-उमाजी म. केळुसकर ⬑ खारावारा ⬉
आपल्या येथे खेळांडूंनी आलिम्पिकमध्ये झेप घेण्याची अपेक्षा सातत्याने व्यक्त होत आल्या आहेत, पण या खेळाडूंना क्रीडायोग्य वातावरण आणि सुविधा पुरविण्याची मानसिकता मात्र दाखविली जात नाही. या अभावग्रस्त परिस्थितही आपल्याकडे चांगले खेळाडू तयार झाले. पण आंतरराष्ट्रीय पातळीवरील खेळाचा विचार करताना खेळाडूंना चांगली क्रींडागणे आणि चांगले प्रशिक्षक मिळणे गरजेचे आहे. पण आपल्या खेळाडूंना या सुविधा मिळत नाहीत आणि मिळाल्याच तर त्या उशिराच मिळतात. महाराष्ट्र शासनाने २००१ साली क्रीडा धोरण जाहीर केले. याला १५ वर्ष उलटून गेल्यावर अखेर अलिबाग तालुक्यातील नेहुली येथील जिल्हा क्रीडा संकुल १ जून २०१६ पासून खुले करण्यात आले आहे. पण त्याही अगोदर १५ वर्षे या क्रीडा संकुलाचे भिजत घोंगडे पडले होते. म्हणजे तीस वर्षांनी रायगडकरांना हे क्रीडा संकुल लाभले आहे.
रायगड जिल्ह्यात १९८५ ते २०१६ हा कालखंड तीस वर्षांचा. म्हणजे १०८५ साली ३० वर्षांचे युवक आज ६० वर्षांचे ज्येष्ठ नागरिक झालेत आणि २० वर्षांचे युवक ५० वर्षांचे मध्यमवयीन बनलेत, १० वर्षांचे कुमार आज ४० वर्षांचे प्रौढ बनलेत. या सगळ्यांच्या हातातून एक स्वप्न कालचक्रातील वाळूप्रमाणे सटकलेय. होय, आपण जिल्हा क्रीडा संकुलाचा फायदा घेऊन आपल्यातील क्रीडानैपुण्य विकसीत करु हे, त्यांचे स्वप्न. हे स्वप्न काही अशक्य कोटीतील नव्हतं, पण शासकीय मानसिकतेचा घोडा नेहमी लंगडा असल्यामुळे त्यांच्या स्वप्नांचं वैराण वाळवंट झालं. हे स्पप्न तरी त्यांनी का पाहिलं, तर अलिबाग तालुक्यातील नेहुली येथे क्रीडा संकुलासाठी १९८५ साली संपादित करण्यात आलेल्या १० एकर जागेवर संरक्षक भिंत बांधण्यात आली. त्यामुळे आता लवकरात लवकर क्रीडा संकुल उभे राहील हा त्यांचा आशावाद निव्वळ भाबडा ठरला. या संरक्षक भितीच्या वेढ्यातच त्यांच स्वप्न कैद पडलं.
स्वप्न अद्ययावत क्रीडा संकुलाचं होतं. प्रशासन मुर्दाड होतं, पण या प्रतिकूल परिस्थितीतही जिल्ह्याचं क्रीडाक्षेत्र चमकत होतं. राज्य आणि राष्ट्रीय पातळीवर वाजत-गाजत होतं. कारण सोयी-सुविधांच्या अभावांचा एव्हरेस्ट सर करणारे आमचे जिद्दी खेळाडू. मग ते कबड्डीपटू असोत, क्रिकेटपटू असोत, सायकलिंगपटू आसोत, जलतरणपटू असोत, की तलवारबाज असोत, प्रत्येक क्रीडा प्रकारात रायगडचा खेळाडू जिल्ह्याचे, महाराष्ट्राचे नाव मोठे करीत राहिला आहे. परंतु जिल्हा प्रशासन आणि महाराष्ट्र शासन ढिम्म होते. रायगडच्या खेळांडूंच्या सोयी-सुविधांच्या अभावाशी त्यांचं काही सोयरसुतक नव्हतं.
२००१ साली जिल्हा तेथे क्रीडा संकुल हे महाराष्ट्र शासनाचे क्रीडा धोरण ठरले. राज्यातील ग्रामीण भागांतून दर्जेदार खेळाडू निर्माण व्हावे असा त्यामागे उद्देश होता. या धोरणानुसार राज्यातील सर्व तालुकास्तरावर आणि जिल्हा स्तरावर मोठ्या क्रीडा संकुलाची उभारणी केली जाणार होती. त्यामुळे रायगड जिल्हा क्रीडा संकुलाच्या स्वप्नाने पुन्हा उचल खाल्ली. गंमत म्हणजे १९८५ ते २००३ पर्यंत क्रीडा संकुलाच्या उभारणीसाठी तब्बल तीन वेळा भूमिपूजनाचे कार्यक्रम करण्यात आले. प्रत्येक वेळेला वर्षभरात संकुलाचे काम पूर्ण केले जाईल, अशी आश्वासने देण्यात आली. मात्र काम काही पूर्ण झाले नाही. २००३ साली राज्यशासनाने रायगड जिल्हा क्रीडा संकुलासाठी ४ कोटी रुपयांचा निधी मजूर केला. ४०० मीटर धावण्याचा ट्रॅक, इंडोअर क्रीडाप्रकारांसाठी हॉल, विविध खेळांची मैदाने, तरणतलाव, व्यायामशाळा, प्रेक्षकगॅलरी असं या जिल्हा क्रीडा संकुलाचं सुंदर चित्र होतं. हे चित्र कुशल चित्रकाराप्रमाणे प्रशासनाने चितारायचं होतं. दोन टप्प्यात हा हा म्हणता क्रीडा संकुलातील आतील-बाहेरील सर्व सुविधा तयार करायच्या होत्या. पहिल्या टप्प्याचे काम २००५ साली सुरु झाले आणि २००९ साली ते पूर्ण झाले. बहुउद्देशीय इनडोअर क्रीडा संकुल, व्यायामशाळा, प्रेक्षागृह आणि जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय आणि खेळाडूंच्या राहण्यासाठी वसतिगृह व्यवस्था ही पहिल्या टप्प्यातील कामे पूर्ण झाली आणि घोडं गंगेत न्हाले या पद्धतीने तत्कालिन पालकमंत्री सुनील तटकरे यांच्या हस्ते १५ ऑगस्ट २००९ मध्ये सदर इमारतीचे लोकार्पण झाले. आता त्याचा आपण वापर करु असे खेळाडूंना वाटायला लागले पण पाणी आणि वीज पुरवठा व इतर काही मूलभूत सुविधांच्या तेथे उभ्याच केल्या गेल्या नसल्यामुळे खेळाडूंना त्याचा फायदा घेता आला नाही. म्हणजे घास तोंडापर्यंत न्यावा आणि हाताला लकवा व्हावा, असं झालं.
मुंगीच्या गतीने होत असलेल्या या कामामुळे या क्रीडा संकुलाच्या उभारणीचा खर्च वाढला. त्यामुळेही काही काळ पुढील टप्पा सुरु होण्यापूर्वीच ठप्प पडला. अपुर्या निधीची राज्य सरकारला जाणीव झाली आणि या क्रीडा संकुलासाठी आणखी चार कोटी ७८ लाख रुपये मंजूर केले. म्हणजे या दोन टप्प्यातील क्रीडा संकुलाचा एकूण खर्च ८ कोटी ७८ लाख रुपये झाला. पहिल्या आणि दुसर्या टप्प्याचे काम न रेंगाळता, मुंगीच्या गतीने झाले नसते तर जास्तीत जास्त ५ कोटी रुपये रुपये खर्च आला असता. काळाचा आलेख वाढला की खर्चाचा आलेख वाढणारच, त्यात नवल नाही. नवल ही बाब न कळण्याच्या वृत्तीची आहे. प्रशासनाच्या उदासिनतेची आहे.
निधी उपलब्ध झाल्यानंतर दुसर्या टप्प्याला मूहुर्त भेटला. २०११ पासून दुसर्या टप्प्याचे काम सुरु झाले. या दुसर्या टप्प्यात ङ्गुटबॉल मैदान, ४०० मीटर धावण्याचा ट्रॅक, कबड्डी व खो-खो मदान, लॉन टेनिस कोर्ट, बास्केटबॉल कोर्ट, तरणतलाव, क्रिकेटची खेळपट्टी यांचेही धिम्या गतीने काम सुरु झाले. २०१४ अखेरपर्यंत यातील काही मैदानांची आणि तरण तलावांची कामे पूर्ण झाली. पण इमारतींची रंगरंगोटी, विद्युतीकरण, पाणीपुरवठा आदी कामे काही झालीच नाहीत. त्यामुळे हे क्रीडा संकुल वापराविनाच राहिले. परिणामी तेथे गवत-झुडपांचे रान माजले, याचा फायदा मद्यपीने आणि प्रेमी युगुलांनी उठवला. त्यांच्या साधनेसाठी ते स्थळ उत्तम ठरलं, पण ज्या खेळाडूंच्या साधनेसाठी ही वास्तू आसूसलेली राहिली, त्या खेळाडूंसाठी हे क्रीडा संकुल खुले करण्यात आले नाही. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या क्रीडा संकुलाचे ७ जून २०१५ ला उद्घाटन केल्यानतर खेळाडूंसाठी ते ताबतोब खुले व्हायला पाहिजे होते, पण त्यासाठी २०१६ चा जून महिनाच उजडावा लागला. हा सर्व उशीर तत्कालिन जिल्हा क्रीडा अधिकार्याच्या अकार्यक्षमतेमुळे लागला हे उघड आहे. नवे जिल्हा क्रीडा अधिकारी महादेव कसगावडे आणि रायगडच्या जिल्हाधिकारी शीतल तेली-उगले यांनी याबाबत ठोस पावले उचलली, त्यामुळे उशिरा का होईना या क्रीडा संकुल खेळांडूंसाठी खुले झाले आहे. यापूर्वीच्या जिल्हा क्रीडा अधिकार्यांनी ‘रिकाम’पणाचेच खेळ केले आणि यापूर्वीच्या माजी जिल्हाधिकार्यांनी याच क्रीडा संकुलातून विधानसभा-लोकसभा निवडणुकीच्या मतमोजणीचे महाकार्य केले. पण तरीही ‘भांगे’त तुळस उगवलीच नाही. ज्यासाठी हे क्रीडासंकुल बांधण्यात आले आहे, त्याकडे क्रीडा संकुल समितीचे तत्कालिन अध्यक्ष म्हणून खर्याअर्थाने त्यांनी लक्ष पुरवले नाही. रायगडच्या क्रीडा संकुलाचा प्रश्न विधानसभेत, विधानपरिषदेतही गाजला होता. आता जिल्हा क्रीडा कार्यालय या संकुलात हलवले गेले असल्यामुळे व रायगडच्या विद्यमान जिल्हाधिकारी व क्रीडा संकुल समितीच्या अध्यक्षा शीतल तेली-उगले यांनी हे क्रीडा संकुल सर्वांना खुले केले असल्यामुळे या सर्व व्यवस्थेला वेग येईल, असे मानायला हरकत नाही. या क्रीडा संकुलाची निगा, देखभाल यासाठीही निधी लागणार आहे. त्याची पूर्तताही वेळोवेळी होणे आवश्यक आहे. चांगले खेळाडू तयार करण्यासाठी जिल्हा क्रीडा विभागाने आणि जिल्हा प्रशासनाने, शासनाने कायम खिलाडूवृत्ती दाखवली पाहिजे. तसे झाले तरच या जिल्हा क्रीडा संकुलाला अर्थ असणार आहे. जिल्हा क्रीडा संकुल झाले, पण तालुका क्रीडा संकुलांचा प्रश्न तसाच आहे. तो प्रश्न सुटण्यासाठी आणखी किती सरकारे यावी, जावी लागतील हाही एक प्रश्नच आहे.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा