सोमवार, ४ जुलै, २०१६

जिल्हा कारागृहाचा श्‍वास घुसमटतोय!

-उमाजी म. केळुसकर ⬑ खारावारा ⬉


    अलिबाग येथील जिल्हा कारागृह सरखेल कान्होजी आंग्रे यांच्या हिराकोट किल्ल्यात आहे. या कारागृहात कैद्यांसाठी विविध उपक्रम राबविले जातात. महिला दिन, योगदिन सारखे उपक्रम तेथे राबविले जातात. श्री अंबिका योग कुटीर, शाखा अलिबागचे संचालक वीरेंद्र पवार यांनी तेथे योग शिबिरंही राबविली आहेत. आता कैद्यांना वाचनाची आवड निर्माण व्हावी म्हणून कारागृहातील कैद्यांसाठी वाचनालयही सुरु करण्यात आले आहे. या वाचनालयाचे उद्घाटन दक्षिण विभागाच्या कारागृह उपनिरीक्षक स्वाती साठे यांच्या हस्ते नुकतेच करण्यात आले. कैद्यांमध्ये वाचनाची आवड निर्माण होऊन त्यांच्यात परिवर्तन व्हावे, म्हणून वाचनालयाचा खजिना त्यांच्यासाठी मोकळा करण्यात आला आहे, हे सारे कौतुकास्पद आहे. पण तेथील क्षमतेपेक्षा अधिक कैद्यांचा प्रश्‍न उरतोच आहे.
     राज्यात एकूण ५३ कारागृहे आहेत. त्यामध्ये येरवडा, कोल्हापूर, मुंबई, ठाणे, औरंगाबाद, नाशिक रोड, नागपूर, अमरावती, तळोजा ही नऊ मध्यवर्ती कारागृहे आहेत, तर भायखळा, सोलापूर, धुळे, वर्धा, यवतामाळ, कोल्हापूर, अकोला, बुलढाणा, चंद्रपूर, सावंतवाडी, सातारा, अहमदनगर, भंडारा, सांगली, परभणी, नांदेड, उस्मानाबाद, अलिबाग, जळगाव, बीड, कल्याण, भुसावळ, लातूर, वाशिम, नंदुरबार,  जालना, गडचिरोली, सिंधुदूर्ग, जेजे समुह रुग्णालय कारागृह ही २९ जिल्हा कारागृहे आहेत. तसेच येरवडा, पैठण, औरंगाबाद, मोर्शी, येरवडा जिल्हा (महिला कारागृह), विसापूर जिल्हा, कोल्हापूर जिल्हा, नाशिकरोड जिल्हा, नागपूर जिल्हा, अमरावती जिल्हा, ठाणे जिल्हा ही अकरा खुले कारागृह आहेत. मुंबईत महिलांसाठी एक स्वतंत्र जिल्हा तुरुंग आहे. रत्नागिरीस एक विशेष कारागृह आहे. नाशिकला एक किशोर सुधारालय, तर आटपाडीला एक स्वतंत्रपूर खुली वसाहत आहे. तसेच १७२ उपतुरुंग आहेत. महाराष्ट्र कारागृह विभागाचे मुख्यालय पुण्यात असून राज्य प्रशिक्षण केंद्रही पुण्यात येरवडा येथे आहे. ही सर्व कारागृहे पश्‍चिम विभाग, पूर्व विभाग, दक्षिण विभाग व मध्य विभाग या चार विभागात प्रशासकीय सोयीसाठी विभागली आहेत. 
     राज्यभर अशाप्रकारे कारागृहांचा पसारा आहे. यात दक्षिण विभागात मोडणार्‍या अलिबाग येथील जिल्हा कारागृहाच्या वास्तूला विशेष इतिहास आहे. असे असले तरी या कारागृहाचा श्‍वास क्षमतेपेक्षा अधिक कैद्यांनी घुसमटू लागला आहे. मुळात रायगड जिल्ह्यातील आंग्रेकालिन व ब्रिटीशकालिन तुरुंगाचा इतिहास वेधक आहे. आंग्रे राजवटीत कुलाबा, उंदेरी व सागरगड किल्ल्यांत कैदी ठेवीत. कुलाबा किल्ल्यातील कैद्यांच्या कोठड्या इतर किल्ल्यांवरील कोठड्यापेक्षा थोड्या बर्‍या होत्या. उंदेरीच्या अंधार कोठड्या मात्र अगदीच ओंगळ व आरोग्यास अपायकारक होत्या. १८३६ मध्ये १५ कैद्यांना तेथे ठेवले होते. १८४० पर्यंत त्यातील फक्त दोनच कैदी जिवंत राहिले. जिल्ह्यात ब्रिटीश व्यवस्थापन सुरु झाल्यानंतर उंदेरीच्या कोठड्यांचा तुरुंग म्हणून वापर करण्याची प्रथा बंद करण्यात आली.
     जिल्ह्यात १८८२ मध्ये न्यायचौकशीधीन कैद्यांकरिता प्रत्येक उपविभाग मुख्यालयाच्या ठिकाणी असणार्‍या अटक कोठड्यांच्या व्यतिरिक्त अलिबाग व महाडला दोन दुय्यम कारागृहे होती. एक महिन्यापेक्षा जास्त शिक्षा झालेल्या कैद्यांना ठाणे कारागृहात पाठवण्यात येई. १८७६ पर्यंत जंजिरा संस्थानात कैद्यांसाठी मुरुड शहरात लहानशी जागा होती. त्याच वर्षी मुरुडला कारागृह बांधले. १८८२ मध्ये तेथे ४४ कैदी होते. त्याशिवाय बोर्ली मांडले, नांदगाव, मुरुड, म्हसळा, बोर्ली पंचतन व श्रीवर्धनला अटक कोठड्या होत्या. १९२२ मध्ये अलिबागला द्वितीय श्रेणी उपकारागृह व महाड, माणगाव, रोहा, पनवेल, नागोठणे, कर्जत, खालापूर, उरण व पेणला तृतीय श्रेणी उपकारागृहे होती. जंजिरा संस्थानसाठी मुरुडला मध्यवर्ती कारागृह होते. अलिबागच्या हिराकोट भुईकोट किल्ल्यात जिल्हा कारागृह आहे. सरखेल कान्होजी आंग्रे यांनी हा भुईकोट किल्ला १७२० मध्ये बांधला. १७४० मधे बाजीराव पेशवे यांचे पुत्र बाळाजी ऊर्ङ्ग नानासाहेब ससैन्य कोकणात उतरले होते. त्यांचा मुक्काम याच हिराकोटात होता. एके दिवशी बाजीराव पेशव्यांचा नर्मदेकाठी रावेरखेडी मृत्यू झाला आहे ही बातमी दूताकरवी हिराकोटातील नानासाहेबांना मिळाली आणि हिराकोटात जाताना पेशवापुत्र असणारे नानासाहेब हिराकोटातून बाहेर पडले ते पेशवा होण्यासाठीच. सरखेल कान्होजी आंग्रे यांनी बांधलेला हा हिराकोट किल्ला अशा अनेक ऐतिहासिक घटनांचा साक्षीदार आहे. पुरातत्त्व विभागाने अलीकडे त्याला संरक्षित वास्तू म्हणून जाहीर केले आहे.
     ३० डिसेंबर १८४३ साली कुलाबा संस्थान खालसा झाल्यानंतर या भुईकोटाचा तहसिलदाराच्या नियंत्रणाखाली येथे उपकारागृह म्हणून वापर केला जाऊ लागला. या भुईकोट किल्ल्याचे आतील क्षेत्र मोकळ्या जागेसह ३० गुंठे आहे.  स्वातंत्र्यानंतर १९५६ मध्ये या कारागृहाचा कार्यभार कारागृह विभागाकडे आला. १ जून १९६० पासून त्याला जिल्हा कारागृह वर्ग २ चा दर्जा मिळाला. जिल्हा कारागृहाशिवाय माणगाव, मुरुड, पनवेल, महाड, खालापूर, पेण आणि रोहा येथे उपकारागृहे आहेत. ही कारागृह जिल्हा कारागृह अधीक्षकाच्या नियंत्रणाखाली असतात. हिराकोट जिल्हा कारागृहात सहा महिन्यापर्यंत शिक्षा झालेले कैदी आणि न्यायचौकशीधीन गुन्हेगार ठेवतात. या कारागृहाची तेथील १० खोल्यांमध्ये ८० पुरुष आणि २ महिला कैदी ठेवण्याची क्षमता आहे. म्हणजे एकूण ८२ कैदी ठेवण्याची सोय आहे. पण क्षमतेचा तोल येथे कधीच सांभाळता आला नाही. राज्यातही वेगळी परिस्थिती नाही, पण रायगड जिल्हा कारागृहाची अवस्था फारच गंभीर आहे. या कारागृहात १९८४-८५ या वर्षात १०७ कैदी होते. त्यानंतर १५ वर्षांनी क्षमतेपेक्षा अधिक कैदी सामावून घेण्याच्या प्रक्रियेत काहीच फरक पडला नाही. मागील पाच वर्षांची आकडेवारी पाहिली तर याचे गांभीर्य लक्षात येते. २०१०-११ या वर्षात १४५, २०११-१२ या वर्षात १०५, २०१२-१३ या वर्षात १४६, २०१३-१४ या वर्षात १८७, २०१४-१५ या वर्षांत १६५, २०१५-१६ या वर्षात १७६ कैद्यांना कोंबण्याची प्रक्रिया सुरु राहिली. यात १३ महिला व १६३ पुरुष कैदी आहेत. ही बाब मानवाधिकाराशी निगडीत आहे. पण कैद्यांकडे सहानुभुतीने पाहिले जात नसल्यामुळे क्षमतेपेक्षा अधिक कैद्यांची बाब तितकी कोणाच्याच जिव्हाळ्याची राहिली नाही. पण त्याचे दुष्परिणाम या कारागृहात पहायला मिळाले आहेत. या कारागृहातील कैद्यांच्या समस्या वाढल्या आहेत, वाद वाढले आहेत. त्यावर उपाय म्हणून सीसीटीव्ही कॅमेर्‍याद्वारे कारागृहातील प्रत्येक कैद्याच्या हालचालीवर लक्ष ठेवले जाणार आहे. जिल्हा नियोजन मंडळाच्या माध्यमातून ४० सीसीटीव्ही कॅमेरे जिल्हा कारागृहाच्या कानाकोपर्‍यात बसविले जाणार आहेत. सीसीटीव्हीचे कल्पना चांगली असली तरी क्षमतेपेक्षा कैद्यांची समस्या ही महत्वाची आहे. त्यावर राज्य शासनाने, महाराष्ट्र कारागृह विभागाने वेळीच तोडगा काढला नाही तर त्यामुळे निर्माण होणार्‍या गंभीर दुष्परिणामांपासून तेथील सीसीटीव्ही आणि कोणतेही सुसंस्कार वाचवू शकत नाहीत.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा