गुरुवार, २७ फेब्रुवारी, २०२०

रायगडात राज्यव्यवहार कोशाची अंमलबजावणी झाली, पण जिल्ह्यात मराठी भाषा ठरलेय न्यूनगंंडाची धनी!

     -उमाजी म. केळुसकर ⬑ रायगडचा डंका ⬉



     किल्ले रायगड ही छत्रपती शिवाजी महारांजाच्या मराठेशाहीची राजधानी होती, येथून महाराष्ट्राचे स्वराज्य आणि जनतेचे सुराज्य नांदत होते. आज किल्ले रायगडचे नाव धारण केलेल्या रायगड जिल्ह्याची राजधानी अलिबाग आहे आणि महाराष्ट्राची राजधानी मुंबई आहे.  मुंबईत महाराष्ट्र दिसत नाही, अलिबागमध्ये बागा दिसत नाही. एक मात्र दोन्हीकडे साम्य आहे, ते मराठीची उपेक्षा दोन्हीकडे सारखीच होत आहे. मोठ्या-छोट्या शहरांची अशी अवस्था असल्यावर उर्वरित महाराष्ट्राची कशी अवस्था असेल याची कल्पना येते. शासकीय पातळीवरुन मराठी भाषेची दूरवस्था चालली असल्याची ओरड महाराष्ट्र राज्य स्थापनेपासूनच होत आली आहे आणि त्यात खोटे काही नसले तरी या राज्यातील मराठी भाषिक जनतेने मराठीचे सत्व राखण्याचा किती प्रयत्न केला आहे हा देखील मोठा प्रश्‍न आहे. २७ फेब्रुवारी रोजी मराठी राजभाषा दिन साजरा होतो. ही औपचारिकता दरवर्षी पार पडत असते. परंतु मराठीचा वापर सर्व पातळ्यांवर होतोय असे दिसत नाही. राजव्यवहार कोशाची अंमलबजावणी झाली, त्या किल्ले रायगड असलेल्या जिल्ह्यातही मराठीबाबतचा न्यूनगंड पहायला मिळतो आहे.
     मराठी राजभाषेला एक हजार वर्षांपेक्षा अधिक मोठा इतिहास आहे. इसवी सन १०१२ चा रायगड जिल्ह्यातील अलिबाग तालुक्यातील आक्षी येथील शिलालेख हा मराठीतील पहिला शिलालेख त्या काळातील राजभाषेकडेच लक्ष वेधणारा आहे. मराठी त्याही आधी बोलली जात होती, पण लिखित स्वरुपातील शिलालेख आक्षी येथे असणे हा या विभागाचा आणि मराठी भाषेचा गौरव आहे. या शिलालेखातून शिल्पकला आणि भाषिक रेखनाचा अपूर्व संगम पाहायला मिळतो. त्यातून कला व भाषा यांचा संबंधही अधोरेखित होतो. विशेष म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांनी १६७४ मध्ये किल्ले रायगडावर स्वत:चा राज्याभिषेक केल्यानंतर आपली मराठी संस्कृती जपली जावी, यासाठी मराठी राज्यव्यवहार कोशाची निर्मिती केली. त्यांनी त्याकाळी होणार्‍या परकीय ङ्गारशी भाषेचे अतिक्रमण रोखण्यासाठी हे पाऊल उचलले. म्हणजेच शिवकालात साडेतीनशे वर्षांपूर्वी व त्याहीपूर्वी, हजार वर्षांपूर्वी असलेली महाराष्ट्रातील राजसत्तांची मराठी ही राजभाषा स्वातंत्र्यानंतरही या राज्याची खर्या अर्थाने राजभाषा असायला हवी होती. पण तसे दिसत नाही. आज जरी महाराष्ट्राची राजभाषा मराठी असली तरी कवीवर्य कुसुमाग्रजांनी म्हटल्याप्रमाणे मराठी मंत्रालयाबाहेर फाटक्या वस्त्रांत उभी आहे, हेही तितकेच खरे आहे.
      संयुक्त महाराष्ट्राच्या स्थापनेला ६० वर्षे होऊन गेली तरीही मराठी भाषेची शासकीय पातळीवर अवहेलना संपलेली नाही. स्थापित राजकीय पक्षांचे राजकीय धोरणही मराठीच्या भाषेच्या अध:पतनास कारणीभूत ठरत आहे, असं म्हटलं तर चूक ठरणार नाही. सरकारी मराठी शाळांमधील घसरणारी विद्यार्थ्यांची हजेरी असो किंवा मराठी शाळांच्या अनुदानाबाबतचे शासनाचे आडमुठे धोरण असो, या चुकीच्या धोरणांमुळे मराठी शाळांची संख्या महाराष्ट्रात झपाट्याने घटली व खासगी अन् विनाअनुदानित इंग्रजी व इतर माध्यमिक शाळांची संख्या गेल्या काही वर्षात वाढली. परिणामी मातृभाषेत शिक्षण घेणार्‍या विद्यार्थ्यांची संख्या झपाट्याने कमी झाली. सरकारी शाळांचीही अनुदानाअभावी होरपळ होत असल्याने मध्यमवर्गीय पालक मोठ्या प्रमाणात खासगी व विनाअनुदानित शाळांकडे वळले. एकंदरित सरकारच्या अयोग्य धोरणामुळे मराठीचे भविष्यच एका अर्थाने अंधारात गेले आहे. रायगड जिल्ह्यातही अशीच परिस्थिती आहे. येथे  परकीय इंग्रजी भाषेला आणि तिचे शिक्षण देणार्‍या इंग्रजी शाळांना प्रतिष्ठा प्राप्त झाली. इंग्रजी भाषा ही जागतिक भाषा असल्याने ती यायलाच पाहिजे. पराभूतांनी गुलामीची काही लक्षणे मिरवायलाच हवीत, पण आपली भाषिक संस्कृती नष्ट करुन हे परिवर्तन घडत असेल, ही गुलामी मिरवली जात असेल तर मात्र या बाबीचा गांभीर्याने विचार व्हायला पाहिजे. रायगड जिल्ह्यात ही इंग्रजीची गुलामी शहरांच्या आणि विविध व्यवसायांच्या नामङ्गलकांतूनही दिसून येत आहे. येथील इमारती, व्यवसाय यांचे नामङ्गलक ६० टक्के इंग्रजीत आहेत. बँकांत तर इंग्रजी आणि हिंदी भाषेच्या मध्ये मराठी भिंग लावून शोधावी लागते. मराठीचा न्यूनगंड अशाप्रकारे जिल्ह्यात पहायला मिळतो आहे, ही दुर्दैवी बाब आहे.
     हिंदी राष्ट्रभाषा असली (हे काही खरे नाही), इंग्रजी ही ज्ञानभाषा असली तरी मराठी ही राजभाषा आहे आणि तिला कशी ज्ञानभाषा बनवावी याचे प्रयत्न होणे गरजेचे आहे. मुळात कुठल्याही मातृभाषा दुय्यम नाहीत, तर त्याकडे बघण्याची माणसाची दृष्टी दुय्यम आहे. त्यामुळेच भाषांवर अन्याय होत आला आहे. प्रत्येक भाषा हे एकप्रकारचे सोने आहे. जास्तीत जास्त भाषा ज्याला बोलता-लिहिता येणेही आजच्या काळाची गरज आहे. पण इतर भाषा आपल्या मातृभाषेला दुय्यम ठरवून, तिचा गळा घोटून आत्मसात केल्या जात असतील तर त्यासारखी दुसरी आत्मवंचना नाही. भाषावार प्रांतरचना झालेल्या महाराष्ट्र राज्यात मराठी भाषेच्या बाबतीत ही आत्मवंचना चालली आहे. महाराष्ट्रात इंग्रजी आणि हिंदी येत नाही, म्हणून मराठी माणसाचे अडत असेल तर यासारखी दुसरी गंभीर गोष्ट नाही. दुर्दैवाची गोष्ट म्हणजे ज्या महाराष्ट्रात मराठीविना अडायला पाहिजे, त्याच महाराष्ट्रात इंग्रजी आणि हिंदीविना मराठी माणसाला अडायला होते. इंग्रजी आणि हिंदी येत नाही म्हणून काही जगण्याचा हक्क नाहीसा होत नाही. पण या भाषांच्या प्रतिष्ठेपायी मराठी भाषेवर अन्याय होत आहे. हा अन्याय सरकारी पातळीवरुन जसा होत आहे, तसाच तो इंग्रजीची पट्टी डोळ्यावर बांधलेल्या मराठी बांधवांकडून होतो आहे. यांच्याकडून मराठी भाषा पूर्णपणे मारली जाणार नाही, हे खरे असले तरी मराठी भाषेचे वैभव यांच्यामुळे काळवंडते आहे. हे वैभव अबाधित ठेवण्यासाठी मराठी मातीचा आणि भाषेचा अभिमान असलेल्या प्रत्येकाने प्रयत्न केला पाहिजे. तशी चळवळ महाराष्ट्रात काही संस्था, व्यक्ती राबवित आहेत, आपल्या रायगड जिल्ह्यानेही याबाबतीत मागे राहून जमणार नाही. ज्या जिल्ह्यातून मराठी राज्यव्यवहार कोशाची अंमलबाजवणी झाली त्या रायगड जिल्ह्याने आपला मराठी बाणा जपलाच पाहिजे. कारण आपल्या अस्मिता आपणच जपायच्या असतात, त्या आपणच तुडविल्या तर आपलेच हसे होते. इतकेच.

बुधवार, २६ फेब्रुवारी, २०२०

आचळोलीच्या बंद मिलिटरी स्कूलचा टाहो

-उमाजी म. केळुसकर ⬑ दादागिरी ⬉



     रायगड किल्ल्याइतकेच ‘रायगड मिलिटरी स्कुल’ हे रायगड जिल्ह्याचा मानबिंदू होता. ब्रिटिशांनी १८१८ साली तोफांचा भडिमार करुन किल्ले रायगडचा विद्ध्वंस केला आणि २०१४ साली मात्र स्वकियांनी रायगड मिलिटरी स्कुलला भ्रष्टाचाराच्या दलदलीत ढकलून ते बंद पाडले. किल्ले रायगड आणि रायगड मिलिटरी स्कूल हे दोन्ही महाड तालुक्यातीलच. देशाला पारतंत्र्यात टाकणार्‍या ब्रिटिशांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या लोककल्याणकारी राज्याचं देशास विस्मरण व्हावे, यासाठी किल्ले रायगडाची नासधूस केली, पण त्यांच्याच राजवटीत किल्ले रायगडाला संरक्षितही केले गेले. या छत्रपती शिवाजी महाराज यांची आठवण सदोदित यावी, किल्ले रायगडचा इतिहास सतत प्रेरणा देत राहावा, जिल्ह्यातील मुलांना जिल्ह्यातच सैनिकी प्रशिक्षण मिळावे, यासाठी क्रांतीसिंह दिगंबर विनायक तथा नानासाहेब पुरोहित  यांनी ज्या ‘रायगड मिलिटरी स्कुल’ची स्थापना केली, त्या मिलिटरी स्कुलचा नाश संस्थेच्या संचालकांनी ब्रिटिशांनाही लाज वाटेल अशाप्रकारे केला आहे. कर्जात बुडवून टाकलेल्या या स्कुलची मालमत्ता बँक ऑफ इंडियाकडून २०१७ ला जप्त करण्यात आली. रायगड जिल्ह्यासाठी हे धक्कादायक ठरले. पण ही वस्तुस्थिती होती.
        महाराष्ट्रातील ३६ जिल्ह्यांपैकी अहमदनगर, अकोला, अमरावती, उस्मानाबाद, औरंगाबाद, कोल्हापूर, गडचिरोली, गोंदिया, चंद्रपूर, जळगाव, जालना, ठाणे, धुळे, नंदुरबार, नागपूर, नांदेड, परभणी, पुणे, बीड, बुलढाणा, भंडारा, यतमाळ, रत्नागिरी, लातूर, वर्धा, वाशिम, सांगली, सिंधुदुर्ग, सोलापूर, हिंगोली, मुंबई या ३० जिल्ह्यांत ४० सैनिकी शाळा आहेत. त्यांपैकी सातार्‍यातील सैनिक स्कूल आणि पुण्याची श्री शिवाजी प्रिपरेटरी मिलिटरी स्कुल या अधिक प्रसिद्ध आहेत. या ४० शाळांपैकी तीन कायम विनाअनुदित असून, पुण्यातली एक शाळा खासगी आहे. मुलींसाठी एकूण तीन सैनिकी शाळा आहेत.  या सैनिक शाळा असलेल्या जिल्ह्यांत रायगडचे नाव नाही. कारण रायगडचे महाड तालुक्यातील आचळोली येथील रायगड मिलिटरी स्कुल चार वर्षांपूर्वीच संस्थेच्या विश्वस्त पदाधिकार्‍यांमधील मतभेद, ढिसाळ नियोजन, आर्थिक गैरव्यवहार, कर्जाचा वाढता बोजा या कारणांने बंद झाले आहे. नाहीतर राज्यात ४१ सैनिक शाळा असत्या. 
        रायगड जिल्ह्याला लढे आणि आंदोलनाचा इतिहास आहे. येथील काही लढ्यांचे नेतृत्व महाडमधील ज्येष्ठ स्वातंत्र्यसेनानी, क्रांतिसिह नानासाहेब पुरोहित केले आहे. त्यांनी जिल्ह्यातील सर्व स्तरांतील मुला-मुलींना सैनिकी शिक्षण मिळावे आणि देशसेवेच्या, देशरक्षणाच्या विविध शाखांत त्यांनी चांगली भूमिका बजवावी असा ध्यास घेतला होता. विशेष म्हणजे त्यांच्या महाड तालुक्याला सैनिकांची मोठी परंपरा लाभली आहे.  फौजी अंबावडे, आचळोली, गवाडी, वाकी, दहिवडी, वाघेरी या गावांत प्रत्येक घरामागे किमान एक व्यक्ती भारतीय सैन्यदलात आहे. निवृत्त सैनिकांची जिल्ह्यात सर्वाधिक संख्या महाडचीच आहे. त्यामुळे त्यांनी रक्ताचे पाणी करुन १२ ऑगस्ट १९९० साली या तालुक्यात आचळोली येथे जिल्ह्यातील तरुणांना सैन्य दलात जाण्यासाठी आवश्यक शिक्षण देण्यासाठी रायगड मिलिटरी स्कुलची स्थापना केली. चौथी ते बारावीपर्यंत शिक्षणाची सुविधा या वस्तीशाळेत मिळत असे. निसर्गरम्य अशा सुमारे ५० एकर परिसरात ही शाळा वसली आहे. विद्यार्थ्यांना राहण्यासाठी उत्तम वसतिगृह, अद्ययावत तरण तलाव, खेळांच्या सरावासाठी प्रशस्त मैदान, बॉक्सिंग, घोडेस्वारीचे प्रशिक्षण आदी सुविधा या शाळेत होत्या. ही शाळा १५० विद्यार्थी संख्येने सुरु झाली असली तरी पुढच्या दोन वर्षांच या शाळेत शिक्षण घेणार्‍या विद्यार्थ्यांची संख्या ७५० पर्यंत पोहोचली आणि पुढे ती ९०० पर्यंत गेली. २००६ नंतर ही विद्यार्थी संख्या वाढण्याऐवजी झपाट्याने घटत गेली आणि शाळा बंद करताना २०१४ साली ती १०० पर्यंत खाली घसरली. 
       खरे तर या रायगड मिलिटरी स्कुलचे अल्पावधीतच देशात नाव झाले होते. राज्यातून, परराज्यांतूनही मुले या ठिकाणी सैनिकी शिक्षण घेण्यासाठी येऊ लागली होती. तसेच सैनिकी शिक्षणाबरोबर हिवाळी आणि उन्हाळी शिबिरांचे आयोजन केले जात होते. त्यामध्ये रायफल चालविणे, घोड्यावर बसणे, पोहणे, ट्रेकींग इत्यादीचे प्रशिक्षण देण्यात येत होते. विविध उपक्रमांतून शाळेला उत्पन्न मिळण्यास सुरुवात झाली होती. असे असताना या शाळेची अधोगती कशी व का सुरु झाली असा प्रश्‍न उपस्थित होणे साहजिकच आहे. या शाळेची प्रगती आणि शाळेच्या संचालकांचा हव्यास या अधोगतीस कारण ठरला. या शाळेचा  वाढलेला नावलौकिक पाहून मुंबईतही मिलिटरी स्कूल उभारण्याचा निर्णय संचालक मंडळाने घेतला. या शाळेच्या उभारणीसाठी शासनाने मुंबईतील ओशिवरा येथील प्रशस्त भूखंड संस्थेला दिला. त्याजागेवर अद्ययावत शाळा बांधण्यासाठी रायगड मिलिटरी स्कुलच्या तत्कालिन संचालकांनी शाळेचे उत्पन्न वापरलेच, पण बँक ऑफ इंडियाच्या महाड शाखेतून सुमारे ४ कोटी २५ लाखांचे कर्जही काढले आणि आठ मजली अद्ययावत शाळा, तसेच व्यापारी गाळे तेथे बांधले. ही शाळा २००५ साली सुरु झाली आणि तेव्हापासून आचळोलीच्या रायगड मिलिटरी स्कुलला अखेरची घरघर सुरु झाली. शाळेच्या खरेदीत गैरव्यवहार, देणग्या, शैक्षणिक शुल्क आदी विविध बाबतीत भ्रष्टाचार झाल्याच्या चौकशी प्रकरणी धर्मादाय आयुक्तांनी २०१२ साली शाळेची बँक खाती गोठवली, तेव्हा तेथे कोणी कसे शाळेचे आर्थिक शोषण केले हे लक्षात आले. पण कुंपणानेच शेत खाल्ल्यामुळे कारवाई कोणावरच झाली नाही. त्याचे पर्यवसान रायगडचा मानबिंदू बनलेले हे रायगड मिलिटरी स्कुल २०१४ साली बंद करण्यात झाले. 
         शाळा बंद करण्याचा निर्णय घेताना त्याची कोणतीही पूर्वकल्पना येथील कामगार किंवा अधिकारी वर्गाला संस्थेने दिली नाही. उलट येथे प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांना रातोरात ओशिवरा (मुंबई) येथील शाळेत हलवण्यात आले होते. आचळोली येथील रायगड मिलिटरी स्कुलचा बळी देऊन ओशिवर्‍याची शाळा सजवण्यार्‍या संस्थेच्या संचालकांना क्रांतीसिंह नानासाहेब पुरोहित यांच्या ध्येयाचा चुराडा करताना काहीही वाटले नाही, यासारखी दुसरी दुर्दैवी गोष्ट नाही. भविष्यात रायगड मिलिटरी स्कूल दुर्दैवाच्या फेर्‍यात सापडणार आहे हे नानासाहेब पुरोहित यांना १९९४ मध्येच ओळखले होते. त्यांनी तेव्हा रायगड मिलिटरी स्कूलच्या पैशांचा गैरवापर होत असल्याचे निदर्शनास आणले होते, त्याचे फळ म्हणजे त्यांना, त्यांनी आपल्या आयुष्याच्या अखेरीस उभारलेल्या या संस्थेतील आपल्या पदाचा राजीनामा द्यावा लागला होता. राजीनामा दिल्यानंतर त्याच महिन्यात,  २७ नोव्हेंबर १९९४ रोजी त्यांचे निधन झाले. त्यानंतर ज्येष्ठ स्वातंत्र्यसेनानी, माजी राज्यमंत्री प्रभाकर कुंटे संस्थेचे सर्वेसवार्र् बनले. सध्या श्रीमती वर्षा प्रभाकर कुंटे संस्थेच्या अध्यक्ष आहेत. दुर्दैवाने त्यांच्या कारकीर्दीत क्रांतीसिंह नानासाहेब पुरोहित यांच्या नावाने ओळखले जाणारे आचळोलीचे रायगड मिलिटरी स्कुल बंद  केले जाऊन, नानासाहेबांची ओळख पुसून टाकण्याचा प्रयत्न केला गेला आहे. आज त्या वास्तूची अतिशय दूरवस्था झाली आहे. आजी-माजी संचालकांच्या पापामुळे ही परिस्थिती ओढवली आहे. हे सारे संपूर्ण रायगडसाठी क्लेषकारक आहे. यामुळे या जिल्ह्याचे कधीही भरुन न येणारे नुकसान झाले आहे.
         नफ्यात असलेल्या ओशिवरा येथील शाळेच्या बांधकामासाठी काढलेल्या कर्जापैकी केवळ एक कोटी रुपयांची परतफेड संस्थेने केली. उर्वरित कर्जाची परतफेड संचालक मंडळ गेल्या २२ वर्षांत करु शकले नाही. परिणामी आज व्याजासह हे कर्ज १५ कोटींवर जाऊन पोहोचले आहे. कर्ज परतफेडीचा तगादा लावूनही परतफेड न केली गेल्यामुळे शुक्रवार, २७ जानेवारी २०१७ रोजी बँक ऑफ इंडियाच्या अलिबाग येथील मुख्य शाखेने रायगड मिलिटरी स्कुलच्या मालमत्ता जप्तीची कारवाई केली. ही जप्तीची कारवाई टाळता आली असती. बँकेशी तडजोड करुन रक्कम भरता येणे अशक्य नव्हते.. पण संचालक मंडळाला आचळोलीचे रायगड मिलिटरी स्कुल सुरुच करायचे नाही. त्यांचे प्रेम धंदेवाईक असलेल्या ओशिवर्‍याच्या मिलिटरी स्कुलवर आहे. ही शाळा क्रांतीसिंह नानासाहेब पुरोहित यांच्या ध्येय धोरणानुसार चालत नाही. शिक्षण हक्क कायद्यानुसार दुर्बल आणि वंचित घटकातील मुलांना खासगी शाळांमध्ये २५ टक्के प्रवेश देणे बंधनकारक आहे. असे असूनही ओशिवर्‍याच्या मिलिटरी स्कूलने हे प्रवेश नाकारल्याने जून २०१६ ला शिक्षण उपसंचालकांनी शाळेचे ना हरकत प्रमाणपत्र रद्द करण्यात येईल, असा इशारा दिला होता. या इशार्‍यावरुन ही शाळा संचालकांसाठी एक मलिद्याची वस्तू आणि वास्तू बनली आहे हे दिसून येत आहे. मुळात त्या शाळेची गरजच नव्हती, प्रसंगी ती शाळा बंद करुन, त्या शाळेची मालमत्ता विकून बँकेची कर्जफेड करुन आचळोलीचे रायगड मिलिटरी स्कुल वाचविता आले असते. पण जर संचालक मंडळाला रायगड जिल्ह्यातच मिलिटरी स्कुल नको असेल तर काय करणार? याचा अर्थ रायगडातच घरभेदी आहेत. त्यामुळेच आचळोलीच्या रायगड मिलिटरी स्कुलचा प्रश्‍न सुटला नाही, हे स्पष्ट आहे.


मंगळवार, २५ फेब्रुवारी, २०२०

...अन्यथा खाडीमार्गे समुद्र खारेपाट संस्कृती मिटवून टाकेल

     -उमाजी म. केळुसकर ⬑ दादागिरी ⬉



      कोकणात रायगड, ठाणे, पालघर, रत्नागिरी, सिंधुदुर्ग  जिल्ह्यापर्यंतच्या क्षेत्रात ६४ खाड्या आहेत आणि त्या सर्वांच्या कडेने मोठ्या प्रमाणात खार जमीन आहे. रायगड जिल्ह्यात ही खारजमीन उरण, पनवेल, पेण, अलिबाग, रोहा, महाड, माणगाव, तळा, म्हसळा, श्रीवर्धन या तालुक्यांत पसरली असली, तरी पेण आणि अलिबाग तालुक्यातील खारजमिनीच्या पट्ट्याला प्रामुख्याने खारेपाट म्हटले जाते. खार जमिनीच्या वाट्याला सातत्याने उपेक्षा येत असल्यामुळे जेथे जेथे खार जमीन आहे, तेथील लोकजीवनावर त्याचा परिणाम होत आला आहे. पेण, अलिबागच्या खारेपाटातील गावकर्‍यांना तर शासनाच्या उदासिनतेमुळे, तेथील कारखान्यांसाठी टाकलेल्या भरावामुळे, खाडीचे बाहेरकाठे फुटल्याने, खारफुटीच्या कत्तलीमुळे, खारभूमी विकास विभागाच्या दुर्लक्षामुळे खाडीच्या खार्‍या पाण्याचं अतिक्रमण सोसावं लागत आहे, त्यांच्या जमिनी नापिक झाल्या आहेत. ही परिस्थिती बदलायची असेल तर खारभूमी विकास विभागाने आपल्या योजना प्रामाणिकपणे आणि गुणवत्तापूर्ण गतीने करणे आवश्यक आहे, अन्यथा खारेपाट संस्कृतीचा नामोनिशाण समुद्र मिटवून टाकेल.
    अलिबाग-पेण तालुक्यातील खारभूमीचा प्रश्‍न ऐरणीवर आला आहे.  या तालुक्यांतील खारेपाटात बाहेरकाठे फुटून येथील शेतजमीन नापिक होण्याचे प्रमाण मोठे आहे, इतकेच नव्हे तर समुद्राचे उधाण खाडीवाटे या परिसरातील गावांना भयकंपित करीत आले आहे. अलिबाग तालुक्यातील गणेशपट्टीसारख्या गावांना तर याचा अधिक फटका बसला आहे. गावात खाडीचं पाणी घुसून या गावाची द्वारका होण्याची वेळ आली तेव्हा हे गाव तेथून उठवून दुसरीकडे वसवावं लागलं होतं. अशी भीषण परिस्थिती खारेपाटची आहे. बाहेरकाठे फुटण्याचे मुख्य कारण म्हणजे खारेपाट क्षेत्रात कंपन्यांनी घातलेले भराव. इस्पात व त्या शेजारच्या टाइल्स बनविणार्‍या एच.आर. जॉन्सन कंपनीने कारखाने ज्या जमिनीवर उभारले ती जमीन खाजण क्षेत्रातली आहे. त्यामुळे भोवतालच्या डोंगरातून माती आणून तिथे भराव करण्यात आला व त्यावर कारखाने उभारले. भराव करताना खाडीला मिळणारे अनेक ओढे-नाले त्यांनी बुजवले. ओढे-नाले हे नद्या व खाड्या यांच्यामधील संतुलन साधत. ते बुजवल्याने खारेपाटाची भौगोलिक रचना बदलली आणि पाण्याचा निचरा न झाल्याने दुसर्‍या ठिकाणी दाब वाढून बाहेरकाठ्यांना भगदाडे पडली. त्यामुळे आजूबाजूची हजारो हेक्टर भातजमिनीत खारे पाणी घुसले आणि ते तसेच तुंबून राहिल्याने बहुतांश भातशेती उद्ध्वस्त झाली. भातशेती बेचिराख झाल्याने खारेपाटातील भूमीपुत्रांच्या जगण्याचे साधनच नष्ट झाले. अजूनही हे दुष्टचक्र थांबलेले नाही.
    नद्या  ज्या ठिकाणी समुद्रास मिळतात अशा प्रदेशात समुद्राच्या खार्‍या पाण्यामुळे खारी जमीन तयार होते. ही जमीन सपाट असली तरी समुद्राचे पाणी पसरल्यामुळे नापीक बनते. खार जमिनीचे पुनर्प्रापण व खार्‍या पाण्यास प्रतिबंध या मोठ्या समस्या आहेत. याबाबत येथील खारेपाटात अठराव्या शतकापासून प्रयत्न करण्यात येत आहेत. समुद्राच्या भरतीखालील जमिनी शेतीच्या उपयोगी करण्यास खार पाडणे असे म्हणतात. या खारेपाटात मीठ उत्पादन आणि भातशेती फार पूर्वीपासून होत आली आहे. पण खारेपाटातील मीठ उत्पादनास छत्रपती शिवाजी महाराज यांनी जसे उत्तेजन दिले, तसेच उत्तेजन सरखेल कान्होजी आंग्रे यांनी खारेपाटात भातशेती करण्यास दिले. त्यांच्यानंतर १७५५ ते १७८० दरम्यान विद्यमान आंग्रेसरकार आणि शिलोतरी यांनी खारजमीन पुनर्प्रापणासाठी विशेष प्रयत्न केले. खारे पाणी अडविण्यासाठी बांधलेल्या बंधार्‍यास एक द्वार असते. तेथे शिळा बसवतात. या दाराची व शिळेची देखरेख करण्यासाठी नेमलेल्या व्यक्तीस काही हक्क किंवा वतन दिलेले असे. त्याला शिलोतरा पाटीलकी म्हटले जायचे. शिळोतरीदार (शिलोतरी) किंवा शिळोत्री म्हणजे या पाटीलकीचा वतनदार होय. १८५८ नंतर ब्रिटिशांनी खारजमिनीकडे विशेष लक्ष पुरविले. पुनर्प्रापणासाठी बाहेरकाठ व आतकाठ नावाचे बंधारे बांधतात. आक्टोबर ते जून बाहेरकाठ्याचे दरवाजे खारे पाणी आत येऊ नये म्हणून बंद ठेवतात. जूनमध्ये जोरदार पाऊस पडताच, परिस्थिती पाहून दरवाजे उघडतात. त्यामुळे पावसाच्या पाण्याने विरघळलेले क्षार पाण्याबरोबर खाडीत वाहून जातात. त्यामुळे खारजमीन लागवडीयोग्य होण्यास मदत होते. खार जमिनीचे पुनर्प्रापण, तेथील मशागत, लागवड पद्धती व योग्य जातीचे बियाणे यावर संशोधन व अभ्यासासाठी १९४३ साली पारगाव (ता. पनवेल) येथे कृषि खार जमीन संशोधन केंद्राची तत्कालिन ब्रिटिश सरकारने स्थापना केली. स्वातंत्र्यानंतर पूर्वी ज्या जमिनी लागवडीखाली नव्हत्या, तिथे शेती करण्यासाठी आणि समुद्राच्या पाण्याचे शेतजमिनीवरील अतिक्रमण थांबवण्यासाठी शासनाने १९४७ मध्ये ‘खारजमीन विकास मंडळ’ स्थापन करण्यात आले. १९४८ साली मुंबई खारजमीन सुधारणा कायदा मंजूर करुन तो तत्कालिन ठाणे, रत्नागिरी, कुलाबा (आताचा रायगड) या जिल्ह्यांना लागू केला. खारजमीन विकास मंडळाने खारजमीन विकासाचे जे काम हाती घेतले त्यात मुख्यत: खारबंदिस्ती  म्हणजे बाहेरकाठ्याच्या बांधकामाचा समावेश होता. पण मंडळाचं काम गलथानपणाचे झाले म्हणून १९७५ साली खारजमिनींचा योग्य विकास करण्याकरिता सरकारने एक अभ्यासगट नेमला. या गटाने खारजमिनी सुधारण्याकरता छप्पन्न शिफारसी केल्या. त्यांतल्या एका शिफारशीप्रमाणे खारजमीन विकास हा विषय पाटबंधारे खात्याकडे सोपवण्यात आला. या निर्णयाची अंमलबजावणी करण्यासाठी सरकारने १९७९ साली पुन्हा वेगळा कायदा मंजर केला.
    खारजमीन विकास योजना ही मागासलेल्या कोकणभागातील एक महत्वाची योजना असल्याने जमीनविकास तसेच खारबंदिस्ती दुरुस्ती व देखरेखीची संपूर्ण जबाबदारी सरकारने स्वीकारली आणि चार जिल्ह्यांना मिळून ६०० छोट्यामोठ्या योजना (काम) कार्यान्वित केल्या. या साठी अर्थातच संबधित शेतकर्‍यांनी आपल्या बंदिस्तीखालच्या जमिनी सरकारकडे वर्ग करायच्या होत्या. तत्पूर्वी दुरुस्ती व देखरेखीचे काम शेतकरी स्वत:च सामुहीक श्रमदानाने करीत. पावसाळ्यात तर रात्ररात्र बांधावर जागून लक्ष ठेवीत. या सामुहीक श्रमाला खारेपाटात ‘जोळ’ पद्धत म्हणतात. शिवाय शेतीत एकत्र काम करायची ‘हांदा’ पद्धतही होती. त्यात सगळ्यांनी मिळून कष्ट करायचे असले तरी नंतर एकत्र जेवणखाण होत असल्यान तो एकप्रकारचा सांस्कृतिक कार्यक्रमच असे. सरकारने हे काम ताब्यात घेतल्यानंतर लोकांनी श्रमदान करायचे थांबवले व बाहेरकाठ्यांची दुरुस्ती करण्यातला त्यांचा सहभाग कमी झाला. पाटबंधारेखाते टेंडर काढून कंत्राटदारांमार्फत काम करु लागले. ते ‘खाते’च असल्याने कामाचा दर्जा काय राहणार ते उघडच होते. यासाठीच्या पैशांची तरतूद सरकारने ‘जिल्हा नियोजन व विकास मंडळा’च्या जिल्हा निधीतून केली. काही ठिकाणच्या शेतकर्‍यांनी आपल्या जमिनी सरकारच्या ताब्यात दिल्या नाहीत, त्यांच्या खारबंदिस्ती खाजगीच राहिल्या.
     खारजमीन विकासाच्या योजनेत अर्थातच फक्त खारबंदिस्तीचा समावेश नव्हता, तर बंधार्‍यालगत मिठागरे तयार करणे, लहान तलाव करुन त्यांत कोलंबी वाढवणे, शेती करणे आणि बाहेरकाठ्यांचा रस्त्यासारखा वापर करणे अशाही कामांचा समावेश होता. पण सरकारचा या कामांंतला उत्साह मर्यादित होता. ठेकेदारांनी भ्रष्टाचार तर सुरु केलाच पण नंतर सरकारने कामांसाठी निधीही उपलब्ध केला नाही. लोकांनी तर हे काम सरकारी काम म्हणून लक्ष देणे सोडले. परिणामी बाहेरकाठे कमकुवत झाले आणि दरवर्षी येणार्‍या उधाणांनी त्यांना भगदाडे पडू लागली. शेती नापिक झाली आणि नांदती गावे खार्‍यापाण्याच्या पडलेल्या वेढ्यामुळे हलवावी लागली. खरेतर पेण आणि अलिबागच्या खारेपाटात हेटवणे आणि आंबाखोर्‍याचे पाणी आणून खारेपाट दुपिकी करायचा होता, परंतु हे पाणी खारेपाटात आणून येथील पाणीप्रश्‍न सोडवण्यास शासनाने दोन तपांहून अधिक काळ टाळाटाळ चालवली आहे आणि खारेपाटच्या हरितपट्ट्याचा औद्योगिक झोन करण्याचे ठरवले. या परिस्थितीमुळे समुद्राचे खाडीमार्गे येणारे संकट अधिकच गडद होणार आहे. कुलाबा जिल्हा ते रायगड जिल्हा आणि पाटबंधारे खाते ते जलसंपदा विभाग या नामपरिवर्तनात खारेपाटाच्या नशिबात मोठा बदल घडला नाही. यामुळे खारेपाटकर अस्वस्थ आहेत. या अस्वस्थतेला उधाण येऊ नये म्हणून शासनाने पुरेसा निधी उपलब्ध करुन खारभूमीच्या सर्व सरकारी, खाजगी योजना पूर्ण केल्या पाहिजेत आणि येथे विकासाच्या नावावर येथे रासायनिक कारखानदारी आणण्यापेक्षा येथील भूमीपुत्रांच्या विकासाबाबतच्या संकल्पना जाणून घेऊन त्याआधारीत विकास साधला तरच तो खारेपाटासाठी आणि जिल्ह्यासाठीही हिताचा ठरेल.

लोकप्रतिनिधींनी रायगडच्या रयतेचे हित पहावे

     -उमाजी म. केळुसकर ⬑ दादागिरी ⬉




     रायगड ही शिवप्रभूंची, सर्वसामान्य रयतेची राजधानी. हेच नाव बॅ.ए.आर. अंतुले यांनी आपल्या मुख्यंत्रीपदाच्या कारकीर्दीत तत्कालिन कुलाबा जिल्ह्याला दिले आणि रायगड जिल्ह्याचे नवे पर्व सुरु झाले. नंतर या जिल्ह्याचे १४ चे १५ तालुके झाले. पण खर्‍या अर्थाने जिल्ह्याचा विकास व्हायला हवा, तेवढा झाला नाही. जिल्ह्यात औद्योगिकरण फोफावलं, अनेक प्रकल्प येऊ घातले आहेत, असे असले तरी भाताचं कोठार समजला जाणारा आपला जिल्हा कृषिक्षेत्रात पांगळा झाल्याचे जे चित्र दिसत आहे ते चिंताजनक आहे. उद्योग क्षेत्र आणि कृषि क्षेत्र ही परस्परपुरक ठेवण्यात न आल्याने, तसेच लोकप्रतिनिधींच्या उदासिनतेमुळे जिल्ह्यात अनेक प्रश्‍न निर्माण झाले आणि त्याचा जिल्ह्यातील विकासावर दुष्परिणाम झाला आहे. अशा रायगडची अपेक्षा कोणीच करणार नाही.
      रायगडची भाताचं कोठार ही ओळख न पुसता जिल्ह्यात औद्योगिकरण झालं असतं आणि येथे कृषिआधारित लघुद्योग, कृषिमालावर प्रक्रिया करणारे उद्योग उभे राहिले असते, तर मोठ्या प्रमाणात बेरोजगारीची समस्याही सुटली असती, पण गेल्या साठ वर्षांत जिल्ह्यात शेतीवर आधारीत फार उद्योग विकसित झाले नाहीत अथवा त्या दृष्टीने फारसे प्रयत्नही झाले नाहीत. त्याउलट भातावर आधारीत पोहा गिरण्यासुद्धा बंद झाल्याचीच उदाहरणे आहेत. फळप्रक्रिया उद्योग ज्या प्रमाणात रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्याचे झाले त्या प्रमाणात रायगड जिल्ह्यात झाले नाही. दक्षिण भारतात एकट्या तामिळनाडूमध्ये नारळाचा काथ्या काढण्याचे ५६ कारखाने आहेत. केरळमधील ही इंडस्ट्री वेगळी. त्यातून अनेक शेतकऱ्यांना व कामगारांना उद्योग प्राप्त झाला आहे. रायगडच्या १५० कि.मी. किनारपट्टीत एखादा लघुउद्योग सोडला तर असा एकही उद्योग नाही. या जिल्ह्यात नद्या आणि समुद्र नासवायला प्रामुख्याने रासायनिक कारखाने उभे राहिले आणि रायगड जिल्हा रयतेचा नाही तर रासायनिक कारखान्यांचा झाला.
      रायगड जिल्ह्यालगत ठाणे, रत्नागिरी, पुणे, सातारा, मुंबई हे जिल्हे आहेत. पण रायगडची ओळख मुंबईच्या जवळचा जिल्हा अशी आहे. त्यामुळे येथे विकासाची गंगा धोधो वाहत असेल असा कोणी समज करुन घेतला तर तो त्याचा गैरसमज असेल. मुंबई जवळ असणे रायगड जिल्ह्यासाठी तोटाच ठरला आहे. हा तोटा सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक, आरोग्य क्षेत्रातील, असा सर्वच बाबतीत आहे. आजही उच्चशिक्षणासाठी रायगडकरांना मुंबई-पुण्यावर अवलंबून राहावे लागते, मुंबई जवळ असल्यामुळे रायगडकरांसाठी साधे आकाशवाणी केंद्र मिळू शकले नाही. रायगड जिल्ह्यात रुग्णांवर उपचार करु शकेल असे चांगले रुग्णालय नाही, दीर्घ कालावधीनंतर जिल्हा रुग्णालयास रिलायन्सच्या सौजन्याने सीटी स्कॅन मशीन मिळाले असले तरी तंत्रज्ञाअभावी बोंबच आहे. एमआरआयसाठी मुंबईवरच अवलंबून राहावे लागत आहे. सर्वच बाबतीत रायगड जिल्ह्याला मुंबईवर अवलंबून राहावे लागत आहे. एकप्रकारचे हे परावलंबित्व आहे. दुर्दैवाने रायगडमधील लोकप्रतिनिधींना यात काही वावगे वाटत नाही.
       रायगड निसर्गसंपन्न जिल्हा आहे. प्रदीर्घ समुद्र किनारा, गड-किल्ले, मंदिरे, लेणी असा सौंदर्यसाज या जिल्ह्याला लाभला आहे. त्यामुळे पर्यटकांसाठी हा जिल्हा पर्यटनासाठी पहिली पसंती ठरला आहे. त्यामुळे पर्यटनावर आधारित उद्योग आणि रोजगाराच्या संधी यांस येथे मोठा वाव आहे, पण चांगले रस्ते, पाणी आणि निवास या बाबींची पुर्तता करण्यात शासन, जिल्हा प्रशासन आणि लोकप्रतिनिधी उदासिन आहेत. पावसाळ्यात तर जिल्हा निसर्गसौंदर्याने फुलून येतो, पण सार्वजनिक बांधकाम विभाग, राज्य-राष्ट्रीय महामार्ग विभाग यांच्या निष्क्रियतेमुळे संपूर्ण जिल्ह्यातील रस्त्यांना खड्ड्यांचे कोड उठते आणि त्यामुळे पर्यटकांना, चाकरमान्यांना, तसेच सर्वसामान्यांना येथील रस्त्यांवरुन प्रवास करणे अवघड बनते, त्यामुळे पर्यटनच संकटात आलेले नाही तर येथील जगणेच संकटात आले आहे. या प्रकारांना कुठेतरी चाप बसणे आवश्यक आहे.
      रायगड जिल्हा मुंबई जवळ असूनही विकासात मागे असण्याचे कारण खरेतर मुंबई नाही, तर येथील लोकप्रतिनिधींची मानसिकता जिल्ह्याच्या विकासासाठी अनुकूल नाही. राजकारण आयुष्यभर करायचेच असते, पण ते किती टक्के करायचे ठरवले आणि त्यादृष्टीने सर्व लोकप्रतिनिधी समाजकारणासाठी एकत्र आले तर रायगडचा निश्‍चितच कायापालट होईल. छत्रपती शिवाजी महाराजांच्या मनातील रयतेचं राज्य आज लोकशाही असूनही कोणी तंतोतंत चालवू शकत नाही. तथापि रायगडातील लोकप्रतिनिधी मात्र रायगडातील रयतेच्या हितासाठी एकत्र आले तरच त्यांना राज्य आणि केंद्र सरकारकडे रायगडच्या खर्‍याखुर्‍या विकासासाठी एकजुटीने पाठपुरावा करता येईल. तसे झाले तरच रायगडला भविष्य आणि भवितव्य आहे.

रविवार, २३ फेब्रुवारी, २०२०

मानवी नातेसंबंधाचे संवेदनशील चित्रण : झुला

-उमाजी म. केळुसकर ⬑ पुस्तकवेध ⬉



     अलिबागेतील नाट्य-चित्रपट अभिनेते व साहित्यिक शरद कोरडे लिखित ‘झुला’ हा कथासंग्रह प्रतिक प्रकाशन, पुणे या प्रकाशन संस्थेने प्रकाशित केला आहे. या कथासंग्रहात शरद कोरडे यांच्या एकूण ११ कथांचा समावेश असून त्यांनी त्या समाजातील वास्तववादी घटनांच्या आधारे लिहिलेल्या आहेत. 
   यातली पहिली कथा ‘झुला’ असून त्याच नावाने हा कथासंग्रह प्रकाशीत झाला आहे.रानराईसारख्या डोंगर व जंगलांनी वेढलेल्या आदिवासी वस्ती असलेल्या गावात मुंबईहून एक तरुण डॉक्टर दवाखान्यात बदलून येतो व तेथे त्याला विलक्षण अनुभव येतो.  आंब्याच्या झाडावरील झुल्यात त्याला एक गोंडस बालक हसताना दिसतो व त्याच्या भावविश्वाचा तो ताबा घेतो.  ही गुढकथा आपणांस नक्कीच अंतर्मुख करायला लावणारी आहे.
      नाटक, चित्रपट व लोेककला ही लेखकाच्या खास आवडीची माध्यमे आहेत.  या कलाविश्वातील तीन कथा या संग्रहांत आहेत.  एका नाटनिर्मात्याला त्याच्या उत्तरकाळात अनपेक्षीतरित्या भेटलेल्या एका चिमुकल्या मुुलीच्या सान्निध्याने त्याचे आयुष्य उजळून निघते व ज्या वेगाने ती त्याच्या आयुष्यात येते त्याच वेगाने ती जगातून नाहीशी होते. तिच्या वियोगामुळे त्याच्या मनात जेे प्रश्‍न निर्माण होतात त्याचा मागोवा ‘प्रश्‍न, प्रश्‍न आणि प्रश्‍न‘ या कथेंत घेतलेला आहे. 
     चित्रपट क्षेत्रातील एका निर्माता-दिग्दर्शकास बालपणापासूनच आईची माया देणार्‍या  ‘माई‘ या हॉटेल मालकीणीच्या संपत्तीचे वारस होण्याचा प्रसंग त्याच्या अखेरच्या आयुष्यात माईच्या मृत्यूनंतर येतो. पुढे एका बालकाच्या रुपाने त्यांना खरा वारस कसा सापडतो ते ‘वारस‘ या कथेत विलक्षण संवेदनशीलतेने मांडले आहे.
     एक तमाशा कलावंत खेडोपाड्यांत तमाशाचेे प्रयोग करीत असताना नर्तकी असलेल्या त्याच्या पत्नीस गावगुंडांनी पळवून नेण्याचा प्रसंग येतो व त्या गुंडाच्या रांगड्या पण सज्जन मामाने तिची सुटका कशी केली हे ‘मानाचा मुजरा‘ या कथेत प्रभावीतपणे आपल्या समोर येते. ‘शिरपीची आय‘, ‘रोझा ङ्गर्नांडीस‘, ‘सोनेरी पर्स‘ या खरं तर पोलिस चातुर्य कथा असून त्या रहस्यकथाही आहेत.
     प्राणघातक हल्ल्यामुळे स्मृतीभ्रंश झालेल्या व आपल्या स्वत:च्या अस्तित्वाचा शोध घेण्यासाठी तळमळणार्‍या व हॉस्पिटलमध्ये उपचार घेणार्‍या व्यक्तीची व्यथा लेखकाने ‘अंधारवाटा‘ या कथेत मांडलेली आहे.  तर पुनर्जन्मानंतरही आपल्यावर अत्याचार करुन फसवणूक करणार्‍या आपल्या नराधम पतीचा पाठलाग करुन त्याला धडा शिकवणार्‍या वृद्ध स्त्रीचे दर्शन आपणास ‘पाठलाग‘ या कथेतून होते, तर ‘माझे घर‘ या कथेत उतारवयांतील आपल्या वडिलांच्या घरावर कब्जा करुन त्यांना बेघर करणार्‍या लालची मुलाला वडील आपल्या मित्रांच्या सहाय्याने कसा धडा शिकवतात त्याचे मन हेलावून टाकणारे चित्रण या कथेत करण्यात आले आहे. ‘सांगाती‘ या कथेत एका आदिवासी तरुणीच्या धावपटू होण्यापर्यंतचा प्रवास व तिला झालेल्या अपघाताची गुढरम्य कथा लिहिण्यात आलेली आहे.
झुला या कथासंग्रहातील कथा या मानवी नाते संबंधांचेे संवेदनशीतेने चित्रण करणार्‍या आहेत व आपणास त्या निश्‍चितच आवडतील अशा आहेत.  हा कथासंग्रह प्रवीण जोशी, प्रतिक प्रकाशन, पुणे यांनी प्रसिद्ध केला असून सुप्रसिद्ध लेखिका डॉ. मधुरा कोरान्ने यांनी आपल्या ओघवत्या व प्रासादिक शैलीने प्रस्ता़़़वना लिहिलेली आहे. वैभव चिकोडीकर यांनी विषयानुरुप सुंदर मुखपृष्ठ चितारले आहे.
झुला (कथासंग्रह)
लेखक- शरद कोरडे
प्रकाशक- प्रतिक प्रकाशन, पुणे
पृष्ठ-१३२, मूल्य- १५०/- 
                                    

शनिवार, २२ फेब्रुवारी, २०२०

सावधान! १००८ वर्षांचा आक्षीचा शिलालेखही चोरीस जाईल

-उमाजी म. केळुसकर ⬑ दादागिरी ⬉


* रायगड जिल्ह्यातील प्राचीन ठेवा
* देशातील पहिला मराठी शिलालेख
* शिळेवरील मराठी अक्षरे गेलीय पुसली
* शिलालेखावर गधेगाळ शिल्पाची शापवाणी
* पुरातत्वीय वारशाच्या चोरीची शक्यता
* अंदाजे ५० कोटी रुपयांहून अधिक किंमत
* शिलालेखावर सीसीटीव्ही, सुरक्षेची गरज
* शिलालेखाचे माहितीपूर्ण स्मारक व्हावे
* रायगडात सव्वाशे शिलालेख, दहा ताम्रपट
* यापूर्वी दिवेआगरला हजार वर्षांच्या सुवर्णगणेशाची चोरी

       आदिमानव आधी मुद्राभिनयातूनच एकमेकांशी बोलायचे. त्यांच्या खाणाखुणा हीच त्यांची भाषा असायची. या मुद्राभिनयाच्या कलेतूनच भाषेचा उगम झाला. संकेतांना त्यांनी शब्दांचे रुप दिले आणि त्या त्या समूहाची एक भाषा निर्माण झाली. मानव एकमेकांशी बोलू लागला. त्यामुळे आज जगात शेकडो भाषांचा वापर केला जात आहे. त्यात बोलीभाषा आणि प्रमाणभाषा यांचा समावेश आहे. भारतात प्रस्तर (शिलालेख), स्तंभ (लोहस्तंभ), सोन्या-चांदीचे आणि तांब्याचे पत्रे, कापड, भूर्जपत्रे आणि ताडपत्रे, कागद ते कॉम्प्युटर असा लेखन प्रवास राहिला आहे. या प्रवासातील महत्वाचा साक्षीदार रायगड जिल्हा राहिला आहे, कारण मराठीतील पहिला शिलालेख अलिबाग तालुक्यातील आक्षी येथील आहे आणि मराठीतील पहिला ताम्रपट श्रीवर्धन तालुक्यातील दिवआगर येथील आहे. जिल्ह्यात असे सुमारे सव्वाशे शिलालेख व दहा ताम्रपट आहेत. आक्षी येथील मराठीतील पहिल्या शिलालेखास यावर्षी एक हजार आठ वर्ष होत आहेत. आंतरराष्ट्रीय बाजारात या शिलालेखाची किंमत ५० कोटी रुपयांहून अधिक असू शकते. आंतरराष्ट्रीय तस्करांनी हा अनमोल ठेवा मुळापासून उखडून नेला तर रायगडकरांच्या आणि महाराष्ट्राच्या हाती असलेला हा एक हजार आठ वर्षांचा अनमोल ठेवा गमावण्याचे पाप राज्य शासन आणि जिल्हा प्रशासनाचे असेल. 
       रायगडकरांना कोणी असे विचारले की तुमच्याकडे कोणता असा ठेवा आहे तर छत्रपती शिवाजी महाराज यांचा किल्ले रायगडसह अनेक गडकिल्ले आणि जलदूर्ग आमच्याकडे आहेत (भले या ऐतिहासिक वास्तूंच्याबाबत राज्यसरकार आणि जनता म्हणून आपण उदासिन असलो तरी) असे उत्तर अभिमानाने दिले जाईल. असेच अभिमानाने उदाहरण देण्याजोगा रायगडकरांकडे आणखी एक प्राचीन ठेवा आहे, तो म्हणजे आक्षीच्या पहिल्या मराठीतील शिलालेखाचा. पण हे किती रायगडकरांना माहिती आहे? रायगडकरांचे राहू दे, रायगडच्या किती लोकप्रतिनिधींना मग ते आमदार असोत, खासदार असोत, मंत्री असोत कि स्थानिक पुढारी असोत कोणाला या शिलालेखाबाबत आस्था आहे? जिल्हा परिषद, जिल्हा प्रशासनाला, राज्य शासनाला तर त्याचे काहीच पडले नाही. जिल्हा परिषद अध्यक्ष पदावर आले नि गेले, जिल्हाधिकारीही पदावर आले नि गेले, मुख्यमंत्रीही पदावर आले नि गेले,  पण यापैकी कुणीही आक्षीच्या शिलालेखाची दखल घेतली नाही. त्यामुळे संरक्षण आणि संवर्धनाअभावी तो शिलालेखाचा दगड आहे तेथे १००५ वर्षे झुरत आणि झिजत उभा आहे, यापेक्षा यापेक्षा या जिल्ह्याचे दुसरे दुर्दैव कोणते म्हणायचे?
        शके १०३८ म्हणजे इसवी सन १११६ मधील श्रवणबेळगोळ येथील जैन दिगंबर पंथीय बाहुबलीच्या पायथ्याशी असलेला शिलालेख मराठीतील पहिला म्हणून मानला जात होता; परंतु शके ९३४ म्हणजेच इसवी सन १०१२ मधील आक्षी येथील मराठीतील शिलालेख पहिला असल्याचे प्रसिद्ध संशोधक डॉ. शं.गो. तुळपुळे यांनी सप्रमाण सिद्ध केले. पण रायगड जिल्ह्यासाठी या अभिमानास्पद असलेल्या शिलालेखाच्या जतनासाठी जिल्हाप्रशासन आणि राज्य शासनाने कोणताही पुढाकार घेतला नाही. आक्षीचा शिलालेख जिल्हाप्रशासन आणि शासनाच्या उपेक्षेला सामोरा जात असला तरी जगभरातील पुरातत्व अभ्यासक मात्र आक्षीला मराठीतील या पहिल्या शिलालेखाच्या शोधात येत असतात, त्या प्राचीन ठेव्याची तेथे झालेली दुर्दशा पाहून त्यांच्या डोळ्यात पाणी येते. तो ठेवा आपल्या डोळ्यात आणि कॅमेर्‍यात साठवून ते हळहळतच तेथून जातात. पण काही तस्करही या शिलालेखाची आणि या परिसराची रेकी करुन गेले असण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे या शिलालेखाची चोरी झाल्यावरच जिल्हा प्रशासन आणि राज्य शासन जागे होईल का? आणि तसे झाले तर काय उपयोग? ती ‘बैल गेला नि झोपा केला’ अशीच परिस्थिती असेल.
        यापूर्वी १९९७ साली दिवेआगरला द्रौपदी पाटील यांच्या बागेत जमीन खोदकाम करीत असताना एका लोखंडी पेटीत १ हजार वर्षांपूर्वीचा ५२ कशी सोन्याचा १.३२ किलो वजनाचा सुवर्ण गणेश सापडला होता, त्याची स्थापना ग्रामस्थांनी पेशवेकालिन गणेशमंदिरात केली, परंतु त्याचे संरक्षण योग्यरित्या झाले नाही. सोन्याच्या हव्यासापायी हा पुरातत्वीय ठेवा चोरट्यांनी त्या मंदिरातून २०१२ मध्ये लांबविला आणि तो वितळूनही टाकला आणि एक हजार वर्षांपूर्वीचा पुरातत्वीय वारसा नष्ट झाला. आता आक्षीचा शिलालेख चोरीस जाण्याची शासनाने वाट पाहू नये आणि तो दगड असल्यामुळे चोरीस जाणार नाही, अशा भ्रमातही राहू नये. कारण आंतरराष्ट्रीय बाजारात या आक्षीच्या शिलालेखाची किंमत ५० कोटी रुपयांहून अधिक असू शकते. असा हा तस्करांचं आणि पुरातत्व अभ्यासकांचं, संग्राहकांचं लक्ष वेधून घेणारा ‘दगड’ ही पूर्वी रस्त्याच्या चिरणीत (गटारात) पडलेला होता. १९९५ मध्ये अलिबाग येथे झालेल्या कोकण मराठी साहित्य संमेलनाच्या वेळी आक्षी येथील हा शिलालेख बेवारस अवस्थेत असल्याचे साहित्यिकांच्या लक्षात आले. त्यांनी शिलालेखास सिमेंटच्या चौथर्‍यावर उभे केले. त्यानंतर आजतागायत शिलालेख ऊन-पाऊस झेलीत आहे. त्यावरील अक्षरेही पुसून गेली आहेत. आता अपेक्षा इतकीच आहे की शासनाने आपल्या उदासिनतेने हा प्राचीन वारसा पुसू नये.


        आक्षीतील सोमेश्वर महादेव मंदिराजवळ रस्त्याच्या कडेला असलेल्या या मराठीतील पहिल्या शिलाहारकालीन शिलालेखात राजा केसीदेवराय याचा प्रधान भइर्जू सेणुई याने देवीच्या बोडणासाठी नऊ कुवली (मापे) धान्य दिल्याचा उल्लेख आहे. हा शिलालेख शके ९३४, प्रधावी संवत्सर, अधिक मास (ज्येष्ठ), सुक्रे- शुक्रवार, १६ मे इसवी सन १०१२ चा आहे. हा शिलालेख संस्कृत मराठीमिश्रित देवनागरी लिपीतील असून नऊ ओळींचा आहे. हा कोरलेला लेख असा-
‘गी सुष संतु| स्वस्ति ओं| पसीमस
मुद्रधीपती| स्त्री कोंकणा चक्री-
वर्ती| स्त्री केसीदेवराय| महाप्रधा-
न भइर्जु सेणुई तसीमीनी काले
प्रव्रतमने| सकु संवतु: ९३४ प्रधा
वी संवसरे: अधीकु दीवे सुक्रे बौ-
लु| भइर्जुवें तथा बोडणा तथा नउ
कुवंली अधोर्यु प्रधानु| महलषु-
मीची व आण| लुनया कचली ज-’
        आता ही अक्षरे पुसली गेल्यामुळे ती पाहायला मिळत नाहीत. तथापि, एक हजार पाच वर्षांपूर्वी कोरलेल्या या नऊ ओळींचा अर्थ असा, ‘कल्याण होओ. पश्चिम समुद्राधिपती श्री. कोकण चक्रवर्ती, श्री. केसीदेवराय यांचा महाप्रधान भइर्जु सेणुई याने शक संवत ९३४ प्रधावी संवत्सर अधिक कृष्ण पक्ष शुक्रवार या दिवशी देवीच्या बोडणासाठी नऊ कुवली धान्य नेमून दिले. जगी सुख नांदो.’ कोरलेल्या नऊ ओळींच्या खाली ओणवी स्त्री आणि तीवर आरूढ असे गाढव अशा प्रकारचे चित्र कोरलेले आहे. ही शापवाणी आहे. यास ‘गधेगाळ’ म्हणतात. 
        पहिल्या शिलालेखानंतर २७९ वर्षांनंतर उभारलेला ७२६ वर्षांचा दुसरा यादवकालिन शिलालेख काळंबादेवी मंदिराच्या परिसरात, ग्रामपंचायत कार्यालयाशेजारी आहे. हा शिलालेख देवगिरी यादव नृपती रामचंद्रदेव याच्या राजवटीतील आहे. इथेही वरच्या बाजूस चंद्र-सूर्य आणि गधेेगाळ शिल्प कोरण्यात आले आहे. शके १२१३, खर संवत्सर, चैत्र शुद्ध ८, शुक्रवार, ९ मार्च इसवी सन १२९१ मधील या लेखातही दानविषयक उल्लेख आहेत.  या लेखात म्हटले आहे की यादव नृपती रामचंद्रदेव याचा मांडलिक जाईदेव याचा पुत्र ईश्‍वरदेव क्षत्रिय याने देवीला गद्याण दान दिले आहे. याही शिलालेखाखाली ‘गधेगाळ’ शिल्पं कोरलेले आहे.
       लिखित मजकूर अनंत कालपर्यंत टिकून रहावा म्हणून तो दगडी शिळेवर कोरला तरी त्या दगडांचा गैरवापर होऊ शकतो, तो होऊ नये म्हणून शिलालेेखांवर गधेगाळ शापशिल्पे चितारली जायची. त्या शिल्पात स्त्रीचा गाढवाबरोबर संकर दाखवला जायचा. हे गाढव शिल्प म्हणजे गधेगाळ. शिलाहार, कलचुरी तसेच यादव राजांनी स्थापित केलेली अनेक गधेगाळ शापवाणी शिल्प महाराष्ट्रात सापडतात. या शापशिल्पांमुळे महाराष्ट्रात जिथे जिथे अशाप्रकारचे शिलालेख आहत, त्या दगडांचा वापर इतर कामांसाठी करण्याची कोणाची हिंमत झाली नाही आणि होत नाही. त्यामुळेच आक्षीच्या शिळांवरील लेख पुसले गेले, तरी त्यावर शापवाणीचा संकेत करणारी शिल्पे दिसत असल्यामुळे त्या शिळांचा वापर कोणी खाजगी कामासाठी करण्याचा विचार केला नाही. पण आज हा सारा ठेवा रस्त्याच्या कडेला कुठेतरी उन्हापावसात उभा आहे. या शिलालेखातील अक्षरे आता पुसली गेली आहेत, फक्त शिल्पं दिसत आहेत. त्यांच्या माहितीचा इथे ना फलक आहे, ना गावातील कुणाला त्याची ओळख. यामुळे इथे आलेल्या पर्यटकांनाही त्याचे महत्त्व कळत नाही. खरेतर मराठी भाषेतील या आद्य शिलालेखाचे तेथे स्मारक करून तिथे त्याविषयीची माहिती लावणे गरजेचे आहे. पण असल्या कामासाठी आपल्या मायबाप सरकारला सध्यातरी वेळ नाही.
      महाराष्ट्र, कोकण प्रांत, मराठी भाषा, देवनागरी लिपी आदी अनेक अंगांनी आक्षीच्या दोनही शिलालेखांचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. असे असूनही अशा ठेव्यांची नीट काळजी का घेतली जाऊ नये? पुढेमागे हे शिलालेख तेथून नाहीसे होऊन देशातील वा बाहेरील कोणा संग्राहकाच्या संग्रहात जाऊन पोहोचले आहेत अशी बातमी वाचायला मिळाली तर आश्चर्य वाटण्याचे कारण नाही. आंतरराष्ट्रीय तस्करांनी हा अनमोल ठेवा मुळापासून उखडून नेला तर रायगडकरांच्या आणि महाराष्ट्राच्या हाती असलेला हा एक हजार आठ वर्षांचा अनमोल ठेवा गमावण्याचे पाप राज्य शासन आणि जिल्हा प्रशासनाचे असेल. 

अलिबाग रेल्वेचे काय झाले?

      -उमाजी म. केळुसकर ⬑ दादागिरी ⬉



    कोकण रेल्वेचा सिंधुदूर्ग, रत्नागिरी, रायगड या कोकणातील जिल्ह्यांना कोणता फायदा झाला, याचा जर आलेख काढला तर त्याचे उत्तर नकारात्मकच येईल. कोकणातून रेल्वे जाते हे एकच समाधान कोकणवासियांना आहे. रायगड जिल्ह्यातील पेण स्थानकावरून अनेक अतिजलद व जलद गाड्या धावतात, पण त्यापैकी एकही गाडी पेण स्थानकात थांबत नाही. त्यामुळे कोकणात जाणारी जलद गाडी पकडण्यासाठी खालापूर, पेण, अलिबाग तालुक्यातील प्रवाशांना पनवेलला जावे लागते. यात वेळ व पैशांचा अपव्यय होतो. मुंबईच्या जवळ असूनही जिल्हा अतिशय उपेक्षित आहे. अलिबाग तर अतिशय दुर्दैवी आहे, कारण थळपर्यंत आरसीएफच्या मालवाहतुकीसाठी रेल्वे मार्ग उपलब्ध असूनही अलिबागकरांना प्रवासी रेल्वेचे सुख नाही. गेले काही वर्षे अलिबागपर्यंत प्रवासी रेल्वे येणार असल्याचे चित्र रंगवले जात असले, तरी जोपर्यंत हे चित्र प्रत्यक्षात साकार होत नाही, तोपर्यंत अलिबागकरांना जलवाहतूक आणि रस्तेवाहतूक यावरच अवलंबून राहवे लागणार आहे. रेल्वेचा तिसरा पर्याय उपलब्ध झाल्यास आणि तो पार मुरुडपर्यंत गेल्यास अलिबाग-मुरुडच्याच नव्हे तर रायगड पर्यटनाला निश्‍चितच बाळसे येईल.
     रायगड जिल्ह्यातील कर्जत-खोपोली रेल्वे लोहमार्गाची निर्मिती ब्रिटीश राजवटीच्या काळात अंदाजे १८९० साली झाली. १९६६ साली दिवा-पनवेल मार्ग बांधला गेला व १९८६ मध्ये तो रोहापर्यंत वाढवला गेला. अशाप्रकारे रायगड जिल्ह्यातील रोह्यापर्यंत ३१ वर्षांपूर्वी मध्य रेल्वे पोहोचली. त्याच दरम्यान पेण ते थळ असा रेल्वे लोहमार्ग टाकला जाऊन त्यावरुन आर.सी.एफ. प्रकल्पासाठी माल वाहतूक सुरु झाली. पण या तीन दशकांत रायगड जिल्ह्यात रेल्वे प्रवासी वाहतुकीत फारशी क्रांती झाली नाही. तिचा जिल्ह्यात अन्यत्र विस्तार झाला नाही. या तीन दशकांत जिल्ह्यात राजकारण वाढले, औद्योकीकरण मोठ्या प्रमाणात वाढले, पर्यटन वाढले, त्याबरोबर वाहतुकीचे पर्याय वाढले, पण ते पुरेसे ठरले नाहीत. आहे त्या लोहमार्गावरुन रोह्यापर्यंत प्रवासी रेल्वे गाड्यांची पुरेसी वाहतूक होत नसल्याने ती जिल्ह्याच्या विकासात भर घालणारी ठरली नाही. अगदी २२ वर्षांपूर्वी कोकण रेल्वे रोहा ओलांडून जिल्ह्याबाहेर गेली तरीही ङ्गारसे नेत्रदीपक, भरीव असे काही घडले नाही. त्यामुळे कोकण रेल्वे हा देखील रायगड जिल्ह्याच्या विकासाचा फक्त बुडबुडा ठरला. तथापि, ही कोकण रेल्वे रोज तीन राज्यातून ७४१ किमीचा प्रवास करते. हा रेल्वेमार्ग महाराष्ट्र, गोवा आणि कर्नाटक ह्या तीन राज्यातून जातो. कोकण रेल्वेची हद्द रोहा येथून सुरु होते ती थोकुर ह्या मंगलोर जवळील दक्षिण कर्नाटकमधील रेल्वे स्टेशनला संपते.
     मुंबई व मंगळूर या दोन बंदरांदरम्यान थेट मार्ग नसल्यामुळे रेल्वे वाहतूक लांबच्या मार्गाने (पुणे-सोलापूर-बंगळूर) चालू होती. तसेच उंचसखल भूभाग, अनेक नद्या, अतिवृष्टी इत्यादी कारणांमुळे कोकणामध्ये रेल्वे चालू करण्यात अनेक अडथळे येत होते. रेल्वे वाहतूक उपलब्ध नसल्यामुळे कोकणाचा विकास खुंटण्याची भिती व्यक्त करण्यात येत होती. मधू दंडवते, बॅ. नाथ पै, जॉर्ज फर्नांडिस इत्यादी नेत्यांनी केंद्रीय पातळीवर कोकण रेल्वे बांधण्याची मागणी चालू ठेवली. १९९० साली तत्कालीन रेल्वेमंत्री जॉर्ज फर्नांडिसांच्या नेतृत्वाखाली नवी मुंबईमधील सी.बी.डी. बेलापूर येथे मुख्यालय असलेल्या कोकण रेल्वे कॉर्पोरेशन ह्या कंपनीची स्थापना करण्यात आली. ई. श्रीधरन हे कोकण रेल्वे कॉर्पोरेशनचे पहिले चेअरमन होते. १५ सप्टेंबर १९९० रोजी रोहा येथे कोकण रेल्वेचा पायाभरणी समारंभ पार पडला.
      ७४१ किमी लांबीचा हा मार्ग महाड, रत्नागिरी उत्तर, रत्नागिरी दक्षिण, कुडाळ, पणजी, कारवार व उडुपी या प्रत्येकी १०० किमी लांबीच्या ७ भागांमध्ये विभागण्यात आला व प्रत्येक विभागाचे काम स्वतंत्रपणे सुरू करण्यात आले. परदेशांमधून अद्ययावत बांधकाम तंत्रे वापरणारी यंत्रे बांधकामासाठी मागवली गेली. लार्सन अँड टूब्रो, गॅमन इंडिया ह्या भारतामधील मोठ्या बांधकाम कंपन्यांना बांधकामाची कंत्राटे दिली गेली. भूसंपादनामधील अडथळे, अनेक कोर्ट खटले, दुर्गम भूरचना, पावसाळ्यात येणारे पूर व कोसळणार्या दरडी इत्यादी बाबींमुळे कोकण रेल्वेच्या बांधकामाचे वेळापत्रक रखडले. कोकण रेल्वेमार्गावरील पहिली रेल्वे २० मार्च १९९३ रोजी मंगळूर ते उडुपी दरम्यान धावली. रोहा-वीर-खेड-सावंतवाडी या लोहमार्गाचे काम डिसेंबर १९९६ मध्ये पूर्ण झाले. उत्तर गोव्यामधील पेडणे येथील एका बोगद्याचे काम पूर्ण होण्यास एकूण ६ वर्षांचा कालावधी लागला. अखेर २६ जानेवारी १९९८ रोजी कोकण रेल्वेचे उद्घाटन करण्यात आले. हे सर्व सांगण्याचे कारण म्हणजे कोकण रेल्वे हे एक आव्हान होते, पण अलिबागपर्यंत रेल्वे आणणे हे काही आव्हान नाही. अलिबागच्या थळ येथील आरसीएङ्ग प्रकल्पासाठी मालवाहतुकीसाठी रेल्वे लोहमार्ग टाकण्यात आला आहे आणि त्यावरुन गेले ३२ वर्षे कंपनीची मालवाहतूक होते आहे, पण राजकीय उदासिनतेमुळे या रेल्वे लोहमार्गाचा प्रवासी वाहतुकीसाठी उपयोग करण्यात आला नाही, अथवा प्रवासी वाहतुकीसाठी दुसरा रेल्वे लोहमार्ग टाकण्यात आला नाही.
      कोकण रेल्वे ज्या मार्गावरुन धावते तो लोहमार्ग रोह्यापर्यत मध्यरेल्वेच्या अधिकारक्षेत्रात, तर रोह्यापासून कोकण रेल्वेच्या अधिकार क्षेत्रात येतो. पेणहून मध्यरेल्वे अलिबागला आणायची आहे. पण पेण हे रायगड जिल्ह्याचे मध्यवर्ती ठिकाण असूनही त्याचीही एक व्यथा आहे. पेण रेल्वे स्थानकात दिवा-मडगाव, दादर-रत्नागिरी, दादर-रोहा या पॅसेंजर गाड्याच थांबतात. एकही जलद किवा अतिजलद गाडी या स्थानकात थांबत नाही. त्यामुळे या स्थानकाचा उपयोग रायगडमधून कोकणात जाणार्या प्रवाशांना होत नाही. त्यांना लांब पल्ल्याच्या गाड्यांसाठी पनवेल येथे जावे लागते. किमान काही जलद गाड्यांना पेण थांबा द्यावा, हॉलिडे स्पेशल गाड्यांना थांबा मिळावा, पेण स्थानकात रिटर्न तिकीट मिळावे, अशी मागणी आहे. पण या मागणीकडे ङ्गारसे गांभीर्याने पाहिले जात नाही. निश्‍चितच ही मागणी मान्य होणे गरजेचे आहे.
     दिवा-रोहा-दिवा ही गाडी सध्या धावते, अलिकडे पेण-दिवा-पेण,  रोहा-पनवेल-रोहा, पेण-पनवेल-पेण या गाड्या सुरु झाल्या आहेत. त्या नाममात्र आहेत. पण पनवेल-वीर-पनवेल, पनवेल-माणगाव-पनवेल, , पेण-डहाणू-पेण, पेण-सी.एस.टी. अशा गाड्या सुरु कराव्या अशाही मागण्या आहेत. त्या मागण्यांचा कोण आणि कधी विचार करणार असा प्रश्‍न पडतो. खरेतर कोकण रेल्वेचा मार्ग सुरू होऊन तब्बल २२ वर्षांचा कालावधी लोटला; परंतु या मार्गावर जी प्रगती व्हायला हवी होती तशी झाली नाही. मध्य रेल्वे आणि कोकण रेल्वे महामंडळ यांच्या वादातच या मार्गावरील अनेक विकास कामे रखडली गेली. तब्बल ३१ वर्षांपूर्वी रोह्यापर्यंत पोहचलेल्या रेल्वेला मध्य रेल्वे पुढे नेऊ शकली नाहीच; पण या मार्गाचा विकासही करू शकली नाही. मात्र १९९७ मध्ये कोकण रेल्वेचा लोहमार्ग पूर्ण होताच मध्य रेल्वेने या मार्गावर अपेक्षेपेक्षा जास्त गाड्या केरळपर्यंत सोडून या मार्गाचा यथेच्छ लाभ उठविला. या मध्य रेल्वेच्या दिवा-रोहा दरम्यानचा १०१ कि.मी.चा मार्ग एकेरी होता. या मार्गाचे पनवेल-पेण ३५ कि.मी. आणि पेण-रोहा ४० कि.मी. असे ७५ कि.मी.चे दोन टप्पे तयार करून सन २००९ आणि २०११ पर्यंत हा मार्ग पूर्ण करावयाचा होता. परंतु मध्य रेल्वे प्रशासनाच्या ढिसाळपणामुळे हा मार्ग पूर्ण होण्यास तब्बल सहा वर्षें उशीर झाला. यातील प्रथम पनवेल ते पेणपर्यंतचे काम पूर्ण झाले. त्यानंतर पेण ते रोहा टप्प्यातील सर्व कामे मार्च २०१७ ला पूर्ण झाली. त्यावरुन दुहेरी वाहतूक एप्रिल २०१७ ला सुरु झाली. या मार्गावरुन पनवेल-रोहा-पनवेल प्रवासी रेल्वेगाडी अलिकडेच सुरु झाली आहे. तसेच पेण-पनवेल-पेण हा मार्ग दुहेरी तयार आहे. त्या मार्गावरुन पेण-पनवेल-पेण गाडी सुरु आहे. असे असूनही अलिबाग रेल्वेचे घोंगडे भिजत पडले आहे. त्यामुळे अलिबागला रेल्वे स्थानक कधी बांधले जाणार? पेण-अलिबाग रेल्वे मार्ग कधी तयार होणार? आणि त्यावरुन प्रवासी रेल्वे कधी धावणार? त्यासाठी आणखी किती वर्षे वाट पहावी लागणार हा मोठा प्रश्‍नच आहे. अलिबागला प्रवासी रेल्वे सुरु झाल्यास त्याने जिल्ह्याच्या पर्यटनात अमूलाग्र क्रांती होणार आहे. उद्योग, कृषीक्षेत्र यांनाही ती पुरक ठरणार आहे. सर्वसमावेश भूमिकेतून अलिबाग रेल्वेचे महत्व आहे. हे महत्व अनेक वर्षे अधोरेखित होत आले आहे. त्याबाबत पावलेही उचलली जात आहेत, पण प्रगती शून्य आहे. त्यामुळे सर्व संशयास्पद आहे. हा संशय दूर होणे गरजेचे आहे. तसेच अलिबागपर्यंत रेल्वे आणण्यातील तांत्रिक बाबी काय असतील त्या असतील, त्याची पूर्तता केली गेली तर कोणतीच अडचण असायला नाही. पण प्रश्‍न मानसिकतेचा आहे.

शुक्रवार, २१ फेब्रुवारी, २०२०

अंधश्रद्धेचे तीनतेरा

   -उमाजी म. केळुसकर ⬑ दादाची गोष्ट ⬉



      राजूने गृहपाठ केला आणि मित्रांबरोबर खेळायला म्हणून तो घराबाहेर पडला. तेव्हा रस्त्यातून काही माणसे धावत जाताना पाहून त्यातील एकाला थांबवून त्याने विचारलं, ‘काय हो काका, तुम्ही असे गडबडीने धावत कुठे चालला आहात?’
       तेव्हा तो माणूस म्हणाला, ‘अरे तुला माहीत नाही? आपल्या गावाजवळ खाटबाबा येत आहेत, त्यांचं दर्शन घेण्यास मी चाललो आहे. ते नेहमी दोन खाटांमध्ये राहतात. तू स्वत: ते पहायला चल माझ्याबरोबर.’
        राजू देखील त्या माणसाबरोबर धावू लागला. गावाबाहेर वटवृक्षाजवळ खूप गर्दी जमली होती. सर्व खाटबाबांच्याच गोष्टी करीत होते. तेथे राजू त्या माणसासह धावत आला. त्यावेळी गर्दीतील एकजण सांगत होता, ‘माझ्या शरीरावर कोड होते. मी खाटबाबांची चरणधूळ आपल्या सर्वांगाला फासली, सात दिवस सतत बाबांचं दर्शन घेतलं आणि अंगावरील कोड पूर्णपणे नाहीसे झाले. आणखी एक व्यक्ती म्हणाली, ‘बाबांच्या अंगात मोठी शक्ती आहे. त्या शक्तीच्या कारणामुळेच ते नेहमी दोन खाटांमध्ये राहतात. परंतु खाटबाबा खाटेवर बसले नाही तर आपल्या अद्भूत शक्तीमुळे पृथ्वीत घुसतील आणि छत्रीप्रमाणे त्यांच्या डोक्यावर खाट नसली तर ते अग्नीबाणाप्रमाणे आकाशात उडून जातील. सुंभाच्या खाटेला मोठे चौकोनी भोगदे असतात ना, यामुळेच धरती आणि आकाशापासून शक्तीचं संतुलन व्यवस्थित राहातं. गेल्या जन्मी बाबांनी एकदा डोक्यावर खाट ठेवायला दिली नाही, तेव्हा ते सरळ आकाशाकडे उडून गेले. डोक्याची धडक आकाशाला लागली आणि आकाशाला छिद्र पडलं. ते छिद्र येथून दिसत नाही. पण त्याचा वैज्ञानिक पुरावा मिळाला आहे. एकोणीसशे चौर्‍याऐंशी व पंच्याऐंशीला अमेरिकेचे दोन उपग्रह बेकाबू झाले होते, त्याचं कारण त्या छिद्रातून येणारी गरम हवा होती.’
       ‘होय तर-’ मघाचा तथाकथित कोडी माणूस म्हणाला, ‘प्राचीन काळी एका जन्मात बाबा खाटेवरुन खाली उतरले होते, तेव्हा धरतीत असे घुसले की ते सरळ दुसर्‍या बाजूने निघाले. तेथे अमेरिका होती. त्यानंतर त्याच मार्गाने भारतातून अमेरिकेला जाऊन अर्जुनाने हत्यारे आणली होती आणि महाभारताचं महायुद्ध केलं होतं. आज देखील भारत सरकार दलालामार्फत अमेरिकेतून हत्यारे आणते. जनतेला असल्या संकटातून वाचविण्यासाठी बाबा आता खाटेवरुन खाली पाय ठेवत नाहीत आणि आपल्या डोक्यावरील खाटेची छत्री काढत नाहीत.’
        राजू खाटबाबांच गुणगान करणार्‍या कथित कोडी माणसाजवळ गेला आणि त्याने विचारलं, ‘तुम्हाला बाबांची चरणधूळ कुठून मिळाली? बाबा तर धुळीत पाय ठेवतच नाहीत ना?’ त्याच्या या प्रश्‍नावर तो कोडी मोठ्याने हसला आणि सर्व लोकांस त्याचा प्रश्‍न ऐकवला आणि आपलं उत्तरं देखील मोठ्याने ऐकवलं, ‘अरे मुला, तू दोन पायाचा आहेस, पण चारपायीपेक्षा कमी अकलेचा आहेस. अन्य बाबांची तर दोन पायांची धुळ असते, पण खाटबाबांची चारपायांची धूळ जनकल्याणासाठी उपलब्ध आहे. ते खाटेवर बसतात. खाट चारपायांची असते. खाटेचे चार पाय म्हणजे बाबांचे पवित्र पायच जणू! खाटेच्या चार पायांची धूळ अमृतासमान आहे.’
        त्या कोडी माणसाच्या अगाध ज्ञानाने सगळे गावकरी प्रभावित झाले आणि सर्व लोक खाटबाबांच स्मरण करीत अधीरतेने त्यांची प्रतिक्षा करु लागले. दुरुन खाटबाबांच्या जयजयकाराचा आवाज ऐकू येऊ लागला. ‘खाटबाबा आले, खाटबाबा आले’ म्हणत लोक तिकडे धावले. राजू देखील त्यात सामील होता. गर्दीत परत एकदा राजूने त्या कोडी माणसाला शोधलं आणि विचारलं, ‘खाटबाबा या गावात कुठे राहतील?’
        ‘खाटेवरच राहतील.’ कोडी माणूस म्हणाला.
        ‘त्यांची खाट कुठे राहील?’ राजूने चिकित्सकपणे विचारलं.
         ‘जेथे भूमीत श्रीगजानन असतील. ज्या जागी भगवान श्रीगजानन असतील तेथील भूमी पवित्र असेल, तेथेच खाटबाबांचं खाटविमान उतरेल.’ तो कोडी माणूस माहिती पुरवीत होता.
         ‘पण अमूक अमूक जागी भूमीत भगवान श्रीगजानन आहेत, हे कसं कळेल?’ राजूची योग्य शंका.
         ‘हे तुझ्या माझ्यासारख्या क्षुद्र मूढ मानवास कळणार नाही. परंतु ते ब्रह्मज्ञानी-आत्मज्ञानी खाटबाबांना कळतं. भगवान श्रीगजाननातून निघणार्‍या सुक्ष्म तरंगांना बाबांचा मेंदू त्वरीत पकडतो. बाबांनी अशा रीतीने आतापर्यंत भगवान श्रीगजाननाचा शोध घेतला आहे. हे चौदावे भाग्यशाली गाव आहे, येथे भूमीमध्ये श्रीगजानन सापडतील. बाबा येथे एक मंदिर बनवतील.’ तो कोडी म्हणाला.
        राजू मनातल्या मनात पुटपुटला- ठअशी गोष्ट आहे! बाबा पैसा कमविण्यासाठी आले आहेत तर!’
        दुरुन खाटबाबांची स्वारी येताना दिसली. एका खाटेवर बाबा बसले होते. त्याच खाटेच्या पायांना काठ्या बांधून त्यावर छतासारखी दुसरी खाट बांधली होती. खाट भक्तजन घेऊन येत होते.
        लोक बाबांचा जयजयकार करु लागले. बाबांच्या चरणावर रुपये ठेवू लागले, परंतु बाबा द्रव्याला हात लावीत नाहीत म्हणून त्यांचे शिष्य ते रुपये उचलून पाठीमागील खाटांवर ठेवू लागले. त्या खाटांना देखील भक्तांनीच धरलं होतं.
         ही खाटबाबांची मिरवणूक गावात गेली आणि परत गावाबाहेर आली. जसे पोलिसांचे कुत्रे गुन्हेगारांचा वास घेत माग काढत फिरतात, त्याच तर्‍हेने खाटेवर बसलेले बाबा खाली वाकून भूमीतील श्रीगजाननाचा वास घेत, त्या पवित्र जागेचा माग काढत होते. गावाबाहेर अचानक बाबांनी ‘जय श्री गजानन’ म्हटलं. मिरवणूक तिथचं थांबली. एका झाडाखाली बाबांची खाट ठेवली गेली. बाबांनी एका जागी इशारा केला की, येथे भूमीमध्ये श्रीगजानन आहेत. तिसर्‍या दिवशी खोदकाम होईल.
तेथे सारा गाव गोळा झाला, पाहता पाहता राहुट्या तंबू उभे राहिले. भक्तांकरिता चवदार खाद्यपदार्थ येऊ लागले. भजन-कीर्तन होऊ लागलं.
       तिसर्‍या दिवशी आसपासच्या गावातील लोक देखील आले. पोलीस अधीक्षक, जिल्हाधिकारी, पुढारी हे देखील दर्शनाकरिता आले. नंतर बाबांच्या आदेशानुसार खोदकाम सुरु झालं. राजूही तेथे हजर होता. ‘ठण्ण! कसल्यातरी लोखंडी वस्तूत कुदळ लागली. बाबांचे कान उभे राहिले. दगडाची मूर्ती निघणार होती, हा धातूचा आवाज कसला? जमिनीतून एक मोठा कुकर निघाला. त्याला पाहून एक गावकरी ओरडला, ‘अरे, तो तर माझा आहे. तो कुकर पाच दिवसापूर्वी कोणीतरी चोरुन नेला होता.
 खणता खणता एक एक करुन गृहोपयोगी वस्तू निघू लागल्या. या गावात पाच दिवसांपूर्वी अनेक घरांमध्ये चोर्‍या झाल्या होत्या. तोच हा चोरीचा माल होता. बाबा चिंतीत झाले. लोक आपापलं सामान ओळखू लागले. इतक्यात तेथे गडबड झाली. कारण एका पोलीस सब इन्स्पेक्टरबरोबर काही पोलीस एका चोरास पकडून घेऊन तेथे आले. पोलीस सब इन्स्पेक्टरने व पोलिसांनी पोलीस अधीक्षकांस खाडकन सॅल्यूट ठोकला. चोराकडे पाहून पोलीस अधीक्षकांनी विचारलं, ‘काय मामला आहे?’
       पोलीस सबइन्स्पेक्टर म्हणाले, ‘या माणसाने पाच दिवसापूर्वी या गावातील अनेक घरात चोर्‍या केल्या आहेत. याचं म्हणणं असं की, जेव्हा हा चोरीचं सामान घेऊन गावाबाहेर जात होता तेव्हा याने पाहिलं की येथे कोणीतरी व्यक्ती जमीन खोदून त्यात काहीतरी मोठी वस्तू गाडत होता. ती व्यक्ती गेल्यावर याने येथील जमीन खोदली तर त्यातून श्रीगजाननाची एक मूर्ती निघाली. याने विचार केला, ती श्री गजाननाची मूर्ती जुन्या काळातील असेल, परदेशीयांना विकली तर मोठी किंमत येईल, म्हणून याने ती मूर्ती काढून आपल्या थैलीत टाकली आणि चोरीचं सामान या खड्ड्यात टाकलं. मी याला संशयावरुन पकडलं होत. याला बोलता करुन चोरीचं सामान ताब्यात घेण्याकरिता आलोय.’
        हे ऐकून खाटबाबांचे धाबे दणाणले. ते हेच करायचे, गावाबाहेर कुठल्यातरी ठिकाणी दगडाची मूर्ती जमिनीत गाडून नंतर म्हणायचे की, येथे श्रीगजानन निघतील. अचानक गावगाल्यांचं लक्ष बाबाकडे गेलं. पाहिलं, खाटबाबा आणि त्यांचे भक्त खाटा सोडून पळत आहेत, त्यामुळे नाही धरती दुभंगत किंवा आकाश फाटत. खाटबाबांचे तीनतेरा पावणेबारा वाजले होते. या गडबडीचा फायदा घेऊन पोलीसांच्या हाताला हिसडा देऊन तो चोर बेड्यांसह पळू लागला. राजू दूर झाडाखाली उभे राहून ही गंमत पहात होता. तो चोर पळत पळत त्यांच्याच शेजारुन जाऊ लागला. चोर आपल्या शेजारुन पळून जातोय हे पाहून राजूने त्यांच्या अंगावर चित्त्यासारखी झेप घेतली आणि त्याला पकडले व तो म्हणाला, ‘तू चोर नाहीस, लाटबाबा आहेस. तुला पाहून खाटबाबा पळाले. तू आला नसतास तर अशा ढोंबी बाबांच्या अंधश्रद्धेचं भूत गावकर्‍यांनी कायमचं पोसलं असतं. तुझ्यासारख्या काट्याने असा काटा निघाला.’
        एवढ्यात पोलिसांसह पोलीस सबइन्स्पेक्टर तेथे आले. राजूकडून चोराला ताब्यात घेतलं व त्यांनी राजूचं नाव विचारलं आणि त्या चोराला धाडसीपणे पकडल्याबद्दल त्याला शाबासकी दिली.
(उमाजी म. केळुसकर यांच्या "दादाच्या गोष्टी" या बालकथासंग्रहातील एक गोष्ट.)

संगीतकार मदनमोहन यांचे शरद कोरडे यांनी घडविलेले यथार्थ दर्शन

-उमाजी म. केळुसकर ⬑ पुस्तकवेध ⬉

संगीतकार मदनमोहन यांचे शरद कोरडे यांनी घडविलेले यथार्थ दर्शन, उमाजी केळुसकर

      अलिबागचे ज्येष्ठ साहित्यिक शरद कोरडे यांनी लिहिलेले व प्रतिक प्रकाशन, पुणे यांनी प्रकाशित केलेले संगीतकार मदनमोहन हे पुस्यातक अतिशय वाचनीय आहे. प्रतिक प्रकाशनने प्रसिद्ध केलेले शरद कोरडे यांचे हे तृतीय पुस्तक आहे. या पुस्तकात त्यांनी सुप्रसिद्ध चित्रपट संगीतकार स्वर्गीय मदनमोहन यांच्या हिंदी चित्रपट गीतांचा मागोवा घेतला असून त्यांच्या जीवनातील विविध पैलूंचे दर्शन घडविले आहे.
       मदनमोहन यांचे वडील रायबहादूर चुनीलाल कोहली हे इराक सरकारच्या कुर्दिस्तान पेशमर्ग फोर्समध्ये अकाऊंटंट जनरल या पदावर काम करीत होते. तेथेच इरबील शहरात मदनमोहन यांचा जन्म झाला. इराक स्वतंत्र झाल्यावर ते हिंदुस्थानात परत आले. मदनमोहन यांचे बालपण इराक, चकवाल-पंजाब, लाहोर व मुंबईमध्ये गेले. लहानपणापासून त्यांना संगीताची आवड होती. आजोबा डॉक्टर, आई कवयित्री व संगीत प्रेमी असल्याने घरात सुसंस्कृतपणा व संगीताची आवड होती. त्याचा परिणाम मदनमोहन यांचे संगीतप्रेम वाढण्यावर झाला. मुंबईत आल्यावर ते शाळेतील कार्यक्रमात भाग घेत व गाणी म्हणत असत. तेथील ऑल इंडिया रेडिओवरील लहान मुलांच्या कार्यक्रमासाठी मुलांना आकाशवाणीवर बोलावण्यात येई, त्यातही मदन मोहन यांचा सहभाग असे. सुप्रसिद्ध गायिका व अभिनेत्री सुरय्या, राज कपूर यांचा परिचय मदनमोहन यांच्याशी आकाशवाणीवर झाला. मदनमोहन यांनी आपल्या वडिलांच्या आग्रहामुळे डेहराडून येथे मिलिटरी स्कूलमध्ये प्रवेश घेऊन खडतर सैनिकी प्रशिक्षण सेकंड लेफ्टनंट म्हणून ते सैन्यात भरती झाले. काही काळातच त्यांनी वडिलांना न सांगता संगीत साधनेसाठी सैन्यातील नोकरी सोडून ते लखनौ येथील ऑल इंडिया रेडिओवर प्रोग्राम असिस्टंट म्हणून रुजू झाले. तेथे त्यांचा परिचय उस्ताद उस्ताद फैय्याजखान, उस्ताद अली अकबर खान, बेगम अख्तर, तलत महमूद या दिग्गज गायकांशी झाला व त्यांच्या संगीत विषयक ज्ञानात भर पडून त्यांना शास्त्रीय संगीताबाबत प्रेम वाटू लागले. लखनौ, दिल्ली येथील आकाशवाणी केंद्रात काम करून ते मुंबईत परतले. आपल्या वडिलांच्या सहाय्याने आपण मुंबईतील हिंदी चित्रपटसृष्टीत प्रवेश करू, हा त्यांचा अंदाज चुकला. सैन्यातील मानाची नोकरी सोडून ते बेभरवशाच्या चित्रपट व्यवसायात येण्याचे स्वप्न पहात आहेत, याचा संताप येऊन त्यांच्या वडिलांनी त्यांना आपल्या घराचे दरवाजे बंद केले. त्यानंतर मदनमोहन यांचा स्वतःला सिद्ध करण्याचा संघर्ष सुरू झाला. अनेक संकटे व मानहानीला तोंड दिल्यावर देवेंद्र गोयल या नवीन निर्मात्याने त्यांना आपला पहिला चित्रपट ‘आँखे’ (१९५०) साठी संगीत देण्याचे स्वतंत्र काम दिले. आपल्या पहिल्या चित्रपटाचे काम पाहण्यासाठी त्यांनी आपल्या वडिलांना थिएटरमध्ये येण्याचे निमंत्रण दिले. चित्रपटातील संगीत पाहून रायबहादू यांच्या डोळ्यांतून अश्रूधारा सुरू झाल्या. ते मदनमोहन यांना म्हणाले, ‘तू योग्य मार्गावर आहेस. माझे चुकले.’ पिता-पुत्रांतील वाद संपला. दोघे एकत्र आले, पण थोड्याच काळात त्यांचा मृत्यू झाला व पुन्हा मदनमोहन एकाकी पडले. त्यानंतर त्यांनी स्वरकोकिळा लता मंगेशकर यांच्यासारखी बहीण, राजेंद्र कृष्ण व राजा मेहंदी अलीखॉं यांच्या सारखे मित्र, देवेंद्र गोयल, चेतन आनंद,  राज खोसला यांच्या सारखे मार्गदर्शक मिळाले व शामसुंदर, एस.बी. बर्मन, नौशाद यांच्यासारखे प्रशंसक संगीतकार त्यांनी मिळवले. आपल्या संगीतावर फिल्मफेअर ऍवार्डची मोहोर उमटवता आली नाही ही खंत उभ्या आयुष्यभर त्यांना होती. याशिवाय चित्रपट पडद्यामागे एकमेकांना खच्ची करण्याचे जे उद्योग चालतात त्याचाही ते बळी ठरलेे होते त्यामुळे त्यांच्यात येणारी विफलता त्यांना व्यसनाच्या गर्तेत घेऊन गेली व हळूहळू त्यांचा प्रवास मृत्यूच्या दिशेने सुरू झाला. लिव्हर सोरायसिसने त्यांचा मृत्यू झाला.
       मदनमोहन यांची १९५० पासून सुरू झालेली सांगितीक कारकीर्द १९७८ च्या ‘जलन’ या चित्रपटापर्यंत सुरु होते. या कारकीर्दीचा मागोवा,  त्यांच्या वैयक्तीक आयुष्यातील सुखदु:खाचा आढावा शरद कोरडे यांनी अतिशय परिश्रम घेऊन लिहिल्याचे पुस्तक वाचताना जाणवते. पुस्तकाच्या शेवटी त्यांनी मदनमोहन यांनी संगीतबद्ध केलेल्या गाण्यांची, त्यांच्या गीतकारांची व चित्रपटाची सूची देण्यात आली आहे. सर्वसामान्य रसिकांना आवडेल असेच हे वाचनीय पुस्तक आहे. 
पुस्तकाचे नाव- संगीतकार मदनमोहन
लेखक- शरद कोरडे
प्रकाशक- प्रतिक प्रकाशन, पुणे
पृष्ठे- १४८, किंमत- रु. १५०/-

गुरुवार, २० फेब्रुवारी, २०२०

शिवछत्रपती (काव्यांजली)


जय हिंद, जय भारती, दुमदुमते श्री शिवरायांची महती

श्री शहाजी नंदन, आधी किल्ले शिवनेरीला वंदन
धन्य ती भूमी, जेथ जन्मले शौर्यवदन, आमुची शक्ती
दशदिशांत पसरली शिवछत्रपतींची कीर्ती

माय जिजाऊंचे पुत्र, नेक शिवबांचे चरित्र 
जिवाला जीव देणारे त्यांचे लहान-थोर मित्र
शिवरायांची थोरवी गाताना गात्र कधी न थकती
स्वराज्याच्या जिद्दीपुढे शत्रू भलेभले सरती
जय हिंद, जय भारती, दुमदुमते श्री शिवरायांची महती

लाल महाली उन्मत्त शाहिस्त्याची बोटे छाटूनी
प्रतापगडी गर्विष्ठ राक्षस अफजल्या फाडुनी, गाडुनी
भयमुक्त केली शिवरायांनी रयत आणि धरणी
लावूया त्यांच्या गडकिल्ल्यांची कपाळी माती
जय हिंद, जय भारती, दुमदुमते श्री शिवरायांची महती

वीर शिवरायांनी दिली चातुर्वर्ण्या मूठमाती
तानाजी, बाजी, मावळे सारे त्यांचे साथी
गनिमा दाखविल्या न त्यांनी कधी पाठी
लढले बारा बलुतेदारही प्राण घेऊनी तळहाती
जय हिंद, जय भारती, दुमदुमते श्री शिवरायांची महती

आग्र्यात शिवराय जणू कडाडती वीज
शंभूसवे शिवबा कसे झाले गायब
मोगल साम्राज्या ना कसली गाज होती
येता मुलुखात, औरंग्याची धुळीस गेली मती
जय हिंद, जय भारती, दुमदुमते श्री शिवरायांची महती

आदिलशाही, मोगल साम्राज्य, इंग्रज आणि सिद्दी
जिद्दी शिवरायांनी चालू नाही दिली त्यांची सद्दी
गड-जलदुर्ग, उभारल्या आरमाराची उभी केली भिती
घोड्यावर जशी मांड, तशी त्यांची सागरावरही होती
जय हिंद, जय भारती, दुमदुमते श्री शिवरायांची महती

राजगडा कारभार पाहिला, रयतेला स्वाभिमान दिला
बुलंद किल्ले रायगडा स्थापिली राजधानी
फडकली स्वराज्याची भगवी पताका गगनी
मराठेमोळे राजे झाले आमुचे शिवछत्रपती
जय हिंद, जय भारती, दुमदुमते श्री शिवरायांची महती

मराठी भाषा, मराठमोळे राज्य, राजे आमचे प्रजाहितदक्ष
उत्कृष्ट योद्धा, आदर्श राज्यकर्ता ही भारतभूमी साक्ष
शिवरायांचे नाव घेता उन्नत होते आमुची पहाडी छाती
नतमस्तक आमुचे, आदर्श आमच्या शिवछत्रपतींची नीती
जय हिंद, जय भारती, दुमदुमते श्री शिवरायांची महती

------उमाजी म. केळुसकर

संपादक, सा. कोकणनामा

बुधवार, १९ फेब्रुवारी, २०२०

शिवजयंती निमित्त शिवप्रेमींसाठी लोकशाहीर विठ्ठल उमप यांचे सांकेतिक लोकगीत- लग्नाला चला


लोकशाहीर स्व.विठ्ठल उमप यांनी तुंबडी यांनी लोकगीताच्या प्रकारातून हुबेहुब उतरवलेले बहिर्जी नाईक. त्याकाळी मोहिमेस जाण्यासाठी तसेच गुप्त वार्ता शत्रूला कळू न देण्यासाठी अशा संकेतामध्ये बोलावणं जायचं. लग्नाला चला म्हणजे मोहिमेला (लढायला) चला असा अर्थ. हे लोकगीत स्वत: लोकशाहीर विठ्ठल उमप यांनी लिहिले आणि आपल्या आवाजाने व अभिनयाने अजरामर केले. त्यांची कलाकृती खास रसिकांच्या सेवेसाठी-

सोमवार, १७ फेब्रुवारी, २०२०

रायगडच्या मिठागरांना लागलेय अखेरची घरघर

-उमाजी म. केळुसकर ⬑ दादागिरी ⬉




     रायगडची मीठ उत्पादक जिल्हा अशी जी ओळख होती, ती आता पुसली गेली आहे. त्याला कारणे अनेक आहेत. या कारणांत या मिठाच्या खाण्यासाठी होणार्‍या वापरावर तत्कालिन केंद्र सरकारने घातलेली बंदी, औद्योगिक कंपन्यांच्या प्रदूषणामुळे पाण्यातील क्षार घटणे, मीठ कामगारांची कमतरता, मिठागरांचा वाढता खर्च व त्यातून शाश्‍वत उत्पन्नाची ठोस हमी नसणे, राज्य सरकारची मीठ उत्पादक आणि मिठागरे यांच्याबद्दलची उदासिनता, यांचा प्रामुख्याने समावेश आहे. या सरकारी उदासिनतेचा फटका रायगड जिल्ह्यासह कोकणातील मुंबई, ठाणे, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यांनाही बसल्यामुळे कोकणातील या उर्वरित मिठागरांना अखेरची घरघर लागली आहे. ही मिठागरे शेवटचे आचके देत आहेत. आज कोकणाची मिठाची गरज बाहेरुन भागवली जाते. यालाच विकास म्हणायचा का? हा मोठा प्रश्‍न यानिमित्ताने उपस्थित होतो.
       प्राचीन काळापासून भारतात शेतीनंतर मीठ उत्पादन हा मोठा व्यवसाय होता. भारताच्या ज्या भागात मीठ तयार होत नाही तिथेही मीठ पोचवण्याची सोय प्राचीन काळापासून आहे आणि फार पूर्वीपासून मिठावर अल्पशी करआकारणीही होत आलेली आहे. सम्राट चंद्रगुप्त मौर्य  यांनी मिठावर कर लावलेला होता. तेव्हा एक विशेष अधिकारी  ज्याला लवणाचार्य असे संबोधले जायचे, तो मिठाच्या व्यवहारासंबंधी जबाबदार होता. मीठ तयार करणार्यांना शुल्क आकारून परवाना दिला जाई किंवा त्याच्या मिठाच्या उत्पादनाच्या एक षष्ठांश हिस्सा राजाला देण्याच्या हमीवर त्याला परवाना दिला जाई. हा मिठावरील एकूण कर २५ टक्के इतका असावा. ब्रिटिश सरकार भारतात येण्यापूर्वी अशा स्वरूपाचा अथवा थोडा कमी कर कायम आकारला जात होता. ब्रिटिश आल्यावर प्रंचड वाढवला गेला आणि त्यानंतरच भारतात मोठ्या प्रमाणात मीठ-प्रश्नाला सुरुवात झाली. तत्पूर्वी छत्रपती शिवाजी महाराजांच्या राजवटीत त्यांनी रायगड जिल्ह्यात या व्यवसायाकडे विशेष लक्ष पुरवले असल्याचे दिसून येते. गोव्यातील पोर्तुगीज राजवटीत येथे मीठ आयात होऊ लागल्यामुळे येथील मीठ उद्योगावर त्याचा विपरित परिणाम झाला, तेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांनी या आयात मिठावर मोठी जकात बसवून स्थानिक मिठास संरक्षण दिले. पेशवे काळात  उरण, पेण, नागोठणे, पनवेल, अलिबाग ही महत्वाची मीठ उद्योग केंद्रे होती. आज दुर्दैव असे आहे की ही उद्योग केंद्रे पेण तालुक्यापुरती मर्यादित झाली असून तेथील ३० ते ४०  मिठागरांतून आता जेमतेम ५ ते ६ आगारे शिल्लक राहिली आहेत. ही मिठागरेही या दशकात संपुष्टात येतील, असे चित्र आहे.
     शिवशाहीत या स्थानिक मीठ उत्पादनास संरक्षण दिले गेले, परंतु लोकशाहीत असे संरक्षण मिठागरांना मिळालेले नाही. स्वातंत्र्यानंतर या अडिच दशकांपूर्वी देशात आयोडीनयुक्त मिठाचे प्रपोजल टाटांनी कालिन कॉंग्रेस सरकारला दिले. त्यांना त्याचे लायसेन्स मिळाले. याआधी टाटांनी मिठागारे खरेदी केली आणि कॉंग्रेस सरकारने आयोडिनयुक्त मीठ वापरायची सक्ती करणारा कायदा बनवला. त्यानंतर सरकारने आयोडिनयुक्त मिठाच्या नावावर इतर मोठ्या उद्योगपतींना मीठ उत्पादनात ओढून स्थानिक मिठागरांवर उदरनिर्वाह करणार्यांना देशोधडीला लावले. स्थानिक मिठागरांतील मिठात आयोडिन नसल्यामुळे त्याच्या वापराने गलगंड हा रोग होतो, असा बागुलबुवा उभा करुन सरकारने आयोडिनयुक्त मिठाची सक्ती केली. तशी सक्ती केली तरी हे मीठ वापरले जाईल म्हणून सरकारने साध्या मिठाची भिती दाखवून त्यावर बंदी घातली. त्यामुळे जिल्ह्यात स्थानिक मिठागरातून १०० रुपयांनी ५० किलोचे मिठाचे पोते मिळायचे तेथे आज बड्या कंपन्याचे आयोडिनयुक्त मीठ २५ ते ४० रुपये प्रतिकिलोने विकत घ्यावे लागते. त्यात खरोखरच किती आयोडिन शिल्लक असते हा देखील संशोधनाचा विषय आहे. स्थानिक मिठागरांतील खडे मिठाचा वापर मत्स्य व्यवसाय, विटभट्टी व्यवसाय आणि काही प्रमाणात बर्फ उद्योगासाठीच केला जात आहे. लोणच्यांसाठी तर खडा मीठच उत्तम असते
  ज्या पाश्चिमात्य राष्ट्रांना प्रमाण मानून आपले अनेक व्यवहार चालतात, त्या पाश्चिमात्यांनीही आयोडिनयुक्त मिठाची सक्ती रद्द केलेली आहे याकडे डोळेझाक केली जाते. साधारणतः १०-२० वर्षापूर्वी भारतातच नव्हे तर जगभर आयोडिनयुक्त मीठच हवे, असा जोरदार प्रचार चालू झाला. अमेरिका, फ्रान्स, स्वित्झर्लंड, इंग्लंड या देशांत आयोडिनयुक्त मिठाची सक्ती झाली. पण आयोडिनची सक्ती जरूरी नाही हे वैद्यकीय व्यावसायिकांनी दाखवून दिल्यानंतर ती मागे घेण्यात आली. आता या देशांत नैसर्गिक मीठ व आयोडिनयुक्त मीठ असे दोन्ही प्रकार उपलब्ध आहेत. पण भारतात मात्र हा पर्याय ठेवण्यात आलेला नाही. आयोडिनयुक्त मिठाच्या नावावर पारंपरिक मीठ उत्पादकांना बाजूला ङ्गेकण्यात आले. असाच अन्याय मीठ उत्पादकांवर ब्रिटीश राजवटीत झाला होता. ब्रिटीश सरकारने इंग्लंडमधील मीठ धंद्याचे हितसंबध जपण्यासाठी मीठ आयात करण्याचे धोरण अवलंबिले व स्थानिक मिठावर जबर कर लादले. भारतात निसर्गाने प्रदान केलेल्या समुद्राच्या पाण्यापासून मीठ बनविण्याचा हक्कही ब्रिटीशांनी हिरावून घेतला.
‘मीठ’ हा सर्वाच्याच अन्नाचा अविभाज्य घटक असल्याने या गोष्टीचा सर्वांच्याच जीवनावर आणि मानसिकतेवर परिणाम झाला. महात्मा गांधींनी या अन्यायाविरुद्ध असहकार पुकारून लढायचं ठरवलं. त्यासाठी त्यांनी प्रथम जनजागृती केली. त्यानंतर अहमदाबादजवळील साबरमती आश्रम ते दांडी गावचा समुद्र किनारा अशी पदयात्रा करायचं ठरवलं. साबरमती आश्रम ते दांडी हे अंतर २४० मैल (३९० कि. मी.) इतकं आहे. हजारो देशभक्तांना घेऊन १२ मार्च १९३० ला सुरू केलेली गांधीजीची ही पदयात्रा २४ दिवसांनी म्हणजेच ६ एप्रिल १९३० या दिवशी दांडी येथे पोहोचली. इंग्रजांची मिठावरील एकाधिकारशाही मोडून काढण्यासाठी महात्माजींनी सागरतीरावरील चिमूटभर मीठ उचलले. इंग्रजी सत्तेविरोधातील हा अनोखा सत्याग्रह होता. त्याला प्रतिसाद म्हणून रायगड जिल्ह्यातही मिठाचा सत्याग्रह मोठ्या प्रमाणात झाला. दुर्दैवाने तेव्हा ब्रिटीशांनी मिठावरील कर रद्द केला नाही. मिठावरील कराद्वारे ब्रिटीशांना मोठा महसूल मिळत होता. तो कर ब्रिटीश भारत सोडून जाण्यापूर्वी सहा महिने आधी, २८ ङ्गेब्रुवारी १९४७ रोजी रद्द झाला. त्यानंतर मिठाचे उत्पादन वाढून आयात बंद झाली. १९७१ मध्ये जिल्ह्यात २,६३०.४६ हेक्टर क्षेत्रात सुमारे ५० लाख टन मीठ उत्पादन झाले, तर १९८३ मध्ये २,२७९.१९ हेक्टर जमिनीत १,६६,००० मे. टन मिठाचे उत्पादन झाले. १९८६ नंतर आयोडिनयुक्त मिठाच्या सक्तीनंतर मीठ उत्पादन क्षेत्र घटले आणि हे उत्पादन केवळ २ हजार टनावर आले आहे. दुर्दैवाने हे पाप कोणाचे याचा विचार झालाच नाही. सेझ विरुद्ध आक्रमक झालेला रायगडचा भूमीपुत्र मिठागरांच्या आस्तित्वासाठी का आक्रमक झाला नाही, त्यांचे नेतृत्व का आक्रमक बनले नाही, हा देखील मोेठा प्रश्‍न आहे. या प्रश्‍नाच्या गुंत्याचा फास बनून आज मिठागरांचा श्‍वास घुसमटतो आहे.
      आज भारताचे भाजप सरकारने केलेल्या नोटबंदी विरुद्ध व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भांडवलधार्जिण्या भूमिकेविरुद्ध आकांत सुरु आहे, पण तत्कालिन कॉंग्रेस सरकारने केलेल्या भांडवलधार्जिण्या मीठ बंदी विरुद्ध कोणी आकांत केला नाही. या कृतीने कॉंग्रेसने महात्मा गांधी यांच्या ऐतिहासिक मिठाच्या सत्याग्रहालाच धुडकावले आहे. त्यांच्या विचारांनाच हरताळ ङ्गासला आहे. त्यानंतरच्या आघाडी-युती सरकारांकडे या प्रश्‍नाकडे गांभीर्याने पहायला वेळच मिळाला नाही. मीठ महत्वाचे नाही, तर सत्तेची खुर्ची महत्वाची, तिला वेळ दिला पाहिजे, अशी सत्ताधार्यांची धारणा राहिल्यामुळे महात्मा गांधींनंतर मिठाचे महत्व ओळखणारा कोणी दिसलाच नाही. मुंबईतून कापड गिरण्या गेल्या, तशीच रायगडातून मिठागरे गेली आहेत. यात ङ्गायदा कोणाचा झाला, तोटा कोणाचा झाला हे शोधायला ज्योतिषाचा पोपट आणायची गरज नाही, या मिठागरांवर जे अवलंबून होते त्यांचे पोटच याबाबतची रामकहाणी सांगेल. पण आता या प्रश्‍नावर रामबाण उत्तर मिळणे कठीण आहे. या विद्यमान सरकारकडून त्याचे उत्तर मागितले तरी ते मिळणार नाही. हा दोष या सरकारचा नाही, कारण वेळ निघून गेली आहे. पण विद्यमान केंद्र सरकार व राज्य सरकारने आमच्या रायगडात, कोकणात जी मिठागरे अस्तित्वात आहेत, त्यांना तरी बळ द्यावे, त्यांना प्रोत्साहन द्यावे आणि हा आयोडिनयुक्त मिठाचा चालू असलेला ङ्गार्स बंद करावा, इतकीच अपेक्षा केली आहे.

रविवार, १६ फेब्रुवारी, २०२०

नरवीर तानाजी मालुसरे यांच्या उमरठच्या पुण्यतिथीची सत्यकथा

    -उमाजी म. केळुसकर ⬑ दादागिरी ⬉

      

      
     रायगड जिल्ह्यातील पोलादपूर तालुक्यातील उमरठ या गावी नरवीर तानाजी मालुसरे यांचा ३५० वा शौर्य दिन आज १६ फेब्रुवारी २०२० ला आहे आणि उद्या १७ फेब्रुवारीला पुण्यतिथी सोहळा आहे. त्यानिमित्त आजपासून उमरठ येथे विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. उद्या  नरवीर तानाजी मालुसरे आणि शेलार मामा यांच्या संयुक्त समाधीच्या नूतनीकरणाच्या वास्तूचे लोकार्पण महाराष्ट्राचे मुख्यमंत्री  उद्धव ठाकरे यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. रायगड जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदाच्या कारकीर्दीत स्व. प्रभाकर पाटील यांनी  १९८० सालापासून नरवीर तानाजी मालुसरे यांची पुण्यतिथी सुरु केली, त्याची ही सत्यकथा ३५० व्या पुण्यतिथी सोहळ्याच्या निमित्ताने...
     श्रीरामचंद्रांकडे ज्याप्रमाणे मारुतीराया होते, त्याप्रमाणे छत्रपती शिवाजी महाराजांकडे नरवीर तानाजी मालुसरे होते. दोघांनीही भक्ती, शक्ती आणि सेवेचा जगाला आदर्श घालून दिला. दोघेही निरपेक्ष होते. एक चिरंजीव आहे, तर दुसरा वीरगती पत्करुन अमर झाला. परंतु रायगडच्या जनतेला आपल्या उमरठने स्वराज्याला एक नररत्न दिले याचे विस्मरण झाले आणि उमरठ आणि नरवीर तानाजी मालुसरे यांची काहीशी उपेक्षाच केली. परंतु स्व. प्रभाकर पाटील यांनी आपल्या जि.प. अध्यक्षपदाच्या कारकीर्दीत ही उपेक्षेची धूळ झटकून १९८० सालापासून उमरठ येथे नरवीर तानाजी मालुसरे यांची पुण्यतिथी सुरु केली आणि त्यासाठी नरवीरांचे ११ वे वंशज बाळकृष्ण नारायणराव मालुसरे (दहा वर्षांपूर्वी त्यांचे निधन झाले) यांना आमंत्रित केले. नारायणराव बळवंतराव मालुसरे हे नरवीर तानाजी मालुसरे यांचे १० वे वंशज. त्यांना तानाजी मालुसरे (थोरले घराणे) आणि बाळकृष्ण मालुसरे (धाकटे घराणे) हे दोन पुत्र. थोरल्या तानाजी नारायणराव मालुसरे यांची दोनही मुले नारायण तानाजी मालुसरे (वय ६४ वर्षे) आणि अप्पाजी तानाजी मालुसरे (वय ५५ वर्षे) कोल्हापूर जिल्ह्यातील चंदगड तालुक्यातील झेंडेवाडी येथे आहेत. या दोन १२ व्या वंशजांपैकी नारायण तानाजी मालुसरे यांचे पुत्र रामचंद्र मालुसरे (वय ३० वर्षे), तर अप्पाजी तानाजी मालुसरे यांचे पुत्र ओमकार मालुसरे (वय २४) हेे १३ वे वंशज पुणे येथे वास्तव्यास आहेत. अनगोळ-बेळगाव येथे वास्तव्यास असलेले धाकट्या घराण्याचे (कै) बाळकृष्ण नारायणराव मालुसरे यांंचे २०१२ साली अपघाती निधन झालेले पुत्र शिवराज बाळकृष्ण मालुसरे हेही नरवीर तानाजी यांचे १२ वे वंशज. त्यांच्या पेशाने शिक्षिका असलेल्या पत्नी डॉ. शीतल शिवराज मालुसरे आपले पुत्र रायबा, कन्या अंकिता, देवयांनी या नरवीर तानाजी मालुसरे यांच्या १३ व्या वंशजांसह महाड येथे वास्तव्यास आहेत. 
     तानाजी मालुसरे यांचे वंशज
     वास्तविक नरवीर तानाजी मालुसरे यांचे वंशज आहेत की नाहीत याची कल्पना कुणालाच नव्हती. त्याचे असे झाले १६७६ साली छत्रपती शिवाजी महाराज दक्षिणेच्या स्वारीवर निघाले. कोल्हापूर नजीकच्या पारगाव गावी मौनी बाबांचे छत्रपती शिवाजी महाराजांनी दर्शन घेतले. चिमुटभर साखर महाराजांच्या हातावर घातली व मोरपीसाने महाराजांच्या डोक्यावर आशीर्वाद दिला. ‘विजयी भव’ या आशीर्वादावर महाराज कर्नाटक प्रांत पार करुन मद्रास प्रांतापर्यंत गेले. पारगावहून जाताना महाराज पारगडमार्गे गेले. पारगडची भौगोलिक रचना पाहून या ठिकाणी शिबंदी ठेवली तर पोर्तुगीज, विजापूरकर, खेम सावंत यांच्यावर कायमची जरब राहील याची त्यांना खात्री वाटली व शिबंदीला पाचशे मावळ्यांची नेमणूक पारगडवर केली. आपले जीवाभावाचे मित्र नरवीर तानाजी मालुसरे यांचे सुपुत्र रायबा मालुसरे यांना त्या ठिकाणी किल्लेदार म्हणून नेमले व चंद्रसूर्य असेपर्यंत या गडाचे संरक्षण करण्यासाठी त्यांना ताम्रपट (सनद) दिला. तेव्हापासून रायबा तानाजी यांचे वंशज बाळकृष्ण नारायण मालुसरे (दहा वर्षांपूर्वी त्यांचे निधन झाले.) आणि इतर मावळ्याचे वंशज या पारगडावर अजूनही वास्तव्यास आहेत. १९७९ साली पारगडावर बाळकृष्ण मालुसरे यांनी आपल्या सहकार्‍यांच्या सहकार्याने छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभारला. या पुतळ्याच्या निमित्ताने पारगडपर्यंत बुलडोझरने कच्चा रस्ता तयार करण्यात आला. पुतळ्याच्या अनावरणासाठी दहा हजार लोकांनी तेथे उपस्थिती लावली. ही संधी साधून बाळकृष्ण मालुसरे यांनी पारगडचा इतिहास सांगितला आणि आपण नरवीरांचे ११ वे वंशज आहोत हे जाहीर केले. पुढे बेळगावचे लोकसत्तेचे वार्ताहर एस.एन. पवार यांनी मुंबईच्या रविवार लोकसत्तेत नरवीर तानाजी मालुसरेंचे वंशज बेळगावातील पारगडमध्ये आहेत अशा आशयाचा लेख लिहिला. या लेखामुळे महाराष्ट्रातून बाळकृष्ण मालुसरे यांच्यावर पत्रांचा पाऊस पडला. या सर्व पत्रांमध्ये एकच प्रश्‍न होता. तुम्ही नरवीरांचे वंशज कसे? तुमच्याकडे त्याबाबत काय पुरावा आहे? सर्वांना थोडक्यात उत्तरे आणि सनदेच्या प्रती देऊन त्यांचे समाधान केले. परंतु पोलादपूर तालुक्यातील गावडी गावचे सुभेदार लक्ष्मणराव मालुसरे यांनी मात्र बाळकृष्ण मालुसरे यांची दोन महिने पाठ सोडली नाही. अनेक पत्रोत्तरे देऊन बाळकृष्ण मालुसरे यांनी त्यांना सर्व पुराव्यांसह माहिती कळवली तेव्हा त्यांनी गावडी गावात २५ मालुसरेंची घरे आहेत आणि आम्ही सूर्याजी मालुसरेचे वंशज असून साखर गावात त्यांची समाधी असल्याचे कळविले. बाळकृष्ण मालुसरे यांनीही आपल्या पत्रात सुभेदार लक्ष्मणराव मालुसरे यांना लिहिले की, मालुसरे वंश हा एक मोठा वटवृक्ष आहे. आपण त्या वृक्षाचे मोठा बुंधा असाल, मोठी ङ्गांदी असाल, पण मी त्या झाडाची हातभर का होईना पण डहाळी आहे.
     
नरवीरांचे १३ वे वंशज रायबा, अंकिता, देवयानी मालुसरे, त्यांच्या मातोश्री डाॅ. शीतल मालुसरे.

     
      पत्रोत्तरांची जुगलबंदी
      अशाप्रकारे बाळकृष्ण मालुसरे आणि सुभेदार लक्ष्मणराव मालुसरे यांची पत्रोत्तरांची जुगलबंदी रंगली असतानाच प्रभाकर पाटील यांच्या कानावर हा प्रकार गेला. त्यांनी स्वत: याप्रकरणी लक्ष घातले आणि सुभेदार लक्ष्मण मालुसरेंना सभापती उतेकर यांच्यासह बेळगावी पारगडावर जाण्याचा सल्ला दिला. पारगडावर होणार्‍या शिवजयंतीचे निमित्त साधून दोघे बेळगावला गेले. बाळकृष्ण मालुसरे या त्यांना घेऊन पारगडावर गेले. शिवजयंतीच्या समारंभात त्यांचा आ. नरसिंगराव पाटील यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. नंतर बाळकृष्ण मालुसरे त्यांना घेऊन आपल्या निवासस्थानी आले. त्यांनी वंशपरंपरेने चालत आलेल्या तानाजी मालुसरे यांच्या सर्व वस्तू दाखवल्या. त्यानंतर त्यांनी देवघरात जाऊन देवांना हार घातला. तेथे तानाजी मालुसरे यांची कवड्यांची माळ आणि तलवार वगैरे पाहून सुभेदार लक्ष्मणराव मालुसरे गहिवरले. त्यांनी बाळकृष्ण मालुसरे यांना मिठी मारली आणि त्यांना रडूच फुटले. त्यांनी म्हटले, इतक्या पिढ्यानंतर तानाजी, रायबांचे वंशज आम्हाला भेटले. हा आयुष्यातील मोठा योगायोग आहे. आमच्या मागील पिढीत रायबाने आत्महत्या केली, संन्यास घेतला अशा अनेक वावड्या उठल्या. परंतु रायबाचे वंशज पारगडावर आहेत हे समजल्यावर गेले दोन महिने मला झोपेचे, भूकेचे भान नव्हते. प्रभाकर पाटील यांच्या सल्ल्यानेच आज मी सभापती उतेकर यांना पारगडावर घेऊन आलो, त्यामुळे आपली भेट झाली. अन्यथा रायबा हा विषयच आमच्या दृष्टीने बंद होता.
      पोलादपूरला सुभेदार लक्ष्मणराव मालुसरे आणि उतेकर आल्यानंतर उतेकर यांनी अलिबागला येऊन सर्व हकिगत प्रभाकर पाटील यांच्या कानावर घातली.


शिवरायांनी नरवीर तानाजी मालुसरे यांच्या वीरदेहावर घातलेली  कवड्यांची माळ


       पुण्यतिथीस सुरुवात
       त्याचवेळी प्रभाकर पाटील यांनी निर्णय घेतला की, यावर्षीपासून उमरठला नरवीर तानाजी मालुसरे यांची पुण्यतिथी साजरी करायची व त्या पहिल्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून बाळकृष्ण मालुसरे यांनाच आमंत्रित करायचे. अशा प्रकारे नरवीर तानाजी मालुसरे यांच्या पुण्यतिथीस १९८० पासून सुरुवात झाली. बाळकृष्ण मालुसरे त्यांची मातोश्री सावित्रीबाई मालुसरे, बंधू, पारगडचे शेलार, झेंडे असे सर्व मानकरी घेऊन बेळगावहून मॅटेडोर गाडीने पोलादपूरला आले. त्यांच्या स्वागताला सुभेदार लक्ष्मणराव मालुसरे हजर होते. पोलादपूरला विश्रामगृहात सर्वांची व्यवस्था करण्यात आली होती. दुसर्‍या दिवशी दोन-तीन गाड्या घेऊन सर्वजण उमरठला गेले. रस्ता कच्चाच होता, पण दुपारी त्यांनी उमरठ गाठले. कळंबे यांच्या घरात सुभेदार लक्ष्मणराव मालुसरे यांनी त्यांची सर्व व्यवस्था केली होती. नरवीर तानाजी मालुसरे यांना उमा नावाची मुलगी होती, ती उमरठच्या कळंबेंच्या घरात दिली होती. त्यामुळे कळंबे घराण्याने बाळकृष्ण मालुसरे यांच्या कुटुंबियांचे आणि पारगडच्या मानकर्‍यांचे जंगी स्वागत केले. दुपारी जिल्हा परिषदेच्या आठ-दहा गाड्या आल्या. शाळेच्या मुला-मुलींच्या चार-पाच बसेस आल्या. कार्यक्रमाला बरीच गर्दी होती. सभापती उतेकर यांनी बाळकृष्ण मालुसरे यांची प्रभाकर पाटील, आ. दत्ता पाटील, महाडचे आमदार व इतर जि.प. सदस्यांशी ओळख करुन दिली.


नरवीर तानाजी मालुसरे यांची तलवार


        नरवीरांचा पोवाडा
        कार्यक्रमाची सुरुवात बाळकृष्ण मालुसरे यांच्या मातोश्री सावित्रीबाई मालुसरे यांनी आपल्या खड्या आवाजात नरवीरांचा पोवाडा म्हणून केली. नरवीर तानाजी मालुसरे यांच्या वंशजाच्या सहवासात आपण आहोत या कल्पनेनेच प्रभाकर पाटील भारावून गेले. त्यांनी आपल्या भाषणात म्हटले की, ‘हा एक मोठा योगायोग सुभेदार लक्ष्मणराव मालुसरे यांनी घडवून आणला आहे. यापुढे पारगडाचे मालुसरे यांनी पंढरपूरच्या एकादशी वारीप्रमाणे दरवर्षी नरवीर तानाजी मालुसरे यांच्या पुण्यतिथी कार्यक्रमास उमरठला यावे.’
       यानंतर आ. दत्ता पाटील व बाळकृष्ण मालुसरे यांचे भाषण झाले. या कार्यक्रमाचे उमरठच्या विकासाची मुहुर्तमेढ रोवली गेली. पुढे दोन वर्षात प्रभाकर पाटील यांनी उमरठचा कायापालट केला. नरवीरांच्या समाधीवर मेघडंबरी, पुतळ्याजवळ कमानी गेट, उमरठपर्यंत डांबरी रस्ता, नळपाणी योजना व विश्रामगृह व नरवीर तानाजी मालुसरे हॉस्पिटल अशी कामाची सुरुवात केली.

        बाळकृष्ण मालुसरे आज हयात नाहीत. त्यांनी नरवीर तानाजी मालुसरे यांचे आपण ११ वंशज आहोत म्हणून अभिमान बाळगला, परंतु गर्व बाळगला नाही. ते अनगोळ-बेळगाव येथे किराणा मालाचे दुकान चालवायचे आणि सर्वसामान्यांसारखे राहायचे. इतर संस्थानिकांप्रमाणे छत्रपतींचा झेंडा बाजूला ठेवून स्वत:चा झेंडा ङ्गडकवत ते स्वत:च्या मिशीला पीळ देत बसले नाहीत. आपण छत्रपती शिवाजी महाराजांचे पाईक आहोत, हीच श्रद्धा बाळकृष्ण मालुसरे यांच्याकडे होती. हा प्रांजळपणा प्रभाकर पाटील यांना आवडला आणि त्यांनी अखेरपर्यंत नरवीरांच्या ११ व्या वंशजाला अंतर पडू दिले नाही. आज पारगड, झेंडेवाडीला १२ वे आणि पुण्याला १३ वे वंशज आहेत, तर महाडलाही १३ वे वंशज आहेत. या नरवीर तानाजी मालुसरे यांच्या वंशजांना आता रायगडच्या जनतेनेही अंतर पडू देऊ नये, इतकेच.