-उमाजी म. केळुसकर ⬑ खारावारा ⬉
प्रत्येक आई-वडिलांच्या डोळ्यात एक स्वप्न असते, ते म्हणजे त्यांच्या मुलांनी, मुलींनी समाजात मान उंचावून जगावं. चारचौघांत त्यांची मान कधी खाली झुकू नये आणि आयुष्यात त्यांना कोणापुढे हात पसरायची वेळ येऊ नये, हीच त्यांची प्रामाणिक अपेक्षा असते. मुलगा असो वा मुलगी, ते केवळ एक ‘वस्तू’ नाहीत, तर आई-वडिलांनी आपल्या प्रेमाने, कष्टाने आणि त्यागाने घडवलेलं एक जिवंत आणि सुंदर शिल्प आहेत, हे सत्य आपण कधीही विसरता कामा नये. या शिल्पाला घडवताना आई-वडील आपलं सर्वस्व पणाला लावतात, आणि त्यामागे केवळ एकच उद्देश असतो त्यांच्या पाल्यांनी सुखी आणि समाधानी जीवन जगावं, सोबतच आपल्या कुटुंबाचा आणि समाजाचा मान राखावा.
आजच्या वेगवान युगात, जिथे स्वातंत्र्याची आणि वैयक्तिक निवडीची अनेकदा चुकीची व्याख्या केली जाते, तिथे कौटुंबिक आणि सामाजिक जबाबदारीचं भान हरवत चालल्याचं चित्र दिसतं. विशेषतः तरुण पिढीमध्ये, अनेकदा क्षणिक आकर्षणापोटी किंवा मित्र-मैत्रिणींच्या प्रभावाखाली येऊन असे निर्णय घेतले जातात, ज्यामुळे आई-वडिलांना अतोनात दुःख सहन करावं लागतं आणि त्यांच्या सन्मानाला ठेच पोहोचते. मुलींच्या बाबतीत बोलायचं झाल्यास, अनेकदा असं दिसून येतं की प्रेमाच्या भावनिक गुंत्यात अडकून, त्या आपल्या आई-वडिलांना विश्वासात न घेता, त्यांना न सांगता प्रियकराचा हात धरतात आणि निघून जातात. अशावेळी त्यांना कदाचित वाटत असेल की त्यांनी आपल्या प्रेमासाठी एक मोठा त्याग केला आहे किंवा एक धाडसी पाऊल उचललं आहे. पण या निर्णयामुळे त्यांच्या सुख-समाधानासाठी अहोरात्र झटणाऱ्या आई-वडिलांच्या मनाची काय अवस्था होते, याचा विचार त्यांनी करायला हवा.
ज्या आईने नऊ महिने पोटात ठेवून, जन्म देऊन, स्वतःच्या दुधाने आणि प्रेमाने तिला मोठं केलं, ज्या वडिलांनी स्वतःच्या इच्छा-आकांक्षा बाजूला ठेवून तिच्या प्रत्येक गरजा पूर्ण केल्या, तिला शाळेत पाठवलं, चांगले संस्कार दिले त्या माता-पित्याला अचानकपणे आलेल्या या धक्क्यातून सावरण्यासाठी किती वेळ लागतो, याचा विचार या मुलींनी करायला हवा. त्यांची स्वप्नं, त्यांच्या आशा, त्यांच्या अपेक्षा एका क्षणात धुळीला मिळतात. समाजासमोर, नातेवाईकांसमोर त्यांची मान खाली जाते. 'आपल्या लेकीने असं का केलं?' या प्रश्नाने ते रात्रंदिवस तळमळतात. मुलीच्या प्रेमासाठी घेतलेल्या या निर्णयातून तिला खरंच शाश्वत सुख मिळतं का, आणि तिच्या या कृतीमुळे तिच्या आई-वडिलांना आयुष्यभर जी वेदना आणि अपमानाची भावना सहन करावी लागते, त्याची किंमत काय असते, याचा गांभीर्याने विचार करण्याची गरज आहे.
केवळ मुलींनीच नाही, तर मुलांनीही आजच्या काळात जबाबदारीचं भान ठेवणं अत्यंत आवश्यक आहे. 'मुलगा आहे, त्याला स्वातंत्र्य हवं,' किंवा 'तो पुरुष आहे, तो काहीही करू शकतो' अशा जुन्या आणि चुकीच्या कल्पना आता कालबाह्य झाल्या आहेत. मुलांनीही मुलींप्रमाणेच आपल्या कुटुंबाची, आई-वडिलांची जबाबदारी समजून वागायला हवं. दारू, जुगार, वाईट संगत किंवा इतर कोणत्याही व्यसनाच्या आहारी जाऊन आपल्या भविष्याची राखरांगोळी करणं किंवा आई-वडिलांनी कष्टाने उभं केलेलं घर दारिद्र्यात ढकलणं, हे कोणत्याच मुलाला शोभून दिसत नाही. सैराटपणा म्हणजे केवळ प्रेमात वाट्टेल ते करणं नव्हे, तर अविचारीपणे, बेफिकीरपणे वागून आपल्या कुटुंबाला अडचणीत आणणं हा देखील एक प्रकारचा सैराटपणाच आहे. मुलांच्या चुकीच्या वागण्यामुळेही आई-वडिलांना समाजासमोर मान खाली घालावी लागते, त्यांच्या चारित्र्यावर प्रश्नचिन्ह निर्माण होतं आणि त्यांना मनस्ताप सहन करावा लागतो.
सैराट झालेल्या मुला-मुलींना अनेकदा असं वाटतं की त्यांनी घेतलेले निर्णय हे त्यांच्या स्वातंत्र्याचा भाग आहेत आणि ते कधीच चुकणार नाहीत. पण जेव्हा त्यांच्या या सैराटपणाची, बेफिकिरीची आणि अविचारीपणाची किंमत त्यांना फेडावी लागते, जेव्हा त्यांची फसगत होते, तेव्हा त्यांच्या आई-वडिलांवर कोणता प्रसंग ओढवतो, हे दुसरा कुणीही सांगू शकणार नाही. अशावेळी, ज्या आई-वडिलांना त्यांनी आपल्या वागण्याने दुखावलेलं असतं, त्यांची मान खाली घालून ठेवली असते, त्याच आई-वडिलांच्या दारात त्यांना आश्रयासाठी परत यावं लागतं. समाजातून बहिष्कृत झाल्यावर, किंवा ज्यांच्यासाठी त्यांनी सर्वस्व पणाला लावलेलं असतं, त्याच माणसांनी पाठ फिरवल्यावर, त्यांना आपल्या आई-वडिलांची आठवण येते.
यावेळी आई-वडिलांची अवस्था खरंच पाहण्यासारखी असते. एकीकडे आपल्या मुलाने/मुलीने केलेल्या चुकांचा मनस्ताप आणि समाजाची कुत्सिक दृष्टी, तर दुसरीकडे आपल्या काळजाच्या तुकड्याला पुन्हा स्वीकारण्याची ओढ. अनेकदा, समाजाच्या टीकेला, नातेवाईकांच्या टोमण्यांना आणि लोकांच्या नजरांना तोंड देत, ते पुन्हा आपल्या पाल्याला आधार देतात. त्यांच्या मनात प्रचंड दुःख आणि वेदना असूनही, आपल्या मुलाला किंवा मुलीला संकटात पाहून त्यांना पुन्हा वात्सल्यच आठवतं. या प्रसंगाची भीषणता आणि त्यातून होणारी मानसिक घुसमट केवळ ते आई-वडीलच जाणू शकतात. जी मान मुलांनी/मुलींनी खाली झुकवली होती, तीच मान ते पुन्हा मोठ्या कष्टाने, समाजाचा रोष पत्करून, आपल्या पाल्यासाठी वर उचलण्याचा प्रयत्न करतात. कारण, कितीही झालं तरी, ते त्यांचेच रक्त असतं.
आजच्या काळात मुलगा-मुलगी असा भेद करणं योग्य नाही, कारण दोघांनाही समान हक्क आणि संधी मिळत आहेत. पण याचा अर्थ असा नाही की त्यांना जबाबदारीपासून मुक्ती मिळते. 'मुलगी १८ वर्षांची झाली आणि मुलगा २१ वर्षांचा झाला, म्हणजे त्यांना शिंगं फुटत नाहीत. कायदेशीरदृष्ट्या ते सज्ञान झाले असले तरी, त्यांना सामाजिक आणि कौटुंबिक जबाबदारीचं भान असणं तितकंच महत्त्वाचं आहे. कायद्याने त्यांना 'सज्ञान' ठरवलं म्हणजे ते काहीही करू शकतात असं नाही. माणूस हा समाजशील प्राणी आहे. पण किमान कौटुंबिक भान त्यांनी ठेवायलाच हवं. ज्या कुटुंबाने त्यांना घडवलं, ज्यांच्या जीवावर ते आज उभे आहेत, त्या कुटुंबाच्या सन्मानाची आणि प्रतिष्ठेची काळजी घेणं हे त्यांचं आद्य कर्तव्य आहे.
आई-वडिलांनी आपल्या मुलांकडून कोणतीही मोठी अपेक्षा ठेवलेली नसते. त्यांना केवळ एकच गोष्ट हवी असते ती म्हणजे त्यांचा सन्मान. त्यांनी आयुष्यभर जो त्याग केला आहे, जो संघर्ष केला आहे, त्याचा मोबदला म्हणून त्यांना केवळ आपल्या मुलांच्या चांगल्या वागणुकीतून मिळणारा आनंद आणि समाजात मिळणारा आदर हवा असतो. जेव्हा मुलगा किंवा मुलगी सैराट वागते, बेजबाबदारपणे निर्णय घेते, तेव्हा त्या बापाची मान खाली जाते, त्या आईचं हृदय पिळवटून निघतं. त्यांचे डोळे अश्रूंनी डबडबतात, आणि मनात एकच प्रश्न असतो, 'आम्ही यांच्यासाठी हे सर्व केलं, पण यांनी आमचा विचार का नाही केला?'
आजच्या पिढीने या गंभीर बाबीवर आत्मचिंतन करण्याची गरज आहे. आपले आई-वडील आपल्यासाठी काय आहेत, त्यांनी आपल्यासाठी काय केलं आहे, याचा विचार करण्याची गरज आहे. त्यांच्यावर प्रेम करणं, त्यांचा आदर करणं, त्यांच्या शब्दाला मान देणं आणि त्यांना कधीही मान खाली घालण्याची वेळ येऊ नये याची काळजी घेणं, ही प्रत्येक मुलाची आणि मुलीची जबाबदारी आहे. आपला प्रत्येक निर्णय घेताना, आपण आपल्या आई-वडिलांच्या सन्मानाला ठेच तर पोहोचवत नाही आहोत ना, याचा विचार करणे आवश्यक आहे. त्यांच्या चेहऱ्यावर आनंद आणि अभिमान दिसला पाहिजे, दुःख आणि अपमानाची भावना नाही.
आपल्या आई-वडिलांनी घडवलेलं हे सुंदर शिल्प, म्हणजे आपण स्वतः, केवळ आपल्या पुरतं मर्यादित न राहता, त्यांनी आपल्याला दिलेले संस्कार आणि मूल्यांचं जतन करत, समाजासाठी एक आदर्श म्हणून उभं राहिलं पाहिजे. जेव्हा एखादं मूल चांगलं वागतं, जबाबदारीने वागतं, तेव्हा ते केवळ स्वतःचंच नाव मोठं करत नाही, तर आपल्या आई-वडिलांनाही समाजात प्रतिष्ठा मिळवून देतं. आपल्या कृतीतून आपल्या आई-वडिलांना अभिमान वाटेल असं जीवन जगणं, हीच त्यांच्यासाठी खरी गुरुदक्षिणा आहे, आणि याचमध्ये त्यांच्या कष्टांचं आणि त्यागाचं सार्थक आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा