मंगळवार, १३ डिसेंबर, २०१६

मुंबई ते सिंधुदुर्ग प्रवासी बोटीचा भोंगा पुन्हा वाजणार!

-उमाजी म. केळुसकर ⬑ खारावारा ⬉


       सागरी महामार्गाचे नाही पण प्रवासी सागरी वाहतुकीचे कोकणवासियांचे स्वप्न लवकरच पूर्ण होणार आहे. सध्या गेटवे ते मांडवा आणि मांडवा ते गेटवे, गेटवे ते एलिफंटा आणि एलिफंटा ते गेटवे,  तसेच भाऊचा धक्का ते रेवस आणि रेवस ते भाऊचा धक्का, मुंबई ते मोरा (उरण) आणि मोरा (उरण) ते मुंबई अशीच प्रवासी जलवाहतूक (फेरी बोट) मुंबईतून रायगड जिल्ह्यात प्रवेश करण्यासाठी होते, पण पुढे रत्नागिरी, सिंधुदुर्गपर्यंत ती प्रवासी जलवाहतूक होत नसल्याने मुंबई-गोवा महामार्गावर आणि कोकण रेल्वेवर अवलंबून रहावे लागत होते आणि तोही मार्ग मृत्यूचा सापळा बनला आहे. त्यामुळे या महामार्गापेक्षाही सुरक्षित अशी मुंबई ते सिंधुदुर्ग प्रवासी जलवाहतूक येत्या तीन महिन्यात, २०१७ च्या मार्चपासून सुरु होणार आहे, ही संपूर्ण कोकणासाठी खूशखबर आहे.
     कोकणाच्या निसर्गाचा बाज काही निराळाच. तिथलं प्रसन्न करणारं वातावरण, हिरवळ हवीहवीशी वाटते. मात्र, होळी, उन्हाळ्याची सुट्टी, गणेशोत्सवात कोकणात जाणं कठीण होत असतं. या काळात ट्रेनचं बुकिंग न मिळणं, खाजगी बसेसची मुजोरी अशा समस्या येत जातात. अशा परिस्थितीत जलवाहतुकीचा चांगला पर्याय चाकरमान्यांना, सर्वसामान्यांना मिळणे गरजेचे होते. त्यामुळे वाहतुकीच्या दृष्टीने चांगला असणारा हा जलवाहतुकीचा पर्याय लवकरात लवकर खुला व्हावा, अशी मागणी दीर्घकाळ केली जात होती. ही मागणी आता प्रत्यक्षात येणार आहे. येत्या २०१७ च्या मार्चपासून मुंबईतील भाऊचा धक्का येथून दिघी, दाभोळ, जयगड, हर्णे, श्रीवर्धन, रत्नागिरी, जैतापूर, विजयदुर्ग, मालवण, वेगुर्ला या ठिकाणांदरम्यान प्रवासी जलवाहतूक करण्यात येणार आहे. महाराष्ट्र मेरीटाइम बोर्डाने हे काम मे. सुवर्णदुर्ग शिपिंग ऍण्ड मरिन सर्व्हिसेस या जलवाहतूक सेवा पुरवणार्‍या कंपनीला दिले आहे. येत्या तीन महिन्यात ही प्रवासी जलवाहतूक सेवा उशिरा का होईना, पण सुरु होत आहे, याचा कोकणवासियांना आगळा आनंद आहे.
     रस्ता वाहतुकीसाठी एसटीचा जन्म झाला नव्हता, त्या काळी अर्ध्याअधिक मुंबईकरांचे मूळ कोकणात होते. त्या काळी वाहतुकीचे पर्याय नसल्यामुळे कोकणातून मुंबईकडे प्रवास जलमार्गानेच व्हायचा. रात्रभर प्रवास करून आलेली बोट समुद्रात लांब कोठे तरी नांगर टाकायची. मग मोठ्या हिंदकळणार्‍या होड्यांमधून प्रवासी खच्चून भरून, चिखलाने भरलेल्या मुंबईच्या पूर्व किनार्‍यावर पाऊल ठेवायचे. गोदीत कंत्राटदारी करणारे उरणचे भाऊ अजिंक्य हे दृश्य पाहून रोज हळहळत असत. ब्रिटिश सरकार हे हाल निवारण्यासाठी काही करणार नाही, हे लक्षात आल्यानंतर भाऊंनी धक्का स्वत:च उभारण्याचे ठरवले आणि अल्पावधीतच १८६२ साली कोकणी माणसांच्या हक्काचा ‘भाऊचा धक्का’ तयार झाला. त्यानंतर धरमतर (१८६८), रेवस (१८६९) येथे आणि कोकणात धक्के बांधण्यात येऊन प्रवासी जलवाहतुकीचे सुवर्णयुग सुरु झाले. 
     १८४५ च्या सुमारास ब्रिटिशांनी प्रवासी जलवाहतुकीसाठी बॉम्बे स्टीम नेव्हिगेशन कंपनीची स्थापना केली होतीच. त्यानंतर ‘शेटवाला कंपनी‘ (माझी आगबोट कंपनी), ‘दी रत्नागर स्टिम नेव्हिगेशन कंपनी‘ या कंपन्यांच्या प्रवासी जलवाहतूक सेवांनीही कोकणवासियांची मने जिंकली.  त्या वेळी प्रवाशांची क्षमता अडीशे ते तीनशेच्या आसपास होती आणि तिकीट अडीच, तीन, चार रुपये असायचं. पुढे बोट उद्योगाला मोठ्या प्रमाणात चालना मिळाली आणि त्यानुसार तिकीट दरही वाढले. साधारण या बोटींवर तीन डेक असायचे. सकाळी साडेसहा वाजता रेवस-धरमतरकडे जाणारी छोटी बोट सुटली की, आठ वाजता दाभोळ बंदरापर्यंतची मोठी बोट सुटत असे. लागोपाठ रत्नागिरी, विजयदुर्ग, गोवा या लाइनीवरील अगडबंब बोट सुटत असे. या बोटी निघून गेल्या तरी आदल्या दिवशी कोकण-गोव्याकडे गेलेल्या बोटी परतण्याची वेळ झाल्यामुळे दुपारपर्यंत भाऊच्या धक्क्याला उसंत नसे. त्यावेळी प्रवासी बोटींवर काहीही नियंत्रण नसल्यामुळे अतिवादळी किंवा अतिपावसाळी हवामानाचे काही दिवस वगळता सर्रास बारमाही वाहतूक चाले.
      ११ नोव्हेंबर १९२७ ला जयंती व तुकाराम या प्रवासी बोटी एकाच ठिकाणी बुडाल्या. नंतर दोन दशकांनी १७ जुलै १९४७ रोजी देशाचे स्वातंत्र्य महिनाभरावर आले असताना रामदास बोट बुडाली ते प्रकरण चांगलंच गाजलं. या जयंती, तुकाराम, रामदास या तीन बोटी समुद्रात बुडून २० वर्षांत एक हजार कोकणवासी मरण पावले. पण यात बळी पडलेल्या कोकणवासीयांचे ते बलिदान वाया गेले नाही. कोकण बोट प्रवासात पुष्कळ सुधारणा झाल्या. पावसाळ्याच्या वादळी हवेत चार महिने बोटी कायद्याने बंद झाल्या. बिनतारी यंत्र, रेडिओ आदी संदेशवहनाची अद्ययावत साधने बोटींवर बसवली गेली. बोटींचा प्रवास पुष्कळ सुरक्षित झाला व त्यानंतर एकही मोठा अपघात झाला नाही. 
     पुढे बॉम्बे स्टीम कॉपोर्रेशनने रत्नागिरी, चंदावती, इरावती अशा नवीन बोटी ताफ्यात सामील केल्या. ग्राहकांना खुश करण्यासाठी मोङ्गत जेवणाची व्यवस्था त्या वेळी सर्वप्रथम सुरू करण्यात आली. त्याच वर्षी मार्चमध्ये चंदावती बोट मालवणच्या बंदरात रुतून बसली ती कायमचीच. पुढे ही कंपनी तोटा सहन न झाल्याने १९६४ मध्ये बंद पडली. १२५ वर्षांच्या बॉम्बे स्टीम कॉपोर्रेशनचा अशाप्रकारे अध्याय संपला. तेव्हा कोकणवासीयांची मोठी पंचाईत झाल्याचे पाहून तत्कालीन मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांनी गोव्यातील उद्योजक विश्वासराव चौगुले यांच्या स्टीमशिपमार्ङ्गतच्या चौगुले बोटसेवा पुन्हा सुरू केली. चौगुले स्टीमशिपने रोहिणी, सरीता, कोकणसेवक बोटी सुरू केल्या. मात्र, या बोटींचं आथिर्क गणित जमेना. त्यातच १९७१ मध्ये कंपनीची ’रोहिणी’ ही बोट मालवण बंदरात बुडाली आणि कंपनीचे कंबरडेच मोडले. अखेर खाजगी उद्योजक पुढे येत नसल्याने या सेवेचेच राष्ट्रीयीकरण झाले आणि १९७३ मध्ये मोगल लाइन्सने (भारत सरकारचा अंगीकृत व्यवसाय) कोकणसेवक व कोकणशक्ती (कोकणशक्ती मूळची सरिता बोट) या दोन बोटींची सेवा सुरू केली. या कंपनीला कोकण प्रवासी वाहतुकीमुळे जो तोटा सहन करावा लागत होता, त्या तोट्यापैकी २० टक्के रक्कम मोगल लाइन्स कंपनीने सोसावी व उरलेल्या तोट्यापैकी २५ टक्के भारत सरकार, ४० टक्के महाराष्ट्र शासन व ३५ टक्के गोवा शासनाने प्रतिपूर्ती करावयाची ठरले होते व ही व्यवस्था मे १९८८ पर्यंत होती. दरम्यान वाटेवरील बंदरांची संख्या केवळ दोनवर आली. त्यातच राजीव गांधी पंतप्रधान असताना श्रीलंकेला जाणार्‍या भारतीय शांतिसैनिकांची वाहतूक करण्यासाठी भारत सरकारकडून मोगल लाइन्सकडून कोकणसेवक बोट काढून घेण्यात आली. (दुसर्‍या महायुद्धाच्या वेळीही त्या वेळच्या सरकारने युद्धासाठी व किनार्‍याच्या रक्षणासाठी बॉम्बे स्टीम नेव्हिगेशन कंपनी, शेटवाला कंपनी (माझी आगबोट कंपनी), दी रत्नागर स्टिम नेव्हिगेशन कंपनी या तिन्ही कंपन्यांच्या बोटी काढून घेतल्या होत्या.) म्हणूनच २९ जानेवारी १९८८ रोजी मुंबईहून पणजीला गेलेली ’कोकणसेवक’ परत आलीच नाही. त्यानंतर उरली केवळ कोकणशक्ती. पण तिची शक्तीही क्षीण होत गेली आणि १ मे १९८८ ला तिने शेवटचा श्वास घेतला. मुंबई-गोवा दरम्यानची प्रवासी बोट सेवा कायमची बंद पडली. 
    आता पुन्हा दोन तपानंतर येत्या नवीन वर्षात मार्चमध्ये कोकणवासीयांसाठी महत्त्वाची असणारी मुंबई ते सिंधुदुर्ग प्रवासी बोटसेवा सुरु झाल्यावर पर्यटनाच्या दृष्टीने तिचा खूपच फायदा होणार आहे. कोकणातील बहुतांशी पर्यटन केंद्रे किनारपट्टीवर असल्याने पर्यटन विकासाला गती मिळून मोठ्या प्रमाणावर पर्यटक कोकणात उतरतील. नितांत सुंदर समुद्र किनार्‍यांचे जगभरच्या पर्यटकांच्यादृष्टीने मार्केटींग करता येईल. आंबा उत्पादन व मच्छिमारी व्यवसायाला अधिक गती मिळेल. अशाप्रकारे या प्रवासी जलवाहतूक सेवेने कोकण विकासाची चक्रे गतीमान होणार आहेत. तसेच मुंबई-गोवा महामार्गावर पडणारा वाहतुकीचा ताणही प्रवासी जलवाहतुकीने कमी होणार आहे आणि त्याबरोबरच या महामार्गाचे चौपदरीकरण लवकर करुन कोकणचा महामार्गप्रवास सुसह्य आणि सुरक्षित करण्याचे आव्हानही सरकारसमोर आहे. कोकण रेल्वेचे दुपदरीकरणही लवकर झाले पाहिजे, तसेच कोकणातील सागरी महामार्गाचाही एकदा निकाल लावून टाकला पाहिजे. कारण महाराष्ट्र सोडला तर पश्चिम किनारपट्टीवरील सर्व राज्यांतील सागरी महामार्ग तयार आहेत. तथापि, सागरी महामार्ग नाही, पण सागरी प्रवास आता टप्प्यात आला ही घटनाच ऐतिहासिक ठरणार आहे, यात वाद नाही.  


 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा