-उमाजी म. केळुसकर ⬑ दादाची गोष्ट ⬉
तो स्कूलबसचा क्लीनर होता. तो जवळ जवळ १५-१६ वर्ष वयाचा होता. त्याच नाव तुकाराम होतं आणि तो शाळेतील मुलांमध्ये खूपच मिळूनमिसळून राहत असे.
मुलं त्याला ‘तुकाभाऊ’ म्हणून हाक मारीत. तो त्यांना रोज वेगवेगळ्या गोष्टी ऐकवी. बसमध्ये चढणार्या लहान मुलांना मदत करे. तो मुलांवर आणि मुलं त्याच्यावर खूप प्रेम करीत.
मुलांना पाहून त्याच्या मनात येई- ‘मला देखील यांच्याप्रमाणे शाळेचा गणवेश घालून शाळेत जाता आलं असतं तर किती मजा आली असती!’ पण तुकाराम बिचारा गरीब होता. त्याच्या वडिलांचे तर केव्हाच निधन झाले होते. घरात अपंग आई होती. म्हणूनच त्याला ‘क्लीनर’ची नोकरी करून घराची गुजराण करावी लागत होती.
तो मनातल्या मनात विचार करीत असे की, जर या मुलांनी शाळेत जाता-येताना मला शिकविलं तर मी देखील शिकू शकतो. त्याने काही मुलांना या संबंधात सांगितलं देखील होतं. परंतु, तुकाभाऊने त्यांना बसमध्ये गोष्टी-कहाण्याच ऐकवाव्या, असे त्यांना वाटत असे. घरी आणि शाळेप्रमाणे बसमध्येही शैक्षणिक वातावरण बनविणं त्यांना आवडत नव्हतं. बिचारा तुकाराम मनातल्या मनात झुरत असे.
एक दिवस मनीषा आपली जुनी पाटी बसमधून बाहेर फेकण्याच्या तयारीत होती. तुकाराम जवळच बसला होता. त्याने ते पाहिलं. तो म्हणाला, ‘मनीषाताई, ती मला देऊन टाक.’
‘ही तर बेकार झाली आहे. हिची चौकटही तुटली आहे. कोणत्याही कामाची नाही ही पाटी.’ मनीषा म्हणाली.
‘काही हरकत नाही, मी तिनेच काम चालविन.’
‘पण, तू याने करशील तरी काय?’ मनीषा म्हणाली.
‘मला देखील शिकायचेय. मला ती दे मनीषाताई!
‘शिकणार्याचं तोंड पहा!’ असं म्हणत मनीषा आणि जवळील सीटवर बसलेल्या तिच्या मैत्रिणींनी हास्याचा धबधबा सोडला. त्या बिचार्याचा चेहरा पडला. मनीषाने ती पाटी फेकून दिली, परंतु त्याला दिली नाही.
विद्याला हे पाहून खूप वाईट वाटलं. तुकारामच्या डोळ्यांतून अश्रू आल्याचेही तिने पाहिलं. तिने आपल्या घराजवळ उतरण्यापूर्वी त्याला विचारलं, ‘तुकाभाऊ, तुला खरोखरच शिकायचं आहे?’
‘होय विद्याताई.’
‘ठीक आहे. मी उद्या तुझ्यासाठी पाटी-पेन्सील आणि माझी मागच्या इयत्तेतील पुस्तके आणून देईन. आता तू रडू नको.’ त्याचं सांत्वन करीत विद्या म्हणाली.
‘तर मग मी तुझ्यासाठी माझ्याजवळ बसण्यासाठी जागा ठेवत जाईन, कारण मी तुला माझी शिक्षिका बनविणार.’ तुकाराम म्हणाला.
‘ठीक आहे. मी तुला शिकवीत जाईन.’ विद्या म्हणाली.
विद्याकडे एक जुनं दप्तर होतं. ती दुसर्या दिवशी त्यात पाटी, पेन्सील, अंकलिपी इत्यादी पुस्तके ठेऊन घेऊन गेली. तिने ते तुकारामला दिलं. तो अतिशय खुष झाला.
आता तो रोज स्कूलबसमध्ये विद्या आणि तिची मैत्रीण छाया या दोघींना आपल्या शेजारी बसवून आणे. आता तो त्यांना ‘मॅडम’ म्हणू लागला. त्या त्याला बसमध्ये आपलं घर येईपर्यंत शिकवीत. जर पाठांतर केलं नाही अथवा अभ्यासात योग्य लक्ष दिलं नाही तर त्या त्याला ओरडत. तो देखील कान पकडून ‘सॉरी मॅडम’ म्हणे.
अशाप्रकारे तुकारामचं शिक्षण चाललं होतं. प्रारंभी तर अन्य मुलांना हे आवडलं नाही, कारण आता त्यांना तुकारामकडून विविध गोष्टी ऐकायला मिळत नव्हत्या. ते विद्या व छायावर नाराज राहू लागले. तरीही तुकारामचं शिक्षण चालू होतं.
हळूहळू अन्य मुलांनी देखील तुकारामला शिकवणं सुरू केलं. आता त्याला एखादा मुलगा वही देई तर कोणी मुलगा पेन्सील. बसची सर्व मुले त्यांचे शिक्षक बनले होते.
बसचा ड्रायव्हर एक सरदारजी होता. तो कित्येकदा तुकारामवर वैतागे आणि म्हणे, ‘अरे नीट नोकरी कर. हे काय वह्या-पुस्तके घेऊन बसतोस?’
सरदारजीचा ओरडा ऐकून त्याची दातखिळी बसे, तेव्हा मुलं सरदारजीला विनंती करीत म्हणत, ‘शिकू द्या काका, तुकारामला. त्याचं काम आम्ही करू.’
मुलांची वकिली ऐकून सरदारजी मनातल्या मनात हसे आणि गप्प होत असे. त्याला माहीत होत की, तुकाराम गरीब मुलगा आहे. आपल्या आईचा एकुलता एक सहारा आहे, चांगलं आहे, थोडा शिकला तर थोडा लायक तरी बनेल. खोल श्वास सोडत तो त्याच्या डोक्यावर हात फिरवून म्हणे, ‘पुत्तर, लिहा-वाचायला शिकशील, तर जीवनाला चांगलं वळण तरी लागेल. आम्हाला कोणी नाही शिकविल, आम्हाला ‘सही’ करणं देखील येत नाही.’
एकदा मुलांची सहल गेली, त्यांना महाबळेश्वरला जायचं होतं, पंधरवड्याचा कार्यक्रम होता. आनंदात-बागडण्यात पंधरवडा कसा निघून गेला तेच कळलं नाही. मुलांना बाटल की पंधरवडा जणू लहान झाला असावा, परंतु पंधरवडा तर संपतच होता, परतावं लागणार तर होतच. सहलीची तुकारामला देखील खूप मजा वाटली. केवळ त्याला एकच गोष्ट वाईट वाटली होती, तो जेव्हा जेव्हा मुलांच्याबरोबर खेळत-बागडत, उठत-बसत असे तेव्हा शाळेचे शिक्षक व संयोजक त्याला दम देत, कोण जाणे संयोजकांना तर तो डोळ्यासमोरही नको नसे. ते मनातल्या मनात निश्चय करून चुकले होते की येथून परत गेल्यावर त्याला नोकरीवरून काढून टाकायचा. तो देखील मनातल्या मनात चिंताक्रांत झाला होता.
रात्रीचं जेवण उरकल्यानंतर परतीचा प्रवास सुरू झाला. बसमध्ये मुलं विविध प्रकारची गाणी गात होती आणि टाळ्या वाजवीत होती. थोड्या वेळाने त्यांना झोप येऊ लागली. सर्व आपापल्या जागी झोपले. संयोजक आणि शिक्षक देखील झोपले. बिचार्या तुकारामच्या डोळ्यावर झोप नव्हती. त्याला राहून राहून आपल्या नोकरीचा विचार येत होता.
रस्त्यामध्ये एका चेकपोस्टवर बसला थांबावं लागलं. तेथे बसची कागदपत्र वगैरेची चेकिंग होत असे. ड्रायव्हरने बस थांबविली आणि कागदपत्र घेऊन चेकपोस्टच्या कार्यालयात निघून गेला. तुकारामने देखील दरवाजा उघडला आणि तो खाली उतरून इकडे तिकडे ङ्गिरू लागला,
चारीबाजूंस काळाकुट्ट अंधार होता, केवळ चेकपोस्टची लाल लाईट चमकत होती. बस जेथे एका बाजूस उभी होती तेथून काही पाऊले पुढेच पर्वताचा भयंकर उतार सुरू होत होता. ड्रायव्हर आल्यावर पुढील प्रवास सुरू करता येईल म्हणून तुकाराम तेथे उभा राहून प्रतीक्षा करीत होता.
इतक्यातच पाठीमागून एक ट्रक आला. त्या ट्रकला देखील चेकपोस्टवर आपली कागदपत्रं दाखवायची होती. म्हणून ड्रायव्हरने बसच्या पाठीमागे आपला ट्रक उभा केला. परंतु ट्रकने थांबता थांबता बसला स्पर्श केला. यामुळे बस हळू हळू पुढे सरकू लागली. हे कोणालाही कळलं नाही.
अचानक तुकारामचं लक्ष बसकडे गेलं. पर्वताचा भयंकर उतार आणि बसमधील बसलेल्या मुलांचा विचार करून तो भीतीने शहारला. बसच्या ड्रायव्हरला बोलवायला किंवा मुलांना जागवून खाली उतरविण्याइतका वेळही नव्हता. त्याच्या लक्षात आलं होतं की, जर बस उतरणीवर पोहोचली तर कोणी जिवंत वाचणार नाही.
त्याने ड्रायव्हरला हाका मारल्या, परंतु त्याला त्या ऐकू आल्या नाहीत. बसला हाताने थांबविण्यासाठी त्याने आपली सारी ताकद पणास लावली. परंतु ती थांबली नाही. संकट प्रत्येक क्षण समीप येत होतं. बस दरीत कोसळून मोठा अनर्थ घडणार होता.
या प्रसंगाने तुकाराम किंचितही गोंधळला नाही. दुसरा कोणताही मार्ग नाही हे जाणून तो बसच्या पुढील टायरसमोर आडवा झोपला. पाय पसरून जवळील मैलाच्या दगडाला पायांची पकड घातली. यामुळे पुढे सरकणारी बस थांबली. तरीदेखील ती त्याच्या डाव्या पायावर थोडेबहुत चाक चढलेच.
संयोजकाने या प्रकारामुळे आपला निश्चयच नाही तर तुकारामबद्दलचे आपले विचार देखील बदलले. शाळेने तुकारामचा इलाज केला आणि त्याला कायमचा आपला कर्मचारी बनविला. नोकरीबरोबरच त्याला शाळेत निःशुल्क शिक्षणाची सुविधा दिली गेली. अशा प्रकारे शिक्षणाच्या ध्यासाने तुकारामचे जीवनच बदलले.
(उमाजी म. केळुसकर यांच्या "दादाच्या गोष्टी" या बालकथासंग्रहातील एक गोष्ट.)
(उमाजी म. केळुसकर यांच्या "दादाच्या गोष्टी" या बालकथासंग्रहातील एक गोष्ट.)

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा