-उमाजी म. केळुसकर ⬑ दादागिरी ⬉
रायगड किल्ल्याइतकेच ‘रायगड मिलिटरी स्कुल’ हे रायगड जिल्ह्याचा मानबिंदू होता. ब्रिटिशांनी १८१८ साली तोफांचा भडिमार करुन किल्ले रायगडचा विद्ध्वंस केला आणि २०१४ साली मात्र स्वकियांनी रायगड मिलिटरी स्कुलला भ्रष्टाचाराच्या दलदलीत ढकलून ते बंद पाडले. किल्ले रायगड आणि रायगड मिलिटरी स्कूल हे दोन्ही महाड तालुक्यातीलच. देशाला पारतंत्र्यात टाकणार्या ब्रिटिशांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या लोककल्याणकारी राज्याचं देशास विस्मरण व्हावे, यासाठी किल्ले रायगडाची नासधूस केली, पण त्यांच्याच राजवटीत किल्ले रायगडाला संरक्षितही केले गेले. या छत्रपती शिवाजी महाराज यांची आठवण सदोदित यावी, किल्ले रायगडचा इतिहास सतत प्रेरणा देत राहावा, जिल्ह्यातील मुलांना जिल्ह्यातच सैनिकी प्रशिक्षण मिळावे, यासाठी क्रांतीसिंह दिगंबर विनायक तथा नानासाहेब पुरोहित यांनी ज्या ‘रायगड मिलिटरी स्कुल’ची स्थापना केली, त्या मिलिटरी स्कुलचा नाश संस्थेच्या संचालकांनी ब्रिटिशांनाही लाज वाटेल अशाप्रकारे केला आहे. कर्जात बुडवून टाकलेल्या या स्कुलची मालमत्ता बँक ऑफ इंडियाकडून २०१७ ला जप्त करण्यात आली. रायगड जिल्ह्यासाठी हे धक्कादायक ठरले. पण ही वस्तुस्थिती होती.
महाराष्ट्रातील ३६ जिल्ह्यांपैकी अहमदनगर, अकोला, अमरावती, उस्मानाबाद, औरंगाबाद, कोल्हापूर, गडचिरोली, गोंदिया, चंद्रपूर, जळगाव, जालना, ठाणे, धुळे, नंदुरबार, नागपूर, नांदेड, परभणी, पुणे, बीड, बुलढाणा, भंडारा, यतमाळ, रत्नागिरी, लातूर, वर्धा, वाशिम, सांगली, सिंधुदुर्ग, सोलापूर, हिंगोली, मुंबई या ३० जिल्ह्यांत ४० सैनिकी शाळा आहेत. त्यांपैकी सातार्यातील सैनिक स्कूल आणि पुण्याची श्री शिवाजी प्रिपरेटरी मिलिटरी स्कुल या अधिक प्रसिद्ध आहेत. या ४० शाळांपैकी तीन कायम विनाअनुदित असून, पुण्यातली एक शाळा खासगी आहे. मुलींसाठी एकूण तीन सैनिकी शाळा आहेत. या सैनिक शाळा असलेल्या जिल्ह्यांत रायगडचे नाव नाही. कारण रायगडचे महाड तालुक्यातील आचळोली येथील रायगड मिलिटरी स्कुल चार वर्षांपूर्वीच संस्थेच्या विश्वस्त पदाधिकार्यांमधील मतभेद, ढिसाळ नियोजन, आर्थिक गैरव्यवहार, कर्जाचा वाढता बोजा या कारणांने बंद झाले आहे. नाहीतर राज्यात ४१ सैनिक शाळा असत्या.
रायगड जिल्ह्याला लढे आणि आंदोलनाचा इतिहास आहे. येथील काही लढ्यांचे नेतृत्व महाडमधील ज्येष्ठ स्वातंत्र्यसेनानी, क्रांतिसिह नानासाहेब पुरोहित केले आहे. त्यांनी जिल्ह्यातील सर्व स्तरांतील मुला-मुलींना सैनिकी शिक्षण मिळावे आणि देशसेवेच्या, देशरक्षणाच्या विविध शाखांत त्यांनी चांगली भूमिका बजवावी असा ध्यास घेतला होता. विशेष म्हणजे त्यांच्या महाड तालुक्याला सैनिकांची मोठी परंपरा लाभली आहे. फौजी अंबावडे, आचळोली, गवाडी, वाकी, दहिवडी, वाघेरी या गावांत प्रत्येक घरामागे किमान एक व्यक्ती भारतीय सैन्यदलात आहे. निवृत्त सैनिकांची जिल्ह्यात सर्वाधिक संख्या महाडचीच आहे. त्यामुळे त्यांनी रक्ताचे पाणी करुन १२ ऑगस्ट १९९० साली या तालुक्यात आचळोली येथे जिल्ह्यातील तरुणांना सैन्य दलात जाण्यासाठी आवश्यक शिक्षण देण्यासाठी रायगड मिलिटरी स्कुलची स्थापना केली. चौथी ते बारावीपर्यंत शिक्षणाची सुविधा या वस्तीशाळेत मिळत असे. निसर्गरम्य अशा सुमारे ५० एकर परिसरात ही शाळा वसली आहे. विद्यार्थ्यांना राहण्यासाठी उत्तम वसतिगृह, अद्ययावत तरण तलाव, खेळांच्या सरावासाठी प्रशस्त मैदान, बॉक्सिंग, घोडेस्वारीचे प्रशिक्षण आदी सुविधा या शाळेत होत्या. ही शाळा १५० विद्यार्थी संख्येने सुरु झाली असली तरी पुढच्या दोन वर्षांच या शाळेत शिक्षण घेणार्या विद्यार्थ्यांची संख्या ७५० पर्यंत पोहोचली आणि पुढे ती ९०० पर्यंत गेली. २००६ नंतर ही विद्यार्थी संख्या वाढण्याऐवजी झपाट्याने घटत गेली आणि शाळा बंद करताना २०१४ साली ती १०० पर्यंत खाली घसरली.
खरे तर या रायगड मिलिटरी स्कुलचे अल्पावधीतच देशात नाव झाले होते. राज्यातून, परराज्यांतूनही मुले या ठिकाणी सैनिकी शिक्षण घेण्यासाठी येऊ लागली होती. तसेच सैनिकी शिक्षणाबरोबर हिवाळी आणि उन्हाळी शिबिरांचे आयोजन केले जात होते. त्यामध्ये रायफल चालविणे, घोड्यावर बसणे, पोहणे, ट्रेकींग इत्यादीचे प्रशिक्षण देण्यात येत होते. विविध उपक्रमांतून शाळेला उत्पन्न मिळण्यास सुरुवात झाली होती. असे असताना या शाळेची अधोगती कशी व का सुरु झाली असा प्रश्न उपस्थित होणे साहजिकच आहे. या शाळेची प्रगती आणि शाळेच्या संचालकांचा हव्यास या अधोगतीस कारण ठरला. या शाळेचा वाढलेला नावलौकिक पाहून मुंबईतही मिलिटरी स्कूल उभारण्याचा निर्णय संचालक मंडळाने घेतला. या शाळेच्या उभारणीसाठी शासनाने मुंबईतील ओशिवरा येथील प्रशस्त भूखंड संस्थेला दिला. त्याजागेवर अद्ययावत शाळा बांधण्यासाठी रायगड मिलिटरी स्कुलच्या तत्कालिन संचालकांनी शाळेचे उत्पन्न वापरलेच, पण बँक ऑफ इंडियाच्या महाड शाखेतून सुमारे ४ कोटी २५ लाखांचे कर्जही काढले आणि आठ मजली अद्ययावत शाळा, तसेच व्यापारी गाळे तेथे बांधले. ही शाळा २००५ साली सुरु झाली आणि तेव्हापासून आचळोलीच्या रायगड मिलिटरी स्कुलला अखेरची घरघर सुरु झाली. शाळेच्या खरेदीत गैरव्यवहार, देणग्या, शैक्षणिक शुल्क आदी विविध बाबतीत भ्रष्टाचार झाल्याच्या चौकशी प्रकरणी धर्मादाय आयुक्तांनी २०१२ साली शाळेची बँक खाती गोठवली, तेव्हा तेथे कोणी कसे शाळेचे आर्थिक शोषण केले हे लक्षात आले. पण कुंपणानेच शेत खाल्ल्यामुळे कारवाई कोणावरच झाली नाही. त्याचे पर्यवसान रायगडचा मानबिंदू बनलेले हे रायगड मिलिटरी स्कुल २०१४ साली बंद करण्यात झाले.
शाळा बंद करण्याचा निर्णय घेताना त्याची कोणतीही पूर्वकल्पना येथील कामगार किंवा अधिकारी वर्गाला संस्थेने दिली नाही. उलट येथे प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांना रातोरात ओशिवरा (मुंबई) येथील शाळेत हलवण्यात आले होते. आचळोली येथील रायगड मिलिटरी स्कुलचा बळी देऊन ओशिवर्याची शाळा सजवण्यार्या संस्थेच्या संचालकांना क्रांतीसिंह नानासाहेब पुरोहित यांच्या ध्येयाचा चुराडा करताना काहीही वाटले नाही, यासारखी दुसरी दुर्दैवी गोष्ट नाही. भविष्यात रायगड मिलिटरी स्कूल दुर्दैवाच्या फेर्यात सापडणार आहे हे नानासाहेब पुरोहित यांना १९९४ मध्येच ओळखले होते. त्यांनी तेव्हा रायगड मिलिटरी स्कूलच्या पैशांचा गैरवापर होत असल्याचे निदर्शनास आणले होते, त्याचे फळ म्हणजे त्यांना, त्यांनी आपल्या आयुष्याच्या अखेरीस उभारलेल्या या संस्थेतील आपल्या पदाचा राजीनामा द्यावा लागला होता. राजीनामा दिल्यानंतर त्याच महिन्यात, २७ नोव्हेंबर १९९४ रोजी त्यांचे निधन झाले. त्यानंतर ज्येष्ठ स्वातंत्र्यसेनानी, माजी राज्यमंत्री प्रभाकर कुंटे संस्थेचे सर्वेसवार्र् बनले. सध्या श्रीमती वर्षा प्रभाकर कुंटे संस्थेच्या अध्यक्ष आहेत. दुर्दैवाने त्यांच्या कारकीर्दीत क्रांतीसिंह नानासाहेब पुरोहित यांच्या नावाने ओळखले जाणारे आचळोलीचे रायगड मिलिटरी स्कुल बंद केले जाऊन, नानासाहेबांची ओळख पुसून टाकण्याचा प्रयत्न केला गेला आहे. आज त्या वास्तूची अतिशय दूरवस्था झाली आहे. आजी-माजी संचालकांच्या पापामुळे ही परिस्थिती ओढवली आहे. हे सारे संपूर्ण रायगडसाठी क्लेषकारक आहे. यामुळे या जिल्ह्याचे कधीही भरुन न येणारे नुकसान झाले आहे.
नफ्यात असलेल्या ओशिवरा येथील शाळेच्या बांधकामासाठी काढलेल्या कर्जापैकी केवळ एक कोटी रुपयांची परतफेड संस्थेने केली. उर्वरित कर्जाची परतफेड संचालक मंडळ गेल्या २२ वर्षांत करु शकले नाही. परिणामी आज व्याजासह हे कर्ज १५ कोटींवर जाऊन पोहोचले आहे. कर्ज परतफेडीचा तगादा लावूनही परतफेड न केली गेल्यामुळे शुक्रवार, २७ जानेवारी २०१७ रोजी बँक ऑफ इंडियाच्या अलिबाग येथील मुख्य शाखेने रायगड मिलिटरी स्कुलच्या मालमत्ता जप्तीची कारवाई केली. ही जप्तीची कारवाई टाळता आली असती. बँकेशी तडजोड करुन रक्कम भरता येणे अशक्य नव्हते.. पण संचालक मंडळाला आचळोलीचे रायगड मिलिटरी स्कुल सुरुच करायचे नाही. त्यांचे प्रेम धंदेवाईक असलेल्या ओशिवर्याच्या मिलिटरी स्कुलवर आहे. ही शाळा क्रांतीसिंह नानासाहेब पुरोहित यांच्या ध्येय धोरणानुसार चालत नाही. शिक्षण हक्क कायद्यानुसार दुर्बल आणि वंचित घटकातील मुलांना खासगी शाळांमध्ये २५ टक्के प्रवेश देणे बंधनकारक आहे. असे असूनही ओशिवर्याच्या मिलिटरी स्कूलने हे प्रवेश नाकारल्याने जून २०१६ ला शिक्षण उपसंचालकांनी शाळेचे ना हरकत प्रमाणपत्र रद्द करण्यात येईल, असा इशारा दिला होता. या इशार्यावरुन ही शाळा संचालकांसाठी एक मलिद्याची वस्तू आणि वास्तू बनली आहे हे दिसून येत आहे. मुळात त्या शाळेची गरजच नव्हती, प्रसंगी ती शाळा बंद करुन, त्या शाळेची मालमत्ता विकून बँकेची कर्जफेड करुन आचळोलीचे रायगड मिलिटरी स्कुल वाचविता आले असते. पण जर संचालक मंडळाला रायगड जिल्ह्यातच मिलिटरी स्कुल नको असेल तर काय करणार? याचा अर्थ रायगडातच घरभेदी आहेत. त्यामुळेच आचळोलीच्या रायगड मिलिटरी स्कुलचा प्रश्न सुटला नाही, हे स्पष्ट आहे.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा