-उमाजी म. केळुसकर ⬑ खारावारा ⬉
१९३० ते २०१६ ही कालखंडाची दोन टोकं आहेत आणि त्यांची तुलनाच होऊ शकणार नाही. कारण सोपं आहे. १९३० चा काळ पारतंत्र्याचा होता आणि २०१६ चा काळ स्वातंत्र्याचा आहे. १९४७ साली कालखंडाचे दोन तुकडे पडले. संघर्षाचा पूर्वार्ध संपला आणि नवनिर्माणाचा उत्तरार्ध सुरु झाला. या दोन कालखंडात रायगड जिल्ह्यातील अलिबाग तालुक्यात १९३० साली आणि २०१६ साली २२ ते २४ जून असे तीन दिवस राज्यस्तरीय शिक्षण परिषद आयोजित करण्यात आली. एका परिषदेला राष्ट्रीय नेते सरदार वल्लभभाई पटेल आणि दुसर्या परिषदेला राज्याचे विद्यमान शिक्षण मंत्री विनोद तावडे, राज्याचे वन व अर्थमंत्री सुधीर मुनगंंटीवार उपस्थित होते. एक परिषद रिसॉर्टमध्ये, तर एक विद्यालयात आयोजित करण्यात आली होती. दुर्दैवाची गोष्ट म्हणजे राज्याच्या शिक्षणाची चिंता व चिंतन करणार्या या मंत्र्यांना या विद्यालयाच्या वास्तूला गेल्या काही वर्षांपासून लागलेली घरघर पहायला जावेसे वाटले नाही.
१९३० सालच्या आणि २०१६ च्या शिक्षण परिषदेत फार फरक आहे. २०१६ ची राज्यस्तरीय शिक्षण परिषद चोंढी येथील फाऊंटन हेड रिसॉर्ट येथे आयोजित केली होती, तर १९३० सालची राज्यस्तरीय राष्ट्रीय शिक्षण परिषद सासवणे येथे आज जेथे शासकीय अध्यापक विद्यालय आहे, तेथे असलेल्या तत्कालिन गांधी विद्याश्रमात म्हणजेच वैश्य विद्याश्रमात आयोजित करण्यात आली होती. या विद्याश्रमातील विद्यार्थी आणि अध्यापक यांचे स्वातंत्र्यचळवळीत मोठे योगदान राहिले आहे. काळाचा महिमा अगाध आहे, त्यामुळे २०१६ ची शिक्षण परिषद अलिबाग तालुक्यात आयोजित करण्यात आली ती सर्व सुविधायुक्त रिसॉर्टमध्ये. पण स्वातंत्र्यपूर्व काळात जेथे राज्यस्तरीय शिक्षण परिषद आयोजित करण्यात आली होती, त्या सासवण्याच्या शासकीय अध्यापक विद्यालयाची माती कपाळी लावण्यासाठी राज्याचे शिक्षणमंत्री विनोद तावडे आणि राज्याचे वन व अर्थमंत्री सुधीर मुनगंंटीवार गेले असते तर निदान या विद्यालयाची झालेली दूरवस्था त्यांच्या लक्षात आली असती. महात्मा गांधी आणि सरदार वल्लभभाई पटेल यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या या विद्यालयाचे नूतनीकरण करुन येथेच जर ही शिक्षण परिषद आयोजित केली गेली असती तर विनोद तावडे यांचीही नोंद इतिहासाच्या पानावर सुवर्णाक्षरांनी झाली असती. पण तसे व्हायचे नव्हते. २०१५ साली विधानसभा अधिवेशनात अलिबाग-मुरुड विधानसभा मतदार संघाचे आमदार पंडितशेठ पाटील यांनी या शासकीय अध्यापक विद्यालयाच्या दूरवस्थेचा प्रश्न उपस्थित केला होता. तेव्हा शिक्षणमंत्री या नात्याने विनोद तावडे यांनी त्यांना उत्तर दिले होते. सध्या या विद्यालयात एकूण १७ विद्यार्थी शिक्षण घेत असून या शासकीय इमारतीच्या दुरुस्तीचे अंदाजपत्रक तयार करण्यात आले आहे. या शासकीय विद्यालयात कौशल्य विकास कार्यक्रमांतर्गत कोणता अभ्यासक्रम सुरु करता येईल याबाबतचा विचार सुरु आहे. तसेच इमारत दुरुस्तीचे काम तातडीने हाती घेण्यात येईल, असे त्यांनी सांगितले होते. पण वर्ष उलटून गेले तरी या विद्यालयाच्या दुरुस्तीचे काम झालेले नाही. विनोद तावडे अलिबाग-चोंढी येथे आले. चोंढीपासून काही किलोमीटरवर सासवणे आहे. त्या सासवणे येथील अध्यापक विद्यालयाच्या वास्तूत, त्यावेळच्या वैश्य विद्याश्रमात पारतंत्र्य असताना तेथे राष्ट्रीय पातळीवरील क्रांतिकारी नेते आले, पण स्वातंत्र्यात राज्यपातळीवरील शिक्षणमंत्री तेथे जाऊ शकले नाहीत, ही दुर्दैवाची बाब आहे.
स्वातंत्र्य चळवळीची पार्श्वभूमी असलेले हे विद्यालय मूळचे वैश्य विद्याश्रम होते. कोकणस्थ वैश्य समाज, मुंबई यांनी ते बांधले होते. पारतंत्र्याच्या काळात राष्ट्रीय वृत्ती बाणावी यासाठी विद्याश्रम काढावे, अशी कल्पना स्व. जगन्नाथ गणपतशेठ ढवण उर्फ आचार्य भाई ढवण यांना सुचली. कै. गणपत विठोबा तथा आण्णासाहेब मोरे (मूळचे वारंगी गावचे) यांनी १९१८ मध्ये विद्याश्रमासाठी पन्नास हजार रुपयांची देणगी दिली. कै. गजाननशेठ देवळेकर यांनी नाममात्र मोबदल्यात समुद्र किनार्यावरील दोन एकर वाडी दिली. लगेच कामचलावू इमारत बांधून १० मे १९२१ रोजी अक्षय तृतीयेच्या सुमुहूर्तावर समारंभपूर्वक या विद्याश्रमाच्या कामकाजाला सुरुवात झाली. पहिल्या वर्षी २९ विद्यार्थी होते, तर दुसर्या वर्षी ती संख्या १०२ पर्यंत गेली. या आश्रमात प्राथमिक दुय्यम म्हणजे मॅट्रिकपर्यंत शिक्षण दिले जात होते. राष्ट्रीय शिक्षण देण्याच्या उद्देशाने हा आश्रम सुरु झाला. यात मातृभाषा, राष्ट्रभाषा, संस्कृत, सूतकताई, विणकाम, खादी ग्रामोद्योग, संगीत आणि खेळ व व्यायाम असे विविध विषय शिकविले जात.
आचार्य भाई ढवण या विद्याश्रमाचे मुख्याधिकारी होते. तर डॉ. रा.सी. तथा भाऊ कापडी, डॉ. सी.प्र. तथा दादा मलुष्टे, तात्या लुमण, शंकर लक्ष्मण बंधू, धोंडो सार्दळ, आप्पासाहेब, तुळपुळे, आबासाहेब शेट्ये, नाना काणे, तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी यांचे बंधू चिंतामणशास्त्री जोशी अशी दिग्गज अध्यापक मंडळी या वैश्य विद्याश्रमाला लाभली. तपस्वी रामजी लक्ष्मण घरत यांचेही या आश्रमास सतत सहकार्य राहिले.
१९२७ साली महात्मा गांधी, त्यांच्या पत्नी कस्तुरबा व त्यांचे चिटणीस महादेवभाई देसाई यांचे या आश्रमात काही दिवस वास्तव्य होते. महात्मा गांधीचे वास्तव्य या वास्तूत होते म्हणून पुढे या वास्तूचे नाव महात्मा गांधी विद्याश्रम असे ठेवण्यात आले. १९३० साली सरदार वल्लभभाई पटेल यांच्या अध्यक्षतेखाली आश्रमाचा दहावा वार्षिक समारंभ मोठ्या थाटात साजरा झाला. त्याचवेळी महाराष्ट्र राष्ट्रीय शिक्षण परिषदेचे आठवे अधिवेशन येथे भरले. या शिक्षण परिषदेसही सरदार वल्लभभाई पटेल यांचे मार्गदर्शन लाभले. या राष्ट्रीय शिक्षणाच्या संस्काराने या विद्याश्रमातील विद्यार्थी स्वातंत्र्य चळवळीकडे ओढले गेले. या विद्यार्थ्यांच्या तुकड्या मीठाच्या सत्याग्रहासाठी दांडी येथे पाठवण्यात आल्या. हे त्यावेळच्या इंग्रज सरकारच्या लक्षात आल्यामुळे या वैश्य विद्याश्रमावर बंदी आणली गेली. त्यामुळे ही संस्था १९३१ साली बंद पडली.
कोकणस्थ वैश्य समाज, मुंबई यांनी ३० जानेवारी १९४९ रोजी वैश्य विद्याश्रम तथा गांधी विद्याश्रमात कोणतीही शैक्षणिक संस्था चालवण्याच्या अटीवर इमारतीसह सरकारच्या ताब्यात दिली. त्याच वर्षी या अध्यापक विद्यालयाची स्थापना करण्यात आली. इमारतीचे बांधकाम करुन शासकीय अध्यापक विद्यालय सुरु झाले. ही या सर्व पार्श्वभूमी पाहता या शासकीय अध्यापक विद्यालयाला किती उज्ज्वल वारसा आहे, हे लक्षात येते. पण या वारशाचं राज्याच्या शिक्षण विभागाला, सरकारला काही वाटत नाही. म्हणूनच या वारशाची गेली अनेक वर्षे पडझड सुरु आहे. समुद्राच्या खार्या वार्यांचा प्रहार झेलत असलेल्या या इमारती ८५ व ६६ वर्षांपूर्वी बांधल्या गेल्या आहेत. साडे आठ व साडे सहा दशकांमध्ये साहजिकच त्या जीर्ण झाल्या आहेत. योग्य देखभाल होत नसल्याने त्यांची पडझड झाली आहे. वास्तविक या अध्यापक विद्यालयाची देखरेख, देखभाल व दुरुस्तीचे काम सार्वजनिक बांधकाम विभागाकडे आहे. पण बांधकाम विभाग निधी नसल्याचे सांगून काहीही करत नाही.
विद्यार्थी अध्यापक शिक्षण घेत असलेली इमारत, कर्मचारी निवासस्थान, प्रवेशद्वारासह संरक्षक भिंत सगळंच पडझडीच्या भक्ष्यस्थानी पडले आहे. अध्यापक विद्यार्थी व विद्यार्थिनींसाठी असलेले वसतिगृह पूर्णपणे मोडकळीस आल्यामुळे चार वर्षापूर्वीच बंद करण्यात आले. विद्यालयाच्या आवारात सगळीकडे पडलेला पालापाचोळा, ठिकठिकाणी इमारतीला लावलेले लाकडाचे टेकू, तुटलेल्या खिडक्या, निघालेली वायरिंग, मोडकळीस आलेली विहीर ही सर्व हॉरर चित्रपटात आढळणारा मालमसाला या आध्यापक विद्यालयात दिसून येतो. या सर्व विदारक परिस्थितीच्या बाबत जिल्हा प्रशासन डोळे झाक करीत आहे, म्हणून दोन वर्षांपूर्वी येथील विद्यार्थ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला होता. लोकशाही दिनात दाद मागण्याचा प्रयत्नही करण्यात आला होता. पण त्याचाही काही उपयोग झाला नाही. यामागे पद्धतशीर षडयंत्र तर नाही ना? कोकणस्थ वैश्य समाज, मुंबई यांनी केवळ या वास्तूत शिक्षणाचे कार्य चालावे म्हणून ही वास्तू राज्य सरकारला दिली आहे. पण समुद्र किनारी असलेल्या जागेवर दुसरे काही उद्योग उभे करण्याचेही काही दिग्गजांचे प्रयत्न आहेत. त्यामुळे या वास्तूकडे दुर्लक्ष करुन ही वास्तू उद्ध्वस्त करण्याचा बेत तर नाही ना? तीच शंका प्रबळ ठरते.
ज्या विद्यालयात पूर्वी १०० ते १२० विद्यार्थी अध्यापक शिकत असत तिथे आज जेमतेम १५-२० विद्यार्थी अध्यापक शिकत आहेत. विद्यार्थी अध्यापकांची घटत असलेेली पटसंख्या निश्चितच चिंतेची बाब आहे. सोनेरी इतिहासाचा वारसा असलेले हे अध्यापक विद्यालय बंद होण्याची वाट पहाण्यापेक्षा येथील सर्व इमारती नव्याने बांधून या विद्यालयाचे पुनरुज्जीवन राज्य सरकारने करणे आवश्यक आहे. गेल्या आघाडी सरकारने या विद्यालयासाठी निधी दिला नाही, विद्यमान बिघाडी सरकारही या विद्यालयाबाबत उदासिन आहे. जवळ आले असूनही राज्याचे शिक्षणमंत्री व राज्याचे वन व अर्थमंत्रीही या अध्यापक विद्यालयाकडे फिरकले नाहीत. त्यांना तशी गरज वाटली नाही. त्यांना जे गरजेचे वाटते तेथे ते जातात, त्याला कोणाचीही हरकत असण्याचे कारण नाही. पण सासवण्याचे अध्यापक विद्यालय इतके विनागरजेचे, दुर्लक्ष करण्याजोगे नाही, हेही या मंत्र्यांनी लक्षात घेतले पाहिजे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा