मंगळवार, १३ ऑक्टोबर, २०१५

बाईमागचा गूढार्थ

  -उमाजी म. केळुसकर ⬑ चिंतन ⬉

     माऊली आणि बाई. या दोन्ही शब्दात आई आहे, पण त्यातील भावार्थ वेगळा आहे. त्यामुळे आई, माऊली, बाप, या शब्दांमागचा गूढार्थ शोधला पाहिजे. बापातला बा आणि आईतली ई या दोन अक्षरांचा एक शब्द बनला तो बाई. पण या बाई शब्दाला आज मादीचा दर्जा दिला जात आहे. त्यामुळे कोणत्याही महिलेला आपणास बाई बोललेले आवड नाही. हा महिलांचा दोष नाही. दोष बदलत्या समाजाचा आहे. बदल हे घडत असतात, पण जेव्हा अर्थाचे अनर्थ करणारे बदल होतात, तेव्हा ते विखारी ठरतात.
      बाई या शब्दाबरोबरच मला माऊली या शब्दाचा जिव्हाळा फार आहे. आईला माऊली बोलतात. पण संतांनाही माऊली बोलतात. आई कशी असते ? ती असते हवेच्या थंडगार झुळकेसारखी शीतल. तिच्यात दाहकता अजिबात नसते. मुलांनी हजार गुन्हे करो, तिला आपली मुले प्रियच असतात. संतांचेही तसेच असते त्यांच्यादृष्टीने सारे जगच बिनविषारी असते. जगाला प्रेम आणि सुविचारांची शीतलता देण्याचा त्यांचा ध्यास असतो. बाईंचे तसे नसते बापातली दाहकता आणि आईतली शीतलता यांचा संगम बाई या शब्दात असतो. करडी शिस्त आणि प्रेमाचा ओलावा या शब्दाला असतो. त्यामुळेच पूर्वी आदरणीय, शिक्षिका, मार्गदर्शक आणि ज्येष्ठ महिलांना बाई हा शब्द वापरला जायचा. छोट्या मुक्ताईला मुक्ताबाई म्हणून संबोधले जायचे. ज्ञानेश्‍वरांना माऊली म्हणून ओळखले जाते, त्या माऊलीचे आणि भावंडाचेही कान उपटण्याचे काम मुक्ताबाई करीत असत. यातून माऊलीपेक्षा किती मोठा अधिकार बाई या शब्दाला आहे हे लक्षात येते. 
     अर्धनारी नटेश्‍वर भगवान शिव-पार्वतीचे रुपही बाईचेच. जगन्माता अंबाबाई या देखील बाईच. शिवशंकर आणि अंबाबाई दाहकता आणि शीतलतेचं उत्कृष्ट उदाहरण. सृष्टी सर्जन आणि सृष्टीविनाश या दोन्ही घडविण्याचं या दोघांचही सामर्थ्य. म्हणूनच शिवशंकराला माऊली म्हणत नाही, त्याला बाई न म्हणता अर्धनारी नटेश्‍वराची उमपा देतात, तर जगन्माता अंबेला बाई म्हणतात. पुराणातली वांगी पुराणात ठेवली, देव या संकल्पनेवर कोणाचा विश्‍वास असला, नसला तरी बाई या शब्दातलं ओज आणि तेज विसरुन चालणार नाही. खरोखरच बापामधला बा आणि आईमधली ई ही दोन अक्षरे घेऊन ज्याने बाई शब्द बनवला त्याचा या शब्दामागे किती उद्दात विचार आहे, दे लक्षात येते. बाई हा शब्द थिल्लर नाही, त्याचा चुकीचा वापर करणारे थिल्लर आहेत. नाटक, सिनेमातून बाई या शब्दाला विकृत स्वरुप दिले आणि बाई हा शब्द मादीला पर्यायी ठरवला. बाई या शब्दाचा कोणी चुकीचा अर्थ घेत असेल त्यातील आई शब्दावरच ते लांच्छन लावण्यासारखे आहे. माणसाची पुरुष आणि स्त्री अशी वर्गवारी आहे, मातृसत्ताक काळात बाप आणि आईचे अधिकार ज्याठिकाणी एकाकार झाले ती स्त्री म्हणजे बाई. बाई म्हणजे बाप आणि आईसारख्या आदरणीय, तेव्हा या आदरणीय बाई या शब्दाचा अनादर होणार नाही, याची काळजी प्रत्येकाने घ्यायला नको का?
     बाप आणि आई यांच्या मिलाफातून बनला शब्द बाई. याचा अर्थच मुळात आई-वडिलासारखा आदरणीय. आम्ही वर्गशिक्षिकांना बाई म्हणूनच हाक मारायचो. जुन्या काळातील महिला आणि पुरुषही समाजातील ज्येष्ठ महिलांचा बाई असाच उल्लेख करायचे. राजमाता जिजाबाई, झाशीची राणी लक्ष्मीबाई, शिक्षणशिखा सावित्रीबाई फुले, अशी अनेक नावे सांगता येतील, यांच्यापुढे त्यात्या काळी आदराने बाई हा शब्द लावलेला आहे. त्यातील बाई हा शब्द आदरार्थी आहे. बाई ही आई-बापासारखी आदरणीय असते. बाई या शब्दातील पावित्र्य आजच्या लोकांना कळणार नाही. कारण त्यांनी बाई या शब्दाचा अर्थच चुकीचा घेतला आहे. आजच्या मनुने याचा अर्थ बदलवलाय. भोगवस्तू म्हणजे बाई हा काढलेला नवीन अर्थ भयानक आहे. बाप-आई म्हणजे बाई काय भोगायची गोष्ट आहे. जनावरही असं करणार नाही. माणसानेच आपल्या विकृत मानसिकतेने बाई शब्दाचा अर्थ बदलवला आहे. इंग्रजीचा वापर वाढला आणि मम्मी-डॅडीचा प्रचार-प्रसार वाढला तसे आदरणीय महिलांना मॅडम बोलले जाऊ लागले आणि बाई हा शब्द उपेक्षित झाला. (ताकाला जाऊन भांड कशाला लपवू, मी देखील ज्येष्ठ महिलांना ताई, माई, अक्का, मॅडम म्हणूनच संबोधतो. बाई हा पवित्र शब्द असला तरी त्यांच्यासाठी मी तो वापरु शकत नाही, कारण ताबडतोब मला त्यांच्या नापसंतीला सामोरे जावे लागू शकते.) तात्पर्य काय तर बाई या शब्दाचा गैरअर्थ काढला गेला आहे. बाई वाड्यावर या संवादातून तर या पवित्र शब्दाचे धिंडवडे निघतात. खरेतर महिलेकडे बाई म्हणूनच पाहण्याची गरज आहे. ताई, माई, अक्कापेक्षाही ते पवित्र नाते आहे. बाई या शब्दात आई-बापाचं मातृत्व-पितृत्व आहे, तेच कळत-नकळत नाकारलं जातंय. हेही आजच्या काही समस्यांचं मूळ नाही काय?

शुक्रवार, १७ एप्रिल, २०१५

पोयनाडच्या भैरवनाथ रसवंतीगृहाचे बंडू विठ्ठल इंगुळकर

-उमाजी म. केळुसकर ⬑ वलयांकित ⬉


    पोयनाड ही अलिबाग तालुक्यातीलच नाही, तर जिल्ह्यातील मोठी बाजारपेठ. येथे मिरची खरेदी करण्यासाठी अगदी मुंबईसह जिल्हाभरातून मोठ्याप्रमाणात ग्राहक येतात. इथल्या व्यापार्‍यांची मिरची जशी बोलते, तसा इथे भैरवनाथ रसवंतीगृहाचे बंडू विठ्ठल इंगुळकर यांचा ऊसाचा रस बोलतो. गेली ४२ वर्षे बंडू इंगुळकर ऊसाच्या रसाचा व्यवसाय करीत असले तरी प्रत्यक्षात पोयनाड पंचक्रोशीची ही त्यांनी व्रतस्थपणे केलेली सेवा आहे.  
      बंडू विठ्ठल इंगुळकर मूळचे पुणे जिल्ह्यातील आडवली येथील. वडील शेतकरी त्यामुळे शेती हा त्यांचा जिव्हाळ्याचा विषय. परंतु आपण स्वत:च्या पायावर उभे राहून काहीतरी वेगळे करावे या हेतूने त्यांनी वयाच्या विसाव्या वर्षी १९५८ साली पेणला येऊन मडक्यातील भेंडीच्या पानावरच्या कुल्फी विक्रीचा व्यवसाय सुरु केला. त्यावेळी आजच्यासारखी वाहनांची सोय नव्हती, पण बंडू इंगुळकर कष्टाला भिणारे नव्हते, त्यांनी अगदी पायाला चाकं लावून पेण, नागोठणे, पाली, पोयनाड इत्यादी गावे फिरुन आपला कुल्फी विक्रीचा व्यवसाय केला. परंतु त्याकाळी स्वस्ताई असल्यामुळे कुल्फी विक्रीतून अपेक्षित उत्पन्न मिळत नसल्याने त्यांच्या मनात ऊसाच्या रसाचा व्यवसाय करावा असा विचार आला आणि त्यासाठी ठिकाण निवडले पोयनाड. १३ वर्षांचा कुल्फी विक्रीचा व्यवसाय जड मनाने बंद करुन ते १९७३ साली पोयनाडला आले. रायगड जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष प्रभाकर पाटील यांच्या पोयनाड येथील जागेत (तेथे नंतर पोयनाड ग्रामपंचायतीचे कार्यालयही होते.) प्रथम ऊसाच्या रसाचा भैरवनाथ रसवंतीगृह या नावाने व्यवसाय सुरु केला. हाताने फिरवायच्या  चरका, त्याला लावलेली घुंगरं आणि त्याचा येणारा छुन्नुकछुन्नक आवाज, त्याचबरोबर बंडू इंगुळकर यांची ‘ताई, माई, अक्का, दादा, भाऊ, काका ऊसाचा रस तरी पिऊन बघा’ ही त्यांनी ग्राहकांसाठी मारलेली हाळी ऊसाच्या रसाइतकीच तेव्हा गोड वाटायची. चरक्याचा दांडा फिरवताना त्यांनी म्हटलेली पुणेरी थाटाची गाणीही विसरता येणार नाही.
    काळानुरुप विजेवर चालणारा चरका आला, पण ऊसाच्या रसाचा आणि बंडू इंगुळकर यांच्या स्वभावातील मिठ्ठासपणा कायम राहिला. पोयनाड हे बाजारपेठेचे आणि सोमवारच्या आठवडा बाजाराचे गाव असल्यामुळे थकला-भागल्या ग्राहकांचे बंडू इंगुळकरांचे ऊसाच्या रसाचे दुकान तनमन शांत करण्याचे एक ठिकाणच होते. आजही पोयनाड नाक्यावरील त्यांच्या रसवंतीगृहात तेच काम चालू आहे.
     स्व. प्रभाकर पाटील, विजयकुमार मधुकर पाटील, आ. पंडितशेठ पाटील, कै. मदन रघुनाथ केळुसकर यांच्या आशीर्वादाने पोयनाड येथे आपण ऊसाच्या रसाचा व्यवसाय उत्तमरित्या करु शकलो, अशी कृतज्ञता बंडू इंगुळकर व्यक्त करतात.
      आज त्यांच्या या व्यवसायाला त्यांचे पुत्र अनंता बंडू इंगुळकर यांचे हात लाभले आहेत. अनंता आणि सौ. अनिता अनंता इंगुळकर यांना तीन मुली एक मुलगा आहे. बंडू इंगुळकर यांना त्यांच्या व्यवसायात अनुकुल आणि प्रतिकुल परिस्थितीतही त्यांच्या पत्नी सौ. ताराबाई बंडू इंगुळकर यांची चांगली साथ लाभली. आज बंडू इंगुळकर ७८ वर्षांचे असले तरीही ग्राहकांना मारलेली त्यांची हाळी अजूनही खणखणीतच आहे आणि त्याला ऊसासारखाच गोडवा आहे.

शुक्रवार, १० एप्रिल, २०१५

योगेश पवार नावाचा रंगभूमीवरील बहुरुपी

-उमाजी म. केळुसकर ⬑ नाट्य-चित्ररंग ⬉


      अलिबाग तालुक्यात अनेक गुणी कलाकार आहेत. या गुणी कलाकारांत किहीम-साईनगरच्या योगेश पवार यांचे नाव घ्यावे लागेल. योगेश पवार यांना रंगभूमीवरील बहुरुपीच म्हटले पाहिजे, इतके त्यांच्या भूमिकांत वैविध्य आहे. या वैविध्यानेच त्यांच्यातील कलाकाराला सातत्याने एक आव्हान मिळत आले आहे आणि हे आव्हान त्यांनी सतत लिलया पेलले आहे.  त्यामुळेच योगेश पवार रंगभूमीवरील खणखणीत नाणे आहे. 
       योगेश भिकाजी पवार यांची नाट्यआवड ही शालेय जीवनातली. चोंढी-किहीमच्या स.म. वडके विद्यालयाचे ते विद्यार्थी. खोडकर असले असले तरी ते शिक्षकांचे लाडके होते. आज मात्र त्यावेळचा खोडकर मुलगा अवखळ कलाकार म्हणून संपूर्ण नाट्यरसिकांचा लाडका बनला आहे. २००२ साल हे योगेश पवार यांच्या जीवनाला कलाटणी देणारे ठरले. याच वर्षी योगेश पवार हे विजय बारसे या परिसाच्या सहवासात आले आणि त्यांचे सोने झाले.  त्यावर्षी विजय बारसे यांच्या प्रयास सांस्कृतिक मंडळाने हिंदी राज्य नाट्यस्पर्धेसाठी सादर केलेल्या ‘ढलती छॉव’ या नाटकातून ‘रामू’ या नोकराची भूमिका करुन रंगभूमीवर खर्‍या अर्थाने वाटचाल सुरु केली. २००४ साली प्रयासच्याच ‘होऊन जाऊ दे एकदाच’ या राज्यनाट्य स्पर्धेसाठी केलेल्या नाटकात त्यांनी भूमिका केली.  त्याचे विविध ठिकाणी प्रयोगही झाले. त्याच वर्षी प्रयासच्याच ‘आन महाराष्ट्राची’ या लोकनाट्यात भूमिका केली. प्रयासच्या ‘अंध कोलाहल’साठी त्यांनी प्रकाश योजनाही केली. २००५ साली हजारीबाग येथील पर्यटन महोत्सवात प्रयासने सादर केलेल्या ‘एक खोज दमकते सुरज की और’ या हिंदी पथनाट्यातही योगेश पवार यांच्या भूमिकेचे  कौतुक झाले.
      २००३ साली किशोर म्हात्रे यांच्या रंगसेवा नाट्यसंस्थेने राज्यनाट्य स्पर्धेत सादर केलेल्या ‘रंग माझा तुला’ या नाटकात छोटी भूमिका केली. या छोट्या भूमिकांतून त्यांनी कधी मोठ्या भूमिका करणे सुरु केली हे कळलेच नाही आणि कळले तेव्हा योगेश पवार नावाचं रंगभूमीवरील नाणं खणखणीतपणे वाजायला लागलं होतं. २००४ या वर्षी प्रकल्प वाणी यांच्या प्रवीणकुमार मित्रमंडळ फोफेरी यांच्या ‘अरुणोदय झाला’ या लोकनाट्यात योगेश पवार यांनी ‘महाराज’  ही प्रमुख भूमिका केली. हे त्यांचे पहिले लोकनाट्य. २००५ साली त्याच संस्थेच्या ‘द्रोपदी वस्त्रहरण’ या लोकनाट्यात त्यांनी ‘टेंशन’ आणि ‘रावण’ या भूमिका केल्या.
      नंतर २००६ साली प्रकल्प वाणी यांनी कलारंग सामाजिक, सास्कृतिक संस्थेची स्थापना केल्यावर योगेश पवार यांना आपल्या कलेचे रंग दाखवायला जणू काही मोकळे आकाश भेटले. त्याच वर्षीच्या ‘च्या मायला एकदम टाप’ या कलारंगने सादर केलेल्या नाटकात हवालदार आणि यमाची त्यांनी धमाल भूमिका केली. २००८ साली कलारंगने ‘गजा आला रे’ हे नाटक राज्यनाट्य स्पर्धेसाठी नेले आणि त्याचे मोठ्याप्रमाणात प्रयोगही केले. त्यात मावळा आणि इन्स्पेक्टर या दोन भूमिका करुन रसिकांचे कौतुक मिळवले.
     २००९ साली योगेश पवार यांनी भूमिका कलेलेल्या कलारंगच्या ‘समझ जाव’ या एकांकिकेला मुंबईतील अमृतकुंभ एकांकिका स्पर्धेत दुसरा क्रमांक मिळाला आणि त्याच सालच्या बीड येथील अखिल भारतीय नाट्यसंमेलनासाठीही त्याची निवड झाली.
      २०१० साली ‘फूल २ धमाल’ या कलारंगच्या नृत्य-नाट्य प्रयोगात अभिनेते गणेश रेवडेकर आणि विकास सामुद्रे यांच्या सोबत विनोदी स्किट्सही केले. याचीही वाहव्वा झाली. २०११ साली कलारंगच्या ‘बिन भाड्याची खोली’ या नाटकात योगेश पवार यांनी घर मालकाची भूमिका केली. या नाटकाचे राज्य नाट्य स्पर्धा आणि कल्याणच्या आचार्य अत्रे नाट्यगृह येथे व्यावसायिक प्रयोगही झाले. त्यातील त्यांच्या भूमिकेचे आणि नाटकाचे खुप कौतुक झाले.
       २०१२ सालच्या कलारंगने सादर केलेल्या ‘सदा आनंदी युगे युगे’ या नाटकात त्यांनी सरपंच ही भूमिका केली. २०१३ साली कलारंगच्या ‘कट्टी बट्टी’ या नाटकात बाबाची भूमिका केली. २०१४ साली कलारंगच्या ‘कबड्डी कबड्डी’ या नाटकाचा प्रयोग पंढरपूर येथील अखिल भारतीय नाट्य संमेलनात झाला. या नाटकातही योगेश पवार यांची महत्वाची भूमिका होती.
      संदेश गायकवाड यांच्या सम्यक सांस्कृतिक संस्थेच्या माध्यमातूनही योगेश पवार यांना आपले नाट्य गुण दाखवायला मिळाले. सम्यकच्या २००७ च्या ‘नो टेंशन’ या लोकनाट्यात त्यांनी यमाची भूमिका केली. याच संस्थेच्या २००८ सालच्या ‘अधूनमधून अफलातून’ या लोकनाट्यात त्यांनी महाराजांची भूमिका केली. २०१४ ला सम्यकच्या ‘लगनडाव’ या नाटकात वशा ही भूमिका केली.
       योगेश पवार यांनी खेळ, चोराच्या उलट्या बोंबा, चल रे भोपळ्या टुनुक टुनुक इत्यादी एकांकिकांत  भूमिका केल्या आणि त्या एकांकिका स्पर्धांतही गाजल्या. तसेच वेगवेगळ्या विषयांवर प्रयास आणि कलारंग मार्फत सादर केलेल्या ५०० हून अधिक जनजागृतीपर पथनाट्यात त्यांनी भूमिका केल्या आहेत. प्रयासच्या ‘नवसाला पावणारा अलिबागचा सिद्धिविनायक’ या माहितीपटात त्यांनी भूमिका केली आहे. तसेच निषाद निर्मित ‘धुमार’ या लघुचित्रपटातही त्यांची भूमिका आहे. अक्षय केबल निर्मित ‘बोला मुग्धा जिंदाबाद’ या सुप्रसिद्ध व्हिडीअर गीतात कलाकार म्हणूनही त्यांनी काम केले आहे. शर्मिला सानकर दिग्दर्शित ‘धोबी की दुल्हन बडी प्यारी है’ या हिंदी चित्रपटात त्यांनी भूमिका केली आहे. तसेच ‘गुलमोहर’ या चित्रपटातही त्यांची भूमिका आहे. स्वरमधुर म्युशिकच्या ‘कावळा काव काव करतय’ या ऑडिओ-व्हिडिओ अल्बममध्ये त्यांच्या नृत्याची धमाल आहे. रोहित पाटील यांच्या ऑर्केस्ट्रात निवदन व विनोदी स्किटचे ते सादरी करण करतात.
       त्यांना कुलाबा जीवन गौरव पुरस्काराने गौरविण्यात आले आहे. तसेच ज्या शाळेत ते शिकले त्याच शाळेत त्यांना सांस्कृतिक कार्यक्रमाचे परीक्षक म्हणून त्यांना सन्मानाने बोलावले जाते. घरचा पाठिंबाही त्यांना नेहमी बळ देत आला आहे. पत्नी सौ. पायल आणि मुलगा शौर्य तर त्यांचा प्रेरणास्त्रोत आहे.
        स्व. विजय बारसे, प्रकल्प वाणी, संदेश गायकवाड, सचिन शिंदे, किरण साष्टे, मनीष अनसुरकर, विक्रांत वार्डे, रणजीत घरत, सागर नार्वेकर, किशोर म्हात्रे आदि कलाकार, दिग्दर्शकांचे मार्गदर्शन आपल्याला लाभले आणि या सगळ्यांसोबत आपल्याला काम करायला मिळाले यांचा नम्रपणे उल्लेख योगेश पवार करतात. योगेश पवार रंगभूमीवरील बहुरुपी असले तरी नम्रतेचे खरे रुप त्यांच्याकडे कायम आहे.
योगेश पवार यांचा मो. ९८२३४७११००

शुक्रवार, ३ एप्रिल, २०१५

अवधूत संप्रदायाचा झेंडा फडकवत ठेवणारे दिगंबर राणे

-उमाजी म. केळुसकर ⬑ वलयांकित ⬉



       पेझारी हे गाव दोन मोठ्या पंत-संतांसाठी प्रसिद्ध आहे. एक राजकारणातील पंत तर दुसरे अध्यात्मातील संत. होय, शेकापचा लाल बावटा जिल्ह्यात फडकत ठेवणारे प्रभाकर नारायण पाटील आणि अवधूत संप्रदायाचा प्रेमध्वज फडकवणारे गुरुवर्य सुभानराव तथा अण्णा राणे यांच्या बाबतचेच हे वर्णन आहे. पेझारी या गावात गुरुवर्य सुभानराव तथा अण्णा राणे यांनी साबाजीदादा शेडगे यांच्या आशीर्वादाने १९५८ मध्ये  श्री पंत महाराज बाळेकुंद्री यांच्या अवधूत संप्रदायाचे रोपटे लावले. आज त्यांनी लावलेल्या रोपट्याचा वटवृक्ष झाला आहे आणि त्यांचे पुत्र दिगंबर राणे अवधूत संप्रदायाचा झेंडा खांद्यावर घेऊन अध्यात्मातून समाजकारण करत आहेत.
       गुरुवर्य सुभानराव तथा अण्णा राणे यांचा पुण्यतिथी उत्सव बुधवार, ८ एप्रिल २०१५ रोजी साजरा होत आहे. त्यानिमित्त त्यांचे पुत्र दिगंबर राणे यांच्या कार्याचा एक आढावा घ्यावासा वाटतो. तीन बहिणींनंतर दिगंबर राणे राणे यांचा जन्म १९ फेब्रुवारी १९५९ ला झाला. त्याचे औचित्य साधून त्याच वर्षी गुरुवर्य सुभानराव तथा अण्णा राणे यांनी श्रीपंत भक्त मंडळ, पेझारीची स्थापना केली तर १९७४ ला श्रीदत्त मंदिराची बांधणी केली. त्यांनी १९८२ पर्यंत संप्रदाय चालवला, चांगला वाढवला.
      चैत्र संकष्टी, ११ एप्रिल १९८२ रोजी त्यांनी देह ठेवला. अकरा महिन्यांनी त्यांच्या पत्नी सुनंदाताई राणे यांनीही देह ठेवला. त्यानंतर अवधूत संप्रदायाची धुरा त्यांचे पुत्र दिगंबर राणे यांच्याकडे आली.
गुरुवर्य सुभानराव तथा अण्णा राणे यांचे पुत्र दिगंबर राणे वडिलांसारखेच प्रेमळ, निगर्वी, सर्वांशी मिळून मिसळून वागणारे आहेच. जन्मापासूनच अवधूत कार्याचे बाळकडू मिळालेल्या दिगंबर राणे यांनी आपल्या सहकारी गुरुबंधूंना घेऊन अनेक उपक्रम सुरु केले. स्वच्छता शिबीर, रक्तदान शिबीर. आरोग्य शिबीर, वक्तृत्व स्पर्धा, चित्रकला स्पर्धा, गायन स्पर्धा तसेच विविध क्षेत्रांमध्ये नैपुण्य मिळवणार्‍यांचा सत्कार, हुशार  व होतकरु विद्यार्थ्यांचा सत्कार, दहावीच्या विद्यार्थांसाठी तज्ज्ञांचे मार्गदर्शन शिबीर असे अनेक उपक्रम श्रीपंत भक्त मंडळातर्फे वर्षभर राबविले जातात.
       गुरुवर्य सुभानराव तथा अण्णा राणे यांच्या पुण्यतिथीला श्रींच्या मूर्तीस अभिषेक, भजन इत्यादी कार्यक्रमासह गुणवंत विद्यार्थी व खेळाडू, विविध क्षेत्रातील गुणवंतांचा कौतुक सोहळ्या बरोबरच या दिवशी सामाजिक सेवा करणार्‍या मंडळाला किंवा व्यक्तीला गुरुवर्य सुभानराव राणे पुरस्कार दिला जातो.
गुरुवर्य साबाजीदादा शेडगे पुण्यतिथी उत्सवप्रसंगी मान्यवरांचे परिसंवाद, विद्यार्थांना शालेय वस्तूंचे वाटप इत्यादी कार्यक्रम होतात. श्रावण वद्य अष्टमीला श्रीपंत जन्मसोहळा मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. सुनंदाताई राणे पुण्यतिथीला इतर धार्मिक कार्याबरोबरच महिला मंडळाच्या विविध स्पर्धा घेतल्या जावून श्रीपंत वाङ्मयावरील प्रश्‍नमंजुषा हा कार्यक्रम होतो. श्रीदत्त जयंतीचा कार्यक्रम तीन दिवस साजरा होतो. हे सर्व कार्यक्रम दिगंबर राणे यांच्या मार्गदर्शनाखाली नियोजनबद्धरित्या शिस्तबद्धपणे पार पडतात. या त्यांच्या अवधूत कार्यात त्यांच्या पत्नी सौ. दिप्ती राणे यांची खंबीर साथ आहे. त्याचा हा अध्यात्माचा वारसा त्यांचा पुत्र व विवाहित कन्या यांनीही प्रगल्भतेने चालवला आहे.

शुक्रवार, २० मार्च, २०१५

विलास समेळ घडवताहेत छंदातून पर्यावरणाचा जागर

-उमाजी म. केळुसकर ⬑ वलयांकित ⬉


    अलिबागकरांना विलास समेळ माहीत आहेत ते चोंढीचे एक उद्योजक, कवी म्हणून. वृत्तपत्र विक्री, जनरल स्टोअर्स, मेडिकल स्टोअर्स, गिफ्टशॉप, अशा सर्व क्षेत्रात त्यांनी झोकून काम केले. मात्र चोंढीहून निवृत्तीचे जिणे जगण्यासाठी ते घणसोलीत गेले आणि त्यांना नवी ओळख मिळाली. संपूर्ण महाराष्ट्रात त्यांच्या छंदातून निर्माण झालेल्या कलेने ते ओळखले जावू लागले आहेत.
      १३,१४,१५ मार्च असे तीन दिवस अलिबागेतील सार्वजनिक वाचनालय व जिल्हा ग्रंथालयाच्या पाठिमागील भागात महाराष्ट्र खादी व ग्रामोद्योग मंडळाने भरवलेल्या प्रदर्शन व विक्री महोत्सवात विलास समेळ यांच्या पर्यावरण पुरक पेपर बॅग्जचा स्टॉल सर्वांचे लक्ष वेधून घेत होता. त्या पेपर बॅग्जवरील त्यांच्या हस्ताक्षरातील सुविचार, कविता वाचन संस्कृतीला उत्तेजन देणार्‍या होत्या, याबरोबरच वाढदिवस, विवाह, इतर विविध समारंभात देता येण्याजोगी त्यांनी बनविलेली ग्रिटीेग्ज, प्रेझेंट पॉकिटस्, तसेच पोस्टकार्डवरील लिखाण ह्रदयाला हात घालणारे असल्यामुळे या स्टॉलवर ग्राहकांची गर्दी होणे साहजिकच होते. तथापि विलास समेळ यांचा यामागे पैसा मिळवणे हा उद्देश नाही, आपले छंद जोपासणे हा त्यांचा उद्देश आहे.
     आपल्या वयाच्या साठीनंतर निवृत्तीचे जीवन छंदांमध्ये ‘आनंद द्या, आनंद घ्या’ या पद्धतीने जगत आपण वाचलेले मराठी सुविचार, लेखन  लोकांपर्यत पोहोचवावे या हेतूने  त्यांनी आपले पोस्टकार्डवरील विविध प्रकारचे लिखाण, हस्ताक्षर, हस्ताक्षरातील कविता, कॅलिग्राफी याचे पहिले प्रदर्शन वाशी येथील विष्णूदास भावे नाट्यगृहाच्या सभागृहात भरविले होते. त्यानंतर अलिबागेतील राममंदिरात भरविण्यात आले होते. या प्रदर्शनानंतर ९ ते १६ फेब्रुवारी २०१५ दरम्यान आयोजित करण्यात आलेल्या सिडको हॉल, नवी मुंबईतील कोकणसरस महोत्सवात त्यांच्या कलाकृती असलेल्या सुनीता आमले यांच्या नव निर्मिती बचत गट-चोंढीच्या प्रदर्शन व विक्री स्टॉलला दुसरा क्रमांक मिळाला. यामुळे त्यांचा उत्साह अधिक दुणावला आणि त्यांनी ठाणे येथील ‘ती’ महोत्सवात सहभाग घेतला. शिवाजी मैदान, जांभळी नाका, नौपाडा, ठाणे येथील ६ मार्च ते ९ मार्च २०१५ दरम्यान आयोजित करण्यात आलेल्या ‘ती’ महोत्सवात ८० स्टॉलमधून त्यांच्या नव निर्मिती बचत गट-चोंढीची उत्कृष्ट सजावट, मांडणी आणि पर्यावरण पुरक वस्तूंची विक्री केल्याबद्दल प्रथम क्रमांक म्हणून निवड झाली.
     प्लास्टिकमुळे पर्यावरणाचे प्रचंड  नुकसान होत आहे, हे पाहूनच त्यानी पर्यावरण पुरक पेपर बॅग्जची निर्मिती करणे सुरु केले आणि त्यासाठी त्यांनी केलेल्या ‘पर्यावरणाचा टळेल र्‍हास, सोडता प्लास्टिकचा हव्यास, यावर आता एकच उपाय, पेपर बॅग हाच पर्याय’ या स्लोगनचाही ते मुक्तपणे प्रचार आणि प्रसार करीत आहेत. त्यांचे सुलेखन असलेल्या एक हजारांहून अधिक पेपर बॅग्जची आतापर्यंत विक्री झाली आहे, यातून समाजात पर्यावरण विषयक जागृती वाढत आहे हे लक्षात येते. याबरोबरच विविध प्रकारचे लेखन असलेली पोस्टकार्ड, ग्रिटींग्ज यांचीही विक्री दोन हजारांहून अधिक झाली आहे.
     विलास समेळ यांना वृत्तपत्र वाचनाबरोबर कथा, कादंबर्‍या वाचनाचाही नाद आहे. त्यांचे स्वत:चे घरात वाचनालय असून त्यात सुमारे १२०० पुस्तके असून ती त्यांनी वाचलेली आहेत. १९९० पासूनचे अनेक दिवाळी अंक त्यांच्या संग्रही आहेत. आवडलेल्या विषयांवरील वृत्तपत्र कात्रणे त्यांच्या संग्रही असून स्वत:सह नामवंत कवींच्या सुमारे तीन हजार कविता त्यांनी स्वत:च्या सुंदर अक्षरात लिहून ठेवलेल्या आहेत. त्यांच्या छंदाला त्यांच्या पत्नी सौ. शिल्पा समेळ, तसेच मुले परेश व मृगेश, सुना सुरभी व माधुरी यांचे उत्तेजन असल्यामुळे आज वयाच्या ६३ व्या वर्षातही आपले जीवन मनस्वीपणे जगत आहेत. विलास समेळ यांचा मो. ८८७९००५८५८

शुक्रवार, १३ मार्च, २०१५

रायगडच्या कलाक्षेत्रातील अष्टपैलू मनीष अनसुरकर

-उमाजी म. केळुसकर ⬑ नाट्य-चित्ररंग ⬉


     अलिबाग तालुक्यातील थळ-चाळमळा येथील मनीष शांताराम अनसुरकर हा संपूर्ण रायगड जिल्ह्यातील एकमेव अष्टपैलू व्यक्तीमत्व असलेला तरुण. बाकीच्यांना दोनचार पैलू असू शकतात. पण मनीष अनसुरकर शब्दश: अष्टपैलू आहेत. अभिनय, दिग्दर्शन, निर्मिती, लेखन, पटकथा, संवाद, व्यंगचित्र, चित्रकला, सुलेखन, काव्य, गीत, संगीत या सर्व क्षेत्रांत त्यांनी आपला दबदबा निर्माण केला आहे. लवकरच त्यांचा ‘माझ्या अलिबागचा कुलाबा किल्ला’ या शीर्षकाचा व्हिडिओ अल्बम रसिकांच्या भेटीला येत आहे.
      कलेच्या क्षेत्रातील ‘दादा’ असलेले मनीष अनसुरकर एक मृदू, पण मनस्वी असं व्यक्तिमत्व आहे. ते अभिनेते, दिग्दर्शक, एकांकिकाकार, नाटककार, निर्माते, संवाद-पटकथाकार, लेखक, व्यगंचित्रकार, चित्रकार, सुलेखनकार, कवी, गीतकार, संगीतकार आहेत. त्यांचे गीत-संगीत असलेला ‘माझ्या अलिबागचा कुलाबा किल्ला’ हा व्हिडिओ अल्बम लवकरच प्रकाशित होणार आहेत.त्यांची निर्मिती असलेल्या या अल्बममध्ये दहा गाणी असून ती गोरख गुंजाळ व रेश्मा पाटील या नामवंत गायकांनी गायिली आहेत. अलिबागमध्ये येणार्‍या पर्यटकांना कुलाबा किल्ल्याची माहिती मिळावी, त्याचा इतिहास कळावा, यासाठी या व्हिडिओ अल्बमची निर्मिती करण्यात येत असून त्यातील नादमय, जोशपूर्ण संगीतावर रसिकांना नृत्याची मेजवानी अनुभवता येणार आहे.
     कलेच्या प्रांतात मनीष अनसुरकर यांची २० वर्षांची मुशाफिरी आहे. शाळा, कॉलेजातून त्यांच्या प्रतिभेला जे धुमारे फुटले त्यांनी आज संपूर्ण कलाविश्‍वच व्यापून टाकले आहे. म्हणूनच आज कलाक्षेत्रात मनीष अनसुकर हे नाव परवलीचा शब्द बनला आहे. मनीष अनसुरकर यांनी प्रारंभी एकांकिका, नाटके यातून अभिनयास सुरुवात केली. नंतर ते दिग्दर्शनाकडे वळले. त्यांनी जिहाद, मेहनाज, गोष्ट उद्याची, द मॉर्ग, ज्याचं त्याचं स्वातंत्र्य,  कॉमेडी ऑफ ट्रॅजेडी, यावश्‍चंद्र दिवाकरौ या एकांकिका लिहिल्या, त्याचे दिग्दर्शन आणि सादरीकरणही त्यांनीच केले. एकांकिका लिहून ते थांबले नाहीत, त्यांनी काल आज आणि उद्या, हम बापके है कौन, आईशपथ शॉलेट, च्यामायला एकदम टॉप, पोत्यातून गोत्यात, तो येत आहे, फियास्को ही नाटके लिहिली, त्यांचे दिग्दर्शनही केले. त्यांच्या एकांकिका व  नाट्यसंहिता पुस्तकरुपानेही प्रसिद्ध झाल्या आहेत.
      मनीष अनसुरकर यांनी दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीच्या मालिकांसाठीही पटकथा-संवाद लेखन केले आहे. त्यांनी स्वयंप्रभा या मालिकेसाठी पटकथा-संवाद लिहिले, कुंकू टिकली, तुमचं आमचं जमलं या मालिकांचे संवाद लिहिले, तर रानपाखरे या मालिकेचे लेखन-दिग्दर्शन केले. हिंदी कलर्स वाहिनीच्या देशमे निकला होगा चांद या मालिकेसाठीही संवाद लिहिले. त्यांचे लघुचित्रपटही रसिकांवर, समीक्षक, परीक्षकांवर गारुड करणारे ठरले आहेत. माती माय या लघुचित्रपटाचे लेखन, दिग्दर्शन, संवादलेखन त्यांनी केले. व्यर्थ, तसेच इट्या या लघुचित्रपटांचे लेखन-दिग्दर्शक त्यांनी केले. दादू या लघुचित्रपटाची कथा संकल्पना त्यांचीच आहे. बिंयॉड लव्ह या लुघचित्रपटाची कथा त्यांनी लिहिली आहे. इट्याला तर आंतरराष्ट्रीय लघुचित्रपट महोत्सवात ४३८ लघुचित्रपटांमधून मानांकन मिळाले होते.
      मनीष अनसुरकर यांनी गीत-संगीत दिलेल्या व्हिडिओ अल्बमचीही यादी मोठी आहे. सादावलेल्या रानातून, श्रावणधून, लालबागचा राजा, आईमाऊलीचा उदोउदो, कावला काव काव करतोय, नमन तुला गणराया, लालबागचा राजा या व्हिडिओ अल्बमसाठी त्यांनी गीत-संगीत दिले आहे. सागरिका म्युझिक, निशब्द क्रिएशन व त्यांनी स्वत: या व्हिडिओ अल्बमची निर्मिती केली आहे. युनिव्हर्सल म्युझिकच्या एकदंत तू, सावळ्या विठ्ठला या व्हिडिओ अल्बमसाठी गीतलेखन केले आहे.
      रॅगिंग या मराठी चित्रपटाची सगळी गाणी मनीष अनसुरकर यांनी लिहिली आहेत. स्ट्रगलर चित्रपटाची दोन गाणी, गोष्ट तिच्या प्रेमाची चित्रपटासाठी एक गाणे त्यांनी लिहिले आहे.
      मनीष अनसुकर यांच्यातील व्यंगचित्रकार सतत जागा असतो. त्यांनी सा. कोकणनामा दिवाळी विशेषांकाबरोबरच महाराष्ट्रातील इतरही नामवंत दिवाळी अंकासाठी व्यंगचित्रे, कथाचित्रे, विविध बाजाच्या कथा लिहिल्या आहेत. अमेरिकेतून निघणार्‍या ‘सावली’ या मराठी दिवाळी विशेषांकासाठी त्यांनी काढलेली कथाचित्रे जागतिक पातळीवर गौरवली गेली आहे. तसेच त्यांच्या चित्रांचीही प्रदर्शने सातत्याने भरवली जातात. त्यांनी ओवीबद्ध, चित्रमय शिवचरित्रही लिहिले आहे. लवकरत प्रकाशित होणारा त्यांचा ‘माझ्या अलिबागचा कुलाबा किल्ला’ हा व्हिडिओ अल्बम रसिकांसाठी एक पर्वणी असणार आहे.
    आपल्या या कलाक्षेत्रातील यशस्वी भ्रमंतीबाबत बोलताना मनीष अनसुरकर सागंतात की, ‘माझ्या कलाक्षेत्रातील वाटचालीला वडील शांताराम अनसुरकर व आई सौ. रोहिणी अनसुरकर, तसेच भाऊ राहुल, बहीण सौ. लतिका राहुल परब यांचे प्रोत्साहन आणि माझ्या कलाक्षेत्रातील मित्रांचे सहकार्य असल्यामुळे हा प्रवास सुसह्य झाला आहे. या माझ्या प्रवासात माझ्या अलिबागचा कुलाबा किल्ला हा मी गीत-संगीत दिलेला व्हिडिओ अल्बम लवकरच प्रकाशित होत आहे, याला महाराष्ट्रातील पर्यटक आणि अलिबागचे नागरिक उदंड प्रतिसाद देतील असा मला विश्‍वास वाटतो.’
     मनीष अनसुरकर यांनी कलाक्षेत्रात ज्या ज्या विषयाला हात घातला आहे, त्यात ते यशस्वी झाले आहेत, त्यामुळे ते त्यांच्या या प्रकल्पातही यशस्वी होतील, यात शंका नाही.  शेवटी ते अष्टपैलू आहेत आणि अष्टपैलू राहतील. खरं ना?