मंगळवार, २६ मार्च, २०१९

थकलेले लढाऊ मिग-२१ ठरलेय 'उडती शवपेटी'

-उमाजी म. केळुसकर ⬑ विश्वभरारी ⬉
 

   सोव्हिएत रशियाकडून खरेदी केलेल्या ११ हजारांहून अधिक मिग-२१ विमानांनी १९८० पर्यंत जगभरातील ६० देशांत आपली सेवा बजावत शत्रूच्या उरात धडकी भरवली आहे. अरब-इस्रायल युद्धे आणि व्हिएतनाम युद्धात मिग-२१ चा प्रताप जगाने पाहिला आहे. आधुनिक काळात त्यांचे महत्त्व थोडे कमी झाले असले तरी भारतीय हवाई दलात अद्याप मिग-२१ कार्यरत आहेत. या मिग-२१ लढाऊ विमानांच्या सतत होणाऱ्या अपघातांमुळे आता त्यांना ‘उडती शवपेटी’ असे म्हटले जात असले तरी या विमानाने एक काळ गाजवला आहे. ही मिग विमाने आपल्या निवृत्तीची वाट पहात आहेत. त्यांना जोपर्यंत निवृत्ती दिली जात नाही तोपर्यंत त्यांचे अपघात आणि जीवितहानीचे नुकसान देशाला भोगावेच लागणार आहे.
       भारतीय हवाई दलाकडे आजमितीला सर्व प्रकारची सुमारे ३८९७ विमाने आहेत. त्यात ५६९ लढाऊ, ८०९ फिक्स्ड विंग, ८५३ ट्रान्स्पोर्ट, ३१८ ट्रेनर्स, ६४६ हेलिकॉप्टर्स आणि १९ अॅटॅक हेलिकॉप्टर्स आहेत. लढाऊमध्ये प्रामुख्याने २०० सुकॉय, ३० जग्वार, ६६ मिग-२७/२९, ५४ मिराज-२०००, २४७ मिग-२१ आणि ६ तेजस लढाऊ विमाने आहेत. यापैकी रशियन प्रणालीची मिग-२१ विमाने भारत वगळता जगातील इतर कुठल्याही देशामध्येे कार्यरत नाहीत. त्यामुळे जवळजवळ पाच दशके जुनी ही मिग विमाने निवृत्त करण्याची मागणी दीर्घकाळपासून केली जात आहे. परंतु हवाई दलाच्या ताफ्यात इतर लढाऊ विमानाच्या कमतरतेमुळे हवाईदलाला नाईलाजाने मिगची सेवा घ्यावी लागत आहे. अत्याधुनिक राफेल विमाने हवाई दलाच्या ताफ्यात सामिल झाल्यानंतर हळहळू मिग विमानांना निवृत्ती देण्यात येणार आहे आणि २०३० पर्यंत मिग-२७ आणि मिग २९ विमानांनाही निवृत्ती देण्यात येणार आहे. याचा अर्थ २०३० पर्यंत मिग विमाने अशाप्रकारच्या अपघातांची शिकार बनत राहणार आणि आपले लढाऊ पायलट आपण गमावत राहणार असा होतो, हे सारे गंभीर आहे. जेथे एका लढाऊ विमानावर अब्जावधी रुपयांची गुंतवणूक करावी लागते, तेथेच हवाई दलाच्या लढाऊ विमान चालकांना प्रशिक्षण देण्यासही मोठी रक्कम खर्च करण्यात येते या बाबीकडे दुर्लक्ष करता येणार नाही. अशा परिस्थितीत एक लढाऊ विमान आणि एक विमान चालक गमावण्याने देशाला किती नुकसान सोसावं लागतं, हे स्पष्ट आहे. मिग विमानांनी भारत-पाकिस्तान युद्धात चांगली भूमिका बजावली असली तरी गेल्या दोन दशकांत अनेक विमाने आणि लढाऊ पायलट आपण गमावले आहेत.
        गेल्या दोन दशकांत मिग-२१ चे सातत्याने अपघात होत आले आहेत ते २०१९ उजाडले तरी थांबायचे नाव घेत नाही. १४ फेब्रुवारी जैश-ए-महम्मदच्या आत्मघाती दहशतवाद्याने जम्मू-काश्मीरमधील पुलवामा येथे सीआरपीएफच्या बसवर आत्मघाती हल्ला केला. या हल्ल्यामध्ये ४० हून अधिक जवान शहीद झाले. त्यानंतर २६ फेब्रुवारी रोजी पहाटे पावणेचार वाजता भारतीय हवाई दलाने पाकिस्तानातील बालाकोट येथील जंगलामधील जैश-ए-महम्मदच्या तळावर मिराज-२००० या लढाऊ विमानाद्वारे १००० किलो वजनाचे बाॅम्ब फेकून ते तळ उद्ध्वस्त केले. भारताच्या या हवाई हल्ल्यानंतर पाकिस्तानने भारताच्या हद्दीत एफ-१६ विमानं घुसवून हल्ला चढवला. त्यातील एका लढावू विमानाला पाडण्यात यश मिळालं असलं तरी या धुमश्चक्रीत मिग-२१ विमान तांत्रिक त्रुटीमुळे खाली कोसळले आणि त्यानंतर पुन्हा ८ मार्चला राजस्थानच्या बिकानेर जिल्ह्यात मिग-२१ ला अपघात झाल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या ताफ्यातील मिग विमानांच्या सुरक्षेचा मुद्दा पुन्हा एकदा समोर आला आहे.
        ज्यावेळी रशिया हा सोव्हिएत संघाचा भाग होता आणि सोव्हिएत संघामध्ये नव्या विमानांना त्यांच्या रचनाकारांचे नाव देण्याची प्रथा होती, त्यावेळी सोव्हिएत युनियनच्या हवाई दलात १९५९ साली सामील झालेल्या या विमानाला मिकोयान आणि गुरेविच (मिग-२१) असे नाव देण्यात आले. हा काळ अमेरिका व सोव्हिएत रशिया यांच्यातील शीतयुद्धाचा होता. भारतालाही नुकतेच स्वातंत्र्य मिळालेले होते. अशावेळी भारताची लष्करी सामग्रीची जमवाजमव सुरू झाली, तेव्हा भारताने मिग-२१ विमाने घेण्याचा विचार १९६१ मध्ये केला. या विमानाच्या जुळणीसाठी लागणार्‍या तंत्रज्ञानाचे पूर्ण हस्तांतरण करण्याचे सोव्हिएत रशियाने मान्य केले. या रशियन बनावटीच्या मिग-२१ विमानाच्या रुपाने भारतीय हवाई दलात पहिल्या सुपरसॉनिक विमानाचे १९६३ मध्ये पदार्पण झाले. यानंतर या विमानाच्या मिग-२३ आणि मिग-२९ अशा आवृत्त्याही निघाल्या. १९६६ मध्ये नाशिक जवळ हिंदुस्थान एरॉनॉटिक्स कंपनीच्या कारखान्यात या विमानांच्या उत्पादनास सुरुवात झाली आणि ८७२ विमानांची निर्मिती करण्यात आली.
अवघ्या दोनच वर्षात भारतास सामोरे जावे लागलेल्या १९६५ च्या भारत-पाक युद्धात मिग-२१ पुरेशा संख्येने आपल्याकडे नसल्याने त्यांचा वापर करता आला नव्हता. तथापि १९७१ च्या भारत-पाकिस्तान युद्धात मिग-२१ विमानांवरच भारतीय हवाई दलाची भिस्त राहिली. अमेरिकेने पाकिस्तानला दिलेल्या एफ-१०४, एफ-६, एफ- ८६ सारख्या सॅबर विमानांना मिग-२१ ने चांगलेच जेरीस आणले. अगदी अलीकडे १९९९ च्या कारगील युद्धासहीत इतर अनेक प्रसंगी मिग-२१ ने महत्वाची भूमिका बजावली आहे. परंतु ही विमाने आता इतकी जुनी झाली आहेत की अनेक वेळा साधारण उड्डाण करतानाही त्यांचा अपघात झाला आहे. गेल्या अनेक वर्षांत मिग विमानांचे इतके अपघात झाले आहेत की त्यात जवळजवळ आपण दोनशेहून अधिक प्रशिक्षित लढावू पायलट गमावले आहेत. त्यामुळे त्यांना आता हवाई दलातच फ्लाइंग काॅफिन म्हणजेच उडती शवपेटी म्हटले जाऊ लागले आहे. रशियाने १९८५ मध्येच मिग-२१ चं उत्पादन बंद केले आहे आणि तेव्हापासून जेव्हा जेव्हा मिग विमानांचा अपघात झाला आहे, तेव्हा तेव्हा प्रत्येक वेळी या विमानाचा खराब पार्टसमुळे अपघात झाल्याचा आरोप झाला आहे.
         १९७१ ते २०१२ च्या दरम्यान ४८२ मिग विमानांचा अपघात झाला आहे. म्हणजेच वर्षाला सरासरी १२ मिग विमानांची शिकार बनले आहेत. सरकारने दिलेल्या आकडेवारीनुसार या कालावधीत मिग अपघातात १७१ लढाऊ पायलट, ३९ नागरिक, ८ सैन्यकर्मचारी आणि विमान चालक पथकाच्या एका सदस्याचा मृत्यू झाला आहे. तथापि, हवाई दलाकडे आता जी मिग विमाने आहेत, त्यांना तांत्रिकदृष्ट्या सुधारणा करण्यात आल्या असल्या तरी असे अपघात थांबायला तयार नाहीत. केंद्र सरकारने मार्च २०१६ ला संसदेत सांगितले होते की, २०१२ ते २०१६ या दरम्यान भारतीय हवाई दलाची एकूण २८ विमाने अपघातग्रस्त झाली होती, त्यात तांत्रिकदृष्ट्या सुधारणा करुन मिग-२१ बायसन असा दर्जा दिलेली ८ मिग-२१ विमाने होती. काही काळापूर्वी हवाई दलाकडे जवळजवळ १२० मिग-२१ विमाने होती, त्यातील अधिकांश विमाने अपघातग्रस्त झाली. सध्या केवळ ४०-४२ मिग विमाने उरली आहेत. ही मिग विमाने रशियाच्या जुन्या तंत्रज्ञानापासून बनवली असल्यामुळे आता त्यांचे सुटे भाग मिळत नाहीत. मिग विमाने सातत्याने अपघातग्रस्त होण्यामागे हेच प्रमुख कारण सांगितले जाते.
       भारताने २००६ आणि २०१३ साली आपल्याकडे असलेल्या मिग-२१ या विमानांचे आधुनिकीकरण केले होते. त्याच जुन्या सुधारित विमानांना मिग बायसन असे नाव दिले होते. अनेक जुन्या यंत्रणा सुधारून त्यात नवीन यंत्रणा बसवल्या होत्या. मिग २१ बायसनच्या कॉकपिटमध्ये अत्याधुनिक एव्हिऑनिक्‍स यंत्रणा व अन्य आधुनिक उपकरणे बसवली आहेत. त्या विमानात नवे मल्टि-मोड रडार बसवले आहे. सध्याच्या आधुनिक विमानांप्रमाणे त्याच्या पायलटच्या हेल्मेटच्या काचेवर लक्ष्यासंबंधी उपयुक्त माहिती पाहण्याची सोय केली आहे. असे असूनही या विमानांचं वय आधीच भरलेलं आहे, हे वास्तव आहे. मिग विमानाच्या अपघातांचे प्रमुख कारण यातील जुने झालेले पार्ट, एअर फ्रेम आणि यंत्रणेतील खराबी मानले जाते. युद्धात वापरल्या जाणाऱ्या कोणत्याही मशिनरीची चांगली देखाभाल-दुरुस्ती केली जाते आणि तिला अद्ययावतही ठेवले जाते, परंतु लढाऊ विमानांच्या कमतरतेमुळे अतिशय वाईट अवस्थेतील मिग विमानांचा वापर करत राहणे भारतीय हवाई दलाचा नाईलाज आहे.
        जर या मिग-२१ विमानांच्या वैशिष्ट्यांबद्दल सांगायचे झाले तर जास्तीत जास्त २२३० किलोमीटर ताशी वेग असलेल्या या विमानात हवेतून हवेत मारा करणारी क्षेपणास्त्रे घेऊन जाता येऊ शकतात आणि ते जवळपास दोन हजार किलो दारुगोळा वाहून नेण्यास सक्षम आहे. यातून शत्रूवर रासायनिक आणि क्लस्टर बाॅम्बचाही वर्षाव करता येऊ शकतो. याच्या काॅकपीटमधून ४२० राऊंड गोळ्या झाडण्याचीही व्यवस्था आहे. असे असले तरी वास्तव असे आहे की आजच्या पिढीच्या विमानाच्या तुलनेत मिग विमाने सरस ठरत नाहीत, कारण मिग विमाने चार-पाच दशक जुन्या संरक्षण आवश्यतेनुसार बनवण्यात आली होती. संरक्षण तज्ज्ञांच म्हणणं आहे की खऱ्या अर्थाने मिग विमानांना १९९० च्या दशकातच सैन्य वापरासाठी बाद करायला हवी होती. प्रत्येक लढाऊ विमानाचे एक वय असते आणि मिग विमानाची वयोमर्यादा वीस वर्षांपूर्वीच संपुष्टात आली होती, परंतु आपण त्यांना अपग्रेड करुन त्याचे वय वाढवण्याचा प्रयत्न करीत राहिलो आहोत आणि सर्वप्रकारच्या प्रयत्नानंतरही त्यांची कार्यप्रणाली नेहमी धोका देत राहिली आहे. त्याचे परिणाम अपघातांच्या रुपात समोर येत आहेत. संरक्षण तज्ज्ञांच्या अनुसार मिग-२१ चा वापर करणारा भारत हा आता कदाचित शेवटचा देश असावा,
      मिग-२१ लढाऊ विमानांनी अनेकवर्षे भारतीय हवाई दलाची उत्तमरित्या सेवा केली आहे. अत्यंत बिकट परिस्थितीतही या विमानाने हवाईदलाला हात दिला. असे असले तरी आता परिस्थिती अशी आहे की मिग-२१ विमानं आता सामान्य उड्डाणादरम्यानही अपघातांची शिकार बनत आहेत. अत्याधुनिक राफेल विमाने हवाई दलाच्या ताफ्यात सामिल झाल्यानंतर हळहळू मिग विमानांना निवृत्ती देण्यात येणार आहे आणि २०३० पर्यंत मिग-२७ आणि मिग २९ विमानांनाही निवृत्ती देण्यात येणार आहे. मिग-२१ (टाईप ७७) ही विमाने यापूर्वीच निवृत्त झाली आहेत. तथापि, राफेल विमानांबाबत बोलायचे झाले तर काही संरक्षण तज्ज्ञांचं म्हणणं आहे की युद्ध आघाडीवर लहान, हलकी व सक्षम लढाऊ विमानांची अधिक गरज असते. अशा परिस्थितीत राफेल विमाने मिग विमानांची जागा घेऊ शकत नाहीत. जरी सर्वांत मारक समजली जाणारी रशियन सुखोई-३० विमाने, पाकिस्तानच्या बालाकोटमध्ये विद्ध्वंस केलेली फ्रान्सीसी मिराज-२००० विमाने आणि ब्रिटिश जग्वार विमाने भारतीय हवाई दलाची शक्ती असली तरी आपल्या हवाई दलाकडे प्रत्येक प्रकारच्या लढाऊ विमानाची अतिशय कमतरता आहे या बाबीकडे दुर्लक्ष करता येणार नाही. वेळ, काळ आणि प्रसंग आणि आव्हानांच्या हिशोबाने हवाई दलाला वेगवेगळ्या आकार आणि दर्जाच्या विमानांची आवश्यकता असते. संसदीय समितीच्या एका अहवालानुसार हवाई दलाकडे लढाऊ विमानांचे केवळ ३१ ताफे आहेत, तर गरज ४२ ताफ्यांची आहे आणि नवीन विमाने येण्याचा वेग अतिशय कमी आहे. अशा परिस्थितीत मिग विमानांचे चौदा ताफे काढून टाकण्यात आले तर हवाई दलाकडे लढाऊ विमानांचे अतिशय कमी ताफे उरतील. त्यामुळे सध्यातरी नवी लढाऊ विमान हवाई दलात दाखल होण्यासाठी २०३० ची वाट पहावीच लागेल आणि तोपर्यंत मिग आणि त्यांच्या चालकांचे बळी पहात राहावेच लागेल, त्याशिवाय पर्याय नाही.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा