-उमाजी म. केळुसकर ⬑ विश्वभरारी ⬉
जगाची लोकसंख्या २०५० पर्यंत आताच्या ७७० कोटींवरून सुमारे ९७० कोटींवर पोहोचेल. असे असले तरी लोकसंख्येच्या वाढीत प्रत्येक ठिकाणी घट नोंदवली जात आहे, पण भारतात मात्र लोकसंख्या वाढेल, असाच अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. जगात सध्या ६५ वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांची संख्या पाच वर्षांहून कमी वयाच्या मुलांपेक्षा अधिक असून २०५० पर्यंत जगाच्या एकूण लोकसंख्येत ज्येष्ठांचा वाटा दुप्पट तर भारतात तिप्पट होईल. भारतात आताच १४ कोटी ज्येष्ठ नागरिक असून २०५० पर्यंत त्यांची संख्या ३१ कोटी ६८ लाखावर पोहोचेल. अशा परिस्थितीत वेगाने वाढणार्या ज्येष्ठांच्या लोकसंख्येमुळे काही कौटुंबिक, सामाजिक प्रश्नही निर्माण होतात. त्यांच्या सामाजिक सुरक्षेची जबाबदारी सरकारवर आहे.
वाढती लोकसंख्या ही समस्या आहे की तिला मानव संपत्ती अथवा मनुष्यबळाच्या दृष्टीने पाहिले जावे? याबाबत वेगवेगळ्या देशांचा वेगवेगळा दृष्टीकोन असू शकतो. परंतु लोकसंख्येशी निगडीत ज्या गंभीर समस्या समोर येत आहेत, त्याकडे दुर्लक्ष करुन चालणार नाही. याला आणखी एक कंगोरा आहे, तो म्हणजे जगात पहिल्यांदाच ज्येष्ठ नागरिकांची संख्या पाच वर्षांच्या मुलांच्या तुलनेत अधिक झाली आहे. २०१८ च्या अखेरीस ६५ वर्षांपेक्षा अधिक वयाच्या ज्येष्ठांची संख्या ७० कोटींहून अधिक होती, तर चार वर्षांच्या मुलांची संख्या ६८ कोटी आहे. त्यामुळे ठोसपणे असं म्हणता येईल की, जग अशा टप्प्यावर आहे की तेथे नातवंडांच्या तुलनेत आजी-आजोबांची संख्या अधिक झाली आहे. जर अशीच परिस्थिती राहिली तर २०५० मध्ये ० ते ४ वर्षांच्या प्रत्येक मुलावर दोन ज्येष्ठ असतील, म्हणजेच ज्येष्ठांची संख्या मुलांच्या तुलनेत दुप्पट असणार आहे.
ही परिस्थिती दोन मुख्य कारणांमुळे निर्माण झाली आहे. पहिली गोष्ट म्हणजे वाढत्या आरोग्य सुविधांनी आयुर्मर्यादा वाढली आहे, त्यामुळे ज्येष्ठ नागरिकांच्या संख्येत वाढ होत आहे. अनेक विकसित देशांमध्ये सेवानिवृत्तीनंतर ज्येष्ठांच्या देखभालीसाठी विशेष सामाजिक सुरक्षा व्यवस्था केल्या आहेत, त्याने त्यांना आरोग्य आणि उदरनिर्वाहासाठी कोणावरही अवलंबून राहावे लागत नाही. अशाप्रकारे आरोग्य आणि आर्थिक समस्यांपासून चिंतामुक्त जीवनामुळे ज्येष्ठांना दीर्घायुष्य मिळू लागले आहे. हा एक अर्थपूर्ण बदल आहे. पण याला समांतर दुसरी उल्लेखनिय गोष्ट अशी आहे की कामकाज आणि नोकरीतील वाढत्या जबाबदार्या आणि ताणतणावांमुळे तरुणाई मुलांना कमी प्रमाणात जन्म देत आहे. चीन व्यतिरिक्त असे जरी कोणत्याही देशाचे जाहीर धोरण नसले तरी आता अधिकांश देशांत एक अपत्याच्या कुटुंबाचे चलन वाढत आहे. असा बदल ब्रिटनसारख्या देशातही होत आहे. तेथे मध्यमवर्गीय कुटुंबांना अपत्याचे संगोपन करणे परवडत नसल्याने ते एकापेक्षा अधिक मुलांना प्राधान्य देत नाहीत. यामागे मुलांच्या संगोपनासाठी लागणारा वेळ आणि खर्चाची समस्या देखील आहे. त्यामुळे तरुण दाम्पत्य आता अधिक मुलांना जन्म देत नाहीत. यामुळे ज्येष्ट आणि मुलांच्या प्रमाणात असंतुलन निर्माण होत आहे. परंतु हे असंतुलन खरेतर एका मोठ्या धोक्याकडे लक्ष वेधून घेत आहे, हा धोका उलट्या पिरॅमिडसारख्या सामाजिक रचनेच्या देशांची संख्या वाढण्याचा आहे. यात ज्येष्ठ अधिक आणि मुलं कमी असणार आहेत.
जर जगात मुलांची संख्या कमी आणि ज्येष्ठांची अधिक जास्त झाली तर अशा वेळी जागतिक समाजाचे सामाजिक आरोग्य सदृढ ठेवणे अवघड होईल. विशेष म्हणजे जगातील अर्ध्या देशांमध्ये अजूनही लोकसंख्येचा सद्य आकार कायम ठेवण्यासाठी पुरेशी मुले नाहीत. १९६० मध्ये जगात महिलांमध्ये प्रजनन दर पाच मुलांचा होता, तो सहा दशकानंतर अर्ध्याहून कमी म्हणजेच २.४ झाला आहे. साठच्या दशकात लोक सरासरी ५२ वर्षे जगत होते, या दशकात ही सरासरी ७२ वर्षे झाली आहे. जपानमध्ये तर या आयुर्मर्यादेची सरासरी ८२ वर्षे आहे. २०१८ मध्ये जपानच्या एकूण लोकसंख्येत ६५ सालापेक्षा अधिकच्या जेष्ठांची टक्केवारी २७, तर पाच वर्षांपेक्षा लहान मुलांची टक्केवारी केवळ ३.८५ होती. ज्या देशांमध्ये सामाजिक सुरक्षेच्या उदारमतवादी धोरणांतर्गत चांगल्या आरोग्य सुविधा आणि पेन्शनसारख्या योजना आहेत, तेथे ज्येष्ठांची अधिक संख्या लोकसंख्येच्या बिघडलेल्या प्रमाणाबरोबरच अनेक आर्थिक आणि देशाच्या विकासावर परिणाम करणार्या समस्या निर्माण करु शकते. खरे तर समाजात ज्येष्ठांची संख्या वाढण्याचा अर्थ, कामकाजी लोकांच्या संख्येत घट असा आहे. त्यामुळे देशाची उत्पादकता कमी होऊ शकते आणि विकासावर परिणाम होऊ शकतो. जपानचं उदाहरण देत आंतरराष्ट्रीय नाणे निधीने हाच इशारा दिला आहे की ज्येष्ठांच्या अधिक संख्येने येत्या चार दशकात जपानची अर्थव्यवस्था २५ टक्क्यांपर्यंत घसरु शकते. ज्येष्ठांची वाढती संख्या चीनलाही सतावत आहे, म्हणूनच त्याने एक मुल धोरणाच्या लोकसंख्या निर्बंधांचा ङ्गेरविचार करण्याचे ठरविले आहे.
भारताचा दृष्टीकोन मात्र एकूण लोकसंख्येच्या भयावह आकडेवारीवर आहे, त्यामुळे भारत एकीकडे तरुणाचा देश म्हटला जात असला तरी ज्येष्ठांच्या वाढत्या संख्येकडे गांभीर्याने पाहिले जात नाही. ज्येष्ठांची संख्या वाढू नये असे नाही, तर त्याहीपेक्षा वेगाने तरुणांची संख्या वाढणे गरजेचे आहे. तसे होत नाही आहे. २००१ मध्ये भारतात सात कोटी ७० लाख ज्येष्ठ नागरिक होते. २०११ मध्ये ही संख्या १० कोटी ४० लाख एवढी झाली. २०५० मध्ये हा आकडा ३१ कोटी ६८ लाखावर पोहोचेल. ‘एक किंवा दोनच मुलं पुरेत’ या धोरणाचा हा परिणाम आहे. त्यामुळे प्रत्येक कुटुंबात किमान आई-वडील ही दोन प्रौढ माणसं आणि बहुधा एकच लहान मूल असतं. काही कुटुंबांमध्ये आई, वडील आणि आजी, आजोबा अशा चार प्रौढांमागे एक लहान मूल असं प्रमाण असतं. अशा प्रकारे मुलांची संख्या मुळातच रोडावत चालल्यामुळे प्रौढ ज्येष्ठ होण्याच्या प्रमाणाएवढं लहान मुलं तरुण होण्याचं प्रमाण नाही.
समस्येचं एक टोक थेट ज्येष्ठांशी निगडीत आहे, ते अधिक चिंताजनक आहे. वास्तविक कोणत्याही समाजात ज्येष्ठ एकाकीपण आणि असुरक्षेसारख्या मुद्यावरुन ङ्गारच समस्याग्रस्त असतात. अनेक देशांमध्ये झालेला अभ्यास सांगतो की वेगाने बदलत्या सामाजिक आणि आर्थिक परिस्थितीत ज्येष्ठ सामाजिक आणि भावनात्मक पातळीवर एकाकी पडत चालले आहेत. भारतात तर ज्येष्ठांची ससेहोलपट चालली असल्याचे दिसून येते. अनेक प्रकारची कारणे सांगून त्यांना वृद्धाश्रमात पाठवले जाते. ज्या ज्येष्ठांना संतती नसते त्यांना तर अक्षरशः एकाकी जीवन जगावे लागते. या घडीला १४ कोटींपैकी जवळपास तीन ते चार कोटी ज्येष्ठ नागरीक असे आहेत की ज्यांना मुले आहेत पण ती नोकरी व्यवसायाच्या निमित्ताने परगावी असतात. कौटुंबिक विवादामुळे अनेकांना आपल्याच मुलांपासून वेगळे राहाण्याची वेळ येते. बर्याच ठिकाणी तर पैसा असूनही अनेक ज्येष्ठांचा भावनिक कोंडमारा होतो आणि हे वृद्धत्व त्यांनाच एक ओझेसुध्दा वाटू लागते. अशा प्रकारचे नैराश्य समाजव्यवस्थेच्या दृष्टीने घातकच म्हणायला हवे. याबरोबरच त्यांच्या सुरक्षेचाही मोठा प्रश्न आहे. एकाकी ज्येष्ठ नागरिक चोर, लुटारुंच्या लक्ष्यस्थानी आहेत. त्यांच्या हत्याही झाल्या आहेत. दोन वर्षांपूर्वी मुंबईत एका आलिशान फ्लॅटमध्ये वृद्ध महिलेच्या मृत्यूने एकाकीपणाच्या सामाजिक समस्येकडे लक्ष वेधून घेतले होते. या महिलेचा मुलगा दीड वर्षाने जेव्हा अमेरिकेतून परतला तेव्हा त्याला फ्लॅटमधील बेडरुममधील बेडवर त्याला आपल्या आईचा केवळ सापळा दिसला. दीड वर्षापूर्वी त्या वृद्धेचे आपल्या मुलाबरोबर बोलणे झाले होते. या घटनांकडे गांभीर्याने पाहण्याचा गरज आहे.
ज्या भारतीय संस्कृतीने ज्येष्ठांचा आदर करण्याचा नेहमीच संस्कार सांगितला. घरात असणारी वयोवृद्ध व्यक्ती ही त्या कुटुंबाला आधारवडासारखी असते. आणि तिची सेवा हा आपल्या जीवनाच्या कर्तव्याचा भाग असतो. असे संस्कार ज्या कुटुंबव्यवस्थेतून दिले गेले. त्याच भारतामध्ये आता मुले मोबाइल अथवा टीव्हीमध्ये गुंतून असतात. त्यांच्याकडे ज्येष्ठांशी गप्पागोष्टी करण्यास वेळ नसतो. मोठ्या शहरांतील कुटुंब चालविण्यासाठी जर पती-पत्नी नोकरदार असतील तर घरातील ज्येष्ठांशी बोलायला त्यांना आठवडे न आठवडे बोलायला वेळ नसतो. हल्ली ज्येष्ठांसाठी विरंगुळा केंद्रे आहेत, तसेच ज्येष्ठ नागरिक संघटना आहेत, तेथे चार विरंगुळ्याचे क्षण ज्येष्ठ नागरिकांना अनुभवता येतात. परंतु सर्वत्र या सोयीसुविधा उपलब्ध नसतात, आजारी वृद्धांना बाहेर पडता येत नाही. त्यांच्या औषधोपचाराचाही प्रश्न असतो. त्यांना आपल्या जगण्यासाठी संघर्ष करावा लागतो, तसेच सरकारबरोबरही आपल्या अधिकारांसाठी लढावे लागते आहे. कारण भारतात आज सर्वात मोठी समस्या ज्येष्ठांच्या सामाजिक-आर्थिक सुरक्षेची आहे. सरकार सेवानिवृत्तीनंतर पेन्शनसारख्या सुविधा नाहीशा करीत आहेत. असंघटीत क्षेत्रात तर आधीच पेन्शनसारखा प्रकार नाही. काही ज्येष्ठांना तर हात पाय चालताहेत तोपर्यंत काम करावे लागते. अशा परिस्थितीत भारतासारख्या देशात ज्येष्ठांची वाढती संख्या आणि त्यांच्या समस्या सरकारसाठी एखाद्या आव्हानापेक्षा कमी नाही. त्यामुळे सरकारने आणि समाजानेही ज्येष्ठांसाठी सुविधांची पार्श्वभूमी तयार करुन द्यावी, यात सर्व समाजाचे हित आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा