-उमाजी म. केळुसकर ⬑ ठसा आणि ठोसा ⬉
सांगतो ऐका! तुम्हाला एखादं आदर्श आत्मचरित्र वाचायचं आहे? थोडी कळ काढा. त्याची सोय होतेय. गेल्या चाळीस वर्षांत लिहिले गेले नाही, असे आत्मचरित्र लिहिले जाणार आहे. १९७० साली, म्हणजे ४० वर्षांपूर्वी ‘सांगत्ये ऐका’ म्हणून हंसा वाडकर यांनी आपल्या आत्मचरित्रातून आपल्या जीवनाचं कटू वास्तव मांडलं. आता ‘बोलतो ऐका’ म्हणून यावर्षी एक नवीन आत्मचरित्र लिहिलं जाणार आहे आणि त्यात कटुवास्तवाऐवजी केवळ आणि केवळ साखरपेरणी असणार आहे. त्यामुळे सुखांताची अपेक्षा असलेल्या वाचकांना गोड गोड वाटणार आहे किंवा गोड वाटून घ्यावे लागणार आहे. पुणेकरांचं लाडकं व्यक्तिमत्त्व आणि भारतातील ‘महान’ व्यक्तिमत्त्व सुरेश कलमाडी हे आपले आत्मचरित्र लिहिणार आहेत.
लोकमान्य टिळकांनी मंडालेच्या तुरुंगात ‘गीतारहस्य’ लिहिलं, तर सुरेश कलमाडी तिहार तुरुंगात आपल्या आत्मचरित्रातून आयुष्याचा गुंता सोडवणार आहेत. त्यांनी गुंता सोडवो अथवा वाढवो, वाचकांच्या हाती तुरुंग परंपरेतील एक पुस्तक पडणार आहे, हे नक्की! पंडित नेहरुंनी तुरुंगातच ‘डिस्कव्हरी ऑफ इंडिया’ लिहून खर्या अर्थाने ‘भारताचा शोध’ घेतला. सुरेश कलमाडी यांनी आपले आत्मचरित्र लिहून स्वत:चा शोध घेतला तरी पुरेसे आहे. परंतु ते तसं करतील असं वाटत नाही. कारण आत्मचरित्रात खरं लिहून नागडं व्हायचं नसतं, मग भले आपण समाजात कितीही उघडे पडलेलो का असेना. याच्या टिप्स त्यांना मिळाल्याच असतील आणि खरं सांगायला ते इतके निर्बुद्ध नाहीत. ते तसे असते, तर १६०० कोटी रुपयांचा भ्रष्टाचार त्यांच्याकडून झालाच नसता. तो त्यांना पचला नाही, ही वेगळी गोष्ट आहे. सुरेश कलमाडी सध्या तिहार तुरुंगात आराम करीत आहेत. राष्ट्रकुल घोटाळ्यांचं त्यांच्यावर ओझं असलं, तरी ते तसं अजिबात जाणवू देत नाहीत. तुरुंगवासातील आपला वेळ ते पंचतारांकीत उपक्रम राबवण्यात घालवू शकत नाहीत. कारण ते कैदी आहेत. व्हीआयपी कैदी आहेत, म्हणून ते तिहार तुरुंगाधिकार्यांच्या कार्यालयात बसून चहापाणी पिऊ शकतात. तुरुंगातील इतर कैद्यांशी मनमोकळ्या गप्पा मारु शकतात. पण, तुरुंगाधिकारी तर व्हीआयपी नाहीत ना, त्यामुळे त्या बिचार्या तुरूंगाधिकाऱ्यांची अंदमानला तुरुंगाधिकारी म्हणून बदली केली जाते.
कोणाचं केव्हा काय होईल, हे सांगता येत नाही. पूर्वी स्वातंत्र्य योद्ध्यांना अंदमानात काळ्या पाण्याची शिक्षा दिली जायची, परंतु २०११ मध्ये कलमाडी यांच्या पायगुणामुळे तुरुंगाधिकार्यांची पार्सल थेट अंदमानला पाठवली जाते, यापेक्षा दुसरी कुठची गंमत नसेल. अशा गंमतीजमती कदाचित कलमाडी लिहितील, पण ‘माडी’च्या गोष्टी त्या लिहितील काय हा प्रश्नच आहे. कलमाडी यांना सुरसुरी आली आहे. त्यामुळे ते आत्मचरित्र लिहितीलच. त्यासाठी त्यांनी संगणकासाठी तुरूंग प्रशासनाची परवानगीही मागितली आहे. पण चार-दोन दिवसातच कलमाडी यांनी आपल्याला स्मृतिभ्रंश झाला असल्याचे जाहीर केले आहे. म्हणजे तसा अहवालच त्यांच्या एमआरआय चाचणीतून मिळाला आहे. त्यामुळे कलमाडी यांनी पूर्ण विस्मरण होण्यापूर्वी आत्मचरित्र लिहावे. तथापि, ते आत्मचरित्रात काय आणि कसं लिहितील याची थोडी जरी कल्पना केली, तरी गंमत वाटते. म्हणून गमती गमतीतच त्यांच्या खर्याखोट्या चरित्राचा पट अलगदपणे उलगडावासा वाटतो.
कलमाडी लिहितील, ‘मी जर महाराष्ट्रात जन्माला आलो नसतो, तर कर्नाटकात जन्माला आलो असतो. माझे वडील कर्नाटकातून पुण्यात वैद्यकीय व्यवसायासाठी स्थायिक झाले, म्हणून माझा जन्म पुण्यात झाला. कानडी विठ्ठलु जर पंढरपुरी राहून महाराष्ट्राच्या भक्तीचा मळा फुलवत आहे तर मी महाराष्ट्रात क्रीडेचा मळा फुलवला, यात नवल ते काय? तत्पूर्वी माझे शिक्षण पुण्यातील उच्चभ्रू शाळा-महाविद्यालयात झाले. त्यानंतर मी भारतीय हवाई दलात वैमानिक म्हणून देशाच्या सेवेसाठी रुजू झालो. १९६५ च्या भारत-पाक युद्धात भाग घेण्याची मला संधी मिळाली. हवाई दलाच्या सेवेत आठ पदकांची मी घवघवीत कमाई केली. ती मला तेव्हा लाखो-कोट्यवधी रुपयांपेक्षा मोठी वाटली. नंतर मात्र माझा दृष्टीकोन बदलला. मी कॉंग्रेसमध्ये आलो. तेथे मी अर्थपूर्ण राजकारण केलं. मी राज्यमंत्री झालो. खासदार बनलो. या दरम्यान मी क्रीडाक्षेत्रात माझा ठसा निर्माण केला. मी डोळस बनलो होतो. मला कळलं होतं की, हजारो कोटींचा भ्रष्टाचार या देशातील नागरिकांना आता नवा राहिलेला नाही. ज्याच्या हाती ससा तो पारधी या न्यायाने आपल्या देशातील उच्चपदस्थ व्यक्ती बिनबोभाट भ्रष्टाचार करू लागल्या आहेत. पण, भ्रष्टाचाराच्या या मांदियाळीत आपल्या महाराष्ट्राचा कोणी नाही याची मला शरम वाटली. म्हणूनच मी राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धांच्या आयोजनात तब्बल १६०० कोटी रुपयांचा भ्रष्टाचार केला. महाराष्ट्राचा नावलौकिक वाढविण्यासाठी मी हे सर्व केलं, पण माझी ही सद्भावना कोणी लक्षात घेतली नाही आणि मला थेट तिहार तुरुंगात कोंबलं.’ कलमाडी आपलं अर्ध खरं आणि अर्ध खोटं आत्मचरित्र कसं लिहितील. याची ही एक चुणूक दाखवली आहे. ज्यांना आत्मचरित्र लिहायचं आहे त्यांनी या लेखाचा अभ्यास केला तरी ते कलमाडींपेक्षा भन्नाट आत्मचरित्र लिहू शकतील यात शंका नाही.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा