शुक्रवार, २५ डिसेंबर, २०२०

भीमपराक्रम करणारा टी-५५ रणगाडा अलिबागेत ठरणार प्रेरणास्रोत

   -उमाजी म. केळुसकर ⬑ रायगडचा डंका ⬉

अलिबाग ही रायगड जिल्ह्याची राजधानी आहे. सरखेल कान्होजी आंग्रे ते जनरल अरुणकुमार वैद्य असा अलिबागचा समर्थ चेहरा आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा वारसा सांगणारे हे दोन्ही महापुरुष आणि ही भूमी आहे. येथे पराक्रमाचा वारा वाहतो. येथील समुद्राने, मिश्रदुर्ग कुलाब्याने सर्व शाह्यांचा थरकाप उडविला. या समुद्राला, कुलाब्याला मानवंदना देण्यासाठी, ऐतिहासिक पर्यटनाला बळकटी देण्यासाठी रायगडचे माजी जिल्हाधिकारी डाॅ. विजय सूर्यवंशी यांच्या संकल्पनेतून आणि अलिबागचे नगराध्यक्ष प्रशांत नाईक यांच्या धडपडीतून समुद्र किनारी टी-५५ रणगाडा बसवण्यात आला आहे. या रणगाड्याच्या माध्यमातून भारताच्या संरक्षण सामर्थ्याची ओळख अलिबागेत जगभरातून येणाऱ्या पर्यटकांना होणार आहे. या रणगाड्यामुळे अलिबागकरांचीच नाही, तर रायगडकरांची छाती अभिमानाने फुलली आहे.

रायगडचे जिल्हाधिकारी म्हणून डाॅ. विजय सूर्यवंशी यांनी सूत्रे हाती घेतल्यावर मी रायगड टाइम्समध्ये विशेष लेख लिहून जिल्हाधिकारी म्हणून त्यांच्यापुढे कोणती आव्हाने आहेत, याबाबत उहापोह केला. तेव्हा त्यांनी आवर्जून या लेखाची दखल घेऊन मला फोन केला आणि त्यांच्या मनातील रायगड जिल्ह्याच्या विकासाचा आलेख त्यांनी माझ्यासमोर मांडला. रायगडचे पर्यटन मग ते सागरी, डोंगरी, सामाजिक, सांस्कृतिक, ऐतिहासिक, शैक्षणिक, वैज्ञानिक असो, त्याची जगाला ओळख व्हावी, येथील पर्यटन वाढावे, येथील जनतेचे आणि पर्यटन उद्योगावर आधारीत जनतेचे जीवनमान वाढावे अशी त्यांची तळमळ होती. यात आपलेही सहकार्य लागेल असेही त्यांनी मला म्हटले. सामाजिक, सांस्कृतिक, पर्यटन क्षेत्राला मी माझ्यापरीने सहकार्य करीत असतो. त्यामुळे त्यांचा दृष्टीकोन मला आश्वासक वाटला. त्यादृष्टीने त्यांनी पावलेही उचलली. अलिबाग समुद्रकिनाऱ्यावर रणगाडा बसविण्याची योजना त्यांनी आखली. त्यासाठी केंद्र सरकारकडे पाठपुरावा केला. दरम्यान डाॅ. विजय सूर्यवंशी यांची बदली झाली. परंतु त्यांच्या प्रयत्नांना यश आले. यासाठी अलिबागचे नगराध्यक्ष प्रशांत नाईक यांनीही धडपड केली. या प्रयत्नाचे आणि धडपडीचे मूर्त स्वरुप म्हणजे १९७१ च्या भारत-पाक युद्धात वापरलेला, प्रदीर्घ देशसेवेतून निवृत्त झालेला टी-५५ रणगाडा. हा रणगाडा आता अलिबाग समुद्र किनाऱ्याची केवळ शोभाच वाढविणार नाही, तर तरुणांना लष्करी सेवेत सामील होण्यासाठी प्रेरणाही देणार आहे.
सोव्हिएत युनियनने तयार केलेल्या या रणगाड्यांचा जगातील सुमारे ५० देशांनी वापर केला आहे. सध्या भारतात हे रणगाडे सक्रीय नाहीत. त्यांना २०११ मध्ये सेवेतून निवृत्त करण्यात आले. त्यांनी १९६४ ते २०११ पर्यंत ४७ वर्षांची सेवा बजावली. सध्या या रणगाड्यांचा प्रशिक्षणासाठी वापर केला जातो. शीतयुद्धाच्या सुरुवातीच्या काळात सोव्हिएत युनियनने तयार केलेला ‘टी-५४’ हा रणगाडा जगातील सर्वाधिक उत्पादन झालेला रणगाडा मानण्यात येतो. त्याच्या विविध आवृत्ती मिळून ८६ हजार ते १ लाख रणगाडे तयार झाल्याचा अंदाज आहे. त्या खालोखाल क्रमांक लागतो तो सोव्हिएत युनियनच्याच दुसऱ्या महायुद्धात वापरलेल्या ‘टी-३४’ या रणगाड्याचा. सोव्हिएत युनियनने १९४७ साली ‘टी-५४’ चा विकास सुरू केला आणि १९४९ साली हा रणगाडा सोव्हिएत सैन्यात दाखल झाला. या रणगाड्याची लांबी २८ फूट, रूंदी १२ फुट, तर वजन ३५ टन आहे. त्याच्यावरील चिलखताची जाडी ८ इंच आहे आणि त्यावर ४ इंच व्यासाची मुख्य तोफ आणि मशिनगन आहेत. हा रणगाडा ताशी ४८ किमी वेगाने एका दमात ४०० किमीचे अंतर पार करू शकतो. या रणगाड्यासाठी कमांडर, गनर, लोडर आणि ड्रायव्हर अशा चार जणांची आवश्यकता असते. या रणगाड्याचे वैशिष्ट्य म्हणजे उंचीला कमी असलेले ‘हल’ (मुख्य बॉडी) आणि मश्रुमच्या आकाराचे गन टरेट. कमी उंचीमुळे हा रणगाडा शत्रूच्या माऱ्याला सहजासहजी बळी पडत नसे. पुढे सर्वच रशियन रणगाड्यांची ही खासियत बनली.
टी-५४ च्या टी-५४ ए, टी-५५ बी आदी अनेक आवृत्ती विकसित होत गेल्या. मूळ रणगाड्याला आण्विक हल्ल्याच्या वातावरणात लढण्याची क्षमता देऊन टी-५५ ही सुधारित आवृत्ती तयार केली होती. त्याचे चिलखत अधिक जाड आणि इंजिन अधिक प्रभावी होते. दुसऱ्या महायुद्धानंतर सोव्हिएत प्रभावाखालील वॉर्सा पॅक्ट संघटनेतील ४० देशांना टी-५४ आणि टी-५५ या आवृत्तींचा भरपूर पुरवठा केला होता. झेकोस्लोव्हाकिया, रुमानिया, पोलंड, चीन अशा अनेक देशांसह खुद्द सोव्हिएत युनियनमध्ये त्याचे १९९० च्या दशकापर्यंत उत्पादन होत होते. चीनने या रणगाड्यांची टाइप-६९ नावाने आवृत्ती तयार केली. हीच आवृत्ती चीनने पाकिस्तानला विकली. २०१० मध्ये तिला रंगरंगोटी करुन पाकिस्तानने तिला अल्झरा नाव दिले. अल्झरा टी-५५ रणगाड्याचीच आवृत्ती आहे.
अरब देश आणि इस्रायलमधील १९६७ चे ‘सिक्स डे वॉर’ आणि १९७३ चे योम किप्पूर युद्ध यात टी-५४/५५ रणगाडय़ांचा भरपूर वापर झाला. इस्रायलने युद्धात अरब देशांकडून १००० हून अधिक टी-५४/५५ रणगाडे काबीज केले आणि त्यांच्या सैन्यात वापरले. इस्रायलने या रणगाड्यांवरील रशियन १०० मिमीची तोफ बदलून १०५ मिमीची तोफ बसवली आणि रशियन इंजिन बदलून जनरल मोटर्स कंपनीचे डिझेल इंजिन बसवले. इस्रायलने या रणागाड्यांना ‘तिरान-५’ असे नाव दिले. टी-५४/५५ रणगाड्यांनी १९८० ते १९८८ दरम्यानचे इराण-इराक युद्ध, व्हिएतनाम युद्ध, युगोस्लाव्हियाच्या विघटनानंतरचे बाल्कन युद्ध अशा अनेक संघर्षांत महत्त्वाची भूमिका बजावली. भारताच्या ताफ्यातील टी-५४, टी-५५ या रणगाड्यांनी १९६४ ते १९८४ या तीन दशकांत पाकिस्तानी सैन्यदलात मोठी दहशत निर्माण केली होती.
१९७१ च्या तिसऱ्या भारत-पाकिस्तान युद्धात अलिबागचे सुपुत्र अरुणकुमार श्रीधर वैद्य यांनी मेजर जनरल म्हणून पहिल्या चिलखती दलाचे नेतृत्व केले. चक्रा, देहलरा आणि बसंतर येथे त्यांनी धैर्य, रणनेतृत्व दाखवून शत्रूला नामोहरम केले. त्यांच्या तुकडीने शत्रूच्या प्रदेशात २० कि.मी.पर्यंत मजल मारून शत्रूचे ६० रणगाडे नष्ट केले, त्यातील बहुतांश रणगाडे टी-५४ रणगाड्यांनी नष्ट केले होते. या युद्धात भारताने पाकिस्तानचा निर्णायक पराभव केला व बांगलादेशची निर्मिती केली. या युद्धातील अरुणकुमार वैद्य यांच्या कुशल रणनीतीबद्दल भारत सरकारने त्यांना दुसऱ्यांदा महावीरचक्र प्रदान केले. त्यापूर्वी १९६५ च्या भारत-पाकिस्तान युद्धात केलेल्या पराक्रमाबद्दल त्यांना परमवीरचक्र मिळाले होते. दोनदा महावीरचक्र मिळविणारे अरुणकुमार वैद्य हे एकमेव सेनाधिकारी आहेत आणि ते अलिबागचे सुपुत्र होते, त्यांच्या कार्यकाळातील रणगाडा अलिबागेत स्थापन होणे हीदेखील अभिमानाची बाब आहे.
भारतीय सैन्यदलात तब्बल ४७ वर्षे सेवा बजावून निवृत्त झाल्यानंतर टी-५५ रणगाडे देशातील विविध राज्यांत प्रेरणास्रोत म्हणून स्थापित करण्यात आले आहेत. महाराष्ट्रात, कोकणातही टी-५५ रणगाडे स्थापन करण्यात आले आहेत. कोकणामधील रायगड जिल्ह्यातील अलिबाग येथेही टी-५५ रणगाडा समुद्र किनारी कुलाबा किल्ल्यासमोर चौथरा बांधून उच्चासनी स्थापन करण्यात आल्याने अलिबागच्या कीर्तीत, सौंदर्यात भर पडली आहे. अलिबाग एकेकाळी नारळी-पोफळींच्या वाड्यांनी समृद्ध असे गाव होते, जिल्ह्याची राजधानी म्हणून स्वत:त काळानुरुप बदल घडवत अलिबाग आता आधुनिक शहर बनले आहे. अलिबागच्या विकासाचा, सौंदर्याचा ध्यास घेतलेल नगराध्यक्ष प्रशांत नाईक यांच्या नेतृत्वाखाली अलिबागचा समुद्र किनारा देखणा झाला. आता तेथे भीमपराक्रम करणारा टी-५५ रणगाडा स्थापन करण्यात आला आहे. या रणगाड्यामुळे १९७१ च्या भारत-पाकिस्तान युद्धाचे आणि भारताचे माजी लष्करप्रमुख अरुणकुमार वैद्य यांचे स्मरण होणार आहे. या स्मरणगाथेने पर्यटकांच्या अंगावर रोमांच उभे राहणार आहे, तर तरुण पिढीला लष्करात सेवा बजावण्यासाठी प्रेरणा मिळणार आहे.

गुरुवार, २० ऑगस्ट, २०२०

कोरोनाचा धोका उंबरठ्यापर्यंत आलाय!

-उमाजी म. केळुसकर ⬑ खारावारा ⬉

जगाला कोरोना महामारीने गेले सहा महिने स्तब्ध केले आहे. भारताचेही कोरोनामुळे अर्थचक्र गाळात रुतले. वित्तहानी झाली, पण कोरोनापुढे जीवितानेही हार पत्करल्यामुळे अनेक सामान्य-असामान्यांना आपणास मुकावे लागले. देशाचा, राज्याचा, जिल्ह्याचा आणि तालुक्याचा विचार केला, तर कोरोना महामारीकडे दुर्लक्ष करुन चालणार नाही, हे पक्के लक्षात घ्यायला हवे. कोरोनामुक्त झालेल्यांचा संख्या मोठी असली तरी कोरोनामुळे मृत्यू पावलेल्यांचा संख्याही काही कमी नाही, हे विसरुन चालणार नाही. अलिबागचे बांधकाम व्यवसायिक, अलिबाग अर्बन बँकेचे संचालक प्रताप गंभीर यांच्या कोरोनामुळे झालेल्या, चटका लावण्याऱ्या मृत्यूने इतरांनी आत्मपरीक्षण करणे आवश्यक आहे.
तनया इन्फ्रास्ट्रक्चरचे प्रताप गंभीर अलिबागेतील बांधकाम व्यवसायातील बडे प्रस्थ. माझा आणि त्यांचा फारसा संपर्क नाही. दोघेही अलिबागेत असल्यामुळे समोरासमोर भेट झाल्यावर स्मितहास्य करुन पुढे जायचे, यापेक्षा वेगळे काही व्हायचे नाही. एक-दोन वेळा त्यांनी कोकणनामासाठी जाहिराती दिल्या, पण त्याहीपेक्षा जास्त संबंध आला नाही. त्यांचे विश्व वेगळे, माझे विश्व वेगळे. ते समांतर जात नव्हते, त्यामुळे एका शहरात असूनही आम्ही दोन टोकाला होतो. नगराध्यक्ष प्रशांत नाईक मित्रमंडळाच्या सामाजिक कार्यात मात्र त्यांचा सिंहाचा वाटा असायचा. त्यांचे सामाजिक कार्य हेच त्यांच्याकडे मी आकर्षित होण्याची बाब होती.
प्रताप गंभीर स्वामी समर्थांचे भक्त. पिंपळभाटच्या स्वामी समर्थ सेवा केंद्रात नेहमी जायचे, तेथील प्रत्येक उपक्रमात त्यांचा सहभाग असायचा, मला वाटते ते त्यांचे जगण्याचे टॉनिक होते. हे टॉनिक मिळत असल्यानेच बांधकाम क्षेत्रात अनेक चढउतार येऊनही ते ठाम राहिले. अनेक प्रकल्पांना त्यांनी साकार केले. त्यांना कोरोना महामारीने घेरणे आणि त्यातच त्यांचा अंत होणे ही, निश्चितच धक्कादायक बाब आहे.
प्रताप गंभीर यांच्यासह आतापर्यंत अलिबाग तालुक्यात ४३ रुग्णांचा मृत्यू झाला आहे, त्यामुळे कोरोना महामारी कोणाच्या उंबरठ्यापर्यंत येईल याचा काही नेम राहिलेला नाही. देशात कोरोना बाधितांची संख्या २८ लाख ३६ हजार ९२६ वर पोहोचली आहे. आतापर्यंत २० लाख ९६ हजार ६६५ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे, तर ५३ हजार ८६६ रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. महाराष्ट्रात कोरोना बाधितांची संख्या ६ लाख १५ हजारावर पोहोचली आहे. यापैकी २० हजार ६८७ रुग्णांचा मत्यू झाला आहे, तर चार लाख ३८ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. रायगड जिल्ह्यात कोरोना बाधित रुग्णांची सख्या २२ हाजर ३५३ वर पोहोचली आहेत यापैकी ६७२ रुग्णांचा मृत्यू झाला असून १८ हजार ३३३ रुग्ण उपचारानंतर बरे झाले आहेत. सद्यस्थितीत ३ हजार ३४८ पॉझिटीव्ह रग्णांवर उपचार सुरु आहेत. अलिबाग तालुक्यातील कोरोना रुग्णांची संख्या १ हजार ५२१ वर पोहोचली आहे. यापैकी ४३ रुग्णांचा मत्यू झाला तर १ हजार २२२ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. २५७ रुग्णावर उपचार सुरु आहेत. ही सर्व आकडेवारी तासातासाला बदलत असल्यामुळे हा लेख वाचेपर्यंत या आकडेवारीत चढउचार झालेला पहायला मिळेल, तथापि मृत्यूची टक्केवारी कमी असली तरी मृत्यूची संख्या कमी नाही हे लक्षात घेतले पाहिजे.
दोन दिवसांवर गणेशोत्सव आला आहे. कोरोना महामारी धर्म बघत नाही, सण-उत्सव बघत नाही, त्यामुळे सर्व जनतेनेे सावधगिरी बाळगून आपल्या घरातच गणेशोत्सव साजरा करुन जनसंपर्क टाळला पाहिजे. आतापर्यंत असा समज होता की प्रतिकारशक्ती कमी असल्यामुळे बालके आणि वृद्धांना कोरोनाचा धोका असतो, पण प्रत्यक्षात तरुणांनी सावधगिरी न बाळगल्यामुळे त्यांचेच मृत्यू कोरोनामुळे अधिक झाले आहेत. कोरोनापासून बचाव व्हावा यासाठी काही बाबींची काटोकोर पूर्तता होणे गरजेचे आहे. पचापचा कुठेही थुंकणार्यांनी आपल्या तोंडावर लगाम घातला पाहिजे. कारण त्यांच्या या सवयी जाताना दिसत नाहीत. त्यांच्या या सवयीने दुसर्यांच्या जीविताला धोका निर्माण होऊ शकतो हे त्यांनी लक्षात घेतले पाहिजे. मास्कचा वापर करणे व हातांची, तसेच शरीराची स्वच्छता ठेवणे, पिण्यासाठी थंड पाण्याचा वापर न करणे, पौष्टिक आहार आणि योग्य व्यायाम करण्याची गरज आहे. प्रतिकारशक्ती वाढवूनच कोरोनाला हरवायचे आहे. कोरोनापेक्षा कोरोनाच्या संशयाने, किंवा त्याच्या धास्तीने होणारा मनस्ताप जास्त आहे. त्यामुळे हा मनस्ताप होऊ नये, याच्यावर काळजी घेणे हाच एक सर्वोत्तम उपाय आहे. अशी काळजी घेतली नाही, तर कोरोनाचे आक्रमण प्राणघातकही ठरु शकते. रोज डोळ्यासमोर वावरणारे बांधकाम व्यवसायिक प्रताप गंभीर कोरोनाने गेले, यापुढे कोणीही कोरोनाने जाऊ नये, याची दक्षता घ्यायलाच हवी.

बुधवार, १९ ऑगस्ट, २०२०

प्रवीण कदम : सामान्यांचा आधार गेला

-उमाजी म. केळुसकर ⬑ खारावारा ⬉


आमचा मित्र आम्हाला सोडून गेला. वयाचं अर्ध शतकही पार केले नाही, वयाच्या ४९ व्या वर्षीच गरुडपाड्याचे आमचे मित्र, सकल मराठा समाज अलिबाग तालुका उपाध्यक्ष, उद्योजक प्रवीण भास्कर कदम जीवनाची शर्यत अर्ध्यावर सोडून गेले. १६ नोव्हेंबर १९७२ ही त्यांची जन्मतारीख. शून्यातून विश्व निर्माण केलेला आमचा मित्र मृत्यूला मात्र हरवू शकला नाही, १९ ऑगस्ट २०२० ला त्यांनी अखेरचा श्वास घेतला. मात्र मृत्यू त्यांच्या दातृत्वाची, कर्तृत्वाची आणि नेतृत्वाची कवचकुंडलं हिरावू शकला नाही, हे वास्तव आहे. आमचा मित्र आठवणींच्या रुपात आमच्या ह्रदयात अमर आहे.
शेतकरी कामगार पक्षाचे बामणगाव विभागातील प्रवीण कदम हे बिनीचे शिलेदार. अलिबाग तालुक्यात मराठा समाजाचं एकीकरण करण्याचे त्यांनी तन-मन-धन अर्पून काम सुरु केले. त्याच सुमारास सकल मराठा समाजाचे सचिव, झिराडपाड्याचे उल्हास पवार यांच्या माध्यमातून त्यांची माझी ओळख झाली आणि मैत्री कधी झाली ते कळलेच नाही. खरे तर त्यांचे मोठे बंधू कृष्णा यांची माझी तीस वर्षांपासूनची मैत्री, ते प्रवीण कदम यांचे भाऊ आहेत, हे एकदा प्रवीण कदम यांच्या वाढदिवशी त्यांना शुभेच्छा द्यायला आम्ही म्हणजे सकल मराठा समाज, अलिबाग तालुका अध्यक्ष नरेश सावंत, सचिव उल्हास पवार, सहसचिव अनिल गोळे, सदस्य प्रदीप ढवळे, मनोहर कदम, संतोष पवार, कृष्णा जाधव, नयन जरंडे, बाळू पवार, सुधीर पाटील, जितेंद्र साळसकर, यशवंत हरेर आदी त्यांच्या घरी गेलो असताना कळले. आणि आपल्या मित्राचा भाऊ देखील आपला मित्र आहे, हे पाहून तर माझ्या आनंदाला उधाण आहे.
प्रवीण यांची मैत्री ही जीवाभावाची, या मैत्रीचा कधी गैरफायदा न घेतल्यामुळेच ती मैत्री अक्षय आहे. सा. कोकणनामाचे दैनिक करावे, त्याच्या भांडवलाची मी तजवीज करतो, असे ते नेहमी म्हणायचे, ते म्हटल्या प्रमाणे करणारे होते, पण मी या बाबीला नम्रपणे नकार देत आलो. कोकणनामाच्या मोजक्या हितचिंतकांपैकी प्रवीण कदम हे एक होते. मनात एक आणि ओठावर एक असा त्यांचा स्वभाव नव्हता. रोखठोक स्वभाव खरे तर माणसे तोडतो, पण प्रवीण कदम यांनी सतत माणसे जोडली. कारण या रोखठोक स्वभावाबरोबर एक जाणतेपण त्यांच्यात होते. मराठा समाजाबरोबरच बहुजन समाजाबद्दल त्यांना कळकळ होती. बहुजन हिताय, बहुजन सुखाय हे त्यांच्या कार्याचं ब्रीद होतं, त्यामुळे त्यांनी कधी आपपर भाव बाळगला नाही. जो मदत मागण्यास समोर आला, त्याला निरपेक्षपणे मदत केली. बामणगाव विभागात प्रवीण कदम यांचा शब्द हा अखेरचा होता.
प्रवीण कदम मोठी स्वप्न पहाणारे, केवळ स्वप्नच पहायचं नाही, तर ते प्रत्यक्षात आणायचं ही त्यांची जिद्द. म्हणूनच प्रतिकूल परिस्थिती संघर्ष करुन त्यांनी त्यांनी स्वत:चं एक वेगळ साम्राज्य उभं केलं. हे साम्राज्य उद्योगाच्या रुपात, सामाजिक नेतृत्वाच्या रुपात, राजकीय कार्यकर्त्याच्या रुपात, अशा विविध स्वरुपात त्यांनी उभं केलं. घरच्या प्रतिकूल परिस्थितीमुळे दहावीनंतर शिक्षणाला रामराम ठोकून त्यांनी १९९० साली अलिबाग नागडोंगरी येथे सायकल दुरुस्तीचा व्यवसाय सुरु केला. प्रवीण कदम सायकल दुरुस्तीत एकदम पटाईत. सायकल दुरुस्तीच्या व्यवसायातून त्यांची परिस्थिती थोडी सुधारल्यावर त्यांनी स्वत:च्या हुशारीने १९९८ पासून बांधकाम व्यवसायात उडी घेतली. स्वत: इंजिनिअर वा आर्किटेक नसताना अनुभव हाच गुरु हे मानून त्यांनी असंख्य घरे, बंगलो, दुकाने, गाळे, हॉटेल व इमारती यांची अलिबागमध्ये, अलिबागबाहेर कामे केली. स्वतःचे ऑफीस, दोन इंजिनिअर, चार सुपरवायझर व वीस ते पंचवीस जणांच्या कर्मचारी वर्गाला रोजगार पुरविला.
प्रवीण कदम यांना राजकारणाची आवड. १९९५ पासून ते ग्रुप ग्रामपंचायत कावीरमध्ये तीन वेळा सदस्य म्हणून भरघोस मताधिक्याने निवडून आले. सध्या ग्रुप ग्रामपंचायत कावीरचे उपसरपंच म्हणून कार्यभार सांभाळत होते. त्यांच्या कामाची दखल घेत शेतकरी कामगार पक्षाचे सरचिटणीस आ. जयंत पाटील यांनी विश्वासाने बामणगाव विभागीय चिटणीसपदाची सूत्रे त्यांच्याकडे सोपविली होती. राजकारणाप्रमाणेच ते सामाजिक कार्यात अग्रेसर होते. त्यांनी संभाजी ब्रिगेडचे तालुका अध्यक्षपद, नॅशनल ऍण्टी करप्शन ऍण्ड ऍन्टी ऍट्रॉसिटी ऑर्गनाझेशनचे (टायगर फोर्स) रायगड जिल्हा उपाध्यक्ष, बामणगाव पंचक्रोशी कबड्डी लीगचे कार्याध्यक्ष, सकल मराठा समाज अलिबागचे उपाध्यक्ष अशी त्यांनी पदे भूषविली.
मराठा मोर्चाचे त्यांनी अलिबागेत यशस्वी आयोजन केले. पालकमंत्र्यांचा उपस्थितीत मराठा आत्मसन्मान मेळावा व मराठा जात प्रमाणपत्र उपक्रम यशस्वी करण्यात त्यांनी मोलाचा वाटा उचलला. ज्याप्रमाणे ते सामाजिक, राजकीय क्षेत्रात आहेत तसेच शैक्षणिक क्षेत्रातही मागे नव्हते. अनेक गरीब व गरजू विद्यार्थ्यांना त्यांनी शिक्षणाला मदत केली असून ते सध्या कोएसोच्या बामणगाव हायस्कूलमध्ये खजिनदार म्हणून कार्यरत होते. ऑगस्ट २०१९ मध्ये कोल्हापूर येथे नैसर्गिक आपत्ती आली, त्यावेळी स्वतः प्रवीण कदम यांनी आपल्या मित्रांसह (मीही त्यांच्या सोबत होतो.) अब्दुल लाट या गावी जाऊन विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप करून तेथील मुलांना मदतीचा हात दिला.
आपला राजकीय, सामाजिक, औद्योगिक प्रवास करताना त्यांनी कधी कुटुंबाकडे दुर्लक्ष केले नाही. प्रेरणा वहिनी (रेशमा धुमाळ) आमच्या नवेनगरच्या. त्यामुळे प्रवीण कदम आमच्या पोयनाड विभागाचे जावईच. यश आणि पार्थ ही दोन मुले असा त्यांचा सुखी संसार होता. पण क्रूर नियतीला हे सुख मंजूर नव्हते म्हणून तीने रडीचा डाव खेळून प्रवीण कदम यांचा घात केला आणि प्रेरणा वहिनी, यश आणि पार्थ या त्यांच्या मुलांना दु:ख सागरात लोटून दिले. मोठी बहीण रजनी, दोन नंबरचा भाऊ कृष्णा, त्यानंतरचे अशोक, रवींद्र, प्रमोद आणि शेवटची बहीण रंजना या सर्वांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. बामणगाव विभागाचेही प्रवीण कदम यांच्या अचानक जाण्याने नुकसान झाले आहे, ते कधीही भरुन निघणारे नाही. मृत्यू क्रूर असतो, पण परमेश्वर कसा क्रूर असू शकतो? का त्याने माझ्या मित्राला आयुरारोग्य दिले नाही? म्हणून आमचे देवाशी सतत भांडण राहील.

रविवार, ५ जुलै, २०२०

शं.ना. नवरे, मी आणि चित्रकार राजेंद्र घोसाळकर


 -उमाजी म. केळुसकर ⬑ रायगडचा डंका ⬉
      
       फेसबुकवर राजेंद्र घोसाळकर दिसले... 
       घोसाळकर हे काही नारायण धारप किंवा रत्नाकर मतकरी यांच्या गूढकथांतील पात्र नव्हे, तर आपल्या रेवदंड्यातील प्रसिद्ध चित्रकार आहेत.
        या राजेंद्र घोसाळकर यांचं सुदैव असं की ते चक्क सुप्रसिद्ध साहित्यिक शं.ना. नवरे यांच्या कथेचा एक अविभाज्य भाग बनले. राजेंद्र घोसाळकर यांच्या निसर्गचित्रांवरुन त्यांनी एक कथा लिहिली आणि मी ती ‘चित्रकथा’ शीर्षकाची कथा दैनिक कृषीवलच्या १८ सप्टेंबर १९९४ च्या ‘संवाद’ पुरवणीत प्रसिद्ध केली होती. ही कथा त्यांनी नंतर त्यांच्या एका कथासंग्रहात देखील छापली. एकंदरीत या कथेतील निसर्गचित्रं हेच प्रमुख पात्र होतं. आणि हा सर्व निसर्ग रेवदंड्याचा होता. चित्रातून हा निसर्ग बघणार्‍याला आकर्षित करुन घेतो, जणू काही बघणार्‍याला रेवदंड्यातच पोहोचवतो, अशी ती कथा होती.
       ही उत्कट निसर्गचित्रं शं.ना. नवरे यांच्या घरात लावलेली होती. शं.ना. नवरे येणार्‍या-जाणार्‍या आपल्या मित्रांना, स्नेह्यांना ही निसर्गचित्रं माझ्या रेवदंड्याच्या तरुण चित्रकार मित्रानं, राजेंद्र घोसाळकर यांनी चितारलेली आहेत, हे कौतुकाने सांगायचे. ‘चित्रकथा’ या कथेने रेवदंड्याचे चित्रकार राजेंद्र घोसाळकर हे माझ्या मनीमानसी वसले होते. पण त्यांची भेट घडायला ६ वर्षे लागली. २००० साली ते माझ्यासमोर येऊन दत्त म्हणून उभे राहिले. 
      सोमवार, २७ एप्रिलला मुंबईतील जहांगीर कलादालनात त्यांच्या चित्राचं प्रदर्शन आयोजित करण्यात आले होते, त्याचे निमंत्रण देण्यासाठी ते आले होते. तेव्हा मी त्यांची २६ एप्रिल २००० च्या संवाद रविवार पुरवणीसाठी ‘अमूर्त चित्रांचा किमयागार’ या शीर्षकाची मुलाखत घेतली. त्यांनी तेव्हा आपली निसर्गचित्रे, अमूर्तचित्रे मला आपुलकीने दाखविली. त्यातील एक चित्र प्रेमाने त्यांची आठवण म्हणून त्यांनी मला दिले.
         मुलाखत प्रसिद्ध झाल्यानंतर तिला जिल्ह्यातून चांगला प्रतिसाद लाभला. ज्यांच्या चित्रावरुन शं.ना. नवरे यांच्यासारख्या सुप्रसिद्ध साहित्यिकाला कथा लिहाविसी वाटली, असा चित्रकार आपल्या रेवदंड्यात आहे, ही कौतुकाची बाब होती. आज या घटनेला २० वर्षे झाली आहेत. रेवदंडा आणि अलिबाग काही दूर नाही, पण या दीर्घ कालावधीत एकदाही आमची भेट झाली नाही, की दोघांनाही आपण एकमेकांची भेट घ्यावी असे वाटले नाही. तसा कोणताच संबंध उरला नव्हता, एकच पाश मनाला बांधून होता, तो म्हणजे त्यांनी दिलेलं निसर्गचित्र.
       पण २० वर्षापूर्वी ऑफीसमध्ये दुपारी ज्या कपाटात मी ते निसर्गचित्र ठेवलं होतं, ते संध्याकाळी मी घरी घेऊन जाण्यासाठी कपाट उघडलं, तर ते चित्र तेथे नव्हतं. ते चित्र कोणी नेलं ते २० वर्ष झाली तरी शेवटपर्यंत कळलं नाही, कदाचित माझ्यापेक्षा ते चित्र नेणार्‍याला त्या चित्राची किंमत कळली असावी, पण अशाप्रकारे ते चित्र गायब व्हायला नको होतं. पण ते झालं. ही बाब मनातच राहिली. आज फेसबुकवर राजेंद्र घोसाळकर यांना कबुली देतो की, तुम्ही दिलेलं निसर्गचित्र माझ्याकडे नाही. तुमच्या चित्रांनी शं.ना. नवरे यांच्या घराला एक वैभव लाभलं, पण माझ्यासारख्या लेखकाला ते सुख नाही. माझ्या घराच्या भिंतीच आता तुमच्या अमूर्त चित्रांप्रमाणे झाल्या आहेत. रंगहीन भिंतीतून कोणीही काहीही अर्थ काढावा...

रविवार, २८ जून, २०२०

कोकण अन्यायाचा धनी

-उमाजी म. केळुसकर ⬑ दादागिरी ⬉
कोकणातील रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यांनी ३ जून २०२० ला निसर्ग चक्रीवादळाचा थरार अनुभवला. हजारो घरांची पडझड झाल्यामुळे संसार उघड्यावर आले. झाडे पडली. फळबागा उद्ध्वस्त झाल्या. शेकडो गावांचा बाहेरच्या जगाशी संपर्क तुटला. हजारो वीजेचे खांब पडल्याने गावेच्या गावे अंधारात सापडली. या विदारक परिस्थिमुळे कोकणवासियांचं मन पिळवटून निघालं. मदतीला धावणाऱ्या कोकणाच्या मदतीला मात्र राज्यातून अथवा देशातून मदतीचा हात मिळाला नाही. राज्य सरकारने मदतीचे तुषार उडविले, केंद्र सरकारने तर कोकणाची (महाराष्ट्राची) उपेक्षाच केली. पण कोकणी माणूस हरणारा नाही, तो पुन्हा उभा राहील. देशाच्या मदतीसाठी धाऊन जाईल, पण ज्यांनी ज्यांनी उपेक्षा केली, त्यांना मात्र जमिनीवर उतरवेल. कोकणी माणूस खमका आहे, तेव्हा लोकप्रतिनिधींनी सावध रहायला हवे.
मनीआॅर्डरवर जगणाऱ्या कोकणाला गेल्या दोन दशकात बरे दिवस आले होते. अर्थात याला सरकार नाही, तर कोकणी माणसाची स्वावलंबी प्रवृत्ती कारणीभूत ठरली. आपल्या दारिद्र्याचे रडगाणे गाण्यापेक्षा कष्टाचे जीवनगाणे गाण्याचे त्याने ठरवले. आधीही तो कष्टकरी होता, पण याच वाड्यांमधून नंदनवन साकार करण्याचे त्याने स्वप्न पाहिले आणि ते साकारही केले. कल्पवृक्ष, आम्रवृक्ष, पोफळी, कोकम, फणस नि काजूचे झाड आदी त्याच्या घरातले सदस्य बनले. हे सदस्य श्वास घेत राहिले म्हणून कोकणचा श्वास चालू राहिला. कोरोना महामारीचा फटका बसल्याने कोकण विकल बनले होते, त्यात निसर्ग चक्रीवादळाने कोकणाला झोडपून काढल्याने रायगड, सिंधुदुर्ग, रत्नागिरीची अवस्था अतिशय विदारक झाली. मुलांप्रमाणे संगोपन केलेली वाड्यांतील झाडे आणि घरेदारे डोळ्यांदेखत कोसळून अखेरचे आचके देताना त्यांनी पाहिली आणि गेल्यावर्षी राज्यात आलेल्या महापुराच्या आपत्तीत मदतीसाठी धावून गेलेल्या कोकणाच्या डोळ्यांत अश्रूंचा महापूर आला.
हा अश्रूंचा महापूर त्याला स्वत:ला सावरुन स्वत:च पुसावा लागला. कोकणावर वर्षानुवर्षे अन्यायच होत आला आहे. कोकणात सर्वाधिक पाऊस पडत असूनही कोकणची तहान भागवू शकतील अशी मोठी धरणे येथे बांधण्यात आली नाही, म्हणून पावसाचे पाणी थेट समुद्रला जाऊन मिळते आणि ऐन उन्हाळ्यात पिण्याच्या पाण्याअभावी कोकणवासियांच्या तोंडचे पाणी पळते. येथे कारखानदारी आहे, पण येथील भूमीपुत्राच्या हाताला काम देणारे कृषीआधारित प्रकल्प नाहीत. रासायनिक कारखान्यांनी येथील नद्या, येथील समुद्र नासवला आहे. नद्यांचे पाणी तोंडात घेण्याजोगे उरले नाही, या नद्यांतील प्रदूषणामुळे नद्यांमध्ये मासेच न उरल्याने मासेमारीवर उपजीविका असलेल्याची उपजीविकाच तोडली गेली. येथील डोंगर पोखरले गेले, जंगले बेचिराख केली गेली, याचा पर्यावरणावरच दुष्परिणाम झाला नाही तर कोकणवासियांवरही परिणाम झाला. येथील भावी पिढीला कोणता वारसा मिळणार आहे, हा विचार मनात येताच ह्रदयाचे ठोके वाढायला लागतात.
हे ह्रदयाचे ठोके वाढणे उद्याच्या विदारक भविष्याच्या दारावरची ठकठक आहे. कोकणाला कारखानदारीने रोजगार मिळाला असला, तर कोकणविकासासाठी कारखानदारी हाच एकमेव आणि अंतिम उपाय नाही. येथील शेतीवाड्या उद्ध्वस्त करुन हा विकास करता येणार नाही, कृषीआधारित उद्योग आणि कारखानदारी ही कोकणच्या विकासाची दोन चाके ठरु शकतात. हे संतुलन राखले गेले तरच कोकणविकास सुपरफास्ट होईल. पण कोकणविकासाबाबत कोकणातील नेतृत्वाला आस्था आहे असे वाटत नाही आणि त्याच्यात त्याबाबत एकमतही नाही. मधु दंडवतेंसारखे नेते याला अपवाद आहेत, कोकण रेल्वेचे स्वप्न त्यांनी साकार केले, पण बाकी नेते आपला आकार वाढवत राहिले. त्यांचा हा विकारच कोकणच्या प्रगतीत अडसर ठरला. पण कोकणवासिय खचला नाही, तो स्वत:च स्वत:च्या वाटा शोधत राहिला, स्वत:च्या वाटा निर्माण करीत रहिला. पण या वाटाही निसर्ग चक्रीवादळाने उद्ध्वस्त केल्या.
निसर्ग वादळाने उद्ध्वस्त झालेल्या कोकणातील, नेतृत्वाचेही यानिमित्ताने वस्त्रहरण झाले. या वादळाने कोकणवासियांचे अपरिमित नुकसान केले आहे. पण त्यांचे अश्रू पुसण्याइतपतही मदत हे नेते खेचून आणू शकलेले नाहीत. मास्क बाजूला करुन आपल्या खिशातूनच ही मदत गरजवंताना देत असल्याचा आव आणताना ही नेतेमंडळी दिसून आली. राज्य सरकारने दिलेला निधी हा जनतेचाच पैसा असतो, तो त्यांना गरजेला देताना हे कशाला दातृत्वाचा आव आणतात? कोरोनाच्या बागुलबुव्यात रममाण झालेली नोकरशाही मिळालेली अल्प मदतही योग्यरित्या वितरित करु शकली नाही. म्हणे हेक्टरी मदत दिली जातेय. इथे हेक्टरी जमीन आहे कोणाकडे? जेमतेम ५ ते १५ गुंठे बागायती जमीन, त्यातच राहते घर. या चक्रीवादळग्रस्त बागायतदारांना प्रती हेक्टरी ( एक हेक्टर म्हणझे अडीच एकर ) ५० हजार रुपये नुकसानभरपाई जाहीर करण्यात आली. पण येथे हेक्टरी बागायती नसल्यामुळे ५ ते १५ हजार रुपयांच्याच मदतीची प्रक्रिया सुरु झाली. अजूनही या प्रक्रियेची प्रत्यक्ष क्रिया होत नसल्यामुळे बागायतदार मदतीपासून वंचित आहेत, अजूनही मदत आपल्यापर्यंत पोहोचली नसल्याचे या वादळग्रस्तांचे म्हणणे आहे.
या वादळग्रस्तांच्या म्हणण्याकडे गांभीर्याने लक्ष देण्याची गरज आहे. कोकणातील सामान्य शेतकरी, बागायतदार लोकांकडे हेक्टरी जागा नाही (ती नेते मंडळींकडे आहे.) त्यांच्याकडे गुंठ्यांनी जागा आहे. ही बाब लक्षात घेऊन कोकणासाठी हेक्टरी निकष बदून गुंठेवारीनुसार मदत दिली पाहिजे. पडलेली झाडे वार्षिक ५ ते १० हजार प्रत्येकी उत्पन्न द्यायची, ती सर्व झाडे तोडण्यासाठी ५-२५ हजार रुपये खर्च आहे, तितकाच खर्च नवीन झाडे लावण्याचा आहे. ती झाडे प्रत्यक्ष उत्पादन द्यायला ५ ते १५ वर्षे लागणार, असे असताना ५-१० हजार रुपयांची मदत म्हणजे या बागायतदारांची क्रूर चेष्टाच म्हणायला हवी. कोकणातील नेते भूमीपुत्रांच्या न्याय्य मागण्याबाबत कमी पडले म्हणून मदतीचे कुंभ येथे रिते होताना दिसत नाहीत. कोकणी माणूस संतापत नाही, तोडफोड करत नाही, आत्महत्या करत नाही, म्हणून त्याची सत्वपरीक्षा तरी किती पहायची?
निसर्गाने सत्वपरीक्षा घेतली तर समजू शकते. 'राजाने मारले आणि पावसाने झोडपले' तर दाद कुणाकडे मागायची अशी एक म्हण आहे. खरेच राजेशाहीत राजाने मारलं तर दाद कुणाकडे मागायची हा प्रश्नच होता, पण आता राजेशाही नाही, तर लोकशाही आहे. या लोकशाहीत कोकणवासियांच्या सहनशिलतेचा अंत पहायचा अविवेकी खेळ सरकारने आणि लोकप्रतिनिधींनी खेळू नये. कोकणवासीय फिनिक्स पक्षाप्रमाणे पुन्हा राखेतून उभे राहतील, सरकारेही डळमळीत करतील, तेवढी धमक त्यांच्यात आहे, सरकारने हे वेळीच लक्षात घ्यावे.

शनिवार, २१ मार्च, २०२०

कवी आला रे!


कवी तो आला आला
चला भर भर पळा पळा

ऐकवेल तो भारी कविता
त्या ओझ्याखाली
दडपू नका
कवी तो आला आला
चला भर भर पळा पळा

कवितेची निघेल चोपडी
तुमची खोपडी
फिरवू नका
कवी तो आला आला
चला भर भर पळा पळा

कविता अस्सल शंभर नंबरी
बुद्धीची भिंगरी
करु नका
कवी तो आला आला
चला भर भर पळा पळा

अचाट प्रतिभेचा तो धबधबा
वाहून त्यात
जावू नका
कवी तो आला आला
चला भर भर पळा पळा

सुरांची करेल दंगल
कानांवर कवित्कार
करु नका
कवी तो आला आला
चला भर भर पळा पळा

सापडलातच जर कचाट्यात
वाहव्वा करायला
विसरु नका
कवी तो आला आला
चला भर भर पळा पळा

नाही जर दिली दाद
होईल तुमचा घात
अविचार असा करु नका
कवी तो आला आला
चला भर भर पळा पळा

त्याच्यापासून कितीही लपा
ठाण मांडून घरात तुम्हाला
ऐकवेल कविता सतराशेसहा
कवी तो आला आला
चला भर भर पळा पळा


-----उमाजी म. केळुसकर
संपादक, सा. कोकणनामा

मंगळवार, १० मार्च, २०२०

खवय्यांसाठी खास ’मेजवानी’

-उमाजी म. केळुसकर ⬑ स्वाद-आस्वाद ⬉


     अलिबागला मिनी गोवा ओळखले जात असलं तरी आमचं अलिबाग हे जगात भारी आहे. विस्तीर्ण समुद्र किनारा, समृद्ध खाद्य संस्कृतीने परिपूर्ण असा हा परिसर आहे. त्यामुळे येथे एक वेगळे हॉटेल हब निर्माण झाले आहे. गोंधळपाडा-अलिबाग येथील मेजवानी गार्डन रेस्टॉरंट आणि बार प्रारंभापासूनच येथील खाद्य संस्कृतीचा महोत्सव भरवत आला आहे. जंबो थाळी या मेजवानीचे वैशिष्ट्य. १८ मार्चच्या दुसर्‍या वर्धापन दिनानिमित्त १४ मार्चपासून पाच दिवस विविध जंबो थाळ्या खवय्यांसाठी विशेष सवलतीत उपलब्ध केल्या जाणार आहेत. पर्यटक आणि अलिबागकर खवय्यांसाठी ही पर्वणी आहे, असेच या ठिकाणी म्हणावे लागेल.
    मेजवानी! मेजवानी म्हटले की पंचपक्वान्नांचा थाट आलाच. पंचपक्वान्न म्हटले की तोंडाला पाणी सुटते. पण खवय्यांच्या या काळात मेजवानीच्या आणि आतिथ्याच्या कक्षाही रुंदावल्या आहेत. मेजवानी आता पंचपक्वान्नांचीच नसते तर झणझणीत मटन, चिकन, मासे यांची आणि दिलखुलास आतिथ्याचीही असते. पेण-अलिबाग मुख्य रस्त्यावरील गोंधळपाडा येथील मेजवानी गार्डन रेस्टॉरंट आणि बारमध्ये याचा प्रत्यय येतो. म्हणूनच पर्यटक आणि अलिबागकर यांच्या जीभेवर रेंगाळणारा मेजवानीचा स्वाद या गार्डन रेस्टॉरंटची कीर्ती दशदिशांत पसरवित असतो.
     मेजवानी गार्डन रेस्टॉरंट आणि बारचा शुभारंभ १८ मार्च २०१८ ला झाला. या १८ मार्चला २ वर्षे पूर्ण होऊन मेजवानी तिसर्‍या वर्षात पदार्पण करीत आहे. या रेस्टॉरंटचे मालक गणेश गावडे, विनायक गावडे, व्यवस्थापकीय संचालक प्रमुख शंकरशेठ ढोणुक्षे, कृष्णाशेठ तुपट यांनी काळाची पावले ओळखून प्रारंभापासूनच वेगवेगळे प्रयोग करुन पर्यटक आणि अलिबागकरांना आपल्याकडे आकर्षित केले. अर्थात हे प्रयोग खवय्यांच्या मानसिकतेला ओळखूनच करण्यात आले. त्यामुळे त्यात कोणतीही तडजोड करण्यात आली नाही. मेजवानीत मिळणारा प्रत्येक पदार्थ हा दर्जेदार असतोच, हा विश्वास निर्माण केला आणि त्या विश्वासाला बाधा आणू दिली नाही. या विश्वासामुळेच पर्यटक आणि अलिबागकरांची पावले विविध प्रसंगी मेजवानी रेस्टॉरंटकडे वळत असतात.
        मेजवानीमध्ये विविध खाद्य उपक्रम राबविले जातात. त्यांचा थाळी महोत्सव विशेषकरुन खवय्यांच्या जीभेचे चोचले पुरवणारा ठरला आहे. त्यांच्या सर्व थाळ्या या जंबो थाळ्या असतात आणि त्या १९९ रुपयांपासून २४९९ रुपयांपर्यंत उपलब्ध आहेत. ज्यांना जे हवे ते आणि तितके, विविध दरांमध्ये उपलब्ध केले जात असल्याने समाधान सोबत घेऊनच पर्यटक मागे फिरतात आणि पुन्हा पुन्हा या गार्डन रेस्टॉरंटमध्ये मेजवानीचा स्वाद घ्यायला येतात. येथील चव त्यांना या मेजवानी रेस्टॉरंटचे विस्मरण होऊ देत नाही. गेल्या दोन वर्षाच मेजवानीमध्ये सी फूड फेस्टिव्हल, कबाब फेस्टिव्हल, गावरान जत्रा फेस्टिव्हल, बिर्याणी फेस्टिव्हल, चायनीज फेस्टिव्हल आदी उपक्रम राबविले. या फेस्टिव्हलला पर्यटक अलिबागकर खवय्यांनी चांगला प्रतिसाद दिला. या उत्तम प्रतिसादाने बळ मिळाल्याने मेजवानीची वाटचाल योग्य दिशेने सुरु आहे.
       मेजवानी गार्डन रेस्टॉरंट आणि बारचा परिसर आल्हाददायक आहे. पार्कींगची उतम सोय आहे. डायनिग हॉल, फॅमिली रुम, गार्डन, बार असे या  गार्डन रेस्टॉरंटचे स्वरुप आहे. अलिबागकरांसह राज्या-परराज्यातील, अगदी विदेशातील पर्यटकांनीही या मेजवानीचा आस्वाद घेतला आहे. गार्डनमध्ये वाढदिवस,लग्नाचे वाढदिवस, पत्रकार परिषद, इतर विविध कार्यक्रम होत असतात. खर्‍याअर्थाने मेजवानीकडून अतिथींची मेजबानी होत असते.
         असे हे मेजवानी रेस्टॉरंट तिसर्‍या वर्षात पदार्पण करीत आहे. दुसर्‍या वर्धापन दिनानिमित्त १४ मार्च ते १८ मार्चपर्यंत खवय्यांसाठी १० टक्के ते ५० टक्के विशेष सवलत मेजवानी गार्डन रेस्टॉरंटच्या वतीने देण्यात आली  आहे. याप्रसंगी चिकन जंबो थाळी, मटन जंबो थाळी, अलिबाग आगरी फेमस थाळी, अलिबाग कोळावाडा थाळी खवय्यांसाठी उपलब्ध करण्यात येणार आहे. या जंबो थाळ्या म्हणजे येथील खाद्य संस्कृतीचे निदर्शक असणार आहेत. झटकेबाज आगरी कोळी पदार्थांची मेजवानी खवय्यांसाठी मोठी पर्वणी असणार आहे. ही पर्वणी अलिबागकरांनी आणि पर्यटकांनी चुकवू नये आणि त्यांनी आपल्या मित्रपरिवारासह मेजवानी गार्डन रेस्टॉरंटमध्ये येऊन सवलत काळात विशेष सवलतीचा फायदा घ्यावा, मेजवानीचा स्वाद घ्यावा, तृप्त व्हावे, असे आवाहन मेजवानी गार्डन रेस्टॉरंटच्या वतीने करण्यात आले आहे. त्यामुळे मेजवानीचा स्वाद घ्यायला जायलाच हवे, खरे ना?

गुरुवार, २७ फेब्रुवारी, २०२०

रायगडात राज्यव्यवहार कोशाची अंमलबजावणी झाली, पण जिल्ह्यात मराठी भाषा ठरलेय न्यूनगंंडाची धनी!

     -उमाजी म. केळुसकर ⬑ रायगडचा डंका ⬉



     किल्ले रायगड ही छत्रपती शिवाजी महारांजाच्या मराठेशाहीची राजधानी होती, येथून महाराष्ट्राचे स्वराज्य आणि जनतेचे सुराज्य नांदत होते. आज किल्ले रायगडचे नाव धारण केलेल्या रायगड जिल्ह्याची राजधानी अलिबाग आहे आणि महाराष्ट्राची राजधानी मुंबई आहे.  मुंबईत महाराष्ट्र दिसत नाही, अलिबागमध्ये बागा दिसत नाही. एक मात्र दोन्हीकडे साम्य आहे, ते मराठीची उपेक्षा दोन्हीकडे सारखीच होत आहे. मोठ्या-छोट्या शहरांची अशी अवस्था असल्यावर उर्वरित महाराष्ट्राची कशी अवस्था असेल याची कल्पना येते. शासकीय पातळीवरुन मराठी भाषेची दूरवस्था चालली असल्याची ओरड महाराष्ट्र राज्य स्थापनेपासूनच होत आली आहे आणि त्यात खोटे काही नसले तरी या राज्यातील मराठी भाषिक जनतेने मराठीचे सत्व राखण्याचा किती प्रयत्न केला आहे हा देखील मोठा प्रश्‍न आहे. २७ फेब्रुवारी रोजी मराठी राजभाषा दिन साजरा होतो. ही औपचारिकता दरवर्षी पार पडत असते. परंतु मराठीचा वापर सर्व पातळ्यांवर होतोय असे दिसत नाही. राजव्यवहार कोशाची अंमलबजावणी झाली, त्या किल्ले रायगड असलेल्या जिल्ह्यातही मराठीबाबतचा न्यूनगंड पहायला मिळतो आहे.
     मराठी राजभाषेला एक हजार वर्षांपेक्षा अधिक मोठा इतिहास आहे. इसवी सन १०१२ चा रायगड जिल्ह्यातील अलिबाग तालुक्यातील आक्षी येथील शिलालेख हा मराठीतील पहिला शिलालेख त्या काळातील राजभाषेकडेच लक्ष वेधणारा आहे. मराठी त्याही आधी बोलली जात होती, पण लिखित स्वरुपातील शिलालेख आक्षी येथे असणे हा या विभागाचा आणि मराठी भाषेचा गौरव आहे. या शिलालेखातून शिल्पकला आणि भाषिक रेखनाचा अपूर्व संगम पाहायला मिळतो. त्यातून कला व भाषा यांचा संबंधही अधोरेखित होतो. विशेष म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांनी १६७४ मध्ये किल्ले रायगडावर स्वत:चा राज्याभिषेक केल्यानंतर आपली मराठी संस्कृती जपली जावी, यासाठी मराठी राज्यव्यवहार कोशाची निर्मिती केली. त्यांनी त्याकाळी होणार्‍या परकीय ङ्गारशी भाषेचे अतिक्रमण रोखण्यासाठी हे पाऊल उचलले. म्हणजेच शिवकालात साडेतीनशे वर्षांपूर्वी व त्याहीपूर्वी, हजार वर्षांपूर्वी असलेली महाराष्ट्रातील राजसत्तांची मराठी ही राजभाषा स्वातंत्र्यानंतरही या राज्याची खर्या अर्थाने राजभाषा असायला हवी होती. पण तसे दिसत नाही. आज जरी महाराष्ट्राची राजभाषा मराठी असली तरी कवीवर्य कुसुमाग्रजांनी म्हटल्याप्रमाणे मराठी मंत्रालयाबाहेर फाटक्या वस्त्रांत उभी आहे, हेही तितकेच खरे आहे.
      संयुक्त महाराष्ट्राच्या स्थापनेला ६० वर्षे होऊन गेली तरीही मराठी भाषेची शासकीय पातळीवर अवहेलना संपलेली नाही. स्थापित राजकीय पक्षांचे राजकीय धोरणही मराठीच्या भाषेच्या अध:पतनास कारणीभूत ठरत आहे, असं म्हटलं तर चूक ठरणार नाही. सरकारी मराठी शाळांमधील घसरणारी विद्यार्थ्यांची हजेरी असो किंवा मराठी शाळांच्या अनुदानाबाबतचे शासनाचे आडमुठे धोरण असो, या चुकीच्या धोरणांमुळे मराठी शाळांची संख्या महाराष्ट्रात झपाट्याने घटली व खासगी अन् विनाअनुदानित इंग्रजी व इतर माध्यमिक शाळांची संख्या गेल्या काही वर्षात वाढली. परिणामी मातृभाषेत शिक्षण घेणार्‍या विद्यार्थ्यांची संख्या झपाट्याने कमी झाली. सरकारी शाळांचीही अनुदानाअभावी होरपळ होत असल्याने मध्यमवर्गीय पालक मोठ्या प्रमाणात खासगी व विनाअनुदानित शाळांकडे वळले. एकंदरित सरकारच्या अयोग्य धोरणामुळे मराठीचे भविष्यच एका अर्थाने अंधारात गेले आहे. रायगड जिल्ह्यातही अशीच परिस्थिती आहे. येथे  परकीय इंग्रजी भाषेला आणि तिचे शिक्षण देणार्‍या इंग्रजी शाळांना प्रतिष्ठा प्राप्त झाली. इंग्रजी भाषा ही जागतिक भाषा असल्याने ती यायलाच पाहिजे. पराभूतांनी गुलामीची काही लक्षणे मिरवायलाच हवीत, पण आपली भाषिक संस्कृती नष्ट करुन हे परिवर्तन घडत असेल, ही गुलामी मिरवली जात असेल तर मात्र या बाबीचा गांभीर्याने विचार व्हायला पाहिजे. रायगड जिल्ह्यात ही इंग्रजीची गुलामी शहरांच्या आणि विविध व्यवसायांच्या नामङ्गलकांतूनही दिसून येत आहे. येथील इमारती, व्यवसाय यांचे नामङ्गलक ६० टक्के इंग्रजीत आहेत. बँकांत तर इंग्रजी आणि हिंदी भाषेच्या मध्ये मराठी भिंग लावून शोधावी लागते. मराठीचा न्यूनगंड अशाप्रकारे जिल्ह्यात पहायला मिळतो आहे, ही दुर्दैवी बाब आहे.
     हिंदी राष्ट्रभाषा असली (हे काही खरे नाही), इंग्रजी ही ज्ञानभाषा असली तरी मराठी ही राजभाषा आहे आणि तिला कशी ज्ञानभाषा बनवावी याचे प्रयत्न होणे गरजेचे आहे. मुळात कुठल्याही मातृभाषा दुय्यम नाहीत, तर त्याकडे बघण्याची माणसाची दृष्टी दुय्यम आहे. त्यामुळेच भाषांवर अन्याय होत आला आहे. प्रत्येक भाषा हे एकप्रकारचे सोने आहे. जास्तीत जास्त भाषा ज्याला बोलता-लिहिता येणेही आजच्या काळाची गरज आहे. पण इतर भाषा आपल्या मातृभाषेला दुय्यम ठरवून, तिचा गळा घोटून आत्मसात केल्या जात असतील तर त्यासारखी दुसरी आत्मवंचना नाही. भाषावार प्रांतरचना झालेल्या महाराष्ट्र राज्यात मराठी भाषेच्या बाबतीत ही आत्मवंचना चालली आहे. महाराष्ट्रात इंग्रजी आणि हिंदी येत नाही, म्हणून मराठी माणसाचे अडत असेल तर यासारखी दुसरी गंभीर गोष्ट नाही. दुर्दैवाची गोष्ट म्हणजे ज्या महाराष्ट्रात मराठीविना अडायला पाहिजे, त्याच महाराष्ट्रात इंग्रजी आणि हिंदीविना मराठी माणसाला अडायला होते. इंग्रजी आणि हिंदी येत नाही म्हणून काही जगण्याचा हक्क नाहीसा होत नाही. पण या भाषांच्या प्रतिष्ठेपायी मराठी भाषेवर अन्याय होत आहे. हा अन्याय सरकारी पातळीवरुन जसा होत आहे, तसाच तो इंग्रजीची पट्टी डोळ्यावर बांधलेल्या मराठी बांधवांकडून होतो आहे. यांच्याकडून मराठी भाषा पूर्णपणे मारली जाणार नाही, हे खरे असले तरी मराठी भाषेचे वैभव यांच्यामुळे काळवंडते आहे. हे वैभव अबाधित ठेवण्यासाठी मराठी मातीचा आणि भाषेचा अभिमान असलेल्या प्रत्येकाने प्रयत्न केला पाहिजे. तशी चळवळ महाराष्ट्रात काही संस्था, व्यक्ती राबवित आहेत, आपल्या रायगड जिल्ह्यानेही याबाबतीत मागे राहून जमणार नाही. ज्या जिल्ह्यातून मराठी राज्यव्यवहार कोशाची अंमलबाजवणी झाली त्या रायगड जिल्ह्याने आपला मराठी बाणा जपलाच पाहिजे. कारण आपल्या अस्मिता आपणच जपायच्या असतात, त्या आपणच तुडविल्या तर आपलेच हसे होते. इतकेच.

बुधवार, २६ फेब्रुवारी, २०२०

आचळोलीच्या बंद मिलिटरी स्कूलचा टाहो

-उमाजी म. केळुसकर ⬑ दादागिरी ⬉



     रायगड किल्ल्याइतकेच ‘रायगड मिलिटरी स्कुल’ हे रायगड जिल्ह्याचा मानबिंदू होता. ब्रिटिशांनी १८१८ साली तोफांचा भडिमार करुन किल्ले रायगडचा विद्ध्वंस केला आणि २०१४ साली मात्र स्वकियांनी रायगड मिलिटरी स्कुलला भ्रष्टाचाराच्या दलदलीत ढकलून ते बंद पाडले. किल्ले रायगड आणि रायगड मिलिटरी स्कूल हे दोन्ही महाड तालुक्यातीलच. देशाला पारतंत्र्यात टाकणार्‍या ब्रिटिशांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या लोककल्याणकारी राज्याचं देशास विस्मरण व्हावे, यासाठी किल्ले रायगडाची नासधूस केली, पण त्यांच्याच राजवटीत किल्ले रायगडाला संरक्षितही केले गेले. या छत्रपती शिवाजी महाराज यांची आठवण सदोदित यावी, किल्ले रायगडचा इतिहास सतत प्रेरणा देत राहावा, जिल्ह्यातील मुलांना जिल्ह्यातच सैनिकी प्रशिक्षण मिळावे, यासाठी क्रांतीसिंह दिगंबर विनायक तथा नानासाहेब पुरोहित  यांनी ज्या ‘रायगड मिलिटरी स्कुल’ची स्थापना केली, त्या मिलिटरी स्कुलचा नाश संस्थेच्या संचालकांनी ब्रिटिशांनाही लाज वाटेल अशाप्रकारे केला आहे. कर्जात बुडवून टाकलेल्या या स्कुलची मालमत्ता बँक ऑफ इंडियाकडून २०१७ ला जप्त करण्यात आली. रायगड जिल्ह्यासाठी हे धक्कादायक ठरले. पण ही वस्तुस्थिती होती.
        महाराष्ट्रातील ३६ जिल्ह्यांपैकी अहमदनगर, अकोला, अमरावती, उस्मानाबाद, औरंगाबाद, कोल्हापूर, गडचिरोली, गोंदिया, चंद्रपूर, जळगाव, जालना, ठाणे, धुळे, नंदुरबार, नागपूर, नांदेड, परभणी, पुणे, बीड, बुलढाणा, भंडारा, यतमाळ, रत्नागिरी, लातूर, वर्धा, वाशिम, सांगली, सिंधुदुर्ग, सोलापूर, हिंगोली, मुंबई या ३० जिल्ह्यांत ४० सैनिकी शाळा आहेत. त्यांपैकी सातार्‍यातील सैनिक स्कूल आणि पुण्याची श्री शिवाजी प्रिपरेटरी मिलिटरी स्कुल या अधिक प्रसिद्ध आहेत. या ४० शाळांपैकी तीन कायम विनाअनुदित असून, पुण्यातली एक शाळा खासगी आहे. मुलींसाठी एकूण तीन सैनिकी शाळा आहेत.  या सैनिक शाळा असलेल्या जिल्ह्यांत रायगडचे नाव नाही. कारण रायगडचे महाड तालुक्यातील आचळोली येथील रायगड मिलिटरी स्कुल चार वर्षांपूर्वीच संस्थेच्या विश्वस्त पदाधिकार्‍यांमधील मतभेद, ढिसाळ नियोजन, आर्थिक गैरव्यवहार, कर्जाचा वाढता बोजा या कारणांने बंद झाले आहे. नाहीतर राज्यात ४१ सैनिक शाळा असत्या. 
        रायगड जिल्ह्याला लढे आणि आंदोलनाचा इतिहास आहे. येथील काही लढ्यांचे नेतृत्व महाडमधील ज्येष्ठ स्वातंत्र्यसेनानी, क्रांतिसिह नानासाहेब पुरोहित केले आहे. त्यांनी जिल्ह्यातील सर्व स्तरांतील मुला-मुलींना सैनिकी शिक्षण मिळावे आणि देशसेवेच्या, देशरक्षणाच्या विविध शाखांत त्यांनी चांगली भूमिका बजवावी असा ध्यास घेतला होता. विशेष म्हणजे त्यांच्या महाड तालुक्याला सैनिकांची मोठी परंपरा लाभली आहे.  फौजी अंबावडे, आचळोली, गवाडी, वाकी, दहिवडी, वाघेरी या गावांत प्रत्येक घरामागे किमान एक व्यक्ती भारतीय सैन्यदलात आहे. निवृत्त सैनिकांची जिल्ह्यात सर्वाधिक संख्या महाडचीच आहे. त्यामुळे त्यांनी रक्ताचे पाणी करुन १२ ऑगस्ट १९९० साली या तालुक्यात आचळोली येथे जिल्ह्यातील तरुणांना सैन्य दलात जाण्यासाठी आवश्यक शिक्षण देण्यासाठी रायगड मिलिटरी स्कुलची स्थापना केली. चौथी ते बारावीपर्यंत शिक्षणाची सुविधा या वस्तीशाळेत मिळत असे. निसर्गरम्य अशा सुमारे ५० एकर परिसरात ही शाळा वसली आहे. विद्यार्थ्यांना राहण्यासाठी उत्तम वसतिगृह, अद्ययावत तरण तलाव, खेळांच्या सरावासाठी प्रशस्त मैदान, बॉक्सिंग, घोडेस्वारीचे प्रशिक्षण आदी सुविधा या शाळेत होत्या. ही शाळा १५० विद्यार्थी संख्येने सुरु झाली असली तरी पुढच्या दोन वर्षांच या शाळेत शिक्षण घेणार्‍या विद्यार्थ्यांची संख्या ७५० पर्यंत पोहोचली आणि पुढे ती ९०० पर्यंत गेली. २००६ नंतर ही विद्यार्थी संख्या वाढण्याऐवजी झपाट्याने घटत गेली आणि शाळा बंद करताना २०१४ साली ती १०० पर्यंत खाली घसरली. 
       खरे तर या रायगड मिलिटरी स्कुलचे अल्पावधीतच देशात नाव झाले होते. राज्यातून, परराज्यांतूनही मुले या ठिकाणी सैनिकी शिक्षण घेण्यासाठी येऊ लागली होती. तसेच सैनिकी शिक्षणाबरोबर हिवाळी आणि उन्हाळी शिबिरांचे आयोजन केले जात होते. त्यामध्ये रायफल चालविणे, घोड्यावर बसणे, पोहणे, ट्रेकींग इत्यादीचे प्रशिक्षण देण्यात येत होते. विविध उपक्रमांतून शाळेला उत्पन्न मिळण्यास सुरुवात झाली होती. असे असताना या शाळेची अधोगती कशी व का सुरु झाली असा प्रश्‍न उपस्थित होणे साहजिकच आहे. या शाळेची प्रगती आणि शाळेच्या संचालकांचा हव्यास या अधोगतीस कारण ठरला. या शाळेचा  वाढलेला नावलौकिक पाहून मुंबईतही मिलिटरी स्कूल उभारण्याचा निर्णय संचालक मंडळाने घेतला. या शाळेच्या उभारणीसाठी शासनाने मुंबईतील ओशिवरा येथील प्रशस्त भूखंड संस्थेला दिला. त्याजागेवर अद्ययावत शाळा बांधण्यासाठी रायगड मिलिटरी स्कुलच्या तत्कालिन संचालकांनी शाळेचे उत्पन्न वापरलेच, पण बँक ऑफ इंडियाच्या महाड शाखेतून सुमारे ४ कोटी २५ लाखांचे कर्जही काढले आणि आठ मजली अद्ययावत शाळा, तसेच व्यापारी गाळे तेथे बांधले. ही शाळा २००५ साली सुरु झाली आणि तेव्हापासून आचळोलीच्या रायगड मिलिटरी स्कुलला अखेरची घरघर सुरु झाली. शाळेच्या खरेदीत गैरव्यवहार, देणग्या, शैक्षणिक शुल्क आदी विविध बाबतीत भ्रष्टाचार झाल्याच्या चौकशी प्रकरणी धर्मादाय आयुक्तांनी २०१२ साली शाळेची बँक खाती गोठवली, तेव्हा तेथे कोणी कसे शाळेचे आर्थिक शोषण केले हे लक्षात आले. पण कुंपणानेच शेत खाल्ल्यामुळे कारवाई कोणावरच झाली नाही. त्याचे पर्यवसान रायगडचा मानबिंदू बनलेले हे रायगड मिलिटरी स्कुल २०१४ साली बंद करण्यात झाले. 
         शाळा बंद करण्याचा निर्णय घेताना त्याची कोणतीही पूर्वकल्पना येथील कामगार किंवा अधिकारी वर्गाला संस्थेने दिली नाही. उलट येथे प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांना रातोरात ओशिवरा (मुंबई) येथील शाळेत हलवण्यात आले होते. आचळोली येथील रायगड मिलिटरी स्कुलचा बळी देऊन ओशिवर्‍याची शाळा सजवण्यार्‍या संस्थेच्या संचालकांना क्रांतीसिंह नानासाहेब पुरोहित यांच्या ध्येयाचा चुराडा करताना काहीही वाटले नाही, यासारखी दुसरी दुर्दैवी गोष्ट नाही. भविष्यात रायगड मिलिटरी स्कूल दुर्दैवाच्या फेर्‍यात सापडणार आहे हे नानासाहेब पुरोहित यांना १९९४ मध्येच ओळखले होते. त्यांनी तेव्हा रायगड मिलिटरी स्कूलच्या पैशांचा गैरवापर होत असल्याचे निदर्शनास आणले होते, त्याचे फळ म्हणजे त्यांना, त्यांनी आपल्या आयुष्याच्या अखेरीस उभारलेल्या या संस्थेतील आपल्या पदाचा राजीनामा द्यावा लागला होता. राजीनामा दिल्यानंतर त्याच महिन्यात,  २७ नोव्हेंबर १९९४ रोजी त्यांचे निधन झाले. त्यानंतर ज्येष्ठ स्वातंत्र्यसेनानी, माजी राज्यमंत्री प्रभाकर कुंटे संस्थेचे सर्वेसवार्र् बनले. सध्या श्रीमती वर्षा प्रभाकर कुंटे संस्थेच्या अध्यक्ष आहेत. दुर्दैवाने त्यांच्या कारकीर्दीत क्रांतीसिंह नानासाहेब पुरोहित यांच्या नावाने ओळखले जाणारे आचळोलीचे रायगड मिलिटरी स्कुल बंद  केले जाऊन, नानासाहेबांची ओळख पुसून टाकण्याचा प्रयत्न केला गेला आहे. आज त्या वास्तूची अतिशय दूरवस्था झाली आहे. आजी-माजी संचालकांच्या पापामुळे ही परिस्थिती ओढवली आहे. हे सारे संपूर्ण रायगडसाठी क्लेषकारक आहे. यामुळे या जिल्ह्याचे कधीही भरुन न येणारे नुकसान झाले आहे.
         नफ्यात असलेल्या ओशिवरा येथील शाळेच्या बांधकामासाठी काढलेल्या कर्जापैकी केवळ एक कोटी रुपयांची परतफेड संस्थेने केली. उर्वरित कर्जाची परतफेड संचालक मंडळ गेल्या २२ वर्षांत करु शकले नाही. परिणामी आज व्याजासह हे कर्ज १५ कोटींवर जाऊन पोहोचले आहे. कर्ज परतफेडीचा तगादा लावूनही परतफेड न केली गेल्यामुळे शुक्रवार, २७ जानेवारी २०१७ रोजी बँक ऑफ इंडियाच्या अलिबाग येथील मुख्य शाखेने रायगड मिलिटरी स्कुलच्या मालमत्ता जप्तीची कारवाई केली. ही जप्तीची कारवाई टाळता आली असती. बँकेशी तडजोड करुन रक्कम भरता येणे अशक्य नव्हते.. पण संचालक मंडळाला आचळोलीचे रायगड मिलिटरी स्कुल सुरुच करायचे नाही. त्यांचे प्रेम धंदेवाईक असलेल्या ओशिवर्‍याच्या मिलिटरी स्कुलवर आहे. ही शाळा क्रांतीसिंह नानासाहेब पुरोहित यांच्या ध्येय धोरणानुसार चालत नाही. शिक्षण हक्क कायद्यानुसार दुर्बल आणि वंचित घटकातील मुलांना खासगी शाळांमध्ये २५ टक्के प्रवेश देणे बंधनकारक आहे. असे असूनही ओशिवर्‍याच्या मिलिटरी स्कूलने हे प्रवेश नाकारल्याने जून २०१६ ला शिक्षण उपसंचालकांनी शाळेचे ना हरकत प्रमाणपत्र रद्द करण्यात येईल, असा इशारा दिला होता. या इशार्‍यावरुन ही शाळा संचालकांसाठी एक मलिद्याची वस्तू आणि वास्तू बनली आहे हे दिसून येत आहे. मुळात त्या शाळेची गरजच नव्हती, प्रसंगी ती शाळा बंद करुन, त्या शाळेची मालमत्ता विकून बँकेची कर्जफेड करुन आचळोलीचे रायगड मिलिटरी स्कुल वाचविता आले असते. पण जर संचालक मंडळाला रायगड जिल्ह्यातच मिलिटरी स्कुल नको असेल तर काय करणार? याचा अर्थ रायगडातच घरभेदी आहेत. त्यामुळेच आचळोलीच्या रायगड मिलिटरी स्कुलचा प्रश्‍न सुटला नाही, हे स्पष्ट आहे.


मंगळवार, २५ फेब्रुवारी, २०२०

...अन्यथा खाडीमार्गे समुद्र खारेपाट संस्कृती मिटवून टाकेल

     -उमाजी म. केळुसकर ⬑ दादागिरी ⬉



      कोकणात रायगड, ठाणे, पालघर, रत्नागिरी, सिंधुदुर्ग  जिल्ह्यापर्यंतच्या क्षेत्रात ६४ खाड्या आहेत आणि त्या सर्वांच्या कडेने मोठ्या प्रमाणात खार जमीन आहे. रायगड जिल्ह्यात ही खारजमीन उरण, पनवेल, पेण, अलिबाग, रोहा, महाड, माणगाव, तळा, म्हसळा, श्रीवर्धन या तालुक्यांत पसरली असली, तरी पेण आणि अलिबाग तालुक्यातील खारजमिनीच्या पट्ट्याला प्रामुख्याने खारेपाट म्हटले जाते. खार जमिनीच्या वाट्याला सातत्याने उपेक्षा येत असल्यामुळे जेथे जेथे खार जमीन आहे, तेथील लोकजीवनावर त्याचा परिणाम होत आला आहे. पेण, अलिबागच्या खारेपाटातील गावकर्‍यांना तर शासनाच्या उदासिनतेमुळे, तेथील कारखान्यांसाठी टाकलेल्या भरावामुळे, खाडीचे बाहेरकाठे फुटल्याने, खारफुटीच्या कत्तलीमुळे, खारभूमी विकास विभागाच्या दुर्लक्षामुळे खाडीच्या खार्‍या पाण्याचं अतिक्रमण सोसावं लागत आहे, त्यांच्या जमिनी नापिक झाल्या आहेत. ही परिस्थिती बदलायची असेल तर खारभूमी विकास विभागाने आपल्या योजना प्रामाणिकपणे आणि गुणवत्तापूर्ण गतीने करणे आवश्यक आहे, अन्यथा खारेपाट संस्कृतीचा नामोनिशाण समुद्र मिटवून टाकेल.
    अलिबाग-पेण तालुक्यातील खारभूमीचा प्रश्‍न ऐरणीवर आला आहे.  या तालुक्यांतील खारेपाटात बाहेरकाठे फुटून येथील शेतजमीन नापिक होण्याचे प्रमाण मोठे आहे, इतकेच नव्हे तर समुद्राचे उधाण खाडीवाटे या परिसरातील गावांना भयकंपित करीत आले आहे. अलिबाग तालुक्यातील गणेशपट्टीसारख्या गावांना तर याचा अधिक फटका बसला आहे. गावात खाडीचं पाणी घुसून या गावाची द्वारका होण्याची वेळ आली तेव्हा हे गाव तेथून उठवून दुसरीकडे वसवावं लागलं होतं. अशी भीषण परिस्थिती खारेपाटची आहे. बाहेरकाठे फुटण्याचे मुख्य कारण म्हणजे खारेपाट क्षेत्रात कंपन्यांनी घातलेले भराव. इस्पात व त्या शेजारच्या टाइल्स बनविणार्‍या एच.आर. जॉन्सन कंपनीने कारखाने ज्या जमिनीवर उभारले ती जमीन खाजण क्षेत्रातली आहे. त्यामुळे भोवतालच्या डोंगरातून माती आणून तिथे भराव करण्यात आला व त्यावर कारखाने उभारले. भराव करताना खाडीला मिळणारे अनेक ओढे-नाले त्यांनी बुजवले. ओढे-नाले हे नद्या व खाड्या यांच्यामधील संतुलन साधत. ते बुजवल्याने खारेपाटाची भौगोलिक रचना बदलली आणि पाण्याचा निचरा न झाल्याने दुसर्‍या ठिकाणी दाब वाढून बाहेरकाठ्यांना भगदाडे पडली. त्यामुळे आजूबाजूची हजारो हेक्टर भातजमिनीत खारे पाणी घुसले आणि ते तसेच तुंबून राहिल्याने बहुतांश भातशेती उद्ध्वस्त झाली. भातशेती बेचिराख झाल्याने खारेपाटातील भूमीपुत्रांच्या जगण्याचे साधनच नष्ट झाले. अजूनही हे दुष्टचक्र थांबलेले नाही.
    नद्या  ज्या ठिकाणी समुद्रास मिळतात अशा प्रदेशात समुद्राच्या खार्‍या पाण्यामुळे खारी जमीन तयार होते. ही जमीन सपाट असली तरी समुद्राचे पाणी पसरल्यामुळे नापीक बनते. खार जमिनीचे पुनर्प्रापण व खार्‍या पाण्यास प्रतिबंध या मोठ्या समस्या आहेत. याबाबत येथील खारेपाटात अठराव्या शतकापासून प्रयत्न करण्यात येत आहेत. समुद्राच्या भरतीखालील जमिनी शेतीच्या उपयोगी करण्यास खार पाडणे असे म्हणतात. या खारेपाटात मीठ उत्पादन आणि भातशेती फार पूर्वीपासून होत आली आहे. पण खारेपाटातील मीठ उत्पादनास छत्रपती शिवाजी महाराज यांनी जसे उत्तेजन दिले, तसेच उत्तेजन सरखेल कान्होजी आंग्रे यांनी खारेपाटात भातशेती करण्यास दिले. त्यांच्यानंतर १७५५ ते १७८० दरम्यान विद्यमान आंग्रेसरकार आणि शिलोतरी यांनी खारजमीन पुनर्प्रापणासाठी विशेष प्रयत्न केले. खारे पाणी अडविण्यासाठी बांधलेल्या बंधार्‍यास एक द्वार असते. तेथे शिळा बसवतात. या दाराची व शिळेची देखरेख करण्यासाठी नेमलेल्या व्यक्तीस काही हक्क किंवा वतन दिलेले असे. त्याला शिलोतरा पाटीलकी म्हटले जायचे. शिळोतरीदार (शिलोतरी) किंवा शिळोत्री म्हणजे या पाटीलकीचा वतनदार होय. १८५८ नंतर ब्रिटिशांनी खारजमिनीकडे विशेष लक्ष पुरविले. पुनर्प्रापणासाठी बाहेरकाठ व आतकाठ नावाचे बंधारे बांधतात. आक्टोबर ते जून बाहेरकाठ्याचे दरवाजे खारे पाणी आत येऊ नये म्हणून बंद ठेवतात. जूनमध्ये जोरदार पाऊस पडताच, परिस्थिती पाहून दरवाजे उघडतात. त्यामुळे पावसाच्या पाण्याने विरघळलेले क्षार पाण्याबरोबर खाडीत वाहून जातात. त्यामुळे खारजमीन लागवडीयोग्य होण्यास मदत होते. खार जमिनीचे पुनर्प्रापण, तेथील मशागत, लागवड पद्धती व योग्य जातीचे बियाणे यावर संशोधन व अभ्यासासाठी १९४३ साली पारगाव (ता. पनवेल) येथे कृषि खार जमीन संशोधन केंद्राची तत्कालिन ब्रिटिश सरकारने स्थापना केली. स्वातंत्र्यानंतर पूर्वी ज्या जमिनी लागवडीखाली नव्हत्या, तिथे शेती करण्यासाठी आणि समुद्राच्या पाण्याचे शेतजमिनीवरील अतिक्रमण थांबवण्यासाठी शासनाने १९४७ मध्ये ‘खारजमीन विकास मंडळ’ स्थापन करण्यात आले. १९४८ साली मुंबई खारजमीन सुधारणा कायदा मंजूर करुन तो तत्कालिन ठाणे, रत्नागिरी, कुलाबा (आताचा रायगड) या जिल्ह्यांना लागू केला. खारजमीन विकास मंडळाने खारजमीन विकासाचे जे काम हाती घेतले त्यात मुख्यत: खारबंदिस्ती  म्हणजे बाहेरकाठ्याच्या बांधकामाचा समावेश होता. पण मंडळाचं काम गलथानपणाचे झाले म्हणून १९७५ साली खारजमिनींचा योग्य विकास करण्याकरिता सरकारने एक अभ्यासगट नेमला. या गटाने खारजमिनी सुधारण्याकरता छप्पन्न शिफारसी केल्या. त्यांतल्या एका शिफारशीप्रमाणे खारजमीन विकास हा विषय पाटबंधारे खात्याकडे सोपवण्यात आला. या निर्णयाची अंमलबजावणी करण्यासाठी सरकारने १९७९ साली पुन्हा वेगळा कायदा मंजर केला.
    खारजमीन विकास योजना ही मागासलेल्या कोकणभागातील एक महत्वाची योजना असल्याने जमीनविकास तसेच खारबंदिस्ती दुरुस्ती व देखरेखीची संपूर्ण जबाबदारी सरकारने स्वीकारली आणि चार जिल्ह्यांना मिळून ६०० छोट्यामोठ्या योजना (काम) कार्यान्वित केल्या. या साठी अर्थातच संबधित शेतकर्‍यांनी आपल्या बंदिस्तीखालच्या जमिनी सरकारकडे वर्ग करायच्या होत्या. तत्पूर्वी दुरुस्ती व देखरेखीचे काम शेतकरी स्वत:च सामुहीक श्रमदानाने करीत. पावसाळ्यात तर रात्ररात्र बांधावर जागून लक्ष ठेवीत. या सामुहीक श्रमाला खारेपाटात ‘जोळ’ पद्धत म्हणतात. शिवाय शेतीत एकत्र काम करायची ‘हांदा’ पद्धतही होती. त्यात सगळ्यांनी मिळून कष्ट करायचे असले तरी नंतर एकत्र जेवणखाण होत असल्यान तो एकप्रकारचा सांस्कृतिक कार्यक्रमच असे. सरकारने हे काम ताब्यात घेतल्यानंतर लोकांनी श्रमदान करायचे थांबवले व बाहेरकाठ्यांची दुरुस्ती करण्यातला त्यांचा सहभाग कमी झाला. पाटबंधारेखाते टेंडर काढून कंत्राटदारांमार्फत काम करु लागले. ते ‘खाते’च असल्याने कामाचा दर्जा काय राहणार ते उघडच होते. यासाठीच्या पैशांची तरतूद सरकारने ‘जिल्हा नियोजन व विकास मंडळा’च्या जिल्हा निधीतून केली. काही ठिकाणच्या शेतकर्‍यांनी आपल्या जमिनी सरकारच्या ताब्यात दिल्या नाहीत, त्यांच्या खारबंदिस्ती खाजगीच राहिल्या.
     खारजमीन विकासाच्या योजनेत अर्थातच फक्त खारबंदिस्तीचा समावेश नव्हता, तर बंधार्‍यालगत मिठागरे तयार करणे, लहान तलाव करुन त्यांत कोलंबी वाढवणे, शेती करणे आणि बाहेरकाठ्यांचा रस्त्यासारखा वापर करणे अशाही कामांचा समावेश होता. पण सरकारचा या कामांंतला उत्साह मर्यादित होता. ठेकेदारांनी भ्रष्टाचार तर सुरु केलाच पण नंतर सरकारने कामांसाठी निधीही उपलब्ध केला नाही. लोकांनी तर हे काम सरकारी काम म्हणून लक्ष देणे सोडले. परिणामी बाहेरकाठे कमकुवत झाले आणि दरवर्षी येणार्‍या उधाणांनी त्यांना भगदाडे पडू लागली. शेती नापिक झाली आणि नांदती गावे खार्‍यापाण्याच्या पडलेल्या वेढ्यामुळे हलवावी लागली. खरेतर पेण आणि अलिबागच्या खारेपाटात हेटवणे आणि आंबाखोर्‍याचे पाणी आणून खारेपाट दुपिकी करायचा होता, परंतु हे पाणी खारेपाटात आणून येथील पाणीप्रश्‍न सोडवण्यास शासनाने दोन तपांहून अधिक काळ टाळाटाळ चालवली आहे आणि खारेपाटच्या हरितपट्ट्याचा औद्योगिक झोन करण्याचे ठरवले. या परिस्थितीमुळे समुद्राचे खाडीमार्गे येणारे संकट अधिकच गडद होणार आहे. कुलाबा जिल्हा ते रायगड जिल्हा आणि पाटबंधारे खाते ते जलसंपदा विभाग या नामपरिवर्तनात खारेपाटाच्या नशिबात मोठा बदल घडला नाही. यामुळे खारेपाटकर अस्वस्थ आहेत. या अस्वस्थतेला उधाण येऊ नये म्हणून शासनाने पुरेसा निधी उपलब्ध करुन खारभूमीच्या सर्व सरकारी, खाजगी योजना पूर्ण केल्या पाहिजेत आणि येथे विकासाच्या नावावर येथे रासायनिक कारखानदारी आणण्यापेक्षा येथील भूमीपुत्रांच्या विकासाबाबतच्या संकल्पना जाणून घेऊन त्याआधारीत विकास साधला तरच तो खारेपाटासाठी आणि जिल्ह्यासाठीही हिताचा ठरेल.

लोकप्रतिनिधींनी रायगडच्या रयतेचे हित पहावे

     -उमाजी म. केळुसकर ⬑ दादागिरी ⬉




     रायगड ही शिवप्रभूंची, सर्वसामान्य रयतेची राजधानी. हेच नाव बॅ.ए.आर. अंतुले यांनी आपल्या मुख्यंत्रीपदाच्या कारकीर्दीत तत्कालिन कुलाबा जिल्ह्याला दिले आणि रायगड जिल्ह्याचे नवे पर्व सुरु झाले. नंतर या जिल्ह्याचे १४ चे १५ तालुके झाले. पण खर्‍या अर्थाने जिल्ह्याचा विकास व्हायला हवा, तेवढा झाला नाही. जिल्ह्यात औद्योगिकरण फोफावलं, अनेक प्रकल्प येऊ घातले आहेत, असे असले तरी भाताचं कोठार समजला जाणारा आपला जिल्हा कृषिक्षेत्रात पांगळा झाल्याचे जे चित्र दिसत आहे ते चिंताजनक आहे. उद्योग क्षेत्र आणि कृषि क्षेत्र ही परस्परपुरक ठेवण्यात न आल्याने, तसेच लोकप्रतिनिधींच्या उदासिनतेमुळे जिल्ह्यात अनेक प्रश्‍न निर्माण झाले आणि त्याचा जिल्ह्यातील विकासावर दुष्परिणाम झाला आहे. अशा रायगडची अपेक्षा कोणीच करणार नाही.
      रायगडची भाताचं कोठार ही ओळख न पुसता जिल्ह्यात औद्योगिकरण झालं असतं आणि येथे कृषिआधारित लघुद्योग, कृषिमालावर प्रक्रिया करणारे उद्योग उभे राहिले असते, तर मोठ्या प्रमाणात बेरोजगारीची समस्याही सुटली असती, पण गेल्या साठ वर्षांत जिल्ह्यात शेतीवर आधारीत फार उद्योग विकसित झाले नाहीत अथवा त्या दृष्टीने फारसे प्रयत्नही झाले नाहीत. त्याउलट भातावर आधारीत पोहा गिरण्यासुद्धा बंद झाल्याचीच उदाहरणे आहेत. फळप्रक्रिया उद्योग ज्या प्रमाणात रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्याचे झाले त्या प्रमाणात रायगड जिल्ह्यात झाले नाही. दक्षिण भारतात एकट्या तामिळनाडूमध्ये नारळाचा काथ्या काढण्याचे ५६ कारखाने आहेत. केरळमधील ही इंडस्ट्री वेगळी. त्यातून अनेक शेतकऱ्यांना व कामगारांना उद्योग प्राप्त झाला आहे. रायगडच्या १५० कि.मी. किनारपट्टीत एखादा लघुउद्योग सोडला तर असा एकही उद्योग नाही. या जिल्ह्यात नद्या आणि समुद्र नासवायला प्रामुख्याने रासायनिक कारखाने उभे राहिले आणि रायगड जिल्हा रयतेचा नाही तर रासायनिक कारखान्यांचा झाला.
      रायगड जिल्ह्यालगत ठाणे, रत्नागिरी, पुणे, सातारा, मुंबई हे जिल्हे आहेत. पण रायगडची ओळख मुंबईच्या जवळचा जिल्हा अशी आहे. त्यामुळे येथे विकासाची गंगा धोधो वाहत असेल असा कोणी समज करुन घेतला तर तो त्याचा गैरसमज असेल. मुंबई जवळ असणे रायगड जिल्ह्यासाठी तोटाच ठरला आहे. हा तोटा सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक, आरोग्य क्षेत्रातील, असा सर्वच बाबतीत आहे. आजही उच्चशिक्षणासाठी रायगडकरांना मुंबई-पुण्यावर अवलंबून राहावे लागते, मुंबई जवळ असल्यामुळे रायगडकरांसाठी साधे आकाशवाणी केंद्र मिळू शकले नाही. रायगड जिल्ह्यात रुग्णांवर उपचार करु शकेल असे चांगले रुग्णालय नाही, दीर्घ कालावधीनंतर जिल्हा रुग्णालयास रिलायन्सच्या सौजन्याने सीटी स्कॅन मशीन मिळाले असले तरी तंत्रज्ञाअभावी बोंबच आहे. एमआरआयसाठी मुंबईवरच अवलंबून राहावे लागत आहे. सर्वच बाबतीत रायगड जिल्ह्याला मुंबईवर अवलंबून राहावे लागत आहे. एकप्रकारचे हे परावलंबित्व आहे. दुर्दैवाने रायगडमधील लोकप्रतिनिधींना यात काही वावगे वाटत नाही.
       रायगड निसर्गसंपन्न जिल्हा आहे. प्रदीर्घ समुद्र किनारा, गड-किल्ले, मंदिरे, लेणी असा सौंदर्यसाज या जिल्ह्याला लाभला आहे. त्यामुळे पर्यटकांसाठी हा जिल्हा पर्यटनासाठी पहिली पसंती ठरला आहे. त्यामुळे पर्यटनावर आधारित उद्योग आणि रोजगाराच्या संधी यांस येथे मोठा वाव आहे, पण चांगले रस्ते, पाणी आणि निवास या बाबींची पुर्तता करण्यात शासन, जिल्हा प्रशासन आणि लोकप्रतिनिधी उदासिन आहेत. पावसाळ्यात तर जिल्हा निसर्गसौंदर्याने फुलून येतो, पण सार्वजनिक बांधकाम विभाग, राज्य-राष्ट्रीय महामार्ग विभाग यांच्या निष्क्रियतेमुळे संपूर्ण जिल्ह्यातील रस्त्यांना खड्ड्यांचे कोड उठते आणि त्यामुळे पर्यटकांना, चाकरमान्यांना, तसेच सर्वसामान्यांना येथील रस्त्यांवरुन प्रवास करणे अवघड बनते, त्यामुळे पर्यटनच संकटात आलेले नाही तर येथील जगणेच संकटात आले आहे. या प्रकारांना कुठेतरी चाप बसणे आवश्यक आहे.
      रायगड जिल्हा मुंबई जवळ असूनही विकासात मागे असण्याचे कारण खरेतर मुंबई नाही, तर येथील लोकप्रतिनिधींची मानसिकता जिल्ह्याच्या विकासासाठी अनुकूल नाही. राजकारण आयुष्यभर करायचेच असते, पण ते किती टक्के करायचे ठरवले आणि त्यादृष्टीने सर्व लोकप्रतिनिधी समाजकारणासाठी एकत्र आले तर रायगडचा निश्‍चितच कायापालट होईल. छत्रपती शिवाजी महाराजांच्या मनातील रयतेचं राज्य आज लोकशाही असूनही कोणी तंतोतंत चालवू शकत नाही. तथापि रायगडातील लोकप्रतिनिधी मात्र रायगडातील रयतेच्या हितासाठी एकत्र आले तरच त्यांना राज्य आणि केंद्र सरकारकडे रायगडच्या खर्‍याखुर्‍या विकासासाठी एकजुटीने पाठपुरावा करता येईल. तसे झाले तरच रायगडला भविष्य आणि भवितव्य आहे.

रविवार, २३ फेब्रुवारी, २०२०

मानवी नातेसंबंधाचे संवेदनशील चित्रण : झुला

-उमाजी म. केळुसकर ⬑ पुस्तकवेध ⬉



     अलिबागेतील नाट्य-चित्रपट अभिनेते व साहित्यिक शरद कोरडे लिखित ‘झुला’ हा कथासंग्रह प्रतिक प्रकाशन, पुणे या प्रकाशन संस्थेने प्रकाशित केला आहे. या कथासंग्रहात शरद कोरडे यांच्या एकूण ११ कथांचा समावेश असून त्यांनी त्या समाजातील वास्तववादी घटनांच्या आधारे लिहिलेल्या आहेत. 
   यातली पहिली कथा ‘झुला’ असून त्याच नावाने हा कथासंग्रह प्रकाशीत झाला आहे.रानराईसारख्या डोंगर व जंगलांनी वेढलेल्या आदिवासी वस्ती असलेल्या गावात मुंबईहून एक तरुण डॉक्टर दवाखान्यात बदलून येतो व तेथे त्याला विलक्षण अनुभव येतो.  आंब्याच्या झाडावरील झुल्यात त्याला एक गोंडस बालक हसताना दिसतो व त्याच्या भावविश्वाचा तो ताबा घेतो.  ही गुढकथा आपणांस नक्कीच अंतर्मुख करायला लावणारी आहे.
      नाटक, चित्रपट व लोेककला ही लेखकाच्या खास आवडीची माध्यमे आहेत.  या कलाविश्वातील तीन कथा या संग्रहांत आहेत.  एका नाटनिर्मात्याला त्याच्या उत्तरकाळात अनपेक्षीतरित्या भेटलेल्या एका चिमुकल्या मुुलीच्या सान्निध्याने त्याचे आयुष्य उजळून निघते व ज्या वेगाने ती त्याच्या आयुष्यात येते त्याच वेगाने ती जगातून नाहीशी होते. तिच्या वियोगामुळे त्याच्या मनात जेे प्रश्‍न निर्माण होतात त्याचा मागोवा ‘प्रश्‍न, प्रश्‍न आणि प्रश्‍न‘ या कथेंत घेतलेला आहे. 
     चित्रपट क्षेत्रातील एका निर्माता-दिग्दर्शकास बालपणापासूनच आईची माया देणार्‍या  ‘माई‘ या हॉटेल मालकीणीच्या संपत्तीचे वारस होण्याचा प्रसंग त्याच्या अखेरच्या आयुष्यात माईच्या मृत्यूनंतर येतो. पुढे एका बालकाच्या रुपाने त्यांना खरा वारस कसा सापडतो ते ‘वारस‘ या कथेत विलक्षण संवेदनशीलतेने मांडले आहे.
     एक तमाशा कलावंत खेडोपाड्यांत तमाशाचेे प्रयोग करीत असताना नर्तकी असलेल्या त्याच्या पत्नीस गावगुंडांनी पळवून नेण्याचा प्रसंग येतो व त्या गुंडाच्या रांगड्या पण सज्जन मामाने तिची सुटका कशी केली हे ‘मानाचा मुजरा‘ या कथेत प्रभावीतपणे आपल्या समोर येते. ‘शिरपीची आय‘, ‘रोझा ङ्गर्नांडीस‘, ‘सोनेरी पर्स‘ या खरं तर पोलिस चातुर्य कथा असून त्या रहस्यकथाही आहेत.
     प्राणघातक हल्ल्यामुळे स्मृतीभ्रंश झालेल्या व आपल्या स्वत:च्या अस्तित्वाचा शोध घेण्यासाठी तळमळणार्‍या व हॉस्पिटलमध्ये उपचार घेणार्‍या व्यक्तीची व्यथा लेखकाने ‘अंधारवाटा‘ या कथेत मांडलेली आहे.  तर पुनर्जन्मानंतरही आपल्यावर अत्याचार करुन फसवणूक करणार्‍या आपल्या नराधम पतीचा पाठलाग करुन त्याला धडा शिकवणार्‍या वृद्ध स्त्रीचे दर्शन आपणास ‘पाठलाग‘ या कथेतून होते, तर ‘माझे घर‘ या कथेत उतारवयांतील आपल्या वडिलांच्या घरावर कब्जा करुन त्यांना बेघर करणार्‍या लालची मुलाला वडील आपल्या मित्रांच्या सहाय्याने कसा धडा शिकवतात त्याचे मन हेलावून टाकणारे चित्रण या कथेत करण्यात आले आहे. ‘सांगाती‘ या कथेत एका आदिवासी तरुणीच्या धावपटू होण्यापर्यंतचा प्रवास व तिला झालेल्या अपघाताची गुढरम्य कथा लिहिण्यात आलेली आहे.
झुला या कथासंग्रहातील कथा या मानवी नाते संबंधांचेे संवेदनशीतेने चित्रण करणार्‍या आहेत व आपणास त्या निश्‍चितच आवडतील अशा आहेत.  हा कथासंग्रह प्रवीण जोशी, प्रतिक प्रकाशन, पुणे यांनी प्रसिद्ध केला असून सुप्रसिद्ध लेखिका डॉ. मधुरा कोरान्ने यांनी आपल्या ओघवत्या व प्रासादिक शैलीने प्रस्ता़़़वना लिहिलेली आहे. वैभव चिकोडीकर यांनी विषयानुरुप सुंदर मुखपृष्ठ चितारले आहे.
झुला (कथासंग्रह)
लेखक- शरद कोरडे
प्रकाशक- प्रतिक प्रकाशन, पुणे
पृष्ठ-१३२, मूल्य- १५०/- 
                                    

शनिवार, २२ फेब्रुवारी, २०२०

सावधान! १००८ वर्षांचा आक्षीचा शिलालेखही चोरीस जाईल

-उमाजी म. केळुसकर ⬑ दादागिरी ⬉


* रायगड जिल्ह्यातील प्राचीन ठेवा
* देशातील पहिला मराठी शिलालेख
* शिळेवरील मराठी अक्षरे गेलीय पुसली
* शिलालेखावर गधेगाळ शिल्पाची शापवाणी
* पुरातत्वीय वारशाच्या चोरीची शक्यता
* अंदाजे ५० कोटी रुपयांहून अधिक किंमत
* शिलालेखावर सीसीटीव्ही, सुरक्षेची गरज
* शिलालेखाचे माहितीपूर्ण स्मारक व्हावे
* रायगडात सव्वाशे शिलालेख, दहा ताम्रपट
* यापूर्वी दिवेआगरला हजार वर्षांच्या सुवर्णगणेशाची चोरी

       आदिमानव आधी मुद्राभिनयातूनच एकमेकांशी बोलायचे. त्यांच्या खाणाखुणा हीच त्यांची भाषा असायची. या मुद्राभिनयाच्या कलेतूनच भाषेचा उगम झाला. संकेतांना त्यांनी शब्दांचे रुप दिले आणि त्या त्या समूहाची एक भाषा निर्माण झाली. मानव एकमेकांशी बोलू लागला. त्यामुळे आज जगात शेकडो भाषांचा वापर केला जात आहे. त्यात बोलीभाषा आणि प्रमाणभाषा यांचा समावेश आहे. भारतात प्रस्तर (शिलालेख), स्तंभ (लोहस्तंभ), सोन्या-चांदीचे आणि तांब्याचे पत्रे, कापड, भूर्जपत्रे आणि ताडपत्रे, कागद ते कॉम्प्युटर असा लेखन प्रवास राहिला आहे. या प्रवासातील महत्वाचा साक्षीदार रायगड जिल्हा राहिला आहे, कारण मराठीतील पहिला शिलालेख अलिबाग तालुक्यातील आक्षी येथील आहे आणि मराठीतील पहिला ताम्रपट श्रीवर्धन तालुक्यातील दिवआगर येथील आहे. जिल्ह्यात असे सुमारे सव्वाशे शिलालेख व दहा ताम्रपट आहेत. आक्षी येथील मराठीतील पहिल्या शिलालेखास यावर्षी एक हजार आठ वर्ष होत आहेत. आंतरराष्ट्रीय बाजारात या शिलालेखाची किंमत ५० कोटी रुपयांहून अधिक असू शकते. आंतरराष्ट्रीय तस्करांनी हा अनमोल ठेवा मुळापासून उखडून नेला तर रायगडकरांच्या आणि महाराष्ट्राच्या हाती असलेला हा एक हजार आठ वर्षांचा अनमोल ठेवा गमावण्याचे पाप राज्य शासन आणि जिल्हा प्रशासनाचे असेल. 
       रायगडकरांना कोणी असे विचारले की तुमच्याकडे कोणता असा ठेवा आहे तर छत्रपती शिवाजी महाराज यांचा किल्ले रायगडसह अनेक गडकिल्ले आणि जलदूर्ग आमच्याकडे आहेत (भले या ऐतिहासिक वास्तूंच्याबाबत राज्यसरकार आणि जनता म्हणून आपण उदासिन असलो तरी) असे उत्तर अभिमानाने दिले जाईल. असेच अभिमानाने उदाहरण देण्याजोगा रायगडकरांकडे आणखी एक प्राचीन ठेवा आहे, तो म्हणजे आक्षीच्या पहिल्या मराठीतील शिलालेखाचा. पण हे किती रायगडकरांना माहिती आहे? रायगडकरांचे राहू दे, रायगडच्या किती लोकप्रतिनिधींना मग ते आमदार असोत, खासदार असोत, मंत्री असोत कि स्थानिक पुढारी असोत कोणाला या शिलालेखाबाबत आस्था आहे? जिल्हा परिषद, जिल्हा प्रशासनाला, राज्य शासनाला तर त्याचे काहीच पडले नाही. जिल्हा परिषद अध्यक्ष पदावर आले नि गेले, जिल्हाधिकारीही पदावर आले नि गेले, मुख्यमंत्रीही पदावर आले नि गेले,  पण यापैकी कुणीही आक्षीच्या शिलालेखाची दखल घेतली नाही. त्यामुळे संरक्षण आणि संवर्धनाअभावी तो शिलालेखाचा दगड आहे तेथे १००५ वर्षे झुरत आणि झिजत उभा आहे, यापेक्षा यापेक्षा या जिल्ह्याचे दुसरे दुर्दैव कोणते म्हणायचे?
        शके १०३८ म्हणजे इसवी सन १११६ मधील श्रवणबेळगोळ येथील जैन दिगंबर पंथीय बाहुबलीच्या पायथ्याशी असलेला शिलालेख मराठीतील पहिला म्हणून मानला जात होता; परंतु शके ९३४ म्हणजेच इसवी सन १०१२ मधील आक्षी येथील मराठीतील शिलालेख पहिला असल्याचे प्रसिद्ध संशोधक डॉ. शं.गो. तुळपुळे यांनी सप्रमाण सिद्ध केले. पण रायगड जिल्ह्यासाठी या अभिमानास्पद असलेल्या शिलालेखाच्या जतनासाठी जिल्हाप्रशासन आणि राज्य शासनाने कोणताही पुढाकार घेतला नाही. आक्षीचा शिलालेख जिल्हाप्रशासन आणि शासनाच्या उपेक्षेला सामोरा जात असला तरी जगभरातील पुरातत्व अभ्यासक मात्र आक्षीला मराठीतील या पहिल्या शिलालेखाच्या शोधात येत असतात, त्या प्राचीन ठेव्याची तेथे झालेली दुर्दशा पाहून त्यांच्या डोळ्यात पाणी येते. तो ठेवा आपल्या डोळ्यात आणि कॅमेर्‍यात साठवून ते हळहळतच तेथून जातात. पण काही तस्करही या शिलालेखाची आणि या परिसराची रेकी करुन गेले असण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे या शिलालेखाची चोरी झाल्यावरच जिल्हा प्रशासन आणि राज्य शासन जागे होईल का? आणि तसे झाले तर काय उपयोग? ती ‘बैल गेला नि झोपा केला’ अशीच परिस्थिती असेल.
        यापूर्वी १९९७ साली दिवेआगरला द्रौपदी पाटील यांच्या बागेत जमीन खोदकाम करीत असताना एका लोखंडी पेटीत १ हजार वर्षांपूर्वीचा ५२ कशी सोन्याचा १.३२ किलो वजनाचा सुवर्ण गणेश सापडला होता, त्याची स्थापना ग्रामस्थांनी पेशवेकालिन गणेशमंदिरात केली, परंतु त्याचे संरक्षण योग्यरित्या झाले नाही. सोन्याच्या हव्यासापायी हा पुरातत्वीय ठेवा चोरट्यांनी त्या मंदिरातून २०१२ मध्ये लांबविला आणि तो वितळूनही टाकला आणि एक हजार वर्षांपूर्वीचा पुरातत्वीय वारसा नष्ट झाला. आता आक्षीचा शिलालेख चोरीस जाण्याची शासनाने वाट पाहू नये आणि तो दगड असल्यामुळे चोरीस जाणार नाही, अशा भ्रमातही राहू नये. कारण आंतरराष्ट्रीय बाजारात या आक्षीच्या शिलालेखाची किंमत ५० कोटी रुपयांहून अधिक असू शकते. असा हा तस्करांचं आणि पुरातत्व अभ्यासकांचं, संग्राहकांचं लक्ष वेधून घेणारा ‘दगड’ ही पूर्वी रस्त्याच्या चिरणीत (गटारात) पडलेला होता. १९९५ मध्ये अलिबाग येथे झालेल्या कोकण मराठी साहित्य संमेलनाच्या वेळी आक्षी येथील हा शिलालेख बेवारस अवस्थेत असल्याचे साहित्यिकांच्या लक्षात आले. त्यांनी शिलालेखास सिमेंटच्या चौथर्‍यावर उभे केले. त्यानंतर आजतागायत शिलालेख ऊन-पाऊस झेलीत आहे. त्यावरील अक्षरेही पुसून गेली आहेत. आता अपेक्षा इतकीच आहे की शासनाने आपल्या उदासिनतेने हा प्राचीन वारसा पुसू नये.


        आक्षीतील सोमेश्वर महादेव मंदिराजवळ रस्त्याच्या कडेला असलेल्या या मराठीतील पहिल्या शिलाहारकालीन शिलालेखात राजा केसीदेवराय याचा प्रधान भइर्जू सेणुई याने देवीच्या बोडणासाठी नऊ कुवली (मापे) धान्य दिल्याचा उल्लेख आहे. हा शिलालेख शके ९३४, प्रधावी संवत्सर, अधिक मास (ज्येष्ठ), सुक्रे- शुक्रवार, १६ मे इसवी सन १०१२ चा आहे. हा शिलालेख संस्कृत मराठीमिश्रित देवनागरी लिपीतील असून नऊ ओळींचा आहे. हा कोरलेला लेख असा-
‘गी सुष संतु| स्वस्ति ओं| पसीमस
मुद्रधीपती| स्त्री कोंकणा चक्री-
वर्ती| स्त्री केसीदेवराय| महाप्रधा-
न भइर्जु सेणुई तसीमीनी काले
प्रव्रतमने| सकु संवतु: ९३४ प्रधा
वी संवसरे: अधीकु दीवे सुक्रे बौ-
लु| भइर्जुवें तथा बोडणा तथा नउ
कुवंली अधोर्यु प्रधानु| महलषु-
मीची व आण| लुनया कचली ज-’
        आता ही अक्षरे पुसली गेल्यामुळे ती पाहायला मिळत नाहीत. तथापि, एक हजार पाच वर्षांपूर्वी कोरलेल्या या नऊ ओळींचा अर्थ असा, ‘कल्याण होओ. पश्चिम समुद्राधिपती श्री. कोकण चक्रवर्ती, श्री. केसीदेवराय यांचा महाप्रधान भइर्जु सेणुई याने शक संवत ९३४ प्रधावी संवत्सर अधिक कृष्ण पक्ष शुक्रवार या दिवशी देवीच्या बोडणासाठी नऊ कुवली धान्य नेमून दिले. जगी सुख नांदो.’ कोरलेल्या नऊ ओळींच्या खाली ओणवी स्त्री आणि तीवर आरूढ असे गाढव अशा प्रकारचे चित्र कोरलेले आहे. ही शापवाणी आहे. यास ‘गधेगाळ’ म्हणतात. 
        पहिल्या शिलालेखानंतर २७९ वर्षांनंतर उभारलेला ७२६ वर्षांचा दुसरा यादवकालिन शिलालेख काळंबादेवी मंदिराच्या परिसरात, ग्रामपंचायत कार्यालयाशेजारी आहे. हा शिलालेख देवगिरी यादव नृपती रामचंद्रदेव याच्या राजवटीतील आहे. इथेही वरच्या बाजूस चंद्र-सूर्य आणि गधेेगाळ शिल्प कोरण्यात आले आहे. शके १२१३, खर संवत्सर, चैत्र शुद्ध ८, शुक्रवार, ९ मार्च इसवी सन १२९१ मधील या लेखातही दानविषयक उल्लेख आहेत.  या लेखात म्हटले आहे की यादव नृपती रामचंद्रदेव याचा मांडलिक जाईदेव याचा पुत्र ईश्‍वरदेव क्षत्रिय याने देवीला गद्याण दान दिले आहे. याही शिलालेखाखाली ‘गधेगाळ’ शिल्पं कोरलेले आहे.
       लिखित मजकूर अनंत कालपर्यंत टिकून रहावा म्हणून तो दगडी शिळेवर कोरला तरी त्या दगडांचा गैरवापर होऊ शकतो, तो होऊ नये म्हणून शिलालेेखांवर गधेगाळ शापशिल्पे चितारली जायची. त्या शिल्पात स्त्रीचा गाढवाबरोबर संकर दाखवला जायचा. हे गाढव शिल्प म्हणजे गधेगाळ. शिलाहार, कलचुरी तसेच यादव राजांनी स्थापित केलेली अनेक गधेगाळ शापवाणी शिल्प महाराष्ट्रात सापडतात. या शापशिल्पांमुळे महाराष्ट्रात जिथे जिथे अशाप्रकारचे शिलालेख आहत, त्या दगडांचा वापर इतर कामांसाठी करण्याची कोणाची हिंमत झाली नाही आणि होत नाही. त्यामुळेच आक्षीच्या शिळांवरील लेख पुसले गेले, तरी त्यावर शापवाणीचा संकेत करणारी शिल्पे दिसत असल्यामुळे त्या शिळांचा वापर कोणी खाजगी कामासाठी करण्याचा विचार केला नाही. पण आज हा सारा ठेवा रस्त्याच्या कडेला कुठेतरी उन्हापावसात उभा आहे. या शिलालेखातील अक्षरे आता पुसली गेली आहेत, फक्त शिल्पं दिसत आहेत. त्यांच्या माहितीचा इथे ना फलक आहे, ना गावातील कुणाला त्याची ओळख. यामुळे इथे आलेल्या पर्यटकांनाही त्याचे महत्त्व कळत नाही. खरेतर मराठी भाषेतील या आद्य शिलालेखाचे तेथे स्मारक करून तिथे त्याविषयीची माहिती लावणे गरजेचे आहे. पण असल्या कामासाठी आपल्या मायबाप सरकारला सध्यातरी वेळ नाही.
      महाराष्ट्र, कोकण प्रांत, मराठी भाषा, देवनागरी लिपी आदी अनेक अंगांनी आक्षीच्या दोनही शिलालेखांचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. असे असूनही अशा ठेव्यांची नीट काळजी का घेतली जाऊ नये? पुढेमागे हे शिलालेख तेथून नाहीसे होऊन देशातील वा बाहेरील कोणा संग्राहकाच्या संग्रहात जाऊन पोहोचले आहेत अशी बातमी वाचायला मिळाली तर आश्चर्य वाटण्याचे कारण नाही. आंतरराष्ट्रीय तस्करांनी हा अनमोल ठेवा मुळापासून उखडून नेला तर रायगडकरांच्या आणि महाराष्ट्राच्या हाती असलेला हा एक हजार आठ वर्षांचा अनमोल ठेवा गमावण्याचे पाप राज्य शासन आणि जिल्हा प्रशासनाचे असेल.