-उमाजी म. केळुसकर ⬑ दादागिरी ⬉
महाराष्ट्रात आहेत तसे आणि तितके किल्ले जगात अन्यत्र नाहीत. त्यापैकी रायगड जिल्ह्यात सुमारे ३०-३५ किल्ले आहेत. आपला जिल्हा असा नशीबवान आहे की, या जिल्ह्याचे नाव रायगड आहे आणि संपूर्ण जगात दबदबा असलेला, वंदनीय असलेला किल्ले रायगड आपल्या जिल्ह्यात महाड तालुक्यात आहे. पण किल्ले रायगडसह या जिल्ह्यातील गडकिल्ले, ऐतिहासिक वास्तू यांचं पावित्र्य राखले जात आहे, असे चित्र दिसत नाही.
रायगड जिल्ह्यात सुमारे ३०-३५ किल्ले आहेत. ऐतिहासिक, धार्मिक, लेणी आहेत. इतकेच नव्हे तर छत्रपती शिवाजी महाराजांचे अर्धपुतळे, अश्वारुढ पुतळे जिल्ह्यातीळ प्रमुख शहरांत आहेत. या सर्वांचे पावित्र राखण्याची जबाबदारी स्थानिक स्वराज्य संस्थांची आणि जिल्हा प्रशासनाची आहेच, पण या ऐतिहासिक स्थळांचे दर्शन घेण्यास, त्यांचा अभ्यास करण्यास येणार्यांची, शिवप्रभूंच्या पराक्रमाची, त्यांच्या सुराज्याची अनुभूती घेण्यास येणार्या पर्यटकांचीही जबाबदारी आहे. एक रायगडकर म्हणून आपल्यालाही ही जबाबदारी नाकारता येणार नाही. पण प्रत्यक्षात काय घडते? सांगायला लाज वाटते? गडकिल्ल्याच्या तटबंदींवर, तेथील पडक्या इमारतींवर पर्यटक स्वत:ची नावे रंगवितात, आपल्यासह आपल्या प्रेमपात्रांची नावे तेथे रंगवून आपल्या प्रेमाचा तेथे बाजार भरवितात, तटबंदीवर बसून प्रेमलिलाही मोठ्याप्रमाणात केली जात असल्याचेही दिसून येते. मद्यपानासाठीही गडकिल्ले सोयीचे आहेत, असा भ्रम काही पर्यटकांचा झाला आहे. या सर्व गोष्टींमुळे त्यांच्या कुल्यांवर पोकळ नव्हे, तर भरलेल्या बांबूचे फटके मारण्याची गरज आहे.मुळात जर दारु ढोसायचाच हेतू असेल तर त्यासाठी वेगळे ठिकाणे आहेत आणि खुल्लम-खुल्ला प्रेम करायचे असेल तर त्यासाठीही वेगळी ठिकाणे आहेत, प्रणयराधन करायचे असेल तर त्यासाठीही वेगळी ठिकाणे आहेत. त्यासाठी गडकिल्ल्यांचे पावित्र्य भंग करण्याची गरज नाही. परंतु पर्यटनाच्या नावावर हे सर्व प्रकार काही बांडगुळे करत असल्याने खरोखरच जे ऐतिहासिक, धार्मिक पर्यटनासाठी येतात ते बदनाम होतात.
मद्यपी पर्यटकांनी ङ्गोडलेल्या मद्याच्या बाटल्यांमुळे जिल्ह्यातील गडकिल्ल्यांवरच नाही, तर येथील समुद्र किनारे, धबधबे, धरणे, अभयारण्ये, जंगले, रस्त्यांच्या कडेला शेतांत काचांचा खच पहायला मिळतो. या काचांमुळे पर्यटक, पादचारी, शेतकरी जखमी होण्याचे प्रकार सर्रास घडतात. स्वच्छता मोहिमांमध्ये कचर्याबरोबर मद्याच्या बाटल्या आणि काचा मोठ्याप्रमाणात सापडतात, त्यातून हा प्रश्न किती गंभीर आहे, हे लक्षात येते. अशी परिस्थिती असताना शिवप्रेमी, दूर्गप्रेमी पर्यटक, संस्था दूर्गसंवर्धन चळवळीद्वारे स्वच्छता मोहिमा राबवून गडकिल्ल्यांचे पावित्र्य जपताहेत, त्यांचे करावे तितके कौतुक थोडेच आहे. त्यांच्या या चळवळीला जिल्ह्यातून चांगल्याप्रकारे पाठिंबा मिळत आहे. ही चळवळ राजकीय नेतृत्वाकडून राबविली जात नाही, तर तरुणांकडून राबविली जातेय, ही एक जमेची बाजू आहे.
येेथील ऐतिहासिक वास्तू, गडकिल्ले, धार्मिक स्थळे यांचं कोणत्याही परिस्थितीत पावित्र्य राखलेच पाहिजे. यासाठी स्थानिक प्रशासन आणि जिल्ह्या प्रशासनाने दक्ष राहायला हवे. नागरिकांनी, शिवप्रेमी संघटनांनी या स्थळांचं पावित्र्य राखण्यासाठी पुढाकार घेतला पाहिजे, कारण आपल्या अस्मिता आपणच जपायच्या असतात, त्या आपणच तुडविल्या तर आपलेच हसे होते. इतकेच.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा