शुक्रवार, २१ फेब्रुवारी, २०२०

अंधश्रद्धेचे तीनतेरा

   -उमाजी म. केळुसकर ⬑ दादाची गोष्ट ⬉



      राजूने गृहपाठ केला आणि मित्रांबरोबर खेळायला म्हणून तो घराबाहेर पडला. तेव्हा रस्त्यातून काही माणसे धावत जाताना पाहून त्यातील एकाला थांबवून त्याने विचारलं, ‘काय हो काका, तुम्ही असे गडबडीने धावत कुठे चालला आहात?’
       तेव्हा तो माणूस म्हणाला, ‘अरे तुला माहीत नाही? आपल्या गावाजवळ खाटबाबा येत आहेत, त्यांचं दर्शन घेण्यास मी चाललो आहे. ते नेहमी दोन खाटांमध्ये राहतात. तू स्वत: ते पहायला चल माझ्याबरोबर.’
        राजू देखील त्या माणसाबरोबर धावू लागला. गावाबाहेर वटवृक्षाजवळ खूप गर्दी जमली होती. सर्व खाटबाबांच्याच गोष्टी करीत होते. तेथे राजू त्या माणसासह धावत आला. त्यावेळी गर्दीतील एकजण सांगत होता, ‘माझ्या शरीरावर कोड होते. मी खाटबाबांची चरणधूळ आपल्या सर्वांगाला फासली, सात दिवस सतत बाबांचं दर्शन घेतलं आणि अंगावरील कोड पूर्णपणे नाहीसे झाले. आणखी एक व्यक्ती म्हणाली, ‘बाबांच्या अंगात मोठी शक्ती आहे. त्या शक्तीच्या कारणामुळेच ते नेहमी दोन खाटांमध्ये राहतात. परंतु खाटबाबा खाटेवर बसले नाही तर आपल्या अद्भूत शक्तीमुळे पृथ्वीत घुसतील आणि छत्रीप्रमाणे त्यांच्या डोक्यावर खाट नसली तर ते अग्नीबाणाप्रमाणे आकाशात उडून जातील. सुंभाच्या खाटेला मोठे चौकोनी भोगदे असतात ना, यामुळेच धरती आणि आकाशापासून शक्तीचं संतुलन व्यवस्थित राहातं. गेल्या जन्मी बाबांनी एकदा डोक्यावर खाट ठेवायला दिली नाही, तेव्हा ते सरळ आकाशाकडे उडून गेले. डोक्याची धडक आकाशाला लागली आणि आकाशाला छिद्र पडलं. ते छिद्र येथून दिसत नाही. पण त्याचा वैज्ञानिक पुरावा मिळाला आहे. एकोणीसशे चौर्‍याऐंशी व पंच्याऐंशीला अमेरिकेचे दोन उपग्रह बेकाबू झाले होते, त्याचं कारण त्या छिद्रातून येणारी गरम हवा होती.’
       ‘होय तर-’ मघाचा तथाकथित कोडी माणूस म्हणाला, ‘प्राचीन काळी एका जन्मात बाबा खाटेवरुन खाली उतरले होते, तेव्हा धरतीत असे घुसले की ते सरळ दुसर्‍या बाजूने निघाले. तेथे अमेरिका होती. त्यानंतर त्याच मार्गाने भारतातून अमेरिकेला जाऊन अर्जुनाने हत्यारे आणली होती आणि महाभारताचं महायुद्ध केलं होतं. आज देखील भारत सरकार दलालामार्फत अमेरिकेतून हत्यारे आणते. जनतेला असल्या संकटातून वाचविण्यासाठी बाबा आता खाटेवरुन खाली पाय ठेवत नाहीत आणि आपल्या डोक्यावरील खाटेची छत्री काढत नाहीत.’
        राजू खाटबाबांच गुणगान करणार्‍या कथित कोडी माणसाजवळ गेला आणि त्याने विचारलं, ‘तुम्हाला बाबांची चरणधूळ कुठून मिळाली? बाबा तर धुळीत पाय ठेवतच नाहीत ना?’ त्याच्या या प्रश्‍नावर तो कोडी मोठ्याने हसला आणि सर्व लोकांस त्याचा प्रश्‍न ऐकवला आणि आपलं उत्तरं देखील मोठ्याने ऐकवलं, ‘अरे मुला, तू दोन पायाचा आहेस, पण चारपायीपेक्षा कमी अकलेचा आहेस. अन्य बाबांची तर दोन पायांची धुळ असते, पण खाटबाबांची चारपायांची धूळ जनकल्याणासाठी उपलब्ध आहे. ते खाटेवर बसतात. खाट चारपायांची असते. खाटेचे चार पाय म्हणजे बाबांचे पवित्र पायच जणू! खाटेच्या चार पायांची धूळ अमृतासमान आहे.’
        त्या कोडी माणसाच्या अगाध ज्ञानाने सगळे गावकरी प्रभावित झाले आणि सर्व लोक खाटबाबांच स्मरण करीत अधीरतेने त्यांची प्रतिक्षा करु लागले. दुरुन खाटबाबांच्या जयजयकाराचा आवाज ऐकू येऊ लागला. ‘खाटबाबा आले, खाटबाबा आले’ म्हणत लोक तिकडे धावले. राजू देखील त्यात सामील होता. गर्दीत परत एकदा राजूने त्या कोडी माणसाला शोधलं आणि विचारलं, ‘खाटबाबा या गावात कुठे राहतील?’
        ‘खाटेवरच राहतील.’ कोडी माणूस म्हणाला.
        ‘त्यांची खाट कुठे राहील?’ राजूने चिकित्सकपणे विचारलं.
         ‘जेथे भूमीत श्रीगजानन असतील. ज्या जागी भगवान श्रीगजानन असतील तेथील भूमी पवित्र असेल, तेथेच खाटबाबांचं खाटविमान उतरेल.’ तो कोडी माणूस माहिती पुरवीत होता.
         ‘पण अमूक अमूक जागी भूमीत भगवान श्रीगजानन आहेत, हे कसं कळेल?’ राजूची योग्य शंका.
         ‘हे तुझ्या माझ्यासारख्या क्षुद्र मूढ मानवास कळणार नाही. परंतु ते ब्रह्मज्ञानी-आत्मज्ञानी खाटबाबांना कळतं. भगवान श्रीगजाननातून निघणार्‍या सुक्ष्म तरंगांना बाबांचा मेंदू त्वरीत पकडतो. बाबांनी अशा रीतीने आतापर्यंत भगवान श्रीगजाननाचा शोध घेतला आहे. हे चौदावे भाग्यशाली गाव आहे, येथे भूमीमध्ये श्रीगजानन सापडतील. बाबा येथे एक मंदिर बनवतील.’ तो कोडी म्हणाला.
        राजू मनातल्या मनात पुटपुटला- ठअशी गोष्ट आहे! बाबा पैसा कमविण्यासाठी आले आहेत तर!’
        दुरुन खाटबाबांची स्वारी येताना दिसली. एका खाटेवर बाबा बसले होते. त्याच खाटेच्या पायांना काठ्या बांधून त्यावर छतासारखी दुसरी खाट बांधली होती. खाट भक्तजन घेऊन येत होते.
        लोक बाबांचा जयजयकार करु लागले. बाबांच्या चरणावर रुपये ठेवू लागले, परंतु बाबा द्रव्याला हात लावीत नाहीत म्हणून त्यांचे शिष्य ते रुपये उचलून पाठीमागील खाटांवर ठेवू लागले. त्या खाटांना देखील भक्तांनीच धरलं होतं.
         ही खाटबाबांची मिरवणूक गावात गेली आणि परत गावाबाहेर आली. जसे पोलिसांचे कुत्रे गुन्हेगारांचा वास घेत माग काढत फिरतात, त्याच तर्‍हेने खाटेवर बसलेले बाबा खाली वाकून भूमीतील श्रीगजाननाचा वास घेत, त्या पवित्र जागेचा माग काढत होते. गावाबाहेर अचानक बाबांनी ‘जय श्री गजानन’ म्हटलं. मिरवणूक तिथचं थांबली. एका झाडाखाली बाबांची खाट ठेवली गेली. बाबांनी एका जागी इशारा केला की, येथे भूमीमध्ये श्रीगजानन आहेत. तिसर्‍या दिवशी खोदकाम होईल.
तेथे सारा गाव गोळा झाला, पाहता पाहता राहुट्या तंबू उभे राहिले. भक्तांकरिता चवदार खाद्यपदार्थ येऊ लागले. भजन-कीर्तन होऊ लागलं.
       तिसर्‍या दिवशी आसपासच्या गावातील लोक देखील आले. पोलीस अधीक्षक, जिल्हाधिकारी, पुढारी हे देखील दर्शनाकरिता आले. नंतर बाबांच्या आदेशानुसार खोदकाम सुरु झालं. राजूही तेथे हजर होता. ‘ठण्ण! कसल्यातरी लोखंडी वस्तूत कुदळ लागली. बाबांचे कान उभे राहिले. दगडाची मूर्ती निघणार होती, हा धातूचा आवाज कसला? जमिनीतून एक मोठा कुकर निघाला. त्याला पाहून एक गावकरी ओरडला, ‘अरे, तो तर माझा आहे. तो कुकर पाच दिवसापूर्वी कोणीतरी चोरुन नेला होता.
 खणता खणता एक एक करुन गृहोपयोगी वस्तू निघू लागल्या. या गावात पाच दिवसांपूर्वी अनेक घरांमध्ये चोर्‍या झाल्या होत्या. तोच हा चोरीचा माल होता. बाबा चिंतीत झाले. लोक आपापलं सामान ओळखू लागले. इतक्यात तेथे गडबड झाली. कारण एका पोलीस सब इन्स्पेक्टरबरोबर काही पोलीस एका चोरास पकडून घेऊन तेथे आले. पोलीस सब इन्स्पेक्टरने व पोलिसांनी पोलीस अधीक्षकांस खाडकन सॅल्यूट ठोकला. चोराकडे पाहून पोलीस अधीक्षकांनी विचारलं, ‘काय मामला आहे?’
       पोलीस सबइन्स्पेक्टर म्हणाले, ‘या माणसाने पाच दिवसापूर्वी या गावातील अनेक घरात चोर्‍या केल्या आहेत. याचं म्हणणं असं की, जेव्हा हा चोरीचं सामान घेऊन गावाबाहेर जात होता तेव्हा याने पाहिलं की येथे कोणीतरी व्यक्ती जमीन खोदून त्यात काहीतरी मोठी वस्तू गाडत होता. ती व्यक्ती गेल्यावर याने येथील जमीन खोदली तर त्यातून श्रीगजाननाची एक मूर्ती निघाली. याने विचार केला, ती श्री गजाननाची मूर्ती जुन्या काळातील असेल, परदेशीयांना विकली तर मोठी किंमत येईल, म्हणून याने ती मूर्ती काढून आपल्या थैलीत टाकली आणि चोरीचं सामान या खड्ड्यात टाकलं. मी याला संशयावरुन पकडलं होत. याला बोलता करुन चोरीचं सामान ताब्यात घेण्याकरिता आलोय.’
        हे ऐकून खाटबाबांचे धाबे दणाणले. ते हेच करायचे, गावाबाहेर कुठल्यातरी ठिकाणी दगडाची मूर्ती जमिनीत गाडून नंतर म्हणायचे की, येथे श्रीगजानन निघतील. अचानक गावगाल्यांचं लक्ष बाबाकडे गेलं. पाहिलं, खाटबाबा आणि त्यांचे भक्त खाटा सोडून पळत आहेत, त्यामुळे नाही धरती दुभंगत किंवा आकाश फाटत. खाटबाबांचे तीनतेरा पावणेबारा वाजले होते. या गडबडीचा फायदा घेऊन पोलीसांच्या हाताला हिसडा देऊन तो चोर बेड्यांसह पळू लागला. राजू दूर झाडाखाली उभे राहून ही गंमत पहात होता. तो चोर पळत पळत त्यांच्याच शेजारुन जाऊ लागला. चोर आपल्या शेजारुन पळून जातोय हे पाहून राजूने त्यांच्या अंगावर चित्त्यासारखी झेप घेतली आणि त्याला पकडले व तो म्हणाला, ‘तू चोर नाहीस, लाटबाबा आहेस. तुला पाहून खाटबाबा पळाले. तू आला नसतास तर अशा ढोंबी बाबांच्या अंधश्रद्धेचं भूत गावकर्‍यांनी कायमचं पोसलं असतं. तुझ्यासारख्या काट्याने असा काटा निघाला.’
        एवढ्यात पोलिसांसह पोलीस सबइन्स्पेक्टर तेथे आले. राजूकडून चोराला ताब्यात घेतलं व त्यांनी राजूचं नाव विचारलं आणि त्या चोराला धाडसीपणे पकडल्याबद्दल त्याला शाबासकी दिली.
(उमाजी म. केळुसकर यांच्या "दादाच्या गोष्टी" या बालकथासंग्रहातील एक गोष्ट.)

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा