मंगळवार, ६ ऑगस्ट, २०१९

अमेरिकेने जागवले अण्वस्त्रांचे भूत

-उमाजी म. केळुसकर ⬑ विश्वभरारी ⬉  


     उद्या अमेरिकेच्या जागतिक दहशतवादाच्या काळ्याकुट्ट, भीषण आठवणी जागवण्याचा दिवस. ६ ऑगस्ट रोजी जपानमधील हिरोशिमावर आणि ९ ऑगस्ट १९४५ रोजी नागासाकीवर अणुबॉम्ब फेकून अमेरिकेने आपल्या विकृत कृत्याचा फटका या दोन शहरांतील लाखो जपानी नागरिकांना दिला. त्यांना मृत्यूमुखी लोटून दिले. युद्ध हे दोन लष्करात लढायचे असते हे जाणीवपूर्व विसरुन अमेरिकेने  जपानला धडा शिकवण्यासाठी हिरोशिमा, नागासाकीच्या निष्पाप नागरिकांचा बळी घेतला. हिटलरच्या कौर्याबद्दल बोलले जाते, पण हिटलरपेक्षाही अमेरिका क्रूर वागली, तरी ती जगात साव म्हणून वावरते आहे. स्वत:ला जगाची ङ्गौजदार समजते आहे. अमेरिकेने केलेले पाप कधीही न मिटणारे आहे. तिने जागवलेले अण्वस्त्रांचे भूत आता सिंदबादच्या म्हातार्‍याप्रमाणे जगाच्या पाठिवर बसले आहे. या घटनेला ७४ वर्षे झाली तरी त्यातून मुक्तता होण्याची सध्यातरी चिन्हे दिसत नाहीत.
      पहिल्या महायुद्धानंतर अनेक युरोपीय देशांची आर्थिक व सामाजिक घडी विस्कटली होती. बेरोजगारी,महागाई, उपासमार, अनारोग्य यामुळे वाढलेला असंतोष, जर्मनीत नाझीवाद आणि इटलीत ङ्गॅसिझमची वाढ अशी अनेक कारणे दुसर्‍या महायुद्धाला आमंत्रण देणारी ठरली. जर्मनीने पोलंडवर केलेल्या हल्ल्याने हे युद्ध १ सप्टेंबर १९३९ रोजी अधिकृतपणे सुरू झाले. इंग्लंड, ङ्ग्रान्स, अमेरिका, रशिया आणि इतर दोस्त राष्ट्रे यांच्याविरुद्ध जर्मनी, जपान, इटली आणि त्यांची समर्थकराष्ट्रे यांच्यात हे युद्ध पेटले. सुरुवातीला अमेरिकेने प्रत्यक्ष युद्धात भाग घेतला नव्हता. जपानला जगातील महासत्ता होण्याची इच्छा होती. जपानने डच व ब्रिटीश वसाहतींवर आक्रमण केले व जगाच्या पूर्व भागातील युद्धाला तोंड ङ्गुटले.सुरुवातीला तटस्थ असलेल्या अमेरिकेने दोस्त राष्ट्रांना जर्मनीविरुद्ध आर्थिक मदत करणे चालूच ठेवले होते. जपानने डिसेंबर १९४१ मध्ये अमेरिकेच्या पर्ल हार्बर वर हल्ला केला. आणि त्याला प्रत्युत्तर देताना अमेरिकेने युद्धात सक्रीय भाग घेतला व येथून युद्ध जगभर पसरले. हे युद्ध हिटलरच्या आत्महत्येबरोबर ३० एप्रिल १९४५ रोजी संपल्यात जमा होते. त्यानंतर आठवडाभरात ७ मे रोजी जर्मनीने शरणागती पत्करली आणि युरोपमधील दुसरे महायुद्ध संपले. कमकुवत झालेल्या जपानची शरणागती तेवढी बाकी होती.
      जपानच्या शरणागतीची कलमे जाहीर करण्यासाठी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष हॅरी ट्रमन, इंग्लंडचे चर्चिल आणि तैवानस्थित चँग कै शेक यांची बैठक अमेरिकी राष्ट्राध्यक्षांमुळे लांबत होती. जगातील पहिली अण्वस्त्र चाचणी अमेरिकेने जुलै १६ रोजी केल्यानंतर ट्रमन यांनी ती बातमी २४ जुलै रोजी स्टालिन यांना दिली. हेरगिरीतून ही बातमी स्टालिन यांना आधीच कळाली होती. सोविएत रशियाने जपानवर हल्ला करण्याची जोरदार तयारी चालविल्याची बातमी ट्रमन यांनादेखील हेरगिरीतूनच कळाली होती. महायुद्धाने स्पर्श न केलेल्या हिरोशिमा, कोकुरा, निईगाटा आणि नागासाकी या जपानी शहरांपैकी कोणत्याही एका लक्ष्यावर ३ ऑगस्टनंतर योग्य हवामान पाहून अणुबॉम्ब टाकण्याची आज्ञा जनरल कार्ल स्पाट्झ यांना २५ जुलै रोजी मिळाली. दुसर्‍याच दिवशी जपानला शरणागतीचा निर्वाणीचा इशारा देणारी ती लांबलेली बैठक जर्मनीतील पोस्टडॅम येथे झाली. त्याच दिवशी तो इशारा आणि इशारा न पाळल्यास ‘न भूतो..’ हानी करण्याची धमकी नभोवाणीवरून प्रथम इंग्रजीत आणि नंतर दोन तासांनी जपानी भाषेत जपानकडे पोहोचविली. राजनैतिक पातळीवरून हा इशारा मात्र जपानी शासनाला पोहोचविला नाही. रशियाने जपानविरुद्ध युद्ध जाहीर करण्याआधी दोन दिवस म्हणजे ६ ऑगस्ट रोजी अमेरिकेने हिरोशिमावर पहिला अणुबॉम्ब हल्ला केला. त्यानंतर दुसरा अणुबॉम्ब हल्ला ९ ऑगस्ट रोजी नागासाकीवर केला.
      अमेरिकेने टाकलेल्या अणुबॉम्बमुळे हिरोशिमा व नागासाकी या दोन्ही शहरातील हसती खेळती घरे, गजबजलेले रस्ते चिवचिवणार्‍या शाळा नेस्तनाबूत झाल्या. माणसाने वसवलेल्या संस्कृतीची स्ङ्गोटाने राखरांगोळी करत सगळे सजीव निर्जीव आपल्या पोटात घेतले. दोन्ही शहरांना स्मशानाची कळा  आली. हिरोशिमाच्या २ लाख ५५ हजार लोकसंख्येपैकी १ लाख ३५ हजार आणि नागासाकीतील सुमारे १ लाख ९५ हजार लोकसंख्येपैकी ६४ हजार माणसे ठार झाली. त्यापैकी ९५ टक्के नागरिकांचा युद्धाशी प्रत्यक्ष संबंधही नव्हता. या दोन्ही शहरांत मरण पावलेल्या लोकांतील बहुतेक लोक हे बॉम्ब टाकलेल्या दिवशीच मरण पावले. त्यानंतरच्या महिन्यात अनेक जण भाजलेल्या जखमांमुळे, उत्सर्जित किरणाच्या आजारामुळे, अन्य जखमा, अपुरा आहार व इतर आजार यामुळे मृत्यू पावले. या स्ङ्गोटांमुळे अनेक व्याधी, व्यंग, आजार पसरले. जगातील हा पहिला आणि एकमेव अणुबॉम्ब हल्ला होय. या हल्ल्यामुळे १५ ऑगस्ट १९४५ रोजी जपानने अमेरिकेपुढे बिनशर्त शरणागती पत्करली. जगातल्या कुठल्या दहशतवादी गटाने अथवा अमेरिकी शासनाच्या नजरेतील शांततेला धोकादायक कोणत्या राष्ट्राने अमेरिकेच्या तोलामोलाचे दहशतवादी कृत्य केले आहे? युद्धकाळात नागरिकांवर होणारे हल्ले अनैतिक, दहशतवादी आणि आंतरराष्ट्रीय कायद्याचे उल्लंघन करणारे असतात. त्याविरुद्ध १९२३ सालीच आंतरराष्ट्रीय कायदा अस्तित्वात आला होता. पण त्या कायद्याला अमेरिकेने आजपर्यंत भीक घातली नाही आणि आपल्या विकृत कृत्याची माङ्गी मागण्याचीही गरज तिला वाटली नाही. अमेरिकेच्या या एका अमानवी कृत्याने जगात अण्वस्त्र स्पर्धा वाढीस लागली. अमेरिकेने जपानवर टाकलेल्या अणुबॉम्बच्या तुलनेत सध्या अस्तित्वात असलेले अणुबॉम्ब शेकडोपटीने जास्त संहारक आहेत. विविध प्रक्षेपकांच्या माध्यमातून ही अण्वस्त्रे आता नेमक्या ठिकाणी टाकता येऊ शकतात.
      स्टॉकहोम येथील आंतरराष्ट्रीय शांतता संशोधन संस्थेने (स्टॉकहोम इंटरनॅशनल पीस रिसर्च इन्स्टिट्यूट) दिलेल्या ताज्या अहवालानुसार, १९८० च्या दशकात जगात एकूण ७०,००० अण्वस्त्रे होती. यात अनेकपट घट होऊन २०१९ च्या सुरुवातीला अमेरिका, रशिया, ङ्ग्रान्स, ब्रिटन, चीन, भारत, पाकिस्तान, इस्रायल आणि उत्तर कोरिया या देशांकडे मिळून सुमारे १३ हजार ८६५ इतकी अण्वस्त्रे आहेत. २०१८ च्या तुलनेत ही संख्या ६०० ने घटली आहे. २०१८ मध्ये अण्वस्त्रांची जगातील संख्या १४ हजार ४६५ एवढी होती. १३ हजार ८६५ अण्वस्त्रांपैकी ३ हजार ७५० अस्त्रांची सुरक्षा दलांनी तैनाती केली आहे. त्यातील २ हजार अस्त्रे अत्याधिक सतर्कता म्हणून संचालनाच्या स्थितीत ठेवण्यात आली आहेत. १९९० नंतर अण्वस्त्रांविरोधात जागृती घडवली जावू लागली. २०१० मध्ये अमेरिका आणि रशियादरम्यान झालेल्या स्टार्ट समझोत्यामुळे अण्वस्त्रांची संख्या कमी होण्यास मदत झाली. तथापि या करारानुसार
अमेरिका व रशियाचा अण्वस्त्र साठा होता तेवढाच आहे. या कराराची मुदत २०२१ मध्ये संपणार आहे. तथापि याच दोन देशांकडे जगातील एकूण अण्वस्त्रांच्या ९० टक्के अस्त्रे आहेत. याचा अर्थ जगातील अण्वस्रे कमी करुन त्यांना आपली ङ्गौजदारकी वाढवायची आहे. अहवालानुसार, अमेरिकेजवळ ६ हजार १८५, रशियाकडे ६ हजार ५००, ब्रिटनकडे २००, ङ्ग्रान्सकडे ३००, चीनकडे २९०, पाकिस्तानकडे १५० ते १६०, भारताकडे १३० ते १४० आणि इस्रायलकडे ८० ते ९० अण्वस्त्रे आहेत. जगातील देश अण्वस्त्रांची संख्या कमी ठेवू इच्छितात; मात्र त्यांचे आधुनिकीकरण करून आकार लहान करण्याचा सर्वांचा प्रयत्न आहे.अण्वस्त्रे ठेवणे सोपे व्हावे, हा त्यामागील हेतू आहे. अमेरिका लबाड आहे, त्यामुळे ती लबाडासारखीच वागणार यात शंका नाही. अणुबॉम्बपासून जगाला धोका उद्भवतो हे निमित्त पुढे करुन अमेरिका ही इराण, कोरिया, सिरिया अशा देशांना आपल्या वेठीस धरुन आर्थिक ङ्गायदे करुन घेताना दिसत आहे. इतर देश अणुबॉम्बचा वापर करतील हा केवळ सशंय आहे, पण ङ्गक्त अमेरिकेने अमुबॉम्बचा वापर केला आहे, हे निखळ सत्य आहे. त्यामुळे याबाबतीतला अमेरिकेचा दांभिकपणा लक्षात घ्यायला हवा.
     हिरोशिमा-नागासाकीवरील बॉम्बहल्ला आपल्याला वैज्ञानिक प्रगतीच्या मानवाने, म्हणजेच अमेरिकेने केलेल्या दुरुपयोगाची आठवण करुन देतात. रशियाने १९४९ साली अणुबॉम्बची सङ्गल चाचणी घेऊन अमेरिकेची मक्तेदारी संपुष्टात आणली. त्यानंतर इतर देशही या अणवस्त्र स्पर्धेत सामील झाले. खरेतर अण्वस्त्र स्पर्धा खर्‍या अर्थाने अमेरिका आणि रशियामध्येच आहे. म्हणून सर्वात आधी त्यांनीच आपली अण्वस्त्रे मोठ्या प्रमाणात कमी करुन इस्रायलच्या रांगेत बसायला पाहिजे. तरच त्यांचे प्रयत्न प्रामाणिक आहेत असे दिसून येईल. अमेरिकेने जो खड्डा खोदला त्या खड्ड्यात कधीतरी तिच पडू शकते. त्यामुळे अण्स्त्रांच्या बाबतीत दांभिकपणा दाखवून जमणार नाही. अणुऊर्जा हे दुधारी शस्त्र आहे. त्याने देशातील घराघरात प्रकाश पसरवायचा की लाखो कुंटुंबांचे भविष्य अंधकारमय करायचे, हा देशोदेशीच्या राजकारण्यांनी, विचारवंतांनी व सरकारे निवडून देणार्‍या सामान्य नागरकांनी गांभीर्याने विचार करायला हवा. अन्यथा भावी पिढ्यांचे सर्व आयुष्य अणुबॉम्बच्या भीतीमध्ये आणि हल्ला झाल्यास त्याचा संहारक-विदारक अनुभव सहन करण्यात जाईल.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा