बुधवार, १० ऑगस्ट, २०११

सचिनची गाडी आणि...

-उमाजी म. केळुसकर ⬑ ठसा आणि ठोसा ⬉
   
    आपल्या देदीप्यमान कामगिरीने भारतभरात सकारात्मक प्रवृत्तीचं प्रतीक बनलेल्या क्रिकेटपटू म्हणजे सचिन तेंडुलकर. अशा या सचिन तेंडुलकर याला भारतीय क्रिकेटसंघाचा कर्णधार धोनी याने एप्रिलमध्ये वर्ल्ड कपची भेट दिली. वर्ल्ड कपमध्ये सचिनची कामगिरी अपेक्षेप्रमाणे झाली नसली, तरी त्यातील त्याची उपस्थिती प्राणवायूप्रमाणे होती, त्यामुळे वर्ल्डकपचा आनंद द्विगुणीत झाला असे म्हटले तर त्यात काहीही वावगे नाही. या सर्वांमुळे प्रत्येक भारतीयांच्या मनात सचिनची प्रतिमा हनुमानरायाच्या हृदयातील श्रीरामाप्रमाणे दृढ झाली आहे. म्हणूनच सचिनला भारतरत्न मिळावे अशी प्रत्येक भारतीयाची अपेक्षा आहे. या अपेक्षेबद्दल कोणताही आक्षेप घेता येणार नाही, कारण हिमालयाकडे मान उंच करून पाहताना टोपी गळून पडावी, त्याप्रमाणे सचिनच्या कर्तृत्वाच उंची आहे. 
    या सचिनकडे फेरारी नावाची गाडी होती. फार मानाची गाडी होती. ती वादग्रस्त झाली होती, कारण त्या गाडीची कस्टम ड्युटी माफ करावी, म्हणून सचिनने सरकारकडे केलेल्या विनंतीवर प्रचंड टीकेची झोड उठली होती. धावांचा पाऊस पडणारा सचिन या खेळातून पैशांचा पाऊसही पाडतो, अशा सचिनने कस्टम ड्युटी माफ करण्यासाठी सरकारकडे हात पसरावे, याचे सर्वसामान्य सचिनप्रेमींना निश्चितच दु:ख वाटले. तर सांगण्यासारखे म्हणजे सचिनने ही फेरारी गाडी विकली आहे. फेरारी विकली म्हणजे तिच्या जागी सामान्य गाडी तो वापरणार नाही, हे ओघाने आलेच. सचिनने आता फेरारीपेक्षाही भारी गाडी खरेदी केली आहे. आता तो निस्सान जीटी-आर या लाल रंगाच्या चकाचक सुपर कारमधून सफर करणार आहे. ही कार नुकतीच त्याच्या ताफ्यात दाखल झाली आहे. ताफ्यात अशासाठी की, त्याच्याकडे एकसोएक कारस् आहेत. सर्वसामान्यांकडे एक सायकल असणेही अभिमानाचे असते, त्यामुळे सचिनसारख्या असामान्यांकडे गाड्यांचा ताफा असणे आणि त्याला त्याचा अभिमान वाटत असणे, यात नवल नाही. 
     सचिनच्या निस्सान जीटी-आर गाडीची किंमत ८७ हजार डॉलर्स, म्हणजे सुमारे चार कोटी रूपये आहे. तो त्याच्या घामाचा पैसा आहे. मग तो क्रिकेटमधील असो, त्याच्या हॉटेलमधील असो अथवा त्यांनी केलेल्या जाहिरातीमधील असो, त्याने घाम गाळला आहे, हे नक्की. त्याचे वडील रमेश तेंडुलकर यांनीही अध्यापनात घाम गाळला. विद्यार्थ्यांना घडविणे ही बाब साधी नाही. तेथे गाळला जाणारा घाम दिसत नाही आणि कोणाला त्याकडे गांभीर्याने पहावेसेही वाटत नाही. त्याचे वडील प्राध्यापक असले तरी उत्तुंग प्रतिभेचे कवी होते. त्यांनी कवितेचे चौकार, षट्कार ठोकले, परंतु त्यांचा चाहता वर्ग सीमित राहिला, अर्थात मराठी कवींची, साहित्यिकांची अशीच परिस्थिती असते. प्रसिद्धी आणि पैसा त्यांच्या नशिबी नसतो. प्रसिद्धी मिळाली तरी पैसा नाही, अशी दरिद्री अवस्था बर्याच कवी आणि साहित्यिकांची असते. प्रा. रमेश तेंडुलकर यांची ओळख कवी म्हणून फारच थोड्यांना आहे, ते सचिनचे वडील आहेत हीच त्यांची ओळख आता प्रस्थापित झाली आहे. एका अर्थाने सचिनने आपल्या वडिलांचे नाव उज्ज्वल केले आहे .सचिनने त्यांची कविता घेतली नाही, त्यांचे शब्द घेतले नाहीत, परंतु त्यांची मृदूता घेतली, आक्रमकताही घेतली. कवीमध्ये आक्रमकता असते ती प्रत्यक्ष दिसत नसते, परंतु त्याच्या कवितेत मृदूता आणि आक्रमकता यांचा मिलाफ आढळतो. त्यामुळे वडिलांचे हे दोन्ही गुण सचिनने उचलले. त्याची बोलण्यावागण् यातील मृदूता आणि खेळातील आक्रमकता पाहून हे तेंडुलकरी रसायन वेगळेच आहे, याची जाणीव होते. सचिन हा मध्यमवर्गीय पित्याचा पूत्र. त्याच्या वडिलांन सायकलवरून प्रवास केला असेल, पण सचिन आज कोट्यवधींच्या कारस्मधून प्रवास करतो आहे, हे दोन पिढ्यांतील आर्थिक आणि सामाजिक अंतर आहे. गरीब आणि श्रीमंतांमध्ये जरी दरी असते तशी ही दोन पिढ्यातील दरी असली तरी ही दरी संपन्नतेची आहे, ही संपन्नतेची दरी प्रत्येक सामान्य माणसाच्या जीवनात यावी, अशीच अपेक्षा सर्वसामान्यांचे हित पाहणारा प्रत्येकजण करेल.
     सर्वसामान्यांची आज अवस्था अशी आहे की, त्याला दोन वेळच्या अन्नासाठी रक्ताचे पाणी करावे लागते. गॅस सिलेंडरप्रमाणे ५० रूपयांची वाढ केली गेल्यावर त्याच्या तोंडाला फेस येतो. रिक्षाने, एस.टी. बसने प्रवास करायचा आहे म्हटल्यावर त्याच्या पायातलं बळ निघून जातं. आपल्या पायालाच चाकं असती तर बरं झालं असतं असं त्याला वाटतं. महागाईच्या सरणावर तो जळतो आहे. त्याला सचिनच्या फेरारीचं नवल नाही किंवा निस्सान जीटी-आरचं कौतुक नाही, त्याला चिंता स्वत:ची आहे, स्वत:च्या जगण्याची आहे. त्याला सचिनच्या कर्तृत्वाचा अभिमान आहे, पण हा सचिन आपलं भविष्य आणि भवितव्य बदलणार नाही, हे सर्वसामान्यांना माहीत आहे. सचिनच्या गाड्यांबद्दल लिहिणार्या माध्यमांनी आपल्या कुपोषित, रोडावलेल्या पोटाकडेही पाहावं, असं सर्वसामान्यांना वाटतं. सचिन मराठी माणूस आहे, त्याहूनही तो भारतीय आहे, त्यामुळे त्याचा सर्वांना अभिमान आहे. त्याचं ऐश्वर्य वाढो असेच सर्वांना वाटेल, परंतु गरीबांची फरफट संपो, त्यांचं दारिद्रय नाहीसं होओ, अशी आपण यानिमित्त शुभेच्छा व्यक्त केली तर त्यात काही अयोग्य नाही. होय ना?

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा