सोमवार, ११ सप्टेंबर, २०१७

रायगडच्या जिल्हाधिकार्‍यांनी जनतेला स्वप्न दिले, पण...

-उमाजी म. केळुसकर ⬑ रायगडचा डंका ⬉


     रायगड जिल्ह्याला इतिहास, भूगोल, राजकारण, समाजकारण, अध्यात्म, कला आणि साहित्याचा मोठा वारसा आहे, पण या वारशाचेच विस्मरण आज जिल्ह्यातील जनतेला झाले आहे. या जनतेतूनच लोकप्रतिनिधी येत असल्याने त्यांची भूमिका वेगळी असण्याचे कारण नाही. नाहीतर आज जिल्ह्याचे चित्र केवळ विकासाभिमुख न राहता विकसित जिल्हा असे झाले असते. परंतु जिल्हा निर्मितीपासून हा रायगड जिल्हा विकासाभिमुख राहिला आहे. विकासाभिमुख असणे ही चांगली गोष्ट असली तरी समाधानकारक नाही. कारण स्वातंत्र्यानंतर ७० वर्षे झाली आणि महाराष्ट्र राज्य स्थापनेला ५७ वर्षे होऊन गेली तरी हा जिल्हा विकसित जिल्हा म्हणून ओळखला जात नाही. आज तर जिल्ह्याचे विचित्र रुप दिसत असल्यामुळे तो एक चेष्टेचा विषय झाला आहे. रस्त्यांवर पडलेल्या खड्ड्यांनी  रायगड जिल्ह्याचे रुप चाळणीसारखे केले आहे. अशा परिस्थितीत रायगडचे जिल्हाधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी यांनी संपूर्ण रायगड जिल्हा पर्यटनाच्या दृष्टीने विकसित करण्यात येत त्यावर आपले बारीक लक्ष असल्याचे सांगितले. जिल्हाधिकार्‍यांच्या आश्‍वासक भूमिकेवर जनता मात्र साशंक आहे. कारण गेल्या ५७ वर्षांचे सोडा, गेल्या तीन वर्षांत या जिल्ह्याला पालकच नाही अशी परिस्थिती आहे. त्यामुळे याचाच फायदा घेऊन मालक बनलेल्या ‘वृत्ती’ जिल्ह्याच्या दुर्दशेस कारण ठरले आहेत.
      रायगड जिल्ह्याला लोकप्रतिनिधी तेच, किंवा त्याच घरातील पहायला मिळतात, पण जिल्हाधिकारी मात्र नित्य नवे पहायला मिळतात. त्यामुळे नव्या चेहर्‍यांबद्दल एक औत्सुक्य आणि आकर्षण जनतेमध्ये असते. हे आकर्षण ते आपल्या कर्तबगारीने वाढवित असतात किंवा घटवित असतात. रायगडचे नवे जिल्हाधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी यांनी यापूर्वी तलावांचा जिल्हा म्हणून ओळखल्या जाणार्‍या गोंदियाचे जिल्हाधिकारी म्हणून आपला ठसा उमटविला आहे. त्यापूर्वी त्यांनी औद्योगिक विकास महामंडळात सहमुख्य कार्यकारी अधिकारी, कोल्हापूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, नवनिर्मित पालघर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री यांचे खाजगी सचिव म्हणून काम केले आहे. २००६ च्या भारतीय प्रशासकीय सेवेचे (आय.ए.एस.) अधिकारी असलेले डॉ. विजय सूर्यवंशी यांच्या रुपाने आता रायगड जिल्हाला नवा चेहरा मिळून एक महिना झाला आहे. त्यामुळे त्यांच्या कामाचे आताच मूल्यमापन करता येणार नसले तरी गोंदियासारखा ठसा ते येथे उमटवतील काय हे लवकरच दिसून येईल. त्यानंतरच  जनतेमध्ये त्यांच्याबद्दल विश्‍वास निर्माण झालाय की नाही यावरच त्यांच्या आकर्षण आणि अनाकर्षणाचा आलेख ठरलेला असेल.
      डॉ. विजय सूर्यवशी यांनी रायगडच्या जिल्हाधिकारी पदाची सूत्र हाती घेतल्यानंतर मंगळवार, २५ जुलै रोजी त्यांनी किल्ले रायगडाला भेट देऊन छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीस वंदन करुन कामकाजास प्रारंभ केला. वास्तविक भारताचे तत्कालिन राष्ट्रपती ग्यानी झैलसिंग, तत्कालिन पंतप्रधान इंदिरा गांधी, तत्कालिन पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी, तत्कालिन पंतप्रधान चंद्रशेखर आणि गुजरातचे मुख्यमंत्री असताना विद्यमान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रायगडाची धूळ आपल्या कपाळाला लावली आहे. काही अपवाद सोडल्यास महाराष्ट्राचे विद्यमान मुख्यमंत्री देवेंद्र ङ्गडणवीस यांच्यासह सगळे मुख्यमंत्री शिवसमाधी समोर नतमस्तक झाले आहेत. त्यामुळे रायगड जिल्ह्याचे जिल्हाधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी यांनी महाराजांच्या समाधीस वंदन करुन कामकाजास प्रारंभ करणे योग्यच आहे, यापूर्वीच्या जिल्हाधिकार्‍यांनी तसे केले नाही, प्रसंगोपात ते तेथे गेले, त्यामुळे कामकाज सुरु करण्याआधी शिवसमाधीचे दर्शन घेणार्‍या डॉ. सूर्यवंशींचे वेगळेपण दिसते. याच वेगळेपणातून त्यांनी ऐतिहासिक पर्यटनाची रुपरेखा मांडली आहे, त्याबाबत दुमत असण्याचे कारण नाही. 
     किल्ले रायगडच्या विकासासाठी ६०६ कोटी रुपयांच्या विकास आराखडा मंजूर केला आहे. या आराखड्यानुसार भारतीय पुरातत्त्व विभागाच्या पर्यवेक्षणाखाली १२४.१५ कोटी रुपयांची कामे करण्यात येणार आहेत. पाचाड येथील राजमाता जिजाऊ मॉंसाहेब समाधी वाडा परिसर, रायगड किल्ला परिसरातील पर्यटन विकास, रायगड किल्ला परिसरातील ७ कि.मी. परिघातील २१ गावे व त्याअंतर्गत वाड्यांमध्ये मुलभूत सुविधा विकास करण्यात येत आहे. रायगडापर्यंत पोहोचणे सुलभ व्हावे यासाठी महाड ते पाचाड हा रस्ता तीन पदरी विकसित केला जाणार आहे. त्यासाठी महाड ते रायगड किल्ला हा राज्यमार्गही केंद्र शासनाने राष्ट्रीय महामार्ग म्हणून मान्यता दिली आहे. याबरोबरच ऐतिहासिक पर्यटनाची रुपरेखा सांगताना त्यांनी रायगड जिल्ह्यात असणार्‍या विविध ऐतिहासिक स्थळांना जसे प्राचीन गावे, वीर पुरुषांची गावे, खिंडी यांना जोडून ऐतिहासिक पर्यटनाचे एक जाळे विकसित करुन पर्यटकांना आपल्या जिल्ह्याकडे मोठ्याप्रमाणात आकर्षित करुन घेण्याचा आपण प्रयत्न करणार असल्याचे सांगितले. त्यांनी गोंदिया येथे आपल्या जिल्हाधिकारी पदाच्या कारकीर्दीत राज्यात केवळ गोंदिया जिल्ह्यातच आढळणार्‍या सारस पक्ष्यांचे संवर्धन करून त्यांची वृद्धी व्हावी यासाठी विशेष प्रयत्न केले व सारस पक्ष्यांना पाहण्यासाठी जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात पर्यटक यावेत, यासाठी डॉ. विजय सूर्यवंशी सारस फेस्टिव्हलचा अभिनव उपक्रम राबविला होता. त्याचे तेथे सकारात्मक परिणाम पहायलाही मिळाले. तसेच सकारात्मक परिणाम रायगड जिल्ह्यात पर्यटनवृद्धीबाबत पहायला मिळाले तर आनंदच आहे. रायगड जिल्ह्यात पर्यटनाच्या विविध शाखा पहायला मिळतात. ऐतिहासिक म्हणजे गडकिल्ले-गावे पर्यटन, समुद्र पर्यटन, निसर्ग पर्यटन, विज्ञान पर्यटन, कृषी पर्यटन, जंगल पर्यटन, अध्यात्म पर्यन आदी शाखा पर्यटनासाठी जिल्हा प्रशासन विकसित करु शकते. तेथे सोयीसुविधा उभारुन पर्यटकांना आकर्षित करुन महसुलात भर घालता येईल. त्यादृष्टीने जिल्हा प्रशासन सकारात्मक आहे ही समाधानाची बाब आहे. पण दुर्दैवाची गोष्ट म्हणजे पर्यटनासाठी आलेल्या पर्यटकांमध्ये मद्य पर्यटनासाठी आलेले खुशालचेंडू पर्यटकही असतात आणि त्यामुळे विविध उपघात घडतात, त्यांचे बळी जातात, त्याचबरोबर इतर निष्पापांचेही बळी जातात, निसर्गाची नासाडी होते आणि त्यामुळे निखळ पर्यटनास आलेले पर्यटक आणि पर्यटन स्थळ दोघेही बदनाम होतात. याकडेही जिल्हाधिकार्‍यांनी गांभीर्याने पहाणे गरजेचे आहे.
      जिल्ह्यात पर्यटन वाढते आहे, ते नियोजनबद्ध झाले तर त्याचा जनता, जिल्हा प्रशासन, कायदा सुव्यवस्था आणि छोटेमोठे व्यावसायिक यांना त्याचा फायदाच होणार आहे. पण याबरोबरच जिल्ह्यातील इतर प्रश्‍नही धसास लागले तर ते जिल्ह्याच्या स्वास्थ्यास हितकारक असणार आहे. जिल्ह्यात प्रकल्पग्रस्तांचे प्रश्‍न आहेत, पेण अर्बन बँक घोटाळ्यात नाडल्या गेलेल्या खातेदार-ठेविदारांचे प्रश्‍न आहेत, कुपोषण-आरोग्याचे प्रश्‍न आहेत, बेरोजगारांचे प्रश्‍न आहेत, आणखी जिल्हाधिकार्‍यांच्या अधिकार क्षेत्रातील अनेक प्रश्‍न आहेत. रस्त्यांच्या प्रश्‍नाने तर जिल्ह्यातील जनतेचे आणि पर्यटकांचे मणके ढिले झाले आहेत आणि खड्ड्यांमुळे झालेल्या अपघातात अनेकांचे प्राण गेले आहेत.  जिल्ह्याचा प्रशासकीय प्रमुख म्हणून या सर्व प्रश्‍नांची हाताळणी संवदेनशीलतेने त्यांनी करणे गरजेचे आहे. 
      मुळात डॉ. विजय सूर्यवंशी यांनी संपूर्ण जिल्हाधिकारी कार्यालयाला संवेदनशील बनवले तरच जिल्ह्याचे प्रश्‍न सुलभपणे सोडवता येणार आहेत. काही वर्षांपूर्वी रायगड जिल्हा परिषद भ्रष्टाचाराच्या रडारवर आली होती, तसेच रायगड जिल्हाधिकारी कार्यालयही भ्रष्टाचाराच्या रडारवर आले होते. त्यामुळे झालेल्या बदनामीच्या जखमांनी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या भिंतीहीे ठसठसत असतील. या जखमांमुळेच जिल्हाधिकारी कार्यालयाकडे विश्‍वासाने पाहिले जात नाही. महसुल अधिकार्‍यांच्या वाढत असलेल्या मालमत्ता पाहिल्यावर या कार्यालयात धनदांडग्यांचीच चालते आणि वजनाशिवाय फायली हलत नाहीत, यावर शिक्कामोर्तब होते. या चौकटीत सर्वसामान्य कुठे बसतो? त्यांची कामे कशी होणार? लोकशाहीत लोकांना केंद्रबिंदू मानून स्थानिक स्वराज्य संस्थांची आणि जिल्हा प्रशासनांची निर्मिती झाली. पण तो हेतू पूर्णत: देशात साध्य झालेला नाही. दिवसेंदिवस परिस्थिती अधिकच चिघळत चालली आहे. रायगड जिल्ह्यात तर विदारक परिस्थिती आहे. सर्वसामान्यांना या व्यवस्थेत मोजले जात नाही. त्यांना विचारले जात नाही आणि विचारही केला जात नाही. विकासाची व्याख्या कारखानदारीतच तोलली जाते, यात निसर्गाधारित विकास मोजला जात नाही. कारखानदारीसाठी विकासाची चक्रे फिरवली जात आहेत. रस्ते, पूल, जलमार्गांचे बळकटीकरण शासन करणार आहे, पण हे पर्यटनासाठी नाही, येथील खड्ड्यांनी गांजलेल्या जनतेसाठी नाही, तर कारखानदारीसाठी आहे. कारखानदारीही वाईट नाही, पण येथे निसर्गाधारित कारखानदारी नाही, तर रासायनिक कारखानदारी प्रामुख्याने आहे. तिच्यामुळे येथील निसर्ग आणि निसर्गाधारित जीवन बेचिराख होत चालले आहे, ही वस्तुस्थिती आहे. त्यामुळे पर्यटनदृष्ट्या रायगडच्या विकासाचे जिल्हाधिकार्‍यांनी रंगवलेले चित्र जिल्ह्यातील रस्त्यांना पडलेल्या खड्ड्यांतील गढूळ पाण्यात किंवा त्यातील धुळीत विरघळून तर जाणार नाही ना? तसे होऊ नये अशीच रायगडकर जनतेची अपेक्षा आहे.  रायगड विकासाभिमुख नव्हे तर विकसित व्हावा असेच येथील जनतेला वाटते आहे, पण तो विकास येथल्या निसर्गाचा आब राखून झाला पाहिजे. अशा विकासाची मानसिकता येथील लोकप्रतिनिधी, मग ते जिल्ह्याचे पालकमंत्री असोत, आमदार असोत, खासदार असोत, वा मंत्री किंवा दोन्ही जिल्हा प्रशासन, यांना खरोखरच आहे का असा प्रश्‍न आहे.

  

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा