मंगळवार, ३० ऑगस्ट, २०११

वड्याच्या नामांतराचा पेच

-उमाजी म. केळुसकर ⬑ ठसा आणि ठोसा ⬉



   ‘वडा’ हा पदार्थ काय भांडणाचा आणि भांडण लावायचा आहे? परंतु गेले काही महिने मुंबईत या वड्यावरून राजकारण रंगले आहे. या आठवड्यात तर वड्याच्या राजकारणाने उसळी घेतली, त्यामुळे या वड्याचा सांबार होते की काय वाटण्याजोगी परिस्थिती झाली. बरं हा वडा साधासुधा नाही आणि या वड्याचे पुरस्कर्तेही साधेसुधे नाहीत. एका वड्याचे नाव आहे शिववडा आणि दुसऱ्याचे नाव आहे छत्रपती वडा. मराठेशाहीत जितकी सुंदोपसुंदी झाली नसेल, तितकी या वड्यांवरून सुंदोपसुंदी चालली आहे. 
     दोघा पुरस्कर्त्यांकडे मराठी बाणा आहे. एकीकडे स्वाभिमान आहे तर दुसर्याकडे वाघाची डरकाळी आहे, परंतु दोघे मात्र झुंजीच्या कोंबड्यांप्रमाणे झुंजत आहेत. एवढा वडा मातब्बर कसा झाला? वडा हा पेशवेशाहीची देणगी आहे असं म्हणतात, मग आता पेशवेशाही अवतरली आहे की काय? काहीही असो आता सर्व प्रश्नांपेक्षा वडा महत्त्वाचा ठरला आहे. तो सर्वसामान्यांच्या पोटाची भूक भागवतो. त्यामुळे वडा हा पोटाचा प्रश्न बोलता येईल, परंतु तो अस्मितेचा विषय बनला आहे. अस्मितेचे अनेक प्रकार आहेत. मराठी अस्मिता आहे, भाषिक अस्मिता आहे, हिंदू अस्मिता आहे, मुस्लिम अस्मिता आहे, इतरही अस्मिता आहेत. या अस्मिता वेळोवेळी डोके वर काढत असतात आणि त्यासाठी वाद निर्माण होत असतात, परंतु दोन मराठी माणसे एकाच अस्मितेशी भांडतात, याला विशेष म्हटले पाहिजे. 
      वड्याचे तेल वांग्यावर काढले जाते असे म्हटले जाते, परंतु येथे मात्र उलट आहे. येथे राजकारणाचे तेल वड्यावर ओतले जात आहे. शिवछत्रपतींनाही या राजकारणाची कीव यावी असा हा प्रकार आहे. त्यांच्या नावाचा चांगल्या आदर्शासाठी (आदर्श म्हटला की छातीत धस्स होते!), शौर्यासाठी वापर व्हावा, परंतु येथे त्यांचे नाव वड्यासाठी वेठीस धरले गेले आहे. वडा तोच, पण त्यांची नावे काय शिववडा आणि छत्रपती वडा. अखंड हिंदुस्थानमध्ये भारत-पाकिस्तान अशी फाळणी व्हावी असा हा प्रकार आहे. वड्याचे साहित्य तेच, बेसन, बटाट्याची भाजी. त्यापासून निर्माण झालेला वडा मात्र शिववडा आणि छत्रपती वडा. माणूस प्रांताची फाळणी करतो आता वड्याचीही फाळणी करायला लागला आहे यासारखे दुर्दैव नाही. बरं ही फाळणी करून हा वडा पोटातच जायचा आहे. पोटात तर सर्वधर्म समभाव असतो. तिथे सर्व पदार्थांचे ऐक्य असते. मग असा हा वडा मुंबईचे ऐक्य कसा भंगवू शकतो? यात वड्याचा काही दोष नाही आणि शिवछत्रपतींचाही दोष नाही. हा दोष आहे दोन पक्षातील अहमहमिकेचा. एकाने शिववडा काढला म्हणून दुसऱ्याने छत्रपती वडा काढण्याची गरज नव्हती आणि दुसऱ्याने छत्रपती वडा काढला म्हणून पहिल्याच्या पोटात दुखायचे काही कारण नव्हते. दुर्दैवाने दोघांच्याही पोटात वड्याने दुखणे निर्माण केले आणि वातावरण काहीसे गढूळले. होय, ‘जिथे जिथे ‘शिववडा’ तिथे तिथे ‘छत्रपती वडा’ अशी घोषणा करून स्वाभिमान संघटनेचे अध्यक्ष नितेश राणे यांनी शिवसेनेच्या ‘शिववडा’ योजनेला प्रत्युत्तर दिले आहे. 
     तथापि, शिववडा अधिकृत असून छत्रपती वडा अनधिकृत असल्याचे मुंबई महापालिकेने म्हटले आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे आणि नितेश राणे यांच्यामधील वडा पुराण अधिकच रंगणार यात शंका नाही. वडा बिचारा म्हणत असेल, मी निनावी होतो, तेव्हा काही प्रॉब्लेम नव्हता. आता प्रॉब्लेमच प्रॉब्लेम निर्माण झालेत. माझे मन कोणीच विचारात घेत नाही. माझी विविध नामांतरे झाली तर माझी चव बदलणार आहे की आकार बदलणार आहे? मी तसाच ढोल्या राहणार आहे. आज मुंबईत माझी अशी अवस्था करून ठेवलेय, उर्वरित महाराष्ट्रातही माझी अशीच वेगवेगळी नामांतरे झाली, तर मी ‘घर का, ना घाटका’ राहणार. वड्याच्या या मनोगताने खवय्यांचे हृदय काही पिळवटणार नाही, पण त्यांच्या दृष्टीने वड्याला काहीही नाव दिले तरी वडा हा खाण्याचाच एक पदार्थ असणार आहे. नेत्यांमधील राजकारण कशावरून रंगत नाहीत? खुर्चीवरून नेहमीच राजकारण रंगत आले, वड्यावरून ते आता रंगले आहे. वड्यावरून सत्तेचा सोपान पार करता येईल की नाही, हे माहीत नाही. परंतु या मुद्यावरून दोन्ही पक्षीयांना स्वत:च्या प्रतिमा चमकवता येतील. यात फायदा वड्याचा नाही आणि वड्याच्या चाहत्यांचाही असणार नाही. वड्याला अखेर त्याच्या चाहत्यांच्या पोटात जायचे आहे आणि वडा हल्ली इतका स्वस्त राहिला नाही, त्यामुळे त्याच्या चाहत्यांचे खिसे रिकामे व्हायचे आहेत. फक्त वड्याला नावे देऊन राजकारण करताहेत ते नेहमी वडा खातात काय हाच शेवटी प्रश्न आहे.

शनिवार, २७ ऑगस्ट, २०११

‘जिलेबी’ची व्यथा,‘जलेबी’ची कथा

-उमाजी म. केळुसकर ⬑ ठसा आणि ठोसा ⬉



    माणूस खाण्यासाठी नाही. खाणे माणसासाठी आहे. पाणी आणि अन्न या दोन बाबी माणसाला जीवित राहण्यासाठी आवश्यक आहेत; पण माणूस खाण्यात वैविध्य शोधू लागला आणि विविध खाद्यपदार्थांचा जन्म झाला. आता अशी परिस्थिती निर्माण झाली आहे की, एका वर्गासाठी खाणं उपलब्ध नाही, त्यामुळे त्याचं कुपोषण होत आहे, तर दुसर्‍या वर्गासाठी खाणं उपलब्ध आहे, त्यामुळे त्याचं अतिरिक्त पोषण होत आहे. खाण्यासाठी जगणार्‍या माणसांची गोष्टच वेगळी आहे. ही माणसे तुम्हाला अनेक ठिकाणी दिसतील. त्यांचे आकारही आपल्याला ठसठशीतपणे पाहायला मिळतील. पण आजचा विषय त्यांच्या आकाराचा नाही. कुपोषणाचा नाही की, अतिरिक्त पोषणाचा नाही. आजचा विषय जिलेबीचा आहे. तिच्या अवमानाचा आहे. गोड आणि रसाळ अशी कमनीय, देखणी जिलेबी, जिभेचे चोचले पुरविते. अशी ही गरीबांना प्रिय असलेली आणि श्रीमंताच्या जिभेची सहचर असलेली जिलेबी, प्रत्येक बाजारपेठेत, अगदी गल्लीबोळातील दुकानात दिसून येते. हलवायांच्या दुकानातून ‘प्रमोट’ होऊन आता जिलेबी चित्रपट जगतातही दाखल झाली आहे. येथूनच सर्व बखेडा सुरु झाला आहे. प्रसिद्ध मिळाली की बदनामी, हा वादाचा मुद्दा आहे, परंतु जिलेबीची इज्जत जरुर लुटली जात आहे.
       ‘जलेबीबाई’च्या रुपात आजकाल चित्रपट जगतात ‘जिलेबी’च्या एका नवीन आवृत्तीने जन्म घेतला आहे. तिने ‘टपोरी’ समाजात जिलेबीची गोडी अधिकच वाढवली आहे. मला वाटते, बॉलिवूडही ‘जिलेबी’चा आणि तिच्या दिव्य स्वादाचा चाहता आहे. त्यामुळेच तर जिलेबीला सोनेरी पडद्यावर आणून उभे केले आहे. श्रीमतांच्या जगाची गोष्ट सोडली तर बिचारा गरीब, सर्वसामान्य माणूस, मिठाईच्या नावावर केवळ जिलेबीचं स्वप्न पाहू शकतो. काजूकतली, बदामपिस्ता यासारखी मिठाई सर्वसामान्यांसाठी बनलीच नाही. या मिठाईची मजा घेण्यासाठी खिशात मोठी रक्कम असली पाहिजे. पण जिलेबीची गोष्टच वेगळी आहे.
     असे असले तरी सुमधुर, कर्णप्रिय आणि गरमागरम देहयष्टीने परिपूर्ण अल्पवस्त्रधारिणी ‘जलेबीबाई’ने आपल्या ठुमक्यांनी खरोखरच प्रेक्षकांना आकर्षित केलं आहे. त्यामुळे मूळ जिलेबीच्या अस्तित्वाचीच चिंता निर्माण झाली आहे. पण, दुदैवाने या प्रश्‍नाची चिंता कोणत्याही भारतीय हलवायाला वाटत नाही. पण जिलेबीची इभ्रत तर वाचवायला हवीच. कोणाला काही वाटो; पण जिलेबी वळणदार असली तरी मी ती साधी आणि सरळ मानतो. तिच्यात काही जोडतोड नाही आणि कृत्रिम गुंतागुंतही नाही, ती ‘जलेबी’बाईमध्ये आहे. जलेबीबाई आपण जिलेबीची प्रतिष्ठा वाढवत असल्याचा आव आणत असल्या तरी त्यात काही अर्थ नाही. जलेबीबाई खवय्यांना आपल्याकडे आकर्षित करुन घेत आहे. त्यामुळे खर्‍याखुर्‍या जिलेबीची वंचना सुरु झाली आहे. तिचा अवमानही होत आहे. परंतु कोणत्याही हलवाई अथवा जिलेबी भक्षणकर्त्यांकडून कोणतीही हरकत घेतली गेली नाही, विरोध प्रदर्शन केले गेले नाही, ही अतिशय दु:खाची बाब आहे. खरेतर ‘हलवाई असोसिएशन’ने एकजूट होऊन उपोषण केले पाहिजे होते.
     तसेही आजकाल उपोषणाचा मोसम सुरु आहे. त्यामुळे जाहीर घोषणा केली पाहिजे होती की, आम्ही जिलेबीशिवाय दुसरं काहीही खाणार नाही. जोपर्यंत निष्पाप जिलेबीच्या नावाचा दुरुपयोग होईल, तोपर्यंत जिलेबीचे चाहते उपोषण, धरणे आंदोलनावर ठाम राहतील. त्यामुळे पोलिस आणि प्रशासनाची झोप उडाली असती. आणि दिल्लीच्या रामलीला मैदानातील बाबाच्या योगशिबिराप्रमाणे ‘जिलेबी मुक्ती आघाडी मोहिमे’वर लाठीचार्ज झाला असता, अश्रूधर सोडला गेला असता, तर संपूर्ण जगाची नजर जिलेबीवर केंद्रित झाली असती. मीडिया सक्रिय झाला असता, जनतेत हाहाकार माजला असता, न्यायपालिकेने ऍक्शन घेतली असती, तेव्हा एखाद्या ‘योग्य’ ऍडव्होकेट महाशयांनी कोर्टात पिटीशन दाखल केेली असती आणि ‘जिलेबी’च्या नावाचा दुरुपयोग आणि जिलेबीच्या लाजलज्जा आणि शीलभंगाचा खटला चालवला असता. बॉलिवूडवर दबाव निर्माण झाला असता आणि त्याला नाईलाजाने कॉपीराइट, सेन्सॉर बोर्डाच्या प्रतिबंधांकडे पाहून समझोता करावा लागला असता. बिचार्‍या जिलेबीला काही नुकसानभरपाई मिळाली असती आणि उपोषणकर्त्यांना प्रसिद्धीही.
       मीडियानेदेखील अशा सरस-रसाळ वृत्ताला ‘लाईव्ह कव्हरेज’ देऊन टीआरपी गगनाला भिडवला असता. पुन्हा एखाद्या चित्रपटनिर्माता-दिग्दर्शकाला यापासून प्रेरणा मिळाली असती. मग त्याने यावर पुन्हा नवा चित्रपट काढला असता आणि बदनामी वादावादीचं सत्रं चालू राहिलं असतं. अशाप्रकारे जिलेबी आणि जलेबीबाईलाही प्रसिद्धी मिळाली असती आणि दोघांचीही दुकानदारी वाढीस लागली असती. पण तसं झालं नाही, हे जिलेबीचे की जलेबीबाईचे दुदैव, हे ज्याचं त्यांने शोधावे.

सोमवार, २२ ऑगस्ट, २०११

उपभोगाचे स्वामी

-उमाजी म. केळुसकर ⬑ ठसा आणि ठोसा ⬉



     सध्या पुट्टपर्थीच्या सत्यसाईबाबांच्या गडगंज संपत्तीची त्यांच्या मृत्यूनंतर मोठी चर्चा सुरु आहे. ही चर्चा फक्त विचारवंतांमध्येच सुरु आहे. सर्वसामान्यांना या चर्चेत रस नाही, त्यांना फक्त श्रद्धा महत्त्वाची वाटते. तसेही त्यांच्या श्रद्धेला नाव ठेवणे योग्य होणार नाही, परंतु धनवान संत कसा असू शकतो याचा विचार तर केला पाहिजे. आपली श्रद्धा असलेली व्यक्ती संताच्या व्याख्येत आणि परंपरेत बसते का हा विचार व्हायला नको? येथेच श्रद्धेची मती कुंठीत होते, आणि अंधश्रद्धेचा मार्ग सुरु होतो.
     साधू-संत, अध्यात्मिक गुरुंची पुरातन काळापासूनची ओळख म्हणजे त्यांची विरक्तवृत्ती आणि एका ध्यासापोटी पत्करलेली खडतर तपश्चर्या. हा ध्यास सकळ मनुष्यजातीचे कल्याण करण्याचा असायचा. ‘जे का रंजले गांजले, त्यांना म्हणावे आपुले’ अशा स्वरुपाचा असायचा. हा ध्यास संत तुकारामांनी घेतला, हा ध्यास संत ज्ञानेश्वरांनी घेतला, हा ध्यास जुन्या सर्वच संतांनी घेतला. आधुनिक काळात संत गाडगे महाराजांनी तर या ध्यासाला कळसच चढवला, पण आजच्या आधुनिक ‘बाबा’ मंडळींनी या ध्यासालाच चूड लावली आणि ते आसन व वासना (मग ती पैसा, प्रसिद्धी कशाचीही असो.) यांत गुरफटले आहेत.
      सर्वसामान्य जनता आर्थिकदृष्ट्या आणि मानसिकदृष्ट्या लुळीपांगळी बनली आहे आणि ‘कफनी’तले साधू-संत दिवसेंदिवस धनवंत बनत चालले आहेत. अध्यात्मिक गुरुही संपत्तीच्या मोह-लोभापासून सुटलेले नाहीत, हे वास्तव तथाकथित आध्यात्मातील रोग दर्शवणारे आहे. नुकतीच काही बाबा-महाराजांच्या संपत्तीची आकडेवारी प्रसृत झाली आहे, ती थक्क करायला लावणारी आहे. बाबा रामदेव यांची वार्षिक उलाढाल १५००-२००० कोटी रुपये आहे. रविशंकर महाराज यांची वार्षिक उलाढाल ९००-१०० कोटी आहे. आसाराम बापू यांचा वर्षाचा टर्नओव्हर ४०० कोटी रुपये आहे. ‘अम्मा’ अमृतानंदमयी यांची वार्षिक उलाढाल ७००-९०० कोटी आहे. सुधांशू महाराज यांची वार्षिक उलाढाल ३५० कोटी रुपये. या सर्वांचे अनुयायी कोट्यवधी आहेत. कोट्यवधींचे प्रेम मिळवणे ही मोठी गोष्ट ठरते, परंतु कोट्यवधी पैसा मिळवणे ही या बाबा-महाराजांना छोटी करणारी गोष्ट आहे. या मंडळींना कशासाठी पैसा पाहिजे? त्यांना गाडगे महाराजांचे उदाहरण दिले गेले पाहिजे. देव माणूस आणि संत माणूस होऊन जगण्यापेक्षा माणूस म्हणूनच आयुष्यभर सेवा करण्यात गाडगे महाराज यांनी धन्यता मानली. १ फेब्रुवारी १९०५ रोजी बाबांनी सर्वसंग परित्याग केला. तेव्हापासून कमरेला गुंडाळलेले एक वस्त्र, वर ठिगळ लावलेला शर्ट आणि बरोबर पाण्यासाठी एक गाडगं याचं रुपात बाबा सर्वत्र वावरत असतं. तेव्हापासून त्यांना लोक ‘गाडगे बाबा’ म्हणू लागले. सर्वसंग परित्यागानंतर पुढे जवळजवळ बारा वर्षे बाबांनी भारतभ्रमण केले. या भटकंतीतून त्यांच्यात एका समाजक्रांतीकारकाचा जन्म झाला आणि खेड्यापाड्यातून समाजाची सेवा करीत लोकजागृती करणे हेच पुढील आयुष्याचे ध्येय त्यांनी मानले. मला कुणी गुरु नाही आणी मी कोणाचाही गुरु नाही हीच भावना ठेवून त्यांनी समाजाला प्रबोधन केले. समाजातील अज्ञान, अंधश्रद्धा, अस्वच्छता या समाजाच्या विरुद्ध गतीतून बहुजन समाजाबाहेर पडावा म्हणून त्यांची सतत धडपड असे. त्यासाठी बाबा समज असणार्यांना शब्दाने फटकारीत तर कधी कधी हातातल्या काठीचा फटका मारुनही शहाणं करीत आणि हे वागणं फक्त शब्दांपुरते मर्यादित नव्हतं, तर हातात खराटा घेऊन बाबा स्वत: गावाची स्वच्छता करुन लोकांना धडा घालून देत असत.
       लोकांकडून मिळालेला पैसा ते समाजालाच अर्पण करीत. आपल्या मृत्यूनंतर पुतळे किंवा स्मारके बनविण्यास त्यांनी मनाई केली, परंतु त्यांनी निर्माण केलेल्या धर्मशाळा, त्यांनी शाळांना केलेली मदत, त्यांनी केलेली समाजजागृती यामुळे गाडगेबाबा चिरस्मरणीय बनले आहेत. त्यांनी कधी प्रवासासाठी एसी गाडी वापरली नाही, पाय हेच त्यांनी आपले वाहन समजले.
      आजच्या बाबा-बुवा-महाराजांकडे वाहनांचे ऐश्वर्य असते, भाविक सेवेकरी असतात. ही ऐश्वर्यवान मंडळी उपभोगशून्य म्हणता येणार नाही, त्यामुळे हा आधुनिक काळ आता उपभोगवादी बुवा-महाराजांचा आहे हे लक्षात येते, त्यामुळे श्रद्धा आणि अंधश्रद्धा यातला फरक करायला सर्वसामान्य शिकले तरच त्यात त्याचे हीत आहे, असे म्हटले तर वावगे नाही.

शनिवार, १३ ऑगस्ट, २०११

जागृती मोर्चाने व्हावे प्रबोधन

-उमाजी म. केळुसकर ⬑ ठसा आणि ठोसा ⬉



      मुंबईने खूप सोसले आहे आणि अनुभवले आहे. स्वातंत्र्यपूर्व मुंबई आणि स्वातंत्र्योत्तर मुंबईत खूप बदल झाला. मुंबईची अगदी मिसळ की भेसळ झाली, असेही तिच्याबाबत बोलले गेले. पण या मुंबईतून स्वातंत्र्य चळवळीचा हुंकार उठला, संयुक्त महाराष्ट्रासाठी वज्रमूठ उगारली गेली. या मुंबईने अनेक चळवळी, मोर्चे पाहिले; पण आता नव्या स्वातंत्र्यासाठी याच मुंबईत सप्टेंबरमध्ये स्लॅट वॉक म्हणजेच, बेशर्मी मोर्चा निघणार आहे. 
     पाश्चात्य देशांतील अनेक शहरांतून फिरलेला हा बेशर्मी मोर्चा आपल्या देशाच्या राजधानीत, दिल्लीतही नुकताच निघाला होता. दिल्लीपूर्वी हा मोर्चा मध्यप्रदेशची राजधानी भोपाळमध्येही निघाला होता, परंतु त्याला इतकं महत्त्व मिळाले नव्हते. कारण जेव्हा हा मोर्चा भोपाळमध्ये निघाला होता, तेव्हा हा आपल्या मीडियासाठी अनाकलनीय शब्द होता. दिल्लीपर्यंत पोहोचता-पोहोचता स्लॅट वॉक आणि बेशर्मी मोर्चा यासारखे शब्द नीट समजू लागले होते, म्हणूनच त्याने दिल्लीच्या बेशर्मी मोर्चाला जास्त महत्त्व दिले. आता सप्टेंबर महिन्यात होणार्या बेशर्मी मोर्चाचे नेतृत्व ती मॉडेल करणार आहे, जिने विश्वचषक क्रिकेट दरम्यान असे म्हणून धक्का दिला होता की, जर भारतीय क्रिकेट संघाने विश्वचषक जिंकला, तर ती स्टेडियममध्येच आपल्या अंगावरील सर्व कपडे उतरवून नग्न होईल.
     बेशर्मी मोर्चाच्या रुपाने त्या मॉडेलच्या हाती लोकांचे लक्ष वेधून घेण्यासाठी, प्रसिद्धी मिळवण्यासाठी आणखी एक शस्त्र लागलं आहे. काहीही असो, यात शंका नाही की, जगभरच्या महिलांची अवस्था सारखीच आहे. महिला अन्याय, अत्याचाराने पिचलेल्या आहेत. जरी आपण पाश्चात्य देशांचा अपवाद केला, तरी जगाच्या इतर भागांत महिलांची अवस्था ठीक नाही. मुस्लिम देशांत एखादा अपवाद सोडल्यास, सर्व ठिकाणी महिलांबरोबर पशुतुल्य व्यवहार केला जातो. भारताबाबत बोलायचे तर आपला देश जगातील असा चौथा देश आहे की, जेथे महिलांबरोबर सर्वाधिक दुर्व्यवहार केला जातो. महिलांना देवी समजणार्या भारतीय संस्कृतीत त्यांना विविध अन्याय, अत्याचारांना तोंड द्यावे लागत आहे, यासारखा दुसरा विरोधाभास नसावा.
     अजून असं कोणतंही सर्वेक्षण झालेलं नाही, परंतु असे निश्चितपणे म्हणता येऊ शकेल की, भारतात जितके चुटकुले प्रचलित आहेत, त्यातील पन्नास टक्क्यांपेक्षाही अधिक महिलांवरच बेतलेले असतात. हीच मानसिकता विकृत बनत इथपर्यंत आली आहे की, देशाची राजधानी दिल्लीदेखील महिलांसाठी सुरक्षित नाही. एका अंदाजानुसार दिल्लीमध्ये रोज सात महिलांवर बलात्कार होतो आणि छेडछाडीच्या घटना इतक्या आम आहेत की, एक महिला जर चार तासांसाठी घर अथवा कार्यालयाबाहेर राहिली, तर तिली येता-जाताना कमीत कमी दोनशेवेळा पुरुषांच्या विकृत शेर्यांना तोंड द्यावे लागते. ही दिल्लीतीलच परिस्थिती नाही, तर संपूर्ण देशाची आहे. मुंबईही याला अपवाद नाही.
     कार्यालयांत महिलांचे शोषण होते, तर घरांतही तेच होते. कन्या भ्रूणहत्या तर याची चरमसीमा आहे, यात सुशिक्षित आणि सधन कुटुंबंही सामील आहेत. एकीकडे समाजात जितके अपशब्द प्रचलित आहेत, ज्यांचा वापर पुरुष आपसातील भांडतात करतात, ते सर्व महिलांना अवमानित करणारेच असतात, तर दुसरीकडे महिलांविरुद्ध वापरले जाणारे अपशब्द आणि त्यांना केले जाणारे अश्लील इशारे मनोरंजनाचा पर्याय बनले आहेत. चित्रपटांत अधिकांश हेच असतं. तसेच पुरुष महिलांना सल्ला देतात की, त्यांनी कोणता पोशाख करावा आणि करु नये. महिलांची कोण छेड काढतं? पुरुष. त्यामुळे पुरुषांनी आपली मानसिकता बदलली पाहिजे, महिलांचा आदर करणे शिकले पाहिजे, परंतु ते करतात उलटं. ते महिलांना सांगतात की, त्यांनी काय घालावे आणि घालू नये. या सर्व बाबींतून महिलांची स्थिती किती दयनीय आहे, याची जाणीव होते, परंतु ही स्थिती बदलण्याचा उपाय बेशर्मी मोर्चासारखे कार्यक्रम असू शकत नाही. बेशर्मी मोर्चाने महिलांच्या प्रश्नाविषयीचे गांभीर्यच नष्ट होते आणि त्यात केवळ दिखाऊपणाच येतो. महिलांना बेशर्मी मोर्चा नाही, जागृती मोर्चाची आवश्यकता आहे. यासाठी महिलांनी एकजूट व्हावे आणि त्या सर्व विसंगतींविरुद्ध आवाज उठवावा, ज्यांना पुरुषांनी महिलांना दुय्यम बनवण्यासाठी निर्माण केलं आहे. कन्या भ्रूणहत्या, ऑनर किलिंग, हुंड्यासाठी छळ यासारख्या कृत्यांविरुद्ध एकजूट होऊन आवाज उठवला पाहिजे, तरच निश्चितपणे ही परिस्थिती बदलेल. स्लॅटवॉक म्हणजे, बेशर्मी मोर्चा शहरी महिलांचे फॅड आहे, याने काही साध्य होणार नाही.

बुधवार, १० ऑगस्ट, २०११

सचिनची गाडी आणि...

-उमाजी म. केळुसकर ⬑ ठसा आणि ठोसा ⬉
   
    आपल्या देदीप्यमान कामगिरीने भारतभरात सकारात्मक प्रवृत्तीचं प्रतीक बनलेल्या क्रिकेटपटू म्हणजे सचिन तेंडुलकर. अशा या सचिन तेंडुलकर याला भारतीय क्रिकेटसंघाचा कर्णधार धोनी याने एप्रिलमध्ये वर्ल्ड कपची भेट दिली. वर्ल्ड कपमध्ये सचिनची कामगिरी अपेक्षेप्रमाणे झाली नसली, तरी त्यातील त्याची उपस्थिती प्राणवायूप्रमाणे होती, त्यामुळे वर्ल्डकपचा आनंद द्विगुणीत झाला असे म्हटले तर त्यात काहीही वावगे नाही. या सर्वांमुळे प्रत्येक भारतीयांच्या मनात सचिनची प्रतिमा हनुमानरायाच्या हृदयातील श्रीरामाप्रमाणे दृढ झाली आहे. म्हणूनच सचिनला भारतरत्न मिळावे अशी प्रत्येक भारतीयाची अपेक्षा आहे. या अपेक्षेबद्दल कोणताही आक्षेप घेता येणार नाही, कारण हिमालयाकडे मान उंच करून पाहताना टोपी गळून पडावी, त्याप्रमाणे सचिनच्या कर्तृत्वाच उंची आहे. 
    या सचिनकडे फेरारी नावाची गाडी होती. फार मानाची गाडी होती. ती वादग्रस्त झाली होती, कारण त्या गाडीची कस्टम ड्युटी माफ करावी, म्हणून सचिनने सरकारकडे केलेल्या विनंतीवर प्रचंड टीकेची झोड उठली होती. धावांचा पाऊस पडणारा सचिन या खेळातून पैशांचा पाऊसही पाडतो, अशा सचिनने कस्टम ड्युटी माफ करण्यासाठी सरकारकडे हात पसरावे, याचे सर्वसामान्य सचिनप्रेमींना निश्चितच दु:ख वाटले. तर सांगण्यासारखे म्हणजे सचिनने ही फेरारी गाडी विकली आहे. फेरारी विकली म्हणजे तिच्या जागी सामान्य गाडी तो वापरणार नाही, हे ओघाने आलेच. सचिनने आता फेरारीपेक्षाही भारी गाडी खरेदी केली आहे. आता तो निस्सान जीटी-आर या लाल रंगाच्या चकाचक सुपर कारमधून सफर करणार आहे. ही कार नुकतीच त्याच्या ताफ्यात दाखल झाली आहे. ताफ्यात अशासाठी की, त्याच्याकडे एकसोएक कारस् आहेत. सर्वसामान्यांकडे एक सायकल असणेही अभिमानाचे असते, त्यामुळे सचिनसारख्या असामान्यांकडे गाड्यांचा ताफा असणे आणि त्याला त्याचा अभिमान वाटत असणे, यात नवल नाही. 
     सचिनच्या निस्सान जीटी-आर गाडीची किंमत ८७ हजार डॉलर्स, म्हणजे सुमारे चार कोटी रूपये आहे. तो त्याच्या घामाचा पैसा आहे. मग तो क्रिकेटमधील असो, त्याच्या हॉटेलमधील असो अथवा त्यांनी केलेल्या जाहिरातीमधील असो, त्याने घाम गाळला आहे, हे नक्की. त्याचे वडील रमेश तेंडुलकर यांनीही अध्यापनात घाम गाळला. विद्यार्थ्यांना घडविणे ही बाब साधी नाही. तेथे गाळला जाणारा घाम दिसत नाही आणि कोणाला त्याकडे गांभीर्याने पहावेसेही वाटत नाही. त्याचे वडील प्राध्यापक असले तरी उत्तुंग प्रतिभेचे कवी होते. त्यांनी कवितेचे चौकार, षट्कार ठोकले, परंतु त्यांचा चाहता वर्ग सीमित राहिला, अर्थात मराठी कवींची, साहित्यिकांची अशीच परिस्थिती असते. प्रसिद्धी आणि पैसा त्यांच्या नशिबी नसतो. प्रसिद्धी मिळाली तरी पैसा नाही, अशी दरिद्री अवस्था बर्याच कवी आणि साहित्यिकांची असते. प्रा. रमेश तेंडुलकर यांची ओळख कवी म्हणून फारच थोड्यांना आहे, ते सचिनचे वडील आहेत हीच त्यांची ओळख आता प्रस्थापित झाली आहे. एका अर्थाने सचिनने आपल्या वडिलांचे नाव उज्ज्वल केले आहे .सचिनने त्यांची कविता घेतली नाही, त्यांचे शब्द घेतले नाहीत, परंतु त्यांची मृदूता घेतली, आक्रमकताही घेतली. कवीमध्ये आक्रमकता असते ती प्रत्यक्ष दिसत नसते, परंतु त्याच्या कवितेत मृदूता आणि आक्रमकता यांचा मिलाफ आढळतो. त्यामुळे वडिलांचे हे दोन्ही गुण सचिनने उचलले. त्याची बोलण्यावागण् यातील मृदूता आणि खेळातील आक्रमकता पाहून हे तेंडुलकरी रसायन वेगळेच आहे, याची जाणीव होते. सचिन हा मध्यमवर्गीय पित्याचा पूत्र. त्याच्या वडिलांन सायकलवरून प्रवास केला असेल, पण सचिन आज कोट्यवधींच्या कारस्मधून प्रवास करतो आहे, हे दोन पिढ्यांतील आर्थिक आणि सामाजिक अंतर आहे. गरीब आणि श्रीमंतांमध्ये जरी दरी असते तशी ही दोन पिढ्यातील दरी असली तरी ही दरी संपन्नतेची आहे, ही संपन्नतेची दरी प्रत्येक सामान्य माणसाच्या जीवनात यावी, अशीच अपेक्षा सर्वसामान्यांचे हित पाहणारा प्रत्येकजण करेल.
     सर्वसामान्यांची आज अवस्था अशी आहे की, त्याला दोन वेळच्या अन्नासाठी रक्ताचे पाणी करावे लागते. गॅस सिलेंडरप्रमाणे ५० रूपयांची वाढ केली गेल्यावर त्याच्या तोंडाला फेस येतो. रिक्षाने, एस.टी. बसने प्रवास करायचा आहे म्हटल्यावर त्याच्या पायातलं बळ निघून जातं. आपल्या पायालाच चाकं असती तर बरं झालं असतं असं त्याला वाटतं. महागाईच्या सरणावर तो जळतो आहे. त्याला सचिनच्या फेरारीचं नवल नाही किंवा निस्सान जीटी-आरचं कौतुक नाही, त्याला चिंता स्वत:ची आहे, स्वत:च्या जगण्याची आहे. त्याला सचिनच्या कर्तृत्वाचा अभिमान आहे, पण हा सचिन आपलं भविष्य आणि भवितव्य बदलणार नाही, हे सर्वसामान्यांना माहीत आहे. सचिनच्या गाड्यांबद्दल लिहिणार्या माध्यमांनी आपल्या कुपोषित, रोडावलेल्या पोटाकडेही पाहावं, असं सर्वसामान्यांना वाटतं. सचिन मराठी माणूस आहे, त्याहूनही तो भारतीय आहे, त्यामुळे त्याचा सर्वांना अभिमान आहे. त्याचं ऐश्वर्य वाढो असेच सर्वांना वाटेल, परंतु गरीबांची फरफट संपो, त्यांचं दारिद्रय नाहीसं होओ, अशी आपण यानिमित्त शुभेच्छा व्यक्त केली तर त्यात काही अयोग्य नाही. होय ना?