-उमाजी म. केळुसकर ⬑ दादागिरी ⬉
जूनपासून रायगडात समुद्रातील उधाणाचे पर्व सुरु होणार असून ते सप्टेंबरपर्यंत असणार आहे. त्यामुळे समुद्रकिनारपट्टीच्या, तसेच खाडीकिनारी असलेल्या १२३ गावांना समुद्राच्या उधाणाचा आणि नदी किनार्यांवरील २३२ गावांना पूरसदृश्य स्थितीचा सामना करावा लागणार आहे. उधाणाचा फटका मोठ्या प्रमाणात भातशेतीलाही बसणार आहे. त्यामुळे या उधाणाकडे गांभीर्याने पाहणे आवश्यक आहे. खारेपाटातील शेतीला या उधाणाचा फटका वर्षानुवर्षे बसतोच आहे. पण आता या उधाणांमुळे होणार्या नुकसानीचे संदर्भ वेगळे आहेत. पूर्वी खारेपाटातील शेतकरी या उधाणाशी दोन हात करायला सज्ज असायचा, आता मात्र तो राजकीय उदासिनता आणि मानवनिर्मित पर्यावरण असंतुलनाने हतबल झाला आहे. त्यामुळे अतिवृष्टी आणि आणि उधाण म्हटले की त्याचा थरकाप होतो. असे होऊ नये म्हणून खाडी, समुद्र, नदी, शेती, वने आणि डोंगर यांच्या संरक्षणाची जिल्ह्यात गरज आहे, पण मायबाप सरकारची प्राधान्ये पूर्वीपासून दुसरीच असल्यामुळे हा जिल्हा धास्तावलेलाच असणार आहे. या जिल्ह्यात मालक अनेक आहेत, पण पालक कुणी उरलेला नाही, हे वास्तव आहे.
महाराष्ट्र राज्याला लाभलेल्या सुमारे ७२० कि.मी. लांबीच्या समुद्र किनार्यापैकी रायगड जिल्ह्याला २४० कि.मी. लांबीचा किनारा लाभलेला आहे. हा किनारा रायगड जिल्ह्याचे वैभव असले तरी मोठ्या भरतीच्यावेळी तो शाप वाटतो हे तितकेच खरे आहे. पण हा शाप समुद्राने दिलेला नाही, तर माणसाने आपल्या स्वार्थासाठी ओढवून घेतलेला शाप आहे. समुद्रात भराव टाकून समुद्र मागे हटविण्याचा जो प्रयत्न केला जातो, त्यातून समुद्राला आपल्या सीमा ओलांडाव्या लागतात हे वास्तव आहे. खारङ्गुटीची करण्यात आलेली कत्तल आणि सध्या होत असलेली कत्तल यातून अनेक पर्यावरणीय समस्या उभ्या राहिल्या आहेत आणि त्यामुळे समुद्र आणि खाडीकिनारे धोक्यात आले आहेत. समुद्राला आलेली भरती आपल्या सीमा ओलांडून किनारपट्टीला अक्षरशः ओरबाडून टाकते. यात कोळीबांधवांचे सातत्याने नुकसान होत असते तर खाडीतील उधाणाच्या पाण्याने शेतीचा विद्ध्वंस होत असतो. पावसाळ्यात तर परिस्थिती अधिकच गंभीर बनते.
यंदाच्या पावसाळ्यात जिल्ह्यात समुद्राला १८ दिवस मोठे उधाण येणार आहे. यावेळी साडेचार मीटरपेक्षा उंच लाटा उसळणार असून जून महिन्यात ६ दिवस, जुलैमध्ये ६ दिवस, ऑगस्टमध्ये ४ दिवस तर सप्टेंबरमध्ये २ दिवस उंच लाटा उसळणार आहेत. सर्वात मोठी भरती २५ जून रोजी दुपारी १ वाजून ७ मिनिटांनी येणार असून सर्वात मोठ्या ४.९७ मीटर उंचीच्या लाटा उसळण्याची शक्यता आहे. तर २६ जून रोजी दुपारी १ वाजून ५४ मिनिटांनी ४.९४ मीटर उंचीच्या लाटा उसळणार आहेत. अशा परिस्थितीत या अठरा दिवसांत मुसळधार पाऊस पडल्यास समुद्र व खाडी किनार्यांवरील १२३ गावांना पूरसदृश्य स्थितीचा सामना करावा लागणार आहे. त्यातील समुद्र किनार्यावर असलेल्या अलिबाग तालुक्यातील १६, मुरुड ९, पनवेल ५, उरण ४, श्रीवर्धन तालुक्यात १९ अशा एकूण ५३ गावांना, तसेच खाडी किनार्यावर असलेल्या अलिबाग तालुक्यातील ११, मुरुड ८, पनवेल ११, उरण ५, श्रीवर्धन ११, पेण ९, माणगाव २, महाड ६, म्हसळा ९ अशा एकूण ७० गावांना उधाणाचा मोठा धोका निर्माण झाला आहे.
समुद्र, खाड्यांतील उधाणाचा धोका समोर असतानाच जिल्ह्यातील नदी किनार्यांवरील २३२ गावांना पुराचा धोका संभवतो. जिल्ह्यातील सावित्री, गांधारी, काळ, आंबा, कुंडलिका, पाताळगंगा, भोगावती, बाळगंगा, गाढी, उल्हास या पोलादपूर, महाड, माणगाव, रोहा, सुधागड, पेण, अलिबाग, खालापूर, पनवेल, कर्जत तालुक्यांतील प्रमुख नद्या व खाड्या अतिवृष्टीमुळे भरुन वाहतात. धरणे संपूर्ण भरतात. लगतच्या जिल्ह्यांमध्ये (पुणे व सातारा) अतिवृष्टी झाल्यामुळे तेथील पाणी महाड येथील सावित्री आणि पनवेल व खालापूर येथील पाताळगंगा या नद्यांना मिळून या नद्यांचे पाणी पुढे येते. त्याचवेळी समुद्राला मोठ्या प्रमाणात भरती आल्यास त्याचे पाणी महाड, गोरेगाव, माणगाव, रोहा व अलिबाग तालुक्यातील काही भागात येऊन खाडीलगतच्या गावांमध्ये पूरपरिस्थिती निर्माण होते. याची सुरुवात जिल्ह्यात १९८९ च्या महापुराने झाली. त्यांनंतर २६ जुलै २००५ ला जिल्हा पुन्हा पुरास सामोरा गेला. त्यावेळी आभाळ ङ्गाटल्यागत कोसळणार्या मुसळधार पावसामुळे महाड तालुक्यातील अनेक गावांना पुराचा ङ्गटका बसला होता. दासगाव, कोंडिवते, जुई या डोंगरपायथ्याशी आणि नदीकिनार्यावरील गावांना त्यावेळी सर्वाधिक झळ बसली. जुई गावात दरड कोसळून त्या दरडीखाली सापडल्याने अनेकांना मृत्यू झाला. अनेक दिवस तिथे मृतदेह शोधण्याचे काम सुरु होते. दासगावमध्ये अनेक घरांचे नुकसान झाले. आसपासच्या खेड्यातही दासगावसारखीच परिस्थिती होती. आजही परिस्थिती तशीच आहे. जिल्ह्यात नैसर्गिक आपत्तींमध्ये प्रचंड हानी होऊ शकणारी अनेक गावे आहेत. त्यात सुमारे ८४ गावांना दरडीपासून कमी-जास्त प्रमाणात धोका आहे, ही अतिशय गंभीर बाब आहे. यात डोंगरमाथ्यावर व डोंगराच्या पायथ्याशी दरडी कोसळण्याचा धोका असलेली ३२ गावे महाड आणि २५ गावे पोलादपूर तालुक्यातील आहेत. तर उर्वरित तालुक्यांत श्रीवर्धन १, तळा १, सुधागड १, मुरुड २, पनवेल २, माणगाव ३, कर्जत ३, म्हसळा ४, रोहा ४, खालापूर ६ या तालुक्यातील गावांना भूस्खलन आणि दरडी कोसळण्याचा धोका आहे. हा धोका डोंगर वृक्षराईविना बोडके बनवले गेल्यामुळे निर्माण झाला आहे. माती धरुन ठेवायला झाडे शिल्लक नाहीत, अशा परिस्थितीत पूर आणि दरडी कोसळण्याच्या शक्यता निर्माण होणार नाहीत, तर काय होणार?
रायगड जिल्हा कोकणातील सह्याद्रीच्या पर्वतरांगेत येतो. उंच पर्वतरांगामुळे ढग आडवले जाऊन उष्ण व दमट हवामानामुळे पावसाला सुरुवात होते. तथापि, डोंगरांवरील मोठ्या प्रमाणात होत असलेल्या वृक्ष तोडीमुळे वने नष्ट होत आहेत. त्यामुळे माती धरुन ठेवली जात नाही. संततधार पाऊस पडल्यामुळे सह्याद्रीच्या डोंगरावरील माती सुटी, ठिसूळ होऊन ते ढिगारे व दरडी खाली येतात. त्यामुळे पायथ्याशी असणारी लोकवस्ती याची जीवितहानी व वित्तहानी मोठ्या प्रमाणात झाली आहे आणि यापुढेही होणार आहे. याचे कारण ईश्वरी कोप नाही, तर मानवी घोडचुका आहेत. या घोडचुका आपल्या रायगड जिल्ह्यात केल्या जात आहेत, म्हणून वेळीच सावध होण्याची गरज आहे. येथे पर्यावरणाला बिनदिक्कत नख लावण्यात आले आहे. पर्यावरणाचे सारे नियम धाब्यावर बसवून पर्यावरणाचा र्हास करणे सुरु आहे. झाडांची कत्तल, जंगलांचा र्हास, प्रचंड प्रमाणात नदीतील वाळू उपसा, डोंगर सपाटीकरण, मोठ्या प्रमाणात जमिनीतील दगड काढणे, मुरुम उपसणे, पशुपक्ष्यांची हत्या, वाढती कारखानदारी, त्यातून होणारे जल व वायुप्रदूषण, वाढती वाहने, वाढते सिमेंट जंगल या सर्व बाबी निसर्गाच्या विरोधात आहेत. पण त्या सर्व गोष्टी येथे केल्या जात आहेत. यामुळे निसर्ग समतोल ढासळत आहे. पर्यावरणीय अस्थिरता मोठ्या प्रमाणात होत आहे आणि या असमतोलामुळे निसर्गात अनपेक्षित बदल घडत आहेत. रायगड जिल्ह्याला त्याचे प्रतिकूल परिणाम भोगावे लागणार आहे. जर वेळीच सावध होण्याचा प्रयत्न केला नाही, तर भविष्यात रायगड जिल्ह्याची अतिशय वाईट अवस्था होणार आहे. त्यामुळे डोंगर खाण्याची राक्षसी भूक थांबवा, जंगलांची कत्तल करण्याच्या विकृतीला चाप बसवा, खारङ्गुटी खाऊन जमिनीचे क्षेत्र वाढविण्याचा नादानपणा करु नका, असे निसर्गावर टाच आणणार्यांना ठणकावून सांगण्याची वेळ आली आहे. तसे ठणकावून सांगितले तरच रायगड जिल्हा वाचेल. अन्यथा भरती आणि पाऊस यांच्या जाणीवेनेच जिल्ह्यातील जनतेच्या मनात भीतीच्या लाटा उसळू लागतील. इतकेच.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा