गुरुवार, १५ डिसेंबर, २०१६

खारेपाट महोत्सवाचे चैतन्य

-उमाजी म. केळुसकर ⬑ खारावारा ⬉


      अलिबाग तालुक्यात तीनवीराजवळ खारेपाट महोत्सव ‘झेप फाऊंडेशन’ने आयोजित करुन खारेपाटात चैतन्याचे उधाण आणले आहे. डिसेंबर आणि जानेवारी हे विविध महोत्सवांचे महिने आहेत. मुरुड पर्यटन महोत्सव, लायन्स क्लबचे अलिबाग फेस्टिव्हल, पंडितशेठ फाऊंडेशनचे अलिबाग युवा महोत्सव, तसेच जिल्ह्यात इतर तालुक्यांतही विविध पर्यटन महोत्सव साजरे केले जाणार आहेत. असे असले तरी या खारेपाट महोत्सवाचे महत्व अनन्यसाधारण आहे. 
      पस्तीस वर्षांपूर्वी जि.प.चे माजी अध्यक्ष प्रभाकर पाटील यांनी तीनवीरा धरणालगत कृषीप्रदर्शन भरविले होते आणि ते पाहण्यासाठी गर्दीने उच्चांक गाठला होता. त्यानंतर प्रभाकर पाटील यांच्या नातसूनेने, चित्रा आस्वाद पाटील यांनी एक पाऊल पुढे टाकून तीनविराजवळच द्रोणागिरी येथे खारेपाट महोत्सवाचे आयोजन करण्यास सुरुवात केली. पहिला खारेपाट महोत्सव २०१२ साली, त्यानंतर २०१३ व आता २०१६ साली तिसर्‍या खारेपाट महोत्सवाचे आयोजन २० ते २५ डिसंबर दरम्यान केले आहे. खारेपाटात अशाप्रकारचे भव्यदिव्य महोत्सव होतात, हीच बाब विशेष आहे. असे महोत्सव करण्याची शहरांची मक्तेदारी होती, परंतु ती या खारेपाट महोत्सवाने मोडीत काढली आहे.
     मुळात ग्रामीण, आदिवासी उत्पादनांना, महिला बचत गटांच्या उत्पादनांना उत्तम व्यासपीठ मिळवून देणे आणि खारेपाटाची संस्कृती दृग्गोच्चर करणे हे या खारेपाट महोत्सवाचे उदिष्ट्य आहे आणि ते साध्य होत आहे, असे जर म्हटले तर त्यात काही वावगे नाही. खाडीची ललाटरेषा लाभलेल्या खारेपाटातील माणसे मात्र गोडी आहेत. खारेपाट हा प्रामुख्याने आगरी समाजाची वस्ती असलेला प्रदेश. आगारात काम करणारा आणि आगराला आई मानणारा तो आगरी. या आगरी समाजाने आज सर्वच क्षेत्रात आपला ठसा उमटविला असला तरी या खारेपाटात कोळी, मराठा, भंडारी, मुस्लिम, आदिवासी, ब्राह्मण  तसेच इतर समाजाचीही फारशी नसली तरी  वस्ती आहे.  पोयनाड, वाघोडे, नवेनगर, बांधण ही गावे सोडल्यास इतर गावेच्या गावे आगरी समाजाची आहेत. खारेपाटातील बाजारपेठेचं गाव असलेल्या पोयनाडमध्ये आगरआळी, म्हणजेच चवरकर आळी आहे, ती अख्खी आगरी समाजाची आहे, तर उर्वरित पोयनाडमध्ये संमिश्र वस्ती आहे. अलिबाग तालुक्यातील खारेपाटातील  शहाबाजपासून कुर्डूस ते मांडव्यापर्यंतची गावे पूर्णत: आगरी समाजाची आहेत. असा हा खारेपाटावर वर्चस्व असलेला आगरी समाज आहे.
     खारेपाट म्हणजे आगरी आणि आगरी म्हणजे खारेपाट असेच येथील मातीतील मनांचे वर्णन करावे लागेल. शेतकरी चळवळीचे अर्ध्वयु कै. नारायण नागू पाटील उर्फ आप्पासाहेब यांनी खारेपाटात क्रांतीची हाक दिली, चरीचा ऐतिहासिक शेतकर्‍यांचा संप घडविला त्यामुळे येथील शेतकरी  सावकारी, जमीनदारी पाशातून मुक्त झाला, कुळकायदा जन्माला आला. सेझविरुद्धही खारेपाटातील शेतकरी आक्रमक राहिला. त्याचा उद्योगांना विरोध नाही, तर निसर्गाधारित उद्योगांची त्याला अपेक्षा आहे. या अपेक्षांसाठी आजही त्याला संघर्ष करावा लागतो, ही देखील वस्तुस्थिती आहे. खारेपाट नेहमी चैतन्यमय राहिला आहे. खारेपाटाने आपली संस्कृती जपण्याचा आटोकाट प्रयत्न केला आहे. मग ती खारेपाटची खाद्यसंस्कृती असो वा लग्नविधी असो त्यातून खारेपाटचा विशिष्ट असा बाणा दिसून येतो.
     खारेपाट दिखावा करीत नाही, तर तो असाही आणि तसाही व्यक्त होतो, तो पटलं नाही तर कोणाची भिडभाड ठेवत नाही आणि पटलं तर स्वत:चा जीवही द्यायला तयार असतो. खारेपाटातून राज्यपातळीवर, आंतरराष्ट्रीय पातळीवर नावलौकिक मिळवणारे साहित्यिक झाले, गायक, संगीतकार झाले, अभिनेते झाले, कबड्डीपटू झाले, आध्यापक झाले, राजकारणीही झाले. खारेपाट ही गुणी जनांची खाण आहे. याचेच दर्शन खारेपाट महोत्सवात दाखवण्यावर भर राहिला आहे, ही बाब अतिशय चांगली आहे. यावर्षी कुलाबा ते रायगड या कालखंडाची जडणघडण दाखवण्यावर या खारेपाट महोत्सवाचा भर राहणार आहे. केवळ खारेपाट या कोषातच न राहता संपूर्ण रायगडची संस्कृती आणि देदीप्यमान इतिहास दाखविण्याचा या वर्षी जो विविध अंगाने जो प्रयत्न करण्यात येणार आहे, तोही कौतुकास्पद आहे. म्हणूनच खारेपाट महोत्सवास शुभेच्छा!

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा