बुधवार, १९ ऑगस्ट, २०२०

प्रवीण कदम : सामान्यांचा आधार गेला

-उमाजी म. केळुसकर ⬑ खारावारा ⬉


आमचा मित्र आम्हाला सोडून गेला. वयाचं अर्ध शतकही पार केले नाही, वयाच्या ४९ व्या वर्षीच गरुडपाड्याचे आमचे मित्र, सकल मराठा समाज अलिबाग तालुका उपाध्यक्ष, उद्योजक प्रवीण भास्कर कदम जीवनाची शर्यत अर्ध्यावर सोडून गेले. १६ नोव्हेंबर १९७२ ही त्यांची जन्मतारीख. शून्यातून विश्व निर्माण केलेला आमचा मित्र मृत्यूला मात्र हरवू शकला नाही, १९ ऑगस्ट २०२० ला त्यांनी अखेरचा श्वास घेतला. मात्र मृत्यू त्यांच्या दातृत्वाची, कर्तृत्वाची आणि नेतृत्वाची कवचकुंडलं हिरावू शकला नाही, हे वास्तव आहे. आमचा मित्र आठवणींच्या रुपात आमच्या ह्रदयात अमर आहे.
शेतकरी कामगार पक्षाचे बामणगाव विभागातील प्रवीण कदम हे बिनीचे शिलेदार. अलिबाग तालुक्यात मराठा समाजाचं एकीकरण करण्याचे त्यांनी तन-मन-धन अर्पून काम सुरु केले. त्याच सुमारास सकल मराठा समाजाचे सचिव, झिराडपाड्याचे उल्हास पवार यांच्या माध्यमातून त्यांची माझी ओळख झाली आणि मैत्री कधी झाली ते कळलेच नाही. खरे तर त्यांचे मोठे बंधू कृष्णा यांची माझी तीस वर्षांपासूनची मैत्री, ते प्रवीण कदम यांचे भाऊ आहेत, हे एकदा प्रवीण कदम यांच्या वाढदिवशी त्यांना शुभेच्छा द्यायला आम्ही म्हणजे सकल मराठा समाज, अलिबाग तालुका अध्यक्ष नरेश सावंत, सचिव उल्हास पवार, सहसचिव अनिल गोळे, सदस्य प्रदीप ढवळे, मनोहर कदम, संतोष पवार, कृष्णा जाधव, नयन जरंडे, बाळू पवार, सुधीर पाटील, जितेंद्र साळसकर, यशवंत हरेर आदी त्यांच्या घरी गेलो असताना कळले. आणि आपल्या मित्राचा भाऊ देखील आपला मित्र आहे, हे पाहून तर माझ्या आनंदाला उधाण आहे.
प्रवीण यांची मैत्री ही जीवाभावाची, या मैत्रीचा कधी गैरफायदा न घेतल्यामुळेच ती मैत्री अक्षय आहे. सा. कोकणनामाचे दैनिक करावे, त्याच्या भांडवलाची मी तजवीज करतो, असे ते नेहमी म्हणायचे, ते म्हटल्या प्रमाणे करणारे होते, पण मी या बाबीला नम्रपणे नकार देत आलो. कोकणनामाच्या मोजक्या हितचिंतकांपैकी प्रवीण कदम हे एक होते. मनात एक आणि ओठावर एक असा त्यांचा स्वभाव नव्हता. रोखठोक स्वभाव खरे तर माणसे तोडतो, पण प्रवीण कदम यांनी सतत माणसे जोडली. कारण या रोखठोक स्वभावाबरोबर एक जाणतेपण त्यांच्यात होते. मराठा समाजाबरोबरच बहुजन समाजाबद्दल त्यांना कळकळ होती. बहुजन हिताय, बहुजन सुखाय हे त्यांच्या कार्याचं ब्रीद होतं, त्यामुळे त्यांनी कधी आपपर भाव बाळगला नाही. जो मदत मागण्यास समोर आला, त्याला निरपेक्षपणे मदत केली. बामणगाव विभागात प्रवीण कदम यांचा शब्द हा अखेरचा होता.
प्रवीण कदम मोठी स्वप्न पहाणारे, केवळ स्वप्नच पहायचं नाही, तर ते प्रत्यक्षात आणायचं ही त्यांची जिद्द. म्हणूनच प्रतिकूल परिस्थिती संघर्ष करुन त्यांनी त्यांनी स्वत:चं एक वेगळ साम्राज्य उभं केलं. हे साम्राज्य उद्योगाच्या रुपात, सामाजिक नेतृत्वाच्या रुपात, राजकीय कार्यकर्त्याच्या रुपात, अशा विविध स्वरुपात त्यांनी उभं केलं. घरच्या प्रतिकूल परिस्थितीमुळे दहावीनंतर शिक्षणाला रामराम ठोकून त्यांनी १९९० साली अलिबाग नागडोंगरी येथे सायकल दुरुस्तीचा व्यवसाय सुरु केला. प्रवीण कदम सायकल दुरुस्तीत एकदम पटाईत. सायकल दुरुस्तीच्या व्यवसायातून त्यांची परिस्थिती थोडी सुधारल्यावर त्यांनी स्वत:च्या हुशारीने १९९८ पासून बांधकाम व्यवसायात उडी घेतली. स्वत: इंजिनिअर वा आर्किटेक नसताना अनुभव हाच गुरु हे मानून त्यांनी असंख्य घरे, बंगलो, दुकाने, गाळे, हॉटेल व इमारती यांची अलिबागमध्ये, अलिबागबाहेर कामे केली. स्वतःचे ऑफीस, दोन इंजिनिअर, चार सुपरवायझर व वीस ते पंचवीस जणांच्या कर्मचारी वर्गाला रोजगार पुरविला.
प्रवीण कदम यांना राजकारणाची आवड. १९९५ पासून ते ग्रुप ग्रामपंचायत कावीरमध्ये तीन वेळा सदस्य म्हणून भरघोस मताधिक्याने निवडून आले. सध्या ग्रुप ग्रामपंचायत कावीरचे उपसरपंच म्हणून कार्यभार सांभाळत होते. त्यांच्या कामाची दखल घेत शेतकरी कामगार पक्षाचे सरचिटणीस आ. जयंत पाटील यांनी विश्वासाने बामणगाव विभागीय चिटणीसपदाची सूत्रे त्यांच्याकडे सोपविली होती. राजकारणाप्रमाणेच ते सामाजिक कार्यात अग्रेसर होते. त्यांनी संभाजी ब्रिगेडचे तालुका अध्यक्षपद, नॅशनल ऍण्टी करप्शन ऍण्ड ऍन्टी ऍट्रॉसिटी ऑर्गनाझेशनचे (टायगर फोर्स) रायगड जिल्हा उपाध्यक्ष, बामणगाव पंचक्रोशी कबड्डी लीगचे कार्याध्यक्ष, सकल मराठा समाज अलिबागचे उपाध्यक्ष अशी त्यांनी पदे भूषविली.
मराठा मोर्चाचे त्यांनी अलिबागेत यशस्वी आयोजन केले. पालकमंत्र्यांचा उपस्थितीत मराठा आत्मसन्मान मेळावा व मराठा जात प्रमाणपत्र उपक्रम यशस्वी करण्यात त्यांनी मोलाचा वाटा उचलला. ज्याप्रमाणे ते सामाजिक, राजकीय क्षेत्रात आहेत तसेच शैक्षणिक क्षेत्रातही मागे नव्हते. अनेक गरीब व गरजू विद्यार्थ्यांना त्यांनी शिक्षणाला मदत केली असून ते सध्या कोएसोच्या बामणगाव हायस्कूलमध्ये खजिनदार म्हणून कार्यरत होते. ऑगस्ट २०१९ मध्ये कोल्हापूर येथे नैसर्गिक आपत्ती आली, त्यावेळी स्वतः प्रवीण कदम यांनी आपल्या मित्रांसह (मीही त्यांच्या सोबत होतो.) अब्दुल लाट या गावी जाऊन विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप करून तेथील मुलांना मदतीचा हात दिला.
आपला राजकीय, सामाजिक, औद्योगिक प्रवास करताना त्यांनी कधी कुटुंबाकडे दुर्लक्ष केले नाही. प्रेरणा वहिनी (रेशमा धुमाळ) आमच्या नवेनगरच्या. त्यामुळे प्रवीण कदम आमच्या पोयनाड विभागाचे जावईच. यश आणि पार्थ ही दोन मुले असा त्यांचा सुखी संसार होता. पण क्रूर नियतीला हे सुख मंजूर नव्हते म्हणून तीने रडीचा डाव खेळून प्रवीण कदम यांचा घात केला आणि प्रेरणा वहिनी, यश आणि पार्थ या त्यांच्या मुलांना दु:ख सागरात लोटून दिले. मोठी बहीण रजनी, दोन नंबरचा भाऊ कृष्णा, त्यानंतरचे अशोक, रवींद्र, प्रमोद आणि शेवटची बहीण रंजना या सर्वांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. बामणगाव विभागाचेही प्रवीण कदम यांच्या अचानक जाण्याने नुकसान झाले आहे, ते कधीही भरुन निघणारे नाही. मृत्यू क्रूर असतो, पण परमेश्वर कसा क्रूर असू शकतो? का त्याने माझ्या मित्राला आयुरारोग्य दिले नाही? म्हणून आमचे देवाशी सतत भांडण राहील.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा