गुरुवार, १७ जुलै, २०२५

'रामदास' दुर्घटना : कोकणच्या काळजावरील जखम

 -उमाजी म. केळुसकर ⬑ खारावारा ⬉


१७ जुलै १९४७. कोकण आणि मुंबईच्या इतिहासात ही तारीख केवळ एका अपघाताची नोंद नाही, तर ती आहे शेकडो निष्पाप जीवांच्या भयावह अंताची, सामूहिक दुःखाची आणि कधीही न विसरता येणाऱ्या एका आघाताची साक्ष. या दिवशी अरबी समुद्रात बुडालेल्या रामदास बोटीने केवळ जीवच घेतले नाहीत, तर स्वातंत्र्याच्या उंबरठ्यावर उभ्या असलेल्या एका समाजाच्या मनावर एक खोल आणि न पुसणारी जखम कोरली. ७७ वर्षांनंतरही, म्हणजे १७ जुलै २०२५ रोजी या घटनेला ७८ वर्षे पूर्ण होत असतानाही, त्या दुर्घटनेची आठवण आजही अनेकांच्या डोळ्यात पाणी आणते. जे त्या घटनेनंतर कित्येक वर्षांनी जन्माला आले, त्यांनाही या शोकांतिकेचं भान आहे, हीच तिच्या प्रभावाची खरी खोली दर्शवते.

      आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळालं, फाळणीच्या दंगलीत लाखोंनी जीव गमावले, अनेकजण निर्वासित झाले. विमानं कोसळली, रेल्वेचे अपघात झाले, भूकंपांनी हादरवून टाकलं, महापूर आले... पण या साऱ्या आपत्त्यांच्या गदतही, रामदास बोटीची ती ट्रॅजेडी मुंबई-कोकणच्या मनात हाहाकाराचं प्रतीक बनून कायम आहे. तिच्यावर कथा, कविता, लेख, आठवणी आजही लिहिल्या जातात. ती केवळ एक दुर्घटना नव्हती, तर ती होती कोकणच्या मातीच्या एका भागाची, तिच्या माणसांची सामूहिक वेदना. 

     तो दिवस होता स्वातंत्र्याच्या उंबरठ्यावरचा गुरुवार, १७ जुलै १९४७, गटारी म्हणजेच दीप अमावस्येचा. सकाळी पावणेआठच्या सुमारास मुंबईतील भाऊच्या धक्क्यावरून ‌‘रामदास‌’ बोट रेवसच्या दिशेने निघाली. बॉम्बे स्टीम नॅव्हिगेशन कंपनीच्या रामदास बोटीची प्रवासी क्षमता तब्बल १००० माणसांची होती. त्या दिवशी बोटीत ४८ खलाशी, ४ अधिकारी, १८ हॉटेलचा नोकर वर्ग व ६७८ अधिकृत प्रवासी अशी एकूण ७७३ माणसे होती. फुकटे प्रवासी सुमारे ३५ च्या आसपास असावेत, असे गृहीत धरले तरी बोटीत एकंदर ७७८ माणसे होती. या प्रवाशांमध्ये लहान मुले आणि तान्ही बाळे शंभरच्या आसपास होती. विशेष म्हणजे, ही बोट उत्तमरित्या कार्य करीत असल्याचे प्रमाणपत्र एक महिन्यापूवच बंदर अधिकाऱ्यांनी दिले होते. बोटीचा कॅप्टन, शेख सुलेमान, अनुभवी होता. 

       सकाळी वातावरण अगदी निरभ्र होतं, सर्व काही आलबेल होतं. बोटीवर पिकनिकला जाणारे, नातेवाईकांना भेटायला निघालेले, व्यापारानिमित्त प्रवास करणारे असे अनेक जण होते. त्यांच्या मनात भविष्याची, भेटीची, कामाची स्वप्नं होती. पण नियतीला काही वेगळंच मंजूर होतं.

बोट सुरू होऊन अवघा अर्धा तास झाला असेल नसेल, तोच अरबी समुद्राने आपलं रौद्ररूप धारण केलं. आकाशात ढग दाटले, समुद्रात उंचच उंच लाटा उसळू लागल्या. एकेक लाट जणू बोटीला गिळंकृत करायलाच येत होती. बोट हेलकावे खाऊ लागली. प्रवाशांमध्ये आरडाओरडा सुरू झाला, सारेजण सैरावैरा धावू लागले. या गोंधळात बोट अधिकच तिरपी झाली. कॅप्टन शेख सुलेमान यांनी बोट सावरण्याचा आटोक्यात प्रयत्न केला, पण नियतीच्या क्रूर खेळापुढे त्यांचाही निभाव लागला नाही. त्याचवेळी, एक राक्षसी लाट बोटीवर आदळली आणि जवळच असलेल्या काश्याच्या खडकाजवळ रामदास बोट समुद्रात बुडाली.

        ‌‘मरणात भयानक मरण आगीत होरपळून. त्याखालील भयानक मरण म्हणजे पाण्यात बुडून,‌’ असे म्हटले जाते. हेच पाण्यातील भयानक मरण काश्याच्या खडकाजवळ समुद्रात या दुर्दैवी जीवांवर ओढवले. क्षणार्धात होत्याचं नव्हतं झालं. अनेकांना सावरण्याची संधीही मिळाली नाही. समुद्राच्या लाटांवर मृतदेह तरंगू लागले, ती दृश्यं पाहून काळजाचा ठोका चुकला असेल. ज्यांना पोहता येत होतं, ते वाचले. बोटीच्या कॅप्टनने खिडकीतून उडी मारून स्वतःचा जीव वाचवला.

या दुर्घटनेत मरण पावलेल्या ६७८ प्रवाशांना १५ ऑगस्ट १९४७ रोजी देशाला मिळणारे स्वातंत्र्य पाहता आले नाही. आणि जे या दुर्घटनेतून सुदैवाने वाचले, त्या सुमारे १०० जणांनाही या स्वातंत्र्याचा निखळ आनंद घेता आला नाही. त्यांनी रामदास बोट बुडताना स्वतःच्या डोळ्यांनी पाहिली होती. ती बुडण्याच्या प्रक्रियेचाच ते एक भाग होते. त्यांनी आपल्या सोबत प्रवास करणाऱ्या प्रवाशांचा उघड्या डोळ्यांनी बुडताना मृत्यू पाहिला होता. तान्ह्या बाळासह त्यांच्या माता, लहान मुले, गर्भवती स्त्रिया, वृद्ध-तरुण यांच्या मृत्यूने त्यांच्या मनःस्वास्थ्यावर विदारक परिणाम झाला होता. या धक्क्यातून ते कालांतराने बाहेर पडले, पण या दुर्घटनेने शेकडो मृत प्रवाशांच्या कुटुंबांची जी हानी झाली ती कधी भरून निघाली नाही.

      ही बोट बुडाल्यावर तात्काळ बोट चालकावर क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी व सामान भरल्याचा आणि बोट सुस्थितीत नसल्याचा आरोप करण्यात आला. आणखी बरेच मुद्दे उपस्थित झाले. २० जुलै १९४७ पासून इंडियन मर्कटाईन मरीन प्रिन्सिपल ऑफिसर, कमोडोर मिल्स यांनी याबाबत चौकशीस सुरुवात केली. या दुर्घटनेतून वाचलेले कप्तान शेख सुलेमान, फर्स्ट ऑफिसर आदमभाई यांच्या जबान्या झाल्या.

       त्यानुसार, अपघाताच्या वेळी रामदास बोटीचा वेग फक्त २७ नॉट्स इतका मंद होता. वादळाच्या वेळी बोटीचे स्टर्न (मागील भाग) नेहमी लाटांशी काटकोनात ठेवायचा दर्यावद प्रघात आहे, जेणेकरून लाटा फुटतात पण पाणी आत शिरत नाही. तेही कप्तान शेख सुलेमान यांनी केले होते. परंतु, लाटा इतक्या उंच व निरनिराळ्या दिशांनी येत होत्या की त्यावेळी प्रवासी घाबरून स्टार (डावीकडील) भागाकडे पळाले. ती बाजू अतिवजनाने खाली गेली, त्याच वेळी एक काळलाट आली आणि तिने बोट खाली दाबली जाऊन ती समुद्रतळाशी गेली, हेच या अपघाताबद्दलचे त्यांचे स्पष्टीकरण ग्राह्य ठरवण्यात आले. कंपनीने बिनतारी संदेश वहन यंत्रणेची भारत सरकारकडे मागणी करूनही ती मिळाली नाही, असे सांगून बिनतारी संदेश वहन यंत्रणेबाबतच्या आरोपापासून आपले हात झटकले.

      कमोडोर मिल्सने २७ जुलै १९४७ ला भारत सरकारला दिलेल्या चौकशी अहवालात बोट ओव्हरलोड व नादुरुस्त होती या आरोपात तथ्य नसल्याचे सांगितले. त्यामुळे या अपघाताच्या जबाबदारीतून कंपनी निर्दोष सुटली. मात्र, या चौकशीतील काही बाबींची जबाबदारी थेट भारत सरकारवर येऊन पडली होती. त्यावेळी दिल्लीत संमिश्र सरकार होते आणि ब्रिटिश भारताला स्वातंत्र्य देण्याच्या प्रक्रियेत होते. त्यामुळे समुद्रात ज्याप्रकारे लाटेने रामदास बोट दाबली गेली, त्याचप्रकारे या घटनेचे गांभीर्य अनास्थेच्या सागरात दाबले गेले.

      कप्तान शेख सुलेमान यांचा परवाना रद्द करून या प्रकरणावर पडदा टाकण्यात आला. परंतु, या घटनेनंतर बॉम्बे स्टीम नॅव्हिगेशन कंपनीला घरघर लागली आणि ती सिंदिया स्टीम नॅव्हिगेशन कंपनीत विलीन करण्यात आली. पण यानंतर कोकण बोट प्रवासात खूपच सुधारणा झाल्या. पावसाळ्याच्या काळात चार महिने बोटी कायद्याने बंद करण्यात येऊ लागल्या. बिनतारी संदेशवहन यंत्रणा आदी अद्ययावत साधने बोटींवर बसवण्यात आली. बोटींचा प्रवास खूपच सुरक्षित झाला, पण यासाठी रामदास बोटीचा बळी जावा लागला, हे दुर्दैवच म्हटले पाहिजे.

      आजही, या घटनेला १७ जुलै २०२५ रोजी ७८ वर्षे पूर्ण होत असताना तोच वार गुरुवार आहे, कोकणवासीयांच्या मनात ही घटना ताजी आहे. ती केवळ एक जुनी आठवण म्हणून नव्हे, तर एक न पुसणारी जखम म्हणून कायम आहे. १७ जुलै १९४७ हा दिवस कोकणवासीयांसाठीच नाही, तर संपूर्ण महाराष्ट्रासाठी एक काळा दिवस ठरला. रामदास बोटीने जे जीव घेतले, ती केवळ आकडेवारी नव्हती; ती होती भविष्याची स्वप्नं पाहणाऱ्या अनेक निष्पाप जीवांची राखरांगोळी.

       या भीषण दुर्घटनेत मरण पावलेल्या सर्व प्रवाशांना भावपूर्ण श्रद्धांजली! त्यांच्या आत्म्यांना शांती मिळो. ही घटना आपल्याला कायम आठवण करून देते की, जीवनात सुरक्षिततेला किती महत्त्व द्यावं आणि निसर्गाच्या शक्तीचा आदर करावा.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा