-उमाजी म. केळुसकर ⬑ विश्वभरारी ⬉

आजच्या सोशल मीडियाच्या युगात, जिथे प्रत्येक व्यक्ती डिजिटल अवकाशात वावरते, तिथे संपर्कांची सहजता वाढली आहे. पण या सहजतेचा गैरफायदा घेऊन 'हनी ट्रॅप' नावाच्या एका गंभीर गुन्हेगारी प्रकाराने समाजात धुमाकूळ घातला आहे. एखाद्या व्यक्तीला प्रेमाच्या किंवा मैत्रीच्या जाळ्यात ओढून, तिचे अश्लील व्हिडिओ किंवा फोटो बनवून तिला ब्लॅकमेल करणे, याला 'हनी ट्रॅप' म्हणतात. ही केवळ एक साधी फसवणूक नाही, तर ती पीडित व्यक्तीच्या मानसिक आरोग्यावर आणि जीवनावर गंभीर परिणाम करणारी एक संघटित गुन्हेगारी आहे. देशभरात वर्षाकाठी दोन लाखांहून अधिक 'हनी ट्रॅप' चे गुन्हे नोंदवले जातात, परंतु बदनामीच्या भीतीने अनेकजण तक्रार दाखल करत नाहीत, त्यामुळे या गुन्ह्यांचे खरे प्रमाण कैकपटीने अधिक आहे.
संयुक्त राष्ट्र मानवी हक्क विभागाने २०२३ मध्ये प्रसिद्ध केलेल्या एका अहवालानुसार, दक्षिण-पूर्व आशियामध्ये संघटित गुन्हेगारी टोळ्यांनी 'हनी ट्रॅप' च्या माध्यमातून हजारो लोकांना आपल्या जाळ्यात ओढून एका वर्षात तब्बल ६४ हजार कोटी रुपये उकळले आहेत. ही आकडेवारी या गुन्हेगारीच्या गंभीरतेची कल्पना देते. विशेष म्हणजे, पूर्वी प्रत्यक्ष भेटून होणारे हे प्रकार आता मोबाईल आणि कॉम्प्युटरवरून, सोशल मीडियाच्या माध्यमातून घडतात आणि खंडणीही ऑनलाइनच उकळली जाते. मुंबईतील नुकतीच घडलेली घटना, जिथे एका मॉडेलच्या 'हनी ट्रॅप' मध्ये अडकून ३२ वर्षीय सीए राज मोरे याने पावणेतीन कोटी रुपये गमावल्यानंतर आत्महत्या केली, हे या धोक्याचे भयावह वास्तव दर्शवते. अशा घटना देशभर घडत आहेत आणि अनेकांना आपले प्राण गमवावे लागले आहेत. कराड येथे घडलेला एक प्रकार या गुन्हेगारीचे संघटित स्वरूप दर्शवतो. मुंबईतून कर्नाटकला हवालाची तीन कोटींची रक्कम पोहोचवण्यासाठी निघालेल्या एका गाडीच्या चालकाला 'हनी ट्रॅप' मध्ये अडकवून दरोडा घालण्यात आला. या प्रकरणात महिलेसह दहा जणांच्या टोळीला अटक करण्यात आली, ज्यावरून ही टोळी किती संघटितपणे काम करते हे स्पष्ट होते.
हनी ट्रॅपचे बळी बहुतेकदा अशा व्यक्ती असतात, ज्यांच्याकडे पैसा आणि सामाजिक प्रतिष्ठा असते. गुन्हेगार टोळ्या पीडितांची कमकुवत बाजू हेरतात आणि त्यांना सहजपणे हाताळता येते का याचा अंदाज घेतात. 'हनी ट्रॅप' ची सुरुवात अत्यंत सोप्या पद्धतीने होते. आकर्षक महिलांचे डीपी वापरून 'फ्रेंड रिक्वेस्ट' पाठवल्या जातात. एकदा रिक्वेस्ट स्वीकारली की, आरोपी प्रेमाचे नाटक करून जवळीक साधतात. काही दिवसांतच हे नातेसंबंध गंभीर वळण घेतात आणि त्याचे प्रतिकूल परिणाम दिसू लागतात. आरोपींकडून प्रेमसंबंधांचे पुरावे तयार केले जातात आणि मग सुरू होतो ब्लॅकमेलचा खेळ. यासाठी गुन्हेगार टोळ्या आधीच महिलांना पीडित व्यक्तीशी अश्लील चाळे करण्यास भाग पाडतात. त्याचे रेकॉर्डिंग करून ते पीडित व्यक्तीच्या सोशल मीडियावरील निकटवर्तीयांना पाठवण्याची धमकी दिली जाते. फेसबुकसारख्या सोशल मीडियावर ती व्यक्ती कुणाकुणाची मित्र आहे हे त्यांनी आधीच हेरलेले असते. पीडित व्यक्तीने केवळ बातचीत केली तरी त्याचे व्हिडिओ बनवून मॉर्फिंगद्वारे त्याची अश्लील दृश्ये तयार केली जातात. समाजात नाचक्की होण्याच्या भीतीने पीडित व्यक्ती आरोपींनी मागितलेली रक्कम देण्यास मजबूर होतात.
'हनी ट्रॅप' या शब्दाचा वापर पहिल्यांदा कादंबरीकार जॉन ली कैरी यांनी १९७४ साली त्यांच्या कादंबरीत केला होता. त्यानंतर गुप्तचर संस्थांनी त्यांच्या सापळ्यांसंदर्भात या शब्दाचा वापर करण्यास सुरुवात केली आणि आता तो शब्द सर्वसामान्य लोकांमध्येही प्रचलित झाला आहे. यातूनच या गुन्हेगारी प्रकाराची व्याप्ती आणि त्याचा वाढता सामाजिक परिणाम स्पष्ट होतो.
या गंभीर धोक्यापासून स्वतःचे संरक्षण करणे अत्यंत महत्त्वाचे आहे. त्यासाठी सोशल मीडिया अकाऊंट सुरक्षित ठेवा, आपले पासवर्ड मजबूत ठेवा. अनोळखी व्यक्तींपासून दूर राहा, सोशल मीडियावरील रिक्वेस्टना काळजीपूर्वक प्रतिसाद द्या. फुटप्रिंट तपासा, डेटिंग अॅपवर ओळख झालेल्या व्यक्तीचे प्रोफाईल तपासून घ्या. निमंत्रण टाळा, ओळख होताच भेटण्याचे निमंत्रण दिल्यास सावध व्हा. व्हिडीओ कॉलवर संभाषण नकोच, समोरील अनोळखी व्यक्तीने व्हिडीओ कॉल केलाच तर तो अजिबात अटेंड करू नका. खंडणी देऊ नका, खंडणीची मागणी झाल्यास त्वरित पोलिसांत तक्रार करा. गोपनीय माहिती देऊ नका, समोरील व्यक्तीला वैयक्तिक अथवा व्यावसायिक माहिती शेअर करू नका.
'हनी ट्रॅप' हा एक गंभीर सामाजिक धोका आहे, ज्यामुळे व्यक्तीच्या जीवनावर आणि प्रतिष्ठेवर नकारात्मक परिणाम होतो. सोशल मीडियाचा वापर करताना सतर्कता बाळगणे, सायबर सुरक्षेचे नियम पाळणे आणि संशयास्पद हालचाली दिसल्यास तातडीने पोलिसांशी संपर्क साधणे हे अत्यंत महत्त्वाचे आहे. बदनामीच्या भीतीने गप्प राहण्याऐवजी, कायद्याची मदत घेणे हाच यातून बाहेर पडण्याचा एकमेव मार्ग आहे. आपल्या जागरूकतेने आणि योग्य माहितीनेच आपण या 'हनी ट्रॅप' च्या जाळ्यात अडकण्यापासून स्वतःचे आणि आपल्या समाजाचे संरक्षण करू शकतो.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा