-उमाजी म. केळुसकर ⬑ खारावारा ⬉
रायगड जिल्हा मराठी पत्रकार संघाचा आज ५६ वा वर्धापन दिन. या जिल्हा पत्रकार संघाने गेली ५५ वर्षे केलेल्या वाटचालीचे सिंहालोकन करणे यानिमित्त आवश्यक आहे. या दशकात काळानुरुप रायगड जिल्ह्यात नवनव्या पत्रकार सस्थांचा उदय झाला तरी येथील पत्रकारांची मातृसंस्था रायगड जिल्हा मराठी पत्रकार संघच आहे. दुर्दैवाची गोष्ट म्हणजे या दशकातच या जिल्हा पत्रकार संघाला मरगळ आली आहे. या पत्रकार संघाच्या माध्यमातून विशेष विधायक उपक्रम गेल्या काही वर्षांत राबविण्यात आलेले नाहीत, पत्रकारांच्या प्रश्नाविषयी आक्रमक लढे उभारले गेले नाहीत, सामाजिक उपक्रमांत नेतृत्व केले नाही. म्हणूनच या पत्रकार संघात नव्याने प्राण फुंकण्याची गरज निर्माण झाली आहे.
रायगड जिल्ह्यातील पहिली पत्रकार संघटना असलेल्या रायगड जिल्हा मराठी पत्रकार संघाच्या स्थापनेला साडेपाच दशके होत आहेत. एखादी संस्था साडेपाच दशके चालू असणे ही साधी बाब नाही. त्यामुळे रायगड जिल्हा मराठी पत्रकार संघाच्या आजच्या वर्धापन दिनाबद्दल करावे तितके कौतुक थोडे आहे. अशा परिस्थितीत या पत्रकार संघाच्या निर्मितीच्या इतिहासात घुसल्यास एका वेगळ्या तळमळीतून या संस्थेचा उदय झाल्याचे लक्षात येईल. रायगड जिल्ह्यात पत्रकारितेच्या क्षेत्रात सामाजिक स्थित्यंतर घडवून आणण्याच्या प्रक्रियेच्या काळात कुलाबा जिल्ह्यातील पत्रकारांची पहिली सभा १९ जुलै १९५९ रोजी पेण नगरपालिकेच्या सभागृहात झाली. ‘कुलाबा समाचार’चे संपादक विश्वनाथ मंडलीक हे या सभेच्या अध्यक्षस्थानी होते. त्यापूर्वी २४-३-५३ रोजी मुंबईत भरलेल्या मराठी पत्रकार परिषदेच्या अधिवेशनासाठी कुलाबा जिल्ह्यातील ‘कृषीवल’चे ना.ना. पाटील व ‘कुलाबा समाचार’चे विश्वनाथ मंडलीक हे प्रतिनिधी उपस्थित होते. मुंबईच्या मराठी पत्रकार परिषदेच्या अधिवेशनानंतर जिल्ह्यातील पत्रकारांनी आपल्या पत्रव्यवसायातील प्रश्नासंबधी चर्चा करण्यासाठी आवाहन करणारे एक पत्र ‘कुलाबा समाचार’ने आपल्या १७-६-५९ च्या अंकात प्रसिद्ध केले आणि या आवाहनाला प्रतिसाद देऊन कुलाबा जिल्ह्यातील पत्रकारांनी १९-७-५९ रोजी घेतलेल्या सभेत पत्रकार संघाची समारंभपूर्वक स्थापना करण्यात आली. या पत्रकार संघाचे पहिले अध्यक्ष विश्वनाथ मंडलीक यांनी १९५९ ते १९६५ आपले पद भूषविले. त्यानंतर दुसरे अध्यक्ष प्रभाकर ना. पाटील यांनी १९६५ ते १९६९, तीसरे अध्यक्ष हरीभाऊ वा. महाजन यांनी १९६९ ते १९७६, चौथ्या अध्यक्षा श्रीमती मीनाक्षी पाटील यांनी १९७६ ते १९९०, पाचवे अध्यक्ष माधवराव मंडलीक यांनी १९९० ते १९९६, सहावे अध्यक्ष नवीन ना. सोष्टे यांनी १९९६ ते २००२ अशी पत्रकार संघाची सूत्रे सांभाळली. सध्या सातव्या अध्यक्षा सौ. सुप्रिया ज. पाटील २००२ पासून आजतागायत रायगड जिल्हा मराठी पत्रकार संघाची सूत्रे सांभाळीत आहेत.
श्रीमती मीनाक्षी पाटील यांच्या कारकीर्दीत, प्रभाकर पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी अलिबागच्या समुद्र किनारी रायगड जिल्हा पत्रकार संघाची देखणी वास्तू उभी केली. आज ती पुनर्बांधणीच्या प्रतिक्षेत आहेत. विशेष म्हणजे या पत्रकार संघाच्या अध्यक्षा श्रीमती मीनाक्षी पाटील पुढे आमदार, राज्यमंत्री बनल्या. अशीही पार्श्वभूमी या पत्रकार संघास आहे. या रायगड जिल्ह्यास लोकचळवळीचा ज्वलंत इतिहास आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी केलेला महाड चवदार तळ्याचा संग्राम, चिरनेरचा जंगल सत्याग्रह, चरी, भेंडखळचा देशातील पहिला शेतकर्यांचा संप, जासईचे शेतकरी आंदोलन अशा अनेक एतिहासिक घटनांच्या पार्श्वभूमीवरुन प्रेरणा घेऊन काम करीत राहिलेल्या रायगड जिल्हा मराठी पत्रकार संघाने जनसामान्यांच्या भाकरीचा प्रश्न सोडविण्यापासून कोट्यवधी रुपयांचे परकीय चलन मिळवून देणार्या पर्यटन केंद्रांतील अडचणी सोडविण्याच्या कामी लक्ष घालण्यापर्यंत अविरत कार्य केले आणि यामुळेच रायगड जिल्हा मराठी पत्रकार संघ लोकप्रिय झाला. रायगड जिल्हा पत्रकार संघ ही विशिष्ट रितीने संघटित झालेली शक्ती ठरली. समाजाच्या हितसंबंधांचे रक्षण करण्यासाठी जिल्हा पत्रकार संघाने अनेक कृतीशिल कार्यक्रमांचे आयोजन करुन ते राबविण्यात यश मिळविले. मात्र पत्रकार संघाने कोठल्याही राजकीय सत्तेचा उपयोग करुन घेतला नाही. समाजात पिळल्या गेलेल्या घटकांना न्याय मिळवून देण्यासाठी जरुर ती ताकद आणि संधी मिळवून दिली. त्यामुळे रायगड जिल्हा पत्रकार संघाच्या चतुरस्त्र कामगिरीचे कौतुक करुन ‘महाराष्ट्रातील अन्य जिल्हा पत्रकार संघानी रायगड जिल्हा पत्रकार संघाच्या कार्याचा आदर्श समोर ठेवून कार्य करावे’ असे अ.भा. पत्रकार परिषदेने म्हटले.
रायगड जिल्हा मराठी पत्रकार संघाने समाजपयोगी कार्याचा आलेख एका वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवला आहे. रायगड जिल्हा पत्रकार संघाने माथेरानच्या पायथ्याशी असलेल्या ‘हाशाची पट्टी’ नामक आदिवासी वाडीतील साठ कुटुंबाची पाहणी करुन त्यांच्या पिण्याच्या पाण्याची आणि रस्त्याची अडचण सोडविण्यात पुढाकार घेतला होता. अलिबाग तालुक्यातील चंदरवाडी येथील आदिवासी कुटुंबातील सामुदायिक विवाह लावण्यात पुढाकार घेतला आणि पनवेल तालुक्यातील नेर्याच्या शांतिवनातील कुष्ठरुग्णांच्या वसाहतीत जाऊन मानवतेच्या दृष्टीने चाललेल्या तेथील कार्यात भाग घेऊन तेथील कार्यकर्त्यांच्या अडचणी समजावून घेतल्या. पत्रकार संघाचे आधारस्तंभ प्रभाकर पाटील यांनी कुष्ठरुग्णांच्या वसाहतीसाठी ध्वनिक्षेपक संच दिला हे विसरता येणार नाही. रायगड जिल्हा पत्रकार संघाचे आणखी एक वैशिष्ट्य जनसंपर्क सभांचे आयोजन. अन्यायग्रस्त लोकांच्या मागे ठामपणे उभे राहुन आणि त्यांची दु:खे आपली समजून ती निवारण्यात जिल्हा पत्रकार संघाने जनसंपर्क सभांच्या माध्यमातून कोणतीही कसूर केलीली नाही. पत्रकार संघाचा हा उपक्रम इतका लोकप्रिय झाला की, जिल्ह्यातील खेड्यापाड्यांतून डोंगर-कपारीतून पत्रकार संघाला आमंत्रित केले गेले. जिल्ह्यातील आदिवासी, दलित, पीडित आणि कामगार वर्गाची सरकार दरबारी वा मालक वर्गाकडून होणारी पिळवणूक असो किंवा समाजकंटकांकडून होणारी छळवणूक असो, या अन्यायाविरुद्ध पत्रकार संघाने कणखर भूमिका घेऊन अन्यायग्रस्तांना न्याय मिळवून देण्याची भूमिका बजावली आहे. रायगड जिल्हा पत्रकार संघाने कृतज्ञतेच्या भावनेने आपल्या कारकीर्दीत केलेला वयोवृद्ध पत्रकारांचा सत्कार, ज्याला दक्षिण काशी म्हणून ओळखले जाते त्या श्रीवर्धन तालुक्यातील हरिहरेश्वर येथे श्रीमंत रमाबाई पेशवे यांनी सुरु केलेला आणि त्यानंतर अनेक वर्षे बंद पडलेला सनईचौघडा सुरु करण्यात दाखविलेले औचित्य ही पत्रकार संघाने अनुसरलेली सामाजिक सेवेची वाट आहे.
वृत्तपत्र स्वातंत्र हिरावून घेणारे बिहार वृत्तपत्र विधेयक रद्द व्हावे म्हणून पत्रकार संघाच्या कार्यकर्त्यांनी भोगलेला कारावास अशा व्यापक कार्याने रायगड जिल्हा पत्रकार संघाने आपला प्रभाव पाडला. भाषिक हक्कासाठी न्याय मिळावा म्हणून महाराष्ट्र-कर्नाटक सीमा प्रश्नाच्या संदर्भात निघालेल्या अ.भा. मराठी पत्रकार परिषदेने काढलेल्या मोर्चात रायगड जिल्हा पत्रकार संघ अखेरपर्यंत आघाडीवर राहिला. प्लॅस्टिक सर्जरी शिबिर, रक्तदान शिबिर, पत्रकारांसाठी आरोग्य तपासणी शिबिर, वृत्तपत्र विद्या अभ्यासक्रम असे उपक्रम या पत्रकार संघाने राबविले आहेत. या कार्याच्या उत्साहाने पत्रकार संघ झिंगून गेला होता. फक्त एकच विचार, एकच भावना पत्रकार संघातील कार्यकर्त्यांमध्ये व्यापून राहिली होती. या वाटचालीत स्वत:च्या हितापेक्षा समाजहिताला पत्रकार संघाने सर्वस्वी महत्व दिले. पत्रकार संघाच्या विचारांचे ते मुख्य सूत्र असल्यामुळे दुर्बल, पीडित लोकांसाठी रायगड जिल्हा मराठी पत्रकार संघाच्या अलिबाग येथील रामनारायण पत्रकार भवनाची दारे सताड उघडी राहिली. पण आज जिल्हा पत्रकार संघ पत्रकार दिन आणि वर्धापन दिन करण्यापुरता उरला आहे की काय असे वाटण्याजोगी परिस्थिती निर्माण झाली आहे. या परिस्थितीला कारणे अनेक असली तरी या कारणांवर मात करुन या रायगड जिल्हा मराठी पत्रकार संघाला उर्जितावस्था आणणे गरजेचे आहे. पत्रकार संघाची वास्तू आणि कार्य पूर्वीच्याच दिमाखदारपणे उभे राहिले पाहिजे. इतकेच.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा