सोमवार, २२ ऑगस्ट, २०११

उपभोगाचे स्वामी

-उमाजी म. केळुसकर ⬑ ठसा आणि ठोसा ⬉



     सध्या पुट्टपर्थीच्या सत्यसाईबाबांच्या गडगंज संपत्तीची त्यांच्या मृत्यूनंतर मोठी चर्चा सुरु आहे. ही चर्चा फक्त विचारवंतांमध्येच सुरु आहे. सर्वसामान्यांना या चर्चेत रस नाही, त्यांना फक्त श्रद्धा महत्त्वाची वाटते. तसेही त्यांच्या श्रद्धेला नाव ठेवणे योग्य होणार नाही, परंतु धनवान संत कसा असू शकतो याचा विचार तर केला पाहिजे. आपली श्रद्धा असलेली व्यक्ती संताच्या व्याख्येत आणि परंपरेत बसते का हा विचार व्हायला नको? येथेच श्रद्धेची मती कुंठीत होते, आणि अंधश्रद्धेचा मार्ग सुरु होतो.
     साधू-संत, अध्यात्मिक गुरुंची पुरातन काळापासूनची ओळख म्हणजे त्यांची विरक्तवृत्ती आणि एका ध्यासापोटी पत्करलेली खडतर तपश्चर्या. हा ध्यास सकळ मनुष्यजातीचे कल्याण करण्याचा असायचा. ‘जे का रंजले गांजले, त्यांना म्हणावे आपुले’ अशा स्वरुपाचा असायचा. हा ध्यास संत तुकारामांनी घेतला, हा ध्यास संत ज्ञानेश्वरांनी घेतला, हा ध्यास जुन्या सर्वच संतांनी घेतला. आधुनिक काळात संत गाडगे महाराजांनी तर या ध्यासाला कळसच चढवला, पण आजच्या आधुनिक ‘बाबा’ मंडळींनी या ध्यासालाच चूड लावली आणि ते आसन व वासना (मग ती पैसा, प्रसिद्धी कशाचीही असो.) यांत गुरफटले आहेत.
      सर्वसामान्य जनता आर्थिकदृष्ट्या आणि मानसिकदृष्ट्या लुळीपांगळी बनली आहे आणि ‘कफनी’तले साधू-संत दिवसेंदिवस धनवंत बनत चालले आहेत. अध्यात्मिक गुरुही संपत्तीच्या मोह-लोभापासून सुटलेले नाहीत, हे वास्तव तथाकथित आध्यात्मातील रोग दर्शवणारे आहे. नुकतीच काही बाबा-महाराजांच्या संपत्तीची आकडेवारी प्रसृत झाली आहे, ती थक्क करायला लावणारी आहे. बाबा रामदेव यांची वार्षिक उलाढाल १५००-२००० कोटी रुपये आहे. रविशंकर महाराज यांची वार्षिक उलाढाल ९००-१०० कोटी आहे. आसाराम बापू यांचा वर्षाचा टर्नओव्हर ४०० कोटी रुपये आहे. ‘अम्मा’ अमृतानंदमयी यांची वार्षिक उलाढाल ७००-९०० कोटी आहे. सुधांशू महाराज यांची वार्षिक उलाढाल ३५० कोटी रुपये. या सर्वांचे अनुयायी कोट्यवधी आहेत. कोट्यवधींचे प्रेम मिळवणे ही मोठी गोष्ट ठरते, परंतु कोट्यवधी पैसा मिळवणे ही या बाबा-महाराजांना छोटी करणारी गोष्ट आहे. या मंडळींना कशासाठी पैसा पाहिजे? त्यांना गाडगे महाराजांचे उदाहरण दिले गेले पाहिजे. देव माणूस आणि संत माणूस होऊन जगण्यापेक्षा माणूस म्हणूनच आयुष्यभर सेवा करण्यात गाडगे महाराज यांनी धन्यता मानली. १ फेब्रुवारी १९०५ रोजी बाबांनी सर्वसंग परित्याग केला. तेव्हापासून कमरेला गुंडाळलेले एक वस्त्र, वर ठिगळ लावलेला शर्ट आणि बरोबर पाण्यासाठी एक गाडगं याचं रुपात बाबा सर्वत्र वावरत असतं. तेव्हापासून त्यांना लोक ‘गाडगे बाबा’ म्हणू लागले. सर्वसंग परित्यागानंतर पुढे जवळजवळ बारा वर्षे बाबांनी भारतभ्रमण केले. या भटकंतीतून त्यांच्यात एका समाजक्रांतीकारकाचा जन्म झाला आणि खेड्यापाड्यातून समाजाची सेवा करीत लोकजागृती करणे हेच पुढील आयुष्याचे ध्येय त्यांनी मानले. मला कुणी गुरु नाही आणी मी कोणाचाही गुरु नाही हीच भावना ठेवून त्यांनी समाजाला प्रबोधन केले. समाजातील अज्ञान, अंधश्रद्धा, अस्वच्छता या समाजाच्या विरुद्ध गतीतून बहुजन समाजाबाहेर पडावा म्हणून त्यांची सतत धडपड असे. त्यासाठी बाबा समज असणार्यांना शब्दाने फटकारीत तर कधी कधी हातातल्या काठीचा फटका मारुनही शहाणं करीत आणि हे वागणं फक्त शब्दांपुरते मर्यादित नव्हतं, तर हातात खराटा घेऊन बाबा स्वत: गावाची स्वच्छता करुन लोकांना धडा घालून देत असत.
       लोकांकडून मिळालेला पैसा ते समाजालाच अर्पण करीत. आपल्या मृत्यूनंतर पुतळे किंवा स्मारके बनविण्यास त्यांनी मनाई केली, परंतु त्यांनी निर्माण केलेल्या धर्मशाळा, त्यांनी शाळांना केलेली मदत, त्यांनी केलेली समाजजागृती यामुळे गाडगेबाबा चिरस्मरणीय बनले आहेत. त्यांनी कधी प्रवासासाठी एसी गाडी वापरली नाही, पाय हेच त्यांनी आपले वाहन समजले.
      आजच्या बाबा-बुवा-महाराजांकडे वाहनांचे ऐश्वर्य असते, भाविक सेवेकरी असतात. ही ऐश्वर्यवान मंडळी उपभोगशून्य म्हणता येणार नाही, त्यामुळे हा आधुनिक काळ आता उपभोगवादी बुवा-महाराजांचा आहे हे लक्षात येते, त्यामुळे श्रद्धा आणि अंधश्रद्धा यातला फरक करायला सर्वसामान्य शिकले तरच त्यात त्याचे हीत आहे, असे म्हटले तर वावगे नाही.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा