मंगळवार, १९ मार्च, २०१९

आता लोकसभा तरुण मतदारांच्या हाती

-उमाजी म. केळुसकर ⬑ विश्वभरारी ⬉

  
    भारताला तरुणांचा देश म्हणून संबोधले जाते. भारतात गेल्या काही दशकांपासून तरुण मतदारांची संख्या वाढली आहे. त्यामुळेच या तरुणांची मते आपल्याला मिळावीत यासाठी सर्वच राजकीय पक्ष प्रयत्नशील असतात. २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत याच तरूणांची मते महत्वपूर्ण ठरली होती. आता २०१९ च्या या निवडणुकीत जवळपास ८.४३ कोटी नवे मतदार जोडले गेले आहेत. त्यातील १८ ते १९ वयोगटातील सुमारे १.५ कोटी मतदार आहेत. हे सर्व नवमतदार केंद्रात कोणाचे सरकार आणायचे हे ठरवणार आहेत.
     भारतात २०१९ साली लोकसभेसाठी सार्वत्रिक राष्ट्रीय निवडणुका होणार आहेत. ११, १८, २३, २९ एप्रिल आणि ६, १२,१९ मे २०१९ दरम्यान एकूण ७ चरणांमध्ये या निवडणुकांमधून सतराव्या लोकसभेमधील सर्व ५४३ खासदारांची निवड केली जाईल.१३० कोटी लोकसंख्येच्या देशात ८९.७ कोटी मतदार आहेत. त्यामध्ये ४६.५ कोटी पुरुष तर ४३.२ कोटी स्त्री मतदार आहेत. तसेच ३३,१०९ मतदारांनी स्वत:ला तिसऱ्या प्रवर्गात टाकले आहे. तर, १६.६ लाख मतदार हे नोकरदार असून ते पोस्टल मतदान असणार आहे. पण चिंतेची बाब म्हणजे पहिल्या १९५१-५२ सालच्या लोकसभा निवडणुकीच्या तुलनेत मतदानाचा टक्का आजही वाढलेला नाही. ती पहिली सार्वत्रिक निवडणूक राज्यांत डिसेंबर १९५१ मध्ये, तर काही राज्यांत ७ जानेवारी १९५२ ला पार पडली. लोकसभा आणि विधानसभा एकत्रित निवडणुका १९५२, १९५७, १९६२ अशा तीन वेळा झालेल्या आहेत. १९६२ नंतर सर्व विषय बदलले. जिल्हा परिषदा आणि पंचायत समित्यांची निर्मिती झाली. देशातील महापालिकांची संख्या तिप्पट झाली. आणि निवडणुकीचे एकूण स्वरूप बदलून मग विधानसभा आणि लोकसभेची निवडणूक वेगवेगळी करण्यात आली.
     पहिल्या निवडणुकीवेळी देशातील लोकसंख्या ३६ कोटी होती तर साक्षरतेचे प्रमाण जेमतेम ३० टक्के होते आणि अशा या निरक्षर देशात पहिल्या निवडणुकीत ६८ टक्के मतदान झाले. न शिकलेल्या देशातील शहाण्या मतदारांनी या देशाची लोकशाही त्या दिवशी रुजवली आणि त्याचा मोठा वटवृक्ष झाला आहे. ही होती पहिली निवडणूक. पण काही लोकसभा निवडणुकानंतर २०१४ च्या निवडणुकीपर्यंत देशात ५४ टक्के सरासरी मतदान झाले. देश शिकलेला नव्हता तेव्हा ६८ टक्के मतदान आणि नंतर गेल्या ६३ वर्षात देश शिकला, १२७ कोटी लोकसंख्येचा झाला, मतदार ८१.४५ कोटींपेक्षा झाले, पण पण मतदान प्रक्रियेबाबतच मतदारांमध्ये उदासिनता निर्माण झाली आणि ५४ टक्के मतदानाने मतदानाचा आलेख घसरला. याला कारणे अनेक आहेत पण त्याचा परिणाम मतदानाची टक्केवारी खालावण्यात झाला. पूर्वी मतदान करताना मारावयाच्या शिक्क्यावरून संगणकीय क्रांतीने मतदानासाठी मशीन आली. निवडणुकीचा निकाल झटपट लागू लागला असला तरी मतदानाबाबतची जागृती नष्ट झाली हे वास्तव आहे.
      असे असले तरी २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत सर्व पक्षांची मदार तरुण मतदारांवर आहे. या निवडणुकीत दीड कोटी मतदार पूर्णपणे नवे मतदार असणार आहेत, ते प्रथमत:च १७ व्या लोकसभा निवडणुकीत आपल्या मताचा वापर करणार आहेत. यापूर्वी त्यांनी कधीही आणि कोणत्याही निवडणुकीत मतदान केलं नव्हतं. याचा अर्थ ते अगदी प्रथम:च एखाद्या निवडणूक प्रक्रियेचा भाग बनणार आहेत. हे मतदार पूर्णपणे २१ व्या शतकात जन्मलेले मतदार असणार आहेत. कारण त्यांनी नुकतेच आपल्या वयाची १८ वर्षे पूर्ण केली आहेत. दुसरी महत्वाची बाब अशी आहे की १८ वर्षाच्या तरुणांना मतांचा अधिकार २५ वर्षापूर्वी मिळाला आहे. ते मतदार आता ४६ वर्षाचे आहेत. तर गेल्या पाच वर्षांत म्हणजे २०१४ नंतर ज्या भारतीयांनी मतदार यादीत आपलं नाव नोंदवलं आहे, त्यांची संख्या ८ कोटी ४३ लाख आहे. हे देखील प्रथमत:च लोकसभा निवडणुकीचा भाग बनणार आहेत. तथापि हे पहिल्यांदाच मतदान करणार नाहीत. गेल्या पाच वर्षांत यांतील अधिकांश लोकांनी कुठे ना कुठे, कधी ना कधी कमीत कमी एकदा आपल्या मताधिकाराचा वापर केलेला आहे. मग तो एखाद्या विधानसभा निवडणुकीत केलेला असू शकतो, एखाद्या पोटनिवडणुकीत केलेला असू शकतो, अथवा जिल्हापरिषद, नगरपालिका-महापालिका, ग्रामपंचायत आदी निवडणुकात केलेला असू शकतो. परंतु यातील अधिकांश जणांनी मत देण्याचा अनुभव मिळवलेला आहे.
     परंतु हे मतदार या लोकसभा निवडणुकीत पहिल्यांदाच मतदान करणार आहेत. यादृष्टीने पाहिलं तर केवळ दीड कोटी नाही तर जवळ जवळ ९ कोटी मतदार हे लोकसभा निवडणुकीसाठी पहिल्यांदा मतदान करणार आहेत. तसे पहाता ९० कोटींपेक्षा अधिक मतदारांमधील हे ९ कोटी मतदार खूप जास्त नाहीत. परंतु ते देशाच्या एकूण मतदार संख्येच्या १/१० आहेतच. त्यांची मतदान करण्याची पद्धत आणि त्यांची पक्षीय विचारांची बैठक ठरलेली नाही आणि कोणाही निवडणूक विश्लेषकाला त्यांच्याबाबत अंदाज बांधता येत नाही, यादृष्टीने हे नवे मतदार अतिशय महत्वाचे आहेत. हे पहिल्यांदा मतदान करणारे मतदार अशासाठी महत्वाचे आहेत, कारण जरी गेल्या पाच वर्षांत यांच्या अवतीभवती सर्व राजकीय चर्चा होत राहिल्या, तरी जर निवडणुकतज्ज्ञांचे ऐकले या मतदारांनी आधीपासून कोणत्या पक्षाला अथवा उमेदवाराला मत द्यायचे हे पक्के ठरवलेलेच नसते. अशा तरुण मतदारांनी आज जरी अमूक पक्षाला मतदान करु असे ठरवले तरी शेवटच्या क्षणी ते आपला निश्चय बदलू शकतात, असे निवडणुकतज्ज्ञांना वाटते. त्यात अयोग्य असे काहीच नाही. म्हणूनच हे मतदार ८ पट उतर मतदारांपेक्षा महत्वाचे आहेत. या मतदारांपैकी ९५ टक्के मतदार आपल्या मताधिकाराचा वापर करतील, म्हणजेच मतदान करण्यास निश्चित जातील यासाठी हे मतदार अतिशय महत्वाचे आहेत. तज्ज्ञांच्या मते नवे मतदार अतिशय उत्साही आहेत आणि ते कशाही परिस्थितीत आपल्या मताचा वापर करणारच. जर ९ कोटी मतदारांपैकी ६ अथवा ७ कोटींनी जरी मतदान केलं, तर यांच्या मतांमुळे निकालावर मोठ्या प्रमाणात परिणाम होऊ शकतो. त्याच्यावर जय-पराजय ठरु शकतो आणि हे आता नव्या मतदारांच्या हातात आहे. भारतात कोणत्याही पक्षाला मिळाणारी जास्तीतजास्त मते २० कोटींपेक्षा कमी असतात. जर एखाद्या पक्षाच्या अस्थिर मतांची गणती केली तर ती केवळ अडीच ते ३ कोटीच होतात. सांगण्याचा अर्थ असा की ही अडीच ते तीन कोटी मते कोणत्याही पक्षाला पराभूत किवां विजयी बनवू शकतात. जरी तरुण मतदारांनी संघटीत मतदारांप्रमाणे एकतर्फी मतदान केले नाही, तरी त्यांच्याही मतदानात एक स्वाभाविक सामुहिकता असते, त्यामुळे हे मतदार अतिशय महत्वाचे आहेत.
        ७ एप्रिल ते १२ मे, २०१४ दरम्यान ९ फेऱ्यांमध्ये घेतल्या गेलेल्या निवडणुकांमधून सोळाव्या लोकसभेमधील सर्व ५४३ खासदारांची निवड केली गेली. १६ मे २०१४ रोजी मतमोजणी करण्यात आली. त्यात भाजपला एकूण १७ कोटी १० लाख ७० हजार मते मिळाली होती, तर काँग्रेसला मिळालेली एकूण मते १० कोटी ६० लाख ९० हजार होती. आता या दोनही पक्षांना मिळालेल्या अस्थिर मतांकडे राहिले तर भाजपला जवळजवळ ४ कोटी अस्थिर मते मिळाली होती आणि काँग्रेसची जवळजवळ ३.८ कोटी मते निगेटिव्ह अस्थिर झाली होती. केवळ याच कारणामुळे १९८५ नंतर भाजप असा पक्ष बनला की ज्याला सरकार बनवण्यासाठी कोणाच्याही पाठिंब्याची गरज नव्हती. सरकार बनवण्यासाठी २७२ जागांची आवश्यकता असते आणि भाजपला २८३ जागा मिळाल्या होत्या. (भाजप आणि मित्रपक्षांना ३३६ जागा, काँग्रेस आणि मित्रपक्षांना ६० जागा तर इतर पक्षांना १४७ जागा मिळाल्या. सध्या भाजपकडे २६८ सदस्य आहेत. काही जागा भाजपनं पोटनिवडणुकांमध्ये गमावल्या. तसंच पक्षाच्या काही सदस्यांनी विधानसभा निवडणुका लढण्यासाठी राजीनामा दिला होता. असं असलं तरी मित्रपक्षांमुळे भाजपचं केंद्रातलं सरकार स्थिर राहिलं.) सांगण्याचा अर्थ असा की भाजपला सरासरी अडीच ते तीन कोटी मते अधिक मिळाली होती. यामुळे तो एकट्याच्या बळावर प्रचंड बहुमत मिळवणारा पक्ष बनला होता.
       या सर्व बाबी लक्षात घेतल्या तर यावेळी लोकसभा निवडणुकीत तरुण मतदार मोठी ऐतिहासक भूमिका बजावणार हे सांगण्याची आवश्यकता नाही. तरुण अजूनही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबाबत निराश झालेले नाहीत, असे साधारणपणे समजले जाते, असे असले तरी गेली पाच वर्षे रोजगाराच्या दृष्टीने अतिशय वाईट वर्षे ठरली आहेत. राहुल गांधी यांना तरुण अजिबात पसंत करीत नाहीत, अशा प्रकारचे दावे केवळ राजकीय पक्षच करु शकतात. परंतु वास्तव असे आहे की मोठ्याप्रमाणात तरुणही राहुल गांधीमध्ये भविष्य बघतात. तरीही २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत डोळे मिटून कोणताही पक्ष तरुण वर्ग आपल्याला पसंत करेल, असं सांगू शकत नाही की समजू शकत नाही. त्यामुळे या निवडणुकीत काहीही घडू शकते. याच कारणामुळे काँग्रेस असो वा भाजप हे दोनही पक्ष अथवा सर्व प्रादेशिक पक्षयांनी आपल्या सर्व निवडणूक मोहिमांत तरुणांवरच लक्ष केंद्रीत केले आहे. तरुण मतदारच या लोकसभा निवडणुकीत ऐतिहासिक भूमिका बजावतील.
  

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा