शुक्रवार, २५ डिसेंबर, २०२०

भीमपराक्रम करणारा टी-५५ रणगाडा अलिबागेत ठरणार प्रेरणास्रोत

   -उमाजी म. केळुसकर ⬑ रायगडचा डंका ⬉

अलिबाग ही रायगड जिल्ह्याची राजधानी आहे. सरखेल कान्होजी आंग्रे ते जनरल अरुणकुमार वैद्य असा अलिबागचा समर्थ चेहरा आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा वारसा सांगणारे हे दोन्ही महापुरुष आणि ही भूमी आहे. येथे पराक्रमाचा वारा वाहतो. येथील समुद्राने, मिश्रदुर्ग कुलाब्याने सर्व शाह्यांचा थरकाप उडविला. या समुद्राला, कुलाब्याला मानवंदना देण्यासाठी, ऐतिहासिक पर्यटनाला बळकटी देण्यासाठी रायगडचे माजी जिल्हाधिकारी डाॅ. विजय सूर्यवंशी यांच्या संकल्पनेतून आणि अलिबागचे नगराध्यक्ष प्रशांत नाईक यांच्या धडपडीतून समुद्र किनारी टी-५५ रणगाडा बसवण्यात आला आहे. या रणगाड्याच्या माध्यमातून भारताच्या संरक्षण सामर्थ्याची ओळख अलिबागेत जगभरातून येणाऱ्या पर्यटकांना होणार आहे. या रणगाड्यामुळे अलिबागकरांचीच नाही, तर रायगडकरांची छाती अभिमानाने फुलली आहे.

रायगडचे जिल्हाधिकारी म्हणून डाॅ. विजय सूर्यवंशी यांनी सूत्रे हाती घेतल्यावर मी रायगड टाइम्समध्ये विशेष लेख लिहून जिल्हाधिकारी म्हणून त्यांच्यापुढे कोणती आव्हाने आहेत, याबाबत उहापोह केला. तेव्हा त्यांनी आवर्जून या लेखाची दखल घेऊन मला फोन केला आणि त्यांच्या मनातील रायगड जिल्ह्याच्या विकासाचा आलेख त्यांनी माझ्यासमोर मांडला. रायगडचे पर्यटन मग ते सागरी, डोंगरी, सामाजिक, सांस्कृतिक, ऐतिहासिक, शैक्षणिक, वैज्ञानिक असो, त्याची जगाला ओळख व्हावी, येथील पर्यटन वाढावे, येथील जनतेचे आणि पर्यटन उद्योगावर आधारीत जनतेचे जीवनमान वाढावे अशी त्यांची तळमळ होती. यात आपलेही सहकार्य लागेल असेही त्यांनी मला म्हटले. सामाजिक, सांस्कृतिक, पर्यटन क्षेत्राला मी माझ्यापरीने सहकार्य करीत असतो. त्यामुळे त्यांचा दृष्टीकोन मला आश्वासक वाटला. त्यादृष्टीने त्यांनी पावलेही उचलली. अलिबाग समुद्रकिनाऱ्यावर रणगाडा बसविण्याची योजना त्यांनी आखली. त्यासाठी केंद्र सरकारकडे पाठपुरावा केला. दरम्यान डाॅ. विजय सूर्यवंशी यांची बदली झाली. परंतु त्यांच्या प्रयत्नांना यश आले. यासाठी अलिबागचे नगराध्यक्ष प्रशांत नाईक यांनीही धडपड केली. या प्रयत्नाचे आणि धडपडीचे मूर्त स्वरुप म्हणजे १९७१ च्या भारत-पाक युद्धात वापरलेला, प्रदीर्घ देशसेवेतून निवृत्त झालेला टी-५५ रणगाडा. हा रणगाडा आता अलिबाग समुद्र किनाऱ्याची केवळ शोभाच वाढविणार नाही, तर तरुणांना लष्करी सेवेत सामील होण्यासाठी प्रेरणाही देणार आहे.
सोव्हिएत युनियनने तयार केलेल्या या रणगाड्यांचा जगातील सुमारे ५० देशांनी वापर केला आहे. सध्या भारतात हे रणगाडे सक्रीय नाहीत. त्यांना २०११ मध्ये सेवेतून निवृत्त करण्यात आले. त्यांनी १९६४ ते २०११ पर्यंत ४७ वर्षांची सेवा बजावली. सध्या या रणगाड्यांचा प्रशिक्षणासाठी वापर केला जातो. शीतयुद्धाच्या सुरुवातीच्या काळात सोव्हिएत युनियनने तयार केलेला ‘टी-५४’ हा रणगाडा जगातील सर्वाधिक उत्पादन झालेला रणगाडा मानण्यात येतो. त्याच्या विविध आवृत्ती मिळून ८६ हजार ते १ लाख रणगाडे तयार झाल्याचा अंदाज आहे. त्या खालोखाल क्रमांक लागतो तो सोव्हिएत युनियनच्याच दुसऱ्या महायुद्धात वापरलेल्या ‘टी-३४’ या रणगाड्याचा. सोव्हिएत युनियनने १९४७ साली ‘टी-५४’ चा विकास सुरू केला आणि १९४९ साली हा रणगाडा सोव्हिएत सैन्यात दाखल झाला. या रणगाड्याची लांबी २८ फूट, रूंदी १२ फुट, तर वजन ३५ टन आहे. त्याच्यावरील चिलखताची जाडी ८ इंच आहे आणि त्यावर ४ इंच व्यासाची मुख्य तोफ आणि मशिनगन आहेत. हा रणगाडा ताशी ४८ किमी वेगाने एका दमात ४०० किमीचे अंतर पार करू शकतो. या रणगाड्यासाठी कमांडर, गनर, लोडर आणि ड्रायव्हर अशा चार जणांची आवश्यकता असते. या रणगाड्याचे वैशिष्ट्य म्हणजे उंचीला कमी असलेले ‘हल’ (मुख्य बॉडी) आणि मश्रुमच्या आकाराचे गन टरेट. कमी उंचीमुळे हा रणगाडा शत्रूच्या माऱ्याला सहजासहजी बळी पडत नसे. पुढे सर्वच रशियन रणगाड्यांची ही खासियत बनली.
टी-५४ च्या टी-५४ ए, टी-५५ बी आदी अनेक आवृत्ती विकसित होत गेल्या. मूळ रणगाड्याला आण्विक हल्ल्याच्या वातावरणात लढण्याची क्षमता देऊन टी-५५ ही सुधारित आवृत्ती तयार केली होती. त्याचे चिलखत अधिक जाड आणि इंजिन अधिक प्रभावी होते. दुसऱ्या महायुद्धानंतर सोव्हिएत प्रभावाखालील वॉर्सा पॅक्ट संघटनेतील ४० देशांना टी-५४ आणि टी-५५ या आवृत्तींचा भरपूर पुरवठा केला होता. झेकोस्लोव्हाकिया, रुमानिया, पोलंड, चीन अशा अनेक देशांसह खुद्द सोव्हिएत युनियनमध्ये त्याचे १९९० च्या दशकापर्यंत उत्पादन होत होते. चीनने या रणगाड्यांची टाइप-६९ नावाने आवृत्ती तयार केली. हीच आवृत्ती चीनने पाकिस्तानला विकली. २०१० मध्ये तिला रंगरंगोटी करुन पाकिस्तानने तिला अल्झरा नाव दिले. अल्झरा टी-५५ रणगाड्याचीच आवृत्ती आहे.
अरब देश आणि इस्रायलमधील १९६७ चे ‘सिक्स डे वॉर’ आणि १९७३ चे योम किप्पूर युद्ध यात टी-५४/५५ रणगाडय़ांचा भरपूर वापर झाला. इस्रायलने युद्धात अरब देशांकडून १००० हून अधिक टी-५४/५५ रणगाडे काबीज केले आणि त्यांच्या सैन्यात वापरले. इस्रायलने या रणगाड्यांवरील रशियन १०० मिमीची तोफ बदलून १०५ मिमीची तोफ बसवली आणि रशियन इंजिन बदलून जनरल मोटर्स कंपनीचे डिझेल इंजिन बसवले. इस्रायलने या रणागाड्यांना ‘तिरान-५’ असे नाव दिले. टी-५४/५५ रणगाड्यांनी १९८० ते १९८८ दरम्यानचे इराण-इराक युद्ध, व्हिएतनाम युद्ध, युगोस्लाव्हियाच्या विघटनानंतरचे बाल्कन युद्ध अशा अनेक संघर्षांत महत्त्वाची भूमिका बजावली. भारताच्या ताफ्यातील टी-५४, टी-५५ या रणगाड्यांनी १९६४ ते १९८४ या तीन दशकांत पाकिस्तानी सैन्यदलात मोठी दहशत निर्माण केली होती.
१९७१ च्या तिसऱ्या भारत-पाकिस्तान युद्धात अलिबागचे सुपुत्र अरुणकुमार श्रीधर वैद्य यांनी मेजर जनरल म्हणून पहिल्या चिलखती दलाचे नेतृत्व केले. चक्रा, देहलरा आणि बसंतर येथे त्यांनी धैर्य, रणनेतृत्व दाखवून शत्रूला नामोहरम केले. त्यांच्या तुकडीने शत्रूच्या प्रदेशात २० कि.मी.पर्यंत मजल मारून शत्रूचे ६० रणगाडे नष्ट केले, त्यातील बहुतांश रणगाडे टी-५४ रणगाड्यांनी नष्ट केले होते. या युद्धात भारताने पाकिस्तानचा निर्णायक पराभव केला व बांगलादेशची निर्मिती केली. या युद्धातील अरुणकुमार वैद्य यांच्या कुशल रणनीतीबद्दल भारत सरकारने त्यांना दुसऱ्यांदा महावीरचक्र प्रदान केले. त्यापूर्वी १९६५ च्या भारत-पाकिस्तान युद्धात केलेल्या पराक्रमाबद्दल त्यांना परमवीरचक्र मिळाले होते. दोनदा महावीरचक्र मिळविणारे अरुणकुमार वैद्य हे एकमेव सेनाधिकारी आहेत आणि ते अलिबागचे सुपुत्र होते, त्यांच्या कार्यकाळातील रणगाडा अलिबागेत स्थापन होणे हीदेखील अभिमानाची बाब आहे.
भारतीय सैन्यदलात तब्बल ४७ वर्षे सेवा बजावून निवृत्त झाल्यानंतर टी-५५ रणगाडे देशातील विविध राज्यांत प्रेरणास्रोत म्हणून स्थापित करण्यात आले आहेत. महाराष्ट्रात, कोकणातही टी-५५ रणगाडे स्थापन करण्यात आले आहेत. कोकणामधील रायगड जिल्ह्यातील अलिबाग येथेही टी-५५ रणगाडा समुद्र किनारी कुलाबा किल्ल्यासमोर चौथरा बांधून उच्चासनी स्थापन करण्यात आल्याने अलिबागच्या कीर्तीत, सौंदर्यात भर पडली आहे. अलिबाग एकेकाळी नारळी-पोफळींच्या वाड्यांनी समृद्ध असे गाव होते, जिल्ह्याची राजधानी म्हणून स्वत:त काळानुरुप बदल घडवत अलिबाग आता आधुनिक शहर बनले आहे. अलिबागच्या विकासाचा, सौंदर्याचा ध्यास घेतलेल नगराध्यक्ष प्रशांत नाईक यांच्या नेतृत्वाखाली अलिबागचा समुद्र किनारा देखणा झाला. आता तेथे भीमपराक्रम करणारा टी-५५ रणगाडा स्थापन करण्यात आला आहे. या रणगाड्यामुळे १९७१ च्या भारत-पाकिस्तान युद्धाचे आणि भारताचे माजी लष्करप्रमुख अरुणकुमार वैद्य यांचे स्मरण होणार आहे. या स्मरणगाथेने पर्यटकांच्या अंगावर रोमांच उभे राहणार आहे, तर तरुण पिढीला लष्करात सेवा बजावण्यासाठी प्रेरणा मिळणार आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा