सोमवार, २६ डिसेंबर, २०१६

शिवस्मारक आणि पद्मदुर्गचा खराखुरा जागर

-उमाजी म. केळुसकर ⬑ खारावारा ⬉


     मुरूड शहराच्या समोरील समुद्रात कासा खडकावरचा शिवकालीन पद्मदूर्गावर कोकण कडा मित्र मंडळाने सुरू केलेला जागर कार्यक्रम २४ व २५ डिसेंबर उत्साहात संपन्न झाला आणि तिकडे मुंबईत २४ तारखेलाच अरबी समुद्रातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या स्मारकाच्या भूमीपूजन व जलपूजनाचा कार्यक्रम भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पार पडला. पद्मदुर्गचा जागर सामान्य शिवप्रेमींनी घडविला, तर अरबी समुद्रातील शिवस्मारकाचं स्वप्न केंद्र आणि राज्य सरकार साकारत आहे. शिवरायांनी बांधलेल्या पद्मदुर्गचा जागर रायगड जिल्ह्यात विनावाद  गेली आठ वर्षे सुरु आहे, सरकार उभारत असलेल्या स्मारकाचा वाद स्मारक उभारेपर्यंत सुरुच असणार आहे. त्यामुळे सामान्य शिवभक्तांनी सुरु ठेवलेल्या पद्मदुर्गच्या जागराबद्दल कौतुकच केले पाहिजे.
    महाराष्ट्र अंजन-कांचन करवंदीचा, दगडांचा, गडकिल्ल्यांचा प्रदेश आहे. गड-किल्ले ही महाराष्ट्राची खरी ओळख आणि संपत्ती आहे. मराठी माणसाचे राज्य छत्रपती शिवाजी महाराजांनी साडेतीनशे वर्षांपूर्वी येथे घडवले. आज या महाराष्ट्रात मराठी माणसांचे भविष्य भलतीच माणसे घडवित आहेत. त्याला घडवणं म्हणतात की बिघडवणं म्हणतात, हे ठरविण्याची वेळ कधीच निघून गेली. ज्यांनी आपल्या आरमारी सामर्थ्यांने दर्यावर्दी इंग्रजांना धडकी भरवली त्या शिवरायांचे स्मारक देशाचे सागरी प्रवेशद्वार जेथे आहे त्या मुंबईच्या अरबी समुद्रात उभारले जाणे योग्यच आहे, पण त्या मुंबईतील मराठी माणूस तेथून दूर फेकला गेला आहे आणि तेथे इतर भाषिकांची भेळ झाली आहे ही देखील वस्तुस्थिती आहे. असा मराठी माणूस घडत असेल तर येथील गडकिल्ल्यांची काय जडणघडण असेल यांचा अंदाज यायला हरकत नाही. अशी अवस्था देशाच्या स्वातंत्र्यानंतर, महाराष्ट्र राज्याच्या स्थापनेनंतर कोणा एका राजवटींनी केली नाही, तर या पापात सर्व सहभागी आहेत. 
     महाराष्ट्र हे देशातील सगळ्यात जास्त गड-किल्ले असणारे राज्य आहे. पाणदुर्ग, डोंगरी गढ्या आणि डोंगरी किल्ले मिळून महाराष्ट्रात राज्यात सुमारे ३१७ किल्ले आहेत, या किल्ल्यांपैकी ४७ किल्ले राष्ट्रीय संरक्षित असून ते केंद्र शासनाच्या पुरातत्त्व विभागाच्या अखत्यारित आहेत. तसेच ४९ किल्ले राज्यसंरक्षित असून ते महाराष्ट्र शासनाच्या पुरातत्त्व व वस्तुसंग्रहालय संचालनालयाच्या अखत्यारित आहेत. पण सगळ्यांचीच दूरवस्था झाली आहे. बहुतांशी किल्ल्यांची तटबंदी, बुरुज पडले आहेत, तर काही ठिकाणी पूर्ण जमीनदोस्त झाले आहेत. भुयारी गुप्त मार्ग बुजले आहेत. टेहळणी बुरुज पडक्या स्थितीत तर वाडे, सैनिकांची घरे, धान्य कोठारे यांचे चौथरेच उरले आहेत. तोफाही चोरीस गेल्या आहेत. रायगडावरील मेघडंबरीतील शिवरायांच्या हातातील तलवारीचे काय झाले ते सर्वांनाच माहीत आहेत काही वर्षांपूर्वी पाचाड येथील जिजाऊसाहेबांच्या समाधीस्थळावरील त्यांच्या पुतळ्याचीही चोरी झाली होती. ही अवस्था आपल्या गडकिल्ल्यांची आहे. अर्थात या दूरवस्थेचे खापर कोणा एका सरकारवर फोडता येणार नाही. असे असले तरी आम्हीच शिवप्रेमाचा वसा घेतला आहे आहे, अशाप्रकारे सर्व सरकारे वागत आली आहेत, याला आता राज्यातील, केंद्रातील विद्यमान भाजप प्रणित सरकारचा अपवाद नाही. म्हणूनच शिवस्मारक आमच्यामुळे होत आहे, अशा गमजा मारताना या दूरवस्था झालेल्या गडकिल्ल्यांचे जतन-संवर्धन का होत नाही याबाबत काही बोलत नाही. उलट दूरवस्था झालेल्या याच गडकिल्ल्यांची माती विविध नद्यांचे जल शिवस्मारकासाठी भाजप कार्यकर्त्यांनी, नेत्यांनी वाजत गाजत नेले. ‘शिव’नाम इतके पवित्र आहे की त्याला या उपचारांची गरज नव्हती. खरेतर सर्वसामान्य, कष्टकरी, शेतकरी, सैनिक, विविध क्षेत्रातील मंडळीकडून ही माती आणि जल स्मारकासाठी नेले गेले असते आणि त्यामागे या स्मारकाप्रमाणे राज्यातील या गडकिल्ल्यांचे वैभव अबाधित राखा, अशी भावना व्यक्त केली गेली असती तर त्याला अर्थ असता. पण तसे केले गेले नाही. तसेही सत्तेत असताना राष्ट्रवादी कॉंग्रेस-कॉंग्रेसने सर्व परवानग्या मिळवल्या (बर्‍याच परवानग्या त्यांनी मिळवल्या) असत्या आणि तेव्हा शिवस्मारक मार्गी लागले असते, तरी चित्र वेगळे असते असे नाही. पण शिवस्मारकारकाचा कार्यक्रम सरकारी असूनही तो पक्षाचा असल्यासारखा भाजप नेत्या-कार्यकर्त्यांनी अतिरेक केला. कर्तव्य नावाची काही चीज असते, छत्रपती शिवाजी महाराज हे एका कोणा पक्षाचे नाहीत याचे भान श्रेयाच्या लढाईत गुंतलेल्या कोणालाही राहिले नाही, हे खरेच.
      एकीकडे अशी अतिरेकी परिस्थिती असताना दुसरीकडे रायगड जिल्ह्यात पद्मदुर्ग जागरच्या निमित्ताने विवेकी आश्‍वासक चित्र पहायला मिळत आहे. जंजिरा किल्ल्याच्या सहाय्याने सिद्दीने किनारपट्टीवर धाक जमवला होता. सामान्य रयतेची पिळवणूक होत होती. त्यामुळे सिद्दीच्या अत्याचाराला पायबंद घालण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांनी मुरुडच्या सागरात असलेल्या कासवाच्या आकाराच्या बेटावर किल्ला जलदुर्ग बांधला आणि त्याच्या  बुरुजाच्या वरचा भाग ङ्गुललेल्या कमळाच्या पाकळ्याप्रमाणे असल्यामुळे त्याला पद्मदुर्ग असे नाव दिले. कासवाच्या आकारामुळे त्याला कासा असेही म्हटले जाऊ लागले. या किल्ल्यामुळे जंजिर्‍याच्या सिद्दीला चांगलाच पायबंद बसला. या अशा पद्मदुर्गची दूरवस्था झाल्यामुळे व छत्रपतींचा हा किल्ला सरकार दरबारी उपेक्षितच राहिल्यामुळे किल्ल्याच्या या परिस्थितीकडे सरकार आणि पर्यटक एकंदरीत संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष वेधण्यासाठी ’पद्मदुर्गाचा जागर’ हा कार्यक्रम कोकण कडा मित्र मंडळ व मुरूड नगरपरिषद यांच्या विद्यमाने मुरूड बीच ङ्गेस्टिव्हलच्या पार्श्‍वभूमीवर सर्वसामान्य जनतेच्या सहभागातून गेली आठ वर्षे केला जात आहे. पद्मदुर्गजागर या किल्ल्याच्या स्वच्छतेच्या निमित्ताने सुरु झाला आणि आज जागर शिवभक्तांसाठी उत्साहवर्धक उत्सव ठरला आहे. त्यामुळे दरवर्षीप्रमाणे शनिवार, २४ डिसेंबर रोजी रायगड ते पद्मदुर्ग अशी शिवपालखी काढण्यात आली. महाड-रायगड ते मुरुड-पद्मदुर्ग या मार्गावरील मिरवणुकीत तेथील ग्रामस्थांनी छत्रपती शिवाजी महाराजांचे दर्शन घेतले. रविवार, २५ डिसेंबर रोजी गडपूजन व तेथे शिवसृष्टी उभारुन विविध कार्यक्रमांनी पद्मदुर्गचा जागर झाला. 
      संपूर्ण महाराष्ट्रात दुर्गसंवर्धन चळवळीने वेग घेतला आहे. अनेक दुर्गप्रेमी संस्था आणि शिवभक्त तरुणांनी दुर्गस्वच्छतेसाठी वाहून घेतले आहे, अशा परिस्थितीत शिवभक्तांनी मुरुडच्या पद्मदुर्ग जागरचा आदर्श घेऊन महाराष्ट्रातील प्रत्येक गडावर असा जागर घडवला पाहिजे. तसेच सरकार जसे अरबीसमुद्रात शिवस्मारक उभारणार आहे, त्याच धर्तीवर ज्या गडांवर संस्मरणीय घटना घडल्या तेथे त्याने स्फूर्ती स्मारके उभारणेही गरजेचे आहे. तशी एक संकल्पना १९४९ साली पुण्यातील सिहंगडाबाबत सासवने येथील जागतिक दर्जाचे शिल्पकार विनायक पांडुरंग तथा नानासाहेब करमरकर यांना सुचली होती. ‘आधी लगीन कोंढाण्याचं अन् मग रायबाचं’ असं छत्रपती शिवाजी महाराजांना सांगणार्‍या नरवीर तानाजी मालुसरे यांच्या हौतात्म्याने बुलंद कोंढाणा किल्ला सिंहगड झाला. तानाजी आणि त्यांचे मावळे घोरपडीच्या सहाय्याने ज्या कड्यावरुन कोंढाण्यावर चढले, तो बेलाग कडाच खोदून त्यावर नरवीर तानाजी मालसुरे यांची प्रतिमा साकारावी, असे त्यांच्या मनात आले. पण स्वातंत्र्याच्या सुरुवातीच्या कालखंडात ते शक्य झाले नाही. आता मात्र ही संकल्पना राबविता येणे शक्य आहे. सिंहगडावर तानाजी मालुसरे जो कडा चढून वर गेले त्या कड्याच्या वर ते कडा चढून जातानाचे शिल्प स्फूर्ती स्मारक उभारता येईल. सातार्‍यातील प्रतापगडावर अफजलखानाच्या कबरीशेजारी छत्रपती शिवाजी महाराज अफजलखानाचा कोथळा काढतानचे शिल्प स्फूर्ती स्मारक उभारता येईल. रायगड जिल्ह्यातील अलिबागच्या छत्रपती शिवरायांनी बांधलेल्या कुलाबा किल्ल्याच्या बुरुजावर मराठेशाहीचे सरखेल कान्होजी आंग्रे यांचे शिल्प स्फूर्ती स्मारक उभारता येईल. अशाप्रकारे विविध किल्ल्यांवर शिल्प स्फूर्ती स्मारके करता येतील, पण ही करण्याबरोबरच या गडकिल्ल्यांची दूरवस्थाही संपविणे तितकेच गरजेचे आहे. नानासाहेब करमरकर यांनी एके ठिकाणी म्हटले आहे की, ‘शिल्प स्मारकांनीच राष्ट्रपुरुष, राष्ट्रीय परंपरा, राष्ट्रीय कला, कलावंत व राष्ट्रंही अमर होतात.’ अरबी समुद्रातील जगातील सर्वात उंच अशा अश्‍वारुढ छत्रपती शिवाजी महाराजांच्या शिल्पस्मारकाने असेच घडणार आहे. जगभरातून भारतात येणार्‍या अभ्यासक-पर्यटकांची शिवकालाबद्दल हे शिवस्मारक उत्सुकता चाळवणार आहे. त्यांचे गडकिल्ले बघण्यासाठी प्रेरणा देणार आहे. त्यामुळे या शिवस्मारकाबरोबरच गडकिल्ल्यांच्या आरोग्याकडे बारकाईने पाहणे गरजेचे आहे. नाही म्हणायला महाराष्ट्रातील या गड-किल्ल्यांचे मूळ स्वरूपात जतन करणे, त्यांचे ऐतिहासिक महत्त्व कायम राखणे तसेच या किल्ल्यांची दुरुस्ती, संरक्षण-संवर्धन व देखभाल करण्यासाठी सांस्कृतिक कार्यमंत्री विनोद तावडे यांच्या अध्यक्षतेखाली गड-किल्ले संवर्धन समिती नेमण्यात आली आहे. यापूर्वी २००५ साली आघाडी सरकारच्या काळात केंद्र सरकारच्या कोकण रिव्हिल्टाच्या माध्यमातून राज्यातील राज्यातील मुंबई, कोकण आदी भागातील किल्ल्यांच्या विकासाचा कार्यक्रम हाती घेण्यात आला होता, पण किल्ल्यांच्या विकासाला पाहिजे तशी चालना मिळाली नाही. राज्य सरकारच्या कला व सांस्कृतिक मंत्रालयाच्या वतीने यावर्षी २१ ते २४ जानेवारीदरम्यान रायगड महोत्सव भरविण्याव्यतिरिक्त महाराष्ट्रातील किल्ले जतन-संवर्धनाबाबत काही ठोस कृती झालेली नाही. अमूक निधी उपलब्ध केलाय, तमूक निधी उपलब्ध केलाय अशा घोषणाच केल्या जात आहेत. परंतु किल्ले जतन-संवर्धनाबाबतच्या योजनांची अंमलबदावणी योग्यरितीने होताना दिसत नाही. याबाबत आता संपूर्ण महाराष्ट्राने जागर करण्याची गरज आहे. तसे केले तरच महाराष्ट्राची गडकिल्ल्यांची अस्मिता अभंग राहील.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा