सोमवार, ६ जून, २०१६

..चला, किल्ले रायगडाची धूळ कपाळी लावू या!

  -उमाजी म. केळुसकर ⬑ दादागिरी ⬉
   


      आज महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस किल्ले रायगडावर शिवराज्याभिषेक सोहळ्यासाठी उपस्थित आहेत. रायगडावर ही त्यांची तीसरी वारी आहे. शनिवार, ४ एप्रिल २०१५ रोजी ३३५ व्या शिवपुण्यतिथी उत्सवास मुख्यमंत्री रायगडावर आले होते. त्यानंतर २१ जानेवारी २०१६ ला रायगड महोत्सवाचे उद्घाटन मुख्यमंत्र्यांच्या हस्ते झाले. आता आज ६ जून रोजी अखिल भारतीय शिवराज्याभिषेक महोत्सव समितीच्या वतीने किल्ले रायगड येथे आयोजित करण्यात आलेल्या ३४३ वा शिवराज्याभिषेक सोहळ्यास मुख्यमंत्री उपस्थित असल्यामुळे रायगडच्या संवर्धनाबाबत त्यांच्याकडून खूप अपेक्षा आहेत. या शिवराज्याभिषेकानिमित्ताने किल्ले रायगडाची धूळ आपल्या कपाळी लावायची एक संधी आपल्याला उपलब्ध झाली आहे. या सोहळ्यानिमित्त हा विशेष लेख.
    किल्ले रायगड म्हणजे उभ्या महाराष्ट्राचा मानबिंदू व रायगड जिल्ह्याचा ‘शान’बिंदू. ६ जून १६७४ (मराठी तिथीनुसार ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशी शके १५९६) रोजी एक स्वप्न या गडावर साकार झाले होते. हे स्वप्न होते सोनेरी, तेजस्वी, गगनचुंबी. ‘प्रतिपच्चंद्ररेखेव वर्धिष्णुविश्‍ववंदिता’ अशी राजमुद्रा जन्माला आली. पोरक्या मराठियांना आधार देण्यासाठी, जागविण्यासाठी एक आत्मविश्‍वासाने ओतप्रोत भरलेले, प्रसन्न, धिरोदात्त, घोंघावते, अनावर व्यक्तिमत्व उभे राहिले, राजाची वस्त्रे घेऊन. ‘राजा प्रकृतिरंजनात्’ या प्रकारात बसणारा हा राजा नव्हता. कारण परकीयांच्या जुलूमशाहीने गांजलेल्या रयतेस रंजनाचे भाग्य कोठून असणार? शिवाय केवळ रंजकाचे तरी तिथे काय काम होते? तिथे गरज होती मुडद्यांत प्राण ओतणारांची आणि झपाटल्या मनाने झंझावाताला टक्कर देणाराची. असे हे शिवराय आज राजे झाले होते. शिवराय छत्रपती बनले होते. अधिकृतपणे. सार्‍यांची ह्रदये भरुन आली होती. त्यात कौतुक होते. विस्मय होता, कृतज्ञता होती, कृतकृत्यता होती. अवघ्या मराठियांच्या ह्रदयसिंहासनावर आधीच आरुढ झालेल्या या नेत्याला राजसिंहासनावर आरुढ झालेलं पाहून सार्‍यांच्या नजरेचे पारणे फिटले. रायगडाचे मन उंचबळून आले. राज्याभिषेकाचा तो अभूतपूर्व सोहळा रायगडाने तर आपल्या अंत:करणात नोंदवून ठेवलाय... नव्हे गोंदवून ठेवलाय.
    तो सोहळा... जेव्हा गडावर राज्यलक्ष्मी भरल्या घरातल्या गृहिणीप्रमाणे नांदत होती.  रायगड चारी अंगांनी राजतेजाने बहरला होता. या सोहळ्याचे छायाचित्र इतिहासाच्या कॅमेर्‍याने टिपून ठेवले आहे. पण आपण असे करंटे की महाराजांच्या निर्वाणानंतर पाच दहा वर्षांतच रायगडच्या वाट्याला आलेले नष्टचर्य अजूनहू खर्‍या अर्थाने संपलेले नाही, ही कटू वस्तूस्थिती आहे. वास्तविक रायगडाचे दर्शन घेण्यासाठी भारताच्या तीन पंतप्रधानांनी हजेरी लावली आहे. भारताचे तत्कालिन राष्ट्रपती ग्यानी झैलसिंग, तत्कालिन पंतप्रधान इंदिरा गांधी, अटल बिहारी वाजपेयी, चंद्रशेखर आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रायगडाची धूळ आपल्या कपाळाला लावली आहे. नरेंद्र मोदी हे गुजरातचे मुख्यमंत्री असताना पंतप्रधान होण्यापूर्वीही मानाचा मुजरा करण्यासाठी रायगडावर आले होते. काही अपवाद सोडल्यास महाराष्ट्राचे विद्यमान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह सगळ्याच मुख्यमंत्र्यांना शिवसमाधीसमोर नतमस्तक व्हावे लागले आहे. पंतप्रधानांनी, मुख्यमंत्र्यांनी किल्ले रायगडच्या विकासाच्या दृष्टीने बर्‍याच घोषणा केल्या, निधीची उपलब्धता केली. राज्यशासनाने अगदी रायगड महोत्सवही आयोजित केला होता. परंतु अजूनही रायगडचे दैन्य संपलेले नाही. पुरातत्व खात्याच्या अजगराने गिळलेल्या किल्ले रायगडला पूर्वीचे गतवैभव मिळवून द्यायचे असेल तर या अजगराचं पोट फाडावं लागणार आहे. त्याकडे दुर्लक्ष करुन चालणार नाही. 
     छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाला ६ जून १९७४ रोजी ३०० वर्षे पूर्ण झाली. यावेळी रायगडावरील सिंहासनाच्या चौथर्‍यावर शिवछत्रपतींचा सिंहासनारुढ पुतळा बसवण्यात येणार होता, परंतु तसा पुतळा रायगडावर कुठेही बसवता येणार नाही असा फतवा पुरातत्व खात्याने काढला होता. केंद्र शासनाचा त्यासाठी वरदहस्त होता. अखेर केंद्र शासनाने मोकळ्या मैदानावर सिंहासनारुढ पुतळा बसवण्यास परवानगी दिली. त्यामुळे तो पुतळा ६ जून १९७४ रोजी शिवराज्याभिषेक त्रिशताब्दी महोत्सवात होळीच्या माळावर बसवला. शिल्पकार सहस्त्रबुद्धे यांनी तो सिंहासनारुढ शिवपुतळा घडवला आहे. महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण, महाराष्ट्राचे तत्कालीन मुख्यमंत्री वसंतराव नाईक, तत्कालिन बांधकाम मंत्री व नंतर महाराष्ट्राला लाभलेले मुख्यमंत्री बॅ. ए.आर. अंतुले यांच्या उपस्थितीत हा शिवराज्याभिषेक त्रिशताब्दी महोत्सव शासनाने साजरा केला. या त्रिशताब्दी सोहळ्यास तत्कालिन कुलाबा (रायगड) जिल्हा परिषदेची भूमिका महत्वाची राहिली आहे.  त्यानंतर ३१ मार्च १९८० रोजी छत्रपती शिवाजी महाराजांच्या ३०० व्या पुण्यतिथी समारंभास भारताच्या पंतप्रधान इंदिरा गांधी रायगडावर आल्या होत्या. तेव्हा त्यानी सिंहासनाच्या जागेवर मेघडंबरी उभारण्याची सुचना दिली. त्या सुचनेस अनुसरुन मेघडंबरी उभारण्यात आली व १९ एप्रिल १९८५ रोजी किल्ले रायगडी भारताचे राष्ट्रपती ग्यानी झैलसिंग यांच्या हस्त मेघडंबरीचे अनावरण करण्यात आले होते.
     १७७४ साली रायगडच्या राजसिंहासनाला शंभर वर्षे पूर्ण झाली. पण त्यावेळी रायगडचे राजकीय महत्व व स्वरुप जवळजवळ नष्टप्राय झालेले होते. १८७४ साली शिवराज्याभिषेकाला दोनशे वर्षे पूर्ण झाली, पण या पवित्र स्मृतीची काहीतरी नोंद घेतली जावी, अशी अपेक्षा करणेच त्या काळात मूर्खपणाची होती, कारण देश इंग्रजांच्या गुलामीत होता. १९७४ रोजी शिवराज्याभिषेकास ३०० वर्षे पूर्ण झाली. ४०० व्या राज्याभिषेकाला अजून ५८ वर्षे बाकी आहेत. २०७४ ला शिवराज्याभिषेकाला चारशे वर्षे पूर्ण होतील. पण तो दिवस आजच्या पिढीला खुद्द रायगडावर अनुभवता येणार नाही, कारण एकतर ही पिढी संपलेली तरी असेल किंवा थकलेली तरी असेल. सुदैवाने गेली अनेक वर्षे रायगडावर शिवराज्याभिषेक सोहळा आयोजित केला जातो, त्यामुळे आजच्या पिढीला निदान या शिवराज्याभिषेक सोहळ्याच्या आनंदात सामिल होण्याचे नशीब लाभले आहे, हे काही थोडे नव्हे. 
     २३ वर्षांपूर्वी शिवराज्याभिषेक सेवा समिती आणि महाडच्या कोकण कडा मित्रमंडळाने शिवराज्याभिषेक उत्सव रायगडावर दरवर्षी साजरा केला जावा यासाठी पुढाकार घेतला आणि याच पुढाकारातून गेली दोन दशके तिथीनुसार ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशीला रायगडावर शिवराज्याभिषेक उत्सव साजरा केला जात आहे. त्याबद्दल त्यांचे अभिनंदन करायला हवे. तथापि, पाच वर्षांपूर्वी कोल्हापूर संस्थानचे संभाजीराजे जेव्हा या सोहळ्यासाठी रायगडावर आले होते. या उत्सवाला लोकोत्सवाचे स्वरूप प्राप्त व्हावे म्हणून त्यांनी पुढाकार घेतला. आणि उत्सवात पावसाचा व्यत्यय टाळण्यासाठी त्यांनी हा उत्सव तारखेनुसार साजरा करण्याची घोषणा केली. अखिल भारतीय शिवराज्याभिषेक समिती स्थापन केली. छत्रपतींच्या या भूमिकेनंतर शिवराज्याभिषेक समितीत दोन गट पडले. तेव्हापासून शिवराज्याभिषेक सोहळा दोनदा साजरा होऊ लागला आहे. तारखेनुसार आणि तिथीनुसार शिवराज्याभिषेक उत्सव होतो, यापेक्षा आपल्या राजाचा राज्याभिषेक सोहळा होत आहे, या भावनेने दोन्ही वेळच्या सोहळ्यासाठी शिवभक्त हजारोंच्या संख्येने उपस्थित राहतात. आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस रायगडवर तिसर्‍यांदा हजेरी लावत आहेत. त्यांनी किल्ले रायगडचे आणि रायगड जिल्ह्याचे प्रश्‍न लक्षात घेऊन ते सोडविण्यावर भर दिला तर त्यांच्या शिवनिष्ठेला अधिक झळाळी येईल. आजच्या सोहळ्यात रायगडावर लाखो शिवभक्तांचाही भगवा पूर लोटला आहे. या पुराला महाराष्ट्राचा पुरोगामी विचार सशक्त करण्याची बुद्धी लाभो. इतकेच. 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा