-उमाजी म. केळुसकर ⬑ रायगडचा डंका ⬉
रायगड जिल्हा असो, वा उर्वरित महाराष्ट्र, वा संपूर्ण देश, हा दहशतवादापेक्षाही रस्त्यांवरील अपघातांनी गलितगात्र झाला आहे. रस्त्यांना विकासाचा मार्ग म्हटले जाते, पण तेच रस्ते जीवघेणे ठरत आहेत. या रस्ते अपघातात आणि अपघाती मृत्यूच्या बाबतीत देशात महाराष्ट्रही उत्तर प्रदेश, तामिळनाडूच्या बरोबरीने बदनाम झाला आहे. एकूणच रस्ते अपघात ही भारतात मोठी चिंताजनक बाब बनली आहे. रस्त्यातील खड्ड्यांनी आणि बेशिस्त, भरधाव वाहतुकीने अनेकांचे बळी जात आहेत. एकाच जागेवर, एकाच मार्गावर अनेक अपघाती मृत्यू होत आहेत. अनेकांच्या आयुष्यांची, सुखी संसाराची, ध्येयाची क्षणात माती होतेय. होत्याचे नव्हते होतेय. कोणी मुलगा, सुन, आई-वडील, मावशी, काका, काकू, चिमुकले, अजून कितीतरी नात्यातील प्रियजनांना गमवतोय. या रस्ते अपघातात माणसांच्या चुकांनी आणि खराब रस्त्याने माणसे मृत्यूमुखी पडताहेत, ही वस्तुस्थिती आहे. ही वस्तुस्थिती बदलत नाही, चांगले रस्ते आणि वाहतूक सुरक्षिततेची काळजी जोपर्यंत खर्याअर्थाने घेतली जात नाही, तोपर्यंत हे रस्त्यावरील मृत्यूचे थैमान थांबणारे नाही.
९ ते २३ जानेवारी २०१७ या कालावधीत २८ वा राष्ट्रीय रस्ता सुरक्षा पंधरवडा राबविण्यात आला. या निमित्त रस्ता सुरक्षा विषयक विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले. दरवर्षी या उपक्रमांचे आयोजन केले जाते, पण त्यांची परिणामकारकता किती असते आणि त्यातून काय निष्पन्न होतेे, किती जनजागृती होते याचा काही थांगपत्ता लागत नाही. याही वर्षी तसेच झाले. रायगड जिल्ह्यातही जनजागृतीचा फक्त सोपस्कार पार पाडला. वस्तुस्थिती अशी आहे की परिणामकारक उपायांअभावी जिल्ह्यात रस्ते अपघातात गेल्या काही वर्षांत मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. एकट्या मुंबई-गोवा महामार्गाचेच उदाहरण घेतले तर परिस्थिती कशी भयानक आहे हे दिसून येईल. २०१० वर्षात या महामार्गावर जिल्ह्यात एकूण २०२ अपघात, १६२ मृत्यू, ५८७ जखमी, २०११ ला ६११ अपघात, १३६ मृत्यू, ६१९ जखमी, २०१२ ला ६४९ अपघात, १२४ मृत्यू, ५५८ जखमी, २०१३ ला ४७४ अपघात, १२२ मृत्यू, ४६७ जखमी, २०१४ ला ४६२ अपघात, ९३ मृत्यू, ४३९ जखमी, २०१५ ला ४९७ अपघात, ९९ मृत्यू, ६२४ जखमी, २०१६ ला ४६० अपघात, ११० मृत्यू, ८२७ जखमी झाले. या मुंबई-गोवा अरुंद महामार्गाच्या चौपदरीकरणासाठी पत्रकारांनी दीर्घकाळ आंदोलन केले. त्याचे फळ म्हणून या महामार्गाच्या चौपदरीकरणास मान्यता मिळाली. जिल्ह्यातून पळस्पे ते इंदापूर या १५४ किलोमीटर दरम्यान मुंबई-गोवा महामार्ग जातो, त्यापैकी पळस्पे ते इंदापूर या ८४ किलोमीटर मार्गाचे काम सुरु झाले आणि ४० टक्के काम पूर्ण झाल्यावर ते रखडले आणि महामार्गाची प्रचंड दूरवस्था झाली आहे. अरुंद महामार्ग, कडेला वाढलेले वृक्ष, प्रचंड वळणे, क्षमतेपेक्षा जास्त चाललेली वाहतूक, भरधाव वेगाने जाणारी वाहने, रस्त्यावरील खड्डे व खचलेल्या व खडे पडलेल्या साईडपट्ट्या, सुरक्षेच्या दृष्टीने उपाय नसणे, रस्त्यावर वाहतूक पोलिस नसणे, अपघातप्रवण भागाकडे सुरक्षितेच्या दृष्टीने काहीच उपाय योजना नसणे, ही अपघातांची प्रमुख कारणे आहेत. महामार्गाची वाहतुक क्षमता २३ मेट्रीक टन पण वाहतूक होेते क्षमतेपेक्षा जास्त. अरुंद पूल, अवजड वाहनांची वाढलेली वाहतूक संख्या, महामार्गावर झालेली अतिक्रमणे या कारणांमुळे मुंबई-गोवा महामार्गावर अपघातांचे प्रमाण वाढत असते. हे कमी म्हणून काही वाहनांचे चालक मद्यपान करुन भर वेगात वाहने चालवून अपघाताला आमंत्रण देत असतात. तसेच अपघात झाल्यास पर्यायी मार्गही नाहीत. त्यामुळे वाहतुकीची कोंडी नेहमी होत असत आणि असे प्रकार दररोज घडत असतात. या महामार्गावर अपघात झाल्यानंतर जागेवरच मृत्युमुखी पडणार्याचे प्रमाण २० टक्के तर ७० टक्के मृत्यू जखमींना रुग्णालयात नेताना झालेले आहेत. या महामार्गावर कोठेही अद्ययावत आणि सुसज्ज रुग्णालय नाही. शासकीय रुग्णवाहिका जलद उपलब्ध होवू शकत नाहीत. चौपदरीकरणाचा पाठपुरावा करण्याबाबतची राजकीय उदासिनता, चौपदरीकरणाबाबतची सरकारी अनास्था, वाहतूक नियमांच्या अंमलबजावणीचा अभाव यामुळे मुंबई-गोवा महामार्गावरील प्रवास सुखाचा न ठरता अपघातांचा ठरला आहे. मुंबई-पुणे द्रुतगती महामार्ग टोलवसुलीची दुभती गाय ठरला आहे, रस्ता सुरक्षेची मात्र तेथे काळजी घेतली जात नाही. त्यामुळे तोही महामार्ग अपघाती ठरला आहे. जुन्या मुंबई-पुणे महामार्गावरही वाहतूक नियमांच्या पायमल्लीने मृत्यू धावता असतो. येथे रस्ता सुरक्षा पंधरवडा आणि रस्ता सुरक्षा विषयक विविध उपक्रम तुटपुंजे ठरतात हे वास्तव आहे.
महामार्ग सोडल्यास रायगड जिल्ह्यातील इतर रस्त्यांवरील अपघातांचे आणि त्यात होणार्या मृत्यूचे प्रमाण लक्षणिय आहे. त्यामुळे रस्ता सुरक्षा हा विषय एका दिवसाचा किंवा पंधरवड्यापुरता मर्यादित नाही तर रोजच्या जगण्यातला अविभाज्य भाग आहे, हे लक्षात घेतले पाहिजे. रस्ता सुरक्षेबाबत विचार करताना दोन बाबी अत्यंत महत्त्वाच्या आहेत. रस्त्याची सुरक्षा आणि रस्त्यावरून वाहने हाकणार्यांच्या जीवाची सुरक्षा. या दोन्हीपैकी रस्त्याची सुरक्षा राखण्याबाबत काय बोलावे? लाखो रुपये खर्चून दरवर्षी रस्ते बांधण्यात येतात. त्यांची दुरुस्ती करण्यात येते. हॉटमिक्स, डांबरीकरण केले जाते. पण मृग नक्षत्राच्या एकाच पावसाने या रस्त्यांची धूप होते. नद्यांना पूर येऊन प्रवाहाबरोबर वृक्ष-वल्ली वाहून जातात, हे समजण्यासारखे आहे. पण पावसाळ्यात पाण्यात रस्तेच वाहून जातात. उरल्या सुरल्या खड्ड्यांत मग वृक्षारोपण करून निषेध करण्याची कामगिरीही काही नागरिकांना करावी लागते. अशा परिस्थितीत रस्त्यांची सुरक्षा कोण, कशी राखणार? या खराब रस्त्यांमुळे, रस्त्यांतील खड्ड्यांमुळे अपघातांची संख्या सातत्याने वाढते आहे, या बाबीकडे कसे दुर्लक्ष करता येणार?
आता रस्त्यावरून वाहने हाकणार्यांच्या जीवाची सुरक्षा राखण्याच्या प्रश्नावर विचार करता अनेक गोष्टी तपासून पाहाव्या लागतील. अपघाताविषयीच्या आकडेवारीनुसार ८५ टक्के अपघात हे मानवी चुकांमुळे घडतात, असे आढळून आले आहे. ङ्गक्त १० टक्के रस्त्यामुळे आणि केवळ ५ टक्के अपघात तांत्रिक कारणामुळे होतात. या माहितीच्या आधारे विचार केला असता अपघातांचे प्रमाण वाढण्यास वाहतुकीच्या नियमांची अंमलबजावणी होत नाही, हेच दिसून येते. अपघात मोठ्याप्रमाणात घडतात ते मानवी चुकांमुळे. कुठे बेफाम गाडी चालविली म्हणून तर कोठे रस्ता ओलांडताना काळजी घेतली नाही म्हणून अपघात होतो. वाहनचालक जसे अपघाताला कारणीभूत असतात तसेच पादचारीही. बहुतेकवेळा रस्ता वाहतुकीबाबतचे अज्ञान व चूक अपघाताला कारणीभूत ठरते. वाहतूक नियमांचे पालन न करणारे जसे दोषी आहेत तसेच नियमांची अंमलबाजवणी न करवून घेणारेही दोषी आहेत. वाहतुकीचे नियम नीटपणे समजून घेतले, अनावश्यक घाई टाळली, वाहन चालवताना मोबाईल फोनवर बोलले नाही, मद्यपान केले नाही, पुरेशी खबरदारी घेतली तर बरेचसे अपघात टाळले जाऊ शकतात. यासाठी शाळेपासूनच मुलांना सुरक्षेचे, वाहतूक नियमांचे शिक्षण देणे आवश्यक आहे. केवळ पंधरवडा साजरा करुन या विषयाला थेट भिडता येणार नाही. या विषयाला थेट भिडायचे असेल प्रत्येक दिवस हा रस्ता सुरक्षेच्या दृष्टीने महत्वाचा आहे. त्यादृष्टीने रस्ते अपघाताकडे गांभीर्याने पाहिले आणि त्याबाबत ठोस उपाययोजनांची निग्रहाने अंलबजावणी केली गेली तरच रस्त्यांवरचा मन सून्न करणारा दररोजचा आक्रोश थांबेल.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा