रविवार, ५ जुलै, २०२०

शं.ना. नवरे, मी आणि चित्रकार राजेंद्र घोसाळकर


 -उमाजी म. केळुसकर ⬑ रायगडचा डंका ⬉
      
       फेसबुकवर राजेंद्र घोसाळकर दिसले... 
       घोसाळकर हे काही नारायण धारप किंवा रत्नाकर मतकरी यांच्या गूढकथांतील पात्र नव्हे, तर आपल्या रेवदंड्यातील प्रसिद्ध चित्रकार आहेत.
        या राजेंद्र घोसाळकर यांचं सुदैव असं की ते चक्क सुप्रसिद्ध साहित्यिक शं.ना. नवरे यांच्या कथेचा एक अविभाज्य भाग बनले. राजेंद्र घोसाळकर यांच्या निसर्गचित्रांवरुन त्यांनी एक कथा लिहिली आणि मी ती ‘चित्रकथा’ शीर्षकाची कथा दैनिक कृषीवलच्या १८ सप्टेंबर १९९४ च्या ‘संवाद’ पुरवणीत प्रसिद्ध केली होती. ही कथा त्यांनी नंतर त्यांच्या एका कथासंग्रहात देखील छापली. एकंदरीत या कथेतील निसर्गचित्रं हेच प्रमुख पात्र होतं. आणि हा सर्व निसर्ग रेवदंड्याचा होता. चित्रातून हा निसर्ग बघणार्‍याला आकर्षित करुन घेतो, जणू काही बघणार्‍याला रेवदंड्यातच पोहोचवतो, अशी ती कथा होती.
       ही उत्कट निसर्गचित्रं शं.ना. नवरे यांच्या घरात लावलेली होती. शं.ना. नवरे येणार्‍या-जाणार्‍या आपल्या मित्रांना, स्नेह्यांना ही निसर्गचित्रं माझ्या रेवदंड्याच्या तरुण चित्रकार मित्रानं, राजेंद्र घोसाळकर यांनी चितारलेली आहेत, हे कौतुकाने सांगायचे. ‘चित्रकथा’ या कथेने रेवदंड्याचे चित्रकार राजेंद्र घोसाळकर हे माझ्या मनीमानसी वसले होते. पण त्यांची भेट घडायला ६ वर्षे लागली. २००० साली ते माझ्यासमोर येऊन दत्त म्हणून उभे राहिले. 
      सोमवार, २७ एप्रिलला मुंबईतील जहांगीर कलादालनात त्यांच्या चित्राचं प्रदर्शन आयोजित करण्यात आले होते, त्याचे निमंत्रण देण्यासाठी ते आले होते. तेव्हा मी त्यांची २६ एप्रिल २००० च्या संवाद रविवार पुरवणीसाठी ‘अमूर्त चित्रांचा किमयागार’ या शीर्षकाची मुलाखत घेतली. त्यांनी तेव्हा आपली निसर्गचित्रे, अमूर्तचित्रे मला आपुलकीने दाखविली. त्यातील एक चित्र प्रेमाने त्यांची आठवण म्हणून त्यांनी मला दिले.
         मुलाखत प्रसिद्ध झाल्यानंतर तिला जिल्ह्यातून चांगला प्रतिसाद लाभला. ज्यांच्या चित्रावरुन शं.ना. नवरे यांच्यासारख्या सुप्रसिद्ध साहित्यिकाला कथा लिहाविसी वाटली, असा चित्रकार आपल्या रेवदंड्यात आहे, ही कौतुकाची बाब होती. आज या घटनेला २० वर्षे झाली आहेत. रेवदंडा आणि अलिबाग काही दूर नाही, पण या दीर्घ कालावधीत एकदाही आमची भेट झाली नाही, की दोघांनाही आपण एकमेकांची भेट घ्यावी असे वाटले नाही. तसा कोणताच संबंध उरला नव्हता, एकच पाश मनाला बांधून होता, तो म्हणजे त्यांनी दिलेलं निसर्गचित्र.
       पण २० वर्षापूर्वी ऑफीसमध्ये दुपारी ज्या कपाटात मी ते निसर्गचित्र ठेवलं होतं, ते संध्याकाळी मी घरी घेऊन जाण्यासाठी कपाट उघडलं, तर ते चित्र तेथे नव्हतं. ते चित्र कोणी नेलं ते २० वर्ष झाली तरी शेवटपर्यंत कळलं नाही, कदाचित माझ्यापेक्षा ते चित्र नेणार्‍याला त्या चित्राची किंमत कळली असावी, पण अशाप्रकारे ते चित्र गायब व्हायला नको होतं. पण ते झालं. ही बाब मनातच राहिली. आज फेसबुकवर राजेंद्र घोसाळकर यांना कबुली देतो की, तुम्ही दिलेलं निसर्गचित्र माझ्याकडे नाही. तुमच्या चित्रांनी शं.ना. नवरे यांच्या घराला एक वैभव लाभलं, पण माझ्यासारख्या लेखकाला ते सुख नाही. माझ्या घराच्या भिंतीच आता तुमच्या अमूर्त चित्रांप्रमाणे झाल्या आहेत. रंगहीन भिंतीतून कोणीही काहीही अर्थ काढावा...

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा