-उमाजी म. केळुसकर ⬑ दादागिरी ⬉
मराठी भाषा, मराठी साहित्य याविषयी शासन फार काही सकारात्मक करते आहे, असे पूर्वीपासून दाखवले जात आहे. परंतु याबाबतची केवळ औपचारिकताच पार पाडली जात असल्याने महाराष्ट्रात मराठी दीनवाणी आहे आणि मराठी ग्रंथचळवळ प्रश्नांकीत बनली आहे. म्हणूनच राज्यात जिल्हा ग्रंथोत्सव चटावरचे श्राद्ध ज्याप्रमाणे उरकले जाते, त्यापद्धतीने उरकले जात आहेत. त्यामुळे हे ग्रंथोत्सव लोकोत्सव ठरु शकलेले नाही. रायगड जिल्ह्यात तर अलिबागेत जेएसएम कॉलेजच्या जयंतराव केळुसकर सभागृहात आयोजित करण्यात आलेल्या २०१७ च्या जिल्हा ग्रंथोत्सवात कल्पनादारिद्ˆयाचेच प्रदर्शन पहायला मिळाले. या ग्रंथोत्सवात ज्येष्ठ कवी अशोक नायगावकर सोडता कोणताही बाहेरचा वा जिल्ह्यातला कवी, साहित्यिक पहायला मिळाला नाही की ग्रंथचळवळ वाहून नेणार्या वाचकांचा मेळा तेथे सळसळताना दिसला नाही. उदास बुकस्टॉल, उदास वातावरण अशी या ग्रंथोत्सवाची साठा उत्तराची कहाणी ठरली.
ग्रामीण व शहरी भागातील लोकांमध्ये वाचनसंस्कृतीची वाढ व्हावी या हेतूने राज्य सरकारच्या ‘सांस्कृतिक धोरण २०१०’ नुसार प्रत्येक जिल्ह्यात २०११ पासून ग्रंथोत्सवाचे आयोजन करण्यात येते. ग्रंथप्रेमींना एकाच ठिकाणी विविध ग्रंथ प्राप्त व्हावेत, प्रकाशक व ग्रंथविक्रेता यांना ग्रंथविक्रीसाठी एकाच ठिकाणी आवश्यक ती सुविधा उपलब्ध व्हावी, साहित्यिक, कवी यांना व्यासपीठ मिळावे हा ग्रंथोत्सव आयोजनाचा मुख्य उद्देश आहे. ग्रंथोत्सव यापूर्वी महाराष्ट्र राज्य साहित्य व संस्कृती मंडळ, माहिती व जनसंपर्क महासंचालनालय यांच्या सहकार्याने, जिल्हा माहिती कार्यालयांच्या वतीने राबविण्यात येत होता. परंतु ग्रंथोत्सवाची योग्य अंमलबजावणी होत नसल्याच्या कारणावरुन २०१६ पासून हा ग्रंथोत्सव उच्च व तंत्र शिक्षण विभागाकडे हस्तांतरीत करण्यात आला आणि त्याची अंमलबाजवणी जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालयामार्फत होऊ लागली आहे. या दोन्ही परिवर्तनादरम्यान ग्रंथोत्सव समितीच्या अध्यक्षस्थानी जिल्हाधिकारीच आहेत. पण आता जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालयांकडे ग्रंथोत्सव येऊनही ते ग्रंथोत्सव घेण्यात कुचकामी ठरत असल्याचे दिसून येते आहे.
आपल्या रायगड जिल्ह्याचंच उदाहरण पुरेसं आहे. रायगड जिल्ह्यात पहिला ग्रंथोत्सव २०११ साली १८,१९, २० डिसेंबर रोजी महाराष्ट्र राज्य साहित्य व संस्कृती मंडळ, माहिती व जनसंपर्क महासंचालनालय यांच्या सहकार्याने, रायगड जिल्हा माहिती कार्यालयाच्या वतीने अलिबाग येथील जा.र.ह कन्याशाळेच्या सभागृहात आयोजित करण्यात आला होता. तत्कालिन जिल्हाधिकारी विजय पवार व कर्मचारीवर्गाने चांगली मेहनत घेऊन तो यशस्वी केला. त्यासाठी महाराष्ट्रातील चांगले साहित्यिक, कवी तर आलेच, पण स्थानिक कवी, साहित्यिक, पत्रकार यांना व्यासपीठ दिले गेले. या संयोजनासाठी त्यांनी विविध संघटनांचे सहकार्य घेतले. त्यानंतर प्रभारी जिल्हा माहिती अधिकारी सुहास नेवासकर यांच्या कारकीर्दीत रोहा, पनवेल येथे ग्रंथोत्सव आयोजित करण्यात आले. पण तेव्हापासून या ग्रंथोत्सवास घसरण लागली, कारण ग्रंथोत्सवाची औपचारिकता पार पाडली जावू लागली होती. त्यात साहित्यिकांपेक्षा राजकारण्यांना महत्व आले. २०१५ साली जिल्हा माहिती अधिकारी राजू पाटोडकर यांच्या कारकीर्दीत त्यांनी स्थानिक उद्योगांचा प्रायोजत्वाखाली डोंगरे हॉलच्या आवारात झालेल्या ग्रंथोत्सवाला भव्यता आणायचा प्रयत्न केला. त्यांनी ग्रंथदिडीत चक्क टीव्ही स्टार आणून गर्दी खेचण्याचा प्रयत्न केला, पण या प्रयत्नात प्रेक्षक मिळाला आणि वाचक हरवला अशी परिस्थिती झाली. त्यानंतर २०१६ साली जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालयाकडे ग्रंथोत्सवाचे आयोजन गेल्यावर जिल्ह्यातील या ग्रंथोत्सवाची अधोगती सुरु झाली. जिल्हा ग्रंथालय अधिकारी प्रतिभा ताटे यांनी २७,२८,२९ जानेवारी रोजी डोंगरे हॉलच्या आवारात आयोजित केलेल्या ग्रंथोत्सवाच्या निमित्ताने जिल्ह्यातील साहित्यिक, ग्रंथरसिक, तसेच विविध साहित्य संघटनांना विचारात न घेण्याची मनमानी सुरु केली. हे मनमानीचे सूत्र त्यांनी नवे जिल्हा ग्रंथालय अधिकारी ध.बा. वळवी यांच्याकडे दिले असावे. त्यामुळे २०१७ च्या २२ व २३ नोव्हेंबर रोजी झालेल्या ग्रंथोत्सवात साहित्यिक, कवी यांच्यापेक्षा प्रशासकीय अधिकारी आणि मोजक्या पत्रकारांना उजवे माप दिले गेले आणि या आयोजनात जिल्ह्यातील पत्रकारांना, साहित्यिक, कवींना, साहित्यसंस्थाना (कोमसाप वगळता), सामाजिक-सांस्कृतिक संस्था आणि अगदी वाचकांनासुद्धा विश्वासात घेतले गेले नाही. या सर्व प्रक्रियेत ग्रंथोत्सव समितीचे अध्यक्ष जिल्हाधिकारी विजय सूर्यवंशी यांची ‘याला घ्या, त्याला घ्या, हा नको, तो नको’ असे सांगून संबंधितांनी दिशाभूल केली असावी. पण त्याचा परिणाम या ग्रंथोत्सवावर झाला आणि हा ग्रंथोत्सव अपयशी ठरला.
ग्रंथोत्सवाचे उद्घाटन २२ नोव्हेंबर रोजी रायगड जिल्ह्याचे पालकमंत्री प्रकाश महेता यांच्या हस्ते होणार होते. उद्घाटक म्हणून त्यांचे नाव समोर आल्यावर त्यांचे रायगड जिल्ह्यावरील प्रेम पहाता ते येणार नाही, हे ठरलेलेच होते. त्यामुळे त्यांची अनुपस्थिती हा काही आश्चर्याचा भाग नव्हता. पण रायगडचे दोन्ही खासदार, सर्व आमदारांनी या ग्रंथोत्सवाकडे पाठ फिरवली. राजकारण्यांच्या या भाऊगर्दीत भिंगाने शोधता येणारे एकच कवी, साहित्यिकाचे नाव होते, ते म्हणजे अशोक नायगावकर यांचे. तेच विशेष निमंत्रित पाहुणे होते आणि त्यांच्याच हस्ते योगायोगाने या संमेलनाचे उद्घाटन झाले, ही त्यातल्या त्यात समाधानकारक गोष्ट झाली. उद्घाटनापूर्वी ग्रंथदिंडीचा सोपस्कार पार पाडण्यात आला. या दिंडीत नायगावकरांशिवाय कोणी कवी वा साहित्यिक नव्हता, किवा रसिक वाचकांचाही सहभाग नव्हता. केवळ विद्यार्थ्यांची गर्दी दाखवण्यात आली. या दिंडीत कवी, साहित्यिक म्हणून नायगावकर आणि अलिबागचे प्रथम नागरिक म्हणून नगराध्यक्ष प्रशांत नाईक उपस्थित राहिले, म्हणून या ग्रंथदिंडीची थोडीफार लाज राखली गेली.
या ग्रंथोत्सवात ‘माझे आवडते पुस्तक’ ही विद्यार्थ्यांसाठीची वकृत्वस्पर्धा, ज्येष्ठ कवी अशोक नायगावकर यांची ‘काव्य मिश्किली’, ‘ग्रंथांनी मला काय दिले?’ हा प्रशासकीय अधिकार्यांचा परिसंवाद, ‘माध्यमे आणि वाचनसंस्कृती’ हा प्रशासनातील अधिकारी आणि पत्रकारांचा परिसंवाद आयोजित करण्यात आला होता. या परिसंवादामध्ये ग्रंथचळवळ वाहून नेणारे साहित्यिक सहभागी नसल्यामुळे आणि न विचारता परिसंवादात सहभागी केल्यामुळे काही पत्रकारांनी या परिसवादात भाग न घेणेच पसंत केले व जिल्ह्यातील पत्रकार, साहित्यिक, साहित्य संघटना यांना या ग्रंथोत्सवात सहभागी न केल्याबद्दल जिल्हा ग्रंथोत्सव समितीचा निषेध केला. या समितीचे अध्यक्ष जिल्हाधिकारीच असल्यामुळे हा निषेध त्यांच्यापर्यंत पोहचला. ज्येष्ठ कवी अशोक नायगावकर यांची ‘काव्य मिश्किली’ मूठभर रसिकांच्या उपस्थितीत मोठ्या प्रमाणात रिकाम्या खुर्च्यांच्या साक्षीने सादर झाली. त्यांनी आपल्या शैलीने उपस्थितांना भारावून सोडले, परंतु जर योग्य नियोजन झाले असते तर जिल्ह्यातील रसिकांना मोठ्याप्रमाणात याचा आस्वाद घेता आला असता. या रिकाम्या खुर्च्यांची गोष्ट माध्यमांत पसरल्यानंतर दुसर्या दिवशीच्या परिसंवादांत या खुर्च्या रिकाम्या दिसू नये म्हणून कॉलेजच्या विद्यार्थ्यांना वेठिस धरण्यात आले. त्यामुळे खुर्च्या तर भरलेल्या दिसल्या, परंतु खर्या रसिकांची डोकी तिथे दिसली नाहीत. समारोपाला तेही विद्यार्थी दिसले नाहीत, कारण हा समारंभ सायंकाळी होता, त्यामुळे बक्षीसपात्र विद्यार्थ्यांखेरीज मूठभर संयोजन समितीचीच माणसे तेव्हा उपस्थित होती. जिल्हाधिकारीही उपस्थित नव्हते. कोणत्याही साहित्यिकाच्या हस्ते येथे बक्षीस वितरण झाले नाही. हे अपयश ग्रंथोत्सव समितीचे आहे, पण आता ते या समितीच्या अध्यक्षांपासून ग्रंथालय अधिकार्यांपर्यंत कोणी मान्य करणार नाही.
या ग्रथोत्सवातील पुस्तक प्रदर्शनातील चार-पाच पुस्तकांचे स्टॉल दोन दिवस वाचक आणि पुस्कप्रेमी नागरिकांची वाट पहात होते. या प्रदर्शनात पुस्तकांचे स्टॉल लावून आम्ही फसलो, अशीच स्टॉल मालकांची भावना होती. जिल्ह्यातले पुस्तकप्रेमी नागरिक सोडा, अगदी अलिबागचेही वाचनप्रिय नागरिक सोडा, या कॉलेजचे विद्यार्थीही आमच्या स्टॉलवर फिरकले नाही, त्यांना थेट सभागृहात नेण्यात येत होते, त्यामुळे पुस्तकांची काहीच विक्री झाली नाही, अशी स्टॉल मालकांची खंत होती. याचा अर्थ हा ग्रंथोत्सवाचा फार्सच अलिबागमध्ये घडत होता. मुळात ग्रंथोत्सवातून साहित्यिक, वाचक आणि प्रकाशक यांना एकत्र आणण्याचे कार्य झाले पाहिजे, ग्रंथोत्सव हे मिनी साहित्य संमेलन ठरले पाहिजे, पण आयोजकांच्या आडमुठ्या धोरणांमुळे असे घडू शकले नाही. या जिल्हास्तरिय ग्रंथोत्सवाला गल्लीतल्या उत्सवाचेही स्वरुप नव्हते. गल्लीतला उत्सव आयोजित करण्यासाठीही मेहनत घेतली जाते, पण या जिल्हा ग्रंथोत्सवासाठी फार मेहनत घेतली आहे असे दिसले नाही. ग्रंथोत्सव समितीच्या समन्वय समितीच्या किती बैठका झाल्या, त्यात कोणाकोणाला बोलावण्यात आले हेही गुलदस्त्यात आहे. या ग्रंथोत्सवाचा प्रचारच योग्य प्रकारे करण्यात ही समिती कुचकामी ठरली आहे. अशाने जिल्ह्याच्या ग्रामीण व शहरी भागातील लोकांमध्ये वाचनसंस्कृतीची वाढ कशी होणार? शासकीय ग्रंथोत्सव लोकोत्सव केव्हा होणार? जिल्हा माहिती कार्यालयाने या ग्रंथोत्सवाच्या गोड गोड बातम्या दिल्या असल्या तरी जिल्हा ग्रंथोत्सवात रायगड दिसायला हवा होता, पण अलिबागही दिसला नाही ही शोकांतिका आहे. ही शोकांतिका पुढच्या वर्षीतरी सुखांतिका व्हावी, ग्रंथोत्सव लोकोत्सव व्हावा, लोकांचा सहभाग वाढावा यासाठी या समितीच्या अध्यक्षांनी सजग रहायला हवे. इतकेच.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा