शुक्रवार, ४ जुलै, २०२५

शिक्षकाच्या क्रूरतेने थांबले जीवन

-उमाजी म. केळुसकर ⬑ दादागिरी ⬉


बुलढाणा जिल्ह्यातील नांदुरा तालुक्यातील वसाडी बुद्रुक गावात घडलेली घटना, ही केवळ एका विद्यार्थ्याच्या आत्महत्येची बातमी नाही, तर ती आपल्या समाजाला आणि शिक्षण व्यवस्थेला आरसा दाखवणारी एक भयावह सत्यकथा आहे. दहावीत शिकणाऱ्या एका कोवळ्या जिवाने, शिक्षकाच्या अमानुष छळामुळे आणि भरवर्गात झालेल्या अपमानामुळे आपलं जीवन संपवलं. ही घटना केवळ त्या कुटुंबावरच नाही, तर संपूर्ण शिक्षण क्षेत्रावर आणि पालकवर्गावर आघात करणारी आहे.
शिक्षण हे विद्यार्थ्यांचं भविष्य घडवण्यासाठी असतं, त्यांना भीती दाखवून किंवा अपमानित करून नाही, याची पुन्हा एकदा वेदनादायक आठवण या घटनेने करून दिली आहे. ही वेळ आहे आत्मपरीक्षण करण्याची, आपल्या शिक्षण पद्धतीत आणि शिक्षकांच्या मानसिकतेत बदल घडवून आणण्याची, जेणेकरून भविष्यात असा कोणताही निष्पाप जीव अमानुष शिक्षेचा बळी ठरू नये. 

        मंगळवार, १ जुलै रोजी घडलेला हा प्रकार म्हणजे माणुसकीला कलंक लावणारा आहे. जय बजरंग विद्यालयातील त्या निरागस विद्यार्थ्याला, केवळ वर्गशिक्षक गोपाल मारोती सूर्यवंशी यांनी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे देता आली नाहीत म्हणून, जी अमानुष शिक्षा मिळाली, ती ऐकून मन सुन्न होतं. उठाबशा काढण्यास नकार दिल्यावर त्याला भरवर्गात कपडे काढायला लावणं, त्याच्या पालकांबाबत अपशब्द वापरणं... हे कृत्य एका शिक्षकाचं असू शकतं का? शिक्षणाच्या नावाखाली चाललेली ही विकृत छळवणूक नाही तर काय आहे? शिक्षकांनी विद्यार्थ्यांच्या चुका सुधारण्याऐवजी, त्यांना प्रोत्साहन देण्याऐवजी, त्यांच्या आत्मसन्मानालाच पायदळी तुडवून त्यांना मृत्यूच्या दारात ढकलण्याचं पाप का करावं?

      या घटनेचं गांभीर्य विद्यार्थ्याच्या खिशात सापडलेल्या सुसाईड नोटमधून समोर येतं. "वर्गशिक्षक गोपाल मारोती सूर्यवंशी यांनी शारीरिक व मानसिक छळ करून अपमानित केल्याने आत्महत्या करत आहे," हे वाक्य केवळ एका विद्यार्थ्याच्या मृत्यूची नोंद नाही, तर आपल्या शिक्षण व्यवस्थेतील सडक्या भागावर केलेला हा थेट हल्ला आहे. एका दहावीच्या विद्यार्थ्याला, ज्याच्या डोळ्यांत भविष्याची अनेक स्वप्नं असतील, त्याला आत्महत्येसारखं टोकाचं पाऊल उचलण्यास प्रवृत्त करणारी परिस्थिती किती भयाण असेल, याचा विचारही अंगावर शहारे आणतो.

      पिंपळगावराजा पोलिसांनी आरोपी शिक्षकाला अटक केली असली तरी, ही केवळ एका गुन्हेगाराला शिक्षा देण्याची बाब नाही. हा आपल्या शिक्षण व्यवस्थेतील व्यवस्थात्मक दोषांचा आरसा आहे. 'छडी लागे छमछम, विद्या येई घमघम' हा काळ आता इतिहासजमा झाला आहे. त्याकाळी काही विद्यार्थी शिक्षकांच्या मारामुळे घडले असतील हे खरे असले तरी, या भीतीपोटी आणि अमानुष मारहाणीमुळे कित्येक विद्यार्थ्यांची शाळा अर्धवट सुटली, त्यांचे शिक्षण थांबले हेही तेवढेच कटू वास्तव आहे. आजच्या युगात, शिक्षण म्हणजे भीती दाखवणे किंवा मारहाण करणे नव्हे. विद्यार्थ्यांच्या चुकांवरून त्यांना शिक्षा करण्याऐवजी, त्यांच्या बुद्धिमत्तेनुसार, त्यांच्या क्षमतांना वाव देणं महत्त्वाचं आहे.

        आजही अनेक शाळांमध्ये, विशेषतः ग्रामीण भागात, शिक्षकांची अमानुष मारहाण आणि मानसिक छळाच्या घटना सर्रास घडतात. 'शिक्षा ही शिक्षणाचा अविभाज्य भाग आहे' या चुकीच्या समजुतीमुळे, अनेक शिक्षक आपल्या मर्यादा ओलांडतात आणि विद्यार्थ्यांना क्रूरतेने वागवतात. या छळाचे परिणाम कोवळ्या मनांवर आयुष्यभर कोरले जातात. काही जण ते सहन करतात, काही घरात बोलून दाखवतात, पण त्या निष्पाप विद्यार्थ्याने जे टोकाचे पाऊल उचलले, त्याचे परिणाम कुटुंबाला आयुष्यभर भोगावे लागतील.

       पालकांच्या मनात आता भीतीचं वातावरण आहे. आपल्या मुलाला शाळेत ज्ञान मिळेल, सुरक्षितता मिळेल, असं वाटणाऱ्या पालकांना आता शिक्षकांच्या क्रूरतेमुळे धडकी भरली आहे. शिक्षण संस्थांनी आणि शासनाने या गंभीर विषयाकडे गांभीर्याने लक्ष द्यायलाच हवं. शिक्षकांना केवळ अभ्यासक्रम शिकवण्यासाठी नेमले जात नाही, तर विद्यार्थ्यांचं सर्वांगीण व्यक्तिमत्त्व घडवण्याची जबाबदारीही त्यांच्यावर असते. त्यामुळे, शिक्षकांच्या निवडीपासून ते त्यांच्या प्रशिक्षणापर्यंत आणि त्यांच्या वर्तनावर लक्ष ठेवण्यासाठी कठोर यंत्रणा असणं हे अत्यंत गरजेचं आहे.

      प्रत्येक विद्यार्थ्याची शिकण्याची क्षमता वेगळी असते. प्रत्येक विद्यार्थ्याला प्रत्येक प्रश्नाचं उत्तर येईलच असे नाही. अशा वेळी, त्यांना समजावून सांगणे, त्यांच्या चुका सुधारण्यास मदत करणे, आणि त्यांना प्रोत्साहन देणे हे शिक्षकाचे कर्तव्य आहे. अपमानास्पद वागणूक किंवा सार्वजनिक शिक्षा देऊन विद्यार्थ्यांच्या आत्मविश्वासाला ठेच पोहोचवणं, हे शिक्षकी पेशाच्या प्रतिष्ठेला काळिमा फासणारं आहे. आता विद्यार्थ्यांच्या बुद्धिमत्तेप्रमाणे, त्यांच्या आकलन क्षमतेनुसार शिक्षण देण्याचा काळ आहे. त्यांना समजून घेऊन, त्यांच्यातील सुप्त गुण ओळखून त्यांना घडवण्याची गरज आहे, दंडुकेशाहीने नव्हे.

या घटनेतून धडा घेऊन, शासनाने आणि शिक्षण विभागाने कठोर पाऊले उचलायलाच हवीत. द्यार्थ्यांच्या मानसिक आरोग्याला प्राधान्य देऊन, त्यांना भयमुक्त वातावरणात शिक्षण घेण्याची संधी उपलब्ध करून देणं ही शिक्षण संस्थांची आणि शासनाची आद्य जबाबदारी आहे.

        वसाडी बुद्रुक येथील या दुर्दैवी घटनेने संपूर्ण समाजाला हादरवून सोडलं आहे. एका निष्पाप जिवाचा बळी घेणाऱ्या या घटनेचे पडसाद दूरवर उमटले पाहिजेत. शिक्षण म्हणजे केवळ पुस्तकी ज्ञान नाही, तर ते विद्यार्थ्यांचं व्यक्तिमत्त्व घडवणारं एक पवित्र माध्यम आहे. या माध्यमाचा गैरवापर करून कोवळ्या जीवांना बळी चढवण्याचा अधिकार कोणालाही नाही. या घटनेतून बोध घेऊन, शिक्षण व्यवस्था अधिक मानवी आणि संवेदनशील बनवण्यासाठी आपण सर्वांनी प्रयत्न केले पाहिजेत. पुन्हा असा बळी जाऊ नये यासाठी, आजच कठोर पाऊले उचलणं आवश्यक आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा