सोमवार, ४ मार्च, २०१९

शौर्याचे भव्यदिव्य प्रतिक असलेले राष्ट्रीय युद्ध स्मारक

उमाजी म. केळुसकर ⬑ विश्वभरारी ⬉
      

     भारतातील विविध राज्यांत शहीद स्मारके आहेत, पण सर्वसमावेशक अशा राष्ट्रीय युद्ध स्मारकाची आवश्यकता होती. ती आवश्यकता देशाची राजधानी नवी दिल्ली येथील ऐतिहासिक इंडिया गेट परिसरात तब्बल ४० एकर जागेवर साकारलेल्या पहिल्या भव्य सर्वसमावेशक राष्ट्रीय युद्ध स्मारकाने पूर्ण केली आहे. या स्मारकात आपल्या अलिबागच्या सुपुत्राच्या, सहाणगोठी येथील शहीद निलेश तुणतुणे यांच्या नावाचा अभिमानास्पद समावेश आहे. स्वातंत्र्यानंतर देशासाठी प्राणाची बाजी लावणार्‍या तमाम शहीद सैनिकांच्या स्मृतीपीत्यर्थ उभारलेले हे स्मारक प्रत्येक भारतीयासाठी प्रेरणास्थान ठरेल यात शंका नाही. 
     जगले ते देशासाठी, मृत्यूला कवटाळले तेही देशासाठी, जगले ते तिरंगा अभिमानाने फडकत ठेवण्याठी आणि जगाचा निरोप घेतला तो तिंरगा अंगावर लपेटूनच, असा देशभक्तीचा आदर्श ठेवणार्‍या, देशासाठी सर्वोच्च बलिदान करणार्‍या शहिदांच्या कायमस्वरुपी स्मरणासाठी, त्यांची शौर्यगाथा अमर राहावी यासाठी नवी दिल्ली येथे उभारण्यात आलेलं नॅशनल वॉर मेमोरियल (राष्ट्रीय युद्ध स्मारक) त्याग आणि हौतात्म्याचे अनोखे उदाहरण म्हणून आपल्या ह्रदयात कायमचे कोरले जाईल. कालपर्यंत जगात फक्त भारतातच सैनिकांच्या हौतात्म्याच्या स्मृती जपण्यासाठी सर्वसमावेशक राष्ट्रीय युद्ध स्मारक नव्हते. या उभारण्यात आलेल्या युद्ध स्मारकाने ही कमतरता दूर झाली आहे. 
     स्वातंत्र्यानंतर अनेक युद्धांत आणि मोहिमांत भारताच्या सैनिकांनी त्याग आणि हौतात्म्याचे दाखले दिले आहेत. त्यांच्या या हौतात्म्याच्या स्मृती जागविण्यासाठी आणि आदरांजली वाहण्यासाठी एका राष्ट्रीय युद्ध स्मारकाची आवश्यकता होती. प्रथम १९६० मध्ये राष्ट्रीय युद्ध स्मारक बनविण्याचा प्रस्ताव सशस्त्र दलांकडून आला होता. परंतु त्यावेळच्या आणि त्यानंतरच्या केंद्र सरकारने या प्रस्तावाची दखल घेतली नव्हती. हीच बाब लक्षात घेऊन विद्यमान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २०१४ साली झालेल्या लोकसभा निवडणुकीदरम्यान राष्ट्रीय युद्ध स्मारकाचे आश्वासन दिले होते. २०१४ रोजी केंद्रात सत्तास्थानी आलेल्या मोदी सरकारने २०१५ मध्ये या स्मारकाच्या उभारणीस मंजुरी दिली आणि इंडिया गेटपासून काही अंतरावर राष्ट्रीय युद्ध स्मारकाचे काम फेब्रुवारी २०१७ ला सुरु केले. दोन वर्षांतच या स्मारकाची नेटकी उभारणी करुन त्यांनी आपले आश्वासन पूर्ण केले. या राष्ट्रीय युद्ध स्मारकाचे २५ फेब्रुवारी २०१९ रोजी उद्घाटन करण्याच आले. 
    

         मुळात हे युद्ध स्मारक नवी दिल्लीत जिथे उभारलंय त्या राजपथावर असलेले ४३ मीटर उंचीचे विशाल इंडिया गेट हेदेखील युद्ध स्मारक आहे. ९० वर्षांपूर्वी १९३१ साली ते बांधले गेले. तेव्हा ब्रिटीश राज्य होते. ब्रिटीशांच्या बाजूने पहिले जागतिक महायुद्ध व अङ्गगाणिस्तान युद्ध यात लढताना वीरमरण आलेल्या ९० हजार भारतीय सैनिकांच्या स्मृतीप्रीत्यर्थ ते बांधले गेले आहे. त्यावर १३३०० शहीद सैनिकांची नांवे कोरली गेली आहेत. त्यानंतर इंडिया गेटच्या जवळच १९७१ च्या पाकिस्तानशी झालेल्या युद्धात भारताच्या बलिदान दिलेल्या ३ हजार ८४३ शहीद सैनिकांच्या स्मरणार्थ अमर जवान ज्योत उभारण्यात आली.या छोट्याशा देखण्या अमर जवान ज्योतीच्या स्मारकाचं उद्घाटन जानेवारी १९७२ ला तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधींनी केलं होतं.परंतु स्वातंत्र्यानंतर १९४७ ते १९९९ दरम्यान भारतीय सैन्याने अनेक मोठमोठ्या युद्धांत आपल्या शौर्याचा परिचय दिला आणि शत्रूचे दात त्यांच्याच घशात घातले. यात हजारो भारतीय सैनिक शहीदही झाले. या सैनिकांना आदरांजली वाहणारं आणि तरुण पिढीला या बलिदानाची माहिती देणारं कोणतंही सर्वसमावेशक भव्य स्मारक नव्हतं. ही उणीव या राष्ट्रीय युद्ध स्मारकाने भरुन निघाली आहे. 
      ४० एकरमध्ये बनवलेल्या या स्मारकावर १७६ कोटी रुपयांचा खर्च झालेला आहे. या स्मारकामध्ये एकावेळी २५० लोक येऊ शकतात. तथापि इंडिया गेटच्या दृश्यात कोणताही अडथळा नको म्हणून स्मारकाचा मोठा भाग जमिनीच्या खाली बनवण्यात आलाय. राष्ट्रीय युद्ध स्मारकाची ‘अमर चक्र’, ‘वीरता चक्र’, ‘त्याग चक्र’ आणि ‘रक्षक चक्र’ अशा एकूण ४ चक्रांत विभागणी करण्यात आलीय. सगळ्यात आतलं आणि सगळ्यात महत्त्वाचं पहिलं चक्र हे अमर चक्र आहे. त्यात अमर ज्योत आहे. त्यावर १५.०५ मीटर उंच स्मारक स्तंभ उभारलाय. तो शहीद सैनिकांच्या स्मृतींचं प्रतीक आहे. हे स्मारकाचं केंद्र आहे. इथं नेहमी अमर ज्योत तेवत राहिल. दुसरं चक्र त्याग चक्र आहे. त्यात १६ भिंती आहेत. स्वातंत्र्याच्या नंतर झालेल्या युद्धकाळात, तसेच शांतता काळात आणि घुसखोरी विरुद्धच्या लढ्यात सर्वोच्च बलिदान देणार्‍या सेनादल, हवाई दल आणि नौदलातल्या २५,९४२ शहिदांची नावे त्यांच्या पदांसह सोनेरी अक्षरांत कोरण्यात आली आहेत. त्यात सहाणगोठी-अलिबागच्या कारगील युद्धात वीरगती पत्करलेल्या निलेश तुणतुणे यांचे नाव आहे.  तिसरं चक्र हे वीरता चक्र आहे. त्यात भारतीय सैन्याने लढलेल्या स्वातंत्र्यानंतरच्या सर्व लढायांची माहिती आहे. त्यात १९४७ ४८ चं पाकिस्तान युद्ध, चीनबरोबरचं १९६२ चं युद्ध, १९६५ चं पाकिस्तान युद्ध, १९७१ चं पाकिस्तान युद्ध आणि १९९९ मधली कारगीलची लढाई याची सगळी माहिती दिलेली आहे. सगळ्यात बाहेर चौथं चक्र हे रक्षक चक्र आहे. तिथं ६९५ झाडं लावलीत. ती देशाच्या रक्षणासाठी सीमेवर तैनात असलेल्या जवानांची प्रतीक आहेत. 
     

    मुख्य स्मारक परिसराच्या शिवाय भारतीय सैन्यातला सर्वोच्च सन्मान असलेल्या परमवीर चक्र मिळवणार्‍या योद्ध्यांचे दोन सार्वजनिक चौक आहेत. त्याला परम योद्धा स्थळ असं नाव दिलंय. आजपर्यंतच्या २१ परमवीर चक्र मिळवलेल्या सैनिकांच्या धातूचे अर्धपुतळे आहेत. या योद्ध्यांपैकी १५ जणांना मरणोत्तर परमवीर चक्र पदकाने गौरविण्यात आले होते. तर सुभेदार मेजर (मानद कॅप्टन) बन्ना सिंग (निवृत्त), सुभेदार मेजर योगेंद्र सिंग यादव आणि सुभेदार संजय कुमार हे तीन योद्धे आजही हयात आहेत. हे राष्ट्रीय युद्ध स्मारक ज्यांच्यामुळे आपण सुरक्षित आहोत अशा वीरमरण पत्करलेल्या योद्ध्यांची कथा सांगेल. तसेच या राष्ट्रीय युद्ध स्मारकातच अमर जवान ज्योतीत यापूर्वी होणारे शहिदांशी निगडीत कार्यक्रम होणार आहेत. हे राष्ट्रीय युद्ध स्मारक पाहण्यासाठी कोणतंही तिकीट नसेल. पण ते पाहण्यासाठीची वेळ मात्र ठरलेली आहे. हे स्मारक नोव्हेंबर ते मार्च या काळात सकाळी ९ ते संध्याकाळी ६ वाजेपर्यंत आणि एप्रिल ते ऑक्टोबरमधे ९ ते ७.३० या वेळात चालू असेल. या स्मारकाच्या माहितीसाठी एक मोबाइल ऍप देखील तयार करण्यात आले असून या ऍपच्या माध्यमातून शहिदाचं नाव टाईप केल्यावर, त्याचं स्मारक कुठे आहे, त्याबाबतची माहिती मिळेल. ही सुविधा ज्यांच्या गावातील अथवा जिल्ह्यातील सैनिक या युद्धांत शहीद झाले होते, त्या लोकांसाठी महत्वाची असणार आहे. 
     ज्या ज्या देशांमध्ये उभी राहिलेली राष्ट्रीय स्मारके त्या देशाचा चेहरा बनली. आज अमेरिका म्हटली की, स्वातंत्र्यदेवतेचा पुतळा किंवा लिंकन मेमोरियल समोर येते. फ्रान्स म्हटले की, पॅरिसचा आयफेल टॉवर डोळ्यासमोर येतो. तद्वत भारत म्हटले की, मुघल वा इंग्रज आक्रमकांनी उभारलेल्या ताजमहाल वा गेट वे ऑङ्ग इंडिया आदी गोष्टी समोर येतात. हे कधी तरी, कुणी तरी बदलले पाहिजे, ते भारतीय सैन्याच्या आणि राजकीय इच्छाशक्तीने शक्य झाले आणि शौर्याचं भव्यदिव्य असे प्रतिक असणारे राष्ट्रीय युद्ध स्मारक उभे राहिले आहे. युद्धखोरीच्या हेतूने हे उभे राहिलेले नाही तर भातीय सैन्याला मानंवंदना आणि शहिदांच्या भीमपराक्रमापुढे नतमस्तक होण्यासाठी, त्यांना आदरांजली वाहण्यासाठी हे राष्ट्रीय युद्ध स्मारक आहे. हे स्मारक पाहाण्यासाठी देशाविदेशातून पर्यटक भारतात येतील तेव्हा त्यांना भारताचे आदरातिथ्य आणि पराक्रम यांचा प्रत्यय येईल. कारण हा देश श्रीरामाचा आहे, तसा श्रीकृष्णाचा आहे, जसा बुद्धाचा आहे, तसा छत्रपती शिवाजी महाराजांचा आहे. राष्ट्रीय युद्ध स्मारक नवी दिल्लीत झाले आता देशाला पराक्रमाची अस्मिता देणार्‍या छत्रपती शिवाजी महाराज यांचे स्मारक महाराष्ट्रात, मुंबईनजीकच्या अरबी समुद्रात लवकरात लवकर व्हावे आणि हे शिवस्मारक राज्याचे असले तरी त्याला राष्ट्रीय शिवस्मारक म्हणूनच दर्जा दिला जावा.

x

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा