-उमाजी म. केळुसकर ⬑ दादागिरी ⬉

नाती... काही जन्माने मिळतात, काही निवडीने जुळतात. पण कधीकधी हीच नाती एखाद्या व्यक्तीसाठी आयुष्यभराची वेदना बनतात. पुण्यातील मुळशी तालुक्यातील भुकूम येथील वैष्णवी कसपटे-हगवणेच्या बाबतीत हेच घडले. तिच्या आयुष्यात जन्माची आणि निवडीची दोन्ही नाती तिच्यासाठी मारक ठरली. एका बाजूला जन्मदात्या पित्याच्या इच्छेविरुद्ध जाऊन तिने प्रेमविवाह केला, तर दुसऱ्या बाजूला ज्याच्यावर तिने अलोट प्रेम केले, त्याच पतीच्या कुटुंबाने तिच्या जीवाचे मोल केले. ही केवळ एका वैष्णवीची कहाणी नाही, तर आजच्या तथाकथित 'शिक्षित' समाजातील अनेक मुलींच्या जीवनातील एक विदारक सत्य आहे, जे या घटनेने पुन्हा एकदा अधोरेखित केले आहे.
वैष्णवी कसपटेच्या दुर्दैवी मृत्यूने (खरे तर ही हत्याच) महाराष्ट्राला पुन्हा एकदा हुंडाबळीच्या क्रूर वास्तवाची आठवण करून दिली आहे. वैष्णवीने शशांक हगवणे याच्याशी प्रेमविवाह केला. हा विवाह तिच्या घरच्यांच्या विरोधात होता. वडिलांना आयसीयूमध्ये ठेऊन ती प्रेमासाठी 'सैराट' झाली आणि पळून जाऊन तिने लग्नाचा निर्णय घेतला. कोणत्याही पित्यासाठी याहून दुर्दैवी काय असू शकते? पण तरीही, आपल्या लाडक्या लेकीच्या सुखासाठी, वैष्णवीच्या वडिलांनी नमते घेतले आणि ते लग्न लाऊन देण्यास तयार झाले. तेव्हा हगवणे कुटुंबाच्या मागणीनुसार हुंडा म्हणून एक फॉर्च्युनर कार (५० लाखांहून अधिक) आणि ५१ तोळे सोने (५५ लाखांहून अधिक) दिले. जवळपास दीड कोटी रुपये खर्च करून हे लग्न थाटामाटात लावून दिले. परंतु, पित्याच्या या त्यागाची आणि प्रेमाची किंमत क्रूरपणे चुकवावी लागली. त्याच लेकीला त्याच हुंड्यासाठी छळलं जाऊ लागलं आणि त्यातच तिचा बळी गेला.या प्रकरणातील सर्वात धक्कादायक बाब म्हणजे, वैष्णवीचा सासरा, राजेंद्र हगवणे, हा राष्ट्रवादीचा पदाधिकारी आहे आणि त्यांची पत्नी, म्हणजेच वैष्णवीच्या सासूचा भाऊ, आयजी दर्जाचा पोलीस अधिकारी आहे. ही पार्श्वभूमीच या प्रकरणाला अधिक गंभीर बनवते. ज्यांच्यावर कायदा आणि सुव्यवस्थेची जबाबदारी आहे, ज्यांना समाजात आदर्श म्हणून पाहिले जाते, तेच लोक जेव्हा कायद्याची भीती न बाळगता कोणाच्या तरी लेकीचा बळी घेतात, तेव्हा सामान्य माणसाने कोणावर विश्वास ठेवावा? 'वजनदार' कुटुंब म्हटल्यावर त्यांना कायद्याचे नियम लागू नाहीत का? सत्ता आणि पैशाच्या जोरावर कोणाचाही जीव घेण्याचा परवाना मिळतो का?
या घटनेतून हे स्पष्ट होते की, या गुन्हेगारी प्रवृत्तीला कायदा सुव्यवस्थेची भीती नाही. त्यांना असे वाटते की, कायदा आपल्या खिशात आहे आणि सत्ता व पैशाच्या जोरावर ते कोणाचाही जीव घेऊ शकतात. हा माजच धनदांडग्याकडून अशा घटना घडण्यास कारणीभूत ठरतो आहे. असे अनेक प्रश्न ही घटना निर्माण करते. सुरुवातीला या 'वजनदार' कुटुंबावर कारवाई टाळण्याचा प्रयत्न झाला. पोलीस यंत्रणेवर राजकीय दबाव आणला गेला, हे स्पष्ट दिसते. पण माध्यमांच्या दबावानंतर, जनमताच्या रेट्यानंतर आणि वैष्णवीच्या वडिलांनी दाखवलेल्या हिमतीमुळे, वैष्णवीची सासू, नणंद, दीर, नवरा, सासरा यांना अखेर अटक झाली आहे. हे स्वागतार्ह पाऊल असले तरी, केवळ अटक पुरेशी नाही.
जोपर्यंत या 'उच्चभ्रू' गुन्हेगारांना कठोरात कठोर शिक्षा होत नाही, तोपर्यंत समाजात अशा घटना थांबणार नाहीत. कायद्याने आपले काम निष्पक्षपणे केले पाहिजे. कायदा सर्वांसाठी समान आहे, हे कृतीतून दाखवून देण्याची वेळ आता आली आहे. जर कायद्याच्या अंमलबजावणीमध्ये दुजाभाव होत असेल, सत्ता आणि पैशामुळे न्याय मिळत नसेल, तर सामान्य माणसाचा व्यवस्थेवरील विश्वास उडेल. हा विश्वास टिकवून ठेवण्यासाठी, वैष्णवीला न्याय मिळवून देण्यासाठी आणि भविष्यात अशा घटनांना आळा घालण्यासाठी, या प्रकरणातील आरोपींना कायद्याच्या कठोर शिक्षा होईल याची खात्री करणे अत्यंत आवश्यक आहे. हा केवळ एका कुटुंबाचा प्रश्न नाही, तर आपल्या समाजाच्या नीतिमूल्यांचा आणि कायद्याच्या सर्वोच्चतेचा प्रश्न आहे.
या घटनेने पुन्हा एकदा हुंड्याच्या मागणीविरोधात कठोर कायदे असूनही, त्यांची प्रभावी अंमलबजावणी होत नसल्याचे सिद्ध केले आहे. सामाजिक स्तरावरही या कुप्रथेविरोधात अधिक जागृती आणि शिक्षण आवश्यक आहे. केवळ कायद्यानेच नाही, तर समाजानेही हुंडा मागणाऱ्या आणि देणाऱ्या दोघांनाही बहिष्कृत केले पाहिजे. वैष्णवीचा बळी व्यर्थ जाऊ नये यासाठी, समाजाने एकत्र येऊन या राक्षसी प्रवृत्तीचा समूळ नायनाट करण्यासाठी कंबर कसली पाहिजे. हे प्रकरण देशभरातील प्रत्येक मुलीसाठी न्याय मिळवण्यासाठी एक महत्त्वाचे उदाहरण बनले पाहिजे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा