मंगळवार, ५ डिसेंबर, २०१७

पत्रकारांचा मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गासाठी पुन्हा एल्गार

-उमाजी म. केळुसकर ⬑ दादागिरी ⬉


        यंदाच्या पावसाळ्यात राज्य सरकारच्या अखत्यारीत असलेल्या, आधीच खड्ड्यांनी चाळण झालेल्या राज्यातील रस्त्यांची अधिकच चाळण होऊन त्यांची ख़ोल विवरे बनली. हेे खड्डे येत्या १५ डिसेंबरपर्यंत कोणत्याही परिस्थितीत बुजविणारच, असा ठाम दावा एक महिन्यापूर्वी सार्वजनिक बांधकाममंत्री चंद्रकांत पाटील यांनी केला, पण  आज ५ डिसेंबर उजाडला असला तरी रायगड जिल्ह्यातील खड्डेमय रस्ते तसेच आहेत. नाही म्हणायला जिल्ह्यातील काही रस्त्यांच्या निविदा निघाल्या आहेत आणि काही रस्त्यांची कामे सुरु आहेत, पण चंद्रकांत पाटील यांनी सांगितल्याप्रमाणे हे रस्ते १० वर्षे टिकणार आहेत का? की पुन्हा पुढच्या वर्षी हे रस्ते उधळले गेले की त्याचे खापर पावसावर फोडून आपली नामुष्की लपवणार? हा मोठा प्रश्‍न उपस्थित होतो. जिल्ह्याचे पालकमंत्री प्रकाश महेता यांना रस्त्यांच्या दूरवस्थेचे, जनतेच्या त्रासाचे काही पडले नाही. त्यांना जिल्हा नियोजन बैठकी व्यतिरिक्त जिल्ह्यात ङ्गिरायला वेळ नाही. चौपदरीकरणाचे काम सुरु असलेल्या मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण आणि ठेकेदार कंपनी यांच्या हलगर्जीपणामुळे महामार्गाची दूरवस्था झाली आहे. तथापि केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी येत्या २०१८ च्या डिसेंबरपर्यंत मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गाचा पळस्पे ते इंदापूरदरम्यानचा मार्ग पूर्ण करणार असे नवीन सावित्री पुलाच्या उद्घाटनप्रंसगी जाहीर केले आहे, या कामाचा वेग पहाता हा राष्ट्रीय महामार्ग चौपदरी व्हायला आणखी दहा वर्षे लागतील असेच चित्र दिसते आहे. चौपदरीकरणाचे हे रखडलेले काम व या महामार्गाची खड्ड्यांमुळे झालेली दूरवस्था याकडे शासनाचे लक्ष जावे यासाठी कोकणातील पत्रकार पुन्हा रस्त्यावर उतरुन सनदशीररित्या आंदोलन करणार आहेत. त्यानिमित्त जिल्ह्यातील सर्वच रस्त्यांच्या दूरवस्थेबाबत केलेला हा उहापोह. 
      राज्यात राष्ट्रीय महामार्ग, मुख्य राज्य महामार्ग, राज्य महामार्ग आणि जिल्ह्यांना जोडणारे मार्ग, अशा चार प्रकारच्या रस्त्यांचा समावेश आहे. राष्ट्रीय महामार्ग हे केंद्र सरकारच्या अखत्यारीत येत असल्याने त्यांच्यावरील खड्डे बुजविण्याची जबाबदारी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकारणावर आहे. राज्यातील एकूण रस्त्यांपैकी यंदा ६५ टक्के रस्त्यांची चाळण झाली आहे. पावसाळ्यात राज्यातील रस्त्यांची भीषण दूरवस्था झाल्याने या विषयी राज्य सरकारवर सातत्याने टीका होत आहे. त्यामुळे सार्वजनिक बांधकाम विभागाने खड्डे बुजविण्याची मोहीम हाती घेतली आहे. खड्डे बुजविण्याचा कार्यक्रम युद्धपातळीवर सुरू असला तरी गेल्या महिन्याभरात ४२ टक्के काम पूर्ण झाले आहे. या पार्श्वभूमीवर चंद्रकांत पाटील यांनी उर्वरित ५८ टक्के काम १५ डिसेंबरपर्यंत पूर्ण होऊन राज्यातील रस्ते खड्डे मुक्त होतील, असे जाहीर केले असले तरी रायगड जिल्ह्यातील रस्त्यांना पडलेले खड्ड्यांचे कोड दूर होण्याची चिन्हे दिसत नाही. कारण १५ डिसेंबर १० दिवसांवर येऊन ठेपला आहे.
      रायगड जिल्ह्याला लागलेले खड्ड्यांचे ग्रहण आजचे नाही. कॉंग्रेस-राष्ट्रवादी आघाडी सरकार असो वा भाजप-शिवसेना युती युती सरकार असो, जिल्ह्याला चांगले रस्ते मिळाले नाहीत. जिल्ह्यातील पत्रकारांच्या सततच्या आंदोलनामुळे, पाठपुराव्यामुळे मंजुर झालेले मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गाचे चौपदरीकरण अजूनही आंधळीकोशिंबीरच बनले आहे. त्यातही या महामार्गाला पडलेल्या खड्ड्यांमुळे आधीपासून सुरु असलेल्या अपघाताच्या घटनांत अधिकच वाढ झाली. त्या मार्गावरील धुळीमुळे त्यावरुन वाहतूक करणार्‍यांच्या आरोग्याचाही प्रश्‍न निर्माण झाला. पण याचे कोणालाच देणे-घेणे नाही.  कोकणचा कॅलिफोर्निया करण्याचे स्वप्न हवेत विरले असले, तरी औद्योगिक रायगडला साजेसेही या जिल्ह्यामध्ये रस्ते नाहीत. रायगड जिल्हा पर्यटनाच्या बाबतीत अग्रेसर आहे, पण रस्त्यांच्या बाबतीत मागास आहे. जिल्ह्यात रस्तोरस्ती खड्ड्यांचे साम्राज्य पसरले आहे. तेथेही अपघात होत आहेत. वाहने आणि पादचार्‍यांना या खड्ड्यांतून कसरत करीत मार्गक्रमण करावे लागते आहे. आधी या रस्त्यांवर पडलेले खड्डे बुुरुम टाकून बुजविल्यामुळे हे रस्ते धूळ भरलेल्या खड्ड्यांचे झाले आहेत. त्यामुळे हे खड्डे योग्यप्रकारे बुंजवले पाहिजेत. ही रस्त्यांवरील खड्ड्यांची मॅरेथॉन संपवली नाही तर ‘भाग, मिल्खा, भाग’ ऐवजी ‘भाग, रायगडकर, भाग’ या शीर्षकाचा खड्ड्यांच्या मॅरेथॉनवरील रायगडकरांच्या पराक्रमाबाबत चित्रपट काढावा लागेल. अर्थात यातील उपहास, विनोद याच्याकडे दुर्लक्ष केले तर खड्ड्यांचा प्रश्‍न जिल्ह्यासाठी किती भयानक आहे, हे लक्षात येईल. 
     या रस्त्यांचे वैगुण्य असलेले खड्डे चेहर्‍यावर प्लॉस्टिक सर्जरी करावी, त्याप्रमाणे वेळीच बुंजवले असते, तर जिल्ह्यातील समस्त जनतेने सुटकेचा श्‍वास सोडला असता. सध्या सिंदबादच्या म्हातार्‍याप्रमाणे हे खड्डे रायगडकरांच्या मानगुटीवर बसले आहेत आणि त्याने रायगडकर हैराण झाले आहेत. एकवेळ राजा विक्रमाच्या पाठीवर बसलेला वेताळ परवडला, तो राजाला गोष्ट ऐकवून, त्यांचे उत्तर घेतल्यानंतर निघून तरी जातो, पण सिंदबादच्या मानगुटीवर बसलेला म्हातारा निघून जाण्याचे नाव घेत नाही, तशी जिल्ह्यातील खड्ड्यांची अवस्था झाली आहे. हे खड्डे नाहीसे होण्याची चिन्हे दिसत नाहीत, उलट रस्तेच नाहीसे होऊ लागले आहेत. स्थानिक नेत्यांना या खड्ड्यांचे दुखणे का दिसत नाहीत. त्यांना हे खड्डे का खुपत नाहीत, त्यांना या खड्ड्यांचा का त्रास होत नाही, याची उत्तरे या स्थानिक नेत्यांनाच जरी माहित असली तरी आपण लोकप्रतिनिधी असल्यामुळे तारतम्याची भूमिका बजावणे आवश्यक आहे ही गोष्ट त्यांनी लक्षात घेतली पाहिजे. मुळात हल्ली रस्ते टिकू नये याची प्रमुख काळजी घेतली जाते. पहिल्या पावसात रस्त्यांचे वस्त्रहरण होऊन खड्डे कसे पडतील आणि पुन्हा त्या रस्त्याचे कंत्राट आपल्याला कसे मिळेल हे पाहिले जाते आणि मुख्यतः ही कंत्राटे स्थानिक राजकीय नेत्यांचीच असतात, त्यामुळे त्यांना कधीही हे रस्ते खुपत नाहीत. रस्त्याच्या कामात मोठ्या प्रमाणात नङ्गा मिळवणे हाच मुख्य उद्देश असल्याने रस्त्याचे काम करीत असताना तांत्रिक बाबींचे पालन होत नाही. तज्ज्ञांच्या मतानुसार रस्ते तयार करताना डांबर आणि खडीचे योग्य मिश्रण नसेल, तर रस्ते खराब होऊ शकतात. ब्रिटिशकालीन कंपन्या शंभर वर्षांची खात्री देऊन रस्ते, पुलांची बांधणी करीत होते. तेवढ्या कालावधीपर्यंत त्या बांधकामांनी टिकाव धरल्याचे आपल्या आसपासच्या उदाहरणांवरुन आपल्याला पहायला मिळाले आहे. मात्र सध्याच्या बांधकाम विभागाचे कंत्राटदारांवर नियंत्रण नसल्याने, तसेच रस्ते पाहणी समितीचेही दुर्लक्ष होत असल्याने राष्ट्रीय महामार्ग, राज्य महामार्ग तसेच जिल्ह्यातील गावोगावचे रस्ते दूरवस्थेच्या विळख्यात सापडले आहेत.
      दरवर्षी पावसाळ्यात रस्त्यांच्या दुरुस्तीवर कोट्यवधी रुपये खर्च केले जातात, परंतु रस्त्यांची सुधारणा होत नाही. रस्ते खराब होण्याची अनेक कारणे आहेत. भ्रष्टाचारामुळे खराब साहित्याचा वापर केला जाणे, डांबर, खडी, यांचे थर नीट टाकले न जाणे, ६४० एमएमचे रस्ते करण्याची गरज असताना ङ्गक्त २० ते २२ एमएमचे रस्ते केले जाणे, क्षमतेपेक्षा जादा वजनाची वाहतूक, खड्डे तंत्रशुद्ध पद्धतीने भरले न जाणे, मांडवांसाठी, जलवाहिनीसाठी रस्ते खोदले जाणे, ही देखील रस्ते खराब होण्याची कारणे आहेत. त्यावरही विचार होणे आवश्यक आहे. रस्त्यांच्या विकासाची जबाबदारी शासनाच्या सार्वजनिक बांधकाम खात्यासोबतच राज्य रस्ते विकास महामंडळाकडे आहे. त्याचबरोबर केंद्र शासनाच्या पंतप्रधान ग्रामसडक योजनेअंतर्गत देखील रस्त्यांची कामे केली जात आहेत. पण प्रत्यक्षात रस्ते त्या-त्या गावांशी जुळले गेेले आहेत का? रस्त्यांचे डांबरीकरण, मजबुतीकरण झाले आहे का? हा प्रश्‍न आपल्या जिल्ह्यातच नव्हे, तर राज्यात उपस्थित झाला आहे. 
      वास्तविक रस्त्यांत खड्डे होतात कसे? अशा निकृष्ट रस्ते बांधणी करणार्‍यांवर पालकमंत्र्यांनी खटले भरणे आवश्यक आहे. पण ते आधीच्या पालकमंत्र्यांनी केले नाही आणि आताच्या पालकमंत्र्यांनीही केलेले नाही. अशा खराब बांधकाम करणार्‍यांवर त्यांनी अजामीन पात्र गुन्हे दाखल केले पाहिजेत. प्रशासन स्वच्छ करा, मग बघा रस्ते कसे चांगले तयार होतात की नाही ते. आज टेंडरच्या किमतीपैकी ४० टक्के लाच देण्यात ठेकेदार खर्च करतात. २० टक्के त्याचा ङ्गायदा. बांधकामावर ङ्गक्त ४० टक्के खर्च होतात. मग रस्त्यावर ४० टक्के लाचेचे खड्डे पडतात, हे काय या राजकारण्यांना माहीत नाही. हे ठेकेही राजकारणी नाहीतर त्यांच्या हस्तकाचे असतात. अमेरिका विकसित आहे, म्हणून तेथील रस्ते चांगले आहेत असे नव्हे; तर चांगल्या रस्त्यांमुळे अमेरिकेचा विकास झाला, हे खुद्द अमेरिकन अध्यक्षांचे मत आहे. भारतात हा दृष्टीकोन दिसत नाही, हे दुर्दैवाचे आहे. पण पालकमंत्री या नात्याने तरी प्रकाश महेता यांनी रायगड जिल्ह्याच्या विकासासाठी येथील रस्त्यांच्या मजबुतीकडे लक्ष दिले पाहिजे. शेवटी राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्रीपद त्यांच्याच पक्षाकडे आहे. दुर्दैवाने त्यांना रायगड हे ओझं वाटत आहे, ते ओझं ते स्वत: उतरवून टाकत नाहीत, की श्रेष्ठी हे ओझं उतरवत नाहीत. पण यात रायगडचा विकास रखडला आहे. त्यामुळेच येथील जनतेला रस्त्यांसाठी आंदोलन करावे लागत आहे, तर कोकणातील पत्रकारांना मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गाच्या रखडलेल्या चौपदरीकरणासाठी गेली ९ वर्षे आंदोलन करावी लागताहेत. त्यांच्याच आंदोलनामुळे २०१२ साली साली हे चौपदरीकरण मंजुर झाले. पण मुंगीच्या गतीने चाललेल्या आणि रखडलेल्या कामामुळे या महामार्गावरील अपघातांची चौकट मोडायला तयार नाही. त्यामुळे पत्रकारांना पुन्हा पुन्हा एल्गार करावाच लागतो आहे. इतकेच.


मंगळवार, २८ नोव्हेंबर, २०१७

घारापुरीची अंधाराच्या कारावासातून मुक्तता होणार, पण...

  -उमाजी म. केळुसकर ⬑ रायगडचा डंका ⬉


        जागतिक पर्यटनस्थळ म्हणून ओळखल्या जाणार्‍या, युनेस्कोने जागतिक ठेवा म्हणून घोषित केलेल्या घारापुरी बेटाला दरवर्षी १०-१२ लाखांहून अधिक देशी-परदेशी पर्यटक भेट देतात. पर्यटनातून देशाला लाखो रुपयांचे परदेशी चलन मिळवून देणारे घारापुरी मात्र स्वातंत्र्य मिळाल्यापासून गेली ७० वर्षे कायमस्वरुपी विजेपासून वंचित राहिले आहे. घारापुरी बेटाला सभोवार जेएनपीटी, बुचर आयलँड, चेंबूर रिङ्गायनरी, भाभा अणुशक्ती केंद्र, नौदल असे विविध शासकीय प्रकल्प ८५० मीटरपासून पाच किमी अंतरापर्यंत आहेत. या प्रकल्पांवर रात्री विजेचा झगमगाट असताना घारापुरी बेटावरील तीन गावे मात्र अंधारात चाचपडत राहिली आहेत. नाही म्हणायला तेथे महाराष्ट्र पर्यटन विभागाकडून गेले काही वर्षे जनरेटरद्वारे वीज पुरवठा केला जातो. पण तोही गेले महिनाभर जनरेटरमध्ये बिघाड झाल्याने बंद आहे, याकडे कोणीही गांभीर्याने पहायला तयार नाही. रायगडच्या पालकमंत्र्यांना जिल्ह्यात घारापुरी नावाचे बेट आहे, त्यावरील तीन गावातील नागरिकांच्या जगणे अंधाराच्या काळडोहाचा एक भाग बनले आहे, हे माहीत  नसेल, पण त्यांचे सरकार मात्र या बेटाबाबत सजग आहे. ऊर्जामत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी मनावर घेतल्याने हे बेट विजेच्या प्रकाशाने लखलखणार आहे. पण याला विलंब होत आहे. या विलंबाची कारणे दूर करुन राज्य सरकारने तेथील जनजीवनाला प्रकाशाचे दान दिले, तर तेथील जनतेची निश्‍चितच अंधाराच्या कारावासातून शाश्‍वत सुटका होईल. 
        मुंबईच्या सागरी किनार्‍यावरून म्हणजेच गेट वे ऑफ इंडियापासून नऊ सागरी मैलांवर असणारं घारापुरी हे ठिकाण प्राचीन लेण्यांसाठी प्रसिद्ध आहे. अभिजात कलाकृतींचा उत्तम नमुना म्हणजे या घरापुरीच्या लेण्या. वेरूळच्या तुलनेत यांची संख्या कमी असली तरी कलेच्या दृष्टीने त्यांची गुणवत्ता तेवढीच आहे. पोर्तुगीजांनी या प्रदेशाचा ताबा घेतल्यानंतर येथे असलेल्या विशाल हत्तीशिल्पांमुळे त्याला इल्हा द एलिफंट असं नाव दिलं आहे. हे ठिकाण मुंबईपासून जवळ असलं तरीही सीमारेषेच्या दृष्टीने ते रायगड जिल्ह्यातील उरण तालुक्यात आहे आणि दुर्दैवाची गोष्ट म्हणजे या बेटाच्या नशिबी अंधाराचा कारावास पूर्वीपासून आहे. या जगप्रसिद्ध घारापुरी बेटवासीयांना प्रतीक्षा आहे ती कायमस्वरूपी विजेची. पण स्वातंत्र्य मिळून ७० वर्षे उलटली तरी परिस्थितीत काहीही बदल झाला नाही. यातून या जिल्ह्याचे आतापर्यंतचे खासदार, आमदार, पालकमंत्री यांचा या बेटाबातचा उदासिन दृष्टीकोन दिसून आला. कायमस्वरूपी वीज मिळावी यासाठी तेथील ग्रामपंचायत, ग्रामस्थांचे आटोकाट प्रयत्न सुरू राहिले तरी सरकारी दरबारी अद्याप तरी फारशी दखल घेतली न गेल्यानेे १९९७-९८  पासून महाराष्ट्र पर्यटन विभागाकडून जनरेटरद्वारे मिळणार्‍या अपुर्‍या साडेतीन तासांच्या वीजपुरवठ्यानंतरही बेटवासीयांचा प्रवास पुन्हा अंधाराकडेच होत राहिला, ही जिल्ह्याच्या दृष्टीने अतिशय लाजीरवाणी बाब ठरली आहे. ही अंधार यात्रा गेल्या महिन्यात जनरेटरमध्ये बिघाड झाल्याने आणि त्याच्या दुरुस्तीबाबत गांभीर्याने पावले उचलली न गेल्यामुळे अधिक ठळक झाली आहे. 
         कोरीव अद्भुत लेण्यांमुळे घारापुरीचे बेट जागतिक नकाशावर झळकत आहे. या बेटावर शेतबंदर, मोराबंदर, राजबंदर अशी तीन गावे आहेत. या तिन्ही गावांचे मिळून लोकसंख्या १२०० च्या आसपास आहे. शैक्षणिक, आरोग्य आणि विकासाच्या दृष्टिकोनातून कोसो दूर असलेल्या बेटावर कायमस्वरूपी वीज नसल्यामुळे गेल्या दोन दशकात सरकारांकडून केल्या जाणार्‍या विकासाच्या आणि पर्यटनवाढीच्या गप्पा, या बाजार गप्पा होत्या हे दिसून आले. मधल्या काळात शरद पवार, सुधाकरराव नाईक, विलासराव देशमुख, विनय कोरे, सुनील तटकरे आदी तत्कालीन मंत्र्यांनी बेटाला कायमस्वरूपी वीजपुरवठा करण्याच्या घोषणा केल्या होत्या. कोरे यांनी तर विजेच्या लाटांवर वीज प्रकल्प उभारून बेटाला वीजपुरवठा करण्याची घोषणा केली होती, मात्र वेळोवेळी विविध मंत्र्यांनी केलेल्या घोषणा हवेतच विरल्या. त्यामुळे या  आमदार, खासदार, मंत्र्यांमध्ये घारापुरी बेटावर कायमस्वरुपी वीज आणण्यासाठी काहीच पॉवर नाही काय? असा प्रश्‍न उपस्थित झाला. नाही म्हणायला तेथील मोराबंदर गावासाठी तत्कालिन सरकारने सुमारे साडेपाच कोटी रुपये खर्च करुन वीजपुरवठा करण्यासाठी सौरऊर्जा प्रकल्पाचीही उभारणी केली होती. मात्र हा प्रकल्प अल्पजीवी ठरला. त्यामुळे मोरा बंदरगाव आजतागायत अंधारातच आहे. तर राजबंदर व शेतबंदर  या दोन गावांना वीज पुरवठा करणार्‍या दोन जनरेटरपैकी १६० केव्ही क्षमतेचे जनरेटर २९ ऑक्टोबरपासून बंद पडल्यामुळे गेल्या २८ दिवसांपासून १०० केवी विद्युतक्षमतेच्या जनरेटरवरुन सदर दोन गावांना आलटून पालटून वीजपुरवठा केला जात आहे, त्यामुळे ही दोन गावेही अंधारातच चाचपडत आहेत. मुळात स्वातंत्र्यापासून आतापर्यंत एखादी आदिवासी वाडी, एखादं गाव, एखाद रहिवासी बेट विजेपासून वंचित असणे ही शोभादायक बाब नाही. ज्या गोष्टी सनदशीरपणे योग्य वेळी व्हायला हव्यात, त्या गोष्टी तेव्हा झाल्याच पाहिजेत. त्या होत नव्हत्या याचे कारण तत्कालिन शासनाची, नोकरशाही आणि लोकप्रतिनिधींची उदासिनता हेच होते. घारापुरी बेट तर जागतिक पातळीवर ओळखले जाणारे ठिकाण आहे. जागतिक पातळीवरील पर्यटकांचा येथे राबता असतो. ते जाताना घारपुरीच्या अभिजात कलाकृती आणि अंधाराच्या आठवणी घेवून जातात. पण येथे जीवंत गावे आहेत, त्या गावांचा मात्र कोणालाच मागमूस नाही, त्यांची दु:ख कोणाला ठाऊक नाही, तेथील पाण्याचं दुर्भीक्ष, तेथे आरोग्य सुविधांचा अभाव, तेथे माणसं जगताहेत कशी याचे कोणाला काही पडले नाही, हेच चित्र आतापर्यंत होते. घारापुरी बेट हे काही आङ्ग्रिकेत नाही, याचे भान जिल्हा प्रशासनानेही ठेवून आपल्यापरीने पुढाकार घेवून घारापुरीवासियांचा विजेचा प्रश्‍न धसास लावायला हवा होता, पण जिल्हा प्रशासनाने कधीही त्यासाठी प्रयत्न केल्याचे दिसून आले नाही.
     राज्यात कॉंग्रेसचे, शिवसेना-भाजप युतीचे, राष्ट्रवादी कॉंग्रेस-कॉंग्रेस आघाडीचे सरकार असताना घारापुरीचा अंधार दूर करण्याची संधी होती, पण त्यांनी ती घेतली नाही. विद्यमान भाजप सरकारने घारापुरीचा विकास करण्याचा आणि घारापुरीमध्ये वीज आणण्याचा विडा उचलला आहे. त्याचे सुतोवाच राज्याचे ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची रायगड जिल्ह्याच्या राजधानीत अलिबाग येथे येऊन ४ डिसेंबर २०१५ रोजी केले. तेव्हा त्यांनी सहा महिन्यात हे बेट दिव्यांनी उजळेल अशी ग्वाही दिली. भाजपने अर्थसंकल्पात घारापुरीच्या विकासासाठी ७५ कोटी रुपयांची तरतूद आपल्या अर्थसंकल्पात केलीे. यामध्ये वीजपुरवठ्यासाठी २४ कोटी रुपयांची तरतूद केली. पण दुर्दैवाने हे काम सहा महिन्यात काय, २०१६ व २०१७ मध्येही झाले नाही. महावितरणमार्फत न्हावा येथील टी.एस. रेहमान या सबस्टेशनमधून चारही बाजूने समुद्राने वेढलेल्या या बेटास ‘मरीन केबल’द्वारे (समुद्राखालून) वीज पुरवण्यात येणार आहे. या करिता समुद्राखालून सात किमी लांबीच्या चार वीज वाहिन्या टाकण्यात येत आहेत. या वीज वाहिन्यांतून २२ केव्हीचा वीज पुरवठा घारापुरी बेटास करण्यात येणार आहे. या परिसरात वीज यंत्रणेचे जाळे टाकण्याचे ९० टक्के काम पूर्ण करण्यात आले आहे; परंतु वन विभागाच्या क्षेत्रातील कामासाठी वन विभागाने हरकत घेतली असल्यामुळे या ठिकाणी विजेचे काम अपूर्ण राहिले. वन विभागाकडून ना हरकत प्रमाणपत्र (एनओसी) मिळाल्यानंतर काही दिवसांमध्ये हे काम पूर्ण होईल, असे महावितरणचे म्हणणे आहे. याचा अर्थ निदान २०१८ मध्ये घारापुरी बेटाची अंधाराच्या कारावासातून सुटका होणार आहे आणि तेथे विकासाची किरणे झिरपणार आहेत. पण त्यापूर्वी जो जनरेटरने तेथे वीज पुरवठा होतो आहे, तो सुरळीत राहावा या दृष्टीने जनरेटरची तब्बेत सुधारणे आवश्यक आहे. तसेच या बेटावर वीज येण्याआधीपासूनच श्रेयाची लढाई सुरु होणार आहे. सरकार म्हणून भाजपला त्याचे श्रेय द्यायलाच हवे. खरे तर तेथे वीज आणणे प्रत्येक सरकारांचे कर्तव्य होते, ते कर्तव्य यापूर्वीच्या सरकारांनी बजावले नाही. भाजप सरकारने बजावले आहे. आता व्यक्तीगत पातळीवर हे श्रेय घेण्याचा कोणी हास्यास्पद प्रयत्न करुन नये. ते योग्यही होणार नाही. इतकेच.

शनिवार, २५ नोव्हेंबर, २०१७

ग्रंथोत्सवाचा शासकीय तमाशा फ्लॉप

-उमाजी म. केळुसकर ⬑ दादागिरी ⬉


         मराठी भाषा, मराठी साहित्य याविषयी शासन फार काही सकारात्मक करते आहे, असे पूर्वीपासून दाखवले जात आहे. परंतु याबाबतची केवळ औपचारिकताच पार पाडली जात असल्याने महाराष्ट्रात मराठी दीनवाणी आहे आणि मराठी ग्रंथचळवळ प्रश्‍नांकीत बनली आहे. म्हणूनच राज्यात जिल्हा ग्रंथोत्सव चटावरचे श्राद्ध ज्याप्रमाणे उरकले जाते, त्यापद्धतीने उरकले जात आहेत. त्यामुळे हे ग्रंथोत्सव लोकोत्सव ठरु शकलेले नाही. रायगड जिल्ह्यात तर अलिबागेत जेएसएम कॉलेजच्या जयंतराव केळुसकर सभागृहात आयोजित करण्यात आलेल्या २०१७ च्या जिल्हा ग्रंथोत्सवात कल्पनादारिद्ˆयाचेच प्रदर्शन पहायला मिळाले. या ग्रंथोत्सवात ज्येष्ठ कवी अशोक नायगावकर सोडता कोणताही बाहेरचा वा जिल्ह्यातला कवी, साहित्यिक पहायला मिळाला नाही की ग्रंथचळवळ वाहून नेणार्‍या वाचकांचा मेळा तेथे सळसळताना दिसला नाही. उदास बुकस्टॉल, उदास वातावरण अशी या ग्रंथोत्सवाची साठा उत्तराची कहाणी ठरली.
        ग्रामीण व शहरी भागातील लोकांमध्ये वाचनसंस्कृतीची वाढ व्हावी या हेतूने राज्य सरकारच्या ‘सांस्कृतिक धोरण २०१०’ नुसार प्रत्येक जिल्ह्यात २०११ पासून ग्रंथोत्सवाचे आयोजन करण्यात येते. ग्रंथप्रेमींना एकाच ठिकाणी विविध ग्रंथ प्राप्त व्हावेत, प्रकाशक व ग्रंथविक्रेता यांना ग्रंथविक्रीसाठी एकाच ठिकाणी आवश्यक ती सुविधा उपलब्ध व्हावी, साहित्यिक, कवी यांना व्यासपीठ मिळावे हा ग्रंथोत्सव आयोजनाचा मुख्य उद्देश आहे. ग्रंथोत्सव यापूर्वी महाराष्ट्र राज्य साहित्य व संस्कृती मंडळ, माहिती व जनसंपर्क महासंचालनालय यांच्या सहकार्याने, जिल्हा माहिती कार्यालयांच्या वतीने राबविण्यात येत होता. परंतु ग्रंथोत्सवाची योग्य अंमलबजावणी होत नसल्याच्या कारणावरुन २०१६ पासून हा ग्रंथोत्सव उच्च व तंत्र शिक्षण विभागाकडे हस्तांतरीत करण्यात आला आणि त्याची अंमलबाजवणी जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालयामार्फत होऊ लागली आहे. या दोन्ही परिवर्तनादरम्यान ग्रंथोत्सव समितीच्या अध्यक्षस्थानी जिल्हाधिकारीच आहेत. पण आता जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालयांकडे ग्रंथोत्सव येऊनही ते ग्रंथोत्सव घेण्यात कुचकामी ठरत असल्याचे दिसून येते आहे.
         आपल्या रायगड जिल्ह्याचंच उदाहरण पुरेसं आहे. रायगड जिल्ह्यात पहिला ग्रंथोत्सव  २०११ साली १८,१९, २० डिसेंबर रोजी महाराष्ट्र राज्य साहित्य व संस्कृती मंडळ, माहिती व जनसंपर्क महासंचालनालय यांच्या सहकार्याने, रायगड जिल्हा माहिती कार्यालयाच्या वतीने अलिबाग येथील जा.र.ह कन्याशाळेच्या सभागृहात आयोजित करण्यात आला होता. तत्कालिन जिल्हाधिकारी विजय पवार व कर्मचारीवर्गाने चांगली मेहनत घेऊन तो यशस्वी केला. त्यासाठी महाराष्ट्रातील चांगले साहित्यिक, कवी तर आलेच, पण स्थानिक कवी, साहित्यिक, पत्रकार यांना व्यासपीठ दिले गेले. या संयोजनासाठी त्यांनी विविध संघटनांचे सहकार्य घेतले. त्यानंतर प्रभारी जिल्हा माहिती अधिकारी सुहास नेवासकर यांच्या कारकीर्दीत रोहा, पनवेल येथे ग्रंथोत्सव आयोजित करण्यात आले. पण तेव्हापासून या ग्रंथोत्सवास घसरण लागली, कारण ग्रंथोत्सवाची औपचारिकता पार पाडली जावू लागली होती. त्यात साहित्यिकांपेक्षा राजकारण्यांना महत्व आले. २०१५ साली जिल्हा माहिती अधिकारी राजू पाटोडकर यांच्या कारकीर्दीत त्यांनी स्थानिक उद्योगांचा प्रायोजत्वाखाली डोंगरे हॉलच्या आवारात झालेल्या ग्रंथोत्सवाला भव्यता आणायचा प्रयत्न केला. त्यांनी ग्रंथदिडीत चक्क टीव्ही स्टार आणून गर्दी खेचण्याचा प्रयत्न केला, पण या प्रयत्नात प्रेक्षक मिळाला आणि वाचक हरवला अशी परिस्थिती झाली. त्यानंतर २०१६ साली जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालयाकडे ग्रंथोत्सवाचे आयोजन गेल्यावर जिल्ह्यातील या ग्रंथोत्सवाची अधोगती सुरु झाली. जिल्हा ग्रंथालय अधिकारी प्रतिभा ताटे यांनी २७,२८,२९ जानेवारी रोजी डोंगरे हॉलच्या आवारात आयोजित केलेल्या ग्रंथोत्सवाच्या निमित्ताने जिल्ह्यातील साहित्यिक,  ग्रंथरसिक, तसेच विविध साहित्य संघटनांना विचारात न घेण्याची मनमानी सुरु केली. हे मनमानीचे सूत्र त्यांनी नवे जिल्हा ग्रंथालय अधिकारी ध.बा. वळवी यांच्याकडे दिले असावे. त्यामुळे २०१७ च्या २२ व २३ नोव्हेंबर रोजी झालेल्या ग्रंथोत्सवात साहित्यिक, कवी यांच्यापेक्षा प्रशासकीय अधिकारी आणि मोजक्या पत्रकारांना उजवे माप दिले गेले आणि या आयोजनात जिल्ह्यातील पत्रकारांना, साहित्यिक, कवींना, साहित्यसंस्थाना (कोमसाप वगळता), सामाजिक-सांस्कृतिक संस्था आणि अगदी वाचकांनासुद्धा विश्‍वासात घेतले गेले नाही. या सर्व प्रक्रियेत ग्रंथोत्सव समितीचे अध्यक्ष जिल्हाधिकारी विजय सूर्यवंशी यांची ‘याला घ्या, त्याला घ्या, हा नको, तो नको’ असे सांगून संबंधितांनी दिशाभूल केली असावी. पण त्याचा परिणाम या ग्रंथोत्सवावर झाला आणि हा ग्रंथोत्सव अपयशी ठरला.
        ग्रंथोत्सवाचे उद्घाटन २२ नोव्हेंबर रोजी रायगड जिल्ह्याचे पालकमंत्री प्रकाश महेता यांच्या हस्ते होणार होते. उद्घाटक म्हणून त्यांचे नाव समोर आल्यावर त्यांचे रायगड जिल्ह्यावरील प्रेम पहाता ते येणार नाही, हे ठरलेलेच होते. त्यामुळे त्यांची अनुपस्थिती हा काही आश्‍चर्याचा भाग नव्हता. पण रायगडचे दोन्ही खासदार, सर्व आमदारांनी या ग्रंथोत्सवाकडे पाठ फिरवली.  राजकारण्यांच्या या भाऊगर्दीत भिंगाने शोधता येणारे एकच कवी, साहित्यिकाचे नाव होते, ते म्हणजे अशोक नायगावकर यांचे. तेच विशेष निमंत्रित पाहुणे होते आणि त्यांच्याच हस्ते योगायोगाने या संमेलनाचे उद्घाटन झाले, ही त्यातल्या त्यात समाधानकारक गोष्ट झाली.  उद्घाटनापूर्वी ग्रंथदिंडीचा सोपस्कार पार पाडण्यात आला. या दिंडीत नायगावकरांशिवाय कोणी कवी वा साहित्यिक नव्हता, किवा रसिक वाचकांचाही सहभाग नव्हता. केवळ विद्यार्थ्यांची गर्दी दाखवण्यात आली. या दिंडीत कवी, साहित्यिक म्हणून नायगावकर आणि अलिबागचे प्रथम नागरिक म्हणून नगराध्यक्ष प्रशांत नाईक उपस्थित राहिले, म्हणून या ग्रंथदिंडीची थोडीफार लाज राखली गेली. 
        या ग्रंथोत्सवात ‘माझे आवडते पुस्तक’ ही विद्यार्थ्यांसाठीची वकृत्वस्पर्धा, ज्येष्ठ कवी अशोक नायगावकर यांची ‘काव्य मिश्किली’, ‘ग्रंथांनी मला काय दिले?’ हा प्रशासकीय अधिकार्‍यांचा परिसंवाद,  ‘माध्यमे आणि वाचनसंस्कृती’  हा प्रशासनातील अधिकारी आणि पत्रकारांचा परिसंवाद आयोजित करण्यात आला होता. या परिसंवादामध्ये ग्रंथचळवळ वाहून नेणारे साहित्यिक सहभागी नसल्यामुळे आणि न विचारता परिसंवादात सहभागी केल्यामुळे काही पत्रकारांनी या परिसवादात भाग न घेणेच पसंत केले व जिल्ह्यातील पत्रकार, साहित्यिक, साहित्य संघटना यांना या ग्रंथोत्सवात सहभागी न केल्याबद्दल जिल्हा ग्रंथोत्सव समितीचा निषेध केला. या समितीचे अध्यक्ष जिल्हाधिकारीच असल्यामुळे हा निषेध त्यांच्यापर्यंत पोहचला. ज्येष्ठ कवी अशोक नायगावकर यांची ‘काव्य मिश्किली’ मूठभर रसिकांच्या उपस्थितीत मोठ्या प्रमाणात रिकाम्या खुर्च्यांच्या साक्षीने सादर झाली. त्यांनी आपल्या शैलीने उपस्थितांना भारावून सोडले, परंतु जर योग्य नियोजन झाले असते तर जिल्ह्यातील रसिकांना मोठ्याप्रमाणात याचा आस्वाद घेता आला असता. या रिकाम्या खुर्च्यांची गोष्ट माध्यमांत पसरल्यानंतर दुसर्‍या दिवशीच्या परिसंवादांत या खुर्च्या रिकाम्या दिसू नये म्हणून कॉलेजच्या विद्यार्थ्यांना वेठिस धरण्यात आले. त्यामुळे खुर्च्या तर भरलेल्या दिसल्या, परंतु खर्‍या रसिकांची डोकी तिथे दिसली नाहीत. समारोपाला तेही विद्यार्थी दिसले नाहीत, कारण हा समारंभ सायंकाळी होता, त्यामुळे बक्षीसपात्र विद्यार्थ्यांखेरीज मूठभर संयोजन समितीचीच माणसे तेव्हा उपस्थित होती. जिल्हाधिकारीही उपस्थित नव्हते. कोणत्याही साहित्यिकाच्या हस्ते येथे बक्षीस वितरण झाले नाही. हे अपयश ग्रंथोत्सव समितीचे आहे, पण आता ते या समितीच्या अध्यक्षांपासून ग्रंथालय अधिकार्‍यांपर्यंत कोणी मान्य करणार नाही.
         या ग्रथोत्सवातील पुस्तक प्रदर्शनातील चार-पाच पुस्तकांचे स्टॉल दोन दिवस वाचक आणि पुस्कप्रेमी नागरिकांची वाट पहात होते. या प्रदर्शनात पुस्तकांचे स्टॉल लावून आम्ही फसलो, अशीच स्टॉल मालकांची भावना होती. जिल्ह्यातले पुस्तकप्रेमी नागरिक सोडा, अगदी अलिबागचेही वाचनप्रिय नागरिक सोडा, या कॉलेजचे विद्यार्थीही आमच्या स्टॉलवर फिरकले नाही, त्यांना थेट सभागृहात नेण्यात येत होते, त्यामुळे पुस्तकांची काहीच विक्री झाली नाही, अशी स्टॉल मालकांची खंत होती. याचा अर्थ हा ग्रंथोत्सवाचा फार्सच अलिबागमध्ये घडत होता. मुळात ग्रंथोत्सवातून साहित्यिक, वाचक आणि प्रकाशक यांना एकत्र आणण्याचे कार्य झाले पाहिजे, ग्रंथोत्सव हे मिनी साहित्य संमेलन ठरले पाहिजे, पण आयोजकांच्या आडमुठ्या धोरणांमुळे असे घडू शकले नाही. या जिल्हास्तरिय ग्रंथोत्सवाला गल्लीतल्या उत्सवाचेही स्वरुप नव्हते. गल्लीतला उत्सव आयोजित करण्यासाठीही मेहनत घेतली जाते, पण या जिल्हा ग्रंथोत्सवासाठी फार मेहनत घेतली आहे असे दिसले नाही. ग्रंथोत्सव समितीच्या समन्वय समितीच्या किती बैठका झाल्या, त्यात कोणाकोणाला बोलावण्यात आले हेही गुलदस्त्यात आहे. या ग्रंथोत्सवाचा प्रचारच योग्य प्रकारे करण्यात ही समिती कुचकामी ठरली आहे. अशाने जिल्ह्याच्या ग्रामीण व शहरी भागातील लोकांमध्ये वाचनसंस्कृतीची वाढ कशी होणार? शासकीय ग्रंथोत्सव लोकोत्सव केव्हा होणार? जिल्हा माहिती कार्यालयाने या ग्रंथोत्सवाच्या गोड गोड बातम्या दिल्या असल्या तरी जिल्हा ग्रंथोत्सवात रायगड दिसायला हवा होता, पण अलिबागही दिसला नाही ही शोकांतिका आहे. ही शोकांतिका पुढच्या वर्षीतरी सुखांतिका व्हावी, ग्रंथोत्सव लोकोत्सव व्हावा, लोकांचा सहभाग वाढावा यासाठी या समितीच्या अध्यक्षांनी सजग रहायला हवे. इतकेच.


मंगळवार, २१ नोव्हेंबर, २०१७

कुपोषण... बालमृत्यू... मातामृत्यू... रायगडचा विकास

  -उमाजी म. केळुसकर ⬑ दादागिरी ⬉


       रायगड जिल्हा कण्हतोय... कुथतोय... खड्डे, प्रदूषण, भ्रष्टाचार... एक ना अनेक प्रश्‍नांनी रायगड जिल्हा हाच रुग्ण बनला आहे. जिल्ह्यातील १५ तालुक्यांत बालकांच्या कुपोषणाचा भेडसावणारा प्रश्‍न तसाच आहे. सध्या जिल्ह्यात १ हजार २१ कुपोषित बालके जिल्ह्याच्या तथाकथित विकासाला हसत आहेत. या जिल्ह्याचे पालक, पालकमंत्री प्रकाश महेता या जिल्ह्यातील बालकांचे कुपोषण दूर करु शकत नाही, ते डॉक्टर बनून रायगड जिल्ह्याच्या वेदना तरी दूर कशा करणार? मुळात डॉक्टरला रुग्णांबाबत आस्था हवी आणि रुग्णांच्या मनात डॉक्टरबद्दल श्रद्धा हवी, पण जिल्ह्याच्या पालकमंत्र्यांच्या मनात जिल्ह्याबाबत आस्थाच नसल्याने या जिल्ह्यातील जनतेच्या मनात त्यांच्याबद्दल श्रद्धा निर्माण होऊ शकलेली नाही. जनतेच्या लायकीप्रमाणे त्यांना लोकप्रतिनिधी मिळत असतात, पण येथे तर चक्क त्यांच्यावर पालकमंत्री लादला गेला आहे. त्यामुळे जिल्ह्याच्या दु:ख, वेदना सतत ठसठसत राहिल्या आहेत. या वेदनेला आता जिल्ह्यातील माता आणि बालकांच्या वाढलेल्या मृत्यूदराने कारुण्याची किनार लागली आहे. २०१६-१७ या वर्षात  जिल्ह्यात ३०५ बालमृत्यू तर २६ मातामृत्यू झाले आहेत. हे अपयश व्यवस्थेचे की व्यवस्थेला खेळवणार्‍या लोकप्रतिनिधींचे, की विकासाच्या नावावर स्वत:चे वस्त्रहरण करु देणार्‍या हतभागी जनतेचे? असा प्रश्‍न पडतो.
       औद्योगिक जिल्हा म्हणून रायगड जिल्ह्याची नवी ओळख आहे. या नव्या ओळखीच्या अनुषंगाने जिल्ह्यातील प्रमुख शहरांना नवं रुप मिळालं, प्रमुख गावांना बाळसंही आलं, आर्थिक समृद्धीही आली. तिसरी मुंबईची बीजं या मातीत रोवली जात आहेत. चित्र कसं नितांत सुंदर आहे? पण हे वरवरचं चित्रं आहे. जरा खोलात शिरलं तर या औद्योगिकरणामागचा, या नव्या रुपामागचा, झगमगाटामागचा सेझविरुद्धचा सर्वसामान्य भूमिपुत्रांचा लढा, जिल्ह्याला समृद्धीमुळे आलेल्या बाळशामागे दडलेलं कुपोषण दिसून येईल. स्पष्टच सांगायचं म्हणजे रायगड जिल्ह्यात एकूण १ हजार २१  कुपोषित बालके आहेत. यात आदिवासी बहुलविभागातील कुपोषित बालकांची संख्या मोठ्याप्रमाणात आहे. जिल्ह्याच्या फसव्या विकासाचं वस्त्रहरण करणारी ही आकडेवारी आहे. ही आकडेवारी कोणी ऐर्‍यागैर्‍याने दिली नसून ती खुद्द रायगड जिल्हा परिषदेचा महिला व बाल कल्याण विभाग, आरोग्य विभाग  आणि आदिवासी विकास विभाग यांनी दिली आहे. त्यामुळे या बाबीचे गाभीर्य लक्षात यायला हरकत नसावी.
       रायगड जिल्ह्यातील काही तालुक्यांमध्ये आदिवासींची संख्या मोठी आहे. जनजीवनाच्या किमान म्हणता येतील अशा पाणी, वीज, आरोग्य, रस्ते आणि शिक्षण या सुविधा या भागांत कित्येक वर्षे उपलब्ध नाहीत. कमालीचे दारिद्रय असलेल्या या भागांत कुपोषणाची समस्या निर्माण होणे साहजिकच होते. गेली अनेक वर्षे हे कुपोषणाचे ग्रहण जिल्ह्याला लागले आहे. कुपोषणाचा आकडा कधी खाली तर कधी वर जातो. २०१७ च्या नोव्हेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यापर्यंत जिल्ह्यात सॅम (तीव्र कुपोषित) ची १९६ तर मॅम (मध्यम कुपोषित) ची ९०५ कुपोषित बालके आहेत.  ही कुपोषित बालके शोधण्यासाठी ३ हजार २८३ अंगणवाड्यातील १ लाख ५९ हजार १९० बालकांपैकी १ लाख ४६ हजार ५८२ मुलांचे सर्वेक्षण करण्यात आले होते. त्यात कर्जत, महाड, श्रीवर्धन,  म्हसळा या तालुक्यांत कुपोषित बालकांचे प्रमाण अधिक असल्याचे आढळून आले. 
         गेल्या वर्षी २०१६ च्या नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यापर्यंत जिल्ह्यात सॅम (तीव्र कुपोषित) ची २४१ तर मॅम (मध्यम कुपोषित) ची ९५८ कुपोषित बालके आढळली होती.  ही कुपोषित बालके शोधण्यासाठी ३ हजार २८३ अंगणवाड्यातील १ लाख ५५ हजार ७७७ मुलांचे सर्वेक्षण करण्यात आले होते. त्यात कर्जत, सुधागड-पाली, पेण, खालापूर या तालुक्यांत कुपोषित बालकांचे प्रमाण अधिक असल्याचे आढळून आले होते. तेव्हा  जिल्ह्यातील आदिवासी बालकांचे हे कुपोषण नियंत्रणात आणण्यासाठी जिल्हा नियोजन समितीमधून आदिवासी उपयोजनांतर्गत नाविन्यपूर्ण उपक्रमाच्या माध्यमातून २५ लाख रुपयांचा तर आदिवासी उपयोजना ५० लाख रुपये असा एकूण ७५ लाखाचा निधी उपलब्ध करुन देण्यात आला होता. त्याचे सकारात्मक परिणाम एक वर्षांनंतरही पहायला मिळालेले नाहीत. नाही म्हणायला सुधागड-पाली, पेण, खालापूर तालुक्यातील तीव्र कुपोषण (सॅम) काही प्रमाणात कमी झाले आहे. पण मध्यम कुपोषित (मॅम) बालकांची संख्या लक्षणीय आहेच. गेल्या एक महिन्यात कर्जत तालुक्यात ५३ तीव्र कुपोषित (सॅम), १४६ मध्यम कुपोषित (मॅम) आदिवासी बालके आढळली, हे पहाता कुपोषण रोखण्यासाठी शर्थीचे प्रयत्न होत नाहीत हे लक्षात येते.  कर्जत  तालुक्यात आदिवासींची संख्या मोठी आहे. हा कर्जत तालुका कुपोषणाच्या बाबतीत जिल्ह्यात दरवर्षी चर्चेत असतो. पण जिल्ह्यातील इतर तालुके याला अपवाद नाहीत. मुळात आदिवासी भागातील बालकांना आहार देण्यासाठी अंगणवाड्यांचे माध्यम वापरले जाते. आदिवासी बालकांसाठीच्या पोषक आहार योजनेची सदोष अंमलबजावणी होत राहिल्यामुळेच, तसेच गाव पातळीवरील ‘ग्राम बाल विकास  केंद्रे’ आणि प्राथमिक आरोग्य केंद्र व ग्रामीण रुग्णालय पातळीवरील ‘बाल उपचार केंद्रे’ अपुर्‍या प्रमाणात असल्यामुळे या भागातील कुपोषित बालकांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढू लागली आहे, हे वास्तव आहे. 
         विविध राज्य सरकारांनी वेगवेगळ्या योजनांद्वारे आदिवासींना पौष्टिक आहार मिळावा, यासाठी वेगवेगळ्या योजना सुरू केल्या, परंतु झारीतील शुक्राचार्यांच्या साखळीमुळे लाभार्थी आदिवासींच्या पदरात या योजनांचे दान कधीच पडले नाही. ज्या अंगणवाड्यांमधून गरोदर मातांना आणि ५ वर्षांखालील बालकांना पोषण आहार दिला जातो, त्या अंगणवाड्यांसाठी तालुका स्तरावर एकात्मिक बालविकास विभागाकडून प्रकल्प अधिकार्‍याची नेमणूक केली जाते, पण दुर्दैवाची गोष्ट म्हणजे रायगड जिल्ह्यातील १५ तालुक्यांत प्रकल्प अधिकार्‍यांची १७ पदे आहेत, पण केवळ ६ तालुक्यांना ८ प्रकल्प अधिकारी आहेत, तर उर्वरित ९ तालुक्यात प्रकल्प अधिकार्‍यांची पदे रिक्त आहेत. या तालुक्यांचाही अतिरिक्त पदभार शेजारच्या सदर ८ प्रकल्प अधिकार्‍यांना पहावा लागतो. ही पदे भरण्याबाबत जिल्हा परिषदेकडून वारंवार पाठपुरावा होतो, परंतु काही केल्या ही पदे भरली जात नाहीत. परिणामी जिल्ह्यातील एकात्मिक बालविकास विभागात संबंधित अधिकारी नसल्यामुळे गेली अनेक वर्षे विविध योजनांचा नुसता खेळखंडोबा चालला आहे. कुपोषणाविरुद्ध लढणारी यंत्रणा निर्माण करणे गरजेचे, तेच मुळात केले जात नाही. अर्थात रायगडातच एकात्मिक बालविकास विभागाची अशी परिस्थिती आहे असे नाही, तर संपूर्ण राज्याचा हा प्रश्‍न आहे.
          कुपोषणाच्या बाबतीत यापूर्वीचे आघाडी सरकार व आताचे युती सरकार संवेदनशील आहे, असे दाखवित असले तरी प्रत्यक्षात ते संवेदनशील आहे असे वाटत नाही, तसे नसते तर आज हा प्रश्‍न उभा राहिला नसता.  आदिवासी विभाग, आरोग्य विभाग आणि एकात्मिक बालविकास विभागामध्येही समन्वय नाही. तत्कालिन आघाडी सरकारने ग्रामविकास विभागातून बालविकास विभाग वगळण्याचे ऑगस्ट २०१२ मध्ये ठरविले होते. परंतु तीन वर्षे झाल्यानंतरही त्याची योग्यरित्या अंमलबजावणी झालेली नाही. एकात्मिक बालविकासमधील सर्व निर्णय आजही जिल्हा परिषद प्रशासनाच्या अखत्यारीत होत आहेत. विशेष म्हणजे राज्य सरकारमध्ये महिला बालविकास या विभागाचा स्वतंत्र कारभार असून मंत्रीही स्वतंत्र आहेत. याचा अर्थ व्यवस्थेत सर्व गोंधळ आहे आणि त्याचा फटका संपूर्ण राज्यातील कुपोषित बालकांना बसला आहे, रायगड जिल्ह्यातही हीच परिस्थिती आहे. अशा परिस्थितीत रायगड जिल्ह्यातील आदिवासी भागांतील कुपोषणाची समस्या आपोआप नाहीशी होईल, हा आशावाद बाळगला तर तो बाळबोध आशावाद ठरेल.
          एकीकडे रायगड जिल्हा विकासात अग्रेसर असल्याचे आभासी चित्र शासनस्तरावरुन निर्माण केले जात आहे. जिल्ह्यात विविध प्रकल्पांची कामे सुरु आहेत. परंतु या जिल्ह्यात कुपोषण मुक्तीचा ठोस प्रकल्प कधीही उभारण्यात आला नाही. तात्पुरते उपाय अवलंबले गेले, त्यामुळे गेल्या विस वर्षांत विसरता न येण्याजोगी कुपोषणाची प्रकरणे समोर आली. २०१७ सालही कुपोषणाची भीषणता पोटात घेऊन सरणार आहे. पालकमंत्र्यांना या विषयाकडेच काय, जिल्ह्याकडे पहायला वेळ नाही आणि येथील लोकप्रतिनिधींना राजकीय पोषण-कुपोषणाच्या मुद्यापेक्षा आदिवासी बालकांचे कुपोषण, बालकमृत्यू, मातामृत्यू महत्वाचे वाटत नाही. यातून एकूणच मानवी संवेदनेचा मृत्यू झाला आहे, असे म्हटले तर त्यात अयोग्य असे काही नाही. 


गुरुवार, ९ नोव्हेंबर, २०१७

सुरक्षेच्या नावाखाली जलवाहतुकीची अडवणूक

-उमाजी म. केळुसकर ⬑ दादागिरी ⬉



          भारतास ५,५१६ किलोमीटर लांबीची किनारपट्टी नऊ राज्ये आणि चार केंद्रशासित प्रदेशांना स्पर्श करते. त्यातील महाराष्ट्राला ७८० किलोमीटरचा समुद्र किनारा लाभलेला आहे. या  समुद्र किनार्‍याच्या सागरी सुरक्षेची जबाबदारी चार यंत्रणांकडे आहे. किनार्‍यापासून समुद्रात ५ सागरी मैल अंतरापर्यंत सुरक्षेची जबाबदारी कस्टम आणि सागरी पोलीस यांच्यावर आहे. तिथून पुढे १२ सागरी मैलांपर्यंत तटरक्षक दल आणि १२ ते २०० सागरी मैलांपर्यंत सागराच्या सुरक्षेची जबाबदारी भारतीय नौसेनेवर आहे. पण या यंत्रणांतील सुसंवादाच्या अभावामुळे २६ नोव्हेंबर २००८ ला पाकिस्तानी दहशतवाद्यांनी समुद्रमार्गे येऊन मुंबईवर हल्ला केला, तेव्हा देशच नव्हे, तर संपूर्ण जगच हादरले होते. या घटनेनंतर सागरी सुरक्षा अधिक मजबूत करण्यासाठी पावले उचलली गेली, पण ती खर्‍या अर्थाने परिणामकारक नाहीत. त्याचा त्रास वारंवार जलवाहतुकीला होतो आहे. ताज पॅलेस हॉटेलमध्ये उतरणार्‍या देशी व विदेशी अति महत्त्वाच्या व्यक्तींच्या सुरक्षेच्या नावावर गेट वे ऑफ इंडिया परिसरात संचारबंदी लादली जाते, जलवाहतूक बंद ठेवली जाते, नुकतीच लॅटव्हिया या देशाचे पंतप्रधान मारिस कुसिनस्किस यांच्या जेएनपीटी भेटीसाठी सुरक्षेच्या कारणावरुन जलवाहतूक दोन दिवस बंद ठेवण्यात आली. त्यातून ही सुरक्षा व्यवस्था आहे, की सुव्यवस्थेचे काढलेले धिंडवडे आहेत, असा प्रश्‍न पडतो.
         कुख्यात डॉन दाऊद इब्राहिम, टायगर मेमन यांनी १२ मार्च १९९३ ला मुंबई येथे बॉम्बस्ङ्गोट मालिका घडवून आणली. त्यासाठी वापरण्यात आलेली आरडीएक्स स्फोटके पाकिस्तानातून समुद्रीमार्गे रायगड जिल्ह्यामधील श्रीवर्धन तालुक्यातील शेखाडी येथे उतरविण्यात आले आणि ते रस्त्याने मुंबई येथे नेण्यात आले होते. त्यानंतर धरमतर, पेझारी, शीघ्रे, साळाव, तांबडी, मांदाड, इंदापूर, आंबेत, साई, शिरगाव आदी बारा ठिकाणी सागरी तपासणी नाके उभारण्यात आले. या बॉम्बस्ङ्गोट मालिकेनंतर १५ वर्षांनी २००८ साली पाकिस्तानी दहशतवाद्यांनी समुद्रमार्गे येऊन मुंबईवर हल्ला केला. यातील सर्व दहशतवादी मारले गेले असले आणि त्यातील कसाब नावाच्या दहशतवाद्याला जीवंत पकडू फाशी देण्यात आले असले तरी या दहशतवाद्यांनी मुंबईमध्ये प्रचंड जीवितहानी घडवून आणली. या घटनेने पुन्हा एकदा सागरी सुरक्षचे महत्व अधोरेखित झाले. पण सागरी सुरक्षेच्या नावावर नागरी निर्बंध घालण्याचा निर्बुद्धपणा केला जावू लागला लागला. २०१० साली प्रामुख्याने ही बाब समोर आली. त्यावर्षी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा भारत दौर्‍यावर आले होते. जगातील दहशतवाद्यांच्या ’हिट लिस्ट’वर ओबामा यांचा पहिला नंबर होता. त्यामुळे त्यांच्या सुरक्षिततेला सर्वाधिक प्राधान्य देणे आवश्यकच होते. त्यानुसार त्यांच्या मुंबईच्या वास्तव्यात ताज हॉटेलच्या परिसरातील जलवाहतूक पूर्णपणे बंद केली गेली, याबद्दल उघडपणे ङ्गारशी नाराजी व्यक्त केली गेली नाही. मात्र या जलवाहतूक बंदीचा मोठा ङ्गटका मच्छिमारांना आणि मुंबई ते अलिबाग दरम्यान जाणार्‍या-येणार्‍या हजारो जणांना बसला. त्यानंतरही देशाचे राष्ट्रपती, पंतप्रधान, इतर अतिमहत्वाच्या व्यक्तींमुळे गेट वे ऑफ इंडियावरील जलवाहतूक सुरक्षेच्या कारणावरुन सातत्याने बंद करण्यात आली आहे. ही जलवाहतूक अर्धाएक तासांसाठी नाही तर एक ते दोन दिवस अशी बंद करण्यात आली आहे. यातून आपली सुरक्षा यंत्रणा सुरक्षेच्या बाबतीत किती मागास आहे हे दिसून येते. 
          या मागास सुरक्षा यंत्रणांमुळे दहशतवाद्यांना भय वाटत नाही, पण सर्वसामान्यांना छळ वाटतो, हे काही बरे नव्हे. काही दिवसांपूर्वी गेट वे ऑफ इंडियावर याच घटनेची पुनरावृत्ती झाली. ५ दिवसीय भारत दौर्‍यावर आलेले लॅटव्हिया या देशाचे पंतप्रधान मारिस कुसिनस्किस यांच्या नेतृत्वाखील उच्चस्तरीय शिष्टमंडळाने शनिवार, ४ नोव्हेंबर रोजी गेट वे ऑफ इंडिया येथून समुद्रमार्गे उरण येथील जवाहरलाल नेहरु पोर्ट ट्रस्ट (जेएनपीटी) या बंदरास भेट दिली. पण सुरक्षेच्या कारणावरुन गेट वे ऑफ इंडियाचा परिसर आणि जेटी क्र. १,२,३,४ पूर्णपणे बंद ठेवल्यामुळे शनिवार, ४ नोव्हेंबरला ११-३० ते १७-३०, तर रविवार, ५ नोव्हेंबरला ९-३० ते १५ वाजेदरम्यान दोन दिवस सर्व प्रकारच्या बोट वाहतुकीस बंदी घालण्यात आली होती. परदेशी पाहुण्यांची सुरक्षा हा या देशाच्या अस्मिता आणि जबाबदारीचा भाग आहे. त्यामुळे ही जबाबदारी योग्यरित्या बजवायलाच हवी. पण रस्तेवाहतूक किंवा जलवाहतूक बंद ठेवून सुरक्षेची जबाबदारी पार पाडली जाते तेव्हा सुरक्षेसाठी आपण किती आधुनिक तंत्रज्ञान आणि मानवी बुद्धिमत्ता वापरतो, असा प्रश्‍न उपस्थित होतो.
           मुंबईतील गेट वे ऑफ इंडिया येथील देशी-विदेशी अति महत्वाच्या व्यक्तींच्या सुरक्षा व्यवस्थेचा मनस्ताप रायगड जिल्ह्याच्या पर्यटनाला आणि पर्यटकांना, प्रवासी जलवाहतुकीला प्रामुख्याने सहन करावा लागतो. एकीकडे रायगड जिल्हा जागतिक पर्यटनाच्या दृष्टीने सक्षम करण्याच्या गप्पा मारल्या जात असताना आणि औद्योगिक जिल्हा म्हणून फुशारक्या मारल्या जात असताना सातत्याने देशी व विदेशी अति महत्त्वाच्या व्यक्तींच्या सुरक्षेसाठी जलवाहतूक बंद ठेवली जाते, यातून पर्यटन आणि उद्योग, जलवाहतूकदार, मच्छिमार, चाकरमानी यांचे किती नुकसान होते, याची दखल सुरक्षा यंत्रणा, राज्य सरकारला घ्यावीसी वाटत नाही, हे दुर्दैवी आहे.  वास्तविक ‘ताज पॅलेस हॉटेलमध्ये उतरणार्‍या देशी व विदेशी अति महत्त्वाच्या व्यक्तींच्या सुरक्षेसाठी एलिङ्गंटा, उरण, अलिबाग येथे जाणारी जलवाहतूक बंद ठेवली जाते. वर्षातून साधारण ३० दिवस अशा घटना घडतात. त्यामुळे प्रवाशांची गैरसोय तर होतेच पण, अनेकांचा रोजगारही बुडतो, त्यावर कोणता उपाय योजणार?’ असा प्रश्‍न २०१५ ला आ. जयंत पाटील यांनी विधानपरिषदेत उपस्थित केला होता. त्याला उत्तर देताना गृहराज्यमंत्री डॉ. रणजित पाटील यांनी ‘मुंबईच्या ताज पॅलेस हॉटेलमध्ये उतरणार्‍या अति महत्त्वाच्या व्यक्तींना वेळप्रसंगी अतिरिक्त सुरक्षाव्यवस्था देऊ, पण जलवाहतूक बंद ठेवली जाणार नाही’, असे आश्वासन दिले होते. पण हे आश्‍वासन पोकळ होते, हे त्या आश्‍वासनानंतरही सातत्याने जलवाहतूक बंद ठेवली गेल्याने दिसून येते. 
           सागरी सुरक्षा हे दोन शब्द भारदस्त वाटत असले तरी यामागचे वास्तव मात्र हास्यास्पद आहे. गेल्या २५ वर्षांत त्यावर खूप लिहिले गेले आहे, बोलले गेले आहे, त्यामुळे त्याबद्दल नव्याने सांगायची गरज नाही. नाही म्हणायला २६ नोव्हेंबर २००८ च्या मुंबईवरील हल्ल्यानंतर सागरी सुरक्षेचा प्रश्‍न पुन्हा ऐरणीवर आला आणि त्यानंतर विविध उपाययोजना केल्या जाऊ लागल्या आहेत, पण या उपाययोजना तितक्याच मंदगतीने अमलात येत आहेत. आता तर विद्यमान केंद्र सरकारने तटरक्षक दल मजबूत करण्याचे मनावर घेतले आहे, पण त्यासाठीही २०२२ ते २६ साल उजडावे लागणार आहे. पण तोपर्यंत काय? हा प्रश्‍न उरतोच. सागरी सुरक्षा करताना मच्छिमारांना ओळखपत्रे दिली असली तरी जलप्रवास करणार्‍यांच्या सुरक्षेचे काय? सुविधेचे काय? गेटवे ऑफ इंडियावर त्यांची प्रवासाची सुविधा अति महत्त्वाच्या व्यक्तींच्या सुरक्षेसाठी काढून घेण्यात येते हा कोणता शहाणपणा आहे? यातून रायगड जिल्ह्याचे पर्यटन कसे वाढणार? एकीकडे कोकण प्रवासी बोटींचे पुन्हा सुवर्णयुग आणण्याची तयारी सुरु असताना जर अशी वारंवार जलवाहतुकीवर सुरक्षेच्या कारणावरुन बंदी आणली जाणार असेल दुखणं पोटाचं आणि उपाय पायाला अशीच परिस्थिती म्हणावी लागेल. या सुरक्षा व्यवस्थेची पण गंमत आहे. गेटवे ऑफ इंडियाची सुरक्षा व्यवस्था कडक आहे. पण मांडवा बंदरात सुरक्षेची बोंब आहे. तेथे कसलीही तपासणी होत नाही. तपासणी आणि अडवणूक यात फरक आहे. सुरक्षेसाठी प्रवाशांची तपासणीला हरकत नसते तर अडवणुकीला हरकत असते. त्यामुळे तेथे तपासणी झालीच पाहिजे. मुंबई आणि रायगडच्या सुरक्षेच्या दृष्टीने मांडवा आणि  गेटवे ऑफ इंडिया येथे पर्यटक, प्रवासी यांची तपासणी झालीच पाहिजे, पण समुद्रावरही ससाण्यासारखी नजर पाहिजे, गुप्तवार्ता दर्जा वाढवला गेला पाहिजे आणि समुद्री पोलीस, तटरक्षक दल व नौदल यांच्यातील समन्वय आणखी सुधारला पाहिजे. खर्‍या अर्थाने असे झाले तर कोणा देशी-विदेशी अति महत्वाच्या व्यक्तींच्या सुरक्षेसाठी जलवाहतूक बंद ठेवण्याची गरज भासणार नाही आणि समुद्रातील संशयित हालचालींनाही पायबंद बसेल. 


बुधवार, १ नोव्हेंबर, २०१७

जत्रांचा पर्यटनाच्या दृष्टीने जिल्हा प्रशासन केव्हा विचार करणार?

 -उमाजी म. केळुसकर ⬑ रायगडचा डंका ⬉


    रायगड जिल्ह्यात पर्यटनाच्या विविध शाखा आहेत, त्यात विविध देवस्थानातील जत्रा ही एक विशेष शाखा आहे. पण या शाखेकडे शासनाचे, पर्यटन मंत्रालयाचे अजिबात लक्ष नाही. कोणत्याही सरकारी मदतीविना परंपरेने चालू असलेल्या या जत्रा येथील ग्रामीण जीवनाचा एक अविभाज्य भाग आहेत. या जत्रांपासून प्रेरणा घेऊन हल्ली शहरांत विविध फेस्टिवल आयोजित केले जातात, पण खरी मजा या जत्रांमध्येच आहे. १८८२ च्या सुमारास रायगड जिल्ह्यात (तत्कालीन कुलाबा जिल्ह्यात) ३१ ठिकाणी जत्रा भरत, असा रायगड गॅझेटिअरमध्ये उल्लेख सापडतो. काळाच्या ओघात काही जत्रा बंद पडल्या, तर काही नव्याने सुरु झाल्या असल्या तरी आजही जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात जत्रा भरतात, पण या जत्रांपैकी काही जत्रांनाच अधिक प्रसिद्धी मिळाली आहे. त्यामुळे इतरही जत्रांना वलय प्राप्त करुन देणे गरजेचे आहे. ग्रामीण जीवनात चैतन्य फुलविणार्‍या या जत्रोत्सवांचा पर्यटनाच्या दृष्टीनेही विचार केला गेला पाहिजे. शासनाने तसा विचार केला तर ग्रामीण जीवनाचे हे विशेष अंग अधिक समृद्ध होईल.
     मंगळवार, ३१ ऑक्टोबरपासून खालापूर तालुक्यातील साजगाव-ताकई येथील बोंबल्या विठोबाची जत्रा सुरु झाली आहे. ती मंगळवार, १४ नोव्हेंबर रोजी संपणार आहे. आजपासून दोन दिवस अलिबाग तालुक्यातील आवासची नागेश्‍वराची जत्रा गुरुवार, २ नोव्हेंबर ते शुक्रवार ३ नोव्हेंबर अशी भरत आहेत. ही जत्रा आटोपताच दुसर्‍या दिवशी कनकेश्‍वराची जत्रा शनिवार, ४ नोव्हेंबर ते रविवार ५ नोव्हेंबर असे दोन दिवस भरणार आहे. त्यानंतर वरसोली येथील आंग्रेकालीन विठोबाची जत्रा मंगळवार, १४ नोव्हेंबर ते शनिवार, १८ नोव्हेंबर असे पाच दिवस भरणार आहे. रविवार, ३ डिसेंबर रोजी थळ टेकडी, शहाबाज टेकडी, रसानी टेकडी अशा अनेक ठिकाणी श्रीदत्त जयंतीच्या जत्रा भरणार आहेत. त्यात चौल-भोवाळे येथील जत्रा रविवार, ३ डिसेंबर ते गुरुवार, ७ डिसेंबर असे पाच दिवस असणार आहे. त्यानंतरही नव्या वर्षांत २०१८ ला जिल्ह्यात इतर देवस्थानांच्याही छोट्यामोठ्या जत्रा उत्साहात भरणार आहेत. तसं पहाता या जत्रा पावसाळा सोडल्यास वर्षभर विविध ठिकाणी आयोजित केल्या जातात. ग्रामीण जीवनात चैतन्याचे रंग भरणार्‍या या जत्रांचे अनन्यसाधारण महत्व आहे. 
      कोणतीही जाहिरातबाजी न करता या जत्रा भरत असतात आणि त्यात लोकसहभाग मोठा असतो. जत्रेचं जटील व्यवस्थापनही स्थानिक गावकरीच कुशलतेने पार पाडत असतात. ग्रामपंचायत, देवस्थान आणि ग्रामस्थ यांच्या सहकार्यातून जत्रांचं नेत्रदीपक असं स्वरुप हल्ली पहायला मिळते. जत्रेच्या ह्या प्रधान धार्मिक अंगासोबतच तिला सामाजिक, आर्थिक, सांस्कृतिक अशीही अंगे आहेत. जत्रेत आजूबाजूच्या खेडोपाडी तयार होणार्‍या वस्तूंचा व्यापार मोठ्या प्रमाणावर होऊन, त्यांवर खेड्यांतील कारागिरांचा चरितार्थ चालतो. जत्रेत आबाल-वृद्ध, स्त्रीपुरुष सणाप्रमाणे यथाशक्ती वेशभूषा करून मोठ्या सख्येने सहभागी होऊन सामाजिक जीवनाचा उत्साहपूर्ण अनुभव घेतात. प्राचीन काळी दळणवळणाची साधने कमीच असल्यामुळे जत्रांमधून त्या त्या परिसरात तयार होणार्‍या वस्तूंना व मालाला चांगलीच मागणी असे. म्हणूनच जत्रेलाही एक उत्कृष्ट बाजारपेठ म्हणून महत्त्व होते आणि आजही काही प्रमाणात ते आहे. कापड, भांडी कुंडी, खाद्यपदार्थ, मिठाई, बैलगाड्या व दमण्या, जनावरे, खेळणी इ. वस्तूंचा व्यापार जत्रांमधून विशेष प्रमाणावर चालतो. महाराष्ट्रातील काही जत्रा तर विशिष्ट जनावरांच्या व्यापारांसाठीच प्रसिद्ध आहेत. उदा., नगर जिल्ह्यातील कानिङ्गनाथाची जत्रा गाढवांच्या व खेचरांच्या व्यापारांसाठी, तर नांदेड जिल्ह्यातील मालेगाव येथील खंडोबाची जत्रा घोड्यांच्या व्यापारांसाठी प्रसिद्ध आहे. या जत्रेला खंडोबाची जत्रा म्हणण्याऐवजी लोक ‘घोड्याची जत्रा’ म्हणूनच ओळखतात. रायगड जिल्ह्यातील खालापूर तालुक्यातील साजगाव-ताकई येथील बोंबल्या विठोबाची जत्रा बैल बाजार, घोंगडी आणि सुकी मच्छी यासाठी प्रसिद्ध आहे. सुमारे साडेतीनशे वर्षांपूर्वी संत तुकाराम महाराज हे मिरचीचा व्यवसाय करीत असताना साजगाव येथील डोंगरावर येऊन पैशांची वसूली करण्यासाठी बोंब (हाक) मारीत असत, म्हणून या जत्रेला बोंबल्या विठोबाची जत्रा म्हणून ओळखले जाते, अशी एक आख्यायिका आहे. तेथे सुके बोंबिल मोठ्या प्रमाणात विकले जातात म्हणून येथील विठुरायाला चक्क बोंबल्या विठोबा नाव पडले, अशीही दुसरी गमतीशीर आख्यायिका सांगितली जाते. काहीही असो येथील विठल्ल बोंबल्या विठल्ल म्हणून प्रसिद्ध आहे, हे वास्तव आहे.
       जत्रांतून तमाशा, दशावतारी नाटके, कुस्त्यांचे ङ्गड, बैलगाड्यांच्या शर्यती, सर्कस, चित्रपट, आकाशपाळणे, ङ्गिरते लाकडी घोडे, जादूचे खेळ इ. करमणुकीच्या कार्यक्रमांचा प्रामुख्याने अंतर्भाव असतो. कीर्तन, भजन, प्रवचन तसेच विविध स्तरांतील लोक एकत्र जमल्यामुळे त्यांच्यात होणारी विचारांची व कल्पनांची देवाणघेवाण यांमुळे त्यांचे सांस्कृतिक उद्बोधनही जत्रेत होते व सामाजिक एकात्मता दृढ होण्यास मदत होते. असे असतानाही या जत्रांकडे राज्याच्या पर्यटन विभागाचे आणि जिल्हा प्रशासनांचे पाहिजे तेवढे लक्ष नाही. या जत्रांची प्रसिद्धी इतर शहरांत आणि राज्यांत होईल अशी यंत्रणा राज्य शासनाने उभारणे गरजेचे आहे. तसे झाले तर या जत्रांचा आस्वाद घेण्यासाठी मोठ्या प्रमाणात परजिल्ह्यातून, परराज्यांतून, अगदी परदेशातूनही पर्यटक मोठ्या प्रमाणात येतील. हल्ली विविध संस्था शहरात भव्य फेस्टिवल भरवतात. मंत्र्यासंत्र्यांच्या हस्ते त्यांचं उद्घाटन होतं, या फेस्टिवलना मोठमोठ्या कंपन्या प्रायोजक असतात, त्यामुळे त्यांना निधीची चणचण भागत नाही. बर्‍याच ठिकाणी या फेस्टिवलमध्ये प्रवेश शुल्क भरावे लागते. त्यात लावण्यात येणारे स्टॉल्सही महागडे असतात. पण जत्रांचा उद्देश हा निव्वळ व्यापारी नसल्यामुळे सामान्य ते असामान्य सर्वांसाठी त्या आनंददायी असतात. येथील स्टॉल्स विक्रेत्यांना आणि त्यातील माल जत्रेकरुंच्या खिशाला परवडणारा असतो. असे असूनही या पारंपरिक जत्रांच्या नशिबी उपेक्षाच पडते. या जत्रांना कुठल्याही स्थानिक कंपन्या मदत करीत नाहीत की शासन सहकार्य करीत नाही. तरीही जत्रा टिकून आहेत. काळानुरुप त्यात काही बदल झाले. पिढ्या बदलल्या पण उत्साहात बदल झाला नाही. 
       या जत्रांमध्ये केवळ पोलीस बंदोबस्त देऊन उपयोगाचे नाही तर जत्रांमध्ये आलेल्यांना विविध सुविधांची पूर्तता केली जाणे गरजचे आहे. स्थानिक पातळीवर शक्य त्या सुविधा उभारल्या जातात, पण या सुविधांना मर्यादा पडतात. शासनाच्या वतीने पर्यटनवृद्धीसाठी या जत्रांसंदर्भात मास्टर प्लॅन आखणे गरचे आहे. राज्यपातळीवर हे व्हायचे तेव्हा होईल, पण रायगड जिल्हा पातळीवर जिल्हा प्रशासनाच्या वतीने जत्रांबाबत ठोस उपक्रम राबविता येणे शक्य आहे. जिल्हा प्रशासनाच्या वतीने पर्यटन वाढीबाबत प्रयत्न होत आहेत. रायगड जिल्ह्यात असणार्‍या विविध ऐतिहासिक स्थळांना जसे प्राचीन गावे, वीर पुरुषांची गावे, खिंडी यांना जोडून ऐतिहासिक पर्यटनाचे एक जाळे विकसित करुन पर्यटकांना आपल्या जिल्ह्याकडे मोठ्याप्रमाणात आकर्षित करुन घेण्याचा जिल्हा प्रशासनाचा प्रयत्न आहे.  या प्रयत्नाचाच एक भाग म्हणून त्यात १५ तालुक्यांतील या जत्रांचा समावेश केला तर ते निश्‍चितच रायगड जिल्ह्याच्या सांस्कृतिक वैभवात भर टाकणारे ठरेल. रायगड जिल्ह्याचे पर्यटन वाढते आहे. फक्त येथील वैशिष्ट्यांची प्रसिद्धी पद्धतशीर होणे गरजेचे आहे. जत्रा हे रायगड जिल्ह्यातील अनेक वैशिष्ट्यांपैकी एक वैशिष्ट्य आहे, त्या वैशिष्ट्याचा प्रचार आणि प्रसार जिल्हा पातळीवर झाला पाहिजे. जिल्हा प्रशासनाने आपल्या पातळीवरुन हे केले पाहिजे. जिल्हा प्रशासन काय काय करणार हा मुद्दा नाही, तर प्रशासनाची तशी मानसिकता पाहिजे. इतकेच.


सोमवार, ११ सप्टेंबर, २०१७

रायगडच्या जिल्हाधिकार्‍यांनी जनतेला स्वप्न दिले, पण...

-उमाजी म. केळुसकर ⬑ रायगडचा डंका ⬉


     रायगड जिल्ह्याला इतिहास, भूगोल, राजकारण, समाजकारण, अध्यात्म, कला आणि साहित्याचा मोठा वारसा आहे, पण या वारशाचेच विस्मरण आज जिल्ह्यातील जनतेला झाले आहे. या जनतेतूनच लोकप्रतिनिधी येत असल्याने त्यांची भूमिका वेगळी असण्याचे कारण नाही. नाहीतर आज जिल्ह्याचे चित्र केवळ विकासाभिमुख न राहता विकसित जिल्हा असे झाले असते. परंतु जिल्हा निर्मितीपासून हा रायगड जिल्हा विकासाभिमुख राहिला आहे. विकासाभिमुख असणे ही चांगली गोष्ट असली तरी समाधानकारक नाही. कारण स्वातंत्र्यानंतर ७० वर्षे झाली आणि महाराष्ट्र राज्य स्थापनेला ५७ वर्षे होऊन गेली तरी हा जिल्हा विकसित जिल्हा म्हणून ओळखला जात नाही. आज तर जिल्ह्याचे विचित्र रुप दिसत असल्यामुळे तो एक चेष्टेचा विषय झाला आहे. रस्त्यांवर पडलेल्या खड्ड्यांनी  रायगड जिल्ह्याचे रुप चाळणीसारखे केले आहे. अशा परिस्थितीत रायगडचे जिल्हाधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी यांनी संपूर्ण रायगड जिल्हा पर्यटनाच्या दृष्टीने विकसित करण्यात येत त्यावर आपले बारीक लक्ष असल्याचे सांगितले. जिल्हाधिकार्‍यांच्या आश्‍वासक भूमिकेवर जनता मात्र साशंक आहे. कारण गेल्या ५७ वर्षांचे सोडा, गेल्या तीन वर्षांत या जिल्ह्याला पालकच नाही अशी परिस्थिती आहे. त्यामुळे याचाच फायदा घेऊन मालक बनलेल्या ‘वृत्ती’ जिल्ह्याच्या दुर्दशेस कारण ठरले आहेत.
      रायगड जिल्ह्याला लोकप्रतिनिधी तेच, किंवा त्याच घरातील पहायला मिळतात, पण जिल्हाधिकारी मात्र नित्य नवे पहायला मिळतात. त्यामुळे नव्या चेहर्‍यांबद्दल एक औत्सुक्य आणि आकर्षण जनतेमध्ये असते. हे आकर्षण ते आपल्या कर्तबगारीने वाढवित असतात किंवा घटवित असतात. रायगडचे नवे जिल्हाधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी यांनी यापूर्वी तलावांचा जिल्हा म्हणून ओळखल्या जाणार्‍या गोंदियाचे जिल्हाधिकारी म्हणून आपला ठसा उमटविला आहे. त्यापूर्वी त्यांनी औद्योगिक विकास महामंडळात सहमुख्य कार्यकारी अधिकारी, कोल्हापूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, नवनिर्मित पालघर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री यांचे खाजगी सचिव म्हणून काम केले आहे. २००६ च्या भारतीय प्रशासकीय सेवेचे (आय.ए.एस.) अधिकारी असलेले डॉ. विजय सूर्यवंशी यांच्या रुपाने आता रायगड जिल्हाला नवा चेहरा मिळून एक महिना झाला आहे. त्यामुळे त्यांच्या कामाचे आताच मूल्यमापन करता येणार नसले तरी गोंदियासारखा ठसा ते येथे उमटवतील काय हे लवकरच दिसून येईल. त्यानंतरच  जनतेमध्ये त्यांच्याबद्दल विश्‍वास निर्माण झालाय की नाही यावरच त्यांच्या आकर्षण आणि अनाकर्षणाचा आलेख ठरलेला असेल.
      डॉ. विजय सूर्यवशी यांनी रायगडच्या जिल्हाधिकारी पदाची सूत्र हाती घेतल्यानंतर मंगळवार, २५ जुलै रोजी त्यांनी किल्ले रायगडाला भेट देऊन छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीस वंदन करुन कामकाजास प्रारंभ केला. वास्तविक भारताचे तत्कालिन राष्ट्रपती ग्यानी झैलसिंग, तत्कालिन पंतप्रधान इंदिरा गांधी, तत्कालिन पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी, तत्कालिन पंतप्रधान चंद्रशेखर आणि गुजरातचे मुख्यमंत्री असताना विद्यमान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रायगडाची धूळ आपल्या कपाळाला लावली आहे. काही अपवाद सोडल्यास महाराष्ट्राचे विद्यमान मुख्यमंत्री देवेंद्र ङ्गडणवीस यांच्यासह सगळे मुख्यमंत्री शिवसमाधी समोर नतमस्तक झाले आहेत. त्यामुळे रायगड जिल्ह्याचे जिल्हाधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी यांनी महाराजांच्या समाधीस वंदन करुन कामकाजास प्रारंभ करणे योग्यच आहे, यापूर्वीच्या जिल्हाधिकार्‍यांनी तसे केले नाही, प्रसंगोपात ते तेथे गेले, त्यामुळे कामकाज सुरु करण्याआधी शिवसमाधीचे दर्शन घेणार्‍या डॉ. सूर्यवंशींचे वेगळेपण दिसते. याच वेगळेपणातून त्यांनी ऐतिहासिक पर्यटनाची रुपरेखा मांडली आहे, त्याबाबत दुमत असण्याचे कारण नाही. 
     किल्ले रायगडच्या विकासासाठी ६०६ कोटी रुपयांच्या विकास आराखडा मंजूर केला आहे. या आराखड्यानुसार भारतीय पुरातत्त्व विभागाच्या पर्यवेक्षणाखाली १२४.१५ कोटी रुपयांची कामे करण्यात येणार आहेत. पाचाड येथील राजमाता जिजाऊ मॉंसाहेब समाधी वाडा परिसर, रायगड किल्ला परिसरातील पर्यटन विकास, रायगड किल्ला परिसरातील ७ कि.मी. परिघातील २१ गावे व त्याअंतर्गत वाड्यांमध्ये मुलभूत सुविधा विकास करण्यात येत आहे. रायगडापर्यंत पोहोचणे सुलभ व्हावे यासाठी महाड ते पाचाड हा रस्ता तीन पदरी विकसित केला जाणार आहे. त्यासाठी महाड ते रायगड किल्ला हा राज्यमार्गही केंद्र शासनाने राष्ट्रीय महामार्ग म्हणून मान्यता दिली आहे. याबरोबरच ऐतिहासिक पर्यटनाची रुपरेखा सांगताना त्यांनी रायगड जिल्ह्यात असणार्‍या विविध ऐतिहासिक स्थळांना जसे प्राचीन गावे, वीर पुरुषांची गावे, खिंडी यांना जोडून ऐतिहासिक पर्यटनाचे एक जाळे विकसित करुन पर्यटकांना आपल्या जिल्ह्याकडे मोठ्याप्रमाणात आकर्षित करुन घेण्याचा आपण प्रयत्न करणार असल्याचे सांगितले. त्यांनी गोंदिया येथे आपल्या जिल्हाधिकारी पदाच्या कारकीर्दीत राज्यात केवळ गोंदिया जिल्ह्यातच आढळणार्‍या सारस पक्ष्यांचे संवर्धन करून त्यांची वृद्धी व्हावी यासाठी विशेष प्रयत्न केले व सारस पक्ष्यांना पाहण्यासाठी जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात पर्यटक यावेत, यासाठी डॉ. विजय सूर्यवंशी सारस फेस्टिव्हलचा अभिनव उपक्रम राबविला होता. त्याचे तेथे सकारात्मक परिणाम पहायलाही मिळाले. तसेच सकारात्मक परिणाम रायगड जिल्ह्यात पर्यटनवृद्धीबाबत पहायला मिळाले तर आनंदच आहे. रायगड जिल्ह्यात पर्यटनाच्या विविध शाखा पहायला मिळतात. ऐतिहासिक म्हणजे गडकिल्ले-गावे पर्यटन, समुद्र पर्यटन, निसर्ग पर्यटन, विज्ञान पर्यटन, कृषी पर्यटन, जंगल पर्यटन, अध्यात्म पर्यन आदी शाखा पर्यटनासाठी जिल्हा प्रशासन विकसित करु शकते. तेथे सोयीसुविधा उभारुन पर्यटकांना आकर्षित करुन महसुलात भर घालता येईल. त्यादृष्टीने जिल्हा प्रशासन सकारात्मक आहे ही समाधानाची बाब आहे. पण दुर्दैवाची गोष्ट म्हणजे पर्यटनासाठी आलेल्या पर्यटकांमध्ये मद्य पर्यटनासाठी आलेले खुशालचेंडू पर्यटकही असतात आणि त्यामुळे विविध उपघात घडतात, त्यांचे बळी जातात, त्याचबरोबर इतर निष्पापांचेही बळी जातात, निसर्गाची नासाडी होते आणि त्यामुळे निखळ पर्यटनास आलेले पर्यटक आणि पर्यटन स्थळ दोघेही बदनाम होतात. याकडेही जिल्हाधिकार्‍यांनी गांभीर्याने पहाणे गरजेचे आहे.
      जिल्ह्यात पर्यटन वाढते आहे, ते नियोजनबद्ध झाले तर त्याचा जनता, जिल्हा प्रशासन, कायदा सुव्यवस्था आणि छोटेमोठे व्यावसायिक यांना त्याचा फायदाच होणार आहे. पण याबरोबरच जिल्ह्यातील इतर प्रश्‍नही धसास लागले तर ते जिल्ह्याच्या स्वास्थ्यास हितकारक असणार आहे. जिल्ह्यात प्रकल्पग्रस्तांचे प्रश्‍न आहेत, पेण अर्बन बँक घोटाळ्यात नाडल्या गेलेल्या खातेदार-ठेविदारांचे प्रश्‍न आहेत, कुपोषण-आरोग्याचे प्रश्‍न आहेत, बेरोजगारांचे प्रश्‍न आहेत, आणखी जिल्हाधिकार्‍यांच्या अधिकार क्षेत्रातील अनेक प्रश्‍न आहेत. रस्त्यांच्या प्रश्‍नाने तर जिल्ह्यातील जनतेचे आणि पर्यटकांचे मणके ढिले झाले आहेत आणि खड्ड्यांमुळे झालेल्या अपघातात अनेकांचे प्राण गेले आहेत.  जिल्ह्याचा प्रशासकीय प्रमुख म्हणून या सर्व प्रश्‍नांची हाताळणी संवदेनशीलतेने त्यांनी करणे गरजेचे आहे. 
      मुळात डॉ. विजय सूर्यवंशी यांनी संपूर्ण जिल्हाधिकारी कार्यालयाला संवेदनशील बनवले तरच जिल्ह्याचे प्रश्‍न सुलभपणे सोडवता येणार आहेत. काही वर्षांपूर्वी रायगड जिल्हा परिषद भ्रष्टाचाराच्या रडारवर आली होती, तसेच रायगड जिल्हाधिकारी कार्यालयही भ्रष्टाचाराच्या रडारवर आले होते. त्यामुळे झालेल्या बदनामीच्या जखमांनी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या भिंतीहीे ठसठसत असतील. या जखमांमुळेच जिल्हाधिकारी कार्यालयाकडे विश्‍वासाने पाहिले जात नाही. महसुल अधिकार्‍यांच्या वाढत असलेल्या मालमत्ता पाहिल्यावर या कार्यालयात धनदांडग्यांचीच चालते आणि वजनाशिवाय फायली हलत नाहीत, यावर शिक्कामोर्तब होते. या चौकटीत सर्वसामान्य कुठे बसतो? त्यांची कामे कशी होणार? लोकशाहीत लोकांना केंद्रबिंदू मानून स्थानिक स्वराज्य संस्थांची आणि जिल्हा प्रशासनांची निर्मिती झाली. पण तो हेतू पूर्णत: देशात साध्य झालेला नाही. दिवसेंदिवस परिस्थिती अधिकच चिघळत चालली आहे. रायगड जिल्ह्यात तर विदारक परिस्थिती आहे. सर्वसामान्यांना या व्यवस्थेत मोजले जात नाही. त्यांना विचारले जात नाही आणि विचारही केला जात नाही. विकासाची व्याख्या कारखानदारीतच तोलली जाते, यात निसर्गाधारित विकास मोजला जात नाही. कारखानदारीसाठी विकासाची चक्रे फिरवली जात आहेत. रस्ते, पूल, जलमार्गांचे बळकटीकरण शासन करणार आहे, पण हे पर्यटनासाठी नाही, येथील खड्ड्यांनी गांजलेल्या जनतेसाठी नाही, तर कारखानदारीसाठी आहे. कारखानदारीही वाईट नाही, पण येथे निसर्गाधारित कारखानदारी नाही, तर रासायनिक कारखानदारी प्रामुख्याने आहे. तिच्यामुळे येथील निसर्ग आणि निसर्गाधारित जीवन बेचिराख होत चालले आहे, ही वस्तुस्थिती आहे. त्यामुळे पर्यटनदृष्ट्या रायगडच्या विकासाचे जिल्हाधिकार्‍यांनी रंगवलेले चित्र जिल्ह्यातील रस्त्यांना पडलेल्या खड्ड्यांतील गढूळ पाण्यात किंवा त्यातील धुळीत विरघळून तर जाणार नाही ना? तसे होऊ नये अशीच रायगडकर जनतेची अपेक्षा आहे.  रायगड विकासाभिमुख नव्हे तर विकसित व्हावा असेच येथील जनतेला वाटते आहे, पण तो विकास येथल्या निसर्गाचा आब राखून झाला पाहिजे. अशा विकासाची मानसिकता येथील लोकप्रतिनिधी, मग ते जिल्ह्याचे पालकमंत्री असोत, आमदार असोत, खासदार असोत, वा मंत्री किंवा दोन्ही जिल्हा प्रशासन, यांना खरोखरच आहे का असा प्रश्‍न आहे.

  

बुधवार, ९ ऑगस्ट, २०१७

जनरल अरुणकुमार वैद्य यांच्या शौर्यस्मारकाची अलिबागला प्रतीक्षा

 -उमाजी म. केळुसकर ⬑ रायगडचा डंका ⬉


   
 रायगड हा लढवय्यांचा जिल्हा आहे. येथे छत्रपती शिवाजी महारांजानी क्रांतीची बिजे पेरली, त्यामुळे स्वातंत्र्य लढा असो, वा देशरक्षणाचा विडा असो, रायगडच्या भूमीपुत्रांनी तन-मन-धन आपला सहभाग नोंदविला आहे. रायगडच्या लढवय्यांची ही परंपरा तानाजी मालुसरे, सरखेल कान्होजी आंग्रे ते हुतात्मा भाई कोतवाल, जनरल अरुणकुमार वैद्य अशी आहे. आजचा दिवस, म्हणजे १० ऑगस्ट रायगडकरांसाठीच नव्हे तर संपूर्ण देशासाठी धक्कादायक ठरला, भारताचे १३ वे लष्करप्रमुख, अलिबागचे सुपुत्र जनरल अरुणकुमार वैद्य यांची, पुण्यात ते निवृत्तीचं जीवन जगत असताना १० ऑगस्ट १९८६ रोजी दोन खलिस्तानवादी अतिरेक्यांनी त्यांची हत्या केली. आज या घटनेस ३१ वर्षे होत आहेत. अलिबागमध्ये त्यांनी प्राथमिक शिक्षण घेतलेल्या इंडस्ट्रियल हायस्कुलचे जनरल अरुणकुमार वैद्य असे नामकरण कोकण एज्युकेशन सोसायटीने करुन त्यांचे स्मरण ठेवले असले तरी अलिबागमध्ये त्यांचे यथोचित शौर्यस्मारक झाले, तर ते रायगड जिल्ह्याच्या शौर्यशाली इतिहासाच्या वैभवात भर घालणारेच ठरेल.
     अलिबागमधील इंडस्ट्रियल हायस्कुल या औद्योगिक शाळेत शिक्षण घेणारा विद्यार्थी देशप्रेमाने प्रेरित होऊन भारतीय लष्करात दाखल होतो... १९६५ आणि १९७१ च्या युद्धात अतुलनीय पराक्रम गाजवतो... १ ऑगस्ट १९८३ ते ३१ जानेवारी १९८६ पर्यंत भारतीय लष्कर प्रमुख म्हणून वावरतो... दोन वेळा महावीरचक्र, एक परम विशिष्ट सेवा पदक, एक अति विशिष्ट सेवा पदक, मरणोत्तर पद्मविभूषण मिळवतो... हे सारेच स्वप्नवत. पण हेच वास्तव होते आणि हे वास्तव रायगड जिल्ह्यासाठी अभिमानास्पद आहे. २७ जानेवारी १९२६ चा त्यांचा जन्म.  वडील श्रीधर वैद्य सरकारी अधिकारी. आईचे नाव इंदिरा तर पत्नीचे नाव भानुमती. त्यांचे शालेय शिक्षण अलिबागनंतर पुण्यातील न्यू इंग्लिश स्कूलमध्ये आणि मुंबईच्या एल्फिन्स्टन विद्यालयात झाले. एल्फिन्स्टन विद्यालयात उच्च शिक्षण घेत असतानाच त्यांनी १९४५ मध्ये लष्करात कॅडेट म्हणून प्रवेश मिळविला. पुढे त्यांनी लष्करात विविध पदांवर आपली छाप पाडली आणि अखेर ते जनरल या हुद्यावर पोहोचले. जनरल अरुणकुमार वैद्य यांचा जीवनप्रवास थांबला निवृत्तीनंतर अवघ्या ७ महिन्यांनी १० ऑगस्ट १९८६ थांबला. अतिरेक्यांच्या गोळ्या झेलत वीरमरण पत्करणारा हुतात्मा हीच त्यांची अखेरची ओळख. आज त्यांचा ३१ वा स्मृतीदिन असल्यामुळे त्यांनी अमृतसरच्या सुवर्ण मंदिरात शरण घेतलेल्या खलिस्तानवादी अतिरेक्यांना हुसकावून लावण्यासाठी ‘ऑपरेशन ब्लू स्टार’ या नावाने केलेल्या कारवाईचेही स्मरण होणे साहजिकच आहे.
      ‘ऑपरेशन ब्लू स्टार’ हा जनरल अरुणकुमार वैद्य यांच्या कारकिर्दीतील अत्यंत कठीण आणि निर्णायक प्रसंग होता. स्वत: अरुणकुमार वैद्य यांनी या प्रसंगाचे वर्णन ‘अत्यंत कटू आणि अपरिहार्य परिस्थितीत घेतलेला निर्णय’ असे केलेले आहे. पंजाबमधील खलिस्तान चळवळीने उग्र स्वरूप धारण केल्यानंतर मोठ्या प्रमाणात फुटीरतावाद वाढीस लागला. भिद्रनवालेंनी सुवर्णमंदिरात शस्त्रांची मोर्चेबांधणी करून देशाच्या घटनेस आव्हान दिले. सामोपचाराचे सर्व प्रयत्न संपल्यानंतर तत्कालिन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी लष्करी कारवाईचा निर्णय घेतला. या वेळेस अरुणकुमार वैद्य लष्करप्रमुख होते आणि भिद्रनवालेंच्या नेतृत्वाखालील अतिरेक्यांवर केलेल्या कारवाईचे आरेखन त्यांनी केले.
      ही लष्करी कारवाई सुवर्ण मंदिरावर नसून देशाच्या एकसंधतेस बाधा आणणार्‍या अतिरेक्यांविरुद्ध होती. ५ जून १९८४ रोजी सुरू झालेल्या कारवाईत प्रथम आपल्या लष्करास हानी सोसावी लागली. भिद्रनवाले गटाची सर्व योजना १९७१ च्या युद्धात अतुलनीय शौर्य गाजवलेल्या आणि ढाक्यात आपल्या सैन्यातर्ङ्गे प्रथम पाऊल ठेवलेल्या आणि खलिस्तान चळवळीस पाठिंबा देऊन लष्कर सोडलेल्या मेजर जनरल शहाबेगसिंग यांच्याकडे होती. आपल्या सैन्याचा अंदाज होता की ङ्गार तर ५०० अतिरेकी असतील, परंतु प्रत्यक्षात २००० हून जास्त अतिरेकी उखळी तोफा मीडियम मशीनगन, ग्रेनेडसह अकाल तख्त आणि हरिमदर सिंगसाहेब यांच्या भवती मोर्चेबांधणी करून होते.
आपल्या सैन्याची हानी होत होती आणि सैन्याने ‘सुवर्ण मंदिरावर’ हल्ला केल्याचा अपप्रचार झाल्याने सर्व शीख समाज सुवर्ण मंदिराभोवती गोळा होऊन आपले सैन्य वेढले जाण्याची शक्यता होती. त्यामुळे ऑपरेशन लवकर संपवण्याच्या हेतूने रणगाडे वापरण्याचा ऐतिहासिक आणि दुर्दैवी निर्णय घेण्यात आला आणि ७ जूनच्या सकाळपर्यंत सर्व अतिरेक्यांचा खातमा होऊन परिस्थिती नियंत्रणात आणली गेली. या कारवाईत अकाल तख्तचे जे नुकसान झाले त्यास अरुणकुमार वैद्य यांना दोष दिला जातो; परंतु ते चुकीचे असून भिद्रनवालेंनीच एक प्रकारे अकाल तख्तभोवती शस्त्रे उभी करून त्या पवित्र जागेचा अपमान केला होता, हे सत्य नाकारून चालणार नाही.
   या कारवाईमुळे अरुणकुमार वैद्य यांच्याविषयी विशिष्ट समाजात आकस निर्माण झाला आणि या आकसातूनच १० ऑगस्ट १९८६ रोजी निवृत्त जीवन जगणार्‍या जन. वैद्य यांची जिंदा आणि सुखा या अतिरेक्यांनी पुण्यात हत्या केली. जनरल वैद्य हे अतिरेक्यांच्या हिटलिस्टवर होते आणि त्याआधी चार वेळा हत्येचा प्रयत्न होऊनदेखील त्यांनी संरक्षण नाकारले होते. सदैव देशाच्या संरक्षणाचा विचार करणार्‍या या सेनानीला आपल्याच देशात आपणच संरक्षण घेणे मान्य नसावे. असा हा सेनानी अलिबागमध्ये बालपणी अलिबागमध्ये वावरला... अलिबागमध्ये प्राथमिक शिक्षण घेतले... देशासाठी त्यांनी बलिदान दिले. कोकण एज्युकेशन सोसायटीच्या एका शाळेला त्यांचे नाव देण्यात आले आहे. पण अलिबागमध्ये त्यांचे कोणतेही शौर्यस्मारक नाही. अलिबागकरांनी त्यांच्या स्मृती जपल्या नाहीत, तर त्यासारखा दुसरा कपाळकरंटेपणा दुसरा नसेल. जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी, जिल्हा प्रशासनाने याकडे गांभीर्याने पाहिले तर अलिबागमध्ये जनरल अरुणकुमार वैद्य यांचे शौर्यस्मारक होणे अशक्य नाही. हे शौर्यस्मारकच अलिबागकरांची, रायगडकरांची त्यांना खरी श्रद्धांजली ठरेल.

बुधवार, २ ऑगस्ट, २०१७

जुन्या पुलांचा आक्रोश अजूनही सुरुच आहे...

 -उमाजी म. केळुसकर ⬑ खारावारा ⬉


    कोकणवासियांना गटारी अमावस्या, म्हणजेच आषाढ अमावस्या दोन दुर्दैवी घटनांनी कायम लक्षात राहणारी आहे. एक घटना म्हणजे ७९ वर्षांपूर्वी १९४७ ला शनिवार, १७ जुलै रोजी रेवसजवळील झालेला रामदास बोटीचा दुर्दैवी अपघात आणि दुसरी घटना म्हणजे गेल्या वर्षी, मंगळवार, २ ऑगस्टला रात्री अकरा-साडेअकरा वाजता मुसळधार पावसात महाडचा सावित्री नदीवरील ८८ वर्ष जुना पूल कोसळण्याची. या दोन्ही घटनांच्या तारखा वेगळ्या असल्या तरी तिथीने त्या एकाच दिवशी घडल्या. ती गटारी अमावस्या म्हणजेच दीपअमावस्या होती. पण त्या पावसाळी रात्री बळी पडलेल्यांच्या नशिबी प्रकाश नव्हता, दुसर्‍या दिवशी येणारा मनभावन श्रावण नव्हता तर अमावस्येचाच काळाकुट्ट अंधार होता. आज तिथीनुसार अमावस्या नाही, पण तारीख तीच म्हणजे २ ऑगस्ट आहे. आज महाड सावित्री पूल दुर्घटनेला १ वर्ष पूर्ण होत आहे. या दरम्यान वाहून गेलेल्या त्या पुलाशेजारी नवा पूल बांधण्यात आला असला तरी त्या दुर्घटनेच्या जखमा ओल्याच आहेत. जेव्हा कोकणातील सर्व जुन्या पुलांचे नूतनीकरण होईल, तेव्हाच ती सावित्री पुलाच्या दुर्घटनेत बळी ठरलेल्यांना श्रद्धांजली असेल.
    मुंबई-गोवा महामार्गावरील महाड-पोलादपूर दरम्यान राजेवाडी ङ्गाट्याजवळ सावित्री नदीवर १९२८ साली ब्रिटीश राजवटीत बांधण्यात आलेल्या पुलाचे आयुष्य संपत आल्याने त्याच्या शेजारी नवा पुल १५ वर्षांपूर्वी बांधण्यात आला होता. सदर नवा पुल जाण्या-येण्यासाठी न वापरता जुना पुल येण्यासाठी आणि नवा पुल जाण्यासाठी वापरला जात होता. वास्तविक जुन्या पुलावरील वाहतूक बंद करणे गरजेचे होते. परंतु जुना पुल मजबूत असल्याने अजून काही काळ त्यावरुन वाहतूक सुरु ठेवण्याचा अभिप्राय राष्ट्रीय महामार्ग विभागाच्या अभियंत्यांनी दिला. त्यामुळे नवीन पूल बांधूनही एकमार्गी वाहतुकीसाठी जुना पूल वापरात ठेवला. तोच जुना पुल मंगळवार, २ ऑगस्टला रात्री अकरा-साडेअकरा वाजता पुरात वाहून गेला. त्याबरोबर जयगड-मुंबई व राजापूर-बोरिवली या दोन एसटी बसेसही बुडाल्या. इतर काही वाहनेही वाहून गेली. या दुर्घटनेत जवळपास ४२ जणांना जीव गमवावा लागला. त्यातल्या काहींचे तर मृतदेहही मिळाले नाहीत. रायगड पोलीस, राष्ट्रीय आपत्ती निवारण पथकाचे (एनडीआरएङ्ग) जवान, नौदल आणि तटरक्षक दल आणि स्थानिक सेवाभावी संस्था यांच्याकडून महिनाभर शोधकार्य राबविण्यात आले. नौदल आणि तटरक्षक दलाने पाणबुड्या, हेलिकॉप्टरच्या सहाय्याने शोधकार्य सुरु केले. मुख्यमंत्री देवेंद्र ङ्गडणवीस, सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील, सार्वजनिक उपक्रम मंत्री एकनाथ शिंदे आणि विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील यांनी घटनास्थळी भेट दिली. यावेळी ङ्गडणवीस यांनी बचावकार्याचा आढावा घेतला आणि अधिकार्‍यांना आवश्यक सूचना दिल्या. 
  वास्तविक ब्रिटिश सरकारने २०१३ च्या सुमारास भारत सरकारला महाडच्या सावित्री पूलासह कोकणातील अन्य ३६ पुलांचे आयुष्य संपलेले असून ते कालबाह्य व वाहतूक करण्यास योग्य नाहीत असे कळविलेले आहे. स्थानिक रहिवाशांनीही जुना पूल धोकादायक झाल्याचे राष्ट्रीय महामार्ग विभागाच्या निदर्शनास आणून दिले होते. खरे तर स्थानिकांच्या सूचनांचा विचार करून त्याच वेळी जुन्या पुलावरील वाहतूक बंद केली गेली असती तर त्या ४२ निष्पाप लोकांचे जीव नक्कीच वाचले असते. मुंबई-गोवा महामार्गातील धोकादायक पुलांचे सर्वेक्षण २०१६ च्या मे महिन्यात तज्ज्ञ अभियंत्यांनी केले होते व त्याबाबतचा अहवालही त्यांनी संबंधित विभागाच्या उच्चपदस्थांकडे सोपवला होता. सर्वेक्षणात सुरक्षित पुलांच्या यादीत सावित्री नदीवरील महाडच्या जुन्या पुलाचाही समावेश होता. पण तोच जुना पूल वाहून गेला. या प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिले. दोषींवर कठोर कारवाई करण्यात येईल असे त्यांनी सांगीतले. पण दोषी कोण आढळले आणि त्यांच्यावर कोणती कारवाई झाली, हे अजून गुलदस्त्यातच आहे. पण त्यावेळी रायगडचे पालकमंत्री प्रकाश महेता यांची निष्क्रियता ठळकपणे समोर आली. त्यांच्या सेल्फीप्रकरणाने घटनेचे गांभीर्य पालकमंत्र्यांना किती आहे, असा प्रश्‍न निर्माण झाला. 
    ६ ऑगस्टला केंद्रीय रस्ते व राष्ट्रीय महामार्ग मंत्री नितीन गडकरी दुर्घटनास्थळी गेले तेव्हा त्यांनी  निविदा निघाल्यानंतर तेथे सहा महिन्यात नवा पूल बांधण्यात येईल, असे जाहीर केले. त्यानुसार त्यांनी दुर्घटनेनंतर दहाच महिन्यात १८० दिवसांचे उद्दीष्ट असताना नवा पूल १६५ दिवसात ३१ मे २०१७ रोजी पूर्ण केला. त्याचे उद्घाटन केंद्रीय रस्ते व राष्ट्रीय महामार्ग मंत्री नितीन गडकरी. मुख्यमंत्री देवेंद्र ङ्गडणवीस, केंद्रीय अवजड उद्योगमंत्री अनंत गीते यांच्या उपस्थितीत ५ जून २०१७ रोजी झाले. सावित्रीवर नवा पूल बांधला गेला पण इतर जुन्या पुलांचा प्रश्न कायम आहे. गोवा-मुंबई महामार्गावर रायगड जिल्ह्याच्या हद्दीत असे जुने १० च्या जवळपास ब्रिटीशकालीन धोकादायक पूल आहेत. त्यांचे दुखणे आहेच. पण सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकार क्षेत्रातीलही मार्गावर, गावांत ब्रिटीशकालिन पूल, तसेच स्वातंत्र्यानंतर बांधलेले अनेक पूल कमकुवत झाले आहेत, त्याचे कठडे कोसळले आहेत. तेही नूतनीकरणासाठी आक्रोश करीत आहेत. परंतु आक्रोश मुर्दाड व्यवस्थेला ऐकू येत नाहीत. सार्वजनिक बांधकाम विभागाने, राज्य सरकारने आता तरी ग्रामीण भागातील रस्ते आणि पूल यांच्या बाबतची उदासिनता सोडली तरच ती सावित्री पूल दुर्घटनेतील मृतांना खरी श्रद्धांजली ठरेल.

सोमवार, ३१ जुलै, २०१७

समुद्र पर्ससीन जाळ्याने घुसमटतोय... प्रदूषणाने तळमळतोय...

-उमाजी म. केळुसकर ⬑ दादागिरी ⬉


    रायगड जिल्ह्याला २४० कि.मी.चा विस्तीर्ण सागरी किनारा लाभला आहे. सुमारे २१,००० चौ.कि.मी. सागरी क्षेत्र (सुमारे १०० फॅदम खोलीपर्यंत) मासेमारीसाठी उपलब्ध आहे. पण वाढते प्रदूषण, नष्ट होणार्‍या काही माशांच्या प्रजाती, घटलेलं उत्पादन, शीतगृहांची कमतरता आणि सरकारी उदासीनता याचा ङ्गटका मत्स्य व्यवसायाला बसलाय. त्यामुळे रायगड जिल्ह्यातील मच्छिमार अस्वस्थ आहे. अर्थात या अस्वस्थततेने संपूर्ण राज्याच्या ७२० किलोमीटरच्या सागरी किनारपट्टीला ग्रासले आहे. मुंबई शहर, मुंबई उपनगर, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या सात सागरी जिल्ह्यांत ३ लाख ८६ हजार लोक मासेमारी व्यवसायावर अवलंबून आहे. या सार्‍यांमध्ये ही अस्वस्थता पहायला मिळते आहे. सात जिल्ह्यांत मासे उतरवण्यासाठी १७३ केंद्रे असून, त्या माध्यमातून सुमारे पाच लाख मेट्रिक टन मत्स्योत्पादन केले जाते. इतर राज्यांच्या तुलनेत हे कमी आहे. पावसाळ्यात  माशांचा प्रजननकाळ असल्याने दरवर्षी १ जून ते ३१ जुलै असे दोन महिने, म्हणजे ६१ दिवस शासनाच्या वतीने ट्रॉलर्स व यांत्रिक नौकांना मासेमारी बंदी लागू करण्यात येते. ही बंदी संपुष्टात आल्याने आज, १ ऑगस्टला ट्रॉलर्स व यांत्रिक नौका मच्छिमारीस सज्ज झाल्या  आहेत. त्यात पारंपरिक मासेमारी नौका, यांत्रिक नौका, ट्रॉलरची मासेमारी, निर्बंध घातलेले पर्ससीननेट, प्रदूषण असे विविध कंगोरे आहेत. दुखरी नस त्यातच आहे.
    भारतात १९६४ साली ट्रॉलर पद्धतीच्या मासेमारीची सुरुवात केरळ, कर्नाटक, गोवा या राज्यांत प्रथमत: झाली. त्याने निश्चितच मत्स्योद्योगाला चालना मिळाली. रोजगार वाढला. पण कालांतराने पारंपरिक मच्छिमार आणि ट्रॉलरधारक यांच्यातील आर्थिक दरी वाढत गेल्याने स्थानिक संघर्ष वाढू लागले. त्यातच १९७२ मध्ये भर पडली ती पर्ससीन जाळ्याची. हे जाळे कमी भोकाचे असून २ ते ५ कि.मी. लांबीचे असते. बटव्यासारखे असणारे हे जाळे भर समुद्रात यंत्राच्या साहाय्याने ओढले जाते आणि मोठ्या प्रमाणात मासळीचे साठे ओढले जातात. त्यातच प्रगत तंत्रज्ञानामुळे वेबसाइटच्या साहाय्याने समुद्रातील मत्स्यसाठे शोधून काढणे सुलभ होऊ लागले. यांत्रिक बोटी माठ्या प्रमाणात मासेमारी करू लागल्या. पण या प्रगतीबरोबरच पावसाळी हंगामातील अंड्यावरील मासा जाणे, पर्ससीनसारख्या जाळ्यांचा पारंपरिक सागरी क्षेत्रात अनियंत्रित शिरकाव, मत्स्यबीजांचा नाश आणि सागरी प्रदूषण यामुळे मत्स्यव्यवसायातील घट वाढत गेली आणि त्याचे गंभीर आणि दूरगामी परिणाम सागरी परिसंस्थेवरही होत राहिले. पर्ससीन ट्रॉलर्समुळे महाराष्ट्राच्याही पारंपरिक मच्छिमारांच्या १२ हजार यांत्रिक व ११ हजार बिगर यांत्रिक अशा एकूण २३ हजार मच्छिमार नौकांच्या व्यवसायास ग्रहण लागले. सागरी किनारपट्टीवरील सात जिल्ह्यांत ४५६ मासेमारी गावे आहेत. या गावांतील ८१ हजार ४९२ कुटुंबांतील जवळपास ३ लाख ८६ हजार लोक मासेमारीच्या आनुषंगिक व्यवसायांत आहेत. या सर्वांना पर्ससीन ट्रॉलर्सविरुद्ध लढा उभारण्याशिवाय पर्याय राहिला नाही. दीर्घकाळ लढा दिल्यानंतर महाराष्ट्र शासनाने राज्यातील पर्ससीननेट मासेमारी (अतिशय कमी आकाराच्या आसाची जाळी ज्यामुळे प्रजननक्षम मत्स्यबीजांचा नाश होतो) व तिचा पारंपरिक मासेमारीवर व राज्याच्या सागरी किनार्‍याच्या पर्यावरणावर होणार्‍या परिणामांचा अभ्यास करण्यासाठी २०११ साली डॉ. व्ही.एस. सोमवंशी यांच्या अध्यक्षतेखाली शोध समितीची स्थापना केली. या समितीने तयार केलेला अहवाल स्वीकारुन महाराष्ट्र शासनाने ५ फेब्रुवारी २०१६ रोजी त्यासंदर्भात अधिसूचना पारित केली. 
    अधिसूचनेनुसार पर्ससीन ट्रॉलर्सची संख्या ४९५ ऐवजी ङ्गक्त १८२ पर्यंत ठेवण्यात आली. पर्ससीननेटवर निर्बंंध घातले. डहाणू ते मुरुड-जंजिरापर्यंत कायमस्वरूपी पर्ससीननेट मासेमारीला बंदी घालण्यात आली, तर मुरुड जंजिरा ते बुरंडी, बुरंडी ते जयगड व जयगड ते बांदा पट्ट्यात सप्टेंबर ते डिसेंबर या चार महिन्यांसाठी पर्ससीन मासेमारीला परवानगी दिली. हायड्रॉलिक विंचच्या साह्याने पर्ससीन जाळे ओढण्यास तसेच रसायनांचा वापर करून माशांना भूल देऊन पकडण्यास बंदी घातली. पर्ससीननेट मासेमारीला बंदी घातल्याने अशी मासेमारी पूर्णपणे बंद झालेली नाही. अनधिकृतपणे ती सुरुच आहे. त्यावरुन स्थानिक सरकारी यंत्रणेच्या कारवाईअभावी या यंत्रणांमध्ये आणि मच्छिमारांमध्ये संघर्ष दिसून येतो. असे असले तरी काही प्रमाणात या बंदीने पारंपरिक मच्छिमारांना मोठा आधार वाटतो आहे. एकीकडे असे काहीसे आश्‍वासक वातावरण असतानाच प्रदूषणाने मत्स्य उत्पादनाला फटका बसत असल्याचे दिसत आहे. समुद्रकिनार्‍यांवर थेट सोडण्यात येणार्‍या सांडपाणी आणि केमिकलयुक्त पाण्यामुळे मासळीसाठे नष्ट होत आहेत, ही बाबही गांभीर्याने घेतली पाहिजे. रायगड जिल्ह्याला लाभलेला समुद्र आणि खाड्याही अनेक रासायनिक कंपन्यांतून होणार्‍या प्रदूषणामुळे तळमळत आहेत. त्याचा परिणाम मत्स्य उत्पादनावर होतोय. माशांच्या काही जाती नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत. पापलेट, झिंगा, सुरमई, माकुल या माशांचं उत्पादन घेतलं जात असलं तरी जिताडे, पाला, रावस, दाडा, ताम, वाम आणि शेवंड या माशांचं उत्पादन कमी झालंय. सागरी प्रदूषण असंच चालू राहील, तर या माशांचं उत्पादन थांबेल आणि त्याचे दुष्परिणाम मत्स्य व्यवसायावर होतील. 
    जिल्ह्यातील समुद्र आणि खाड्यालगतची सुमारे १०३ गावे या मत्स्यव्यवसायात गुंतलेली आहेत. त्यातील ११ हजार ६२० कुटुंबांतील ६९ हजार ४७ जण मासेमारी व्यवसायावर अवलंबून आहेत. यात पूर्ण वेळ मासेमारी करणारे १६ हजार ५२३  मच्छिमार असून अर्धवेळ मासेमारी करणारे १३ हजार ५२१ मच्छिमार आहेत. एकूण ३९ मासेमारी केंद्रांतून मासे पकडणे व विक्रीचे व्यवहार होतात. मोरा-करंजा, अलिबाग, रेवदंडा, मुरुड आणि श्रीवर्धन हे पाच मासेमारी विभाग आहेत. मासेमारीसाठी वावरी, सारंगा, घोळ, बुढी, रामपान, करेल, धनगड, डोल, म्होर, चिराटे, कात्रा, माजोला, खोला, पाग आणि गळांच्या आकड्याची जाळी वापरतात. ही जाळी नॉयलॉनच्या धाग्यापासून तयार करतात. या व्यवसायासाठी ४ हजार ९४३ नौका वापरात आहेत. यामध्ये १ हजार ४९९ बिगर यांत्रिकी, तर ३ हजार ४४४ यांत्रिकी नौका आहेत. या व्यवसायातून दरवर्षी साधारणपणे ४५ हजार मेट्रिक टन मत्स्य उत्पादन घेतले जात असे. गेल्या पाच वर्षांत मात्र मत्स्य उत्पादनात सातत्याने घट झाली आहे. २०११-२०१२ मध्ये रायगड जिल्ह्यात ४६ हजार ९१२ मेट्रिक टन असणारे मत्स्य उत्पादन, २०१५-२०१६ मध्ये घटून ३९ हजार ५३ मेट्रिक टनावर आले आहे. म्हणजेच गेल्या पाच वर्षांंत जिल्ह्यातील मत्स्य उत्पादनात तब्बल आठ हजार मेट्रिक टनाची घट झाली आहे. मत्स्योत्पादनात घट होण्याच्या प्रदूषणाखेरीजच्या अन्य कारणांमध्ये प्रजोत्पादनाच्या काळातच मासे पकडले जाणे, प्रजोत्पादनयोग्य होण्याआधीच मासे पकडले जाणे, तिवरांची कत्तल यासुद्धा प्रमुख बाबी आहेत. या बाबींकडेही गांभीर्याने पाहण्याची गरज आहे. 
    ३० टक्के माशांची युरोप, जपानसारख्या देशात निर्यात केली जात असली तरी मत्स्य निर्यातीला प्रोत्साहन देणारा एकही प्रकल्प जिल्ह्यात नाही. शीतगृह, मत्स्य प्रक्रिया केंद्र सुरू होऊ शकलेलं नाही. नाही म्हणायला केंद्र शासनाच्या साह्याने ७५ टक्के अनुदानावर जिल्ह्यातील करंजा येथे राज्यातील मच्छिमारांनी पकडलेली मासळी किनार्‍यावर उतरविणे, त्यांच्या साठवणुकीसाठी कोल्ड स्टोरेज, खरेदी विक्री व्यवहारासाठी निवारा व इतर मुलभूत सुविधासह एकाचवेळी सुमारे ८०० मासेमारी नौकांद्वारे २७ हजार मेट्रिक टन मत्स्यसंपदा उतरवू शकणारे अद्ययावत असे सुसज्ज मासेमारी बंदर उभारण्याचे शासनाने पाऊल उचलले. २ नोव्हेंबर २०१२ ला बंदराच्या प्रत्यक्ष कामाला सुरुवात झाली. हे बंदर २०१७ ला पूर्ण होणार होते. मात्र २०१७ साल उजाडले तरी ब्रेक वॉटर बंधारा वगळता इतर कामे अपूर्ण आहेत. ६८ कोटींचा हा प्रकल्प आता दोनशे कोटींच्या घरात गेला आहे आणि केंद्र शासनाने हात वर केले आहेत. त्याने प्रकल्पाला अर्थसाहाय्य करण्याचे सूत्र आता ५०-५० टक्के असे केले आहे. केंद्रात नरेंद्र आणि राज्यात देवेंद्र सरकार आहे, देवेंद्र सरकारने राज्यातील पर्ससीन नेटचा प्रश्‍न आधीच सोडविला आहे. त्यामुळे करंजा बंदराचा प्रश्‍न लवकरच मार्गी लागायला हरकत नाही. रायगड जिल्ह्यात मच्छिमारांसाठी एकही मोठे मासेमारी बंदर नसल्याने आजही बहुतांश  मच्छिमार हे व्यापारासाठी मुंबईतील ससून डॉकवर अवलंबून आहेत. करंजा येथे सुसज्ज मच्छिमारांसाठी बंदर झाल्यास मच्छिमारांना हक्काचे बंदर मिळेल. अलिबाग, मुरुड आणि श्रीवर्धन येथील बंदरेही सुसज्ज केली तर ती जिल्ह्यातील मच्छिमारांसाठी फायद्याची ठरतील. पण त्यासाठी राजकीय आणि शासकीय इच्छाशक्तीची गरज आहे.
    शासनाचे ठोस मत्स्यधोरण नसल्याने जिल्ह्यातील मच्छिमारांसमोर अनंत अडचणी आहेत. सातत्याने होणारे हवामानातील बदल, वाढते औद्योगिकरण, आधुनिकतेचा ढळलेला समतोल आणि सरकारी उदासीनता याने जिल्ह्यातील शेतकर्‍यांना संकटाच्या खाईत ढकलले आहे. शेतीपाठोपाठ आता मासेमारी व्यवसायही धोक्यात आला आहे. सर्व मच्छिमार मग ते छोटे असोत की मोठे, त्यांनी या धोक्याला तोंड देताना सागरी परिसंस्थेचे संवर्धन, संरक्षण करणे ही ङ्गक्त पूर्वापार छोट्या प्रमाणात मासेमारी करणार्‍या मच्छिमारांची जबाबदारी नसून आधुनिक पद्धतीने मोठ्या प्रमाणात मासेमारी करणार्‍या मत्स्य व्यावसायिकांची पण तितकीच जबाबदारी आहे, हे लक्षात घेतले पाहिजे. अशा प्रकारची सांघिक जबाबदारी दाखवल्याखेरीज समुद्र वाचणार नाही. मासा जगला तर मच्छिमार जगेल, पण त्यासाठी मच्छिमारांकडून नैतिक जबाबदारीयुक्त वर्तन अपेक्षित आहे. तसेच सरकारकडूनही सागरी प्रदूषणाविरुद्धच्या नैतिक वर्तनाची अपेक्षा आहे. तसे झाले तरच समुद्र आणि मच्छिमार वाचेल. 


बुधवार, २६ जुलै, २०१७

समाजाला पर्यटन साक्षर करण्याची गरज

 -उमाजी म. केळुसकर ⬑ दादागिरी ⬉


     रायगड जिल्ह्याला निसर्गाचा संपन्न असा वारसा असल्यामुळे जिल्ह्यात पर्यटकांचा ओघ वाढतो आहे. पावसाळा असो, हिवाळा असो, वा उन्हाळा असो, रायगड जिल्हा पर्यटकांनी बहरलेला असतो. जिल्ह्यात पर्यटन वाढतेय ही आनंदाची बाब आहे, परतु या आनंदाला पर्यटकांचा अतिउत्साह आणि जिल्हा प्रशासनाची पर्यटनविषयक अनास्था यामुळे अपघातांची काळी किनार लागत असल्याचे गेल्या काही वर्षांत प्रामुख्याने दिसून येत आहे. या पंधरवड्यात पावसाळी पर्यटनासाठी आलेल्या पर्यटकांनी निसर्गाची अती सलगी केल्यामुळे एकट्या कर्जत तालुक्यात ११ जणांचे बळी गेले आहेत. इतर तालुक्यांमधूनही दुर्घटनांमध्ये पर्यटकांच्या मृत्यूच्या घटना समोर येत आहेत. गेल्या पंधरा महिन्यात जिल्ह्यामध्ये ३० पर्यटकांचा समुद्रात बुडून मृत्यू झाला आहे. जिल्ह्यात अशा प्रकारच्या घटना सातत्याने घडत असल्यामुळे ही जिल्हा प्रशासनासाठी चिंतेची बाब आहे. काही ठिकाणी पर्यटकांना जाण्यास बंदी घालून हा प्रश्‍न सुटणार नाही. या दुर्घटना थांबविण्यासाठी जिल्हा प्रशासनाने पर्यटकांच्या सुऱक्षिततेसाठी भक्कम पावले उचलली पाहिजेत, त्याबरोबरच जिल्हा प्रशासन आणि पर्यटनविषयक संस्था, तसेच विविध सामाजिक संस्था यांनी संयुक्तपणे समाजात पर्यटन साक्षरता निर्माण करण्याचा प्रयत्न करणे गरजेचे आहे.
      रायगड जिल्हा रस्त्यांवर पडलेल्या खड्ड्यांनी विव्हळतोय, प्रवाशांची हाडं या खड्ड्यांमुळे खिळखिळी बनताहेत, या खड्ड्यांमुळे पर्यटकांना जिल्ह्यात पावसाळी पर्यटनासाठी काही मर्यादा पडत असल्या तरी येथील धबधबे, धरणे, तलाव, नद्या, समुद्र किनारे, डोंगरदर्‍या पर्यटकांसाठी आकर्षणकेंद्रे ठरत आहेत, त्यामुळे सगळ्या अडचणींवर मात करुन ते तिकडे धाव घेत आहेत. शनिवार, रविवारी तर अशा ठिकाणांना जत्रेचे स्वरुप येते. फरक इतकाच असतो की खर्‍या जत्रेत आकाशपाळणे, मेवामिठाईची दुकाने असतात, या पर्यटकांच्या जत्रेत ठाई ठाई निसर्गसौंदर्याची नवलाई असते. अशा निसर्गाचा मान राखत, मर्यादा राखत आस्वाद घेऊन, एक वेगळीच ऊर्जा रोमारोमात साठवून पर्यटक परतीची वाट चालतात. दुर्दैवाची बाब म्हणजे सर्वच पर्यटक या निसर्गसौंदर्याचा आस्वाद घेण्यासाठी आलेले नसतात. निसर्गातून त्यांना ऊर्जा नको असते, तर दारुतून त्यांना ऊर्जा पाहिजे असते, त्यामुळे दारु पिऊन बेभान होऊन तेथे धिंगाणा घालतात, दारुच्या बाटल्या फोडून तेथेच टाकून तेथील परिसराचा अक्षरश: उकिरडा बनवतात, जणू काही ही माणसं नाही, तर डुकरं आहेत असे त्यांचे वर्तन असते. त्या वर्तनाचा त्रास बहुसंख्य पर्यटकांना होतो. फुटलेल्या दारूच्या बाटल्यांनी जखमी होण्याच्या घटना सर्रास घडतात. हे बेवडे येथील शेतांत, समुद्र किनारी दारुच्या बाटल्या फोडून टाकून जातात, त्याचा त्रास शेतकर्‍यांना, शेतमजुरांना, समुद्रकिनारी फिरायला येणार्‍यांना अतोनाच त्रास होतो. बेवड्या पर्यटकांमुळे पर्यटन बदनाम होते, त्यात अतीउत्साही पर्यटकांनीही पर्यटन बदनाम होत आहे. समुद्र, नद्या, धबधबे, डोंगरदर्‍या यांच्याशी उतावीळपणे दंगामस्ती करू नये, याचे भान राखले जात नसल्याने रायगड जिल्ह्यात मोठ्याप्रमाणात दुर्घटनांत पर्यटकांचे बळी जात आहेत. यातून पर्यटकांनीही धडा घेणे आवश्यक आहे, पण तसा तो घेतला जात नाही. 
      विविध वयोगटातील, स्तरातील पर्यटक पहायला मिळतात. काहीजण तर आपल्या पालकांना न सांगता पर्यटनासाठी येतात. महाविद्यालयीन, तसेच विविध कंपन्यांतील तरुण-तरुणी, समूहाने पावसाळी निसर्गाचा आनंद लुटाण्यासाठी जिल्ह्यातील विविध ठिकाणी येतात. तो परिसर त्यांना पूर्णपणे माहितीही नसतो. अशा परिस्थितीत तारुण्याच्या मस्तीत काही तरुण-तरुणी धोकादायक धबधब्याखाली स्नान करणे, नदीच्या-ओढ्याच्या प्रवाही पाण्यात उतरणे, समुद्राच्या पाण्यात खोलवर शिरणे, अशी दंगामस्ती करतात. गेल्या काही वर्षात वाहनांची मुबलकता झाल्यामुळे, पाच दहा जणांची टोळकी वाहनांतून पावसाळी सहलीचा आनंद लुटायसाठी येतात. भरधाव वेगाने वाहने चालवणे. डोंगरातल्या कड्याकपारीतून चालत जाणे, वाटा माहिती नसलेल्या जंगलात घुसणे, असे प्रकार नित्यनियमाने घडतात. पावसाळ्यात डोंगरवाटा निसरड्या झाल्यामुळे, पाय घसरून दरीत कोसळायचा धोका अधिक असतो. त्या परिसरातील लोकही अमक्या ठिकाणी जावू नका, ती वाट धरू नका, असे पर्यटकांना आवर्जून सांगतात. पण, त्यांचा सल्ला धुडकावून काही तरुण-तरुणी त्या बाजूला जातात आणि अपघातांचे बळी होतात. त्यामुळे या सर्वाचे खापर पूर्णपणे जिल्हा प्रशासनावर फोडणे योग्य होणार नाही, हेही खरे आहे.
      पर्यटकांनी आपण पर्यटनासाठी आलो आहोत, निसर्गात रममाण होण्यासाठी आलो आहोत, धिंगाणा घालण्यासाठी नाही, मर्यादांचे उल्लंघन करण्यासाठी नाही, हे लक्षात घेतले पाहिजे. पण धोक्याचा इशारा देणारेे फलक न वाचणे, वाचूनही धोक्याच्या इशार्‍याकडे दुर्लक्ष करणे, स्थानिक नागरिकांचा सल्ला धुडकावणे असे प्रकार पर्यटक करतात आणि त्यांना मोठ्या संकटांना सामोरे जावे लागते. समुद्रस्नानाचा आनंद लुटू पाहणार्‍या पर्यटकाचा बुडून मृत्यू अशा आशयाच्या बातम्या पूर्वीच्या तुलनेत अधिक वाचायला मिळतात. समुद्र तोच आहे, तेच समुद्र किनारे आहेत. त्यांच्या मर्यादा पर्यटक ओलांडतात आणि समुद्राला दोष दिला जातो. अनेक ठिकाणी पर्यटक पिऊन समुद्रात उतरतात, किंवा समुद्रस्नान करताना पिण्याचा आनंद लुटतात. मोठ्याप्रमाणात पर्यटक तरुण आणि तरुणी असा एन्जॉय करताना सगळीकडे पाहायला मिळतात. समुद्राच्या भरती-ओहटीचा अभ्यास न करता खोलवर समुद्रात घुसल्यामुळेही पर्यटकांना आपल्या जीवास मुकावे लागते. काही ठिकाणी लाइफगार्ड ठेवण्यात आले असले तरी अशा घटना घडतातच. पर्यटकांनी आपली बेपर्वा वृत्तीही सोडली तर बर्‍याच दुर्घटनांवर अंकुश बसेल यात वाद नाही. स्थानिकांनीही पर्यटक आपले वैरी असल्यासारखे त्यांच्याशी वर्तन करु नये आणि पर्यटकांनीही स्थानिकांच्या संयमाची परीक्षा पाहू नये. रायगडच्या महसुलात पर्यटनामुळे भर पडत आहे, अनेक व्यवसाय त्यामुळे भरभराटीस आले असून बेरोजगारांना रोजगाराच्या संधीही प्राप्त झाल्या आहेत, हे लक्षात घेतले पाहिजे.
    पर्यटन ही गोष्ट वाईट नाही, पर्यटन हे जीवनात आनंद निर्माण करण्यासाठी, जीवनातील मरगळ घालवण्यास उपयोगी पडते. पर्यटनाचा उद्देशही तोच असावा, पण हा उद्देश विसरुन निसर्गाची छेडछाड केली जाते आणि येथूनच शोकांतिकेला सुरुवात होते. पर्यटन दारु पिण्यासाठी आणि धिंगाणा घालण्यासाठी असेल तर सुरक्षितता तरी कोण आणि कशी देईल? पर्यटकांनीही आपल्या सुरक्षेची काळजी घेतली तर ती त्यांच्याच हिताची आहे. मुळात रायगड जिल्ह्यात पर्यटनाकडे फार गांभीर्याने पाहिले जात नाही. पर्यटनाच्या माध्यमातून रायगडचा विकास करता येणे शक्य आहे. पण सरकारची रायगडच्या विकासाबाबतची माध्यमे वेगळी आहेत. त्यात पर्यटन बसत नाही. औद्योगिकरण हेच जिल्ह्याचे भले करेल, मग भले रासायनिक कारखानदारीने येथील समुद्र, नद्या-नाले नासवले तरी चालेल ही तिची भावना आहे. भाताचं कोठार म्हणून ओळखला जात असतानचा संपूर्ण रायगड जिल्हा कृषीपर्यटनाचं केंद्र होतं. आता मात्र औद्योगिक जिल्हा म्हणून ओळखल्या जाणार्‍या रायगडमध्ये कृषीपर्यटन असं असतं हे सांगावं लागत आहे. त्यासाठी अशी केंद्रे विकसित करण्यात आली आहेत. जिल्ह्यातील शेतीक्षेत्र प्रचंड प्रमाणात घटलं, उद्या तथाकथित विकासाच्या वाटेवर आजचा उरलासुरला निसर्गसंपन्न रायगड जिल्हा बेचिराख झाला, तर या जिल्ह्याच्या पर्यटनक्षेत्राचे काय होईल ही चिंताही मोठी आहे. रायगडच्या पर्यटनाला चिंतेचे वेगवेगळे कंगोरे आहेत. या कंगोर्‍यात आता गेल्या काही वर्षांपासून दुर्घटनांची वाढ झाली आहे. ही वाढ रोखण्याच्या दृष्टीने जिल्हा प्रशासनाने पावले उचलली पाहिजेत. त्यासाठी पर्यटन साक्षरतेची मोहीम पर्यटन संस्था, सामाजिक संस्थाच्या सहकार्याने राबविली पाहिजे. ही मोहीम राज्यपातळीवरही राज्यशासनाने राबवून पर्यटनविषयक जागृती घडविली पाहिजे. कारण पर्यटन निरक्षरतेचा प्रश्‍न हा रायगडपुरताच मर्यादित नाही आणि पर्यटन साक्षरतेची मोहीम जिल्ह्याबाहेरही राबविला गेली तर निदान रायगडातच नव्हे तर इतर जिल्ह्यांतही पर्यटनसाक्षर पर्यटकांचा वावर सुरु होऊन दुर्घटनांचे प्रमाण कमी होईल आणि जिल्हा प्रशासन, पोलिस यंत्रणा यावर ताण पडणार नाही. 


मंगळवार, ११ जुलै, २०१७

पेण अर्बन बँक घोटाळ्याच्या ग्रहणाविरूद्ध सुरु आहे निकराचा संघर्ष

 -उमाजी म. केळुसकर ⬑ दादागिरी ⬉


     ७५ वर्षांच्या इतिहासाची बिरुदावली मिरवणार्‍या रायगड जिल्ह्यातील पेण को-ऑपरेटिव्ह अर्बन बँकेच्या संचालकांनी २०१० साली ७५८ कोटी रुपयांच्या घोटाळा करुन रायगडमधील गोरगरिबांच्या आयुष्यभराच्या जमापुंजीला कुलूप लावलं. कुणी जमीन विकून आलेले पैसे बँकेत ठेवलेले, कुणी मुलीच्या लग्नासाठी, कुणी मुलाच्या शिक्षणासाठी, तर कुणी उतारवयात उपयोगी येतील म्हणून ठेवलेल्या सार्‍या पैशांची संचालकांनी खुद्द रिझर्व्ह बँकेच्या अधिकार्‍यांच्या संगनमताने लूट केली. अशाप्रकारे पेण को-ऑपरेटिव्ह अर्बन बँक ही गेल्या २० वर्षांत ठेवीदारांना बुडवणारी रायगड जिल्ह्यातली तिसरी सहकारी बँक ठरली. याआधी रोहा अष्टमी अर्बन बँक आणि गोरेगाव अर्बन बँकेच्या गैरव्यवहारापायी लाखो ठेवीदार कंगाल झाले. पेण अर्बन बँकेचे ठेवीदार-खातेदार मात्र या पेण अर्बन बँकेतील घोटाळेबाजांविरुद्ध संघटित झाले. त्यांनी आपल्या ठेवीदार-खातेदार संघर्ष समितीद्वारेे गेली साडेसहा वर्षे लढा चालू ठेवला आहे. या त्यांच्या लढ्यामुळेच या बँकेचे भ्रष्ट अध्यक्ष शिशिर धारकर आणि त्यांच्या टोळीच्या मुसक्या आवळल्या गेल्या, आज ते जामिनावर बाहेर असले तरी सर्वसामान्यांनी संघटितपणे मनात आणले घोटाळेबाज राजकारण्यांना तुरुंगाचे गज दाखवू शकतो, हे दाखवून दिले. त्यानंतर आता ठेवीदार-खातेदार संघर्ष समितीच्या अथक प्रयत्नांनी, संघर्षांनी लहान खातेदार-ठेवीदारांच्या ठेवी परत मिळण्याचा मार्ग देखील मोकळा झाला आहे. त्याबद्दल या संघर्ष समितीचे, नरेंद्र जाधव, आ. धैर्यशील पाटील व त्यांच्या सहकार्‍यांचे करावे तेवढे अभिनंदन थोडेच आहे. 
       पेण अर्बन बँक ठेवीदार-खातेदार संघर्ष समितीचे सातत्यपूर्ण प्रयत्न व पाठपुरावा हा या बँकेच्या छोट्या-मोठ्या ठेवीदार-खातेदारांसाठी भरभक्कम आधार राहिला आहे. वास्तविक त्यांनी स्वत: संघटित होऊन स्वत:ला आधार दिला आहे. पेण अर्बन बँक अवसायनात काढण्याचा आयुक्त व निबंधक सहकारी संस्था, पुणे यांनी २९ एप्रिल २०१४ रोजी पारित केलेला आदेश राज्याचे तत्कालिन सहकार मंत्री चंद्रकांत पाटील यांनी रद्द केल्यामुळे आणि पेण अर्बन बँक ठेवीदार-खातेदार संघर्ष समितीने उच्च न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेमुळे नियमित कर्जदारांच्या कर्जाच्या वसुलीतून २०१५ ला १२ हजार ५८३ ठेवीदारांना त्यांच्या काही हजारांच्या ठेवी परत मिळाल्या असल्या, तसेच २०१७ या चालू वर्षांत  १८ हजार ठेवीदारांना त्यांच्या काही हजारांच्या ठेवी परत मिळणार असल्या तरी लाखो ठेवीदार-खातेदारांचा प्रश्‍न अजूनही सुटलेला नाही. त्यासाठी अजूनही संघर्ष करावा लागतो आहे. ठेवीदार संघर्ष समिती जिल्हाधिकारी कार्यालयाच्या पायर्‍या झिजवून प्रशासनाला सतत जागे ठेवण्याचा प्रयत्न करते आहे. उपोषण, मोर्चे, लॉगमार्च, मंत्र्यांना निवेदने, इतके करुनही तत्कालिन आणि विद्यमान राज्यशासन आणि जिल्हा प्रशासनाच्या उदासिन भूमिकेने आजही त्यांना अथक संघर्ष करावा लागत आहे. हा संघर्ष केला नसता तर आज जी काही रक्कम सर्वसामान्य ठेवीदारांना-खातेदारांना मिळते आहे, तीही मिळाली नसती, हे भयानक वास्तव आहे.
       २३ सप्टेंबर २०१० चा दिवस पेण को-ऑपरेटिव्ह अर्बन बँकेच्या १८ शाखांतील १,९२,००० लाख खातेदार व ठेवीदारांच्या जीवनातील काळाकुट्ट दिवस ठरला. रिझर्व्ह बँकेने नोटीस पाठवून बँकेचे व्यवहार अचानक ठप्प करुन टाकले. कारण या बँकेच्या अध्यक्षाने, संचालक मंडळाने स्वत: पैशांची चंगळ करुन बँक कंगाल करुन टाकली होती. पेण अर्बन बँकेच्या संचालक मंडळाने ही बँक जणू काही आपलीच खासगी मालमत्ता आहे, अशा रीतीने कर्जवाटप केले होते. त्यासाठी खोटे दस्तऐवज तयार केले गेले, अस्तित्वात नसलेल्या कर्जदारांना कर्ज दिली गेली, कर्जदार असणार्‍या व्यक्तीला दुसर्‍या कर्ज प्रकरणात जामीनदार दिले गेले. अशाप्रकारे अनेक नियम धाब्यावर बसवून कोट्यवधी रुपयांची कर्जे वितरित केली गेली. हा सर्व आर्थिक घोटाळा सुमारे ७५८ कोटी रुपयांचा आहे. त्यासाठी १२८ बनावट कर्जप्रकरणे केली गेली. या आर्थिक घोटाळ्याला २०००-०१ साली सुरुवात झाली होती. असे असूनही सरकारी ऑडिटर्सनी आपल्या वार्षिक ऑडिट रिपोर्टमध्ये बँकेला सातत्याने ‘अ’ वर्ग दर्जा दिला होता. रिझर्व्ह बँकेनेही पेण अर्बन बँकेला २००९ अखेर पर्यंत दुसरा वर्ग दिला होता. याचा अर्थ रिझर्व्ह बँकही पेण अर्बन बँकेबाबत उदार होती. या बँकेचा कारभार व्यवस्थित चालला आहे, असे स्पष्ट चित्र दिसत असल्यामुळे खातेदार आणि ठेवीदारांना अध्यक्ष आणि संचालक मंडळाच्या घोटाळ्याची शंका येण्याचे कारणच नव्हते. पण शंका नसलेलेच घडले आणि ते घडणाच होते, परंतु त्याने सहकारासमोरच प्रश्‍नचिन्ह उभे राहिले.
       रिझर्व्ह बँकेने पेण अर्बन बँकेच्या आर्थिक व्यवहारावर २३ सप्टेंबर २०१० रोजी निर्बंध घातले. ७ ऑक्टोबर २०१० ला पेण बँकेवर प्रशासकाची नियुक्ती झाली. प्रशासकांनी १२८ बोगस कर्जदारांची यादी जाहीर केली. ताबडतोब ८ ऑक्टोबर २०१० ला  ठेवीदार-खातेदारांची संघर्ष समिती स्थापन करण्यात आली आणि आपले पैसे परत मिळावेत यासाठी लढा सुरू झाला. १४ ऑक्टोबर २०१० ला सर्व राजकीय पक्षांनी ‘रायगड बंद’ आंदोलन केले. २० मार्च २०११ रोजी पेण अर्बन बँकेतील गैरव्यवहारप्रकरणी संबंधितांवर कारवाई करण्यासाठी संघर्ष समितीने आमरण उपोषण सुरू केले. त्यानंतर २१ मार्च २०११ रोजी बँकेचे अध्यक्ष, संचालक, अधिकारी व लेखा परीक्षक यांच्याविरुद्ध ङ्गौजदारी गुन्हा दाखल केला. २५ मार्च २०११ ला वडगाव येथील रिसॉर्टवर पोलिसांनी छापा टाकून १४ संचालकांना अटक केली. ३० मार्च २०११ ला  ऍलन धारकर आणि संतोष श्रृंगारपुरे यांच्यासह १० संचालकांना आणि कर्मचार्‍यांना अटक करण्यात आली. २ एप्रिल २०११ ला बँकेचे अध्यक्ष शिशिर धारकर आणि बँकेचे मुख्याधिकारी पुरुषोत्तम जोशी यांना मुंबईतून अटक करण्यात आली. त्यानंतर २८ एप्रिल २०११ ला ठेवीदार-खातेदार संघर्ष समितीने मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली. २८ सप्टेंबर २०११ ला ऑडिटर जैथवार यांना अटक करण्यात आली. पण १९ ऑक्टोंबर २०११ ला शिशिर धारकर यांना जामीन मंजूर झाला. असा हा वेगवान घटनाक्रम दिसत असला तरी त्यासाठी ठेवीदार-खातेदार यांनी प्रंचड संघर्ष करावा लागला. प्रदीर्घ लढ्यानंतर उच्च न्यायालयाच्या आदेशामुळे बँकेच्या नियमित कर्जदाराच्या कर्जवसुलीतून सप्टेंबर-ऑक्टोबर २०१५ या काळात रु.१०,०००/- पर्यंत ठेवी असणार्‍या १२ हजार ५८३ ठेवीदारांना ४ कोटी ६८ लाख २५ हजार रुपये परत करण्यात आले. त्यामुळे काही ठेवीदारांना दिलासा मिळाला, पण असंख्य ठेवीदार न्यायापासून वंचित होते आणि आहेत, ही बाब लक्षात घेता ठेवीदार संघर्ष समितीने उच्च न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेवरील २८ एप्रिल २०१७ रोजीच्या सुनावणीच्या वेळी २५ हजार रुपये मुद्दल जमा असलेल्या ठेवीदारांना रक्कम वाटप करण्याचे आदेश न्यायालयाने दिले. त्यानुसार ही प्रक्रिया आता सुरू करण्यात आली आहे. त्यानुसार जवळपास १८ हजार खातेदारांना २७ कोटी २५ हजार रुपये इतकी रक्कम मिळू शकणार आहे. ही रक्कम नियमित कर्जदारांच्या कर्जाच्या ५७ कोटीच्या वसुलीतून दिली जाणार असली तरी तत्कालिन आणि विद्यमान राज्य शासन आणि जिल्हा प्रशासनाच्या उदासिनतेमुळे १२८ बोगस कर्जखात्यातील ७५८ कोटी रुपयांची वसुली झालेली नाही. ती होण्याबाबत न्यायालयाच्या निर्णयानंतरही वेगवान पावले उचलली जात नाही, त्यामुळे न्याय अजून दृष्टीक्षेपात आला आहे, असे म्हणता येणार नाही.
       १२८ बोगस कर्ज खात्यांद्वारे ७५८ कोटी रुपयांची लूट करून दोन लाख ठेवीदार-खातेदारांना रस्त्यावर आणणार्‍या अध्यक्ष, संचालक, अधिकारी, पदाधिकारी, ऑडिटर या सर्व महाघोटाळेबाजांच्या मालमत्ता जप्तीची प्रक्रिया चालू आहे. मुंबई उच्च न्यायालयाचे संबंधित मालमत्तांची विक्री वा लिलाव करून ठेवीदारांना त्यांंच्या ठेवी परत करण्यासाठी तातडीने कार्यवाही करण्याचे आदेश आहेत. त्यासाठी मुंबई उच्च न्यायालयाच्याच आदेशान्वये जिल्हाधिकार्‍यांच्या अध्यक्षतेखाली पेण अर्बन बँक विशेष कृती समिती स्थापन करण्यात आली. पण जिल्हाधिकार्‍यांच्या उदासिनतेमुळे तपास आणि जप्तीची कार्यवाही अतिशय संथ गतीने सुरु आहे. मुंबई उच्च न्यायालयाने अनेकवेळा तपासाच्या प्रगतीबाबत तीव्र नाराजी व्यक्त करून अनेक निर्देश दिले आहेत. वास्तविक पनवेल नैना प्रकल्पामधील पेण अर्बन बँकेच्या ३९ मालमत्तांच्या विक्रीची प्रक्रिया पूर्ण केली तर ५८१ कोटी बँकेत जमा होतील. या मालमत्तांच्या विक्रीकरिता मुख्यमंत्री देवेंद्र ङ्गडणवीस यांनी तत्त्वत: मान्यता देखील दिली आहे, तर मुंबई उच्च न्यायालयाने या मालमत्तांवरील अंमलबजावणी संचालनालयाचे बोजे उतरवण्याचे आदेश ७ ऑक्टोबर २०१६ रोजी दिले आहेत. अशा परिस्थितीत या मालमत्ताची विक्री करून पैसे बँकेत जमा करून ठेवीदारांना त्यांचे पैसे परत देणे शक्य आहे, परंतु ही कार्यवाहीच करण्यात येत नाही, यात कसले पाणी मुरते आहे, हा मोठा प्रश्‍न आहे. विद्यमान राज्यशासन एकेबाजूला सकारात्मक दिसत असले तरी दुसर्‍याबाजूला कृती अतिशय संथ आहे, त्यामुळे ठेवीदार-खातेदार संघर्ष समितीला अजूनही संघर्षाशिवाय पर्याय नाही. यांचा संघर्ष अहिंसक आहे, न्यायालयीन लढाई आणि उपोषण, आंदोलने यावर आधारित आहे. त्यांच्यामध्ये राजकीय फूट पाडण्याचेही प्रयत्न झाले आहेत. पण या सर्वांना ही संघर्ष समिती पुरुन उरली आहे. ही संघर्ष समितीच पेण अर्बन बँकेच्या लाखो ठेवीदार-खातेदारांना न्याय देणार आहे, यात शंका नाही.