-उमाजी म. केळुसकर ⬑ पुस्तकवेध ⬉
अलिबागेतील नाट्य-चित्रपट अभिनेते व साहित्यिक शरद कोरडे लिखित ‘झुला’ हा कथासंग्रह प्रतिक प्रकाशन, पुणे या प्रकाशन संस्थेने प्रकाशित केला आहे. या कथासंग्रहात शरद कोरडे यांच्या एकूण ११ कथांचा समावेश असून त्यांनी त्या समाजातील वास्तववादी घटनांच्या आधारे लिहिलेल्या आहेत.
यातली पहिली कथा ‘झुला’ असून त्याच नावाने हा कथासंग्रह प्रकाशीत झाला आहे.रानराईसारख्या डोंगर व जंगलांनी वेढलेल्या आदिवासी वस्ती असलेल्या गावात मुंबईहून एक तरुण डॉक्टर दवाखान्यात बदलून येतो व तेथे त्याला विलक्षण अनुभव येतो. आंब्याच्या झाडावरील झुल्यात त्याला एक गोंडस बालक हसताना दिसतो व त्याच्या भावविश्वाचा तो ताबा घेतो. ही गुढकथा आपणांस नक्कीच अंतर्मुख करायला लावणारी आहे.
नाटक, चित्रपट व लोेककला ही लेखकाच्या खास आवडीची माध्यमे आहेत. या कलाविश्वातील तीन कथा या संग्रहांत आहेत. एका नाटनिर्मात्याला त्याच्या उत्तरकाळात अनपेक्षीतरित्या भेटलेल्या एका चिमुकल्या मुुलीच्या सान्निध्याने त्याचे आयुष्य उजळून निघते व ज्या वेगाने ती त्याच्या आयुष्यात येते त्याच वेगाने ती जगातून नाहीशी होते. तिच्या वियोगामुळे त्याच्या मनात जेे प्रश्न निर्माण होतात त्याचा मागोवा ‘प्रश्न, प्रश्न आणि प्रश्न‘ या कथेंत घेतलेला आहे.
चित्रपट क्षेत्रातील एका निर्माता-दिग्दर्शकास बालपणापासूनच आईची माया देणार्या ‘माई‘ या हॉटेल मालकीणीच्या संपत्तीचे वारस होण्याचा प्रसंग त्याच्या अखेरच्या आयुष्यात माईच्या मृत्यूनंतर येतो. पुढे एका बालकाच्या रुपाने त्यांना खरा वारस कसा सापडतो ते ‘वारस‘ या कथेत विलक्षण संवेदनशीलतेने मांडले आहे.
एक तमाशा कलावंत खेडोपाड्यांत तमाशाचेे प्रयोग करीत असताना नर्तकी असलेल्या त्याच्या पत्नीस गावगुंडांनी पळवून नेण्याचा प्रसंग येतो व त्या गुंडाच्या रांगड्या पण सज्जन मामाने तिची सुटका कशी केली हे ‘मानाचा मुजरा‘ या कथेत प्रभावीतपणे आपल्या समोर येते. ‘शिरपीची आय‘, ‘रोझा ङ्गर्नांडीस‘, ‘सोनेरी पर्स‘ या खरं तर पोलिस चातुर्य कथा असून त्या रहस्यकथाही आहेत.
प्राणघातक हल्ल्यामुळे स्मृतीभ्रंश झालेल्या व आपल्या स्वत:च्या अस्तित्वाचा शोध घेण्यासाठी तळमळणार्या व हॉस्पिटलमध्ये उपचार घेणार्या व्यक्तीची व्यथा लेखकाने ‘अंधारवाटा‘ या कथेत मांडलेली आहे. तर पुनर्जन्मानंतरही आपल्यावर अत्याचार करुन फसवणूक करणार्या आपल्या नराधम पतीचा पाठलाग करुन त्याला धडा शिकवणार्या वृद्ध स्त्रीचे दर्शन आपणास ‘पाठलाग‘ या कथेतून होते, तर ‘माझे घर‘ या कथेत उतारवयांतील आपल्या वडिलांच्या घरावर कब्जा करुन त्यांना बेघर करणार्या लालची मुलाला वडील आपल्या मित्रांच्या सहाय्याने कसा धडा शिकवतात त्याचे मन हेलावून टाकणारे चित्रण या कथेत करण्यात आले आहे. ‘सांगाती‘ या कथेत एका आदिवासी तरुणीच्या धावपटू होण्यापर्यंतचा प्रवास व तिला झालेल्या अपघाताची गुढरम्य कथा लिहिण्यात आलेली आहे.
झुला या कथासंग्रहातील कथा या मानवी नाते संबंधांचेे संवेदनशीतेने चित्रण करणार्या आहेत व आपणास त्या निश्चितच आवडतील अशा आहेत. हा कथासंग्रह प्रवीण जोशी, प्रतिक प्रकाशन, पुणे यांनी प्रसिद्ध केला असून सुप्रसिद्ध लेखिका डॉ. मधुरा कोरान्ने यांनी आपल्या ओघवत्या व प्रासादिक शैलीने प्रस्ता़़़वना लिहिलेली आहे. वैभव चिकोडीकर यांनी विषयानुरुप सुंदर मुखपृष्ठ चितारले आहे.
झुला (कथासंग्रह)
लेखक- शरद कोरडे
प्रकाशक- प्रतिक प्रकाशन, पुणे
पृष्ठ-१३२, मूल्य- १५०/-
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा