मंगळवार, ६ डिसेंबर, २०१६

शिल्पकार नानासाहेब करमरकर यांच्या पुरस्कार विजेत्या शिल्पाची शंभरी

-उमाजी म. केळुसकर ⬑ खारावारा ⬉


     रायगड जिल्हा म्हटला की छत्रपती शिवाजी महाराज आणि या जिल्ह्यातील सासवणे म्हटले की शिल्पकार विनायक पांडुरंग उर्फ नानासाहेब करमरकर ही नावे समोर येतात. नानासाहेब करमरकर यांचं जीवन छत्रपती शिवाजी महाराजांच्या एका चित्रामुळे बदलले. ते जगप्रसिद्ध शिल्पकार बनू शकले. त्यांच्या पहिल्या रौप्यपदक विजेत्या गोगलगायीवर बसलेल्या नग्न युवतीच्या शिल्पाला या २०१६ च्या डिसेंबर महिन्यात १०० वर्षे पूर्ण होत आहेत. ही रायगडकरांसाठीच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रासाठी, देशासाठी अभिमानाची बाब आहे. नानासाहेबांची सर्व शिल्पे सध्या त्यांच्या अलिबाग जवळील सासवणे गावी करमरकर शिल्पालयात आहेत. त्यांची सून सुनंदा करमकर शिल्पे जतन करण्याचा आटोकाट प्रयत्न करत आहेत. या महान शिल्पकाराला भारत सरकारने पद्मश्री दिला, पण करमरकरांचे कार्य आणि त्यांनी मागे ठेवलेला आपल्या शिल्पांचा वारसा पहाता त्यांना मरणोत्तर भारतरत्न दिले तर तो भारताचाच गौरव ठरेल. 
    भारतातील वास्तववादी शिल्पकारांमधील अग्रगण्य शिल्पकार म्हणून प्रसिद्ध असलेल्या सासवणे येथील विनायक पांडुरंग उर्फ नानासाहेब करमरकरांचे रौप्यपदक विजेेते शतकी शिल्प आजही करमरकर शिल्पालयात विराजमान आहे. या शिल्पाची माहिती देण्यापूर्वी नानासाहेबांचा प्रेरणादायक इतिहास लक्षात घेतला पाहिजे. करमरकरांचा जन्म २ ऑक्टोबर १८९१ साली महाराष्ट्रातील रायगड जिल्ह्यातील (तत्कालिन कुलाबा जिल्हा) सासवणे इथे झाला. समुद्रकिनारी वसलेल्या या गावातच त्यांच्या वडिलांचा गणपतीच्या मूर्ती बनवण्याचा उद्योग होता. त्यामुळे चित्र काढण्याचा नाद असलेल्या करमरकरांना मूर्ती घडवण्याचेही शिक्षण घरीच मिळाले. गावातील देवळाच्या भिंतीवर त्यांनी १९०८ साली काढलेले अश्‍वारुढ शिवाजी महाराजांचे चित्र तत्कालिन कुलाबा जिल्ह्याचे कलारसिक उपजिल्हाधिकारी ऑटो रॉथफील्ड यांनी १९०९ साली सासवणे येथे आले असताना पाहिले. ते त्यांना इतके आवडले की त्यांनी कुमारवयीन नानासाहेबांची कलेचे खोली चाचपण्यासाठी त्यांच्याकडून आपल्याकडील छायाचित्रानुसार एक ग्रीक अर्धशिल्प बनवून घेतले. ते इतके हुबेहुब होते की या मुलाला जर शिल्पकलेलेचे शास्त्रोप्त शिक्षण मिळाले तर तो आंतरराष्ट्रीय दर्जाचा शिल्पकार बनेल असा विश्‍वास रॉथफील्ड यांना वाटला आणि नानासाहेबांनी तो खराही ठरविला. नानासाहेबांचे शालेय शिक्षण संपल्यानतर १९१० साली रॉथफील्ड यांनी नानासाहेबांना मुंबईच्या जे.जे. स्कूल ऑफ आर्टमध्ये शिष्यवृत्ती देऊन दाखल केले. १९१० ते १९१३ पर्यंत जे.जे. स्कूल ऑफ आर्टचा अभ्यास करुन ते परीक्षेत पहिले आले व त्याबद्दल स्कूलतर्फे त्यांना २०१४ साली लॉर्ड मेयो पदकाने सन्मानीत करण्यात आले. 

श्रीमती सुनंदाताई करमरकर

     नानासाहेब करमरकरांनी खर्‍या अर्थाने गणेशमूर्तींनी आपल्या कलाजीवनास सुरुवात केली. रॉथफिल्ड यांच्या सांगण्यानुसार पहिला अर्धपुतळा बनवला. त्यानंतर जे.जे. स्कूल ऑफ आर्टमध्ये तीन वर्षांच्या प्रशिक्षण काळात अनेक शिल्परचना केल्या, त्यातील ‘माकड आणि त्याने जवळ घेतलेले पिल्लू’ या शिल्परचनेस प्रतिष्ठेचे ‘लॉर्ड मेयो पदक’ही भेटले. प्रशिक्षण घेऊन आल्यावर सासवणे येथे १९१३ साली त्यांनी चक्क आपल्या वडिलांचे शिल्प बनवले आणि सर्वांना थक्क केले. त्यानंतर त्यांनी आपल्या कुटुंबियांची, मित्रपरिवाराची अनेक नमुना शिल्पे बनवली. रॉथफिल्ड यांचंही त्यांनी शिल्प बनविलं. १९१५ साली रॉथफिल्ड यांचे स्नेही कर्नल डॉ. व्ही.एन. भाजेकर यांचे यांचे त्यांनी शिल्प घडविलं.  त्यानंतर कर्नल डॉ. व्ही.एन. भाजेकर यांनी जगप्रसिद्ध कवी आणि साहित्यिक रवींद्रनाथ टागोर यांचे पुतणे सुरेंद्रनाथ टागोर हे मुंबईस आले असताना त्यांनी त्यांची भेट घडवली. नानासाहेबांच्या शिल्पकृतींनी प्रभावीत होऊन सुरेंद्रनाथ टागोर यांनी आपल्या मुलीचं आणि रवींद्रनाथ टागोर यांचे वडील देवेंद्रनाथ टागोर यांचं शिल्प घडवण्याचं काम दिलं. अल्पावधीत त्यांनी ती शिल्प तयार केली. यानंतर त्यांच्या जीवनला एक वेगळी दिशा मिळाली. सुरेंद्रनाथ टागोर यांच्या आग्रहावरुन १९१७ साली त्यांनी कलकत्ता येथे स्टुडिओ थाटला. १९१६ च्या डिसेंबरच्या सुरुवातीस कलकत्त्यात त्यांनी आज सासवणे येथे करमरकर शिल्पालयात असलेल्या गोगलगायीवर बसलेल्या नग्न अंध युवतीचे शिल्प तयार केले. त्या शिल्पाला १९१६ च्या डिसेंबरमध्ये बॉम्बे आर्ट सोसायटीच्या प्रदर्शनात रौप्यपदकाचा बहुमान प्राप्त झाला होता. या महिन्यात या घटनेस शंभर वर्षे झाली आहेत.

हेच ते पुरस्कार विजेते शिल्प

















    बॉम्बे आर्ट सोसायटीच्या प्रदर्शनात रौप्यपदक  मिळवणार्‍या या शिल्पात एक नग्न अंध युवती दोन गुडघ्यांवर गोगलगायीवर बसली असून तिच्या आजूबाजूला असणारं जग चाचपडताना दाखवलं आहे. ते शिल्प अनावृत्त असले तरी त्यातून कोणतीही अश्‍लीलता दृग्गोचर होत नाही, उलट तिच्या अंधत्वाची जाणीव होताच मन करुणेने भरुन येते. नानासाहेब शिल्पकार म्हणून का महान आहेत, हे या शिल्पातून सहज लक्षात येते. तरीही या शंभरीच्या शिल्पामागची नानासाहेबांची काय कल्पना असावी असा प्रश्‍न उपस्थित होतोच. या प्रश्‍नाचे उत्तर देताना नानासाहेबांच्या स्नुषा सुनंदा करमरकर सांगतात, ‘निमकर या हिंदुस्थानी व्यक्तीशी विवाह केलेल्या कमळाबाई निमकर या अमेरिकन बाईने अंध आणि पोलिओ रुग्णांना मदत करायची ठरवले. त्यांनी नानासाहेबांना आपण अंधांसाठी काम करत असल्याचे सांगून त्यांनाही अंधांबाबत समाजात जागृती वाढली पाहिजे, समाजात त्यांच्याबाबत कलात्मकरित्या संदेश पोहचला पाहिजे यासाठी काहीतरी करायला सांगितले. आंधळ्यांचं आयुष्य पुढे सरकत नाही ही वस्तुस्थिती नजरेसमोर ठेवून नानासाहेबांनी गोगलगायीवर बसलेल्या नग्न अंध युवतीचे शिल्प तयार केले. त्यातून त्यांनी संपूर्ण समाजाला असा संदेश दिला की, गोगलगाय हे काळाचे प्रतिक असून अंधांच्या दृष्टीने काळाची गती मंद असते, म्हणूनच गोगलगायीवर बसलेली अंध युवती दोन्ही हात पसरवून आपला भविष्यकाळ चाचपडते आहे. अशा अंधांचा वर्तमान आणि भविष्यकाळ सुसह्य करणे समाजाची जबाबदारी ही  भूमिका त्यांनी सदर शिल्पाद्वारे मांडली आणि ती भूमिका व शिल्परचना बॉम्बे आर्ट सोसायटीला आपल्या प्रदर्शनात भावली व त्याबद्दल नानासाहेबांचा रौप्यपदकाने गौरव केला.’
   खरेतर देशात त्याकाळी नग्न शिल्प केली जात नव्हती, परंतु नानासाहेबांनी धाडसाने ते गोगलगायीवर बसलेल्या नग्न अंध युवतीचे शिल्प तयार केले होते. त्याबद्दल कोणीही हरकत घेतली नाही. उलट त्याचे कौतुकच झाले. वास्तविक २ मार्च १८५७ या दिवशी स्थापन झालेल्या सर जे.जे. स्कूल ऑङ्ग आर्टमध्ये १९१९ पर्यंत अभ्यासासाठी वस्त्रांकित मॉडेलचा वापर व्हायचा आणि त्या मॉडेलही दुर्मिळ असत. पूर्ण नग्न मॉडेलवरुन शिल्परचनेचा अभ्यास करणे ही दूरची बाब होती. ही संधी त्यांना ‘रॉयल ऍकॅडमी स्कूल ऑफ लंडन’ या कलाशिक्षण संस्थेत मिळाली. तेथे त्यांना १९२० ते १९२२ अशी दोन वर्षे प्रत्यक्ष नग्न मानवाकृतीवरुन अभ्यास करता आला. मानवाकृती अभ्यासासाठी तेथे विविध वयाची कपडे घातलेली मॉडेल्स व नग्न स्त्री-पुरुष मॉडेल्सही उपलब्ध असत. तसेच ब्रॉंझ कटिंग, ’स्टोन क्रशिंग’ ही तंत्रेही आत्मसात करून १९२३ साली ते कलकत्यास परतले. पुढे १९२५ साली ते मुंबईत आले. त्यांनी देवनारला स्टुडिओ उभारला. त्यानंतर मुंबईतच त्यांचे वास्तव्य कायम राहिले.  नानासाहेबांनी व्यवसायात स्थिरावल्यानंतरही स्वान्त:सुखाय व अभ्यासासाठी प्रत्यक्ष अर्धनग्न व नग्न मॉडेल्सवरुन अनेक शिल्प घडवली. त्या काळात भारतीय समाजरचनेत प्रत्यक्ष अशा कामांसाठी मॉडेल मिळवणे ही अत्यंत कठीण होते. त्यातूनही त्यांनी मार्ग काढला आणि त्यांनी मॉडेल्स मिळवून अनेकानेक उत्तम नग्न शिल्पे घडवली. 
    नानासाहेब करमरकर यांनी १९१७ ते १९६७ या कालखंडात देशातच नव्हे, तर सार्‍या जगात आपल्या वास्तवदर्शी शिल्पकलेने आपल्या नावाचा डंका घुमवला होता. अर्थात हे काही सहज घडले नाही, त्यासाठी त्यांना चिकाटी, संघर्ष आणि कष्ट या त्यांच्या त्रिगुणांचा फायदा झाला. आपल्या आयुष्यात त्यांनी रवींद्रनाथ टागोर, चित्तरंजनदास, महात्मा गांधी, पी.सी. रे प्रभृतींची समोर बसवून व्यक्तिशिल्पे घडवली. पुण्यातील ‘श्री शिवाजी प्रिपरेटरी मिलिटरी स्कूल’च्या आवारातील शिवाजी महाराजांचा पुतळा, बीड, नांदेड, इचलकरंजी येथील अश्वारूढ शिवाजी महाराज, सांगलीजवळ चितळे उद्योगसमूहाकडे असलेले म्हशीचे शिल्प, मुंबईतील गिरगाव चौपाटीवरील विठ्ठलभाई पटेलांचा पुतळा, उच्च न्यायालयाच्या आवारातील सर जस्टीस दिनशा मुल्ला यांचा पुतळा, प्रभादेवी येथील रवींद्र नाट्यगृहातील रवींद्रनाथांचा पुतळा, ऑपेरा हाऊस भागातल्या वरेरकरांच्या घरातील मामा वरेरकर यांचे शिल्प, त्याचबरोबर सयाजीराव गायकवाड, क्लिङ्गटन विल्यम, संत ज्ञानेश्वर, महर्षी धोंडो केशव कर्वे, श्री रामकृष्ण परमहंस, जमशेदजी टाटा, ग्वाल्हेरचे महाराज,  कोळीण, गुराखी अशी अनेक शिल्पे महाराष्ट्रभर प्रसिद्ध आहेत. भारताबाहेरही अनेक ठिकाणी नानासाहेबांची शिल्पे आहेत. सध्या सासवणे येथे असलेली दोनशे शिल्पे ही नानासाहेबांच्या आवडीची निवडक शिल्पे आहेत.
     नानासाहेब करमरकर यांच्या शिल्पांना पुढे अनेकानेक पारितोषिके भेटली. १९२४ साली त्यांच्या शंखध्वनी या नग्न युवती शिल्पास द सोसायटी ऑफ फाईन आर्ट, कलकत्ता या संस्थेचं रौप्यपदक व २०० रुपयांचं पारितोषिक मिळालं, तर येथील हिरा शिवराम कोळी या १३ वर्षांच्या छोट्या टोपलीत मासे घेऊन उभ्या असलेल्या मुलीच्या (मत्स्यकन्या) शिल्पास १९३० साली बॉम्बे आर्ट सोसायटीचं सुवर्णपदक मिळालं. १९६३ साली बॉम्बे आर्ट सोसायटीतर्फे त्यांना पहिलाच आर्टिस्ट ऑफ द इअर हा बहुमान प्रदान करण्यात आला. १९६४ ललित कला अकादमीची त्यांना फोलोशिप मिळाली. त्याच वर्षी त्यांना  भारत सरकारतर्फे पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. त्यांनी अमेरिका, इटली, फ्रान्स, स्वीत्झर्लंड अशा देशांचे अभ्यासदौरे केले. विशेष म्हणजे १९४९ साली अमेरिका दौर्‍यात मिल्टन कॉलेजचे डीन जे.एन. डलांड यांना समोर बसवून त्यांचा अर्धपुतळा तयार केला व तो कॉलेजला भेट दिला.
   योगायोग म्हणजे प्रथम भिंतीवर काढलेल्या अश्‍वारुढ शिवाजी महाराजांच्या चित्रामुळे त्यांच्या कलाजीवनाला चालना मिळाली. नंतर १९२८ मध्ये केलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्‍वारुढ पुतळ्यामुळे त्यांची कीर्ती वाढली आणि त्यांच्या अंतकाळीही ते इचलकरंजीसाठी अश्‍वारुढ छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बनवीत होते. या थोर शिल्पकाराचे १३ जून १९६७ साली वयाच्या ७५ व्या वर्षी निधन झाले. त्यांनी १९३४ साली वडिलोपार्जित घराच्या जागी एक मजली बंगला व स्टुडिओ बांधला होता, त्यात त्यांनी देवनार स्टुडिओतील काही लहान व मध्यम आकाराची शिल्पे हलविली होती. नानासाहेबांच्या मृत्यूनंतर करमरकर कुटुंबियांनी देवनारचा स्टुडिओ विकून तेथील २०० पेक्षा अधिक शिल्प सासवण्यास हलविली आणि नानासाहेब यांच्या पत्नी सगुणाबाई पुत्र विश्‍वास करमरकर यांच्यासोबत कलकत्त्यास राहण्यास गेल्या. त्यानंतर सासवण्यातील वास्तू व त्यातील शिल्प पुढील २० वर्षे नोकरांच्या ताब्यात होती. कोणी बंगल्याची चावी मागितल्यास ती मिळे व बंगला उघडून ती शिल्पे पाहता येत असत. नानासाहेबांचे पुत्र विश्‍वास करमरकर भारत सरकारच्या सरंक्षण खात्यात कानपूर, मद्रास, कलकत्ता अशा विविध ठिकाणी उच्चपदी कार्यरत होते. १९८६ साली ते ऍडिशनल डायरेक्टर जनरल, ऑर्डनन्स बोर्ड या पदावरुन निवृत्त झाले. निवृत्तीनंतर त्यांनी व त्यांच्या पत्नी सुनंदा करमरकर यांनी वडिलांची शिल्पे सांभाळण्याचं ठरवलं आणि त्याच वर्षी नानासाहेबांच्या जन्मदिवशी, २ ऑक्टोबरला सासवण्याच्या घरात करमरकर शिल्पालयाची स्थापना केली. दुर्दैवाने ३० जून १९९० ला विश्‍वास करमरकरांचं ह्दयविकाराच्या झटक्याने अचानक निधन झाले. हा सुनंदा करमरकर यांना मोठा धक्का होता. अमेरिकेत स्थायिक असलेला त्यांचे पुत्र विक्रम विश्‍वास करमरकर यांनी आपल्या आईला अमेरिकेत आपल्याकडे येण्याचा आग्रह केला पण शिल्पालयाच्या देखभालीसाठी त्यांनी त्या आग्रहास नकार दिला. आज त्या गोष्टीला ३० वर्षे झाली आहेत. सुनंदा करमरकर आपल्या सासर्‍यांनी दिलेला कलेचा ठेवा प्राणपणाने जपत आहेत. त्यांना २०१३ साली रायगड जिल्हा परिषदेने रायगड भूषण हा पुरस्कारही दिला आहे. सुनंदा करमरकर या आज ८३ वर्षांच्या असल्या तरी तरुणींना लाजवेल असा त्यांचा उत्साह आहे. त्यांनी आपण थकलो आहे, हे सांगायचा अवकाश शिल्पकार नानासाहेब करमरकर यांचा, आपल्या आजोबांचा वारसा सांभाळण्यासाठी विक्रम करमरकर भारतात, सासवणे येथे येणार आहेत कारण त्यांनी आपल्या आईला शब्द दिला आहे की, ‘तू मला बोलवताच मी अमेरिका सोडून हे शिल्पालय सांभाळण्यास मी येईन.’ नानासाहेबांची प्रत्येक पिढी त्यांच्या कलाकृतींवर प्रेम करते आहे आणि ही प्रत्येक पिढी करमरकर शिल्पालय सांभाळण्यास येणार आहे, मग ती जगाच्या पाठीवर कुठेही असो. रायगड जिल्ह्यातील अलिबाग तालुक्यात हे शिल्पालय आहे. हे करमरकर शिल्पालय या जिल्ह्याचेच नव्हे तर संपूर्ण देशाचे कलातीर्थ आहे. या कलातीर्थातील अंध युवतीच्या शिल्पाला शंभर वर्षे झाली आहेत. त्यानिमित्त जर भारत सरकारने या जगप्रसिद्ध शिल्पकाराला वंदन म्हणून भारतरत्न पुरस्कारने मरणोत्तर सन्मानित केले तर तो भारतीय शिल्पकलेचाच नाही, तर संपूर्ण जगात देशाचा गौरव ठरेल.



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा