शनिवार, २ जुलै, २०१६

प्रगतीशील कृषिनिष्ठांचा जय हो!

-उमाजी म. केळुसकर ⬑ खारावारा ⬉


      हरित क्रांतीचे प्रणेते, महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री कै. वसंतराव नाईक यांची जयंती कृषिदिन म्हणून साजरी करण्यात येते. पूर्वी भाताचे कोठार समजल्या जाणार्‍या व आता औद्योगिक जिल्हा म्हणून ओळखल्या जाणार्‍या रायगड जिल्ह्यातही दरवर्षी कृषिदिन आयोजित केला जातो. औद्योगिकरणाने या जिल्ह्याचे शेतीक्षेत्र सातत्याने घटत चालले आहे. त्यामुळे शेतकरी राजालाही घरघर लागली आहे. अशा परिस्थितीत कृषिदिन साजरा केला जाणे हा मोठा विनोद आहे. कृषिक्षेत्राचे संरक्षण व संवर्धन जेव्हा केले जाईल, तेव्हाच कृषिदिनास अर्थ असेल. कृषि उत्सव साजरी करण्याजोगी आज परिस्थिती नाही. तथापि या प्रतिकूल परिस्थितीत रायगडचा शेतकरी आपल्या उरल्या सुरल्या शेतीत प्रयोग करुन उत्पादन घेतो आहे, या प्रगतीशील शेतर्‍यांचा रायगड जिल्हा परिषदेतर्फे कै. ना.ना. पाटील सभागृहात आज कृषिदिनाचे औचित्य साधून कृषिनिष्ठ पुरस्काराने गौरव करण्यात येणार आहे. खरोखरच शेतकर्‍यांना प्रेरणा देणारा हा उपक्रम आहे. या गौरव सोहळ्यामुळे दरवर्षी शेतकर्‍यांंना प्रेरणा मिळते आणि त्यांच्या हातून शेती क्षेत्रात भरीव कामगिरी केली जाते. असे असले तरी जिल्ह्यातील घटत्या शेतीक्षेत्राकडे गांभीर्याने पाहण्याची गरज निर्माण झाली आहे.
        मुळात शेती हा अतिशय नाजूक विषय आहे. तरुण वर्गाचा शेतीकडे पाहण्याचा दृष्टीकोन उदासीन आहे आणि केंद्र व राज्य सरकारांचा तीन दशकांतील दृष्टीकोन तर त्याहून उदासीन आणि शेतकर्‍यांना देशोधडीला लावणारा राहिला आहे. एकीकडे शेतकर्‍यांचा गौरव करायचा आणि दुसरीकडे त्याला आत्महत्या करायला प्रवृत्त करायचे, असा सरकारचा जो काही बाणा राहिला आहे, तोच शेतीक्षेत्राचे नुकसान करतो आहे. म्हणूनच सरकारने विरोधाभास वाटू नये, याची काळजी घेणे आवश्यक आहे. राजिप जिल्ह्यातील प्रगतशील शेतकर्‍यांचा कृषीनिष्ठ पुरस्कारांनी सत्कार करत आहे, पण इतिहास साक्षीला आहे की, या जिल्ह्यातील शेतकर्‍यांना आपल्या जमिनी वाचविण्यासाठी अथक संघर्ष करावा लागता आहे. सेझच्या आक्रमणात शेतकर्‍यांना घामाऐवजी रक्त सांडावे लागले आहे. भांडवलदारांचे दलाल म्हणूनच प्रत्येक सरकारने याप्रकरणी आपली भूमिका बजावली आणि बजावत आहे. त्यामुळे शासनाकडून जेव्हा जेव्हा शेतकर्‍यांंचा सत्कार होतो, तेव्हा तेव्हा हे मृगजळ आहे की काय असा संशय येतो.
       गेल्या तीन दशकांपासून जिल्ह्यात मोठ्याप्रमाणात कंपनीराज, शासनराज आणि राजकीय राज (मग तो कुठलाही पक्ष असो) चालले आहे. येथे गुंडाराज नाही, कारण त्यांची भूमिका कंपनीराज, शासनराज आणि राजकीय राज बजावत आहे. हा त्रिशूल शेकर्‍यांच्याच नाही तर, सर्वसामान्यांच्या छातीत घुसून विद्ध्वंस माजवतो आहे. शेतकर्‍यांच्या जमिनी त्यांच्याकडून कवडीमोलाचे, सक्तीने ताब्यात घ्यायच्या, भांडवलदारांना कंपन्यांसाठी त्या विकायच्या आणि भांडवलदारांनी तेथे कंपन्या न उभारता त्या जमिनी शंभरपट किंमतीत तिसर्‍याला विकायच्या किंवा कोणतीही कंपनी उभी न करता तशाच पडून ठेवायच्या हे चित्र रायगड जिल्ह्यात बर्‍याच ठिकाणी पहायला मिळत आले आहे.
        शेतकर्‍यांंच्या जमिनी घेऊन जेथे कारखानदारी उभी राहिली आहे, तेथील प्रकल्पग्रस्तांना अजूनही नोकर्‍यांंसाठी संघर्ष करावा लागतो आहे. जे कारखाने जिल्ह्यात विकासाच्या नावावर उभे आहेत, ते जल आणि वायूप्रदूषण करीत आहेत. येथील नद्यांतील मत्स्यजीव संपुष्टात आले आहेत आणि ङ्गळबागा रोगटल्या आहेत. याचा अर्थ शेतकरी आणि कोळीबांधवांचे मरणच ओढवले आहे. हजारो वर्षे शेतीनिष्ठ असलेल्या शेतकर्‍यांपुढे अशी परिस्थिती गेल्या तीन दशकात निर्माण करण्यात आली की, शेतकर्‍यांंच्या मनात चलबिचल सुरु झाली. तसेच शेतीला असलेला सन्मानही पद्धतशीरपणे संपुष्टात आणला गेला. शेती प्रथम, व्यापार मध्यम आणि नोकरी कनिष्ठ अशी जी समाज मांडणी होती, तिला पद्धतशीर नख लावण्यात आले आणि नोकरी प्रथम, व्यापार मध्यम आणि शेती कनिष्ठ अशी नवी मांडणी करण्यात आली आणि तेथेच शेती आणि शेतकरी संपला. विकासाच्या नावावर एकीकडे त्यांच्या जमिनी हडपायच्या आणि दुसरीकडे शेतकर्‍यांना शेतीत प्रयोग करण्यासाठी प्रोत्साहीत करायचे, हा जो दुटप्पी खेळ आपल्याकडे चालला आहे तो अतिशय घृणास्पद आणि संतापजनक आहे. शेतकर्‍यांंच्या जमिनी बकासूर असेच खात राहिले, तर शेतकर्‍यांचा सन्मान करण्यासाठी तरी शेतकरी शिल्लक राहणार आहेत का? सन्मानासाठी शेतकर्‍यांचे डमी उभे करण्याची वेळ आली नाही, म्हणजे मिळवली.
        माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांनी हरितक्रांतीचे स्वप्न पाहिले आणि सत्यात उतरविण्यासाठी त्यांनी अथक परिश्रम घेतले, पण दुर्दैवाने त्यांच्यानंतर सत्ता हरितक्रांतीचे स्वप्न सत्यात उतरविण्यासाठी राबविली गेली नाही, तर भांडवलदारांची स्वप्न साकार करण्यासाठी सत्ता राबविली जावू लागली. त्यामुळे प्रसंगी शेतकर्‍यांंना आंदोलने करावी लागतात, आपल्या न्याय मागण्यांसाठी रस्त्यावर उतरावे लागते, गोळीबाराला सामोरे जावे लागते. याचा अर्थ शेतकर्‍यांना कोणी वाली राहिला नाही असा होतो. शेतकर्‍यांंना पूर्वीसारखी प्रतिष्ठा आणि पत जोपर्यंत प्राप्त होत नाही, तोपर्यंत शेतकर्‍यांचे होणारे कौतुक अपुरेच असणार आहे. रायगड जिल्ह्यात आज शेतीक्षेत्र किती उरले आहे आणि शेती करण्याबाबतचा शेतकर्‍यांमधील उत्साह किती उरला आहे हा अभ्यासाचा विषय आहे. शेतकर्‍यांंची होणारी मुस्कटदाबी जर थांबली तर निश्‍चितच त्यांच्यात पुन्हा उत्साह संचारेल. पुन्हा  शेतकरीराजा, अन्नदाता म्हणून त्यांच्याकडे आदराने पाहिले गेले, तर पुन्हा शेतीला ते नवसंजीवनी देऊ शकतील. अशा वेळी त्यांच्या शेतीनिष्ठ पुरस्काराने झालेला गौरव त्यांच्यासाठी अविस्मरणीय असेल. असो. जिल्ह्यातील ज्या शेतकर्‍यांंचा कृषीनिष्ठ पुरस्कारांनी गौरव होत आहे, त्यांचे अभिनंदन आणि शुभेच्छा!


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा