-उमाजी म. केळुसकर ⬑ खारावारा ⬉
रायगड जिल्ह्याच्या (तत्कालिन कुलाबा जिल्हा) शिक्षण चळवळीला स्वातंत्र्यपूर्व आणि स्वातंत्र्योत्तर काळात अनेक शिक्षण संस्थांनी गती दिली आहे. त्यात अंजुमन इस्लाम, जंजिरा-मुरुड (स्थापना १९०७), पेण एज्युकेशन सोसायटी, पेण (१९१०), कोकण एज्युकेशन सोसायटी, अलिबाग (१९१७), अभिनव ज्ञानमंदिर, कर्जत (१९३५), अलिबाग तालुका शिक्षण प्रसारक मंडळ, अलिबाग (१९३७), नागाव शिक्षण संस्था संचालक मंडळ, नागाव (१९३९), सुधागड एज्युकेशन सोसायटी, पाली (१९४१), माणगाव तालुका एज्युकेशन सोसायटी, गोरेगाव (१९४५), खालापूर तालुका शिक्षण प्रसारक मंडळ, खोपोली (१९५७), जनता शिक्षण मंडळ, अलिबाग (१९५९), पनवेल एज्युकेशन सोसायटी, पनवेल (१९६०), इंदापूर विभाग शिक्षण प्रसारक मंडळ, इंदापूर (१९६०), इंडियन एज्युकेशन सोसायटी, वरसोली (१९८७), पीएनपी एज्युकेशन सोसायटी, अलिबाग (२०००) दत्ताजीराव खानविलकर ट्रस्ट, अलिबाग (२००३) यासारख्या जिल्ह्यातील अनेक संस्थांची नावे विशेषत्वाने घ्यावी लागतील. या शिक्षण संस्थांत आवास, सासवने, धोकवडे रहिवासी हितवर्धक मंडळ या शिक्षण संस्थेने १९४१ पासून सुरु केलेल्या शैक्षणिक कार्याचीही विशेष दखल घ्यावी लागेल. या मंडळाच्या बाबासाहेब नाझरे हायस्कुल व ज्युनिअर कॉलेज, आवासचा या महिन्यात अमृतमहोत्सव साजरा होत आहे, ही या विभागासाठी अभिमानाची बाब आहे.
रायगड जिल्ह्यासाठी २०१७ चा जानेवारी महिना महत्वाचा आहे, कारण १ जानेवारी १९१७ साली कोकण एज्युकेशन सोसायटीची स्थापना झाली. बारा दिवसांनी, पुढील वर्षी या संस्थेचा शतक महोत्सव आहे. तसाच २०१६ चा चालू डिसेंबर महिनाही महत्वाचा आहे. कारण या महिन्यात आवास, सासवने, धोकवडे रहिवासी हितवर्धक मंडळाच्या १९४१ साली स्थापना झालेल्या बाबासाहेब नाझरे हायस्कुल व ज्युनिअर कॉलेज, आवासचा अमृत महोत्सव साजरा होत आहे. एखाद्या संस्थेला १०० वर्षे आणि ७५ वर्षे होणे ही साधी-सोपी गोष्ट नाही. अनेक संकटांचे उन्हाळे-पावसाळे सोसून या संस्था खंबीरपणे उभ्या आहेत, हे कोकण एज्युकेशन सोसायटी आणि आवास, सासवने, धोकवडे रहिवासी हितवर्धक मंडळाच्या शैक्षणिक कार्याकडे पाहता लक्षात येते.
कोकण एज्युकेशन सोसायटीने आपल्या शैक्षणिक कार्याची सीमारेषा नावाप्रमाणे आखली, तसेच आवास, सासवने, धोकवडे रहिवासी हितवर्धक मंडळानेही आपल्या शैक्षणिक कार्याची सीमा नावाप्रमाणे राखली. या मंडळाने अनेक शाळा काढल्या नाहीत, परंतु एकच हायस्कुल व ज्युनिअर कॉलेज, प्राथमिक शाळा काढून आवास, सासवने, धोकवडे परिसरातील चार पिढ्यांची शैक्षणिक भूक भागविली आहे. या शिक्षण संस्थेतून अनेक डॉक्टर, वकील, खेळाडू, लेखक, उद्योगपती, अभिनेते, इंजिनिअर, पत्रकार, राजकीय नेते आणि सच्चे नागरीक या राज्याला, देशाला मिळाले आहेत. दोन विद्यार्थीनींना क्रीडा क्षेत्रातील मानाचा शिवछत्रपती पुरस्कार मिळाला आहे. ही या संस्थेची श्रीमंती आहे आणि ती वाढतच आहे.
आवास, सासवने, धोकवडे ही तीन गावे गावे अगदी जवळ-जवळ असून त्यांचे हितसंबंध फार पूर्वीपासून एकमेकांशी निगडित आहेत. या तीन गावांतील स्थानिक स्थानिक व मुंबईतील रहिवाशांची सार्वजनिक हिताची कामे संघटितपणे करण्यासाठी ६ ऑगस्ट १९३६ रोजी आवास, सासवने, धोकवडे रहिवासी हितवर्धक मंडळाची स्थापना झाली. संस्था स्थापनेची पहिली सभा मुंबईतील गांधर्व महाविद्यालयाच्या सभागृहात ऍडव्होकेट गोपाळ कृष्ण गाडगीळ यांच्या अध्यक्षतेखाली झाली. या सभेचे स्वागताध्यक्ष जागतिक कीर्तीचे शिल्पकार विनायक पांडुरंग तथा नानासाहेब करमरकर हे होते. या सभेत संस्थेचे पहिले कार्यकारी मंडळ निवडण्यात आले. संस्थेचे पहिले अध्यक्ष म्हणून काकासाहेब सप्रे व चिटणीस म्हणून वामन प्रभाकर अभ्यंकर यांची निवड झाली. संस्थेच्या पहिल्या वर्षीच सदर तीन गावांच्या परिसरात इंग्रजी शिक्षणाची सोय करण्याचे प्रयत्न संस्थेने सुरु केले. याबरोबरच मांडवा व रेवस बंदरातील प्रवासाच्या सोयी, शेतकी सुधारणा प्रवचने, व्याख्याने, स्नेहसंमेलने, मैदानी खेळांचे सामने वगैरे उपक्रम संस्थेमार्फत राबविण्यात येऊ लागले.
१९४० मध्ये बॉम्बे युनिफॉर्म क्लोदिंग कंपनी, मुंबईचे मालक बाळकृष्ण बहिरु तथा बाबासाहेब नाझरे यांची संस्थेच्या अध्यक्षपदावर निवड झाली आणि त्यांनी १९६० पर्यंत संस्थेचे अध्यक्षपद सांभाळले. त्यांच्या कारकीर्दीत १९४१ साली संस्थेने धोकवडे येथे इंग्रजी शाळा सुरु केली व या शाळेची जबाबदारी संस्थेचेच एक शिक्षणतज्ज्ञ कार्यकर्ते, महाराष्ट्र हायस्कूलचे माजी मुख्याध्यापक रावसाहेब ना.म. काळे यांच्यावर सोपविण्यात आली. बाबासाहेब नाझरे यांना बहुजन समाजाच्या शिक्षणाविषयी विशेष आस्था असल्यामुळे संस्थेच्या शैक्षणिक कार्यासाठी ५० हजाराची देणगी दिली. त्यावेळचे ५० हजार म्हणजे आजचे किती याचा हिशोब लावा, म्हणजे या परिसराच्या शैक्षणिक उद्धारासाठी त्यांनी किती मोठे मन दाखवले याची कल्पना येते. शाळेचा पसारा वाढविण्यासाठी अधिक जागेची गरज होती. त्यासाठी संस्थेने प्रयत्न करुन जिल्हाधिकार्यांकडून साडेतीन एकर सरकारी जागा मिळवली. त्याच जागेवर १९४४ साली स्वत:च्या इमारतीत बाबासाहेब नाझरे हायस्कुल सुप्रतिष्ठित झाले. त्यानंतर १९७५ साली ज्युनिअर कॉलेज, तसेच २०१३ साली स्व. प्रभाकर सदाशिव राणे पूर्व प्राथमिक व प्राथमिक शाळा सुरु करण्यात आली. १९८९ ला बाबासाहेब नाझरे हायस्कुल व ज्युनिअर कॉलेजची नवीन इमारत उभी राहिली. १९४१ ते २०१६ या ७५ वर्षांच्या काळात संस्थेने शिक्षण क्षेत्रात खूप प्रगती केली. या हायस्कुल व ज्युनिअर कॉलेजमुळे अलिबाग तालुक्याच्या उत्तर विभागातील चार पिढ्यांना विशेष फायदा झाला आहे.
आज या शाळेची सूत्र अध्यक्ष रणजीत राणे, उपाध्यक्ष जयंत चेऊलकर, सचिव प्रभाकर पाटील, सदस्य अभिजीत राणे आणि त्यांचे इतर सहकारी सांभाळीत आहेत. पूर्वसुरींनी त्यांच्या हाती जो ठेवा ठेवला आहे, तो निश्चितच त्यांनी जपला आहे, असे म्हटले तर त्यात काही वावगे नाही. हायस्कुलचे माजी मुख्याध्यापक, तसेच विद्यमान मुख्याध्यापक-प्राचार्य सर्जेराव कडवे, सहकारी शिक्षक, कर्मचारी, संस्थेचे विद्यार्थी-विद्यार्थिनी यांनी यांनी संस्थेच्या प्रतिष्ठेत भर टाकली आहे आणि संस्थेनेही या सर्वांना प्रतिष्ठा दिली आहे.
माणूस आणि संस्था यांच्या २५ साव्या वर्षाला रौप्य, ५० साव्या वर्षाला सुवर्ण, ६० व्या वर्षाला षष्ट्यब्दी अथवा हिरक, ७५ व्या वर्षाला अमृत, तर १०० व्या वर्षाला शतक महोत्सव म्हणतात. आधी रौप्य (चांदी), नंतर रौप्यपेक्षा मौल्यवान सोने आणि नंतर सोन्यापेक्षा मौल्यवान हिरा अशी मांडणी केल्यानंतर सोन्यापेक्षाही मौल्यवान किंबहुना ज्याचे मूल्यच करता येणार नाही असे ‘अमृत’ अशी मांडणी केली आहे आणि त्यानंतरच्या १०० रीला शतक या शब्दाशिवाय दुसरे कोणतेही महत्व देण्यात आलेले नाही. त्यामुळे रौप्य ते शतक या मांडणीत अमृतला, म्हणजे ७५ रीला जे महत्व आहे ते कोणालाही नाही. अमृत या शब्दाचे दोन अर्ध आहेत. अ-मृत या शब्दाचा एक अर्थ म्हणजे ‘मृत नाही’ असा, दुसरा अर्थ मृताला जिवंत करणारं. अमृत हे असे पौराणिक पेय आहे की जे प्यायल्यानंतर अमरत्व प्राप्त होते. पूर्वी माणसाच्या जीवनाची हमी देता येत नव्हती अशा काळात आयुष्याचे तीन टप्पे ओलांडून चवथ्या टप्प्यात म्हणजे ७५ पोहोचणे ही दुर्मिळ बाब होती. पंचाहत्तरीत पोहचणे हेच जणू अमृतपान केल्यासारखे असायचे. ज्याने पंचाहत्तरी गाठली तो पुढील वर्षेही सुखरुप पार करेल असा अमृत या शब्दाचा अर्थ आहे. हा अर्थ व्यक्ती आणि संस्था या दोन्हींनाही लागू आहे. हेच आवास, सासवने, धोकवडे रहिवासी हितवर्धक मंडळाच्या बाबासाहेब नाझरे हायस्कुल व ज्युनिअर कॉलेजच्या ७५ री निमित्त म्हणावेसे वाटते. संस्थेचा अमृत महोत्सव सुरु आहे. कुठच्याही व्यक्तीचा अथवा संस्थेचा अमृत महोत्सव म्हणजे जणू नवतारुण्य लाभणे असते, तेच नवतारुण्य बाबासाहेब नाझरे हायस्कुल व ज्युनिअर कॉलेजला लाभले आहे. ही संस्था कधी म्हातारी होणार नाही आणि या संस्थेतून बाहेर पडणारे विद्यार्थी आणि संचालक मंडळ या संस्थेला कधी म्हातारी होऊ देणार नाही, यात वाद नाही. इतकेच.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा