शुक्रवार, १७ एप्रिल, २०१५

पोयनाडच्या भैरवनाथ रसवंतीगृहाचे बंडू विठ्ठल इंगुळकर

-उमाजी म. केळुसकर ⬑ वलयांकित ⬉


    पोयनाड ही अलिबाग तालुक्यातीलच नाही, तर जिल्ह्यातील मोठी बाजारपेठ. येथे मिरची खरेदी करण्यासाठी अगदी मुंबईसह जिल्हाभरातून मोठ्याप्रमाणात ग्राहक येतात. इथल्या व्यापार्‍यांची मिरची जशी बोलते, तसा इथे भैरवनाथ रसवंतीगृहाचे बंडू विठ्ठल इंगुळकर यांचा ऊसाचा रस बोलतो. गेली ४२ वर्षे बंडू इंगुळकर ऊसाच्या रसाचा व्यवसाय करीत असले तरी प्रत्यक्षात पोयनाड पंचक्रोशीची ही त्यांनी व्रतस्थपणे केलेली सेवा आहे.  
      बंडू विठ्ठल इंगुळकर मूळचे पुणे जिल्ह्यातील आडवली येथील. वडील शेतकरी त्यामुळे शेती हा त्यांचा जिव्हाळ्याचा विषय. परंतु आपण स्वत:च्या पायावर उभे राहून काहीतरी वेगळे करावे या हेतूने त्यांनी वयाच्या विसाव्या वर्षी १९५८ साली पेणला येऊन मडक्यातील भेंडीच्या पानावरच्या कुल्फी विक्रीचा व्यवसाय सुरु केला. त्यावेळी आजच्यासारखी वाहनांची सोय नव्हती, पण बंडू इंगुळकर कष्टाला भिणारे नव्हते, त्यांनी अगदी पायाला चाकं लावून पेण, नागोठणे, पाली, पोयनाड इत्यादी गावे फिरुन आपला कुल्फी विक्रीचा व्यवसाय केला. परंतु त्याकाळी स्वस्ताई असल्यामुळे कुल्फी विक्रीतून अपेक्षित उत्पन्न मिळत नसल्याने त्यांच्या मनात ऊसाच्या रसाचा व्यवसाय करावा असा विचार आला आणि त्यासाठी ठिकाण निवडले पोयनाड. १३ वर्षांचा कुल्फी विक्रीचा व्यवसाय जड मनाने बंद करुन ते १९७३ साली पोयनाडला आले. रायगड जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष प्रभाकर पाटील यांच्या पोयनाड येथील जागेत (तेथे नंतर पोयनाड ग्रामपंचायतीचे कार्यालयही होते.) प्रथम ऊसाच्या रसाचा भैरवनाथ रसवंतीगृह या नावाने व्यवसाय सुरु केला. हाताने फिरवायच्या  चरका, त्याला लावलेली घुंगरं आणि त्याचा येणारा छुन्नुकछुन्नक आवाज, त्याचबरोबर बंडू इंगुळकर यांची ‘ताई, माई, अक्का, दादा, भाऊ, काका ऊसाचा रस तरी पिऊन बघा’ ही त्यांनी ग्राहकांसाठी मारलेली हाळी ऊसाच्या रसाइतकीच तेव्हा गोड वाटायची. चरक्याचा दांडा फिरवताना त्यांनी म्हटलेली पुणेरी थाटाची गाणीही विसरता येणार नाही.
    काळानुरुप विजेवर चालणारा चरका आला, पण ऊसाच्या रसाचा आणि बंडू इंगुळकर यांच्या स्वभावातील मिठ्ठासपणा कायम राहिला. पोयनाड हे बाजारपेठेचे आणि सोमवारच्या आठवडा बाजाराचे गाव असल्यामुळे थकला-भागल्या ग्राहकांचे बंडू इंगुळकरांचे ऊसाच्या रसाचे दुकान तनमन शांत करण्याचे एक ठिकाणच होते. आजही पोयनाड नाक्यावरील त्यांच्या रसवंतीगृहात तेच काम चालू आहे.
     स्व. प्रभाकर पाटील, विजयकुमार मधुकर पाटील, आ. पंडितशेठ पाटील, कै. मदन रघुनाथ केळुसकर यांच्या आशीर्वादाने पोयनाड येथे आपण ऊसाच्या रसाचा व्यवसाय उत्तमरित्या करु शकलो, अशी कृतज्ञता बंडू इंगुळकर व्यक्त करतात.
      आज त्यांच्या या व्यवसायाला त्यांचे पुत्र अनंता बंडू इंगुळकर यांचे हात लाभले आहेत. अनंता आणि सौ. अनिता अनंता इंगुळकर यांना तीन मुली एक मुलगा आहे. बंडू इंगुळकर यांना त्यांच्या व्यवसायात अनुकुल आणि प्रतिकुल परिस्थितीतही त्यांच्या पत्नी सौ. ताराबाई बंडू इंगुळकर यांची चांगली साथ लाभली. आज बंडू इंगुळकर ७८ वर्षांचे असले तरीही ग्राहकांना मारलेली त्यांची हाळी अजूनही खणखणीतच आहे आणि त्याला ऊसासारखाच गोडवा आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा