-उमाजी म. केळुसकर ⬑ नाट्य-चित्ररंग ⬉
रायगड जिल्ह्यात प्रथमत:च अलिबाग येथे अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद रायगड शाखेच्या वतीने आविष्कार प्रायोगिक नाट्यमहोत्सव २९ ते ३० एप्रिल असे दोन दिवस आयोजित करण्यात आला होता. शाखाध्यक्ष दिलीप जोग आणि त्यांच्या सहकार्यांनी प्रतिकूल परिस्थितीला अनुकूल करुन घेत हा प्रायोगिक नाट्य महोत्सव यशस्वी केला. कारण आज अलिबागेत नव्हे तर सर्वत्रच ऑर्केस्ट्रा, धार्मिक समारंभ आणि राजकीय क्षेत्र सोडले तर नाटक, बौद्धिक व्याख्याने आदी समारंभांना गर्दी क्वचितच असते, अशा परिस्थितीत प्रायोगिक नाटकाचा प्रयोग लावणे हे धाडसच असते, पण नाट्यपरिषद शाखा रायगडने ते धाडस केले. हे धाडस वाया गेले नाही. अलिबागेत नाट्यपरिषदेच्या माध्यमातून नाट्य चळवळ पुनर्जीवित झाली आहे, त्याचे गोड फळ म्हणजे दर्दी रसिकांच्या गर्दीत न्हाऊन निघालेला आविष्कार नाट्यमहोत्सव म्हणावा लागेल.
रायगडकरांसाठी आविष्कार नाट्यमहोत्सव नवा आहे. त्यामुळे आविष्कार हे प्रकरण काय आहे ते आधी सांगितले पाहिजे. ‘आविष्कार’ ही प्रयोगशील नाट्यनिर्मितीचे उद्दिष्ट समोर ठेवून ऐंशीच्या दशकाच्या अगदी सुरुवातीस म्हणजे ९ ङ्गेब्रुवारी १९७१ मुंबईतल्या विजय तेंडुलकर, अरविंद देशपांडे, सुलभा देशपांडे, अरुण काकडे आदी दिग्गज नाट्यकर्मीनी एकत्र येऊन स्थापन केलेली संस्था. ‘आविष्कार’ हे नाव ज्येष्ठ अभिनेत्री सुलभा देशपांडे यांनी दिले आहे. गेली ४६ वर्षे हाडाचे कार्यकर्ते असलेले नाट्यकर्मी अरुण काकडे हे या संस्थेची धुरा समर्थपणे पेलत असून, आजही प्रायोगिक नाटकांचा झरा अविरतपणे रसिकांपर्यंत पोहोचवण्याचे कार्य ‘आविष्कार’च्या माध्यमातून सुरू आहे.
प्रयोगशील नाट्यनिर्मितीची चळवळ अखंडित सुरू राहावी यासाठी ज्येष्ठ नाट्यकर्मी अरुण काकडे हे ‘रंगायन’च्या काळापासून- म्हणजे गेली ६५ वर्षे अविश्रांत झटत आहेत. १९५६ साली त्यांनी विजया मेहता, विजय तेंडुलकर, अरविंद देशपांडे, माधव वाटवे यांच्यासोबत ‘रंगायन’ नाट्यचळवळीत स्वत:ला झोकून दिले. श्री.पु. भागवत यांच्या नेतृत्वाखाली सुरू झालेल्या ‘रंगायन’ चळवळीत विविध पिंड-प्रकृतीची नाटके सादर करण्यात आली. मात्र, १९७० मध्ये संस्थेतील रंगकर्मीमधील मतभेदांमुळे ‘रंगायन’ ङ्गुटली आणि त्यातून आजची आविष्कार नाट्यसंस्था जन्माला आली. ‘आविष्कार’ स्थापन झाली व पूर्वीच्या ‘रंगायन’च्या उद्दिष्टांनुसारच प्रायोगिक व समांतर रंगभूमीच्या कार्यास सुरुवात झाली. ‘आविष्कार’ संस्थेच्या माध्यमातून अरुण काकडे यांनी आजवर २२५ नाट्यकृतींची निर्मिती केलेली असून, त्यांचे आठ हजारावर प्रयोग केले आहेत. ‘आविष्कार’च्या जोडीला ‘चंद्रशाला’ हा बालनाट्य विभागही सुरू करण्यात आला. ‘दुर्गा झाली गौरी’ हे गाजलेले बालनाट्य ही ‘चंद्रशाला’चीच निर्मिती.
आविष्कार नाट्यमहोत्सवाचे उद्घाटन शनिवार, २९ एप्रिल रोजी सायंकाळी ६-३० वाजता अलिबागचे नगराध्यक्ष प्रशांत नाईक यांच्या हस्ते करण्यात येणार होते, परंतु ते काही अपरिहार्य कारणामुळे येऊ शकले नाहीत. त्यामुळे आविष्कारचे अरुण काकडे यांनी दीपप्रज्ज्वलन करुन या महोत्सवाचे उद्घाटन केले. यावेळी दिलीप जोग, नागेश कुळकर्णी, प्रसाद ठोसर व स्वत: मी उपस्थित होतो. सुरुवातीला ५-२५ रसिकांनी पुढच्या खुर्च्या भरल्या होत्या, परंतु पहिल्या दिवशीचे ‘ये कौन चित्रकार है’ पहिले नाटक सुरु होताच, प्रेक्षागार कधी खचाखच भरले आणि भारले ते कळलेच नाही. ही मंत्रमुग्धता पुढील तीनही नाटकांनी रसिकांना दिली.
‘ये कौन चित्रकार है’ हे प्रायोगिक नाटक सुप्रसिद्ध आंतरराष्ट्रीय चित्रकार सुधीर पटवर्धन यांच्या २० चित्रांवर आधारित आहे. सुषमा देशपांडे यांनी लिहिलेल्या नाट्यवस्तूचा हिंदी अनुवाद प्रङ्गुल्ल शिलेदार केलेला आहे. मूळचे पुण्याचे असलेले चित्रकार सुधीर पटवर्धन मुंबईत आले तेव्हाची मुंबई आणि कालौघात तिच्यात झालेले बदल, स्थित्यंतरं, इथली नाना स्तरांतली माणसं, आर्थिक-सामाजिक बदलांनी या शहराचं आमूलाग्र बदललेलं रूपडं, माणसा-माणसांतील नातेसंबंधांत येत गेलेलं तुटलेपण, कलावंतांचं कलावंतपण आणि त्याचं व्यक्तिगत जीवन, अशा अनेक गोष्टी चित्रकार सुधीर पटवर्धन यांना भावल्या आणि त्यांनी त्या आपल्या चित्रांतून बद्ध केल्या आहेत. त्यांतून एक कलाकार म्हणून जसा त्यांचा प्रवास दिसतो, जाणवतो, तसंच त्यांच्यातल्या अतिशय संवेदनशील अशा ‘माणसा’चंही दर्शन घडतं. त्यांच्या वैविध्यपूर्ण कलाकृती एका सूत्रात बांधणं तसं अवघडच. तरीही एखादी नाट्यकृती त्यातून साकारायची तर त्याला एक समान सूत्र, समान दुवा हवा. लेखक सुषमा देशपांडे यांनी ‘चित्रकाराला घडलेलं जीवनदर्शन’ या दुव्याभोवती हा रंगाविष्कार गुंङ्गला आहे. त्यासाठी सुधीर पटवर्धन यांच्या चित्रांतली पात्रं त्यांच्याशी संवाद करताहेत, हा ङ्गॉर्म त्यांनी निवडला. यातील देवदत्त साबळे यांनी गायलेला पोवाडा, पार्श्वसंगीत, प्रकाश योजना, दिग्दर्शन, रंगभूषा,नेपथ्य आणि कलाकारांची अदाकारी, हे सारेच थक्क करायला लावणारे आहे.
यानंतर नाटककार शङ्गाअत खान यांनी ४० वर्षांपूर्वी लिहिलेल्या ‘मुंबईचे कावळे’ या प्रायोगिक नाटकाचे सादरीकरण झाले. या नाटकातून वर्तमान सामाजिक-राजकीय व्यवस्थेची झाडाझडती घेण्यात आली असून अजूनही ते नाटक तेवढच समकालिन वाटतं. वर्तमान सामाजिक-राजकीय व्यवस्थेची झाडाझडती घेत असताना प्रायोगिक मंचावर लोकरंगभूमीच्या शक्यता तपासणारं हे नाटक आहे. त्यात आधुनिक रंगभूमीच्या तथाकथित कर्त्यांनी नाटकाच्या शास्त्रशुद्ध व्याकरणाचा गंध नसलेले लोककलावंत सादर करत असलेल्या नाटकाकडे तुच्छतेनं पाहण्याचा दृष्टिकोनही लेखकाने जाता जाता मांडला आहे. अर्थात आज तो तितकासा ठळक उरलेला नाही, हेही आजचे वास्तव आहे. या नाटकाला प्रियदर्शन जाधव यांचे दिग्दर्शन लाभले आहे. तसेच या नाटकातील गीत व संगीत, प्रकाश योजना आणि भूमिका सारेच परिणामकारक आहे.
समारोपाच्या दिवशी रविवार, ३० एप्रिल रोजी सायंकाळी ६-३० वाजता प्रथम ‘इन्शाअल्ला’ हे नाटक सादर करण्यात आले. ज्येष्ठ नाटककार पंडित सत्यदेव दुबे यांच्या मूळ हिंदी नाटकाच्या चेतन दातार यांनी केलेल्या या मराठी रुपांतराला अजित भगत यांनी दिग्दर्शनाचा साज चढविलेला आहे. या नाटकात प्रायोगिक नाटक, नाट्यकला, दिग्दर्शक व कलाकार यांच्या भावनिक संबंधांचे मार्मिक चित्रण आहे. ’इन्शाअल्ला’ हा आशादर्शक शब्दप्रयोग आहे. नाटकाच्या अखेरीस नाटकाचा नायक सर्वेश्वर, आपल्या मुठीत निकराने जपलेली ’चवन्नी’ आपल्या सहकार्यांकडे सोपवतो आणि ’इन्शाअल्ला’ म्हणत एक्झीट घेतो. एकाअर्थी सर्वेश्वरची ही सत्त्वाची चवन्नी प्रत्येक प्रेक्षकाच्या मुठीत येते आणि ती निकराने जपण्याचं मनस्वी आवाहनही देतं. हे नाटक पाहताना एक वेगळाच बौद्धिक खुराक नाट्यरसिकांना मिळाला. या नाटकाचे नेपथ्य, प्रकाश योजना, संगीत, कलाकार साराच एक वेगळा अनुभव होता.
दुसरे संतोष गुजर लिखित ‘मऊ’ हे नाटक सादर करण्यात आले. या नाटकातून एक वेगळा आणि आजच्या गतीमान, स्पर्धात्मक युगाचा प्रश्न मांडला आहे. सामाजिक स्थित्यंतरात कुटुंब व्यवस्थेत होत असलेले बदल, पालकांच्या मुलांबाबत वाढत चाललेल्या अपेक्षा, त्यांचे बालपण हिरावून त्यांना आधीच मोठे करण्याचा ध्यास, यातून बालमनाची चाललेली होरपळ, त्याचे झालेले दुष्परिणाम यावर हे नाटक भाष्य करते. या नाटकाने नाट्यरसिक पालकांना निश्चितच अंतर्मुख केले. या नाटकाचे दिग्दर्शन व नेपथ्य प्रदीप मुळ्ये यांचे आहे.
प्रत्येक नाटकानंतर रमेश धनावडे, संतोष बोंद्रे, सागर नार्वेकर, अमरदीप ठोंबरे यांनी कलाकार आणि रसिक यांच्यामधील सेतू बनून संवाद साधला. यावेळी त्यांनी अलिबागमध्ये सिद्धराज कलामंदिरच्या माध्यमातून एक नाट्ययुग निर्माण करणारे, ज्येष्ठ पत्रकार भाऊ सिनकर, कलेच्या प्रांतात आपल्या ब्रह्माविष्णूमहेश सिनेप्लेक्सच्या माध्यमातून मनोरंजनाचा झेंडा फडकवत ठेवणारे गजेंद्र दळी, स्थापत्याबरोबर कलेवर निखळ प्रेम करणारे प्रसाद जोग, नव्या तरुणाईचा आवाज व्यक्त करणार्या राही पाटील, भाट्ये वाचनालयाचे नाट्यप्रेमी संचालक नितीन प्रधान आदींची या नाटकांबाबतची मते जाणून घेतली. यातून आणि रसिकांनी दिलेल्या उत्स्फूर्त प्रतिसादातून दोन दिवसात सादर झालेल्या या चार नाटकांनी खरोखरच इतिहास घडविलाच, पण येथील कलाकार आणि रसिक प्रेक्षकांसाठीही हा प्रायोगिक नाट्यमहोत्सव एक नवी दृष्टी आणि नवा विचार देणारी कार्यशाळा होती, हे सिद्ध झाले. आपल्या प्रायोगिक नाटकांना अलिबागेत मिळालेला उत्स्फूर्त प्रतिसाद अनुभवून आविष्कारचे काकडे काका आणि त्यांचे कलाकार, तंत्रज्ञ आणि नाट्यपरिषद रायगड शाखेच्या प्रत्येक कार्यकर्त्याला आपल्या मेहनतीचे चीज झाल्याचे जाणवले, यात कोणतेही दुमत नाही.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा