सोमवार, २६ डिसेंबर, २०१६

शिवस्मारक आणि पद्मदुर्गचा खराखुरा जागर

-उमाजी म. केळुसकर ⬑ खारावारा ⬉


     मुरूड शहराच्या समोरील समुद्रात कासा खडकावरचा शिवकालीन पद्मदूर्गावर कोकण कडा मित्र मंडळाने सुरू केलेला जागर कार्यक्रम २४ व २५ डिसेंबर उत्साहात संपन्न झाला आणि तिकडे मुंबईत २४ तारखेलाच अरबी समुद्रातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या स्मारकाच्या भूमीपूजन व जलपूजनाचा कार्यक्रम भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पार पडला. पद्मदुर्गचा जागर सामान्य शिवप्रेमींनी घडविला, तर अरबी समुद्रातील शिवस्मारकाचं स्वप्न केंद्र आणि राज्य सरकार साकारत आहे. शिवरायांनी बांधलेल्या पद्मदुर्गचा जागर रायगड जिल्ह्यात विनावाद  गेली आठ वर्षे सुरु आहे, सरकार उभारत असलेल्या स्मारकाचा वाद स्मारक उभारेपर्यंत सुरुच असणार आहे. त्यामुळे सामान्य शिवभक्तांनी सुरु ठेवलेल्या पद्मदुर्गच्या जागराबद्दल कौतुकच केले पाहिजे.
    महाराष्ट्र अंजन-कांचन करवंदीचा, दगडांचा, गडकिल्ल्यांचा प्रदेश आहे. गड-किल्ले ही महाराष्ट्राची खरी ओळख आणि संपत्ती आहे. मराठी माणसाचे राज्य छत्रपती शिवाजी महाराजांनी साडेतीनशे वर्षांपूर्वी येथे घडवले. आज या महाराष्ट्रात मराठी माणसांचे भविष्य भलतीच माणसे घडवित आहेत. त्याला घडवणं म्हणतात की बिघडवणं म्हणतात, हे ठरविण्याची वेळ कधीच निघून गेली. ज्यांनी आपल्या आरमारी सामर्थ्यांने दर्यावर्दी इंग्रजांना धडकी भरवली त्या शिवरायांचे स्मारक देशाचे सागरी प्रवेशद्वार जेथे आहे त्या मुंबईच्या अरबी समुद्रात उभारले जाणे योग्यच आहे, पण त्या मुंबईतील मराठी माणूस तेथून दूर फेकला गेला आहे आणि तेथे इतर भाषिकांची भेळ झाली आहे ही देखील वस्तुस्थिती आहे. असा मराठी माणूस घडत असेल तर येथील गडकिल्ल्यांची काय जडणघडण असेल यांचा अंदाज यायला हरकत नाही. अशी अवस्था देशाच्या स्वातंत्र्यानंतर, महाराष्ट्र राज्याच्या स्थापनेनंतर कोणा एका राजवटींनी केली नाही, तर या पापात सर्व सहभागी आहेत. 
     महाराष्ट्र हे देशातील सगळ्यात जास्त गड-किल्ले असणारे राज्य आहे. पाणदुर्ग, डोंगरी गढ्या आणि डोंगरी किल्ले मिळून महाराष्ट्रात राज्यात सुमारे ३१७ किल्ले आहेत, या किल्ल्यांपैकी ४७ किल्ले राष्ट्रीय संरक्षित असून ते केंद्र शासनाच्या पुरातत्त्व विभागाच्या अखत्यारित आहेत. तसेच ४९ किल्ले राज्यसंरक्षित असून ते महाराष्ट्र शासनाच्या पुरातत्त्व व वस्तुसंग्रहालय संचालनालयाच्या अखत्यारित आहेत. पण सगळ्यांचीच दूरवस्था झाली आहे. बहुतांशी किल्ल्यांची तटबंदी, बुरुज पडले आहेत, तर काही ठिकाणी पूर्ण जमीनदोस्त झाले आहेत. भुयारी गुप्त मार्ग बुजले आहेत. टेहळणी बुरुज पडक्या स्थितीत तर वाडे, सैनिकांची घरे, धान्य कोठारे यांचे चौथरेच उरले आहेत. तोफाही चोरीस गेल्या आहेत. रायगडावरील मेघडंबरीतील शिवरायांच्या हातातील तलवारीचे काय झाले ते सर्वांनाच माहीत आहेत काही वर्षांपूर्वी पाचाड येथील जिजाऊसाहेबांच्या समाधीस्थळावरील त्यांच्या पुतळ्याचीही चोरी झाली होती. ही अवस्था आपल्या गडकिल्ल्यांची आहे. अर्थात या दूरवस्थेचे खापर कोणा एका सरकारवर फोडता येणार नाही. असे असले तरी आम्हीच शिवप्रेमाचा वसा घेतला आहे आहे, अशाप्रकारे सर्व सरकारे वागत आली आहेत, याला आता राज्यातील, केंद्रातील विद्यमान भाजप प्रणित सरकारचा अपवाद नाही. म्हणूनच शिवस्मारक आमच्यामुळे होत आहे, अशा गमजा मारताना या दूरवस्था झालेल्या गडकिल्ल्यांचे जतन-संवर्धन का होत नाही याबाबत काही बोलत नाही. उलट दूरवस्था झालेल्या याच गडकिल्ल्यांची माती विविध नद्यांचे जल शिवस्मारकासाठी भाजप कार्यकर्त्यांनी, नेत्यांनी वाजत गाजत नेले. ‘शिव’नाम इतके पवित्र आहे की त्याला या उपचारांची गरज नव्हती. खरेतर सर्वसामान्य, कष्टकरी, शेतकरी, सैनिक, विविध क्षेत्रातील मंडळीकडून ही माती आणि जल स्मारकासाठी नेले गेले असते आणि त्यामागे या स्मारकाप्रमाणे राज्यातील या गडकिल्ल्यांचे वैभव अबाधित राखा, अशी भावना व्यक्त केली गेली असती तर त्याला अर्थ असता. पण तसे केले गेले नाही. तसेही सत्तेत असताना राष्ट्रवादी कॉंग्रेस-कॉंग्रेसने सर्व परवानग्या मिळवल्या (बर्‍याच परवानग्या त्यांनी मिळवल्या) असत्या आणि तेव्हा शिवस्मारक मार्गी लागले असते, तरी चित्र वेगळे असते असे नाही. पण शिवस्मारकारकाचा कार्यक्रम सरकारी असूनही तो पक्षाचा असल्यासारखा भाजप नेत्या-कार्यकर्त्यांनी अतिरेक केला. कर्तव्य नावाची काही चीज असते, छत्रपती शिवाजी महाराज हे एका कोणा पक्षाचे नाहीत याचे भान श्रेयाच्या लढाईत गुंतलेल्या कोणालाही राहिले नाही, हे खरेच.
      एकीकडे अशी अतिरेकी परिस्थिती असताना दुसरीकडे रायगड जिल्ह्यात पद्मदुर्ग जागरच्या निमित्ताने विवेकी आश्‍वासक चित्र पहायला मिळत आहे. जंजिरा किल्ल्याच्या सहाय्याने सिद्दीने किनारपट्टीवर धाक जमवला होता. सामान्य रयतेची पिळवणूक होत होती. त्यामुळे सिद्दीच्या अत्याचाराला पायबंद घालण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांनी मुरुडच्या सागरात असलेल्या कासवाच्या आकाराच्या बेटावर किल्ला जलदुर्ग बांधला आणि त्याच्या  बुरुजाच्या वरचा भाग ङ्गुललेल्या कमळाच्या पाकळ्याप्रमाणे असल्यामुळे त्याला पद्मदुर्ग असे नाव दिले. कासवाच्या आकारामुळे त्याला कासा असेही म्हटले जाऊ लागले. या किल्ल्यामुळे जंजिर्‍याच्या सिद्दीला चांगलाच पायबंद बसला. या अशा पद्मदुर्गची दूरवस्था झाल्यामुळे व छत्रपतींचा हा किल्ला सरकार दरबारी उपेक्षितच राहिल्यामुळे किल्ल्याच्या या परिस्थितीकडे सरकार आणि पर्यटक एकंदरीत संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष वेधण्यासाठी ’पद्मदुर्गाचा जागर’ हा कार्यक्रम कोकण कडा मित्र मंडळ व मुरूड नगरपरिषद यांच्या विद्यमाने मुरूड बीच ङ्गेस्टिव्हलच्या पार्श्‍वभूमीवर सर्वसामान्य जनतेच्या सहभागातून गेली आठ वर्षे केला जात आहे. पद्मदुर्गजागर या किल्ल्याच्या स्वच्छतेच्या निमित्ताने सुरु झाला आणि आज जागर शिवभक्तांसाठी उत्साहवर्धक उत्सव ठरला आहे. त्यामुळे दरवर्षीप्रमाणे शनिवार, २४ डिसेंबर रोजी रायगड ते पद्मदुर्ग अशी शिवपालखी काढण्यात आली. महाड-रायगड ते मुरुड-पद्मदुर्ग या मार्गावरील मिरवणुकीत तेथील ग्रामस्थांनी छत्रपती शिवाजी महाराजांचे दर्शन घेतले. रविवार, २५ डिसेंबर रोजी गडपूजन व तेथे शिवसृष्टी उभारुन विविध कार्यक्रमांनी पद्मदुर्गचा जागर झाला. 
      संपूर्ण महाराष्ट्रात दुर्गसंवर्धन चळवळीने वेग घेतला आहे. अनेक दुर्गप्रेमी संस्था आणि शिवभक्त तरुणांनी दुर्गस्वच्छतेसाठी वाहून घेतले आहे, अशा परिस्थितीत शिवभक्तांनी मुरुडच्या पद्मदुर्ग जागरचा आदर्श घेऊन महाराष्ट्रातील प्रत्येक गडावर असा जागर घडवला पाहिजे. तसेच सरकार जसे अरबीसमुद्रात शिवस्मारक उभारणार आहे, त्याच धर्तीवर ज्या गडांवर संस्मरणीय घटना घडल्या तेथे त्याने स्फूर्ती स्मारके उभारणेही गरजेचे आहे. तशी एक संकल्पना १९४९ साली पुण्यातील सिहंगडाबाबत सासवने येथील जागतिक दर्जाचे शिल्पकार विनायक पांडुरंग तथा नानासाहेब करमरकर यांना सुचली होती. ‘आधी लगीन कोंढाण्याचं अन् मग रायबाचं’ असं छत्रपती शिवाजी महाराजांना सांगणार्‍या नरवीर तानाजी मालुसरे यांच्या हौतात्म्याने बुलंद कोंढाणा किल्ला सिंहगड झाला. तानाजी आणि त्यांचे मावळे घोरपडीच्या सहाय्याने ज्या कड्यावरुन कोंढाण्यावर चढले, तो बेलाग कडाच खोदून त्यावर नरवीर तानाजी मालसुरे यांची प्रतिमा साकारावी, असे त्यांच्या मनात आले. पण स्वातंत्र्याच्या सुरुवातीच्या कालखंडात ते शक्य झाले नाही. आता मात्र ही संकल्पना राबविता येणे शक्य आहे. सिंहगडावर तानाजी मालुसरे जो कडा चढून वर गेले त्या कड्याच्या वर ते कडा चढून जातानाचे शिल्प स्फूर्ती स्मारक उभारता येईल. सातार्‍यातील प्रतापगडावर अफजलखानाच्या कबरीशेजारी छत्रपती शिवाजी महाराज अफजलखानाचा कोथळा काढतानचे शिल्प स्फूर्ती स्मारक उभारता येईल. रायगड जिल्ह्यातील अलिबागच्या छत्रपती शिवरायांनी बांधलेल्या कुलाबा किल्ल्याच्या बुरुजावर मराठेशाहीचे सरखेल कान्होजी आंग्रे यांचे शिल्प स्फूर्ती स्मारक उभारता येईल. अशाप्रकारे विविध किल्ल्यांवर शिल्प स्फूर्ती स्मारके करता येतील, पण ही करण्याबरोबरच या गडकिल्ल्यांची दूरवस्थाही संपविणे तितकेच गरजेचे आहे. नानासाहेब करमरकर यांनी एके ठिकाणी म्हटले आहे की, ‘शिल्प स्मारकांनीच राष्ट्रपुरुष, राष्ट्रीय परंपरा, राष्ट्रीय कला, कलावंत व राष्ट्रंही अमर होतात.’ अरबी समुद्रातील जगातील सर्वात उंच अशा अश्‍वारुढ छत्रपती शिवाजी महाराजांच्या शिल्पस्मारकाने असेच घडणार आहे. जगभरातून भारतात येणार्‍या अभ्यासक-पर्यटकांची शिवकालाबद्दल हे शिवस्मारक उत्सुकता चाळवणार आहे. त्यांचे गडकिल्ले बघण्यासाठी प्रेरणा देणार आहे. त्यामुळे या शिवस्मारकाबरोबरच गडकिल्ल्यांच्या आरोग्याकडे बारकाईने पाहणे गरजेचे आहे. नाही म्हणायला महाराष्ट्रातील या गड-किल्ल्यांचे मूळ स्वरूपात जतन करणे, त्यांचे ऐतिहासिक महत्त्व कायम राखणे तसेच या किल्ल्यांची दुरुस्ती, संरक्षण-संवर्धन व देखभाल करण्यासाठी सांस्कृतिक कार्यमंत्री विनोद तावडे यांच्या अध्यक्षतेखाली गड-किल्ले संवर्धन समिती नेमण्यात आली आहे. यापूर्वी २००५ साली आघाडी सरकारच्या काळात केंद्र सरकारच्या कोकण रिव्हिल्टाच्या माध्यमातून राज्यातील राज्यातील मुंबई, कोकण आदी भागातील किल्ल्यांच्या विकासाचा कार्यक्रम हाती घेण्यात आला होता, पण किल्ल्यांच्या विकासाला पाहिजे तशी चालना मिळाली नाही. राज्य सरकारच्या कला व सांस्कृतिक मंत्रालयाच्या वतीने यावर्षी २१ ते २४ जानेवारीदरम्यान रायगड महोत्सव भरविण्याव्यतिरिक्त महाराष्ट्रातील किल्ले जतन-संवर्धनाबाबत काही ठोस कृती झालेली नाही. अमूक निधी उपलब्ध केलाय, तमूक निधी उपलब्ध केलाय अशा घोषणाच केल्या जात आहेत. परंतु किल्ले जतन-संवर्धनाबाबतच्या योजनांची अंमलबदावणी योग्यरितीने होताना दिसत नाही. याबाबत आता संपूर्ण महाराष्ट्राने जागर करण्याची गरज आहे. तसे केले तरच महाराष्ट्राची गडकिल्ल्यांची अस्मिता अभंग राहील.


सोमवार, १९ डिसेंबर, २०१६

एका शिक्षण संस्थेचा अमृतमहोत्सव

 -उमाजी म. केळुसकर ⬑ खारावारा ⬉


     रायगड जिल्ह्याच्या (तत्कालिन कुलाबा जिल्हा) शिक्षण चळवळीला स्वातंत्र्यपूर्व आणि स्वातंत्र्योत्तर काळात अनेक शिक्षण संस्थांनी गती दिली आहे. त्यात अंजुमन इस्लाम, जंजिरा-मुरुड (स्थापना १९०७), पेण एज्युकेशन सोसायटी, पेण (१९१०), कोकण एज्युकेशन सोसायटी, अलिबाग (१९१७), अभिनव ज्ञानमंदिर, कर्जत (१९३५), अलिबाग तालुका शिक्षण प्रसारक मंडळ, अलिबाग (१९३७), नागाव शिक्षण संस्था संचालक मंडळ, नागाव (१९३९), सुधागड एज्युकेशन सोसायटी, पाली (१९४१), माणगाव तालुका एज्युकेशन सोसायटी, गोरेगाव (१९४५), खालापूर तालुका शिक्षण प्रसारक मंडळ, खोपोली (१९५७), जनता शिक्षण मंडळ, अलिबाग (१९५९), पनवेल एज्युकेशन सोसायटी, पनवेल (१९६०), इंदापूर विभाग शिक्षण प्रसारक मंडळ, इंदापूर (१९६०), इंडियन एज्युकेशन सोसायटी, वरसोली (१९८७), पीएनपी एज्युकेशन सोसायटी, अलिबाग (२०००) दत्ताजीराव खानविलकर ट्रस्ट, अलिबाग (२००३) यासारख्या जिल्ह्यातील अनेक संस्थांची नावे विशेषत्वाने घ्यावी लागतील. या शिक्षण संस्थांत आवास, सासवने, धोकवडे रहिवासी हितवर्धक मंडळ या शिक्षण संस्थेने १९४१ पासून सुरु केलेल्या शैक्षणिक कार्याचीही विशेष दखल घ्यावी लागेल. या मंडळाच्या बाबासाहेब नाझरे हायस्कुल व ज्युनिअर कॉलेज, आवासचा या महिन्यात अमृतमहोत्सव साजरा होत आहे, ही या विभागासाठी अभिमानाची बाब आहे.

  रायगड जिल्ह्यासाठी २०१७ चा जानेवारी महिना महत्वाचा  आहे, कारण १ जानेवारी १९१७ साली कोकण एज्युकेशन सोसायटीची स्थापना झाली. बारा दिवसांनी, पुढील वर्षी या संस्थेचा शतक महोत्सव आहे. तसाच २०१६ चा चालू डिसेंबर महिनाही महत्वाचा आहे. कारण या महिन्यात आवास, सासवने, धोकवडे रहिवासी हितवर्धक मंडळाच्या १९४१ साली स्थापना झालेल्या बाबासाहेब नाझरे हायस्कुल व ज्युनिअर कॉलेज, आवासचा अमृत महोत्सव साजरा होत आहे. एखाद्या संस्थेला १०० वर्षे आणि ७५ वर्षे होणे ही साधी-सोपी गोष्ट नाही. अनेक संकटांचे उन्हाळे-पावसाळे सोसून या संस्था खंबीरपणे उभ्या आहेत, हे कोकण एज्युकेशन सोसायटी आणि  आवास, सासवने, धोकवडे रहिवासी हितवर्धक मंडळाच्या शैक्षणिक कार्याकडे पाहता लक्षात येते.
     कोकण एज्युकेशन सोसायटीने आपल्या शैक्षणिक कार्याची सीमारेषा नावाप्रमाणे आखली, तसेच आवास, सासवने, धोकवडे रहिवासी हितवर्धक मंडळानेही आपल्या शैक्षणिक कार्याची सीमा नावाप्रमाणे राखली. या मंडळाने अनेक शाळा काढल्या नाहीत, परंतु एकच हायस्कुल व ज्युनिअर कॉलेज, प्राथमिक शाळा काढून आवास, सासवने, धोकवडे परिसरातील चार पिढ्यांची शैक्षणिक भूक भागविली आहे. या शिक्षण संस्थेतून अनेक डॉक्टर, वकील, खेळाडू, लेखक, उद्योगपती, अभिनेते, इंजिनिअर, पत्रकार, राजकीय नेते आणि सच्चे नागरीक या राज्याला, देशाला मिळाले आहेत. दोन विद्यार्थीनींना क्रीडा क्षेत्रातील मानाचा शिवछत्रपती पुरस्कार मिळाला आहे. ही या संस्थेची श्रीमंती आहे आणि ती वाढतच आहे. 
    आवास, सासवने, धोकवडे ही तीन गावे गावे अगदी जवळ-जवळ असून त्यांचे हितसंबंध फार पूर्वीपासून एकमेकांशी निगडित आहेत. या तीन गावांतील स्थानिक स्थानिक व मुंबईतील रहिवाशांची सार्वजनिक हिताची कामे संघटितपणे करण्यासाठी ६ ऑगस्ट १९३६ रोजी आवास, सासवने, धोकवडे रहिवासी हितवर्धक मंडळाची स्थापना झाली. संस्था स्थापनेची पहिली सभा मुंबईतील गांधर्व महाविद्यालयाच्या सभागृहात ऍडव्होकेट गोपाळ कृष्ण गाडगीळ यांच्या अध्यक्षतेखाली झाली. या सभेचे स्वागताध्यक्ष जागतिक कीर्तीचे शिल्पकार विनायक पांडुरंग तथा नानासाहेब करमरकर हे होते. या सभेत संस्थेचे पहिले कार्यकारी मंडळ निवडण्यात आले. संस्थेचे पहिले अध्यक्ष म्हणून काकासाहेब सप्रे व चिटणीस म्हणून वामन प्रभाकर अभ्यंकर यांची निवड झाली. संस्थेच्या पहिल्या वर्षीच सदर तीन गावांच्या परिसरात इंग्रजी शिक्षणाची सोय करण्याचे प्रयत्न संस्थेने सुरु केले. याबरोबरच मांडवा व रेवस बंदरातील प्रवासाच्या सोयी, शेतकी सुधारणा प्रवचने, व्याख्याने, स्नेहसंमेलने, मैदानी खेळांचे सामने वगैरे उपक्रम संस्थेमार्फत राबविण्यात येऊ लागले. 
    १९४० मध्ये बॉम्बे युनिफॉर्म क्लोदिंग कंपनी, मुंबईचे मालक  बाळकृष्ण बहिरु तथा बाबासाहेब नाझरे यांची संस्थेच्या अध्यक्षपदावर निवड झाली आणि त्यांनी १९६० पर्यंत संस्थेचे अध्यक्षपद सांभाळले. त्यांच्या कारकीर्दीत १९४१ साली संस्थेने धोकवडे येथे इंग्रजी शाळा सुरु केली व या शाळेची जबाबदारी संस्थेचेच एक शिक्षणतज्ज्ञ कार्यकर्ते, महाराष्ट्र हायस्कूलचे माजी मुख्याध्यापक रावसाहेब ना.म. काळे यांच्यावर सोपविण्यात आली. बाबासाहेब नाझरे यांना बहुजन समाजाच्या  शिक्षणाविषयी विशेष आस्था असल्यामुळे संस्थेच्या शैक्षणिक कार्यासाठी ५० हजाराची देणगी दिली. त्यावेळचे ५० हजार म्हणजे आजचे किती याचा हिशोब लावा, म्हणजे या परिसराच्या शैक्षणिक उद्धारासाठी त्यांनी किती मोठे मन दाखवले याची कल्पना येते. शाळेचा पसारा वाढविण्यासाठी अधिक जागेची गरज होती. त्यासाठी संस्थेने प्रयत्न करुन जिल्हाधिकार्‍यांकडून साडेतीन एकर सरकारी जागा मिळवली. त्याच जागेवर १९४४ साली स्वत:च्या इमारतीत बाबासाहेब नाझरे हायस्कुल सुप्रतिष्ठित झाले. त्यानंतर १९७५ साली ज्युनिअर कॉलेज, तसेच २०१३ साली स्व. प्रभाकर सदाशिव राणे पूर्व प्राथमिक व प्राथमिक शाळा सुरु करण्यात आली. १९८९ ला बाबासाहेब नाझरे हायस्कुल व ज्युनिअर कॉलेजची नवीन इमारत उभी राहिली. १९४१ ते २०१६ या ७५ वर्षांच्या काळात संस्थेने शिक्षण क्षेत्रात खूप प्रगती केली. या  हायस्कुल व ज्युनिअर कॉलेजमुळे अलिबाग तालुक्याच्या उत्तर विभागातील चार पिढ्यांना विशेष फायदा झाला आहे.
  आज या शाळेची सूत्र अध्यक्ष रणजीत राणे, उपाध्यक्ष जयंत चेऊलकर, सचिव प्रभाकर पाटील, सदस्य अभिजीत राणे आणि त्यांचे इतर सहकारी सांभाळीत आहेत. पूर्वसुरींनी त्यांच्या हाती जो ठेवा ठेवला आहे, तो निश्‍चितच त्यांनी जपला आहे, असे म्हटले तर त्यात काही वावगे नाही.  हायस्कुलचे माजी मुख्याध्यापक, तसेच विद्यमान मुख्याध्यापक-प्राचार्य सर्जेराव कडवे, सहकारी शिक्षक, कर्मचारी, संस्थेचे विद्यार्थी-विद्यार्थिनी यांनी यांनी संस्थेच्या प्रतिष्ठेत भर टाकली आहे आणि संस्थेनेही या सर्वांना प्रतिष्ठा दिली आहे. 
   माणूस आणि संस्था यांच्या २५ साव्या वर्षाला रौप्य, ५० साव्या वर्षाला सुवर्ण, ६० व्या वर्षाला षष्ट्यब्दी अथवा हिरक, ७५ व्या वर्षाला अमृत, तर १०० व्या वर्षाला शतक महोत्सव म्हणतात. आधी रौप्य (चांदी), नंतर रौप्यपेक्षा मौल्यवान सोने आणि नंतर सोन्यापेक्षा मौल्यवान हिरा अशी मांडणी केल्यानंतर सोन्यापेक्षाही मौल्यवान किंबहुना ज्याचे मूल्यच करता येणार नाही असे ‘अमृत’ अशी मांडणी केली आहे आणि त्यानंतरच्या १०० रीला शतक या शब्दाशिवाय दुसरे कोणतेही महत्व देण्यात आलेले नाही. त्यामुळे रौप्य ते शतक या मांडणीत अमृतला, म्हणजे ७५ रीला जे महत्व आहे ते कोणालाही नाही. अमृत या शब्दाचे दोन अर्ध आहेत. अ-मृत या शब्दाचा एक अर्थ म्हणजे ‘मृत नाही’ असा, दुसरा अर्थ मृताला जिवंत करणारं. अमृत हे असे पौराणिक पेय आहे की जे प्यायल्यानंतर अमरत्व प्राप्त होते. पूर्वी माणसाच्या जीवनाची हमी देता येत नव्हती अशा काळात आयुष्याचे तीन टप्पे ओलांडून चवथ्या टप्प्यात म्हणजे ७५ पोहोचणे ही दुर्मिळ बाब होती. पंचाहत्तरीत पोहचणे हेच जणू अमृतपान केल्यासारखे असायचे. ज्याने पंचाहत्तरी गाठली तो पुढील वर्षेही सुखरुप पार करेल असा अमृत या शब्दाचा अर्थ आहे. हा अर्थ व्यक्ती आणि संस्था या दोन्हींनाही लागू आहे. हेच आवास, सासवने, धोकवडे रहिवासी हितवर्धक मंडळाच्या बाबासाहेब नाझरे हायस्कुल व ज्युनिअर कॉलेजच्या ७५ री निमित्त म्हणावेसे वाटते. संस्थेचा अमृत महोत्सव सुरु आहे. कुठच्याही व्यक्तीचा अथवा संस्थेचा अमृत महोत्सव म्हणजे जणू नवतारुण्य लाभणे असते, तेच नवतारुण्य बाबासाहेब नाझरे हायस्कुल व ज्युनिअर कॉलेजला लाभले आहे. ही संस्था कधी म्हातारी होणार नाही आणि  या संस्थेतून बाहेर पडणारे विद्यार्थी आणि संचालक मंडळ या संस्थेला कधी म्हातारी होऊ देणार नाही, यात वाद नाही. इतकेच.

गुरुवार, १५ डिसेंबर, २०१६

खारेपाट महोत्सवाचे चैतन्य

-उमाजी म. केळुसकर ⬑ खारावारा ⬉


      अलिबाग तालुक्यात तीनवीराजवळ खारेपाट महोत्सव ‘झेप फाऊंडेशन’ने आयोजित करुन खारेपाटात चैतन्याचे उधाण आणले आहे. डिसेंबर आणि जानेवारी हे विविध महोत्सवांचे महिने आहेत. मुरुड पर्यटन महोत्सव, लायन्स क्लबचे अलिबाग फेस्टिव्हल, पंडितशेठ फाऊंडेशनचे अलिबाग युवा महोत्सव, तसेच जिल्ह्यात इतर तालुक्यांतही विविध पर्यटन महोत्सव साजरे केले जाणार आहेत. असे असले तरी या खारेपाट महोत्सवाचे महत्व अनन्यसाधारण आहे. 
      पस्तीस वर्षांपूर्वी जि.प.चे माजी अध्यक्ष प्रभाकर पाटील यांनी तीनवीरा धरणालगत कृषीप्रदर्शन भरविले होते आणि ते पाहण्यासाठी गर्दीने उच्चांक गाठला होता. त्यानंतर प्रभाकर पाटील यांच्या नातसूनेने, चित्रा आस्वाद पाटील यांनी एक पाऊल पुढे टाकून तीनविराजवळच द्रोणागिरी येथे खारेपाट महोत्सवाचे आयोजन करण्यास सुरुवात केली. पहिला खारेपाट महोत्सव २०१२ साली, त्यानंतर २०१३ व आता २०१६ साली तिसर्‍या खारेपाट महोत्सवाचे आयोजन २० ते २५ डिसंबर दरम्यान केले आहे. खारेपाटात अशाप्रकारचे भव्यदिव्य महोत्सव होतात, हीच बाब विशेष आहे. असे महोत्सव करण्याची शहरांची मक्तेदारी होती, परंतु ती या खारेपाट महोत्सवाने मोडीत काढली आहे.
     मुळात ग्रामीण, आदिवासी उत्पादनांना, महिला बचत गटांच्या उत्पादनांना उत्तम व्यासपीठ मिळवून देणे आणि खारेपाटाची संस्कृती दृग्गोच्चर करणे हे या खारेपाट महोत्सवाचे उदिष्ट्य आहे आणि ते साध्य होत आहे, असे जर म्हटले तर त्यात काही वावगे नाही. खाडीची ललाटरेषा लाभलेल्या खारेपाटातील माणसे मात्र गोडी आहेत. खारेपाट हा प्रामुख्याने आगरी समाजाची वस्ती असलेला प्रदेश. आगारात काम करणारा आणि आगराला आई मानणारा तो आगरी. या आगरी समाजाने आज सर्वच क्षेत्रात आपला ठसा उमटविला असला तरी या खारेपाटात कोळी, मराठा, भंडारी, मुस्लिम, आदिवासी, ब्राह्मण  तसेच इतर समाजाचीही फारशी नसली तरी  वस्ती आहे.  पोयनाड, वाघोडे, नवेनगर, बांधण ही गावे सोडल्यास इतर गावेच्या गावे आगरी समाजाची आहेत. खारेपाटातील बाजारपेठेचं गाव असलेल्या पोयनाडमध्ये आगरआळी, म्हणजेच चवरकर आळी आहे, ती अख्खी आगरी समाजाची आहे, तर उर्वरित पोयनाडमध्ये संमिश्र वस्ती आहे. अलिबाग तालुक्यातील खारेपाटातील  शहाबाजपासून कुर्डूस ते मांडव्यापर्यंतची गावे पूर्णत: आगरी समाजाची आहेत. असा हा खारेपाटावर वर्चस्व असलेला आगरी समाज आहे.
     खारेपाट म्हणजे आगरी आणि आगरी म्हणजे खारेपाट असेच येथील मातीतील मनांचे वर्णन करावे लागेल. शेतकरी चळवळीचे अर्ध्वयु कै. नारायण नागू पाटील उर्फ आप्पासाहेब यांनी खारेपाटात क्रांतीची हाक दिली, चरीचा ऐतिहासिक शेतकर्‍यांचा संप घडविला त्यामुळे येथील शेतकरी  सावकारी, जमीनदारी पाशातून मुक्त झाला, कुळकायदा जन्माला आला. सेझविरुद्धही खारेपाटातील शेतकरी आक्रमक राहिला. त्याचा उद्योगांना विरोध नाही, तर निसर्गाधारित उद्योगांची त्याला अपेक्षा आहे. या अपेक्षांसाठी आजही त्याला संघर्ष करावा लागतो, ही देखील वस्तुस्थिती आहे. खारेपाट नेहमी चैतन्यमय राहिला आहे. खारेपाटाने आपली संस्कृती जपण्याचा आटोकाट प्रयत्न केला आहे. मग ती खारेपाटची खाद्यसंस्कृती असो वा लग्नविधी असो त्यातून खारेपाटचा विशिष्ट असा बाणा दिसून येतो.
     खारेपाट दिखावा करीत नाही, तर तो असाही आणि तसाही व्यक्त होतो, तो पटलं नाही तर कोणाची भिडभाड ठेवत नाही आणि पटलं तर स्वत:चा जीवही द्यायला तयार असतो. खारेपाटातून राज्यपातळीवर, आंतरराष्ट्रीय पातळीवर नावलौकिक मिळवणारे साहित्यिक झाले, गायक, संगीतकार झाले, अभिनेते झाले, कबड्डीपटू झाले, आध्यापक झाले, राजकारणीही झाले. खारेपाट ही गुणी जनांची खाण आहे. याचेच दर्शन खारेपाट महोत्सवात दाखवण्यावर भर राहिला आहे, ही बाब अतिशय चांगली आहे. यावर्षी कुलाबा ते रायगड या कालखंडाची जडणघडण दाखवण्यावर या खारेपाट महोत्सवाचा भर राहणार आहे. केवळ खारेपाट या कोषातच न राहता संपूर्ण रायगडची संस्कृती आणि देदीप्यमान इतिहास दाखविण्याचा या वर्षी जो विविध अंगाने जो प्रयत्न करण्यात येणार आहे, तोही कौतुकास्पद आहे. म्हणूनच खारेपाट महोत्सवास शुभेच्छा!

मंगळवार, १३ डिसेंबर, २०१६

मुंबई ते सिंधुदुर्ग प्रवासी बोटीचा भोंगा पुन्हा वाजणार!

-उमाजी म. केळुसकर ⬑ खारावारा ⬉


       सागरी महामार्गाचे नाही पण प्रवासी सागरी वाहतुकीचे कोकणवासियांचे स्वप्न लवकरच पूर्ण होणार आहे. सध्या गेटवे ते मांडवा आणि मांडवा ते गेटवे, गेटवे ते एलिफंटा आणि एलिफंटा ते गेटवे,  तसेच भाऊचा धक्का ते रेवस आणि रेवस ते भाऊचा धक्का, मुंबई ते मोरा (उरण) आणि मोरा (उरण) ते मुंबई अशीच प्रवासी जलवाहतूक (फेरी बोट) मुंबईतून रायगड जिल्ह्यात प्रवेश करण्यासाठी होते, पण पुढे रत्नागिरी, सिंधुदुर्गपर्यंत ती प्रवासी जलवाहतूक होत नसल्याने मुंबई-गोवा महामार्गावर आणि कोकण रेल्वेवर अवलंबून रहावे लागत होते आणि तोही मार्ग मृत्यूचा सापळा बनला आहे. त्यामुळे या महामार्गापेक्षाही सुरक्षित अशी मुंबई ते सिंधुदुर्ग प्रवासी जलवाहतूक येत्या तीन महिन्यात, २०१७ च्या मार्चपासून सुरु होणार आहे, ही संपूर्ण कोकणासाठी खूशखबर आहे.
     कोकणाच्या निसर्गाचा बाज काही निराळाच. तिथलं प्रसन्न करणारं वातावरण, हिरवळ हवीहवीशी वाटते. मात्र, होळी, उन्हाळ्याची सुट्टी, गणेशोत्सवात कोकणात जाणं कठीण होत असतं. या काळात ट्रेनचं बुकिंग न मिळणं, खाजगी बसेसची मुजोरी अशा समस्या येत जातात. अशा परिस्थितीत जलवाहतुकीचा चांगला पर्याय चाकरमान्यांना, सर्वसामान्यांना मिळणे गरजेचे होते. त्यामुळे वाहतुकीच्या दृष्टीने चांगला असणारा हा जलवाहतुकीचा पर्याय लवकरात लवकर खुला व्हावा, अशी मागणी दीर्घकाळ केली जात होती. ही मागणी आता प्रत्यक्षात येणार आहे. येत्या २०१७ च्या मार्चपासून मुंबईतील भाऊचा धक्का येथून दिघी, दाभोळ, जयगड, हर्णे, श्रीवर्धन, रत्नागिरी, जैतापूर, विजयदुर्ग, मालवण, वेगुर्ला या ठिकाणांदरम्यान प्रवासी जलवाहतूक करण्यात येणार आहे. महाराष्ट्र मेरीटाइम बोर्डाने हे काम मे. सुवर्णदुर्ग शिपिंग ऍण्ड मरिन सर्व्हिसेस या जलवाहतूक सेवा पुरवणार्‍या कंपनीला दिले आहे. येत्या तीन महिन्यात ही प्रवासी जलवाहतूक सेवा उशिरा का होईना, पण सुरु होत आहे, याचा कोकणवासियांना आगळा आनंद आहे.
     रस्ता वाहतुकीसाठी एसटीचा जन्म झाला नव्हता, त्या काळी अर्ध्याअधिक मुंबईकरांचे मूळ कोकणात होते. त्या काळी वाहतुकीचे पर्याय नसल्यामुळे कोकणातून मुंबईकडे प्रवास जलमार्गानेच व्हायचा. रात्रभर प्रवास करून आलेली बोट समुद्रात लांब कोठे तरी नांगर टाकायची. मग मोठ्या हिंदकळणार्‍या होड्यांमधून प्रवासी खच्चून भरून, चिखलाने भरलेल्या मुंबईच्या पूर्व किनार्‍यावर पाऊल ठेवायचे. गोदीत कंत्राटदारी करणारे उरणचे भाऊ अजिंक्य हे दृश्य पाहून रोज हळहळत असत. ब्रिटिश सरकार हे हाल निवारण्यासाठी काही करणार नाही, हे लक्षात आल्यानंतर भाऊंनी धक्का स्वत:च उभारण्याचे ठरवले आणि अल्पावधीतच १८६२ साली कोकणी माणसांच्या हक्काचा ‘भाऊचा धक्का’ तयार झाला. त्यानंतर धरमतर (१८६८), रेवस (१८६९) येथे आणि कोकणात धक्के बांधण्यात येऊन प्रवासी जलवाहतुकीचे सुवर्णयुग सुरु झाले. 
     १८४५ च्या सुमारास ब्रिटिशांनी प्रवासी जलवाहतुकीसाठी बॉम्बे स्टीम नेव्हिगेशन कंपनीची स्थापना केली होतीच. त्यानंतर ‘शेटवाला कंपनी‘ (माझी आगबोट कंपनी), ‘दी रत्नागर स्टिम नेव्हिगेशन कंपनी‘ या कंपन्यांच्या प्रवासी जलवाहतूक सेवांनीही कोकणवासियांची मने जिंकली.  त्या वेळी प्रवाशांची क्षमता अडीशे ते तीनशेच्या आसपास होती आणि तिकीट अडीच, तीन, चार रुपये असायचं. पुढे बोट उद्योगाला मोठ्या प्रमाणात चालना मिळाली आणि त्यानुसार तिकीट दरही वाढले. साधारण या बोटींवर तीन डेक असायचे. सकाळी साडेसहा वाजता रेवस-धरमतरकडे जाणारी छोटी बोट सुटली की, आठ वाजता दाभोळ बंदरापर्यंतची मोठी बोट सुटत असे. लागोपाठ रत्नागिरी, विजयदुर्ग, गोवा या लाइनीवरील अगडबंब बोट सुटत असे. या बोटी निघून गेल्या तरी आदल्या दिवशी कोकण-गोव्याकडे गेलेल्या बोटी परतण्याची वेळ झाल्यामुळे दुपारपर्यंत भाऊच्या धक्क्याला उसंत नसे. त्यावेळी प्रवासी बोटींवर काहीही नियंत्रण नसल्यामुळे अतिवादळी किंवा अतिपावसाळी हवामानाचे काही दिवस वगळता सर्रास बारमाही वाहतूक चाले.
      ११ नोव्हेंबर १९२७ ला जयंती व तुकाराम या प्रवासी बोटी एकाच ठिकाणी बुडाल्या. नंतर दोन दशकांनी १७ जुलै १९४७ रोजी देशाचे स्वातंत्र्य महिनाभरावर आले असताना रामदास बोट बुडाली ते प्रकरण चांगलंच गाजलं. या जयंती, तुकाराम, रामदास या तीन बोटी समुद्रात बुडून २० वर्षांत एक हजार कोकणवासी मरण पावले. पण यात बळी पडलेल्या कोकणवासीयांचे ते बलिदान वाया गेले नाही. कोकण बोट प्रवासात पुष्कळ सुधारणा झाल्या. पावसाळ्याच्या वादळी हवेत चार महिने बोटी कायद्याने बंद झाल्या. बिनतारी यंत्र, रेडिओ आदी संदेशवहनाची अद्ययावत साधने बोटींवर बसवली गेली. बोटींचा प्रवास पुष्कळ सुरक्षित झाला व त्यानंतर एकही मोठा अपघात झाला नाही. 
     पुढे बॉम्बे स्टीम कॉपोर्रेशनने रत्नागिरी, चंदावती, इरावती अशा नवीन बोटी ताफ्यात सामील केल्या. ग्राहकांना खुश करण्यासाठी मोङ्गत जेवणाची व्यवस्था त्या वेळी सर्वप्रथम सुरू करण्यात आली. त्याच वर्षी मार्चमध्ये चंदावती बोट मालवणच्या बंदरात रुतून बसली ती कायमचीच. पुढे ही कंपनी तोटा सहन न झाल्याने १९६४ मध्ये बंद पडली. १२५ वर्षांच्या बॉम्बे स्टीम कॉपोर्रेशनचा अशाप्रकारे अध्याय संपला. तेव्हा कोकणवासीयांची मोठी पंचाईत झाल्याचे पाहून तत्कालीन मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांनी गोव्यातील उद्योजक विश्वासराव चौगुले यांच्या स्टीमशिपमार्ङ्गतच्या चौगुले बोटसेवा पुन्हा सुरू केली. चौगुले स्टीमशिपने रोहिणी, सरीता, कोकणसेवक बोटी सुरू केल्या. मात्र, या बोटींचं आथिर्क गणित जमेना. त्यातच १९७१ मध्ये कंपनीची ’रोहिणी’ ही बोट मालवण बंदरात बुडाली आणि कंपनीचे कंबरडेच मोडले. अखेर खाजगी उद्योजक पुढे येत नसल्याने या सेवेचेच राष्ट्रीयीकरण झाले आणि १९७३ मध्ये मोगल लाइन्सने (भारत सरकारचा अंगीकृत व्यवसाय) कोकणसेवक व कोकणशक्ती (कोकणशक्ती मूळची सरिता बोट) या दोन बोटींची सेवा सुरू केली. या कंपनीला कोकण प्रवासी वाहतुकीमुळे जो तोटा सहन करावा लागत होता, त्या तोट्यापैकी २० टक्के रक्कम मोगल लाइन्स कंपनीने सोसावी व उरलेल्या तोट्यापैकी २५ टक्के भारत सरकार, ४० टक्के महाराष्ट्र शासन व ३५ टक्के गोवा शासनाने प्रतिपूर्ती करावयाची ठरले होते व ही व्यवस्था मे १९८८ पर्यंत होती. दरम्यान वाटेवरील बंदरांची संख्या केवळ दोनवर आली. त्यातच राजीव गांधी पंतप्रधान असताना श्रीलंकेला जाणार्‍या भारतीय शांतिसैनिकांची वाहतूक करण्यासाठी भारत सरकारकडून मोगल लाइन्सकडून कोकणसेवक बोट काढून घेण्यात आली. (दुसर्‍या महायुद्धाच्या वेळीही त्या वेळच्या सरकारने युद्धासाठी व किनार्‍याच्या रक्षणासाठी बॉम्बे स्टीम नेव्हिगेशन कंपनी, शेटवाला कंपनी (माझी आगबोट कंपनी), दी रत्नागर स्टिम नेव्हिगेशन कंपनी या तिन्ही कंपन्यांच्या बोटी काढून घेतल्या होत्या.) म्हणूनच २९ जानेवारी १९८८ रोजी मुंबईहून पणजीला गेलेली ’कोकणसेवक’ परत आलीच नाही. त्यानंतर उरली केवळ कोकणशक्ती. पण तिची शक्तीही क्षीण होत गेली आणि १ मे १९८८ ला तिने शेवटचा श्वास घेतला. मुंबई-गोवा दरम्यानची प्रवासी बोट सेवा कायमची बंद पडली. 
    आता पुन्हा दोन तपानंतर येत्या नवीन वर्षात मार्चमध्ये कोकणवासीयांसाठी महत्त्वाची असणारी मुंबई ते सिंधुदुर्ग प्रवासी बोटसेवा सुरु झाल्यावर पर्यटनाच्या दृष्टीने तिचा खूपच फायदा होणार आहे. कोकणातील बहुतांशी पर्यटन केंद्रे किनारपट्टीवर असल्याने पर्यटन विकासाला गती मिळून मोठ्या प्रमाणावर पर्यटक कोकणात उतरतील. नितांत सुंदर समुद्र किनार्‍यांचे जगभरच्या पर्यटकांच्यादृष्टीने मार्केटींग करता येईल. आंबा उत्पादन व मच्छिमारी व्यवसायाला अधिक गती मिळेल. अशाप्रकारे या प्रवासी जलवाहतूक सेवेने कोकण विकासाची चक्रे गतीमान होणार आहेत. तसेच मुंबई-गोवा महामार्गावर पडणारा वाहतुकीचा ताणही प्रवासी जलवाहतुकीने कमी होणार आहे आणि त्याबरोबरच या महामार्गाचे चौपदरीकरण लवकर करुन कोकणचा महामार्गप्रवास सुसह्य आणि सुरक्षित करण्याचे आव्हानही सरकारसमोर आहे. कोकण रेल्वेचे दुपदरीकरणही लवकर झाले पाहिजे, तसेच कोकणातील सागरी महामार्गाचाही एकदा निकाल लावून टाकला पाहिजे. कारण महाराष्ट्र सोडला तर पश्चिम किनारपट्टीवरील सर्व राज्यांतील सागरी महामार्ग तयार आहेत. तथापि, सागरी महामार्ग नाही, पण सागरी प्रवास आता टप्प्यात आला ही घटनाच ऐतिहासिक ठरणार आहे, यात वाद नाही.  


 

मंगळवार, ६ डिसेंबर, २०१६

शिल्पकार नानासाहेब करमरकर यांच्या पुरस्कार विजेत्या शिल्पाची शंभरी

-उमाजी म. केळुसकर ⬑ खारावारा ⬉


     रायगड जिल्हा म्हटला की छत्रपती शिवाजी महाराज आणि या जिल्ह्यातील सासवणे म्हटले की शिल्पकार विनायक पांडुरंग उर्फ नानासाहेब करमरकर ही नावे समोर येतात. नानासाहेब करमरकर यांचं जीवन छत्रपती शिवाजी महाराजांच्या एका चित्रामुळे बदलले. ते जगप्रसिद्ध शिल्पकार बनू शकले. त्यांच्या पहिल्या रौप्यपदक विजेत्या गोगलगायीवर बसलेल्या नग्न युवतीच्या शिल्पाला या २०१६ च्या डिसेंबर महिन्यात १०० वर्षे पूर्ण होत आहेत. ही रायगडकरांसाठीच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रासाठी, देशासाठी अभिमानाची बाब आहे. नानासाहेबांची सर्व शिल्पे सध्या त्यांच्या अलिबाग जवळील सासवणे गावी करमरकर शिल्पालयात आहेत. त्यांची सून सुनंदा करमकर शिल्पे जतन करण्याचा आटोकाट प्रयत्न करत आहेत. या महान शिल्पकाराला भारत सरकारने पद्मश्री दिला, पण करमरकरांचे कार्य आणि त्यांनी मागे ठेवलेला आपल्या शिल्पांचा वारसा पहाता त्यांना मरणोत्तर भारतरत्न दिले तर तो भारताचाच गौरव ठरेल. 
    भारतातील वास्तववादी शिल्पकारांमधील अग्रगण्य शिल्पकार म्हणून प्रसिद्ध असलेल्या सासवणे येथील विनायक पांडुरंग उर्फ नानासाहेब करमरकरांचे रौप्यपदक विजेेते शतकी शिल्प आजही करमरकर शिल्पालयात विराजमान आहे. या शिल्पाची माहिती देण्यापूर्वी नानासाहेबांचा प्रेरणादायक इतिहास लक्षात घेतला पाहिजे. करमरकरांचा जन्म २ ऑक्टोबर १८९१ साली महाराष्ट्रातील रायगड जिल्ह्यातील (तत्कालिन कुलाबा जिल्हा) सासवणे इथे झाला. समुद्रकिनारी वसलेल्या या गावातच त्यांच्या वडिलांचा गणपतीच्या मूर्ती बनवण्याचा उद्योग होता. त्यामुळे चित्र काढण्याचा नाद असलेल्या करमरकरांना मूर्ती घडवण्याचेही शिक्षण घरीच मिळाले. गावातील देवळाच्या भिंतीवर त्यांनी १९०८ साली काढलेले अश्‍वारुढ शिवाजी महाराजांचे चित्र तत्कालिन कुलाबा जिल्ह्याचे कलारसिक उपजिल्हाधिकारी ऑटो रॉथफील्ड यांनी १९०९ साली सासवणे येथे आले असताना पाहिले. ते त्यांना इतके आवडले की त्यांनी कुमारवयीन नानासाहेबांची कलेचे खोली चाचपण्यासाठी त्यांच्याकडून आपल्याकडील छायाचित्रानुसार एक ग्रीक अर्धशिल्प बनवून घेतले. ते इतके हुबेहुब होते की या मुलाला जर शिल्पकलेलेचे शास्त्रोप्त शिक्षण मिळाले तर तो आंतरराष्ट्रीय दर्जाचा शिल्पकार बनेल असा विश्‍वास रॉथफील्ड यांना वाटला आणि नानासाहेबांनी तो खराही ठरविला. नानासाहेबांचे शालेय शिक्षण संपल्यानतर १९१० साली रॉथफील्ड यांनी नानासाहेबांना मुंबईच्या जे.जे. स्कूल ऑफ आर्टमध्ये शिष्यवृत्ती देऊन दाखल केले. १९१० ते १९१३ पर्यंत जे.जे. स्कूल ऑफ आर्टचा अभ्यास करुन ते परीक्षेत पहिले आले व त्याबद्दल स्कूलतर्फे त्यांना २०१४ साली लॉर्ड मेयो पदकाने सन्मानीत करण्यात आले. 

श्रीमती सुनंदाताई करमरकर

     नानासाहेब करमरकरांनी खर्‍या अर्थाने गणेशमूर्तींनी आपल्या कलाजीवनास सुरुवात केली. रॉथफिल्ड यांच्या सांगण्यानुसार पहिला अर्धपुतळा बनवला. त्यानंतर जे.जे. स्कूल ऑफ आर्टमध्ये तीन वर्षांच्या प्रशिक्षण काळात अनेक शिल्परचना केल्या, त्यातील ‘माकड आणि त्याने जवळ घेतलेले पिल्लू’ या शिल्परचनेस प्रतिष्ठेचे ‘लॉर्ड मेयो पदक’ही भेटले. प्रशिक्षण घेऊन आल्यावर सासवणे येथे १९१३ साली त्यांनी चक्क आपल्या वडिलांचे शिल्प बनवले आणि सर्वांना थक्क केले. त्यानंतर त्यांनी आपल्या कुटुंबियांची, मित्रपरिवाराची अनेक नमुना शिल्पे बनवली. रॉथफिल्ड यांचंही त्यांनी शिल्प बनविलं. १९१५ साली रॉथफिल्ड यांचे स्नेही कर्नल डॉ. व्ही.एन. भाजेकर यांचे यांचे त्यांनी शिल्प घडविलं.  त्यानंतर कर्नल डॉ. व्ही.एन. भाजेकर यांनी जगप्रसिद्ध कवी आणि साहित्यिक रवींद्रनाथ टागोर यांचे पुतणे सुरेंद्रनाथ टागोर हे मुंबईस आले असताना त्यांनी त्यांची भेट घडवली. नानासाहेबांच्या शिल्पकृतींनी प्रभावीत होऊन सुरेंद्रनाथ टागोर यांनी आपल्या मुलीचं आणि रवींद्रनाथ टागोर यांचे वडील देवेंद्रनाथ टागोर यांचं शिल्प घडवण्याचं काम दिलं. अल्पावधीत त्यांनी ती शिल्प तयार केली. यानंतर त्यांच्या जीवनला एक वेगळी दिशा मिळाली. सुरेंद्रनाथ टागोर यांच्या आग्रहावरुन १९१७ साली त्यांनी कलकत्ता येथे स्टुडिओ थाटला. १९१६ च्या डिसेंबरच्या सुरुवातीस कलकत्त्यात त्यांनी आज सासवणे येथे करमरकर शिल्पालयात असलेल्या गोगलगायीवर बसलेल्या नग्न अंध युवतीचे शिल्प तयार केले. त्या शिल्पाला १९१६ च्या डिसेंबरमध्ये बॉम्बे आर्ट सोसायटीच्या प्रदर्शनात रौप्यपदकाचा बहुमान प्राप्त झाला होता. या महिन्यात या घटनेस शंभर वर्षे झाली आहेत.

हेच ते पुरस्कार विजेते शिल्प

















    बॉम्बे आर्ट सोसायटीच्या प्रदर्शनात रौप्यपदक  मिळवणार्‍या या शिल्पात एक नग्न अंध युवती दोन गुडघ्यांवर गोगलगायीवर बसली असून तिच्या आजूबाजूला असणारं जग चाचपडताना दाखवलं आहे. ते शिल्प अनावृत्त असले तरी त्यातून कोणतीही अश्‍लीलता दृग्गोचर होत नाही, उलट तिच्या अंधत्वाची जाणीव होताच मन करुणेने भरुन येते. नानासाहेब शिल्पकार म्हणून का महान आहेत, हे या शिल्पातून सहज लक्षात येते. तरीही या शंभरीच्या शिल्पामागची नानासाहेबांची काय कल्पना असावी असा प्रश्‍न उपस्थित होतोच. या प्रश्‍नाचे उत्तर देताना नानासाहेबांच्या स्नुषा सुनंदा करमरकर सांगतात, ‘निमकर या हिंदुस्थानी व्यक्तीशी विवाह केलेल्या कमळाबाई निमकर या अमेरिकन बाईने अंध आणि पोलिओ रुग्णांना मदत करायची ठरवले. त्यांनी नानासाहेबांना आपण अंधांसाठी काम करत असल्याचे सांगून त्यांनाही अंधांबाबत समाजात जागृती वाढली पाहिजे, समाजात त्यांच्याबाबत कलात्मकरित्या संदेश पोहचला पाहिजे यासाठी काहीतरी करायला सांगितले. आंधळ्यांचं आयुष्य पुढे सरकत नाही ही वस्तुस्थिती नजरेसमोर ठेवून नानासाहेबांनी गोगलगायीवर बसलेल्या नग्न अंध युवतीचे शिल्प तयार केले. त्यातून त्यांनी संपूर्ण समाजाला असा संदेश दिला की, गोगलगाय हे काळाचे प्रतिक असून अंधांच्या दृष्टीने काळाची गती मंद असते, म्हणूनच गोगलगायीवर बसलेली अंध युवती दोन्ही हात पसरवून आपला भविष्यकाळ चाचपडते आहे. अशा अंधांचा वर्तमान आणि भविष्यकाळ सुसह्य करणे समाजाची जबाबदारी ही  भूमिका त्यांनी सदर शिल्पाद्वारे मांडली आणि ती भूमिका व शिल्परचना बॉम्बे आर्ट सोसायटीला आपल्या प्रदर्शनात भावली व त्याबद्दल नानासाहेबांचा रौप्यपदकाने गौरव केला.’
   खरेतर देशात त्याकाळी नग्न शिल्प केली जात नव्हती, परंतु नानासाहेबांनी धाडसाने ते गोगलगायीवर बसलेल्या नग्न अंध युवतीचे शिल्प तयार केले होते. त्याबद्दल कोणीही हरकत घेतली नाही. उलट त्याचे कौतुकच झाले. वास्तविक २ मार्च १८५७ या दिवशी स्थापन झालेल्या सर जे.जे. स्कूल ऑङ्ग आर्टमध्ये १९१९ पर्यंत अभ्यासासाठी वस्त्रांकित मॉडेलचा वापर व्हायचा आणि त्या मॉडेलही दुर्मिळ असत. पूर्ण नग्न मॉडेलवरुन शिल्परचनेचा अभ्यास करणे ही दूरची बाब होती. ही संधी त्यांना ‘रॉयल ऍकॅडमी स्कूल ऑफ लंडन’ या कलाशिक्षण संस्थेत मिळाली. तेथे त्यांना १९२० ते १९२२ अशी दोन वर्षे प्रत्यक्ष नग्न मानवाकृतीवरुन अभ्यास करता आला. मानवाकृती अभ्यासासाठी तेथे विविध वयाची कपडे घातलेली मॉडेल्स व नग्न स्त्री-पुरुष मॉडेल्सही उपलब्ध असत. तसेच ब्रॉंझ कटिंग, ’स्टोन क्रशिंग’ ही तंत्रेही आत्मसात करून १९२३ साली ते कलकत्यास परतले. पुढे १९२५ साली ते मुंबईत आले. त्यांनी देवनारला स्टुडिओ उभारला. त्यानंतर मुंबईतच त्यांचे वास्तव्य कायम राहिले.  नानासाहेबांनी व्यवसायात स्थिरावल्यानंतरही स्वान्त:सुखाय व अभ्यासासाठी प्रत्यक्ष अर्धनग्न व नग्न मॉडेल्सवरुन अनेक शिल्प घडवली. त्या काळात भारतीय समाजरचनेत प्रत्यक्ष अशा कामांसाठी मॉडेल मिळवणे ही अत्यंत कठीण होते. त्यातूनही त्यांनी मार्ग काढला आणि त्यांनी मॉडेल्स मिळवून अनेकानेक उत्तम नग्न शिल्पे घडवली. 
    नानासाहेब करमरकर यांनी १९१७ ते १९६७ या कालखंडात देशातच नव्हे, तर सार्‍या जगात आपल्या वास्तवदर्शी शिल्पकलेने आपल्या नावाचा डंका घुमवला होता. अर्थात हे काही सहज घडले नाही, त्यासाठी त्यांना चिकाटी, संघर्ष आणि कष्ट या त्यांच्या त्रिगुणांचा फायदा झाला. आपल्या आयुष्यात त्यांनी रवींद्रनाथ टागोर, चित्तरंजनदास, महात्मा गांधी, पी.सी. रे प्रभृतींची समोर बसवून व्यक्तिशिल्पे घडवली. पुण्यातील ‘श्री शिवाजी प्रिपरेटरी मिलिटरी स्कूल’च्या आवारातील शिवाजी महाराजांचा पुतळा, बीड, नांदेड, इचलकरंजी येथील अश्वारूढ शिवाजी महाराज, सांगलीजवळ चितळे उद्योगसमूहाकडे असलेले म्हशीचे शिल्प, मुंबईतील गिरगाव चौपाटीवरील विठ्ठलभाई पटेलांचा पुतळा, उच्च न्यायालयाच्या आवारातील सर जस्टीस दिनशा मुल्ला यांचा पुतळा, प्रभादेवी येथील रवींद्र नाट्यगृहातील रवींद्रनाथांचा पुतळा, ऑपेरा हाऊस भागातल्या वरेरकरांच्या घरातील मामा वरेरकर यांचे शिल्प, त्याचबरोबर सयाजीराव गायकवाड, क्लिङ्गटन विल्यम, संत ज्ञानेश्वर, महर्षी धोंडो केशव कर्वे, श्री रामकृष्ण परमहंस, जमशेदजी टाटा, ग्वाल्हेरचे महाराज,  कोळीण, गुराखी अशी अनेक शिल्पे महाराष्ट्रभर प्रसिद्ध आहेत. भारताबाहेरही अनेक ठिकाणी नानासाहेबांची शिल्पे आहेत. सध्या सासवणे येथे असलेली दोनशे शिल्पे ही नानासाहेबांच्या आवडीची निवडक शिल्पे आहेत.
     नानासाहेब करमरकर यांच्या शिल्पांना पुढे अनेकानेक पारितोषिके भेटली. १९२४ साली त्यांच्या शंखध्वनी या नग्न युवती शिल्पास द सोसायटी ऑफ फाईन आर्ट, कलकत्ता या संस्थेचं रौप्यपदक व २०० रुपयांचं पारितोषिक मिळालं, तर येथील हिरा शिवराम कोळी या १३ वर्षांच्या छोट्या टोपलीत मासे घेऊन उभ्या असलेल्या मुलीच्या (मत्स्यकन्या) शिल्पास १९३० साली बॉम्बे आर्ट सोसायटीचं सुवर्णपदक मिळालं. १९६३ साली बॉम्बे आर्ट सोसायटीतर्फे त्यांना पहिलाच आर्टिस्ट ऑफ द इअर हा बहुमान प्रदान करण्यात आला. १९६४ ललित कला अकादमीची त्यांना फोलोशिप मिळाली. त्याच वर्षी त्यांना  भारत सरकारतर्फे पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. त्यांनी अमेरिका, इटली, फ्रान्स, स्वीत्झर्लंड अशा देशांचे अभ्यासदौरे केले. विशेष म्हणजे १९४९ साली अमेरिका दौर्‍यात मिल्टन कॉलेजचे डीन जे.एन. डलांड यांना समोर बसवून त्यांचा अर्धपुतळा तयार केला व तो कॉलेजला भेट दिला.
   योगायोग म्हणजे प्रथम भिंतीवर काढलेल्या अश्‍वारुढ शिवाजी महाराजांच्या चित्रामुळे त्यांच्या कलाजीवनाला चालना मिळाली. नंतर १९२८ मध्ये केलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्‍वारुढ पुतळ्यामुळे त्यांची कीर्ती वाढली आणि त्यांच्या अंतकाळीही ते इचलकरंजीसाठी अश्‍वारुढ छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बनवीत होते. या थोर शिल्पकाराचे १३ जून १९६७ साली वयाच्या ७५ व्या वर्षी निधन झाले. त्यांनी १९३४ साली वडिलोपार्जित घराच्या जागी एक मजली बंगला व स्टुडिओ बांधला होता, त्यात त्यांनी देवनार स्टुडिओतील काही लहान व मध्यम आकाराची शिल्पे हलविली होती. नानासाहेबांच्या मृत्यूनंतर करमरकर कुटुंबियांनी देवनारचा स्टुडिओ विकून तेथील २०० पेक्षा अधिक शिल्प सासवण्यास हलविली आणि नानासाहेब यांच्या पत्नी सगुणाबाई पुत्र विश्‍वास करमरकर यांच्यासोबत कलकत्त्यास राहण्यास गेल्या. त्यानंतर सासवण्यातील वास्तू व त्यातील शिल्प पुढील २० वर्षे नोकरांच्या ताब्यात होती. कोणी बंगल्याची चावी मागितल्यास ती मिळे व बंगला उघडून ती शिल्पे पाहता येत असत. नानासाहेबांचे पुत्र विश्‍वास करमरकर भारत सरकारच्या सरंक्षण खात्यात कानपूर, मद्रास, कलकत्ता अशा विविध ठिकाणी उच्चपदी कार्यरत होते. १९८६ साली ते ऍडिशनल डायरेक्टर जनरल, ऑर्डनन्स बोर्ड या पदावरुन निवृत्त झाले. निवृत्तीनंतर त्यांनी व त्यांच्या पत्नी सुनंदा करमरकर यांनी वडिलांची शिल्पे सांभाळण्याचं ठरवलं आणि त्याच वर्षी नानासाहेबांच्या जन्मदिवशी, २ ऑक्टोबरला सासवण्याच्या घरात करमरकर शिल्पालयाची स्थापना केली. दुर्दैवाने ३० जून १९९० ला विश्‍वास करमरकरांचं ह्दयविकाराच्या झटक्याने अचानक निधन झाले. हा सुनंदा करमरकर यांना मोठा धक्का होता. अमेरिकेत स्थायिक असलेला त्यांचे पुत्र विक्रम विश्‍वास करमरकर यांनी आपल्या आईला अमेरिकेत आपल्याकडे येण्याचा आग्रह केला पण शिल्पालयाच्या देखभालीसाठी त्यांनी त्या आग्रहास नकार दिला. आज त्या गोष्टीला ३० वर्षे झाली आहेत. सुनंदा करमरकर आपल्या सासर्‍यांनी दिलेला कलेचा ठेवा प्राणपणाने जपत आहेत. त्यांना २०१३ साली रायगड जिल्हा परिषदेने रायगड भूषण हा पुरस्कारही दिला आहे. सुनंदा करमरकर या आज ८३ वर्षांच्या असल्या तरी तरुणींना लाजवेल असा त्यांचा उत्साह आहे. त्यांनी आपण थकलो आहे, हे सांगायचा अवकाश शिल्पकार नानासाहेब करमरकर यांचा, आपल्या आजोबांचा वारसा सांभाळण्यासाठी विक्रम करमरकर भारतात, सासवणे येथे येणार आहेत कारण त्यांनी आपल्या आईला शब्द दिला आहे की, ‘तू मला बोलवताच मी अमेरिका सोडून हे शिल्पालय सांभाळण्यास मी येईन.’ नानासाहेबांची प्रत्येक पिढी त्यांच्या कलाकृतींवर प्रेम करते आहे आणि ही प्रत्येक पिढी करमरकर शिल्पालय सांभाळण्यास येणार आहे, मग ती जगाच्या पाठीवर कुठेही असो. रायगड जिल्ह्यातील अलिबाग तालुक्यात हे शिल्पालय आहे. हे करमरकर शिल्पालय या जिल्ह्याचेच नव्हे तर संपूर्ण देशाचे कलातीर्थ आहे. या कलातीर्थातील अंध युवतीच्या शिल्पाला शंभर वर्षे झाली आहेत. त्यानिमित्त जर भारत सरकारने या जगप्रसिद्ध शिल्पकाराला वंदन म्हणून भारतरत्न पुरस्कारने मरणोत्तर सन्मानित केले तर तो भारतीय शिल्पकलेचाच नाही, तर संपूर्ण जगात देशाचा गौरव ठरेल.