षेत्राचे रूपडे बरेच बदलले आहे. जिथे 'अर्ध्या हळकुंडाने पिवळे झालेले', स्वतःला 'स्टार' समजणारे अनेक पत्रकार दिसतात, जे क्षणात प्रसिद्धीच्या झोतात येतात आणि चमकून जातात, तिथे नवीन सोष्टे यांचे वेगळेपण अधिकच उठून दिसते. त्यांनी कधीही प्रसिद्धीचा सोस धरला नाही. त्यांना 'टीआरपी' किंवा 'लाईक्स'ची चिंता नव्हती. त्यांची पत्रकारिता ही खऱ्या अर्थाने समाजाच्या वेदना मांडणारी, अन्यायाला वाचा फोडणारी आणि तळागाळातील लोकांचे प्रश्न मांडणारी होती. त्यांनी पत्रकारितेचा वापर आत्मप्रसिद्धीसाठी नव्हे, तर समाजप्रबोधनासाठी आणि परिवर्तनासाठी केला. आजच्या चमचमत्या जगात, सोष्टे यांच्यासारखे पत्रकार म्हणजे खऱ्या अर्थाने पत्रकारितेचे आदर्श होते, जे जमिनीशी जोडलेले राहून, निष्ठेने आपले काम करत राहिले. त्यांची पत्रकारिता म्हणजे केवळ व्यवसाय नव्हता, ती एक साधना होती, एक व्रत होते.

      केवळ पत्रकारितेपुरते ते मर्यादित नव्हते. नागोठण्यात त्यांनी 'शुभेच्छा प्रकाशन' नावाने प्रिंटिंग प्रेसचा व्यवसायही अनेक वर्षं यशस्वीपणे चालवला. हे केवळ उपजीविकेचं साधन नव्हतं, तर त्यांच्या पत्रकारितेला आणि साहित्याला ते पूरक होतं. अनेकांना त्यांनी आपले विचार लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी व्यासपीठ दिलं.

     याशिवाय, रायगड जिल्हा मराठी पत्रकार संघाचे अध्यक्षपद त्यांनी तब्बल सहा वर्षं भूषवलं. या काळात त्यांनी जिल्ह्यांतील पत्रकारांच्या हितासाठी, त्यांच्या अडचणी सोडवण्यासाठी आणि त्यांना एकत्र आणण्यासाठी अथक परिश्रम घेतले. त्यांच्या नेतृत्वाखाली पत्रकार संघ खऱ्या अर्थाने एकजूट झाला.

     नवीन सोष्टे यांची सर्वात मोठी ओळख म्हणजे त्यांनी लिहिलेली २२ पुस्तकं. ही त्यांची साहित्य क्षेत्रातील अथांग निर्मिती होती. त्यांच्या लेखणीतून ऐतिहासिक संदर्भ साकारले गेले. यातील, 'आंबकाठावरील अश्रू' या पुस्तकाने त्यांना खऱ्या अर्थाने जागतिक पातळीवर पोहोचवलं. हे पुस्तक म्हणजे रायगड जिल्ह्यात १९८९ साली आलेल्या महापुराचे विदारक दर्शन घडवणारे एक संवेदनशील चित्रण होते. या पुस्तकाला वॉशिंग्टन युनिव्हर्सिटीकडून गौरवण्यात आलं आणि विशेष म्हणजे, हे पुस्तक युनिव्हर्सिटीमध्ये अभ्यासासाठीही ठेवण्यात आलं. ही केवळ त्यांच्यासाठीच नव्हे, तर संपूर्ण महाराष्ट्रासाठी अभिमानाची गोष्ट होती. 'आंबकाठावरील अश्रू' हे पुस्तक म्हणजे त्यांच्या संशोधक वृत्तीचं, संवेदनशील मनाचं आणि मानवी वेदना समजून घेण्याच्या त्यांच्या क्षमतेचं मूर्तिमंत उदाहरण होतं.

       त्यांच्या बहुआयामी व्यक्तिमत्त्वाला साजेसं असं आणखी एक महत्त्वाचं योगदान म्हणजे त्यांनी लिहिलेलं 'प्रीतीला विफलतेचा शाप' हे नाटक. या नाटकाचे संगीत संयोजन त्यांचे जवळचे मित्र अच्युत ठाकूर यांनी केलं होतं. हे नाटक त्यांच्या कलात्मक आणि साहित्यिक प्रतिभेचा आणखी एक पैलू दर्शवतं. विशेष म्हणजे, त्यांच्या एका पुस्तकाला मी  (उमाजी म. केळुसकर) प्रस्तावना लिहिली होती. त्यांचा मला स्नेह लाभल्यामुळे त्यांच्या लेखणीतील ताकद आणि त्यांच्या कार्याची महती मला चांगल्याप्रकारे माहीत आहे..

     २२ जुलै २०२१ रोजी कोरोनाने नवीन सोष्टे यांना आपल्यातून हिरावून घेतलं आणि रायगडच्या पत्रकारितेचं एक तेजस्वी पर्व संपलं. त्यांच्या जाण्याने केवळ एक पत्रकार हरपला नाही, तर एक सामाजिक कार्यकर्ता, एक दूरदृष्टी असलेला उद्योजक, एक प्रतिभावान लेखक, एक कुशल संघटक आणि अनेकांसाठी एक प्रेरणास्थान आपण गमावलं. त्यांनी केलेलं कार्य, त्यांचे विचार आणि त्यांचं समाजभान हे नेहमीच आपल्या स्मरणात राहील. नवीन सोष्टे यांच्यासारखी माणसं शतकातून एकदाच जन्माला येतात. त्यांनी आपलं संपूर्ण आयुष्य समाजसेवेसाठी, पत्रकारितेसाठी आणि लेखनासाठी समर्पित केलं. त्यांच्या जाण्याने निर्माण झालेली पोकळी कधीही भरून येणार नाही, हे कटू सत्य आहे. पण त्यांनी लावलेल्या विचारांची आणि कार्याची ज्योत आपण सर्वांनी तेवत ठेवणे, हीच त्यांना खरी आदरांजली ठरेल.

रविवार, २० जुलै, २०२५

स्मृतींचा उजळलेला कंदील

 -उमाजी म. केळुसकर ⬑ खारावारा ⬉


आजच्या डिजिटल युगात, जिथे एका क्लिकवर जगभरातील माहिती उपलब्ध होते आणि प्रकाशासाठी एलईडी दिव्यांपासून ते सौरऊर्जेवर चालणाऱ्या उपकरणांपर्यंत असंख्य पर्याय आहेत, तिथे रॉकेलचा कंदील आठवणे म्हणजे एका वेगळ्याच कालखंडात डोकावून पाहण्यासारखे आहे. हा केवळ एक प्रकाशाचा स्रोत नव्हता, तर अनेक पिढ्यांच्या आठवणी, संघर्ष आणि साधेपणाचा तो एक अविस्मरणीय साक्षीदार होता. रॉकेलचा कंदिलाबरोबर काही ठिकाणी चिमणी किंवा टेंबा हे रॉकेलचे दिवेही वापरले जायचे. श्रीमंतांघरी पेट्रोमॅक्सची बत्ती प्रखर प्रकाशाची बरसात करायची. एकंदरीत कंदील हा ग्रामीण भारताच्या, विशेषतः महाराष्ट्राच्या आणि इतर विकसनशील देशांच्या जीवनाचा अविभाज्य भाग होता.

       रॉकेलच्या कंदिलाची रचना अतिशय साधी पण प्रभावी होती. त्यात प्रामुख्याने तेलपात्र (जिथे रॉकेल साठवले जाई), वात (जी रॉकेल शोषून घेई), वातधारक (जो वातीला पकडून ठेवून तिची उंची नियंत्रित करी), आणि चिमा (जो ज्योतीला वाऱ्यापासून वाचवून ती स्थिर ठेवत असे) हे भाग असत. जेव्हा वातीला आग लावली जाई, तेव्हा रॉकेल वातीवाटे वर येऊन जळे आणि त्यातून प्रकाश निर्माण होई. ही साधी कार्यप्रणाली अनेक वर्षांपासून प्रकाशाचा आधार बनली होती.

      रॉकेलचा कंदील केवळ प्रकाशाचे साधन नव्हता; तो अनेक घरांसाठी आशा आणि प्रगतीचे प्रतीक होता. आजच्या पिढीतील मुलांना रॉकेलचा कंदील कदाचित माहीतही नसेल, पण चाळीस वर्षांपूर्वीची परिस्थिती खूप वेगळी होती. त्यावेळी सर्वत्र वीज नव्हती. प्रामुख्याने शहरे विजेने प्रकाशित असली तरी, हजारो गावे, वाड्या आणि वस्त्यांवर वीज पोहोचलीच नव्हती. आणि जिथे पोहोचली होती, तिथेही ती घरात आणून तिचे बिल भरणे अनेकांना त्यांच्या आर्थिक स्थितीमुळे शक्य नव्हते. त्यामुळे बहुतेकांच्या घरी रात्रीच्या वेळी प्रकाशासाठी कंदिलाचाच आधार घ्यावा लागे. हाच कंदील मग त्यांच्या जीवनाचा अविभाज्य भाग बनला.

     याच कंदिलाच्या मंद उजेडात, आम्ही कित्येक रात्री अभ्यास केला आहे. पुस्तकातील अक्षरे कधी मोठी दिसणारी, तर कधी लहान होणारी, अशी ती ज्योत डोळ्यासमोर आजही तरळते. नारायण धारप, द.पा. खांबटे यांसारख्या लेखकांच्या भयकथा वाचताना, त्या कंदिलाच्या लखलखत्या आणि डगमगणाऱ्या प्रकाशात, भिंतींवर पडणाऱ्या सावल्यांमुळे एक वेगळेच भीतीदायक वातावरण तयार होई. त्या काळोखाच्या आणि प्रकाशाच्या खेळात, कथेतील भीती खऱ्या अर्थाने अनुभवली आहे, आणि ती आजही आठवली की अंगावर शहारे येतात.  याच प्रकाशात वि.सं. खांडेकर, ना.सी. फडके, सानेगुरुजी, पु.ल. देशपांडे, रामायण, महाभारत, बाबुराव अर्नाळकर, गुरुनाथ नाईक आदी लेखक वाचले. या कंदिलाच्या मंद प्रकाशात अनेक पिढ्यांनी अक्षरओळख केली, पुस्तके वाचली आणि आपले भविष्य घडवले. कितीतरी डॉक्टर्स, अभियंते, शिक्षक आणि नेते याच कंदिलाच्या प्रकाशात अभ्यास करून मोठे झाले आहेत. रात्रीच्या जेवण बनवण्यापासून ते शिवणकाम करण्यापर्यंत, आणि गप्पा मारण्यापासून ते पत्ते खेळण्यापर्यंत अनेक घरगुती कामे रॉकेलच्या कंदिलाच्या प्रकाशात होत असत. तो केवळ प्रकाश देणारा नव्हे तर कुटुंबाला एकत्र आणणारा एक घटक होता. ग्रामीण भागातील लग्नकार्ये, धार्मिक विधी किंवा इतर समारंभांमध्येही रॉकेलच्या कंदिलांचा वापर केला जाई. अधारात बैलगाडीलाही रॉकेलचा कंदील लटकावलेला असे. तो इमाने इतबारे रस्ता प्रकाशित करण्याचे काम करी.

       या सर्व दिव्यांमध्ये, पेट्रोमॅक्सची बत्ती ही खरी महाराणी होती. ती रॉकेलच्या कंदिलाची मोठी बहीणच असावी, असा तिचा दिमाखदार थाट असायचा. तिचा प्रखर प्रकाश डोळे दिपवणारा असे आणि तो दूरवर पसरत असे. तिची किंमत जास्त असल्याने ती सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर होती, त्यामुळे ती प्रामुख्याने श्रीमंतांच्या घरी दिसायची. देवाच्या पालखीसारख्या धार्मिक मिरवणुकांमध्ये किंवा इतर मोठ्या सांस्कृतिक कार्यक्रमांच्या वेळी पेट्रोमॅक्सच्या बत्तीचाच वापर केला जाई, कारण तिचा तेजोमय प्रकाश त्या सोहळ्यांना एक वेगळीच भव्यता प्रदान करत असे. आजही जेव्हा अचानक वीज जाते, तेव्हा रॉकेलचा कंदील हा एक आपत्कालीन मित्र म्हणून पुढे येतो. जनरेटर किंवा इन्व्हर्टर नसलेल्या घरांमध्ये तो आजही आपत्कालीन प्रकाशाचा स्रोत म्हणून महत्त्वाचा आहे.

      रॉकेलचा कंदील जितका उपयुक्त होता, तितकीच त्याला काही आव्हानेही होती. रॉकेल ज्वलनशील असल्याने कंदिलाच्या वापरामध्ये नेहमीच सुरक्षिततेचे धोके असत. निष्काळजीपणाने वापरल्यास आग लागण्याची शक्यता असे. कंदील जळत असताना धूर बाहेर पडे, जो आरोग्यासाठी हानिकारक असू शके. रॉकेलची उपलब्धता आणि त्याची किंमत हा एक महत्त्वाचा मुद्दा असे. कधीकधी रॉकेल कमी पडत असे किंवा महाग होई. तसेच, कंदिलाच्या चिम्याला काजळी जमत असे, जी नियमितपणे स्वच्छ करावी लागत असे.

      कालांतराने, विजेच्या तारा खेडीगावी पोहोचू लागल्या, घराघरात वीज आली आणि विजेचे दिवे, ट्यूबलाइट्स आणि बल्ब यांनी रॉकेलच्या कंदिलाची जागा घेतली. तंत्रज्ञानाच्या प्रगतीमुळे सौरऊर्जेवर चालणारे दिवे आणि एलईडी दिवे सहज उपलब्ध झाले, जे अधिक सुरक्षित, स्वच्छ आणि प्रभावी आहेत. यामुळे रॉकेलच्या कंदिलाचा वापर हळूहळू कमी होत गेला आणि तो फक्त एका स्मृतीचा भाग बनला. आजच्या पिढीसाठी रॉकेलचा कंदील हे कदाचित एखाद्या जुन्या चित्रपटातील किंवा इतिहासाच्या पुस्तकातील एक चित्र असेल. पण ज्यांनी तो अनुभवला आहे, त्यांच्यासाठी तो केवळ एक वस्तू नसून तो त्यांच्या जीवनाचा अविभाज्य भाग होता. तो गरीबीतही शिक्षणाची ज्योत पेटवणारा, रात्रीच्या अंधारात सुरक्षिततेची भावना देणारा आणि कुटुंबियांना एकत्र आणणारा एक महत्त्वाचा घटक होता.

       रॉकेलचा कंदील हे तंत्रज्ञानाच्या एका टप्प्याचे प्रतीक आहे. त्याने मानवाच्या प्रकाशाच्या मूलभूत गरजेची पूर्तता केली आणि अनेक दशके समाजाला सेवा दिली. जरी आज तो मोठ्या प्रमाणावर वापरात नसला तरी, त्याचे महत्त्व आणि त्याने बजावलेली भूमिका कधीही विसरली जाणार नाही. तो आपल्याला आठवण करून देतो की साधेपणा आणि गरजांनुसार केलेले शोध किती महत्त्वाचे असू शकतात. रॉकेलचा कंदील हा केवळ भूतकाळातील एक वस्तू नसून, तो एका युगाचा, एका जीवनशैलीचा आणि मानवी धैर्याचा एक तेजस्वी साक्षीदार आहे.

गुरुवार, १७ जुलै, २०२५

'रामदास' दुर्घटना : कोकणच्या काळजावरील जखम

 -उमाजी म. केळुसकर ⬑ खारावारा ⬉


१७ जुलै १९४७. कोकण आणि मुंबईच्या इतिहासात ही तारीख केवळ एका अपघाताची नोंद नाही, तर ती आहे शेकडो निष्पाप जीवांच्या भयावह अंताची, सामूहिक दुःखाची आणि कधीही न विसरता येणाऱ्या एका आघाताची साक्ष. या दिवशी अरबी समुद्रात बुडालेल्या रामदास बोटीने केवळ जीवच घेतले नाहीत, तर स्वातंत्र्याच्या उंबरठ्यावर उभ्या असलेल्या एका समाजाच्या मनावर एक खोल आणि न पुसणारी जखम कोरली. ७७ वर्षांनंतरही, म्हणजे १७ जुलै २०२५ रोजी या घटनेला ७८ वर्षे पूर्ण होत असतानाही, त्या दुर्घटनेची आठवण आजही अनेकांच्या डोळ्यात पाणी आणते. जे त्या घटनेनंतर कित्येक वर्षांनी जन्माला आले, त्यांनाही या शोकांतिकेचं भान आहे, हीच तिच्या प्रभावाची खरी खोली दर्शवते.

      आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळालं, फाळणीच्या दंगलीत लाखोंनी जीव गमावले, अनेकजण निर्वासित झाले. विमानं कोसळली, रेल्वेचे अपघात झाले, भूकंपांनी हादरवून टाकलं, महापूर आले... पण या साऱ्या आपत्त्यांच्या गदतही, रामदास बोटीची ती ट्रॅजेडी मुंबई-कोकणच्या मनात हाहाकाराचं प्रतीक बनून कायम आहे. तिच्यावर कथा, कविता, लेख, आठवणी आजही लिहिल्या जातात. ती केवळ एक दुर्घटना नव्हती, तर ती होती कोकणच्या मातीच्या एका भागाची, तिच्या माणसांची सामूहिक वेदना. 

     तो दिवस होता स्वातंत्र्याच्या उंबरठ्यावरचा गुरुवार, १७ जुलै १९४७, गटारी म्हणजेच दीप अमावस्येचा. सकाळी पावणेआठच्या सुमारास मुंबईतील भाऊच्या धक्क्यावरून ‌‘रामदास‌’ बोट रेवसच्या दिशेने निघाली. बॉम्बे स्टीम नॅव्हिगेशन कंपनीच्या रामदास बोटीची प्रवासी क्षमता तब्बल १००० माणसांची होती. त्या दिवशी बोटीत ४८ खलाशी, ४ अधिकारी, १८ हॉटेलचा नोकर वर्ग व ६७८ अधिकृत प्रवासी अशी एकूण ७७३ माणसे होती. फुकटे प्रवासी सुमारे ३५ च्या आसपास असावेत, असे गृहीत धरले तरी बोटीत एकंदर ७७८ माणसे होती. या प्रवाशांमध्ये लहान मुले आणि तान्ही बाळे शंभरच्या आसपास होती. विशेष म्हणजे, ही बोट उत्तमरित्या कार्य करीत असल्याचे प्रमाणपत्र एक महिन्यापूवच बंदर अधिकाऱ्यांनी दिले होते. बोटीचा कॅप्टन, शेख सुलेमान, अनुभवी होता. 

       सकाळी वातावरण अगदी निरभ्र होतं, सर्व काही आलबेल होतं. बोटीवर पिकनिकला जाणारे, नातेवाईकांना भेटायला निघालेले, व्यापारानिमित्त प्रवास करणारे असे अनेक जण होते. त्यांच्या मनात भविष्याची, भेटीची, कामाची स्वप्नं होती. पण नियतीला काही वेगळंच मंजूर होतं.

बोट सुरू होऊन अवघा अर्धा तास झाला असेल नसेल, तोच अरबी समुद्राने आपलं रौद्ररूप धारण केलं. आकाशात ढग दाटले, समुद्रात उंचच उंच लाटा उसळू लागल्या. एकेक लाट जणू बोटीला गिळंकृत करायलाच येत होती. बोट हेलकावे खाऊ लागली. प्रवाशांमध्ये आरडाओरडा सुरू झाला, सारेजण सैरावैरा धावू लागले. या गोंधळात बोट अधिकच तिरपी झाली. कॅप्टन शेख सुलेमान यांनी बोट सावरण्याचा आटोक्यात प्रयत्न केला, पण नियतीच्या क्रूर खेळापुढे त्यांचाही निभाव लागला नाही. त्याचवेळी, एक राक्षसी लाट बोटीवर आदळली आणि जवळच असलेल्या काश्याच्या खडकाजवळ रामदास बोट समुद्रात बुडाली.

        ‌‘मरणात भयानक मरण आगीत होरपळून. त्याखालील भयानक मरण म्हणजे पाण्यात बुडून,‌’ असे म्हटले जाते. हेच पाण्यातील भयानक मरण काश्याच्या खडकाजवळ समुद्रात या दुर्दैवी जीवांवर ओढवले. क्षणार्धात होत्याचं नव्हतं झालं. अनेकांना सावरण्याची संधीही मिळाली नाही. समुद्राच्या लाटांवर मृतदेह तरंगू लागले, ती दृश्यं पाहून काळजाचा ठोका चुकला असेल. ज्यांना पोहता येत होतं, ते वाचले. बोटीच्या कॅप्टनने खिडकीतून उडी मारून स्वतःचा जीव वाचवला.

या दुर्घटनेत मरण पावलेल्या ६७८ प्रवाशांना १५ ऑगस्ट १९४७ रोजी देशाला मिळणारे स्वातंत्र्य पाहता आले नाही. आणि जे या दुर्घटनेतून सुदैवाने वाचले, त्या सुमारे १०० जणांनाही या स्वातंत्र्याचा निखळ आनंद घेता आला नाही. त्यांनी रामदास बोट बुडताना स्वतःच्या डोळ्यांनी पाहिली होती. ती बुडण्याच्या प्रक्रियेचाच ते एक भाग होते. त्यांनी आपल्या सोबत प्रवास करणाऱ्या प्रवाशांचा उघड्या डोळ्यांनी बुडताना मृत्यू पाहिला होता. तान्ह्या बाळासह त्यांच्या माता, लहान मुले, गर्भवती स्त्रिया, वृद्ध-तरुण यांच्या मृत्यूने त्यांच्या मनःस्वास्थ्यावर विदारक परिणाम झाला होता. या धक्क्यातून ते कालांतराने बाहेर पडले, पण या दुर्घटनेने शेकडो मृत प्रवाशांच्या कुटुंबांची जी हानी झाली ती कधी भरून निघाली नाही.

      ही बोट बुडाल्यावर तात्काळ बोट चालकावर क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी व सामान भरल्याचा आणि बोट सुस्थितीत नसल्याचा आरोप करण्यात आला. आणखी बरेच मुद्दे उपस्थित झाले. २० जुलै १९४७ पासून इंडियन मर्कटाईन मरीन प्रिन्सिपल ऑफिसर, कमोडोर मिल्स यांनी याबाबत चौकशीस सुरुवात केली. या दुर्घटनेतून वाचलेले कप्तान शेख सुलेमान, फर्स्ट ऑफिसर आदमभाई यांच्या जबान्या झाल्या.

       त्यानुसार, अपघाताच्या वेळी रामदास बोटीचा वेग फक्त २७ नॉट्स इतका मंद होता. वादळाच्या वेळी बोटीचे स्टर्न (मागील भाग) नेहमी लाटांशी काटकोनात ठेवायचा दर्यावद प्रघात आहे, जेणेकरून लाटा फुटतात पण पाणी आत शिरत नाही. तेही कप्तान शेख सुलेमान यांनी केले होते. परंतु, लाटा इतक्या उंच व निरनिराळ्या दिशांनी येत होत्या की त्यावेळी प्रवासी घाबरून स्टार (डावीकडील) भागाकडे पळाले. ती बाजू अतिवजनाने खाली गेली, त्याच वेळी एक काळलाट आली आणि तिने बोट खाली दाबली जाऊन ती समुद्रतळाशी गेली, हेच या अपघाताबद्दलचे त्यांचे स्पष्टीकरण ग्राह्य ठरवण्यात आले. कंपनीने बिनतारी संदेश वहन यंत्रणेची भारत सरकारकडे मागणी करूनही ती मिळाली नाही, असे सांगून बिनतारी संदेश वहन यंत्रणेबाबतच्या आरोपापासून आपले हात झटकले.

      कमोडोर मिल्सने २७ जुलै १९४७ ला भारत सरकारला दिलेल्या चौकशी अहवालात बोट ओव्हरलोड व नादुरुस्त होती या आरोपात तथ्य नसल्याचे सांगितले. त्यामुळे या अपघाताच्या जबाबदारीतून कंपनी निर्दोष सुटली. मात्र, या चौकशीतील काही बाबींची जबाबदारी थेट भारत सरकारवर येऊन पडली होती. त्यावेळी दिल्लीत संमिश्र सरकार होते आणि ब्रिटिश भारताला स्वातंत्र्य देण्याच्या प्रक्रियेत होते. त्यामुळे समुद्रात ज्याप्रकारे लाटेने रामदास बोट दाबली गेली, त्याचप्रकारे या घटनेचे गांभीर्य अनास्थेच्या सागरात दाबले गेले.

      कप्तान शेख सुलेमान यांचा परवाना रद्द करून या प्रकरणावर पडदा टाकण्यात आला. परंतु, या घटनेनंतर बॉम्बे स्टीम नॅव्हिगेशन कंपनीला घरघर लागली आणि ती सिंदिया स्टीम नॅव्हिगेशन कंपनीत विलीन करण्यात आली. पण यानंतर कोकण बोट प्रवासात खूपच सुधारणा झाल्या. पावसाळ्याच्या काळात चार महिने बोटी कायद्याने बंद करण्यात येऊ लागल्या. बिनतारी संदेशवहन यंत्रणा आदी अद्ययावत साधने बोटींवर बसवण्यात आली. बोटींचा प्रवास खूपच सुरक्षित झाला, पण यासाठी रामदास बोटीचा बळी जावा लागला, हे दुर्दैवच म्हटले पाहिजे.

      आजही, या घटनेला १७ जुलै २०२५ रोजी ७८ वर्षे पूर्ण होत असताना तोच वार गुरुवार आहे, कोकणवासीयांच्या मनात ही घटना ताजी आहे. ती केवळ एक जुनी आठवण म्हणून नव्हे, तर एक न पुसणारी जखम म्हणून कायम आहे. १७ जुलै १९४७ हा दिवस कोकणवासीयांसाठीच नाही, तर संपूर्ण महाराष्ट्रासाठी एक काळा दिवस ठरला. रामदास बोटीने जे जीव घेतले, ती केवळ आकडेवारी नव्हती; ती होती भविष्याची स्वप्नं पाहणाऱ्या अनेक निष्पाप जीवांची राखरांगोळी.

       या भीषण दुर्घटनेत मरण पावलेल्या सर्व प्रवाशांना भावपूर्ण श्रद्धांजली! त्यांच्या आत्म्यांना शांती मिळो. ही घटना आपल्याला कायम आठवण करून देते की, जीवनात सुरक्षिततेला किती महत्त्व द्यावं आणि निसर्गाच्या शक्तीचा आदर करावा.

बुधवार, १६ जुलै, २०२५

पाऊस : निसर्गाचे अलौकिक वरदान

 -उमाजी म. केळुसकर ⬑ खारावारा ⬉


पाऊस! केवळ तीन अक्षरांचा हा शब्द, पण आपल्या मनात कितीतरी भावना, आठवणी आणि दृश्यांची मालिका घेऊन येतो. आकाशातून कोसळणाऱ्या जलधारा केवळ धरणीची तहानच भागवत नाहीत, तर मानवी मनालाही एक अनामिक शांतता, आल्हाददायकता आणि नवचैतन्य देऊन जातात. भारतीय संस्कृतीत पावसाचे महत्त्व अनमोल आहे; तो केवळ जलस्रोत नसून, तो जीवनचक्र, समृद्धी आणि आशावादाचे प्रतीक आहे.

        पावसाचे सौंदर्य अनुभवण्याची सुरुवात होते ती आकाशातील बदलांपासून. कडक उन्हाळ्यानंतर तापलेल्या धरणीवर ढगांची गर्दी जमायला लागते. काळेभोर ढग, जे दूरवरच्या क्षितिजावर दिसतात, ते हळूहळू संपूर्ण आकाश व्यापून टाकतात. त्यांच्या गडगडाटाचा आवाज दूरून येतो आणि विजेचा चमचमाट क्षणार्धात आसमंतात उजळतो. हा निसर्गाचा भव्य ऑर्केस्ट्रा असतो, जो पावसाच्या आगमनाची घोषणा करतो. पहिल्या थेंबाचा मातीवर पडण्याचा आवाज, मग हळूहळू वाढत जाणाऱ्या सरींचा मंद ताल आणि शेवटी मुसळधार पावसाचे अखंड संगीत हे सारे ऐकणे म्हणजे एक अलौकिक अनुभव असतो. घराच्या खिडकीतून किंवा गॅलरीतून बाहेर पाहताना, रस्त्यावर टपटप पडणारे थेंब, छतावरून खाली येणारे पाणी आणि सर्वत्र पसरलेले जलमय वातावरण मन मोहून टाकते.

        पावसाळ्याचे सर्वात अविस्मरणीय सौंदर्य म्हणजे मातीचा सुगंध. कोरड्या, तापलेल्या मातीवर जेव्हा पावसाचे पहिले थेंब पडतात, तेव्हा त्यातून येणारा मिट्टीचा सुगंध (पेटीकोर) हा केवळ एक सुगंध नसतो, तो कित्येक आठवणी आणि भावना जागृत करतो. हा सुगंध अनेकांना बालपणीच्या पावसाळी दिवसांची, शाळेच्या सुट्ट्यांची, कागदी होड्यांची किंवा आईने बनवलेल्या गरम गरम भजींची आठवण करून देतो. हा सुगंध केवळ नाकाला सुखावत नाही, तर तो आत्म्यालाही स्पर्श करतो आणि एक प्रकारची शांतता व समाधान देऊन जातो. पाऊस केवळ सुगंधच देत नाही, तर तो नवसंजीवनी घेऊन येतो. उन्हाळ्याच्या तीव्रतेने निष्प्रभ झालेली झाडे, वेली आणि झुडपे पावसाच्या पाण्याने पुन्हा हिरवीगार होतात. पानांवर साचलेले पाण्याचे थेंब मोत्यांसारखे चमचमतात आणि सर्वत्र एक प्रकारचा उत्फुल्लपणा पसरतो. रखरखीत डोंगर-उतारांवर हिरवीगार मखमली चादर पसरल्यासारखे वाटते. प्रत्येक झाड, प्रत्येक झुडूप, प्रत्येक फूल आणि गवत पावसाच्या पाण्याने धुऊन निघाल्याने अधिक टवटवीत आणि आकर्षक दिसते. निसर्गातील ही कायापालट डोळ्यांना आणि मनाला एक विलक्षण आनंद देते.

          ग्रामीण भागात पावसाचे सौंदर्य अधिक स्पष्टपणे आणि सखोलपणे अनुभवता येते. अथांग शेतात डोलणारी भाताची रोपे, मक्याची कणसे आणि इतर पिके पाहून शेतकऱ्याच्या चेहऱ्यावर समाधान उमटते. डोंगर-दऱ्यांमधून कोसळणारे धबधबे, दुथडी भरून वाहणाऱ्या नद्या आणि ओढे हे दृश्य मन मोहून टाकते. सध्याच्या काळात, महाराष्ट्रातील कोकण आणि पश्चिम घाटातील डोंगररांगांमध्ये, विशेषतः अलिबागसारख्या ठिकाणी, पावसाचे हे सौंदर्य अधिक अनुभवता येते. डोंगरमाथ्यावरून कोसळणारे धबधबे आणि हिरवीगार निसर्गरम्यता डोळ्यांना सुखद वाटते. ओसाड माळरानावर उगवणारी नवी हिरवळ आणि त्यावर चरणाऱ्या जनावरांचे कळप हे सर्व पाऊस घेऊन येणाऱ्या समृद्धीचे प्रतीक आहे. ग्रामीण जीवनात पाऊस म्हणजे केवळ पाणी नव्हे, तर तो अन्न, उपजीविका आणि आनंदाचा स्रोत असतो.

        शहरी जीवनातही पावसाचे सौंदर्य कमी नसते, जरी ते ग्रामीण भागापेक्षा वेगळे असले तरी. शहरातील सिमेंटच्या जंगलातही पाऊस एक वेगळीच जादू करतो. खिडकीतून दिसणारे पावसाचे दृश्य, काचेवरून ओघळणारे पाण्याचे थेंब, रस्त्यांवरून धावणाऱ्या गाड्यांचे आवाजासोबत पावसाच्या सरींचा आवाज एक वेगळेच वातावरण निर्माण करतो. शहरातील कॅफेमध्ये बसून गरमागरम चहा किंवा कॉफीचा आस्वाद घेत पावसाचे निरीक्षण करणे हा अनेकांसाठी एक आवडता छंद असतो. पावसामुळे शहरातील प्रदूषित हवा धुऊन निघते आणि वातावरण अधिक शुद्ध व ताजेतवाने वाटते.

        पाऊस केवळ नैसर्गिक घटना नाही, तर तो मानवी भावनांशी खोलवर जोडलेला आहे. तो कधी प्रेम, विरह, आनंद, दुःख यांसारख्या भावनांना उजाळा देतो. लहान मुलांना पावसात मनसोक्त भिजण्याचा आनंद मिळतो. ते कागदी होड्या बनवून पाण्यात सोडतात, पाण्याच्या डबक्यांमध्ये उड्या मारतात आणि त्यांच्या निरागस चेहऱ्यावरचा आनंद पाहून मन भरून येते. तरुण-तरुणींसाठी पावसाळा हा रोमांटिक काळ असतो; निसर्गाच्या सान्निध्यात फिरायला जाणे, डोंगरयात्रा करणे किंवा मित्र-मैत्रिणींसोबत पावसाचा आनंद घेणे त्यांना आवडते. सध्या, जून महिन्यात मान्सूनने दमदार आगमन केले असल्याने, अनेकजण या वातावरणाचा आनंद घेत आहेत. वृद्ध व्यक्तींसाठी पाऊस म्हणजे एक शांत आणि आरामदायक काळ. घराच्या उबदार कोपऱ्यात बसून, जुन्या आठवणींना उजाळा देत पावसाचे संगीत ऐकणे त्यांना सुखद वाटते. पावसाळ्यात अनेक सण आणि उत्सव साजरे होतात, जे पावसाशी आणि निसर्गाशी संबंधित असतात. श्रावण महिन्यातील हिरवळ आणि सणांची रेलचेल ही पावसाळ्याचीच देणगी आहे.

       पाऊस केवळ भौतिक पातळीवरच नव्हे, तर आध्यात्मिक आणि काव्यात्मक पातळीवरही महत्त्वाचा आहे. अनेक कवींनी, लेखकांनी आणि गीतकारांनी पावसाचे वर्णन करताना त्याची तुलना थेट जीवनाशी, नूतनतेशी आणि शुद्धीकरणाशी केली आहे. पावसाचे पाणी जसे सर्व गोष्टी स्वच्छ करते, त्याचप्रमाणे ते मनातील मळभ धुऊन टाकून नवीन ऊर्जा देते असे मानले जाते. भारतीय शास्त्रीय संगीतात पावसाला समर्पित अनेक राग आहेत, जे पावसाचे विविध मूड आणि पैलू दर्शवतात. पाऊस हे आशा आणि नूतनीकरणाचे प्रतीक आहे. प्रत्येक पावसाळा नवीन पिके घेऊन येतो, नवीन जीवसृष्टी निर्माण करतो आणि भूतकाळातील कोरडेपण विसरून नवीन सुरुवात करण्याची संधी देतो. तो केवळ जलधारांचा वर्षाव नसून, तो जीवनाचा उत्सव आहे, जो आपण प्रत्येकाने मनसोक्त अनुभवायला हवा.

थोडक्यात, पाऊस हे निसर्गाचे एक अनोखे वरदान आहे. त्याचे सौंदर्य केवळ डोळ्यांनी पाहण्यासारखे नसून, ते प्रत्येक इंद्रियाने अनुभवायचे असते – त्याचा सुगंध, त्याचा आवाज, त्याचा स्पर्श आणि तो घेऊन येणारी शांतता व आनंद. पाऊस केवळ पाण्याची गरज पूर्ण करत नाही, तर तो आपल्या आत्म्यालाही शांतता आणि प्रसन्नता देतो आणि म्हणूनच तो आपल्या जीवनाचा अविभाज्य भाग आहे.

गुरुवार, १० जुलै, २०२५

गुरुपौर्णिमा : गुरु-शिष्य परंपरेचे चिरंतन महत्त्व

-उमाजी म. केळुसकर ⬑ खारावारा ⬉


आषाढ महिन्यातील पौर्णिमा, म्हणजेच गुरुपौर्णिमा, हा दिवस भारतीय संस्कृतीत अत्यंत पवित्र आणि महत्त्वाचा मानला जातो. गुरु-शिष्य परंपरेचा हा एक अनुपम सोहळा असून, ज्ञानदानाचे महत्त्व आणि गुरूंप्रति कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा दिवस आहे. केवळ आध्यात्मिकच नव्हे, तर शैक्षणिक, सामाजिक आणि वैयक्तिक जीवनातही गुरूंचे स्थान अनमोल आहे. या दिवशी आपण त्या सर्व व्यक्तींप्रती आदर व्यक्त करतो, ज्यांनी आपल्याला अज्ञानाच्या अंधारातून ज्ञानाच्या प्रकाशाकडे नेले.

       गुरुपौर्णिमा साजरी करण्यामागे अनेक ऐतिहासिक आणि पौराणिक कारणे आहेत. या दिवशी महर्षी व्यासमुनींचा जन्म झाला असे मानले जाते. त्यांनी महाभारत, पुराणे, उपनिषदे  यांची रचना केली आणि वेदांचे संकलन केले. त्यामुळे त्यांना 'आदिगुरू' म्हणूनही ओळखले जाते. त्यांच्या या अतुलनीय योगदानाला आदरांजली वाहण्यासाठी गुरुपौर्णिमा साजरी केली जाते. केवळ व्यासमुनीच नव्हे, तर या दिवशी भगवान बुद्धांनी सारनाथ येथे पहिला उपदेश दिला असेही मानले जाते. त्यांच्या या धर्मचक्र प्रवर्तनाला स्मरून बौद्ध धर्माचे अनुयायीही हा दिवस मोठ्या आदराने साजरा करतात. जैन परंपरेनुसार, या दिवशी भगवान महावीरांनी आपले पहिले शिष्य गौतम गणधर यांना दीक्षा दिली होती, त्यामुळे जैन धर्मीयही या दिवसाला महत्त्व देतात. अशाप्रकारे, गुरुपौर्णिमा ही केवळ एका परंपरेशी जोडलेली नसून, ती विविध धर्म आणि पंथांमध्ये गुरूंच्या महत्त्वाचे प्रतीक आहे.

        गुरुपौर्णिमेचे महत्त्व केवळ पूजा-अर्चा करण्यापुरते मर्यादित नाही, तर ते ज्ञानाचे महत्त्व, मार्गदर्शन आणि कृतज्ञता या मूल्यांमध्ये दडलेले आहे. जीवनाच्या प्रत्येक टप्प्यावर आपल्याला कोणा ना कोणाकडून मार्गदर्शन मिळत असते. आई-वडील हे आपले पहिले गुरू असतात, जे आपल्याला जगाची ओळख करून देतात. त्यानंतर शाळेतील शिक्षक, महाविद्यालयातील प्राध्यापक, कार्यक्षेत्रातील मार्गदर्शक, आध्यात्मिक गुरू आणि कधीकधी तर जीवनातील अनुभवही आपल्याला खूप काही शिकवून जातात. गुरू हे केवळ पुस्तकी ज्ञान देत नाहीत, तर ते आपल्याला योग्य-अयोग्य, सत्य-असत्य यातला फरक शिकवतात. ते आपले विचार आणि दृष्टिकोन विकसित करण्यास मदत करतात. गुरूंच्या मार्गदर्शनामुळेच आपण आपल्या क्षमता ओळखू शकतो आणि जीवनात यशस्वी होऊ शकतो. त्यामुळे, गुरुपौर्णिमा हा ज्ञानाला आणि ज्ञान देणाऱ्याला वंदन करण्याचा दिवस आहे. 

       जीवनाच्या अनिश्चित प्रवासात गुरू हे दीपस्तंभाप्रमाणे असतात, जे आपल्याला योग्य दिशा दाखवतात. जेव्हा आपण गोंधळलेले असतो, तेव्हा गुरूंचे मार्गदर्शन आपल्याला स्पष्टता देते आणि योग्य मार्ग निवडण्यास मदत करते. ते केवळ पुस्तकी ज्ञान देत नाहीत, तर जीवनातील व्यावहारिक अडचणींवर मात कशी करावी हे देखील शिकवतात. गुरुपौर्णिमा हा गुरूंप्रति कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस आहे. त्यांनी आपल्यासाठी केलेल्या त्यागाची, प्रयत्नांची आणि निस्वार्थ सेवेची आठवण करून देणारा हा दिवस आहे. त्यांच्याप्रती आदर आणि कृतज्ञता व्यक्त करून आपण त्यांच्या योगदानाला सन्मानित करतो. ही कृतज्ञता केवळ औपचारिकतेपुरती मर्यादित नसावी, तर ती आपल्या कृतीतून आणि आचरणातूनही व्यक्त व्हायला हवी.

        गुरुपौर्णिमा वेगवेगळ्या प्रकारे साजरी केली जाते, परंतु त्यामागील मुख्य उद्देश गुरुंप्रती आदर आणि कृतज्ञता व्यक्त करणे हाच असतो. या दिवशी अनेक लोक आपल्या आध्यात्मिक गुरूंची, पूज्य व्यक्तींची किंवा इष्टदेवतांची पूजा करतात. अनेक मंदिरांमध्ये विशेष पूजा आणि आरतीचे आयोजन केले जाते. भक्तगण गुरूंच्या चरणी नतमस्तक होऊन त्यांचे आशीर्वाद घेतात. काही ठिकाणी गुरूंच्या पादुकांची पूजा केली जाते. शैक्षणिक संस्थांमध्ये विद्यार्थी आपल्या शिक्षकांचा सन्मान करतात. त्यांना भेटवस्तू देतात, त्यांचे आभार मानतात आणि त्यांचे आशीर्वाद घेतात. अनेक शाळा आणि महाविद्यालयांमध्ये विशेष कार्यक्रम आयोजित केले जातात, जिथे विद्यार्थी आपल्या शिक्षकांबद्दल कृतज्ञता व्यक्त करतात. अनेक ठिकाणी या दिवशी धार्मिक प्रवचने, सत्संग आणि भजनांचे आयोजन केले जाते. आध्यात्मिक गुरू आपल्या शिष्यांना मार्गदर्शन करतात आणि त्यांना धर्म आणि नीतिमत्तेचे पाठ शिकवतात. या दिवशी गुरूंकडून दीक्षा घेण्याची परंपराही काही ठिकाणी पाळली जाते. 

      काही लोक गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने समाजसेवा करतात. गरजू लोकांना मदत करणे, दानधर्म करणे किंवा सार्वजनिक ठिकाणी स्वच्छता मोहीम राबवणे अशा उपक्रमांतूनही गुरूंच्या शिकवणीचे पालन केले जाते. गुरूंची शिकवण ही केवळ व्यक्तिगत उन्नतीसाठी नसते, तर ती समाजाच्या कल्याणासाठीही असते. गुरुपौर्णिमा हा केवळ उत्सवाचा दिवस नाही, तर आत्मचिंतन आणि संकल्प करण्याचाही दिवस आहे. आपण आपल्या गुरूंकडून मिळालेल्या ज्ञानाचा उपयोग कसा करत आहोत, जीवनात त्यांची शिकवण किती अंमलात आणत आहोत, याचा विचार करण्याचा हा दिवस आहे. या दिवशी आपण आपल्या चुका दुरुस्त करून, चांगल्या मार्गावर चालण्याचा आणि ज्ञानाची उपासना करण्याचा संकल्प करू शकतो.

       गुरुपौर्णिमा हा केवळ एक सण नसून, तो ज्ञान, आदर आणि कृतज्ञतेचा महाउत्सव आहे. आपल्या जीवनाला आकार देणाऱ्या, योग्य दिशा दाखवणाऱ्या आणि अज्ञानाचा अंधार दूर करणाऱ्या सर्व गुरूंप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा एक सुवर्ण अवसर आहे. या दिवशी आपण हे स्मरण करूया की ज्ञानाची ज्योत सतत तेवत ठेवणे आणि ती इतरांपर्यंत पोहोचवणे हे आपले कर्तव्य आहे.

वत्सला : पन्नाची शताब्दी हत्तीण

-उमाजी म. केळुसकर ⬑ खारावारा ⬉


मध्य प्रदेशातील विंध्यन टेकड्यांवर स्थित
असलेल्या आणि भारतातील २२ व्या व्याघ्र प्रकल्पांपैकी एक असलेल्या पन्ना व्याघ्र प्रकल्पातील, आशियातील सर्वात वयस्कर हत्तीण असलेल्या ‘वत्सला’ने मंगळवारी (दि. ८ जुलै) अखेरचा श्वास घेतला. मध्य प्रदेशातील विंध्यन टेकड्यांवर स्थित असलेल्या आणि भारतातील २२ व्या व्याघ्र प्रकल्पांपैकी एक असलेल्या पन्ना व्याघ्र प्रकल्पातील या ज्येष्ठ हत्तीणीच्या निधनाने केवळ पन्नाच नव्हे, तर संपूर्ण वन्यजीव जगतात एक शांतता पसरली आहे, जणू काही एखाद्या वृद्ध सदस्याने शांतपणे जगाचा निरोप घेतला आहे. वत्सला फक्त एक हत्तीण नव्हती; ती एक युग होती, एक चालता-फिरता इतिहास होती, आणि पन्ना व्याघ्र प्रकल्पाच्या आत्म्याचा एक अविभाज्य भाग होती.

         वत्सलाचा जीवन प्रवास साधारणपणे १९७१ मध्ये केरळच्या निलांबूर जंगलातून सुरू झाला. तिथून तिला प्रथम नर्मदापूरम आणि नंतर पन्ना व्याघ्र प्रकल्पात आणण्यात आले. या नव्या घरात तिने आपले उर्वरित आयुष्य व्यतीत केले. एका शतकाहून अधिक काळ जगलेल्या या हत्तीणीने पन्नाच्या जंगलात आई, आजी आणि सखी अशा अनेक भूमिका निभावल्या. तिचे दीर्घायुष्य हे वन विभागाच्या अथक परिश्रमाचे, तिच्यावर केलेल्या अपार प्रेमाचे, आणि पन्नाच्या शांत, सृष्टीस्नेही वातावरणाचे प्रतीक होते. वत्सलाचे व्यक्तिमत्त्व अत्यंत शांत, मृदू आणि मायाळू होते. तिच्या स्वभावात एक प्रकारची अथांग शांतता होती, जी कोणालाही तिच्या जवळ खेचून घेत असे. ती केवळ हत्तींच्या कळपाची मार्गदर्शक नव्हती, तर लहान पिल्लांची काळजी घेणारी, त्यांना प्रेम देणारी आजी होती. जेव्हाही एखाद्या हत्तीणीचे पिल्लू जन्माला यायचे, तेव्हा वत्सला आजीच्या मायेने त्याची काळजी घ्यायची, त्याला आपल्या पंखाखाली घेऊन संरक्षण द्यायची. तिच्या या भूमिकेने तिला आई आणि आजी हे दोन्ही सन्मान प्राप्त झाले होते. तिची उपस्थितीच कळपातील इतर हत्तींना आधार देणारी होती, विशेषतः तरुण हत्तींसाठी ती एक मार्गदर्शक दिवा होती. तिच्या अनुभवी नजरेतून आणि शांत स्वभावातून कळपाला नेहमीच सुरक्षिततेची भावना मिळत असे. कळपातील कोणत्याही अडचणीत किंवा संकटात, वत्सलाचा अनुभव आणि धैर्य नेहमीच आधारस्तंभ ठरले. तिने अनेक पिढ्यांच्या हत्तींना जंगलातील जीवन कसे जगावे, नैसर्गिक धोक्यांपासून कसे वाचावे आणि कळपासोबत कसे राहावे हे शिकवले. वाढत्या वयानुसार वत्सलाला अनेक शारीरिक अडचणींना सामोरे जावे लागले. तिची डोळ्यांची दृष्टी पूर्णपणे गेली होती, आणि तिला लांब अंतर चालणेही शक्य नव्हते. परंतु, या शारीरिक मर्यादा असूनही तिने कधीही आपले धैर्य गमावले नाही. तिच्या चेहऱ्यावर नेहमी एक शांत आणि समाधानी भाव असायचा. वन विभागाचे कर्मचारी तिची अत्यंत प्रेमाने काळजी घेत होते. तिला रोज खैरैयां नाल्यावर आंघोळ घातली जायची, मऊ दलिया दिला जायचा आणि तिची अगदी मुलासारखी सेवा केली जायची. तिच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी विशेष पशुवैद्यकीय पथक नेहमी सज्ज असे. तिचे नियमित तपासणी केली जाई आणि तिच्या वाढत्या वयानुसार तिला पौष्टिक आहार दिला जात असे. वन कर्मचाऱ्यांनी तिच्यावर कुटुंबातील सदस्याप्रमाणे प्रेम केले, ज्यामुळे तिचे जीवन सुखकर झाले. सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत तिची प्रत्येक गरज पूर्ण केली जात असे. तिची आंघोळ, खाद्य, औषधोपचार आणि आराम याची पूर्ण काळजी घेतली जात होती. तिची आवडती खेळणी आणि आवडत्या जागी तिला नेले जाई. या सर्व काळजीमुळेच तिला एवढे दीर्घायुष्य लाभले. अलीकडेच तिच्या पुढच्या पायाच्या नखांना दुखापत झाली होती. हा तिच्या वृद्धत्वाने दिलेला शेवटचा धक्का होता. मंगळवारी ती नाल्याजवळ बसली आणि पुन्हा उठू शकली नाही. वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी तिला उठवण्याचा खूप प्रयत्न केला, अनेक डॉक्टर्स आणि तज्ज्ञांची मदत घेण्यात आली, पण अखेर निसर्गाने आपले कार्य केले आणि दुपारी १-३० च्या सुमारास वत्सलाने अखेरचा श्वास घेतला. तिच्या निधनाने वन कर्मचारी, स्थानिक लोक आणि पन्ना व्याघ्र प्रकल्पाला भेट देणारे हजारो पर्यटक यांच्या मनात एक मोठी पोकळी निर्माण झाली आहे. वत्सला केवळ पन्ना व्याघ्र प्रकल्पाची शान नव्हती, तर ती तिथे येणाऱ्या हजारो पर्यटकांची प्रिय होती. अनेक पर्यटक तिला पाहण्यासाठी आणि तिच्याशी संवाद साधण्यासाठी खास पन्नाला भेट देत असत. ती हत्तींच्या कळपाची एक मूक संरक्षक होती, एक अशी शक्ती होती जी कळपाला एकत्र ठेवत असे आणि त्यांना योग्य दिशा दाखवत असे. तिच्या असण्याने पन्ना व्याघ्र प्रकल्पाला एक वेगळी ओळख मिळाली होती. तिच्या दीर्घायुष्याने हे सिद्ध केले की योग्य काळजी आणि प्रेम मिळाल्यास प्राणीही दीर्घकाळ जगू शकतात आणि पर्यावरणाच्या संरक्षणात महत्त्वपूर्ण योगदान देऊ शकतात. तिच्या शांत आणि स्थिर उपस्थितीने पन्नाच्या जैवविविधतेला एक वेगळीच खोली दिली होती. तिने पर्यटकांना हत्तींचे सौंदर्य आणि बुद्धिमत्ता जवळून अनुभवण्याची संधी दिली, ज्यामुळे वन्यजीव संरक्षणाविषयी जागरूकता वाढली. तिची आठवण म्हणून पन्नामध्ये अनेक पर्यटन उपक्रम तिच्या नावाने सुरू करण्यात आले आहेत, जेणेकरून तिचे नाव चिरंतन राहील. आज वत्सला आपल्यामध्ये नाही, पण तिच्या आठवणी या जंगलात, त्या वाऱ्यात, त्या मातीत कायम जिवंत राहतील. तिच्या अस्तित्वाने पन्नाच्या जंगलाला एक वेगळी ऊर्जा दिली होती, एक वेगळे चैतन्य दिले होते. वन विभागाने तिचे अंत्यसंस्कारही अत्यंत सन्मानाने केले, जे तिच्याप्रती असलेल्या आदर आणि प्रेमाचे प्रतीक होते. वत्सलाचे जीवन हे केवळ एका हत्तीणीचे जीवन नव्हते, तर ते निसर्ग आणि मानव यांच्यातील एक अद्वितीय नातेसंबंधाचे उदाहरण होते. तिने आपल्याला शिकवले की प्राण्यांवर प्रेम करणे, त्यांची काळजी घेणे आणि त्यांना सन्मानाने वागवणे किती महत्त्वाचे आहे. वत्सलाच्या रूपाने वन्यजीव संरक्षणाचा एक महान अध्याय संपला असला तरी, तिच्या आठवणी आणि तिने दिलेला संदेश येणाऱ्या पिढ्यांना प्रेरणा देत राहील. तिच्या जीवनातून आपण शिकलो की, केवळ मोठ्या प्राण्यांचेच नव्हे, तर प्रत्येक जीवसृष्टीतील घटकाचे संरक्षण करणे हे आपले कर्तव्य आहे. वत्सला ही केवळ एक हत्तीण नव्हती, ती एक चालती-फिरती संस्था होती, एक प्रतीक होती - शांतता, धैर्य आणि प्रेमाचे. वत्सलाच्या निधनाने पन्ना व्याघ्र प्रकल्पात जी शांतता पसरली आहे, ती केवळ एका जीवनाच्या समाप्तीची शांतता नाही, तर ती एका युगाच्या समाप्तीची शांतता आहे. ती फक्त एक हत्तीण नव्हती, तर ती आपल्या जंगलांचा वारसा होती, आपल्या समृद्ध जैवविविधतेचे प्रतीक होती. वत्सलाला भावपूर्ण श्रद्धांजली! तिचे जीवन आपल्याला नेहमीच आठवण करून देईल की निसर्गाशी एकरूप होऊन जगणे हेच खरे जीवन आहे.


रविवार, ६ जुलै, २०२५

ठाणे जिमाकावर फुलली बाग

-उमाजी म. केळुसकर ⬑ खारावारा ⬉

आज जेव्हा जग
हवामान बदल आणि शहरीकरणाचे गंभीर परिणाम अनुभवत आहे, तेव्हा प्रत्येक लहान प्रयत्नही महत्त्वाचा ठरतो. अशा परिस्थितीत, पर्यावरणपूरक जीवनशैली आणि शाश्वत विकासाच्या दिशेने टाकलेले एक महत्त्वाचे पाऊल म्हणून ठाणे जिल्हा माहिती कार्यालयाच्या छतावर नुकतीच बहरलेली सुंदर बाग, केवळ हिरवीगार जागा न राहता, एक प्रेरणादायी उदाहरण बनली आहे. राज्य सरकारच्या शंभर आणि दीडशे दिवसांच्या कृती आराखड्यांतर्गत विविध शासकीय कार्यालये उपक्रम राबवत असताना, ठाणे जिल्हा प्रशासनातर्फे व ठाणे जिल्हा माहिती कार्यालयाच्या पुढाकाराने ठाणे जिल्ह्याचे तरुण, तडफदार, कर्तव्याशी एकनिष्ठ आणि कल्पक असे जिल्हा माहिती अधिकारी मनोज शिवाजी सानप यांच्या चैतन्यशील धडपडीतून आणि पर्यावरणतज्ज्ञ विजयकुमार कट्टी यांच्या सहकार्याने साकारलेली ही अभिनव कल्पना, समाजाच्या प्रत्येक स्तराला पर्यावरणासाठी एकत्र येण्याचे आवाहन करत आहे.

          या टेरेस गार्डनची संकल्पना फक्त सौंदर्यवृद्धीपुरती मर्यादित नाही, तर ती पर्यावरण रक्षण, कचऱ्याच्या पुनर्वापराची जाणीव आणि सकारात्मक सामाजिक परिवर्तन घडवण्याच्या हेतूने साकारली आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे, ही बाग टाकाऊ लाकूड, प्लास्टिक आणि जुने कपडे यांचा वापर करून फुलवण्यात आली आहे. हा दृष्टिकोन कचरा व्यवस्थापनासाठी एक अभिनव मार्ग दाखवतो. आपण अनेकदा अनावश्यक समजून फेकून देतो त्या वस्तूंना एक नवीन जीवन देता येते, हेच यातून अधोरेखित होते. पर्यावरणतज्ज्ञ विजयकुमार कट्टी यांनी म्हटल्याप्रमाणे, "कोणतीही वस्तू फेकण्याऐवजी तिला दुसरे आयुष्य देता येते, हेच इथे दाखवले आहे." हे वाक्य केवळ एक विधान नसून, पुनर्वापराच्या संस्कृतीचा पाया रोवणारे एक तत्त्वज्ञान आहे.

        या बागेत 45 हून अधिक प्रजातींची झाडे लावण्यात आली आहेत. ही झाडे केवळ डोळ्यांना सुखद वाटणारे हरित सौंदर्यच देत नाहीत, तर अनेक पर्यावरणीय लाभ देखील देतात. छतावर लावलेली झाडे इमारतीचे तापमान कमी करण्यास मदत करतात. यामुळे वातानुकूलनाचा वापर कमी होतो आणि ऊर्जेची बचत होते. वाढत्या शहरीकरणात, काँक्रीटची जंगले तयार होत असताना, शहरांचे तापमान वाढत आहे. अशा परिस्थितीत, छतावरील बागा शहरी उष्णता बेटांचा प्रभाव कमी करण्यास मोलाची मदत करतात. ही झाडे प्रदूषण विरहित परिसर निर्माण करण्यास हातभार लावतात. झाडे हवेतील कार्बन डायऑक्साइड शोषून घेतात आणि ऑक्सिजन बाहेर टाकतात, ज्यामुळे हवेची गुणवत्ता सुधारते. शहरांमधील वाढत्या प्रदूषणामुळे निर्माण होणाऱ्या आरोग्य समस्यांवर हा एक छोटा पण प्रभावी उपाय आहे. विशेष म्हणजे, या बागेतील काही झाडे डास प्रतिबंधक वातावरण तयार करण्यासही मदत करतात, ज्यामुळे आरोग्य आणि स्वच्छतेच्या दृष्टीनेही हा एक महत्त्वाचा फायदा आहे.

        विजयकुमार कट्टी यांनी म्हटल्याप्रमाणे, "या बागेतील प्रत्येक रोप हे शिक्षक आहे." हे विधान खूप मार्मिक आहे. झाडे आपल्याला संयम, जबाबदारी आणि निसर्गाशी संवेदनशीलतेने वागण्याचा धडा शिकवतात. एका रोपाला लावण्यापासून ते त्याची वाढ होईपर्यंत लागणारा संयम, त्याला नियमित पाणी घालण्याची आणि त्याची काळजी घेण्याची जबाबदारी, आणि निसर्गाच्या प्रत्येक लहान घटकाची संवेदनशीलता यातून शिकायला मिळते. ही शिकवण केवळ व्यक्तींसाठीच नव्हे, तर समाजासाठीही अत्यंत आवश्यक आहे.

          या छतावरील बागेचे मॉडेल शाळा, महाविद्यालये, ग्रामीण भाग, गृहनिर्माण संस्था आणि शासकीय इमारतींमध्ये सहजपणे राबवता येऊ शकते. याची अंमलबजावणी करणे सोपे असून, त्याचे फायदे अनेक आणि दूरगामी आहेत. शैक्षणिक संस्थांमध्ये हे मॉडेल राबवल्यास विद्यार्थ्यांना लहानपणापासूनच पर्यावरणाचे महत्त्व आणि शाश्वत पद्धतींचे ज्ञान मिळेल. ग्रामीण भागात, जिथे पाण्याची उपलब्धता आणि कचरा व्यवस्थापन ही आव्हाने आहेत, तिथे हे मॉडेल उपयोगाचे ठरू शकते. गृहनिर्माण संस्थांमध्ये हे मॉडेल राबवल्यास नागरिकांना एकत्र येऊन पर्यावरणासाठी काहीतरी करण्याची संधी मिळेल, ज्यामुळे सामुदायिक भावना वाढीस लागेल.

        
पर्यावरण संरक्षणाची ही कृती-आधारित पद्धत 'विचारातून कृती'कडे नेणारी ठरणार आहे, असे विधान ठाणे जिल्हा माहिती अधिकारी मनोज शिवाजी सानप यांनी केले, ते अगदी योग्यच आहे. आजच्या युगात केवळ पर्यावरणाबद्दल बोलणे पुरेसे नाही, तर प्रत्यक्ष कृती करणे आवश्यक आहे. पर्यावरण समस्यांवर उपाययोजना करण्यासाठी चर्चासत्रे, परिषदा आणि धोरणे आवश्यक असली तरी, त्याशिवाय प्रत्यक्ष जमिनीवर कृती करणे तितकेच महत्त्वाचे आहे. ठाणे जिल्हा माहिती कार्यालयाने उचललेले हे पाऊल इतरांसाठी एक आदर्श उदाहरण आहे.

       ठाणे जिल्हा माहिती कार्यालयावरील हे टेरेस गार्डन केवळ एक बाग नाही, तर ते आशा, बदल आणि जबाबदारीचे प्रतीक आहे. हे आपल्याला आठवण करून देते की, मोठे बदल नेहमी लहान पावलांनी सुरू होतात. प्रत्येक नागरिक, प्रत्येक संस्था आणि प्रत्येक प्रशासकीय घटक अशा छोट्या पण प्रभावी उपायांमध्ये सहभागी झाल्यास, आपण निश्चितच आपल्या पर्यावरणाचे रक्षण करू शकू आणि भावी पिढ्यांसाठी एक सुंदर आणि निरोगी जग निर्माण करू शकू.

        आज, जेव्हा पर्यावरण आणि शाश्वतता हे शब्द केवळ पुस्तकी चर्चांमधून बाहेर पडून प्रत्यक्ष जीवनाचा भाग बनण्याची गरज आहे, तेव्हा ठाण्याच्या या प्रयत्नाचे कौतुक करावे तेवढे थोडेच आहे. हे केवळ एक हरित छत नाही, तर ते एक हरित मन घडवणारे केंद्र आहे. हे एक असे केंद्र आहे, जिथे निसर्गाशी संवाद साधला जातो, पुनर्वापराबद्दल शिकवले जाते आणि पर्यावरणासाठी काहीतरी करण्याची प्रेरणा दिली जाते.

       आपण आपल्या इमारतीच्या छतावर अशी बाग फुलवण्याचा विचार कधी करणार? ही केवळ एक बाग नाही, तर ती एक जीवनशैली आहे; एक अशी जीवनशैली जी आपल्याला निसर्गाच्या जवळ आणते आणि आपल्या भविष्यासाठी आशा निर्माण करते. ठाणे जिल्हा माहिती कार्यालयाने लावलेले हे रोपटे आता एका मोठ्या वृक्षात रूपांतरित होऊन अनेकांना प्रेरणा देईल अशी आशा आहे. हीच वेळ आहे विचार करण्याच्या पलीकडे जाऊन कृती करण्याची.