शनिवार, २२ फेब्रुवारी, २०२०

सावधान! १००८ वर्षांचा आक्षीचा शिलालेखही चोरीस जाईल

-उमाजी म. केळुसकर ⬑ दादागिरी ⬉


* रायगड जिल्ह्यातील प्राचीन ठेवा
* देशातील पहिला मराठी शिलालेख
* शिळेवरील मराठी अक्षरे गेलीय पुसली
* शिलालेखावर गधेगाळ शिल्पाची शापवाणी
* पुरातत्वीय वारशाच्या चोरीची शक्यता
* अंदाजे ५० कोटी रुपयांहून अधिक किंमत
* शिलालेखावर सीसीटीव्ही, सुरक्षेची गरज
* शिलालेखाचे माहितीपूर्ण स्मारक व्हावे
* रायगडात सव्वाशे शिलालेख, दहा ताम्रपट
* यापूर्वी दिवेआगरला हजार वर्षांच्या सुवर्णगणेशाची चोरी

       आदिमानव आधी मुद्राभिनयातूनच एकमेकांशी बोलायचे. त्यांच्या खाणाखुणा हीच त्यांची भाषा असायची. या मुद्राभिनयाच्या कलेतूनच भाषेचा उगम झाला. संकेतांना त्यांनी शब्दांचे रुप दिले आणि त्या त्या समूहाची एक भाषा निर्माण झाली. मानव एकमेकांशी बोलू लागला. त्यामुळे आज जगात शेकडो भाषांचा वापर केला जात आहे. त्यात बोलीभाषा आणि प्रमाणभाषा यांचा समावेश आहे. भारतात प्रस्तर (शिलालेख), स्तंभ (लोहस्तंभ), सोन्या-चांदीचे आणि तांब्याचे पत्रे, कापड, भूर्जपत्रे आणि ताडपत्रे, कागद ते कॉम्प्युटर असा लेखन प्रवास राहिला आहे. या प्रवासातील महत्वाचा साक्षीदार रायगड जिल्हा राहिला आहे, कारण मराठीतील पहिला शिलालेख अलिबाग तालुक्यातील आक्षी येथील आहे आणि मराठीतील पहिला ताम्रपट श्रीवर्धन तालुक्यातील दिवआगर येथील आहे. जिल्ह्यात असे सुमारे सव्वाशे शिलालेख व दहा ताम्रपट आहेत. आक्षी येथील मराठीतील पहिल्या शिलालेखास यावर्षी एक हजार आठ वर्ष होत आहेत. आंतरराष्ट्रीय बाजारात या शिलालेखाची किंमत ५० कोटी रुपयांहून अधिक असू शकते. आंतरराष्ट्रीय तस्करांनी हा अनमोल ठेवा मुळापासून उखडून नेला तर रायगडकरांच्या आणि महाराष्ट्राच्या हाती असलेला हा एक हजार आठ वर्षांचा अनमोल ठेवा गमावण्याचे पाप राज्य शासन आणि जिल्हा प्रशासनाचे असेल. 
       रायगडकरांना कोणी असे विचारले की तुमच्याकडे कोणता असा ठेवा आहे तर छत्रपती शिवाजी महाराज यांचा किल्ले रायगडसह अनेक गडकिल्ले आणि जलदूर्ग आमच्याकडे आहेत (भले या ऐतिहासिक वास्तूंच्याबाबत राज्यसरकार आणि जनता म्हणून आपण उदासिन असलो तरी) असे उत्तर अभिमानाने दिले जाईल. असेच अभिमानाने उदाहरण देण्याजोगा रायगडकरांकडे आणखी एक प्राचीन ठेवा आहे, तो म्हणजे आक्षीच्या पहिल्या मराठीतील शिलालेखाचा. पण हे किती रायगडकरांना माहिती आहे? रायगडकरांचे राहू दे, रायगडच्या किती लोकप्रतिनिधींना मग ते आमदार असोत, खासदार असोत, मंत्री असोत कि स्थानिक पुढारी असोत कोणाला या शिलालेखाबाबत आस्था आहे? जिल्हा परिषद, जिल्हा प्रशासनाला, राज्य शासनाला तर त्याचे काहीच पडले नाही. जिल्हा परिषद अध्यक्ष पदावर आले नि गेले, जिल्हाधिकारीही पदावर आले नि गेले, मुख्यमंत्रीही पदावर आले नि गेले,  पण यापैकी कुणीही आक्षीच्या शिलालेखाची दखल घेतली नाही. त्यामुळे संरक्षण आणि संवर्धनाअभावी तो शिलालेखाचा दगड आहे तेथे १००५ वर्षे झुरत आणि झिजत उभा आहे, यापेक्षा यापेक्षा या जिल्ह्याचे दुसरे दुर्दैव कोणते म्हणायचे?
        शके १०३८ म्हणजे इसवी सन १११६ मधील श्रवणबेळगोळ येथील जैन दिगंबर पंथीय बाहुबलीच्या पायथ्याशी असलेला शिलालेख मराठीतील पहिला म्हणून मानला जात होता; परंतु शके ९३४ म्हणजेच इसवी सन १०१२ मधील आक्षी येथील मराठीतील शिलालेख पहिला असल्याचे प्रसिद्ध संशोधक डॉ. शं.गो. तुळपुळे यांनी सप्रमाण सिद्ध केले. पण रायगड जिल्ह्यासाठी या अभिमानास्पद असलेल्या शिलालेखाच्या जतनासाठी जिल्हाप्रशासन आणि राज्य शासनाने कोणताही पुढाकार घेतला नाही. आक्षीचा शिलालेख जिल्हाप्रशासन आणि शासनाच्या उपेक्षेला सामोरा जात असला तरी जगभरातील पुरातत्व अभ्यासक मात्र आक्षीला मराठीतील या पहिल्या शिलालेखाच्या शोधात येत असतात, त्या प्राचीन ठेव्याची तेथे झालेली दुर्दशा पाहून त्यांच्या डोळ्यात पाणी येते. तो ठेवा आपल्या डोळ्यात आणि कॅमेर्‍यात साठवून ते हळहळतच तेथून जातात. पण काही तस्करही या शिलालेखाची आणि या परिसराची रेकी करुन गेले असण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे या शिलालेखाची चोरी झाल्यावरच जिल्हा प्रशासन आणि राज्य शासन जागे होईल का? आणि तसे झाले तर काय उपयोग? ती ‘बैल गेला नि झोपा केला’ अशीच परिस्थिती असेल.
        यापूर्वी १९९७ साली दिवेआगरला द्रौपदी पाटील यांच्या बागेत जमीन खोदकाम करीत असताना एका लोखंडी पेटीत १ हजार वर्षांपूर्वीचा ५२ कशी सोन्याचा १.३२ किलो वजनाचा सुवर्ण गणेश सापडला होता, त्याची स्थापना ग्रामस्थांनी पेशवेकालिन गणेशमंदिरात केली, परंतु त्याचे संरक्षण योग्यरित्या झाले नाही. सोन्याच्या हव्यासापायी हा पुरातत्वीय ठेवा चोरट्यांनी त्या मंदिरातून २०१२ मध्ये लांबविला आणि तो वितळूनही टाकला आणि एक हजार वर्षांपूर्वीचा पुरातत्वीय वारसा नष्ट झाला. आता आक्षीचा शिलालेख चोरीस जाण्याची शासनाने वाट पाहू नये आणि तो दगड असल्यामुळे चोरीस जाणार नाही, अशा भ्रमातही राहू नये. कारण आंतरराष्ट्रीय बाजारात या आक्षीच्या शिलालेखाची किंमत ५० कोटी रुपयांहून अधिक असू शकते. असा हा तस्करांचं आणि पुरातत्व अभ्यासकांचं, संग्राहकांचं लक्ष वेधून घेणारा ‘दगड’ ही पूर्वी रस्त्याच्या चिरणीत (गटारात) पडलेला होता. १९९५ मध्ये अलिबाग येथे झालेल्या कोकण मराठी साहित्य संमेलनाच्या वेळी आक्षी येथील हा शिलालेख बेवारस अवस्थेत असल्याचे साहित्यिकांच्या लक्षात आले. त्यांनी शिलालेखास सिमेंटच्या चौथर्‍यावर उभे केले. त्यानंतर आजतागायत शिलालेख ऊन-पाऊस झेलीत आहे. त्यावरील अक्षरेही पुसून गेली आहेत. आता अपेक्षा इतकीच आहे की शासनाने आपल्या उदासिनतेने हा प्राचीन वारसा पुसू नये.


        आक्षीतील सोमेश्वर महादेव मंदिराजवळ रस्त्याच्या कडेला असलेल्या या मराठीतील पहिल्या शिलाहारकालीन शिलालेखात राजा केसीदेवराय याचा प्रधान भइर्जू सेणुई याने देवीच्या बोडणासाठी नऊ कुवली (मापे) धान्य दिल्याचा उल्लेख आहे. हा शिलालेख शके ९३४, प्रधावी संवत्सर, अधिक मास (ज्येष्ठ), सुक्रे- शुक्रवार, १६ मे इसवी सन १०१२ चा आहे. हा शिलालेख संस्कृत मराठीमिश्रित देवनागरी लिपीतील असून नऊ ओळींचा आहे. हा कोरलेला लेख असा-
‘गी सुष संतु| स्वस्ति ओं| पसीमस
मुद्रधीपती| स्त्री कोंकणा चक्री-
वर्ती| स्त्री केसीदेवराय| महाप्रधा-
न भइर्जु सेणुई तसीमीनी काले
प्रव्रतमने| सकु संवतु: ९३४ प्रधा
वी संवसरे: अधीकु दीवे सुक्रे बौ-
लु| भइर्जुवें तथा बोडणा तथा नउ
कुवंली अधोर्यु प्रधानु| महलषु-
मीची व आण| लुनया कचली ज-’
        आता ही अक्षरे पुसली गेल्यामुळे ती पाहायला मिळत नाहीत. तथापि, एक हजार पाच वर्षांपूर्वी कोरलेल्या या नऊ ओळींचा अर्थ असा, ‘कल्याण होओ. पश्चिम समुद्राधिपती श्री. कोकण चक्रवर्ती, श्री. केसीदेवराय यांचा महाप्रधान भइर्जु सेणुई याने शक संवत ९३४ प्रधावी संवत्सर अधिक कृष्ण पक्ष शुक्रवार या दिवशी देवीच्या बोडणासाठी नऊ कुवली धान्य नेमून दिले. जगी सुख नांदो.’ कोरलेल्या नऊ ओळींच्या खाली ओणवी स्त्री आणि तीवर आरूढ असे गाढव अशा प्रकारचे चित्र कोरलेले आहे. ही शापवाणी आहे. यास ‘गधेगाळ’ म्हणतात. 
        पहिल्या शिलालेखानंतर २७९ वर्षांनंतर उभारलेला ७२६ वर्षांचा दुसरा यादवकालिन शिलालेख काळंबादेवी मंदिराच्या परिसरात, ग्रामपंचायत कार्यालयाशेजारी आहे. हा शिलालेख देवगिरी यादव नृपती रामचंद्रदेव याच्या राजवटीतील आहे. इथेही वरच्या बाजूस चंद्र-सूर्य आणि गधेेगाळ शिल्प कोरण्यात आले आहे. शके १२१३, खर संवत्सर, चैत्र शुद्ध ८, शुक्रवार, ९ मार्च इसवी सन १२९१ मधील या लेखातही दानविषयक उल्लेख आहेत.  या लेखात म्हटले आहे की यादव नृपती रामचंद्रदेव याचा मांडलिक जाईदेव याचा पुत्र ईश्‍वरदेव क्षत्रिय याने देवीला गद्याण दान दिले आहे. याही शिलालेखाखाली ‘गधेगाळ’ शिल्पं कोरलेले आहे.
       लिखित मजकूर अनंत कालपर्यंत टिकून रहावा म्हणून तो दगडी शिळेवर कोरला तरी त्या दगडांचा गैरवापर होऊ शकतो, तो होऊ नये म्हणून शिलालेेखांवर गधेगाळ शापशिल्पे चितारली जायची. त्या शिल्पात स्त्रीचा गाढवाबरोबर संकर दाखवला जायचा. हे गाढव शिल्प म्हणजे गधेगाळ. शिलाहार, कलचुरी तसेच यादव राजांनी स्थापित केलेली अनेक गधेगाळ शापवाणी शिल्प महाराष्ट्रात सापडतात. या शापशिल्पांमुळे महाराष्ट्रात जिथे जिथे अशाप्रकारचे शिलालेख आहत, त्या दगडांचा वापर इतर कामांसाठी करण्याची कोणाची हिंमत झाली नाही आणि होत नाही. त्यामुळेच आक्षीच्या शिळांवरील लेख पुसले गेले, तरी त्यावर शापवाणीचा संकेत करणारी शिल्पे दिसत असल्यामुळे त्या शिळांचा वापर कोणी खाजगी कामासाठी करण्याचा विचार केला नाही. पण आज हा सारा ठेवा रस्त्याच्या कडेला कुठेतरी उन्हापावसात उभा आहे. या शिलालेखातील अक्षरे आता पुसली गेली आहेत, फक्त शिल्पं दिसत आहेत. त्यांच्या माहितीचा इथे ना फलक आहे, ना गावातील कुणाला त्याची ओळख. यामुळे इथे आलेल्या पर्यटकांनाही त्याचे महत्त्व कळत नाही. खरेतर मराठी भाषेतील या आद्य शिलालेखाचे तेथे स्मारक करून तिथे त्याविषयीची माहिती लावणे गरजेचे आहे. पण असल्या कामासाठी आपल्या मायबाप सरकारला सध्यातरी वेळ नाही.
      महाराष्ट्र, कोकण प्रांत, मराठी भाषा, देवनागरी लिपी आदी अनेक अंगांनी आक्षीच्या दोनही शिलालेखांचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. असे असूनही अशा ठेव्यांची नीट काळजी का घेतली जाऊ नये? पुढेमागे हे शिलालेख तेथून नाहीसे होऊन देशातील वा बाहेरील कोणा संग्राहकाच्या संग्रहात जाऊन पोहोचले आहेत अशी बातमी वाचायला मिळाली तर आश्चर्य वाटण्याचे कारण नाही. आंतरराष्ट्रीय तस्करांनी हा अनमोल ठेवा मुळापासून उखडून नेला तर रायगडकरांच्या आणि महाराष्ट्राच्या हाती असलेला हा एक हजार आठ वर्षांचा अनमोल ठेवा गमावण्याचे पाप राज्य शासन आणि जिल्हा प्रशासनाचे असेल. 

1 टिप्पणी:

  1. देवीचे वार्षिक बोडण करणेसाठी नउ पायली पेराचे शेत दिल्याबद्दलचा शिलालेख आहे.
    बोडण करण्याची परंपरा ही फक्त चित्पावनांमधे असल्याने व त्यांच्या वसाहती संपूर्ण अष्टागरात असल्याने, त्यांच्या इतिहासाशी निगडित हा शिलालेख आहे

    उत्तर द्याहटवा