-उमाजी म. केळुसकर ⬑ रायगडचा डंका ⬉
अर्वाचीन भारताच्या इतिहासात आरमाराचे महत्व ज्यांनी पहिल्या प्रथम ओळखले, ते छत्रपती शिवाजी महाराज यांनीच. केवळ भूदलाचेच सामर्थ्य वाढविण्याकडे लक्ष न देता त्यांनी सागरी सामर्थ्य वाढविण्याचे पद्धतशीर प्रयत्न केले. राज्याचे रक्षण करण्यासाठी प्रबळ आरमार पाहिजे, सिद्दी, पोर्तुगीज, इंग्रज इत्यादी परकीयांना शह देण्यासाठी आरमार सामर्थ्यशाली असले पाहिजे, हे ओळखून त्यांनी आरमाराची आणि सागरी किल्ल्यांची उभारणी केली आणि दर्यावरही वचक निर्माण केला. या आरमारी सामर्थ्याची प्रतिकं कोकणात जागोजागी पहायला मिळतात, त्यापैकी एक खांदेरी जलदुर्ग (सरखेल कान्होजी आंग्रे बेट) आहे. भारतीय नौदलाने शिवरायांच्या युद्धनितीला सलाम करण्यासाठी १९६८ साली आपल्या एका पाणबुडीला ‘खांदेरी’ असे नाव दिले होते. त्यानंतर २०१७ साली या जानेवारी महिन्यात आपल्या पूर्णपणे देेशी बनावटीच्या पाणबुडीला ‘खांदेरी’ असे नाव देऊन पुन्हा सागरी अभिमानाची परंपरा नौदलाने चालू ठेवली आहे.
अथांग सागरावर जो आपले अधिराज्य सिद्ध करील तोच बाजूच्या भूभागावर आपली सत्ता सुयोग्य प्रकारे प्रस्थापित करून रयतेस सक्षम सुरक्षितता देऊ शकेल, अशी दूरदृष्टी बाळगून आरमाराची आणि जलदुर्गांची उभारणी करून छत्रपती शिवाजी महाराजांनी सागरीमार्गे होणार्या परकीयांच्या घुसखोरीस प्रतिबंध घालण्याचा प्रयत्न केला. या आरमाराच्या उभारणीने मराठ्यांच्याच नव्हे तर भारताच्या इतिहासात एक नवीन पर्व सुरु झाले. पूर्वी समुद्रातील संचाराला पोर्तुगीजांची परवानगी घ्यावी लागे; परंतु छत्रपतींच्या आरमाराचे सामर्थ्य पाहिल्यावर पोर्तुगीजांची मराठी आरमाराला परवान्यासाठी अडविण्याची छाती झाली नाही. किनारपट्टी सुरक्षित करण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांनी सिंधुदुर्ग, पद्मदुर्ग, खांदेरी, कुलाबा, विजयदुर्ग, सुवर्णदुर्ग इत्यादी जलदुर्ग बांधले. कुलाबा, अंजनवेल, रत्नागिरी, विजयदुर्ग येथे कसबी सुतार व कारागीर आणून कल्याण, भिवंडी व पनवेल येथील जंगलातील चांगल्या लाकडांचा वापर करून लढाऊ जहाजे बांधण्यास सुरुवात केली. गुराब, तरांडी, गलबते, दुबारे, शिहाडे (शिबाडे), पगार, बाथोर, तिरकटी, पाल, मचवे अशा जातीच्या सुमारे चारपाचशे युद्धनौका तयार झाल्याने महाराजांच्या सागरी शत्रूंना चांगलीच दहशत बसली. महाराजांच्या आरमारात ‘बारकश’ (ङ्गरगाद) म्हणजे मोठी लढाऊ जहाजे नव्हती. याचे कारण म्हणजे, कोकणच्या उथळ व आतील किनारपट्टीत अशा मोठ्या युद्धनौकांना आत नेता येत नसे. यासाठी त्यांना लहान व जलद हालचाली करू शकणारी व वेळप्रसंग आल्यास उथळ पाण्याच्या भागात सुरक्षिततेसाठी आश्रय घेता येण्याजोगी जहाजे उपयुक्त ठरत असत. हाही त्यांच्या कुशल आरमारी युद्धनीतीचा व दूरदर्शीपणाचा भाग होता. आरमारी लढाईत भांडी (तोफा), जंबुरे (लहान तोफा), बंदुकी व टुक्के यांचा प्रामुख्याने वापर होई. इ. स. १६६५ ते १६७९ मध्ये फ्रिगेट्स श्रेणीच्या मोठ्या युद्धनौकाही बांधण्यास सुरुवात झाली. इ.स. १६७९ मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या जवळ ६६ मोठी लढाऊ गलबते होती असा उल्लेख सापडतो. महाराजांनी मराठा आरमाराचा असा पाया घातला आणि पुढे सरखेल कान्होजी आंग्रे यांनी त्यावर कळस चढविला. छत्रपती शिवाजी महाराजांचा एक एक किल्ला, एक एक जलदुर्ग त्यांच्या युद्धनितीचे एक एक उत्कृष्ट प्रतिक आहे. त्यातील इंग्रजांच्या उरावर बसविलेला ‘खांदेरी’ जलदुर्ग हा एक आहे आणि त्याचेच स्मरण ठेवण्यासाठी भारतीय नौदलाने पहिली ‘खांदेरी’ पाणबुडी ६ डिसेंबर १९६८ रोजी सागरी सुरक्षेसाठी दाखल केली होती. ती २० वर्षे सेवा केल्यानंतर १८ ऑक्टोबर १९८९ रोजी नौदलातून निवृत्त झाली. त्यानंतर नौदलाने पुन्हा एकदा २८ वर्षांनी उशिरा का होईना पण आपल्या पूर्णपणे देशी बनावटीच्या पाणबुडीला ‘खांदेरी’ हे नाव देवून शिवरायांच्या युद्धनितीला वंदन केले आहे.
अरबी समुद्र, बंगालचा उपसागर आणि हिंद महासागर या देशाच्या तिन्ही बाजूंचे खात्रीशीर रक्षण करण्यासाठी प्राप्त परिस्थितीत भारतीय नौदलाकडे कमीत कमी २४ पाणबुड्या असणे सामरिकदृष्ट्या आवश्यक आहे. आश्वासक परिस्थितीसाठी ३० पाणबुड्या आवश्यक आहेत. पण प्रत्यक्षात भारतीय नौदलाकडे केवळ १३ पाणबुड्या आणि दोन आण्विक पाणबुड्या आहेत. अशा परिस्थितीत प्रोजेक्ट-७५ अंतर्गत सहा पाणबुड्या तयार करण्यात आल्या असून ते प्रोजेक्ट -७५ सन २०२० पर्यंत पूर्ण करावयाचे आहे. त्यापैकी ‘कलवरी’ पहिली आणि दुसरी ‘खांदेरी’ ही पाणबुडी आहे. मुंबईच्या माझगाव गोदीत तयार झालेल्या ‘खांदेरी’ या पाणबुडीचे जलावतरण केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री डॉ. सुभाष भामरे यांच्या हस्ते गुरुवार,१२ जानेवारी २०१७ रोजी माझगाव डॉकमध्ये करण्यात आले. या पाणबुडीच्या बांधणीचे आव्हान भारतीय तंत्रज्ञांनी यशस्वीपणे पेलले आहे. अर्थात ही पाणबुडी नौदलात सक्रिय होण्यापूर्वी अनेक चाचण्या घेतल्या जाणार आहेत. परंतु या निमित्ताने भारताने पाणबुडी निर्मितीच्या क्षेत्रात टाकलेले पाऊल महत्त्वाचे ठरणार आहे. ‘खांदेरी’ ही पाणबुडी ६१ मीटर लांब आणि ६ मीटर रुंद आहे. तर वजन १५६५ टन आहे. समुद्रात ही पाणबुडी ६० किलोमीटर वेगाने शत्रूवर चाल करू शकते. ही पाणबुडी डिझेल आणि वीजेवर चालणारी आहे. ही पाण्याच्या आतमधून किंवा पृष्ठभागावरुन शत्रूच्या जहाजाला टोर्पिडो आणि जहाज विरोधी क्षेपणास्त्र वापरुन लक्ष करु शकते, तसेच उष्ण कटिबंधासह कोणत्याही वातावरणात कार्य करु शकते. ही अद्ययावत उपकरणांनी सज्ज आहे. तिच्यामधून नौदलाच्या इतर घटकांसह संपर्क केला जाऊ शकतो. तिच्यामधून पाणबुडी विरोधी युद्धसामुग्री, पृष्ठभागविरोधी युद्धसामुग्री वाहून नेणे, गुप्तचर संकलन, पाळत ठेवणे, माइन बसवणे अशा विविध मोहिमा हाती घेतल्या जाऊ शकतात.
भारत आणि फ्रान्स या दोन देशांदरम्यान करण्यात आलेल्या तंत्रज्ञान हस्तांतरण करारानुसार डीसीएनएस या उत्पादन प्रकल्पाच्या सहकार्याने माझगाव डॉक शिपबिल्डर्स लिमिटेडकडून स्कोर्पियन वर्गातील ६ पाणबुड्या तयार करण्यात येत आहेत. पाणबुड्या, जहाज आदींच्या बांधणीत माझगाव डॉकचे योगदान अतिशय महत्त्वाचे राहिले आहे. २०० वर्षांचा इतिहास असलेल्या माझगाव डॉकची स्थापना १८ व्या शतकात करण्यात आली. सुरूवातीला ब्रिटीश इंडिया स्टीम नेव्हिगेशन कंपनी असे त्याचे नाव होते. ही पब्लिक लिमिटेड कंपनी होती. १९६० मध्ये ही कंपनी भारत सरकारने ताब्यात घेतली. माझगाव डॉकमध्ये बांधलेल्या पहिल्या ‘आयएनएन निलगिरी’ या जहाजाचे जलावतरण १५ ऑक्टोबर १९६६ रोजी करण्यात आले. त्यानंतर या गोदीत अनेक विशाल जहाजांची निर्मिती करण्यात आली आहे. ८ डिसेंबर १९६७ साली देशाची पहिली पाणबुडी ‘आयएनएस कलवरी’ भारतीय नौदलाच्या सेवेत सामील करण्यात आली होती. त्यामुळे ८ डिसेंबर हा दिवस दरवर्षी पाणबुडी दिवस म्हणून साजरा करण्यात येतो. या वर्षी ८ डिसेंबर रोजी या घटनेला ५० वर्षे पूर्ण होणार आहेत. ७ फेब्रुवारी १९९२ रोजी ‘आयएनएस शाल्की’ ही पहिली भारतीय बांधणीची पाणबुडी सेवेत आणून पाणबुडी बांधणी करणार्या देशांच्या समुहात सामील झाली. ‘आयएनएस शंकुल’ ही दुसरी स्वदेशी बनविलेली पाणबुडी १९९४ मध्ये सेवेत रुजू झाली. या दोन्ही पाणबुड्या अजूनही सेवेत आहेत. मात्र १९९३ नंतर भारतात पाणबुडीनिर्मिती थांबली होती ती २०१५ साली स्कोर्पियन प्रकल्पाद्वारे सुरु करण्यात आली. स्कोर्पिन प्रणालीतील पहिली ‘कलवरी’ पाणबुडी गुरुवार, २९ ऑक्टोबर २०१५ मध्ये भारतीय नौसेनेत दाखल झाली असून तिची नुकतीच चाचणी घेण्यात आली. ‘कलवरी’ पाणबुडी जूनपर्यंत नौसेनेत कार्यरत होणार आहे. तर दुसर्या स्कोर्पिन क्षेणीतील ‘आयएनएस खांदेरी’ पाणबुडीची डिसेंबरपर्यंत चाचणी घेण्यात येणार आहे. त्यानंतर ‘खांदेरी’ भारतीय नौसेनेत कार्यरत होणार आहे. ‘आयएनएस खांदेरी’ नंतर उर्वरित चार पाणबुड्या नऊ महिन्याच्या अंतराने तयार केल्या जाणार आहेत.
छत्रपती शिवाजी महाराजांना ‘फादर ऑफ इंडियन नेव्ही’ म्हणून अभ्यासले जाते. त्यासाठी खास आयएनएस ‘शिवाजी‘ नावाने एक नौदल प्रशिक्षण केंद्र लोणावळा येथे तयार करण्यात आले आहे. तसेच सरखेल कान्होजी आंग्रे यांनी मराठा नौदलाचे नेतृत्व केले होते. त्यांच्या नावानेही फोर्ट-मुंबई येथे आंग्रे नौदल तळाची स्थापना करण्यात आली आहे. त्याबरोबरच ‘आयएनएस आंग्रे’ असे एका युद्धनौकेला नावही देण्यात आले आहे. मराठा आरमाराचा असा गौरव झाला असताना पुन्हा एका पाणबुडीला ‘खांदेरी’ हे नाव देणे ही रायगडकरांसाठी, तसेच देदीप्यमान इतिहास लाभलेल्या माझगाव गोदीत ‘खांदेरी’ या पाणबुडीची बांधणी होणे ही तेथील तंत्रज्ञ, अधिकारी तसेच कर्मचार्यांसाठी आनंदाची आणि अभिमानाची बाब आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा