‘जलेबीबाई’च्या रुपात आजकाल चित्रपट जगतात ‘जिलेबी’च्या एका नवीन आवृत्तीने जन्म घेतला आहे. तिने ‘टपोरी’ समाजात जिलेबीची गोडी अधिकच वाढवली आहे. मला वाटते, बॉलिवूडही ‘जिलेबी’चा आणि तिच्या दिव्य स्वादाचा चाहता आहे. त्यामुळेच तर जिलेबीला सोनेरी पडद्यावर आणून उभे केले आहे. श्रीमतांच्या जगाची गोष्ट सोडली तर बिचारा गरीब, सर्वसामान्य माणूस, मिठाईच्या नावावर केवळ जिलेबीचं स्वप्न पाहू शकतो. काजूकतली, बदामपिस्ता यासारखी मिठाई सर्वसामान्यांसाठी बनलीच नाही. या मिठाईची मजा घेण्यासाठी खिशात मोठी रक्कम असली पाहिजे. पण जिलेबीची गोष्टच वेगळी आहे.
असे असले तरी सुमधुर, कर्णप्रिय आणि गरमागरम देहयष्टीने परिपूर्ण अल्पवस्त्रधारिणी ‘जलेबीबाई’ने आपल्या ठुमक्यांनी खरोखरच प्रेक्षकांना आकर्षित केलं आहे. त्यामुळे मूळ जिलेबीच्या अस्तित्वाचीच चिंता निर्माण झाली आहे. पण, दुदैवाने या प्रश्नाची चिंता कोणत्याही भारतीय हलवायाला वाटत नाही. पण जिलेबीची इभ्रत तर वाचवायला हवीच. कोणाला काही वाटो; पण जिलेबी वळणदार असली तरी मी ती साधी आणि सरळ मानतो. तिच्यात काही जोडतोड नाही आणि कृत्रिम गुंतागुंतही नाही, ती ‘जलेबी’बाईमध्ये आहे. जलेबीबाई आपण जिलेबीची प्रतिष्ठा वाढवत असल्याचा आव आणत असल्या तरी त्यात काही अर्थ नाही. जलेबीबाई खवय्यांना आपल्याकडे आकर्षित करुन घेत आहे. त्यामुळे खर्याखुर्या जिलेबीची वंचना सुरु झाली आहे. तिचा अवमानही होत आहे. परंतु कोणत्याही हलवाई अथवा जिलेबी भक्षणकर्त्यांकडून कोणतीही हरकत घेतली गेली नाही, विरोध प्रदर्शन केले गेले नाही, ही अतिशय दु:खाची बाब आहे. खरेतर ‘हलवाई असोसिएशन’ने एकजूट होऊन उपोषण केले पाहिजे होते.
तसेही आजकाल उपोषणाचा मोसम सुरु आहे. त्यामुळे जाहीर घोषणा केली पाहिजे होती की, आम्ही जिलेबीशिवाय दुसरं काहीही खाणार नाही. जोपर्यंत निष्पाप जिलेबीच्या नावाचा दुरुपयोग होईल, तोपर्यंत जिलेबीचे चाहते उपोषण, धरणे आंदोलनावर ठाम राहतील. त्यामुळे पोलिस आणि प्रशासनाची झोप उडाली असती. आणि दिल्लीच्या रामलीला मैदानातील बाबाच्या योगशिबिराप्रमाणे ‘जिलेबी मुक्ती आघाडी मोहिमे’वर लाठीचार्ज झाला असता, अश्रूधर सोडला गेला असता, तर संपूर्ण जगाची नजर जिलेबीवर केंद्रित झाली असती. मीडिया सक्रिय झाला असता, जनतेत हाहाकार माजला असता, न्यायपालिकेने ऍक्शन घेतली असती, तेव्हा एखाद्या ‘योग्य’ ऍडव्होकेट महाशयांनी कोर्टात पिटीशन दाखल केेली असती आणि ‘जिलेबी’च्या नावाचा दुरुपयोग आणि जिलेबीच्या लाजलज्जा आणि शीलभंगाचा खटला चालवला असता. बॉलिवूडवर दबाव निर्माण झाला असता आणि त्याला नाईलाजाने कॉपीराइट, सेन्सॉर बोर्डाच्या प्रतिबंधांकडे पाहून समझोता करावा लागला असता. बिचार्या जिलेबीला काही नुकसानभरपाई मिळाली असती आणि उपोषणकर्त्यांना प्रसिद्धीही.
मीडियानेदेखील अशा सरस-रसाळ वृत्ताला ‘लाईव्ह कव्हरेज’ देऊन टीआरपी गगनाला भिडवला असता. पुन्हा एखाद्या चित्रपटनिर्माता-दिग्दर्शकाला यापासून प्रेरणा मिळाली असती. मग त्याने यावर पुन्हा नवा चित्रपट काढला असता आणि बदनामी वादावादीचं सत्रं चालू राहिलं असतं. अशाप्रकारे जिलेबी आणि जलेबीबाईलाही प्रसिद्धी मिळाली असती आणि दोघांचीही दुकानदारी वाढीस लागली असती. पण तसं झालं नाही, हे जिलेबीचे की जलेबीबाईचे दुदैव, हे ज्याचं त्यांने शोधावे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा